जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १२. वाशिम ते अकोला

Submitted by मार्गी on 23 December, 2018 - 11:52

जे सत्य सुंदर सर्वथा....: १२. वाशिम ते अकोला

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१. चाकण ते केडगांव चौफुला

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):२. केडगांव चौफुला ते इंदापूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):३. इंदापूर ते पंढरपूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):४. पंढरपूर ते बार्शी

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):५. बार्शी ते बीड

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):६. बीड ते अंबेजोगाई

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):७. अंबेजोगाई ते हसेगांव (लातूर)

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):८. हसेगांव (लातूर) ते अहमदपूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):९. अहमदपूर ते नांदेड

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१०. नांदेड ते कळमनुरी

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):११. कळमनुरी ते वाशिम

२३ नोव्हेंबरची पहाट. आज वाशिमवरून अकोल्याला जायचं आहे आणि चौथ्या बाल गृहाला भेट द्यायची आहे. हा ह्या मोहीमेचा एका अर्थाने सर्वोच्च बिंदू असेल. सकाळच्या थंडीत वाशिममधून विहान प्रोजेक्ट ऑफीसमधून निघालो. तिथे देवानंदनी मला निरोप दिला. त्याआधी पहाटे उठून त्यांनी माझ्यासाठी कॉफी केली होती. हे ऑफीस अकोला कॉर्नरवरच असल्यामुळे लगेचच हायवेला आलो. आज बराच उतारही मिळणार आहे आणि उद्या काही अंतर परत ह्याच रस्त्याने वापस येईन तेव्हा तो चढ होऊन लागेल. विचार करतोय काय प्रवास राहिला आहे आत्तापर्यंत! सायकलने किती साथ केली आहे. विश्वास वाटत नाही. सुरुवातीचे चार- पाच दिवस तसा मी प्रवाहाविरुद्ध पोहत असल्यासारखा होतो. पण त्यानंतर मोठा प्रवाह तयार झाला. शरीर व मन एका फोर्समध्ये आलं. आता जणू सगळं जवळजवळ आपोआप होतं. पहाटे साडेचारला आरामात जाग येते. शरीरही आपोआप सायकल चालवतं आहे आणि मनही रोजच्या राईडसाठी तयार असतं. जसं पाणी वाहत जाताना त्याची रेष बनते व ते त्याच रेषेतून वाहत जातं, तसं शरीर व मनाची ह्या क्रमामध्ये रेष बनली आहे. किंवा वेगळ्या शब्दात- मै ठहरा रहा, जमीं चलने लगे! इतकं सगळं सोपं होतंय. आजचा दिवस तर मस्तच जाणार, आज ८४ किलोमीटर सायकल चालवायची आहे. पण बराच उतार असल्याने खूप मजा येईल. तसंच आज अनेक दिवसांनंतर बाल गृहातल्या मुलांनाही भेटेन.

२१ किलोमीटर पूर्ण होताना मालेगांव जहांगीरमध्ये पहिला ब्रेक घेतला. हॉटेलवाल्याला माझ्या प्रवासाविषयी व उद्दिष्टाविषयी सांगितलं. कालच्या वाशिमच्या कार्यक्रमाची बातमी आली होती, एकाने वाचलीही आहे. जवळजवळ प्रत्येक ठिकाणी पत्रकारांनी व वृत्तपत्रांनी माझ्या बातम्या दिल्या आहेत. पूर्ण प्रवासात सोबत जाणा-या लोकांची विचारपूस तर सुरूच आहे. अनेक लोक असेही भेटले जे म्हणाले, तुझी गेअरची सायकल आहे ना, मग मस्त पळत असेल, जास्त चालवावीच लागत नसेल. काही जण तर टीशर्टचा मॅसेज वाचतात व त्यांना वाटतं की एचआयव्ही तपासणीच सुरू आहे. मालेगांव जहांगीरनंतर हळु हळु आसमंत बदलत गेला. पातूरच्या आधी एक घाट उतरून जायचं आहे. इथे अगदी जंगलासारखं दृश्य आहे. वन क्षेत्रही असावं. घाट उतरताना मस्त नजारे दिसले. अकोला जिल्ह्यात आल्यावर सातपुडाच्या उंबरठ्यावर आल्यासारखं वाटत आहे. सह्याद्रीच्या चरणतळापासून सुरू झालेली ही मोहीम आता सातपुड्याच्या अंगणात येते आहे! काही लोकांनी आधी म्हंटलं होतं की, रोडवर ट्रॅफीक बरीच लागेल, सावध जा. पण तशी ट्रॅफिक नव्हती. रस्ता थोडा छोटा आहे, पण अगदी उत्तम आहे. त्यामुळे वेगाने पुढे जात राहिलो. अकोल्यातलं सूर्योदय बाल गृह शहराच्या एका टोकाला आहे. अकोला जिल्ह्याचा कार्यक्रम सिव्हील हॉस्पिटलमध्ये आहे, त्यामुळे पहिले तिथे जावं लागेल. अकोल्याला प्रवासात अनेकदा आलो आहे, पण गावात पहिल्यांदाच येतो आहे. पत्ता विचारत हॉस्पिटलला पोहचलो.

