स्तनपान कर्म नोहे जाणिजे उदरभरण...

Submitted by राजेश्री on 4 August, 2018 - 11:19

स्तनपान कर्म नोहे जाणिजे उदरभरण....

मागच्या आठवड्यात आमच्या अधिकारिणी या व्हाट्स ऍप ग्रुप वर याच विषयावर आमची चांगलीच जुंपली होती.जुंपली म्हणजे साहजिकच तात्विक वाद आणि प्रतिवाद,ग्रुप वर एक फोटो पोस्ट share झाली त्या फोटोत युरोपियन संसदेतील एक महिला संसद सदस्य संसदेत आपलं मत मांडायला किंवा भाषण करायला उभ्या होत्या.आणि उभ्या उभ्या ,बोलता बोलता त्या आपल्या बाळाला अंगावर पाजत होत्या किंवा त्या आपल्या बाळाला स्तनपान करीत होत्या.कुणी खूपच छान अशी दाद दिली तर कुणी अंगठा वर करून आपली सहमती दर्शवली.त्या बद्दल एक msg आला त्यामध्ये म्हंटल की स्तनपान करविणे हा त्या आईचा आणि मुलाचा वैयक्तिक प्रश्न होता.तिला तिच्या मुलाला दूध पाजयच होत तर पाचेक मिनिटांचा प्रश्न होता ती कुठे दुसरीकडे(आडोश्याला)जाऊन बाळाला पाजून आली असती तर कुणी काही हरकत दर्शवली नसती.मला हे म्हणणं मांडणाऱ्या अधिकारिणी चे म्हणणे पटले आणि मी हो सहमत आहे अशी या प्रतिक्रियेवर माझा प्रतिसाद व्यक्त केला.मग या मताशी बिलकुल सहमत नसणाऱ्या इतर अधिकारिणी या प्रतिसादावर प्रतिवाद करायला सज्ज झाल्या.कुणी म्हणाले का ती जाईल बाहेर बाळाला दूध पाजायला .बाळ तीचे दूध तिचे ती ठरवेल बाळाला कधी आणि कुठे पाजायचे. मग मी मत मांडल एक सामाजिक शिष्टाचार किंवा आपल्या अवतीभोवतीची माणसांचा काही वैचारिक गोंधळ उडू नये किंवा मग एक awkwardness येऊ नये याची दक्षता आपण घ्यावी अस मला वाटत.यावरही प्रति म्हणणं मांडल गेलं का?आपण का विचार करायचा या गोष्टीचा मला बाळाला दूध पाजायचे आहे मी आत जाते किंवा आता तुम्ही बाहेर जा असे का सांगू मी?माझ्या आजूबाजूचे ठरवतील ना काय करायचंय ते.थांबले तर थांबतील,त्यांना जाऊ वाटलं ते पांगतील. मला हे म्हणणं ,हा विचार नाही पटला मग मी म्हणाले स्तनपान हा आई आणि मुलाच्या अनुभूतीचा प्रश्न आहे.आई ज्यावेळी आपल्या मुलाला अंगावर पाजत असते त्यावेळी तिने आपल्या मुलाशी, त्याच्या भुकेशी ,त्याच्या त्या सुखाशी तादात्म्य पावणे अभिप्रेत असते.
आता हा लेख लिहिताना जेवढं आठवलं तेवढं आणि तस नाही आठवलं पण माझं हे मत किंवा विचार मी त्यावेळी दुसऱ्या शब्दात व्यक्त केले.त्यालाही झालाच विरोध,गर्दीमध्ये जिथे आईला कुठेच बाजूला जाणं शक्य नसते तिथे तिने खुशाल पाजावे बाळाला,शिवाय जी ती आई ठरवेल काय करायचं आईला आपल्या बाळाची भूक भागविणे महत्वाचं असते.किंवा आजूबाजूला गोंगाट असला की बाळ बावचळते,विचलित होते,स्वतःला अस्वस्थ करते त्यावेळी बाळाला अंगावर पाजणे हा त्याला स्थिर करण्याचा,त्याच्यासाठी आश्वासक परिस्थिती निर्माण करण्याचा चांगला उपाय आहे.असेही विचार मी ऐकले.मी या चर्चेतुन त्यावेळी हे म्हणून माघार घेतली की मला तुमच्या सर्वांच्या मताचा आदर आहे आणि माझं मत चुकीचे आहे असं मला अजूनही वाटत नाही.

स्त्रीत्व ही गोष्ट जगाला दाखविण्याची नाही तर ही एक अनुभूतीची गोष्ट आहे.त्यावर पुन्हा असे प्रतिवाद झाले की जाहिरातीत स्त्रियांचे अंतर्वस्त्र जाहिरात असेल आणि इतर कामुकता वाढविणाऱ्या इतर जाहिराती असतील तर याला का कधी विरोध होत नाही.सहज असेल किंवा मनाविरोधी असेल तरी अश्या गोष्टी का स्वीकारल्या जातात,बघितल्या जातात मग स्तनपान सर्वांसमोर केलं तर विरोध का?मी याला काही उत्तर नाही दिले मी त्या चर्चेतून माघार घेतली होती.

