स्तनपान कर्म नोहे जाणिजे उदरभरण...

Submitted by राजेश्री on 4 August, 2018 - 11:19

स्तनपान कर्म नोहे जाणिजे उदरभरण....

मागच्या आठवड्यात आमच्या अधिकारिणी या व्हाट्स ऍप ग्रुप वर याच विषयावर आमची चांगलीच जुंपली होती.जुंपली म्हणजे साहजिकच तात्विक वाद आणि प्रतिवाद,ग्रुप वर एक फोटो पोस्ट share झाली त्या फोटोत युरोपियन संसदेतील एक महिला संसद सदस्य संसदेत आपलं मत मांडायला किंवा भाषण करायला उभ्या होत्या.आणि उभ्या उभ्या ,बोलता बोलता त्या आपल्या बाळाला अंगावर पाजत होत्या किंवा त्या आपल्या बाळाला स्तनपान करीत होत्या.कुणी खूपच छान अशी दाद दिली तर कुणी अंगठा वर करून आपली सहमती दर्शवली.त्या बद्दल एक msg आला त्यामध्ये म्हंटल की स्तनपान करविणे हा त्या आईचा आणि मुलाचा वैयक्तिक प्रश्न होता.तिला तिच्या मुलाला दूध पाजयच होत तर पाचेक मिनिटांचा प्रश्न होता ती कुठे दुसरीकडे(आडोश्याला)जाऊन बाळाला पाजून आली असती तर कुणी काही हरकत दर्शवली नसती.मला हे म्हणणं मांडणाऱ्या अधिकारिणी चे म्हणणे पटले आणि मी हो सहमत आहे अशी या प्रतिक्रियेवर माझा प्रतिसाद व्यक्त केला.मग या मताशी बिलकुल सहमत नसणाऱ्या इतर अधिकारिणी या प्रतिसादावर प्रतिवाद करायला सज्ज झाल्या.कुणी म्हणाले का ती जाईल बाहेर बाळाला दूध पाजायला .बाळ तीचे दूध तिचे ती ठरवेल बाळाला कधी आणि कुठे पाजायचे. मग मी मत मांडल एक सामाजिक शिष्टाचार किंवा आपल्या अवतीभोवतीची माणसांचा काही वैचारिक गोंधळ उडू नये किंवा मग एक awkwardness येऊ नये याची दक्षता आपण घ्यावी अस मला वाटत.यावरही प्रति म्हणणं मांडल गेलं का?आपण का विचार करायचा या गोष्टीचा मला बाळाला दूध पाजायचे आहे मी आत जाते किंवा आता तुम्ही बाहेर जा असे का सांगू मी?माझ्या आजूबाजूचे ठरवतील ना काय करायचंय ते.थांबले तर थांबतील,त्यांना जाऊ वाटलं ते पांगतील. मला हे म्हणणं ,हा विचार नाही पटला मग मी म्हणाले स्तनपान हा आई आणि मुलाच्या अनुभूतीचा प्रश्न आहे.आई ज्यावेळी आपल्या मुलाला अंगावर पाजत असते त्यावेळी तिने आपल्या मुलाशी, त्याच्या भुकेशी ,त्याच्या त्या सुखाशी तादात्म्य पावणे अभिप्रेत असते.
आता हा लेख लिहिताना जेवढं आठवलं तेवढं आणि तस नाही आठवलं पण माझं हे मत किंवा विचार मी त्यावेळी दुसऱ्या शब्दात व्यक्त केले.त्यालाही झालाच विरोध,गर्दीमध्ये जिथे आईला कुठेच बाजूला जाणं शक्य नसते तिथे तिने खुशाल पाजावे बाळाला,शिवाय जी ती आई ठरवेल काय करायचं आईला आपल्या बाळाची भूक भागविणे महत्वाचं असते.किंवा आजूबाजूला गोंगाट असला की बाळ बावचळते,विचलित होते,स्वतःला अस्वस्थ करते त्यावेळी बाळाला अंगावर पाजणे हा त्याला स्थिर करण्याचा,त्याच्यासाठी आश्वासक परिस्थिती निर्माण करण्याचा चांगला उपाय आहे.असेही विचार मी ऐकले.मी या चर्चेतुन त्यावेळी हे म्हणून माघार घेतली की मला तुमच्या सर्वांच्या मताचा आदर आहे आणि माझं मत चुकीचे आहे असं मला अजूनही वाटत नाही.

