तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते बहुतेक सारवलेल्या जमिनी/अंगणांच्या वेळचे नियम असणार. त्यावरची रांगोळी लादीवरच्यासारखी सहज झाडता येत नाही.

वरच्या बऱ्याच प्रथा मी अजूनही पाळते सवयीने. मीठ किंवा कुठलंही शस्त्र हातात देत नाही. शनिवारी तेल, मीठ, साबण,लोखंडी वस्तू, चप्पल विकत घेत नाही (फुकटही घेत नाही). पानात पहिला भात वाढत नाही. मीठ सांडलं तर केरसुणीने गोळा न करता हाताने गोळा करून पाण्यात टाकते म्हणजे सिंक मध्ये टाकून पाणी लगेच सोडते. दही, ताक संध्याकाळी कोणी मागितलं तर कणभर मीठ घालून देते.

भाताची खीर फक्त पितृपक्षात करते. हळद न घालता कढी कधीच करत नाही. नुसतं फोडणीचे ताक किंवा सुंठेची कढी किंवा ताक करते हळद न घालता.

अन्जू खूप छान. या सर्व श्रद्धा, पद्धती नव्या आहेत मला. आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी फक्त संध्याकाळी लक्ष्मी यायच्या वेळी झोपायचे नाही हा नियम होता.

दिवेलागणीला झोपत नाहीत.

बाकी आमच्या काही गोष्टी ऐकून इतरांना शॉक बसू शकेल. केस, नखं शनिवारी कापलेली चालतात आमच्याकडे. ह्या सर्व पद्धती माहेरून खरंतर आई करायची तशा अंगवळणी पडल्या आहेत, बाबा फार त्यात लक्ष द्यायचे नाहीत. माझा नवराही फार लक्ष देत नाही यात. भाऊ फार मानत नाही.

नवरा ऑनलाइन काही मागवतो तेव्हा एकदा मी निर्लेपचा एक तवा आवर्जून शनिवारी येणार नाही असा अंदाज घेऊन मागवायला सांगितला आणि तो नेमका शनिवारी आला Lol माहेरी चपला आवर्जून शनिवारी आल्या, भावाला चालतं. मी online डेरिंग करत नाही.

मी कॉलेजात असताना अधून मधून एका हॉटेलात मित्रांबरोबर जेवायला जात असू. तर तो हॉटेल वाला वरचे सुट्टे पैसे कधीच देत नसे. उद्या घेऊन जायला सांगायचा. रोजच्या रस्त्यावर असल्यामुळे आम्हालाही कांय वाटायचं नाही. एक दिवस त्याचा गाववाला आमचा मित्र झाला. त्यांन सांगितलं की, हे हॉटेल एकदा बंद पडलेलं त्यानं परत चालू केलं.
त्याला कोणीतरी सल्ला दिलेला की दिवस माववळा अन पैसे दिली की आपल्या घरतील लक्ष्मी दुसऱ्या घरात जाते म्हणून तो असं करतोय.

मला एकदा तिकडे कुठेतरी असं असं असतं याचा कल्चरल शॉक नाही पण त्याचं फार आश्चर्य वाटलं होतं.
शाळेत असताना एका कादंबरीत की कथा संग्रहात वाचलं होतं. ट्रेन मध्ये की बागेत तो बसला असतो आणि खारे दाणे विकणारा येतो "हां बैठे बैठे टाइमपास! लो खारा सेंग. घ्या खारे दाणे घ्या! बैठे बैठे टाइमपास."
तेव्हा मला याचं खूप आश्चर्य वाटलं की तिकडे कुठेतरी लोक टाइम पास होण्यासाठी असं काहीतरी खातात? त्याने कसा काय वेळ जाईल बुवा? फार तर पाच मिनिट लागतील खायला. वाचायला काही नाही, बोलायला/खेळायला कुणी नाही, खा दाणे किंवा भेळ, बैठे बैठे टाइमपास!
हे मी मग सगळ्यांना सांगितलं. मित्रांना सांगितलं. "तिकडे बोअर झालं" असं कुणी म्हटलं की "मग दाणे खायचे असते, मस्त वेळ गेला असता." करायचो.