कार्यक्रम जिल्हा शल्यचिकित्सक मॅडमच्या केबिनमध्ये झाला. दनईकर सरांसोबत डापकूची टीम, विहान टीम, लिंक वर्कर्स हे सगळे चर्चेला आहेत. इथे एचआयव्हीच्या काही वेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. एचआयव्ही असलेल्या गर्भवती महिलेच्या अपत्याला एचआयव्ही होऊ नये, ह्यासाठी मोठे प्रयत्न केले जातात. अठरा महिन्यांपर्यंत बाळाला नेव्हेरीपीन औषध व निगराणी आवश्यक असते. तसेच शिशुच्या आई- वडीलांची जागरूकताही तितकीच महत्त्वाची आहे. इथे चर्चेत सांगण्यात आलं की, प्रत्येक गर्भवती महिलेची एचआयव्ही तपासणीही केली जाते. आपल्या समाजात जवाबदारीचा अभाव असल्यामुळे अनेकदा मुलं कच-याच्या ढिगाजवळ फेकली जातात. त्या मुलांचीही एचआयव्ही तपासणी केली जाते. काही वेळेस एचआयव्ही असलेल्या महिला आपला स्टेटस न सांगता प्रसुतीसाठी येतात. त्यावेळी आरोग्य कर्मचा-यांच्या अडचणी वाढतात. त्यांना फार सजग राहावं लागतं. पण आरोग्य कर्मचा-यांच्या कामांमध्ये मदतीला विहान व लिंक वर्कर्सच्या एनजीओजसारखे लोक असल्यामुळे त्यांना मदत मिळते. एचआयव्ही असलेल्या व्यक्तींना तपासून ट्रीटमेंटसोबत लिंक करणे, ह्या उद्देशाने सरकारद्वारे लिंक वर्कर प्रोजेक्ट चालवला जातो व अनेक एनजीओजद्वारे तो राबवला जातो. त्यात अनेक अडचणी‌ असतात. सेक्स वर्कर्स, ट्रान्सजेंडर व्यक्ती व समलिंगी व्यक्तींसोबत काम करणं सोपं नसतं. पण हळु हळु संबंधित लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे. त्यामुळे एचआयव्ही संक्रमणाचं प्रमाण हळु हळु घटत आहे. पण अद्याप भरपूर काम केलं जाणं‌ बाकी आहे. एका गोष्टीमुळे थोडासा दिलासा नक्कीच मिळतो की, भविष्यात चांगली जागरूकता व उपचारांच्या सुविधा असताना आईकडून मुलाला होणारं संक्रमण जवळजवळ थांबवता येईल. पण तोपर्यंत मुलांसोबत काम करण्याची मोठी आवश्यकता आहे. ह्या कार्यक्रमानंतर हॉस्पिटलमध्येच माझे एक नातेवाईक थोडा वेळ भेटले. नंतर बाल गृहाचा रस्ता दाखवण्यासाठी कार्यक्रमातले दोन जण माझ्या सोबत आले.