माझी जेंव्हा एखाद्या गोष्टीबद्दल, विचाराबद्दल मनाची द्विधा अवस्था निर्माण होते तेंव्हा माझं एक मन याच नेमकं उत्तर ,या गोष्टींबद्दल माझ्या मनाचा नेमका कल शोधण्याच्या पाठी असतं. एक सल मनाला सतत सलत असते.आणि मला स्वतःला त्याच नेमकं उत्तर हवं असत.आणि मला या बद्दल नेमके उत्तर मिळायला दोन गोष्टी/घटना अश्या घडल्या की माझ्या मनाने नेमके एक म्हणणं कोणत्याही अटी शर्तीशिवाय मान्य केलं.
पहिली घटना घडली ते स्थळ साताऱ्यातील शेंद्रे फाटा ,वेळ सायंकाळची आणि रस्त्यावर रहदारी होती.मी ज्या गाडीने प्रवास करीत होते ती गाडी होती आमच्या जिल्हा परिषदेतील समाजकल्याण अधिकाऱ्यांची.ते सांगलीचे ते स्वतः गाडी चालवित होते.गाडीत मागे आणखी दोघेजण होते ज्यांना पेठ नाक्यावर उतरायचे होते.रहदारीतून संथ गाडी चालली होती.आणि आमच्या गाडीच्या पुढे एक बाईक होती नवरा बायको आणि लहान मुलं होत त्या गाडीवर.अचानक त्या बाईने आपल्या गर्दीने हैराण आणि रडवेल्या झालेल्या मुलाच्या तोंडात आपला पदर बाजूला सारून स्तन दिले. हे सगळं फक्त काही सेकंदात घडलं,आजूबाजूला सगळं पूर्वीसारख सुरू होत.गर्दी, गोंधळ,हॉर्नचे कर्ण कर्कश आवाज आणि त्यात माझं लक्ष वेधले होते त्यागर्दीत स्तनपान करविणार्या मातेकडे. रस्त्यावर बऱ्यापैकी खड्डे होते आणि ती बाई जराही विचलित न होता,स्थिर राहण्याचा प्रयत्न करीत आपल्या मुलाला छातीशी कवटाळून स्तनपान देत होती.एक प्रकारे त्याला आश्वस्त करीत होती. तिचे वागणे त्यावेळी मला खूप सहज वाटले .आजूबाजूला,गाडीत पाहिलं मला या गोष्टीने कुणी विचलित झाले आहे अस नाही जाणवलं.ती स्त्री कष्टकरी होती.ती तिच्या वागण्याबद्दल यत्किंचितही गोंधळली नव्हती,ती संयंत होती.त्यांच्या गाडीला मागे खोरं आणि घम्याले पाटी अडकवली होती. आम्ही हायवेला लागलो पण ते दृश्य माझ्या मनातील द्विधा मनस्थितीला मात्र चांगलाच धडा शिकवून गेलं.मी मनातून पक्क ठरवलं की संसदेतील ती स्त्री आणि ही रस्त्यावरील कष्टकरी स्त्री दोघीही आजूबाजूच्या परिस्थिचा ,विचारांचा ,अवधानाचा,कुचेष्टेचा,अभिमानाचा,शाबासकीचा कोणत्याही चांगल्या किंवा वाईट विचारांचा विचार न करता त्या केवळ एक विचार करतायत तो म्हणजे मातृत्वाचा आपल्या बाळाच्या उदरभरणाचा.स्तनपान आडोश्याला केले पाहिजे असे काही नाही.ज्या ठिकाणी त्या आईला आपल्या मुलाला स्तनपान करावेसे वाटेल तिथे तिने तितक्याच सहजतेने खुशाल करावे.माझ्या मनातील किंतु परंतु नष्ट झालेच होते या घटनेने त्यावर अंतिम शिक्कामोर्तब व्हायला एक आणखी एक घटना कारणीभूत झाली.

