जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ९. अहमदपूर ते नांदेड

Submitted by मार्गी on 17 December, 2018 - 07:32

जे सत्य सुंदर सर्वथा....: ९. अहमदपूर ते नांदेड

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१. चाकण ते केडगांव चौफुला

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):२. केडगांव चौफुला ते इंदापूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):३. इंदापूर ते पंढरपूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):४. पंढरपूर ते बार्शी

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):५. बार्शी ते बीड

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):६. बीड ते अंबेजोगाई

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):७. अंबेजोगाई ते हसेगांव (लातूर)

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):८. हसेगांव (लातूर) ते अहमदपूर

२० नोव्हेंबर, नववा दिवस. पहाटे अहमदपूरमध्ये आकाश निरभ्र आहे. योगायोग म्हणजे मी ज्यांच्याकडे थांबलो होतो, ते आज परभणीला बाबांकडेच जाणार आहेत! त्यामुळे थोडं सामान त्यांच्यासोबत पाठवलं. सायकलवर अंदाजे बारा किलो सामान असेल, त्यातलं एक- दिड किलो कमी झालं. सामान जर नीट लावलं तर जाणवतही नाही. आणि इतक्या दिवसांनंतर तर ते अजिबातच जाणवत नाही. आजचा टप्पाही छोटा आहे, इथून नांदेडपर्यंत ७४ किमी होतील. आज विशेष म्हणजे मी आजोळी जाईन व मामाच्या घरी थांबेन! ह्या स्वप्नवत प्रवासातला आणखी एक मस्त टप्पा!

सकाळचा एक तास मस्त थंडी होती, त्यानंतर कोवळ्या ऊन्हातल्या सायकलिंगचं सुख सुरू झालं. ह्या प्रवासात मला रोज तीन प्रकारचं हवामान मिळत आहे- सकाळी लवकर एक तास तीव्र थंडी, नंतर दोन तास छान वाटेल असं ऊन आणि शेवटचे एक- दोन तास कडक ऊन. आजनंतर ह्या प्रवासाचे फक्त पाच टप्पे उरतात. पण आपलं मन नेहमीच उड्या मारत असतं. अजून आजचा टप्पाही बाकी आहेच! आता खूपच मस्त हायवे लागला आहे. पुढच्या रस्त्यांसंदर्भात काही जणांनी मला सांगितलं आहे की, पुढेही रिसोडपर्यंत रस्ते चांगलेच असतील. हायवेच असतील. लोहा येण्याच्या आधी नाश्ता करताना माझे मित्र व रनिंगचे माझे गुरू बनसकर सरांचा फोन आला की लोहा गावात त्यांचे एक मित्र मला भेटतील! मी म्हणालो की, भेटतो सर, पण फक्त पाच मिनिटंच. ते म्हणाले ठीक आहे. आता नांदेड जिल्हा सुरू झाला आहे. वाटेत एक सरदारजी सायकलीवर जाताना दिसला, बहुतेक एखाद्या गुरुद्वाराकडे प्रवास करत असावा. हात दाखवून त्याला अभिवादन केलं, तोही हसला. लोह्याच्या आधी एक छोटा घाट- उतार आला. पाच मिनिटंच भेटायचं होतं, पण शोधाशोध आणि चहा- गप्पांमध्ये वीस मिनिटं गेली. पण हरकत नाही, तसंही आज मला जवळच जायचं आहे.

काल ढगाळ वातावरणामुळे मनात किंचित अस्वस्थ वाटत होतं. जेव्हा ऋतु नसताना ढग येतात, तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटू शकतं. काही जणांच्या मते आकाश ह्या पंचमहाभूताशी आपलं शरीर जोडलेलं आहे व जेव्हा असे ऋतु नसताना ढग येतात, तेव्हा हा संपर्क क्षीण होतो व त्यामुळे मन अशांत होतं. काही जणांना जमिनीसोबतचा संपर्क क्षीण झाल्यावर असं अस्वस्थ वाटतं- दुर्गम डोंगरात किंवा समुद्रात बोटीत बसल्यावर. पण आज हवा मस्त आहे व त्यामुळे मनही प्रसन्न आहे. लवकरच पुढचा टप्पा पूर्ण होत गेला व नांदेड म्हणजेच हजूर साहीब नांदेड जवळ आलं. इथे श्री गुरू गोविंद सिंघजी महाविद्यालयापासून हायवे सोडून डावीकडे वळालो व नवीन ब्रिजवरून सरळ वजिराबादला पोचलो. तिथे शिवाजी पुतळ्याजवळ जुनं सिव्हिल हॉस्पिटल आहे. इथेच आता कार्यक्रम होईल.