स्त्रीत्व ही गोष्ट जगाला दाखविण्याची नाही तर ही एक अनुभूतीची गोष्ट आहे.त्यावर पुन्हा असे प्रतिवाद झाले की जाहिरातीत स्त्रियांचे अंतर्वस्त्र जाहिरात असेल आणि इतर कामुकता वाढविणाऱ्या इतर जाहिराती असतील तर याला का कधी विरोध होत नाही.सहज असेल किंवा मनाविरोधी असेल तरी अश्या गोष्टी का स्वीकारल्या जातात,बघितल्या जातात मग स्तनपान सर्वांसमोर केलं तर विरोध का?मी याला काही उत्तर नाही दिले मी त्या चर्चेतून माघार घेतली होती.

माझी जेंव्हा एखाद्या गोष्टीबद्दल, विचाराबद्दल मनाची द्विधा अवस्था निर्माण होते तेंव्हा माझं एक मन याच नेमकं उत्तर ,या गोष्टींबद्दल माझ्या मनाचा नेमका कल शोधण्याच्या पाठी असतं. एक सल मनाला सतत सलत असते.आणि मला स्वतःला त्याच नेमकं उत्तर हवं असत.आणि मला या बद्दल नेमके उत्तर मिळायला दोन गोष्टी/घटना अश्या घडल्या की माझ्या मनाने नेमके एक म्हणणं कोणत्याही अटी शर्तीशिवाय मान्य केलं.
पहिली घटना घडली ते स्थळ साताऱ्यातील शेंद्रे फाटा ,वेळ सायंकाळची आणि रस्त्यावर रहदारी होती.मी ज्या गाडीने प्रवास करीत होते ती गाडी होती आमच्या जिल्हा परिषदेतील समाजकल्याण अधिकाऱ्यांची.ते सांगलीचे ते स्वतः गाडी चालवित होते.गाडीत मागे आणखी दोघेजण होते ज्यांना पेठ नाक्यावर उतरायचे होते.रहदारीतून संथ गाडी चालली होती.आणि आमच्या गाडीच्या पुढे एक बाईक होती नवरा बायको आणि लहान मुलं होत त्या गाडीवर.अचानक त्या बाईने आपल्या गर्दीने हैराण आणि रडवेल्या झालेल्या मुलाच्या तोंडात आपला पदर बाजूला सारून स्तन दिले. हे सगळं फक्त काही सेकंदात घडलं,आजूबाजूला सगळं पूर्वीसारख सुरू होत.गर्दी, गोंधळ,हॉर्नचे कर्ण कर्कश आवाज आणि त्यात माझं लक्ष वेधले होते त्यागर्दीत स्तनपान करविणार्या मातेकडे. रस्त्यावर बऱ्यापैकी खड्डे होते आणि ती बाई जराही विचलित न होता,स्थिर राहण्याचा प्रयत्न करीत आपल्या मुलाला छातीशी कवटाळून स्तनपान देत होती.एक प्रकारे त्याला आश्वस्त करीत होती. तिचे वागणे त्यावेळी मला खूप सहज वाटले .आजूबाजूला,गाडीत पाहिलं मला या गोष्टीने कुणी विचलित झाले आहे अस नाही जाणवलं.ती स्त्री कष्टकरी होती.ती तिच्या वागण्याबद्दल यत्किंचितही गोंधळली नव्हती,ती संयंत होती.त्यांच्या गाडीला मागे खोरं आणि घम्याले पाटी अडकवली होती. आम्ही हायवेला लागलो पण ते दृश्य माझ्या मनातील द्विधा मनस्थितीला मात्र चांगलाच धडा शिकवून गेलं.मी मनातून पक्क ठरवलं की संसदेतील ती स्त्री आणि ही रस्त्यावरील कष्टकरी स्त्री दोघीही आजूबाजूच्या परिस्थिचा ,विचारांचा ,अवधानाचा,कुचेष्टेचा,अभिमानाचा,शाबासकीचा कोणत्याही चांगल्या किंवा वाईट विचारांचा विचार न करता त्या केवळ एक विचार करतायत तो म्हणजे मातृत्वाचा आपल्या बाळाच्या उदरभरणाचा.स्तनपान आडोश्याला केले पाहिजे असे काही नाही.ज्या ठिकाणी त्या आईला आपल्या मुलाला स्तनपान करावेसे वाटेल तिथे तिने तितक्याच सहजतेने खुशाल करावे.माझ्या मनातील किंतु परंतु नष्ट झालेच होते या घटनेने त्यावर अंतिम शिक्कामोर्तब व्हायला एक आणखी एक घटना कारणीभूत झाली.