ती म्हणजे आमच्या घरात अवचित अवतरलेली छोटीशी मणी.हे मांजराचे छोटेसे पिल्लू मम्मीला आणि मला पटकन आवडून गेले आणि तेही आमच्या घरात मोतीशी पंगा घेऊन,गरज पडली तर मला कस फुगता येत हे रागाने मोतीपुढे रागाने शेपटी फुलवून दाखवू लागलं.त्याचे काळेभोर केस आणि सोनेरी डोळे आम्हाला विशेष आवडून गेले.त्याच्या सोनेरी डोळ्यात लहान मुलांची निरागसता,व्याकुळता दिसत होती मला आणि स्पर्शाला आसुसलेले हे छोटंसं पिल्लू स्वतःहुन आपलं अंग माझ्या हाताला घासू लागत.त्याची आणखी एक खोड अशी की मांडीवर घेऊन त्याच्या अंगावर हळुवार हात फिरवत बसलं की ते डोळे मिठून आपल्या पायाचे पुढचे पंजे फुलवीत आणि आकसत राहतं.त्यामुळे मग त्याच्या पंजाची नखे मला किंचितसी रुतत होती.मी मम्मीला दाखवलं बघ हे पायाची हालचाल कशी करते तर मम्मी उत्तरली हे लहान आहे ग अजून ते मनात आपली आई आपल्याला अंगावर दूध कशी पाजत होती ते आठवत असेल.ही पिल्ली अंगावर दूध पिताना आपल्या आईच्या पोटावर असा पंजा रुतवतात.मला हे ऐकून आमच्या मणीबद्दल जास्तच प्रेम दाटून आलं. आईवेगळ हे दूध पित छोटस पिल्लू आईला विसरलं नाही,तिचे स्तनपान विसरलं नाही. खरंच जगात भुकेशिवाय सुंदर अशी गोष्ट नाही.आणि स्तनपान हे केवळ कर्म नाही ते तर लहान मुलांचे उदरभरण आहे. आई आणि मुलं ठरवूदेत कसं ,कधी आणि कुठे स्तनपान करायचे.

अधिकारिणी या व्हाट्सएप ग्रुपवरील चित्रलेखा खातू-राणे, मिनाक्षी थोके-वाकडे,नूतन सावंत-पारधी व इतरही मैत्रिणींचे मनःपूर्वक आभार या सगळ्या अधिकारिणी नव्या युगाच्या आणि नव्या विचारांच्या माता आहेत.आधुनिक विचारांच्या असल्या तरी आपल्या बाळांसाठी तितक्याच सजग आहेत.याच माझ्या मैत्रिणींनी मला स्तनपान या विषयावर विचार करायला भाग पाडले.त्यांचे मनपूर्वक आभार.

खरंच स्त्री विधात्याची सर्वात सुंदर कलाकृती.तिचे शरीर घडवीत असताना त्या विधात्याने किती सुंदर गोष्टी योजल्या आहेत.आपल्या बाळाचे पोषण त्या स्तनातून तर होते.जन्मास आलेलं प्रत्येक मुलं, ती स्त्री असो व पुरुष याच स्तनाला प्रथम बिलगून आपलं भूक भागविते या गोष्टीकडे सदा सर्वकाल बघताना एक निर्व्याज भावना आपल्या मनात अवतरली पाहिजे.स्त्रीच्या छबीचा वापर कित्येक उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी केली तरी स्त्री ही पोषणकर्ती आहे ही बाब विसरली नाही पाहिजे.प्रत्येक स्त्री कडे आदराने बघितले पाहिजे.शेवटी युगंधर मध्ये कृष्ण म्हणतो की,स्त्री ही कुणाची माता,पत्नी,भगिनी,प्रेयसी,भाभी,काकी,मामी,वहिनी आहे म्हणून केवळ वंदनीय नाही तर सर्वप्रथम स्त्री ही केवळ स्त्री आहे म्हणूनही वंदनीय आहे.मला वाटत अशी स्त्री आपल्या मुलाला स्तनपान करवित असते तेंव्हा तर जास्तच वंदनीय असते नाही का? उत्तर तुम्ही द्या...

||श्रीकृष्णार्पणमस्तू ||

© राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
०३/०८/२०१८

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@chraps
हे आपण नाही ठरवू शकत तिने मुद्दाम केलं की कसं
आपण याचा सकारात्मक अर्थ लावू शकतो.अन्यथा विषय सोडून देऊ शकतो.

राजेश्री ताई
कृपया परीच्छेद पाडाल का ? मी पहिला (?) परीच्छेद वाचला. पण सगळे चिकटून चिकटून आल्यासारखे वाटतेय. पूर्ण वाचल्याशिवाय प्रतिसाद देणे योग्य नाही म्हणून विनंती. गैस नसावा.

> आई ज्यावेळी आपल्या मुलाला अंगावर पाजत असते त्यावेळी तिने आपल्या मुलाशी, त्याच्या भुकेशी ,त्याच्या त्या सुखाशी तादात्म्य पावणे अभिप्रेत असते. > एवढा &/ असला विचार करायची &/ पसरवायची गरज नाही.

तुम्ही पुढे आपले विचार बदलले ते चांगलेच झाले.

===
फारच योगायोग आहे पण आता परवाच या विषयावर बोलणं झालेलं. मला वाटत होतं कि बाळ ६ महिन्याचे झाल्यावर दूध येणे कमी होते आणि १.५-२ वर्षचे झाले कि थांबतेच. पण जर दुधाची रिक्वायरमेन्ट असेल तर बाई २०-२१ वर्ष दूध देऊ शकते म्हणे :अओ:हे कस होतं माहीत नाही. म्हणजे एक मुल जन्माला घातलं कि पुढे २० वर्ष मिल्क नॅनी म्हणून काम करता येते का कि ते त्या पर्टिक्युलर बाळ आणि आईवरच अवलंबून असते माहित नाही.