आमच्या प्रथा -

पानात वाढताना पदार्थांची डावी उजवी बाजू पाहावी.
दिवेलागणीला झोपू नये.
दिवेलागणीला जेऊ नये.
दिवेलागणीनंतर कुणाला पैसे देऊ नयेत.
झाडूने खरकटे झाडू नये.
तांदळाची खीर पितृपक्ष वगळता करू नये.
कुणाची देणी असतील तर ती मंगळवारी वा शुक्रवारी फेडू नयेत.
रात्री वगैरे शिजवलेले पदार्थ थोडे तरी उरतील असे पाहावे.

आमच्याकडे कोकणात पूर्वी निखारे इकडून तिकडे न्यायचे असतील आणि वाटेत कोणी दोन व्यक्ती मध्ये येत असतील तर त्या दोन जणांमध्ये निखऱ्यांचा झारा जमिनीवर टेकवत दोन सेकंदांसाठी आणि मग पुढे जात. असं केलं नाही तर त्या दोघांमध्ये भांडण होतं अशी समजून होती.
"त्यांच्या मधून विस्तव जात नाही" हा वाक्प्रचार ह्यावरूनच आला असेल का ?

कुठे नेऊन ठेवला आहे कल्चरल शॉक माझा?>>>>> Lol

पानात वाढताना पदार्थांची डावी उजवी बाजू पाहावी.
दिवेलागणीला झोपू नये.
दिवेलागणीनंतर कुणाला पैसे देऊ नयेत.
झाडूने खरकटे झाडू नये.
कुणाची देणी असतील तर ती मंगळवारी वा शुक्रवारी फेडू नयेत.
रात्री वगैरे शिजवलेले पदार्थ थोडे तरी उरतील असे पाहावे.
>>>>>> वामन राव Ditto आमच्याकडे पण

दिवेलागणीला जेऊ नये.>>>>>> दिव्यात वात आणि तोंडांत हात.

यात आणखी ॲडीशन

दिवेलागणीनंतर केर काढू नये.
घरात कोणी आल्यावर किंवा गेल्यावर लगेच केर काढू नये.
रात्रीचे मीठ, सुई बद्दल पण सेम वर लिहिल्याप्रमाणे.

आणखी एक आमच्याकडे उंबऱ्यावर, उंबरा ओलांडताना शिंक आली तर त्याला तिथेच थांबायला सांगतात आणि मग कोणीतरी शिंकणाऱ्याच्या डोक्यावर चार थेंब पाणी आणि दाराच्या चौकटीवर, उंबऱ्यावर चार थेंब पाणी शिंपडतात.

आमच्याकडे कोणाचे लहान बाळ पहिल्यांदा आले तर त्याची टाळू भरत. आता शास्त्र म्हणून टाळूला थोडे तेल लावतात.

"त्यांच्या मधून विस्तव जात नाही" हा वाक्प्रचार ह्यावरूनच आला असेल का ?>>>> असू शकेल

दिवेलागणीला झोपू नये. >>> हे मला लॉजिकल वाटते. म्हणजे दिवेलागणीला झोपले की रात्री नेहमीच्या वेळेवर झोप येत नाही. मग दुसऱ्या दिवसाची सकाळ खराब होते. आई अजूनही झोपू देत नाही. नातीचा अपवाद फक्त.

झाडूने खरकटे झाडू नये.
>>>> हे ही होते. आजीकडे सारवणाची जमीन होती तेव्हा छोटा शेणाचा गोळा खरकट्यावरून फिरवून झाडाच्या बुंध्यात टाकून देत. ते मला लॉजिकल वाटायचे.

कुणाची देणी असतील तर ती मंगळवारी वा शुक्रवारी फेडू नयेत. >> मी याची करोलरी ऐकली आहे की कुणाला कर्ज देताना मंगळवारी किंवा शुक्रवारी द्यायचे नाही.