ती म्हणजे आमच्या घरात अवचित अवतरलेली छोटीशी मणी.हे मांजराचे छोटेसे पिल्लू मम्मीला आणि मला पटकन आवडून गेले आणि तेही आमच्या घरात मोतीशी पंगा घेऊन,गरज पडली तर मला कस फुगता येत हे रागाने मोतीपुढे रागाने शेपटी फुलवून दाखवू लागलं.त्याचे काळेभोर केस आणि सोनेरी डोळे आम्हाला विशेष आवडून गेले.त्याच्या सोनेरी डोळ्यात लहान मुलांची निरागसता,व्याकुळता दिसत होती मला आणि स्पर्शाला आसुसलेले हे छोटंसं पिल्लू स्वतःहुन आपलं अंग माझ्या हाताला घासू लागत.त्याची आणखी एक खोड अशी की मांडीवर घेऊन त्याच्या अंगावर हळुवार हात फिरवत बसलं की ते डोळे मिठून आपल्या पायाचे पुढचे पंजे फुलवीत आणि आकसत राहतं.त्यामुळे मग त्याच्या पंजाची नखे मला किंचितसी रुतत होती.मी मम्मीला दाखवलं बघ हे पायाची हालचाल कशी करते तर मम्मी उत्तरली हे लहान आहे ग अजून ते मनात आपली आई आपल्याला अंगावर दूध कशी पाजत होती ते आठवत असेल.ही पिल्ली अंगावर दूध पिताना आपल्या आईच्या पोटावर असा पंजा रुतवतात.मला हे ऐकून आमच्या मणीबद्दल जास्तच प्रेम दाटून आलं. आईवेगळ हे दूध पित छोटस पिल्लू आईला विसरलं नाही,तिचे स्तनपान विसरलं नाही. खरंच जगात भुकेशिवाय सुंदर अशी गोष्ट नाही.आणि स्तनपान हे केवळ कर्म नाही ते तर लहान मुलांचे उदरभरण आहे. आई आणि मुलं ठरवूदेत कसं ,कधी आणि कुठे स्तनपान करायचे.

अधिकारिणी या व्हाट्सएप ग्रुपवरील चित्रलेखा खातू-राणे, मिनाक्षी थोके-वाकडे,नूतन सावंत-पारधी व इतरही मैत्रिणींचे मनःपूर्वक आभार या सगळ्या अधिकारिणी नव्या युगाच्या आणि नव्या विचारांच्या माता आहेत.आधुनिक विचारांच्या असल्या तरी आपल्या बाळांसाठी तितक्याच सजग आहेत.याच माझ्या मैत्रिणींनी मला स्तनपान या विषयावर विचार करायला भाग पाडले.त्यांचे मनपूर्वक आभार.