===
सिगमण्ड फ्रेउडने ब्रेस्टफीडिंग हा आई आणि मुल दोघांसाठीही sexual experience असतो अशी काहीतरी थेअरी मांडली होती म्हणे.

===
कष्टकरी बायका 'केवळ दूध पाजणे' यासाठीच बाळाला स्तन देतात असे नाही. रडत असेल तर शांत करायला आईखेरीज आजी वगैरेदेखील बाळाला स्तन देऊन टाकतात. हे मी स्वतः पाहिले आहे. फक्त नातेवाईक स्त्रियाच हे करतात कि इतर कोणीही करू शकते माहित नाही. पण त्या आजीला आणि आईला यात काहीच ऑड वाटले नव्हते.

एकेकीचा चॉईस.मला स्वतःला असं पब्लिक प्लेस ला फीड करताना आरामदायी वाटलं नसतं.पण जिथे इलाज नाही/तातडीची गरज आहे/एखादीला पब्लिक प्लेस मध्ये फीड करताना अवघडलं वाटत नसेल तर फीड करायला काहीच हरकत नाही.

छान लिहिलंय.
.
ही ऑस्ट्रेलियातली घटना आहे.

स्तनपान करवत असताना त्यांनी एक प्रस्ताव मांडला. फार तर अर्धा मिनिट बोलायला लागलं असेल. त्या बाळाला स्तनपान करवत असतानाच, त्यांचं नाव पुकारलं गेलं असावं.

छान लिहिलंय.

एक awkwardness येऊ नये याची दक्षता आपण घ्यावी अस मला वाटत.. .....सहमत आहे.हल्ली एफबीवर गरोदर महिलांचे किंवा स्तनपान देणार्‍या महिलांचे इतके डोळ्यात जाणारे फोटो पहायला लागतात की त्याचा उबग येतोय.

मुंब ईच्या एका नगरसेविकेने मॉल्समध्ये, प्रत्येक वॉर्डात स्तनपान देण्यासाठी कक्ष असावा अशी सूचना केलीय.
आणखी कुठे हिरकणी कक्ष आहेत.
याबद्दल अधिक माहिती शोधताना कळलं, की अमेरिकेतील बहुतांश राज्यांत सार्वजनिक किवा अगदी रेस्टॉरंटसारख्या ठिकाणी स्तनपानाचा अधिकार देणारा कायदा.आहे.

मला वाटते ही एक नॅचरल क्रिया आहे. गरज लागल्यास, पर्याय नसल्यास योग्य ती काळजी घेऊन पब्लिकली करण्यास हरकत नाही.
पण रिसेंटली त्या मॉडेलने स्तनपान करतानाचा (स्वतः बाळाची आई वगैरे नसताना) फोटो मासिकावर आला त्यातले अजेंडे वेगळे वाटले. हकांबद्दल इतकं लढायचंय तर स्तनपान करणारी कोणी खरी माता फिचर करा कव्हर वर. आई झालेल्या मॉडेल सेलेब्रिटि पण भरपूर असतील. त्यातली एखादी करु शकेल.

नर्सिंग कव्हर/ स्कार्फ घेऊन ( किंवा न घेऊन, शेवटी पर्सनल चॉईस आहे) वरील उल्लेख आलेल्या सर्व ठिकाणी स्तनपान करणं सहज शक्य असावं आणि कोणीही अश्या व्यक्तीकडे अजिबात बघू नये.
दुर्दैवाने भारतीय स्त्रिया ( हो. स्त्रिया जास्त) आणि काही पुरुष कोण उत्सुकतेने स्टेअर करत बसतात.

मी एकदा हैद्राबादेत सेक्रेटरिआट समोरच्या भर गर्दीच्या रस्त्यावरून आटोने जात होते सिगनल ला थांबले तर रस्त्यावर एका उंच झाडा खाली चार पाच बायकांचा घोळका गोल करून उभा होता व आत एक नवमाता खाली बसून आरामात बाळाला दूध पाजत होती. आई मुलातले हे एक
प्रायवेट कार्य असल्यामुळे किमान प्रायवसी असावी असे माझे मत आहे. काही प्रूव करायचे असते त्या बायकांचे अजेंडे वेगळे असतात. पण मुलाला जरा पंधरा वीस मिनिटे आईबरोबर अलोन टाइम मिळते व बाँ डिंग व्हायला मदत होते. किमान पदर/ ओढणी घेतल्याने माता बालका चा एक वैयक्तिक अवकाश बनतो. अर्थात हे माझे मत आहे. प्रत्येक आई मुलाचे रिलेशन शिप व डिमांड वेगळ्या असतात. त्यात फार पडू नये व इशू करू नये. ही दीड दोन वर्शा परेन्त चाल णारी फेज आहे. तेव्ढे काँप्रमाइज आईने करायला काही हरकत नसावी.