योगायोगाने कार्यक्रमामध्ये माझे मामाही मित्रांसोबत आले. इथे स्वागत करताना ह्या सायकल मोहीमेसाठी खास बॅनर केला होता, ते बघून छान वाटलं. District AIDS Prevention and Control Unit (डाप्कू), अन्य सरकारी अधिकारी, अमीलकंठवार सर, विहानची टीम, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या लिंक वर्कर प्रोजेक्टची टीम, पॉजिटीव्ह नेटवर्क ह्या सगळ्यांनी स्वागत केलं. हॉस्पिटलच्या मागे डाप्कूच्या कार्यालयात कार्यक्रम झाला. इथे संबंधित टीम्सचे अनेक सदस्य आले. सगळ्यांनी आपले अनुभव सांगितले. ह्या चर्चेत मला दोन मुद्दे मुख्य वाटले. अनेकांनी हे सांगितलंच की, एचआयव्ही ह्या मुद्द्यावर काम करताना खूप अडचणी येतातच. आणि अनेकदा तर त्यांना रुग्णांना घेऊन जावं लागतं. त्यात अनेकदा ह्या कर्मचा-यांना किंवा एनजीओजच्या कार्यकर्त्यांना स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करावे लागतात. आणि ह्यामानाने त्यांना मिळणारं मानधन कमी असतं. काहींनी हेही सांगितलं की, मानधन कमीच असतं, पण ते ही फक्त नोकरी (सरकारी किंवा संस्थेतली) म्हणून करत नाहीत, तर एक सेवा समजतात. जेव्हा एखादा रुग्ण योग्य प्रकारे ट्रीटमेंट सुरू करतो, तेव्हा त्यांना खूप समाधान मिळत असतं. ह्याच चर्चेत एका ताईंनी सांगितलं की, female sex workers सोबत काम करताना अनेक अडचणी येतात. त्यांच्याशी जाऊन बोलणं, त्यांचा विश्वास संपादन करणंही कठीण असतं. ताईंनी सांगितलं की, अशा वेळी एकदा त्यांना FSW सोबत बोलताना असं दाखवावं लागलं की, त्या स्वत:ही FSW आहेत. तेव्हा कुठे बोलता आलं व नंतर विश्वास संपादन करता आला. खरंच हे जगच खूप वेगळं आहे. ह्या क्षेत्रात ज्यांनी काम केलं आहे, त्यांनाच त्या गोष्टी माहिती असतात. मलाही ह्या विषयाबद्दल आणखी खूप गोष्टी समजून घ्यायची गरज आहे. इथेच एक गोष्ट सांगतो. माझ्या टीशर्टवर जे लिहिलं आहे- U = U, तो एक उद्दिष्टाचा मॅसेज आहे. जगभरात एचआयव्हीवर जे काम सुरू आहे, त्यामध्ये सध्या हे एक उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे. एचआयव्ही व्हायरस इतका नियंत्रणात यावा, इतका मर्यादित व्हावा ज्यामुळे तो undetectable होईल व untransmitable सुद्धा होईल. म्हणून U = U चा अर्थ undetectable and untransmitable स्थितीकडे वाटचाल करणे, हा आहे. ह्याचे इतरही अर्थ होऊ शकतात- जसे तुम्ही आम्ही सोबत आहोत, एकमेकांबद्दल संवेदनशील आहोत.