खरंच स्त्री विधात्याची सर्वात सुंदर कलाकृती.तिचे शरीर घडवीत असताना त्या विधात्याने किती सुंदर गोष्टी योजल्या आहेत.आपल्या बाळाचे पोषण त्या स्तनातून तर होते.जन्मास आलेलं प्रत्येक मुलं, ती स्त्री असो व पुरुष याच स्तनाला प्रथम बिलगून आपलं भूक भागविते या गोष्टीकडे सदा सर्वकाल बघताना एक निर्व्याज भावना आपल्या मनात अवतरली पाहिजे.स्त्रीच्या छबीचा वापर कित्येक उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी केली तरी स्त्री ही पोषणकर्ती आहे ही बाब विसरली नाही पाहिजे.प्रत्येक स्त्री कडे आदराने बघितले पाहिजे.शेवटी युगंधर मध्ये कृष्ण म्हणतो की,स्त्री ही कुणाची माता,पत्नी,भगिनी,प्रेयसी,भाभी,काकी,मामी,वहिनी आहे म्हणून केवळ वंदनीय नाही तर सर्वप्रथम स्त्री ही केवळ स्त्री आहे म्हणूनही वंदनीय आहे.मला वाटत अशी स्त्री आपल्या मुलाला स्तनपान करवित असते तेंव्हा तर जास्तच वंदनीय असते नाही का? उत्तर तुम्ही द्या...

||श्रीकृष्णार्पणमस्तू ||

© राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
०३/०८/२०१८

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मॅगझीन कव्हरवर स्तनपान, रॅम्पवॉक मध्ये स्तनपान हे सध्याच्या जगात तरी अटेन्शन सीकिंग नसून तो एक (फेमिनिस्ट) स्टॅन्ड आहे असे मला वाटते.
पब्लिक ब्रेस्टफीडिंग हा पाश्चात्य देशांमध्ये स्त्रीवादाचा एक महत्वाचा मुद्दा आहे. नुसतं पब्लिक फीडिंग नव्हे तर ब्रेस्टफीडिंग हादेखील अमेरिकेसारख्या देशात (जिथे महिलांना पुरेशी मॅटर्निटी लिव्ह मिळत नाही) हक्क म्हणून त्यासाठी लढले जाते आहे.
एकीकडे वैद्यकीय संस्था स्त्रियांवर ६ महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग किती महत्वाचे आहे असा मानसिक ताण आणते आणि दुसरीकडे सरकार स्त्रियांना तितक्या दिवसांची पेड लिव्ह मिळावी याबद्दल अगदीच उदासीन आहे असा तो लढा आहे.
त्यामुळे अशा चित्रांकडे त्या त्या संस्कृतीमधील बॅकग्राउंड लक्षात घेऊन पाहिले पाहिजे.

>>>भरपगारी बाळांतपणाची 6 महिने रजा घेऊन नंतर राजीनामा टाकणाऱ्या बायका 'केवळ वैयक्तिक' निर्णय घेत नसून त्या सगळ्याच बायकांना, त्यांना नोकरिवर घेणाऱ्या/ठेवणारयाना आणि एकदरच समाजाला/त्याच्या स्त्रियांबद्दलच्या दृष्टिकोनाला affect करतायत.

मॅटर्निटी लिव्ह एलिजिबिलिटी ही लिव्ह घेण्याच्या आधी केलेल्या कामावर आधारित असते हे एक कटू सत्य आहे.
आपण कुणालाच आपल्यासाठी काम करायचे कंपल्शन करू शकत नाही.

बाकी भांडायचेच असेल तर बायकांनी एक होऊन पुरुषांशी का भांडू नये?