राजश्री ताई, परिच्छेद पाडले असते तर बरे झाले असते. वाचला पूर्ण लेख. पहिल्या परिच्छेदाच्या वेळी जे वाटलं तेच कायम आहे.
तुम्ही म्हणता ते सामाजिक शिष्टाचार भारताच्या दृष्टीने योग्य आहेत. पण ती महिला ज्या देशात आहे तिथे असे शिष्टाचार नसावेत. तिथे हे अगदी सहज होत असावे. शिवाय भारतीय उपखंड, मुस्लीम राष्ट्रे वगळता अन्य देशात स्तनपान ही खूपच कॉमन गोष्ट समजली जात असणार. अगदी तुर्कस्तानातही.
इथल्या चष्म्याने तिथल्या घटनांकडे पाहू नये आणि तिथल्या चष्म्याने इकडे पाहू नये हेच खरे.

2018 मध्येही मेगन मर्केलची एक इंच ब्रा दिसली तरी फॉक्स न्यूजवर हेड लाईन होते. स्त्रिया ब्रा घालतात आणि त्या कधी कधी दिसतात पण त्यातही अनेकांना 'बातमी' दिसते. स्तनपान तर फार पुढची गोष्ट.

समजा ती सांसद स्तनपानाऐवजी मुलाला बाटलीने फॉर्म्युला (किंवा एक्सप्रेस्ड ब्रेस्ट मिल्क) पाजत असती तर तिला जज केलं नसतं का?
किंवा ती फॉर्म्युला बाटलीतून पाजणारी नॅनी घेऊन संसदेत आली असती तर तिला जज केलं नसतं का?
किंवा, ती नेमकी तिची बोलायची वेळ आली असता (मेजॉरिटी पुरुष प्रधान संसद्भावनातून) दूध पाजण्यासाठी म्हणून गायब झाली असती तर तिला जज केलं नसतं का?

स्तनपान हा बायकांमध्येच इतका ध्रुवीकरण झालेला विषय आहे की बायकांनी एक होऊन कशासाठी लढायची वेळच येणार नाही हे निश्चित आहे.
आपल्याला लॉन्जरे घालून मिनरल वॉटरची जाहिरात करणाऱ्या मॉडेल बद्दल काही विशेष वाटत नाही. पण मॅगझीन कव्हरवर ब्रेस्ट फीडिंग करताना पाहिलं की असं का वाटतं?

सई यांनी विचारलेल्या प्रश्नांत आईऐवजी बापही असू शकतो, असा विचार आला.
दुसरं, एखाद्या संसदसदस्याने आपल्या तान्ह्या बाळाला सभागृहात आणलं आणि ते रडायला लागलं तर काय करत असतील किंवा करतील असा एक प्रश्न पडला.
वर पहिल्याच प्रतिसादातला मुद्दा : हा पर्याय नाइलाज म्हणूनच स्वीकारला जातो ना? जर आईला आपल्या बाळाला स्वतःसोबत ठेवणं शक्य आहे, तर तसं का ठेवू नये?

याला थोडीशी धरून असलेली एक बातमी म्हणजे न्युझीलंडच्या पंतप्रधान बाळंतपणानंतर कामावर रुजू झाल्यात. पदावर असताना बाळंत झालेल्या जगातल्या त्या दुसर्‍याच पंतप्रधान आहेत असं वाचलं. या आधी ब्रिटनचे पंतप्रधान पदावर असताना पिता झाले होते.

सई, माझा मूळ आक्षेप कव्हरवर फीड करणारी बाई दाखवली हा नसून खरंच फीड करणारी/त्या स्टेज मध्ये असलेली स्त्री न दाखवता ब्युटीफाय करायला खोटी मॉडेल दाखवली हा आहे.मी मुद्दा नीट मांडला नसावा.अनेकांनी ट्विट ने सेम आक्षेप दाखवला असावा.(हे तुलनात्मक दृष्ट्या मॅरेज साईट ने खऱ्या लग्नाळू मुली म्हणून ऐश्वर्या वगैरे दाखवण्या सारखे वाटले.चित्र आकर्षक करायला मूळ कंटेक्स्ट बदलून वेगळी व्यक्ती 'खरी' म्हणून दाखवणे असा काहीसा मुद्दा.)

मला वाटतं त्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत ज्याना पदावर असताना मुल झालं आहे. यापूर्वी बेनझीर भुट्टो यांना पं प्र असताना मुल झालं होतं.
ऑस्ट्रेलियामध्ये या घटनेची फारशी चर्चा ऐकू आली नाही!

मुलाला स्वतःच्या घरात पाजत असतानाही स्त्रिया व्यवस्थित कव्हर करून पाजतात. मग सार्वजनिक स्थळी छाती उघडी ठेऊन पाजणार आणि कुणीही तिकडे बघू नका हेही म्हणणार हे पटले नाही. सार्वजनिक ठिकाणी कुणी पुरुष उघडा किंवा नागडा बसला तर कुणीच स्टेअर करणार नाही का?

मुळात जी गोष्ट पूर्णतया खाजगी आहे ती सार्वजनिक स्थळी करू नये. पण मुलाला भूक जागा बघून लागणार नाही. आणि भूक लागल्यावर ते गप्पही बसणार नाही. त्यामुळे त्याला जेव्हा भूक तेव्हा पाजणे आवश्यक आहे. घराबाहेर पाजयची वेळ आलू तर आईने आपण घरात नसून सार्वजनिक स्थळी आहोत याचे भान ठेवून वागायला हवे हेमावैम.