कार्यक्रमात माझ्या मामाचे मित्र श्री शेंबोलीकर आले होते. त्यांचं ग्रामीण भागात बरंच काम आहे. जल संवर्धनावर त्यांनी काम केल्यानंतर त्यांना जल नायक पुरस्कार मिळाला आहे. चर्चेत मुद्दा आला की, एचआयव्ही असलेल्या लोकांना सरकारी सुविधा मिळण्यात अडचणी येतात, जसं दुर्धर रोगांच्या रुग्णांना मिळणारे सरकारी लाभ त्यांना मिळतात, पण त्यांना त्यासाठी डॉक्युमेंटस द्याव्या लागतात आणि त्यात अनेक अडचणी असतात. कारण त्यांचा एचआयव्ही स्टेटस ते उघड करू शकत नाहीत. त्यामुळे अशी कागदपत्रे प्राप्त करणे (जसं सरपंचांद्वारे गंभीर दुर्धर रोग असल्याच्या पत्रावर स्वाक्षरी मिळवणे) अनेकदा अवघड असतं. ह्यावर शेंबोलीकरजींनी सांगितलं की, ते ह्या संदर्भात संबंधित यंत्रणेसोबत बोलतील. गरज असेल तर सरकार दरबारीही हा विषय मांडतील. ह्या मोहीमेच्या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक ठिकाणी अशा ज्या चर्चा होत आहेत, त्याचा हा एक दृश्य परिणाम आहे असं मला वाटतं. कारण अनेक लोक अधिकारी- एनजीओजचे कार्यकर्ते एकमेकांना भेटत आहेत व त्यामुळे चर्चेचा ह्या कामालाही उपयोग होतोय. असो.

खूप उशीरापर्यंत कार्यक्रम चालला. नंतर नांदेडातच तीन किलोमीटर सायकल चालवून मामाच्या घरी भाग्यनगरला पोहचलो. आजोळ असल्यामुळे अगणित आठवणी! पण आठवणींकडे लक्ष द्यायला जास्त वेळ नाही. माझे काही सायकलिस्ट मित्रही नांदेडला आहेत, पण ते एका सायकल मोहीमेवर गेले आहेत. एकदा वाटलं की, नांदेडमध्ये ह्या सायकलीचा मॅकेनिक मिळेल, त्याच्याकडून सायकल चेक करून घ्यावी. पण नंतर इच्छा झाली नाही. मीच सायकल तपासली. नट बोल्ट तपासले. नंतर रोजच्याप्रमाणे रूटीन केलं. ह्या पूर्ण मोहीमेत माझ्यासाठी एक गोष्ट फार चांगली ही राहिली की, एक- दोन दिवस सोडले तर मला अर्जंट सबमिशन्स/ डेडलाईन्स आल्या नाहीत. आणि एक- दोन छोट्या अर्जंट सबमिशन्स सायकल चालवण्याच्या वेळेतच आल्या व त्या मात्र मला करता आल्या नाहीत. त्या फारच छोट्या होत्या व नंतर काहीच तशी वेळ आली नाही. मामा- मामीसोबत गप्पा झाल्या. इथे अशा प्रकारे सायकलीवर येणं मला खरंच स्वप्नवत् वाटतंय! कधी कधी सत्य हेही स्वप्नासारखं होऊन जातं! असो. आता राहिले पाच दिवस.

पुढचा भाग: जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १०. नांदेड ते कळमनुरी

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults

एचआयव्ही व्हायरस अनट्रान्समिटेबल करण्याचं उद्दिष्ट पटलं. पण अनडिटेक्टेबल का? तसं झालं तर इतरांना धोका वाढणार नाही का? ह्या क्षेत्रात कार्य करणारी मंडळी एकमेकांना भेटत आहेत हे वाचून बरं वाटलं. अश्याने चांगलं नेटवर्क बनेल आणि काम अधिक चांगल्या प्रकारे होईल. ह्याआधीच्या लेखाच्या प्रतिसादांत माझ्या प्रश्नांना तुम्ही दिलेली उत्तरं वाचली. धन्यवाद!

सर्वांना वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल अनेक धन्यवाद! Happy

@ स्वप्ना राज ताई, अनडिटेक्टेबल तेव्हाच होतो जेव्हा तो अनट्रान्समिटेबल होतो. ते जवळजवळ समानार्थीच शब्द आहेत. शिवाय अनडिक्टेबल म्हणजे एका अर्थाने मानसिक स्टिग्म्यापासून सुटका. मानसिक दृष्टीने सकारात्मक अशी स्थिती. म्हणून ते तसं असेल.