अकोल्याच्या आउटस्कर्टसमध्ये मलकापूरला सूर्योदय बाल गृह आहे. इथे पोहचलो तेव्हा आजचे ८४ किमी पूर्ण झाले. आज अपेक्षेनुसार सर्वांत जास्त वेग मिळाला. उद्या माझे ह्या मोहीमेतले हजार किलोमीटर पूर्ण होतील. पण आजची व्हिजिट खूप महत्त्वाची आहे. सूर्योदय बाल गृह भय्युजी महाराजांच्या श्री दत्त धार्मिक एवम् पारमार्थिक ट्रस्ट, इंदौर द्वारे चालवलं जातं. भय्युजी महाराजांच्या प्रेरणेने विविध सामाजिक विषयांवर काम केलं जात होतं. पण त्याची माहिती भय्युजी महाराजांच्या निधनानंतरच मिळाली, ह्याची खंत वाटते. असो. ह्या बाल गृहालाही डॉ. पवन चांडकांच्या एचएआरसी संस्थेद्वारे मदत केली जाते. जेव्हा बाल गृहामध्ये पोहचलो, तेव्हा दुपारचे दोन वाजले आहेत. इथले अधीक्षक शिवराज पाटील सरांनी व मुलांनी माझं स्वागत केलं. हे बाल गृह वस्तीमध्येच आहे. मुलांनीच मला माझी खोली दाखवली व बाकीच्या गोष्टी सांगितल्या. आराम झाल्यानंतर मुलांसोबत व इथल्या कार्यकर्त्यांसोबत बोलणं सुरू झालं. भय्युजी महाराजांनी जी अनेक कामं सुरू केली, त्यातलीच ही एक आहे. इथे दहावीपर्यंतची पॉझिटीव्ह मुलं राहतात. काही सरकारी शाळेत व काही खाजगी शाळेत जातात. मुलांच्या देखभालीसाठी इथे एक व्हॅनसुद्धा आहे. आत्तापर्यंत पाहिलेल्या बाल गृहांच्या तुलनेत हे बालगृह थोडं वेगळं वाटलं व स्वाभाविकच आहे, कारण ह्या बालगृहाची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. इतर बाल गृहे त्या त्या कार्यकर्त्यांनी उभी केली. हे श्री दत्त ट्रस्ट, इंदौर ह्यांचं बाल गृह आहे व विविध कार्यकर्ते त्यात नंतर जोडले गेले. आत्ता अधीक्षक म्हणून काम करणारे शिवराज पाटील सरही भय्युजी महाराजांच्या संपर्कात आलेले कार्यकर्ते होते. त्यांनी म्हंटलंही की जोपर्यंत महाराज होते, तेव्हा बाल गृहाला कशाचीच चिंता नव्हती, महाराज बाल गृहाच्या गरजेकडे लक्ष देत होते. पण त्यांच्या निधनांतर ही जवाबदारी आता कार्यकर्त्यांना करावी लागत आहे. हे बाल गृहसुद्धा समाजातील विविध व्यक्तींच्या सहकार्याने व एकत्र येऊन काम केल्याने सुरू झालं आहे.