सार्वजनिक स्थळी सर्व प्रकारचे लोक असतात. तिथे उघडे पाजत बसणे आईला नॉर्मल वागणे वाटले तरी त्याचा काहींना धक्काही बसू शकतो. इथे माबोवरच कुणीतरी त्याच्या 5-10 वर्षांच्या मुलाला स्तनपान करवणारी स्त्री पाहून धक्का बसलेला असे लिहिले होते, त्या मुलाने त्याआधी कधीही असा प्रसंग पहिला नव्हता.

मूळ लेखात काय म्हणायचे आहे हे नीट कळले नाही. स्तनपान कुठेही करावे असे म्हणायचंय की स्तनपान अंग उघडे टाकून करावे व कुणी तिकडे बघूही नये ही अपेक्षा ठेवावी असे म्हणायचंय हे कळले नाही. स्तनपान कुठेही करावे असे म्हणणे असेल तर मी सहमत आहे. बाळाची गरज पाहून करावे, जागा विचारात घेऊ नये. दुसरा पार्ट असेल तर मी असहमत आहे.

गर्दीच्या ठिकाणी मुलाला स्तनपान करवणारी भारतीय स्त्री त्या मासिकाच्या मुखपृष्ठावरील मॉडेलसारखी पदर बाजूलाच ठेऊन राहणार नाही. मी व इथे प्रतिसाद देणाऱ्या कित्येकांनी रेल्वेत, बसमध्ये, रस्त्याच्या कडेला बसून मुलाला पाजणार्या स्त्रिया पहिल्या असतील, त्यातल्या बहुसंख्य स्वतःला नीट झाकून पाजताना पाहिल्यात.

@साधना
एकंदरीत तुमचे विवेचन रास्त आहे. मी सर्वप्रथम सांगितले की आपण एका सामाजिक चौकटीत राहतो त्याच्या मर्यादा पाळाव्यात.काही वेळा अशीही परिस्थिती निर्माण झाली आहे की बाळाला स्तनपान देण्याची तीव्र गरज असताना ते दिले गेले नाही काही स्त्रियांनी हे माझ्याकडे स्वतः कबूल केलं.ही एक सामाजिक नैतिकतेची बाजू झाली.पण नैसर्गिकता या गोष्टींबद्दल आली पाहिजे.सहजता आली पाहिजे. स्त्रियांच्या कपडे ते ती तिच्या मुलाला कुठे आणि कसे पाजेल ,फीड करेल ही ती ठरवेल.मग समाज सरावेल की आपण हे बघावे,बघू नये,हैराण व्हाव,होऊ नये वैगेरे

>>>मुलाला स्वतःच्या घरात पाजत असतानाही स्त्रिया व्यवस्थित कव्हर करून पाजतात.
हे संपूर्णपणे तुमचे अझम्पशन आहे. जगात कित्येक देश आहेत आणि कित्येक संस्कृती आहेत आणि स्तनपान सगळ्या संस्कृतींमध्ये पुरस्कृत आहे. जगात असेही कित्येक ट्राइब्स आहेत जिथे स्त्रिया स्तन झाकण्यासाठी कुठलेही कपडे वापरत नाहीत. त्या स्त्रियादेखील स्तनपान करतात. वरील किस्सा भारतातातील सुद्धा नाहीये. त्यामुळे लोकलमध्ये वगैरे पाहिलेली उदाहरणे या किस्स्याच्या अनुषंगाने देणे बरोबर आहे का?

>>>मग सार्वजनिक स्थळी छाती उघडी ठेऊन पाजणार आणि कुणीही तिकडे बघू नका हेही म्हणणार हे पटले नाही.
सार्वजनिक ठिकाणी पाजणाऱ्या बायकांकडे कुणी बघू नये अशी अपेक्षा नसून, भोचकपणे त्यांना कव्हर करा असे सांगणे अपेक्षित नाही. कुणी कुणाकडे बघावे यावर कुणाचाच कंट्रोल नसतो आणि व्यवस्थित झाकून पाजणाऱ्या महिलेकडेसुद्धा "त्या" दृष्टीने बघण्यात येउ शकते.

>>>सार्वजनिक ठिकाणी कुणी पुरुष उघडा किंवा नागडा बसला तर कुणीच स्टेअर करणार नाही का?
टॉपलेस पुरुष हे सदाशिवपेठेतल्या वाड्यातून, बालकन्यांतून, बीचवर, झालच तर १०० करोड मिळवणाऱ्या सिनेमांमध्ये वगैरे सर्रास आढळतात. आणि नाही, त्यांच्याकडे अजिबात स्टेअर करावेसे वाटत नाही. कारण त्याची आपल्या सगळ्यांनाच सवय झाली आहे. तशीच, स्त्रियांनी जर आपल्या देहाचा काही भाग स्तनपानासाठी उघडा ठेवला तर त्याबद्दल तीक्ष्ण प्रतिक्रिया येऊ नयेत इतपत सवय आता लोकांना व्हायला हवी. तशी सवय होण्यासाठी स्त्रीच्या देहाकडे थोडासा बुद्धीचाही वापर करून बघण्याची गरज आहे. स्त्रियांनाही.