मला मान्य आहे, ६ महिने भर पगारी रजा घेऊन मग रिझाईन करण्याचा बायकांना मॉरल हक्क नाही.
पण बाई प्रेग आहे हे कळल्याक्षणी ती ३-४ महिने व्यवस्थित असली तरी तिच्याबद्दल चे सर्व महत्वाचे करीयर डीसीजन लांबणीवर टाकणे/दुसर्‍याला देणे, इन्क्रीमेंट प्रो रेटा देणे(हे इन्क्रीमेंट तिने प्रेग नसताना १०-११ तास बसून केलेल्या मागच्या वर्षीच्या कामाबद्दल असणार असतं.), अगदी व्यवस्थित प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन नसलेल्या स्त्री ला पण मॅ लीव्ह वर जायला आठवा चालू झाल्यापासून दबाव आणणे,लीव्ह वरुन परत आल्यावर इतर १०० लोकांनी नाकरलेली टिम आणि वर्क प्रोफाईल देणे, ऑनसाईट ला तिने हो सांगितले असले, घरचा सपोर्ट असला तरी परस्पर वर 'ती नाही येणार म्हणाली, जमणार नाही' सांगणे या गेमा कंपन्या टाकतच नाहीत असं नाही. (काही सन्माननीय अपवाद असतील.)

आमच्या स्त्री मैत्रिणी म्हणतात की बायकांना मुलं जन्माला घालावी लागतात,त्यासाठी आपल्याला त्यांना वेळेची/वफ्रॉहो ची सूट द्यावी लागते ही या लोकांना बायकांवर आपण करत असलेली मोठी मेहरबानी वाटते.

छान लेख राजेश्री आणि सई यांचे प्रतिसादही सुरेख.
स्तनपानच नाही तर बाटलीने सार्वजनिक ठिकाणी दूध पाजतानाही बाटली रुमालात गुंडाळा असे सांगतात बऱ्याच बायका. मी सांगतलं की मी असेच पाजते बाळाला दूध तर झाकावे लागते, बाळाला त्रास होतो वगैरे ऐकावं लागलं होतं. तरीही मी ऐकत नाहीच पण बऱ्याच नवमाता ऐकतात, बाळाच्या तब्येतीची रिस्क का घ्या म्हणून!

>>>पण बाई प्रेग आहे हे कळल्याक्षणी ती ३-४ महिने व्यवस्थित असली तरी तिच्याबद्दल चे सर्व महत्वाचे करीयर डीसीजन लांबणीवर टाकणे/दुसर्‍याला देणे, इन्क्रीमेंट प्रो रेटा देणे(हे इन्क्रीमेंट तिने प्रेग नसताना १०-११ तास बसून केलेल्या मागच्या वर्षीच्या कामाबद्दल असणार असतं.), अगदी व्यवस्थित प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन नसलेल्या स्त्री ला पण मॅ लीव्ह वर जायला आठवा चालू झाल्यापासून दबाव आणणे,लीव्ह वरुन परत आल्यावर इतर १०० लोकांनी नाकरलेली टिम आणि वर्क प्रोफाईल देणे, ऑनसाईट ला तिने हो सांगितले असले, घरचा सपोर्ट असला तरी परस्पर वर 'ती नाही येणार म्हणाली, जमणार नाही' सांगणे या गेमा कंपन्या टाकतच नाहीत असं नाही. +१

नुसती प्रेग्नन्ट नाही. जर "प्रेग्नन्ट होणार" अशी शंका असली तरी. काही फर्टिलिटी ट्रीटमेंट घेणाऱ्या बायकांच्या अशा कथा ऐकल्या आहेत. एक तर मूल होईल की नाही याची खात्री नाही आणि मूल होईल म्हणून ऑफिसमधून चांगल्या संधी हातातून निसटाना पाहायच्या.
बिगर पिक्चर बघता बायकांना बेनिफिट ऑफ डाउट देण्याकडे माझा कल आहे. कारण आधी हायरिंगच कमी असतं. त्यात ही सगळी स्थित्यंतरे (आणि त्यांच्यावर असलेला कल्चरल दबाव) पाहता ज्यांना ६ महिन्यांची रजा घेऊन पुन्हा छान सुरुवात करायची आहे अशा स्त्रियांसाठी काही रिझाईन करणाऱ्या असल्या तरी अस व्हर्सस देम अशी स्त्रियांमध्येच फूट पडू नये.