संध्याकाळी माझे एक परिचित श्रीकांत कुलकर्णी जी मला भेटायला आले. मुलांसोबतही हळु हळु गप्पा सुरू झाल्या. इथे मुलांना खेळायला आसपास जागा आहे. बाल गृहाची इमारत तीन मजली आहे. इथे मुलांसोबत महिला केअरटेकर्स व अन्य कार्यकर्ते राहतात. मुलांशिवाय इतरही काही पॉझिटीव्ह लोक इथे राहतात व कामात सहभाग घेतात. एकदा एक मूक- बधिर महिला इथे आल्या, इथे त्यांना निवारा मिळाला व आज त्या इथे सफाई कामगार म्हणून काम करतात. मला भेटायला आलेले श्रीकांतजी शिक्षक आहेत, तेव्हा त्यांनी मुलांना केन्द्रीय विद्यालय प्रवेश प्रक्रियेविषयी सांगितलं. माझ्यामुळे तेही आता ह्या बाल गृहाशी जोडले गेले आहेत. मुलांसोबत चांगली भेट झाली. गप्पा मारताना हेतु त्यांच्या चेह-यावर हसू आणणं, हा आहे. त्यामुळे औपचारिक बोलण्यापेक्षा त्यांना बोलू दिलं. आणि असे प्रश्न विचारले- आपल्यापैकी अजिबात न भांडणारं कोण आहे, किंवा तुम्हांला काय आवडतं हेही सांगा आणि काय आवडत नाही, हेही‌ सांगा. मुलं मोकळी झाली व हसायला लागली. काही मुलांनी मात्र सांगितलं- मला रडायला आवडत नाही... परिचय करून देताना काही मुलांनी फक्त स्वत:चं नाव सांगितलं, वडिलांचं नाव व आडनाव सांगितलं नाही... ह्या गप्पांमध्येच एका दहावीतल्या मुलीने हे गाणं म्हणून सगळ्यांनाच भावुक केलं-

राते ढलती नही
दिन भी निकलता नही
उसकी मर्ज़ी बिना पत्ता हिलता नही
रब जो चाहे वही तो होना है
आदमी खिलौना है..
रब जो चाहे वही तो होना है..
आदमी खिलौना है..

जीना है हसके हमे जीवन का हर पल,
कोई न जाने यहा क्या हो जाये कल..

हर ख्वाब यहा पे संजोना है..
आदमी खिलौना है..
रब जो चाहे वही तो होना है..
आदमी खिलौना है......

... सर्व बाल गृहांप्रमाणेच ह्या बाल गृहातल्या मुलांसाठी आवश्यक सुविधा आहेत. काही प्रमाणात त्यांना अनेक संस्था व व्यक्तिगत देणगीदार ह्यांच्याकडून मदतही मिळते. पण तरीही वाढणारी महागाई, नवीन येणारी मुलं, अधिक सुविधांची आवश्यकता ह्यामुळे आणखी मदतीची गरज आहे. त्यामुळे पुन: एकदा आपल्याला विनंती आहे की, ह्या बाल गृहांचं काम बघावं, कधी जमेल तेव्हा तिथे जाऊन तिथल्या मुलांना भेटावं आणि इच्छा असेल त्यानुसार ह्या कामामध्ये आपला सहभाग घ्यावा, जसा मला घेता आला.

सहभागासाठी संपर्क:

सूर्योदय बाल गृह, भांडे नर्सिंग महाविद्यालयाच्या जवळ, बसेरा कॉलनी, अकोला, महाराष्ट्र 444004. श्री शिवराज पाटील ह्यांचा मोबाईल क्र: 090282 33077

पुढचा भाग: जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १३. अकोला ते रिसोड

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults

खूप छान उपक्रम आणि खूप साऱ्या शुभेच्छा!
बालगृहाला भेट देण्याची इच्छा मनात जागृत झालीये, आणि ती पुढच्या महिन्यात पूर्णही होईल असं दिसतंय.
पुढील उपक्रमांसाठी अनेकविध शुभेच्छा!!!

बाळाला नेविरापीन 18 महिने देत नाहीत.

सहा आठवडे देतात , ( जर आईने ए आर टी अगदी कमी काळ खाल्ली असेल , म्हणजे सहा महिन्यापेक्षा कमी , तर बाळाला नेविरापींन 12 आठवडे देतात )

त्यांनतर 18 महिन्यापर्यंत septran देतात व अँटीबॉडी टेस्ट करतात.

शुभेच्छा.

उडान विहानचा सहभाग हा एचआयव्ही कँट्रोलचा एक महत्वाचा भाग आहे.

@ ब्लॅक कॅट, ओके, तपशीलांबद्दल धन्यवाद. मी एचआयव्हीवर काम करणारा एक्स्पर्ट नसल्यामुळे मला तांत्रिक बाबी माहिती नाहीत. चर्चेत जे ऐकलं होतं, ते लिहिलं होतं, इतकंच. धन्यवाद!