>>>मुळात जी गोष्ट पूर्णतया खाजगी आहे ती सार्वजनिक स्थळी करू नये. पण मुलाला भूक जागा बघून लागणार नाही.
तुमच्या पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यातील विसंगतीच हे सांगते आहे की स्तनपान ही काही खाजगी गोष्ट नाही. सॉलिड फूड खाणाऱ्या लहान मुलाला भूक लागली तर घरी जाईपर्यंत उपाशी ठेवणार नाही. इथे खाजगी फक्त स्त्रीचा देह आहे. आणि तो खाजगी असावा की नाही हे संपूर्णपणे तिचे स्वातंत्र्य आहे.

>>>सार्वजनिक स्थळी सर्व प्रकारचे लोक असतात. तिथे उघडे पाजत बसणे आईला नॉर्मल वागणे वाटले तरी त्याचा काहींना धक्काही बसू शकतो.

लोकांना कशाचाही धक्का बसतो. सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणाऱ्या स्त्रीमुळे लोकांना धक्का बसतो पण सार्वजनिक ठिकाणी आपल्या वासराला स्तनपान करणाऱ्या गाईला मात्र ओवाळायला जातात. नव्हे, स्तनपान करणाऱ्या गाईची मूर्ती मंदिरात वगैरे ठेवतात. ज्यांना स्तनपान बघून धक्का बसतो त्यांनी असं काही दिसलं तर डोळे बंद करावेत किंवा तिकडून पळून जावे.

>>>गर्दीच्या ठिकाणी मुलाला स्तनपान करवणारी भारतीय स्त्री त्या मासिकाच्या मुखपृष्ठावरील मॉडेलसारखी पदर बाजूलाच ठेऊन राहणार नाही. मी व इथे प्रतिसाद देणाऱ्या कित्येकांनी रेल्वेत, बसमध्ये, रस्त्याच्या कडेला बसून मुलाला पाजणार्या स्त्रिया पहिल्या असतील, त्यातल्या बहुसंख्य स्वतःला नीट झाकून पाजताना पाहिल्यात.

सगळ्या स्त्रिया भारतीय असू शकत नाहीत. आणि भारतीय स्त्रिया "भारतीय" असल्याचं पाहिजेत ही अपेक्षा सुद्धा चूक आहे. एकूणच स्त्री कडे, तिच्या देहाकडे सामंजस्याने आणि आदराने बघायची गरज पुरुषांना नाही तर स्त्रियांना देखील आहे हेच या पोस्टवरून सिद्ध होते आहे.

सई, सुरेख प्रतिसाद.
राजेश्री, तुमच्या आताच्या प्रतिसादातलं " मी सर्वप्रथम सांगितले की आपण एका सामाजिक चौकटीत राहतो त्याच्या मर्यादा पाळाव्यात." हे वाक्य आणि त्यापुढचा एकंदर प्रतिसाद परस्परविरोधी वाटले. जाचक वाटणार्‍या चौकटींची मोडतोड व्हायलाच हवी. तुम्हांलाही पुढे तेच म्हणायचंय असं वाटतंय

सई, लेखिकेने दुसरा प्रसंग लिहिलाय तो भारतातील आहे. त्यात जे लिहिलेय त्यावर मी भाष्य केले व तसे माझ्या प्रतिसादात लिहिले. पहिल्या प्रसंगाचा फोटो मी पहिला नाही त्यामुळे मी त्यावर काहीही भाष्य केले नाही.

तुमचा प्रतिसाद उत्तम आहे. पण त्यातल्या अपेक्षा ह्या आदर्श जगातल्या अपेक्षा आहेत. खऱ्या जगात काय चालले आहे हे तुम्ही पेपरात वाचत असाल. ते आदर्श जग कधी अस्तित्वात होते का मला माहित नाही, भारताबाहेर असेल तर मला माहित नाही, मी भारताबाहेरचे जग पाहिले नाही. फेसबुकवर काही ग्रुपवर ह्या विषयाबाबत चर्चा वाचल्यात. त्यात जगभरच्या लोकांनी प्रो अँड अगइन्स्ट अशी दोन्ही मते दिलीत, म्हणजे भारत सोडून बाहेरही कव्हर करावे की नाही याबाबत अजून एकमत नाही. सार्वजनिक जागी काय करावे याचे संकेत पाळले जावेत ही अपेक्षा काही फार मोठी नसावी. मी तसेही मुलाला उपाशी ठेवा म्हणत नाहीय.