प्रेग्नन्सी लिव्ह नंतर रुजू झाल्यावर ठराविक काळ आम्ही नोकरी सोडणार नाही असा क्लोज घालून हवी तितकी प्रेग्नन्सी लिव्ह घेता आली पाहिजे,
( ३ महिने लिव्ह घेतलीत तर काही bond पीरीअड नाही, ६ महिने घेतलीत तर लिव्ह नंतर कमीतकमी ४ महिने काम करावे लागेल, वर्षभर घेतलीत तर ८ महिने लागेल etc _) असे काही तरी

हो असे बरे वाटते.
एच आर आणि बाई या दोघांनी एकमेकांचा अंदाज घेत गेमा टाकत बसण्यापेक्षा क्लियर अ‍ॅग्रीमेंट बरे.

Maternity leave ला काहीही clause असू नये. सहा महिने maternity leave मग साठलेली PL, मग without pay leave असं सगळं करुन स्त्रीने राजीनामा दिला तरी. ह्या काळात स्त्री प्रचंड मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्थित्यंतरातून जात असते. जितकी मदत मिळेल तेवढी असू दे. जी स्त्री rejoin करते तिला anyway मोठा ब्रेक झाल्यामुळे करियर बॅकलॉग आलेला असतोच. जी सोडून जाते तिला निदान पूर्ण काळावधी मिळते नक्की तिला काय हवंय आणि करायचंय ते ठरवण्याचा.

राजसी तुमचे म्हणणे एका अर्थी बरोबर आहे,
पण उलटे बघा,
long ब्रेक नंतर परत येणाऱ्या स्त्री ला जॉब वर ठेऊन घेऊ असा एक अश्युअर्न्स मिळतोय.

तुम्ही एखाद्या कम्पनीच्या मालक, किंवा प्रोजेक्ट सांभाळनार्या manager आहात अशी कल्पना करून पहा.
तुमच्या टीम मेम्बर च्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्थित्यंतराबरोबर तुमचे किती देणेघेणे असेल?
आणि त्या टीम मेम्बर च्या आयुष्यात अशी उलथापालथ घडली आहे म्हणून क्लायंट ने तुमचा सब standard परफोर्मंनस का कबूल करावा?

जी काही पोलिसी असेल ती स्त्रियांना योग्य तितके झुकते माप देऊन कंपनी ला तोटा होणार नाही अशी असावी.

सब स्टॅंडर्ड?
मला वाटते अगदी नवी टेक्नॉलॉजी रात्री जास्त वेळ थांबून रॅम्प अप करायचे असे काम दिले नाही, आधी करत होती तेच काम दिले तर परफॉर्मन्स सब स्टॅंडर्ड असायचे काही कारण नसावे.तसा असला तर तो लिव्ह आधी पण असेल.
'कमी टाईम कमिटमेंट' हा एक फरकाचा मुद्दा सोडल्यास मूल होण्याआधीचा आणि नंतर चा परफॉर्मन्स यात फरक पडतो असे वाटत नाही.
कमी टाईम कमिटमेंट ला पॅकेज मध्ये काही कमी करून चालवायला हरकत नसावी(आमच्या इथे एकीला हाफ पे आणि 6 तास वर्किंग विथ लंच असे दिले होते)

एखादया बुव्याला काही अनपेक्षित तब्बेतीच्या कारणांमुळे वर्ष-सहा महिने रजेवर जावे लागले तर लगेच त्याला काढून टाकायच्या गप्पा करतात का? सगळ्याच बायका बाळंत होतात म्हणून काही महत्त्वाचं नाही असं का! आणि आधी खर्ची घातलेल्या वर्षांवरच ML मिळते.
बाकी, अनुला अनुमोदन.

https://m.economictimes.com/small-biz/sme-sector/indias-maternity-law-ma...