आमच्याकडे कोणाचे लहान बाळ पहिल्यांदा आले तर त्याची टाळू भरत. >>> अगदी जवळच्या नात्यातलं कुणी बाळ असेल तर शास्त्र म्हणून विचारून एक बोट लावतात.

या धाग्याचे नाव कल्चरल शॉकवरून ममव अंधश्रद्धा करायला हरकत नाही.

दोघांच्या मधून दिवा (निरांजन) न्यायचा नाही हेही आमच्या घरी होतं. बहुतेक कुठलाही विस्तव. पण विस्तव न्यायची वेळ फारशी येत नव्हती. निरांजन न्यायची वेळ जवळजवळ रोज यायची, तेव्हा आजी दोघांना एका बाजूला यायला सांगायची.
पुण्यात काही वेळा रिक्षावाले, दुकानदार वगैरे यांच्या बाबतीत बघितलं होतं की सकाळी बोहनीच्या (पहिल्या खरेदी/भाड्याच्या) वेळी ते पैसे परत द्यायला राजी नसायचे. शक्यतो नेमके पैसे द्यायला सांगायचे.
हो, या सगळ्या अंधश्रद्धाच आहेत, कल्चरल शॉक नव्हेत.

याईक्स! एकदा, माझ्या पायाला तडफडणार्‍या पालीचा स्पर्श झालेला बहुतेक किंवा भिती व किळसेने मला तसे वाटलेले. साबांनी डोक्यावरुन पाणी फिरवून सिंकमध्ये टाकलेले.

आमच्या सासूबाई शनिवारी नखे कापू द्यायच्या नाहीत.. बाकी मीठ, पांढरा भात सर्वात आधी नाही, अन्न सगळं संपवायचं नाही, कोरभर भाकर /पोळी शिल्लक ठेवायची, भात अक्खा डबा तसाच ठेवायचा नाही, चमचाभर तरी खावाच म्हणे इ. डिट्टो..
कोणी लवकर यावं घरी म्हणून फुलपात्र कोपऱ्यात पालथे घालत.. कोणी गावाला गेले की अंघोळ लगेच नाही करायची म्हणे. झाडायचं नाही..
हल्ली जेवायला वाढायचा क्रम फक्त मी पाळते असे आहे..

या धाग्याचे नाव कल्चरल शॉकवरून ममव अंधश्रद्धा करायला हरकत नाही.

या धाग्याचे नाव कल्चरल शॉकवरून ममव श्रद्धा करायला हरकत नाही. असं म्हणायला हरकत नाही.

>>> मा लवण
>>> कुठे नेऊन ठेवला आहे कल्चरल शॉक माझा?
Lol

२००० प्रतिसाद झाले यावरून अनुमान काढण्यात आले आहे की लोकांना लईच कल्चरल शॉक बसत आहेत.......
तरी आता कोणीतरी नवीन धागा काढण्याचे पुण्यकर्म करावे.

भरत हे "पाप" तुम्हीच करा व "कुणी शॉक देता का शॉक" नाव द्या. लगे हात अंधश्रद्धा निर्मूलन सुद्धा होऊन जाईल. Lol

>>>>व इतर आठवेल ते
Lol
----------
>>>>>पुण्यकर्म म्हटल्याने
भरत तुम्ही हे 'पुण्यकर्म' करुन आम्हाला 'भरत यांनी पुण्यकर्म केले' असा, कल्चरल शॉक द्या Happy

Lol
अशे तर सगळे माबोच "माबो आणि इतर आठवेल ते" होईल. विषयांतर करण्यात जी मजा आहे, ती विषयानुरूप लिहिण्यात नाही. मला दांडगा अनुभव आहे. त्यामुळे अगदी काटेकोरपणे शीर्षक द्या आणि कोलांट्यांचा आनंद घ्या.

+१. शीर्षकात 'आणि बरच काही' लिहिलंत तर प्रार्थना बेहेर आठवल्याने अजिबात विषयांतर होणार नाही. मग धागे मागे पडतील बरं!

Pages