साधना,
>>भारत सोडून बाहेरही कव्हर करावे की नाही याबाबत अजून एकमत नाही.>> एकमत का बहुमत हा प्रश्न नाहीये. तर काय करावं करू नये त्याचा संपूर्ण हक्क व्यक्तीवर असावा. संकेत ठरवताना ऑल मेन्स क्लब ठरवतं त्याला काही अर्थ आहे का?

बंद कार मध्ये, विमानतळावर आडोसा शोधून नर्सिंग कव्हर घालून स्तनपान केलं तरी मूर्खांसारखे बघणारे आणि किळस म्हणजे व्हिडीओ काढायचा प्रयत्न करणारे विकृत लोकं बघितले आणि हटकले आहेत. हे अमेरिकेत दक्षिण आशियाई उपखंडातील लोकांकडून घडलं आहे. जनरलाईझ अर्थात करत नाहीये.

>>>तुमचा प्रतिसाद उत्तम आहे. पण त्यातल्या अपेक्षा ह्या आदर्श जगातल्या अपेक्षा आहेत. खऱ्या जगात काय चालले आहे हे तुम्ही पेपरात वाचत असाल.
मला पुन्हा एकदा तुमच्या (निरागस) समजुतीवर प्रश्न विचारायची वेळ येते आहे.
जगात काय चालले आहे हे मला माहित आहे. पण त्याचा स्त्रियांनी देह झाकण्याशी किंवा तो उघडा ठेवण्याशी काहीही संबंध नाहीये. भारतात काय चालले आहे हेही मला माहिती आहे आणि भारतीय महिलांनी (आणि लहान मुलींनी) २४ तास बुरखे जरी घातले तरी स्त्रियांवरचे अत्याचार कमी होणार नाहीत याची मला खात्री आहे.

पण काही गोष्टींमध्ये निदान स्त्रियांकडून स्त्रियांनाच जज करणे बंद व्हावे असे मला कळकळीने वाटते. भारतामध्ये अशी कित्येक उदाहरणे दिसतात.
१. स्त्रिया स्वतःला, मुलीला किंवा सुनेला मुलगाच व्हावा याबद्दल आग्रही असणे
२. इतर स्त्रियांनी त्यांच्या मुलांना कसे दूध पाजले (बाटलीने, फॉर्म्युला, स्तनपान, एक्स्प्रेस्ड बॉटल) याबद्दल त्या स्त्रियांची परिस्तिथी/वैद्यकीय अडचण/आयपत वगैरे लक्षात न घेता त्यांना जज करणे.
३. मूल झाल्यावर काम करायचे की नाही करायचे यावर काम करणाऱ्या आणि न करणाऱ्या महिलांची आपापसात जुंपणे. किंवा एका ग्रुप मधील काहींनी दुसऱ्यांना जज करणे.
४. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या तरुणींचे डेटिंग लाईफ, त्यांचे राहणीमान यावरून त्यांना जज करून खच्ची करणे.
५. सासू-सून कथा तर सांगाव्या तितक्या थोड्या.

हा धागा त्या धाटणीतला वाटला म्हणून इथे येऊन यावर अजून जजमेंटल डिस्कशन होऊ नये यासाठी माझे हे २ सेंट्स.
बाकी जग आदर्श असावे ही अपेक्षा असणे काही वाईट नाही. कारण आहे हे असेच चालणार म्हणत राहिलो तर जग अजून भयानक व्हायचे चान्सेस जास्त आहेत.

https://www.indiatvnews.com/buzz/news-mara-martin-breastfeeding-ramp-wal...

ही बातमी बघा.
रॅम्प वॉक करायच्या वेळीच आपल्या बाळाला भुक लागली म्हणुन स्तनपान चालु असतानाच ही मॉडेल रॅम्पवॉक करत स्टेज वर अवतरली....लाईक सिरीअसली ?
कितीही मॉडर्न विचार केला तरी एक आई म्हणुन हे मला नाही पटू शकत.
तुमच्या कामाच्या ठीकाणी तुम्ही अशा पद्धतीने स्तनपान करताय ही तुमची आणि बाळाची गरज आहे की पब्लीक अटेंशन मिळवायची हौस असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.

बाकी सगळ्याशी सहमत आहे सई पण

> ३. मूल झाल्यावर काम करायचे की नाही करायचे यावर काम करणाऱ्या आणि न करणाऱ्या महिलांची आपापसात जुंपणे. किंवा एका ग्रुप मधील काहींनी दुसऱ्यांना जज करणे. >
याच्याशी पूर्ण असहमत. भरपगारी बाळांतपणाची 6 महिने रजा घेऊन नंतर राजीनामा टाकणाऱ्या बायका 'केवळ वैयक्तिक' निर्णय घेत नसून त्या सगळ्याच बायकांना, त्यांना नोकरिवर घेणाऱ्या/ठेवणारयाना आणि एकदरच समाजाला/त्याच्या स्त्रियांबद्दलच्या दृष्टिकोनाला affect करतायत.

आणि स्त्रियांनी एक्मेकांसोबत भगिनीभावच बाळगला पाहिजे असे काही compulsion आहे का? भांडुदेत कि छान कचाकचा Lol

Pages