बाळंतपणाची रजा 6 महिने केल्याचे भारतातील परिणाम.

ANy way धागा या विषयावर नाही म्हणून इकडेच थांबतो.
Just to put on record , माझा वरचा प्रतिसाद चुकीच्या पद्धतीने इंटरप्रित केला गेला आहे.

सई, अनु आणि राजसी, आपापल्या मोलकरणीना भरपगारी बाळंतपणाची रजा वगैरे वगैरे देतात वाटतं.

> बाकी भांडायचेच असेल तर बायकांनी एक होऊन पुरुषांशी का भांडू नये? > मला माफ करा मी तुमच्या गटात येऊ इच्छित नाही _/\_
भारतासारख्या देशात जिथे मुलं जन्माला घालू नका म्हणून सांगावे लागते तिथे ३ महिने काय आठवडयाचीदेखील भरपगारी रजा देऊ नये असे माझे मत आहे.

===
> प्रेग्नन्सी लिव्ह नंतर रुजू झाल्यावर ठराविक काळ आम्ही नोकरी सोडणार नाही असा क्लोज घालून हवी तितकी प्रेग्नन्सी लिव्ह घेता आली पाहिजे,
( ३ महिने लिव्ह घेतलीत तर काही bond पीरीअड नाही, ६ महिने घेतलीत तर लिव्ह नंतर कमीतकमी ४ महिने काम करावे लागेल, वर्षभर घेतलीत तर ८ महिने लागेल etc _) असे काही तरी >
हे ठीक आहे. बिनपगारी रजा असेल तर ती कितीही घेऊ द्यायला हरकत नाही.

एमी,
आमच्या मावशी अलरेडी 45 वर्षाच्या असलयाने असा सिनारीओ आला नाहीये.सध्या वर्षाला 24 पेड हॉलिडे, दिवाळीला पगाराला पगार बोनस, वर्षातून 2 वेळा गावी जायला पेड 5 दिवस सुट्टी इतकं देतो.
मूळ मुद्दा हा की बाळंतपण, त्या साठीची सुट्टी ही लक्झरी मानली जाऊ नये.
6 महिने पेड वाला मुद्दा आता आलाय.काही महिन्यांपूर्वी. त्यापूर्वी 3 महिने पेड, त्यांनंतर लिव्ह बॅलन्स उरला असेल तो आणि त्यांनंतर अनपेड असं सर्व कंपन्या मध्ये होतं.
एम्प्लॉयर ची मजबुरी पटते.टीम मधल्या बायका लिव्ह वर जाणार असणे, त्या साठी रिप्लेसमेंट बघणे हे करावे लागते.यात काही वेळा कंपनी चा फायदा पण असतो.रिसोर्स रोटेशन आपोआप होते.
परत एकदा, बाळंत होण्याचा निर्णय, त्यानंतर घरी राहणे ही लक्झरी नसून समाजातल्या बऱ्याच जणांची गरज आहे.(पुरुषांना पण प्रत्यक्ष बाळंत झाले नाही तरी ऑफस्प्रिंग हवं असतं असं मानून.)

ह्युमन रिसोर्सेसची गरज ठरवताना स्त्रिया बाळंतपणाची रजा घेणार, हे लक्षात घ्यायला हवं. घेतलं जात असावं ना?

ऍमी, बिनतोड मुद्दा केला की पर्सनल व्हायचं का! बाकी माझा तरी अजून प्रेग्नेंट मोलकरणीशी संबंध आलेला नाही. एक मोलकरीण दिवस गेल्यावर गावी निघून गेली, विचारलं असतं तर दिली पण असती. एकीला मुलीच्या लग्नासाठी(मागितली तितकी) पंधरा-वीस दिवसांची भरपगारी रजा दिली होती , दोन-तीन वर्षे होती. तोंड उघडून मागितले की सगळं मिळत!

अजून तरी कोणी कोणाला भारतात मुलं जन्माला घालू नका सांगितले नाहीये!

Amy, तुमची मते भयानक आणि टोकाची आहेत. जराही सहमत नाही.
पुढारलेल्या देशात (अमेरिकेचा अपवाद) स्त्री आणि पुरुष दोघांना पेरेंटल लिव्ह असते. कॅनडात तेव्हा जो पगार मिळतो तो इआय ( एम्प्लॉयमेंट इन्शुरन्स) मधून मिळतो. तुम्ही काम करत असताना प्रत्येकाच्या पगारातून इ आय कापला जातो, आणि तुमची नोकरी गेली, आजारपण आलं, प्रेग्नंट झालात इ.इ. तर एका वर्षांपर्यंत ( प्रेग्नन्सीला हल्ली 2 केलंय मला वाटतं) तुम्हाला पगाराचा काही भाग इआय (पर्यायानं सरकार) देतं.
नंतर कामावर घ्यायचं बंधन असतं. व्यक्तीला काम सोडण्याचा हक्क असतो. इ आय ही एक उत्तम सोशल सिक्युरिटी आहे.

> बिनतोड मुद्दा केला की पर्सनल व्हायचं का! > मुलं जन्माला घालणे हा पर्सनल निर्णयच आहे ना भारतात अजून? कि खाजगी कम्पन्या सांगतायत बायकांना मुलं जन्माला घालायला?

===
अमितव,
• तुम्ही ज्या पुढारलेल्या देशांबद्दल बोलताय तिथे जन्मदर किती आहे?
• इआय सरकार देतंय कि खाजगी कम्पन्या?
• तो सर्व नागरीकांना मिळतोय कि उच्च मध्यम वर्गातल्या पांढरपेशा नोकरदारांनाच मिळतोय?

(लोक)आपापल्या मोलकरणीना भरपगारी बाळंतपणाची रजा वगैरे वगैरे देतात वाटतं.

झालेले विषयांतर लक्षात घेता हा ही योग्य व महत्वाचा मुद्दा आहे.

बरं! बायकांची ML इतकी इतरांना खुपत असेल आणि कंपनीला आतबट्ट्याचा व्यवहार वाटत असेल म्हणून ML वर गदा आली तर career women इतर पर्याय धुंडाळतीलच जस की surrogate, adoption पण त्या option ला पण कुठलीतरी बाईच लागेल अजून प्रयोगशाळेत नऊ महिने ठेऊन घरी बाळ आणायची technology आलेली नाही.
Adoption /Surrogacy दोन्ही केसेसमध्ये नवमातांना ML मिळालेली पाहिलेली आहे. Adoption Govt तर्फे केलं तर surrogacy पेक्षा खूपच स्वस्त पडत. Surrogate Mother च्या ML च काय झालं किंवा ज्या बाईचं मूल दत्तक गेलं तिच्या ML च काय ते मला कळायला मार्ग नव्हता. कोणत्याही केसमध्ये स्वतः मूल जन्माला घालणे स्वस्त आहे.

सर्व इ आय भरणाऱ्या व्यक्तीना मिळतो. सुखवस्तू बाई घरी बसली आणि नवरा काम करत असला तर नवऱ्याला मिळते. इंडिपेंडन्ट कॉन्ट्रॅक्टर असाल आणि खुशीने इ आय भरत असाल तरी मिळतो.
प्रत्येक प्रश्न सामाजिक उतरंडीतून बघण्याचे सोडा.

बाया प्रेग्नन्ट झाल्यावर मॅटर्निटी लीव्ह नाकारून मुले जन्माला घालण्यास डिस्करेज करणे हे फार लांबचा घास वाटतोय. त्यापेक्षा सर्व पुरुषांची सक्तीने नसबंदी करणे जास्त प्रोअ‍ॅक्टिव्ह होईल का? Happy

Pages