मित्र नव्हे, परिचित !

Submitted by कुमार१ on 16 April, 2018 - 02:01

माझ्या वैद्यकीय कारकिर्दीच्या सुरवातीच्या टप्प्यातील हा प्रसंग आहे. एम.डी. ही पदवी प्राप्त करून मी एका हॉस्पिटलमध्ये सल्लागार म्हणून रुजू झालो. ते हॉस्पिटल नव्यानेच सुरू झाले होते. त्यामुळे माझ्यासह इतर सहकारीही पायाभूत उभारणीची कामे मन लावून करीत होते. हळूहळू हॉस्पिटलचा विस्तार होत गेला. मग तेथील डॉक्टरांची संख्याही वाढवण्यात आली. अशाच एका नवीन भरतीच्या वेळी माझ्या विभागात डॉ. सतीश हा माझा कनिष्ठ सहकारी म्हणून रुजू झाला. महिनाभरातच मी त्याच्याविषयी एक अंदाज बांधू शकलो. तो जरी फारसा हुशार नसला तरी तो नेमून दिलेली कामे व्यवस्थित करीत असे.

रोज जेवणाच्या सुटीत आम्ही दोघे एकत्र डबा खाऊ लागलो. त्या वेळेस मी विवाहित होतो तर तो अविवाहित. असंख्य विषयांवर आमच्या मनमोकळ्या गप्पा होत. त्यामध्ये क्रिकेट, राजकारण, नाटक-चित्रपट इ. नेहमीचे विषय तर असतंच, पण त्याचबरोबर स्त्री-पुरुष संबंध या तारुण्यसुलभ विषयाचाही समावेश असे. सतीश या विषयातील त्याच्या शंकांचे माझ्याकडून निरसन करून घेई. त्याचे असे कुतूहल पाहून मलाही माझ्या विवाहपूर्व दिवसांची आठवण होई! आमच्या विभागात आम्ही दोघेच डॉक्टर असल्याने आमची मैत्री दृढ होत गेली.

कालांतराने सतीशच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुली पाहणे सुरू केले. त्या ‘पाहण्याच्या’ कार्यक्रमांचा सविस्तर वृत्तांत तो मला दुसऱ्या दिवशी सांगत असे आणि बायको कशी असावी यावर माझा सल्लाही विचारत असे. यथावकाश त्याचे लग्न झाले. हळूहळू तो संसारात रमला. दोन वर्षात नोकरीतही रुळला.

एव्हाना आमचे हॉस्पिटल सुरू झाल्याला चार वर्षे झाली होती. आता हॉस्पिटलचा विस्तार करण्याचे व्यवस्थापनाने ठरवले होते. त्यामुळे आम्हा सर्वांची जबाबदारी अधिकच वाढत गेली. सतीश व मी दिलजमाईने रोजची कामे जास्त वेळ थांबून पूर्ण करीत होतो. त्यामुळे आमची मैत्री घट्ट होत गेली. आम्हा दोघांना एकमेकांच्या आयुष्यातील काही माहिती नाही असे काहीच उरले नाही.

दरम्यान मी नोकरीची चार वर्षे समर्थपणे पूर्ण केल्याने आणि वाढत्या जबाबदाऱ्या स्वीकारत असल्याने मी माझ्या बढतीचा प्रस्ताव वरिष्ठांपुढे मांडला. मग माझे मूल्यमापन करण्यात येऊन त्यांनी तो व्यवस्थापनापुढे ठेवला. थोड्याच कालावधीत मला ‘वरिष्ठ सल्लागार’ या पदावर बढती देण्यात आली. नवीन पदभार स्वीकारण्याचा दिवस होता १ जानेवारी. पगारामध्ये अर्थातच आकर्षक वाढ दिलेली होती.

नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला हे समजू शकेल की तिथल्या पहिल्या बढतीचा आनंद हा अवर्णनीय असतो. तरुणपणी योग्य वयात बढती मिळणे हा त्या व्यक्तीच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा असतो. मात्र जर का तुम्ही पहिल्याच पदावर बरीच वर्षे कुजलात, तर मात्र तुमची प्रगती नक्कीच खुरटते. माझ्याबाबतीत ही बढती योग्य वयातच झाली होती. त्यामुळे एक प्रकारचे चैतन्य माझ्यात संचारले होते.
बढतीचा आदेश स्वीकारतानाच कार्यालयातील अनेकांनी “डॉक्टर, पेढे पाहिजेत, खरे तर पार्टीच हवी’, असा गलका केला. त्याने मी खूप भारावून गेलो. आमचे संपूर्ण हॉस्पिटल म्हणजे एखाद्या मोठ्या कुटुंबांसारखेच होते. त्यामुळे मी दुसऱ्याच दिवशी त्या सर्वांना पेढे वाटण्याचे ठरवले. तारुण्यात आपण तसे शौकीन असतो. त्यानुसार माझ्या शहरातील सर्वात प्रसिद्ध मिठाईवाल्याकडून त्याच्याकडील सर्वात मोठ्या आकाराचे केशरी पेढे मी खरेदी केले.

हॉस्पिटलच्या उभारणीपासून आम्ही सगळे एकत्र राबलेले असल्यामुळे आमच्यात जिव्हाळा निर्माण झाला होता. त्यामुळे आमच्यातील कोणाच्याही आनंद वा दुखःद प्रसंगात सगळेच सामील होत. ठरवल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलभर फिरून पेढेवाटप सुरु केले. मला पहिला पेढा खरे तर सतीशला द्यायचा होता पण त्या दिवशी तो नेमका कामावर उशीरा येणार होता. म्हणून मी इतरांचे वाटप सुरु केले. त्या सगळ्यांनी माझे मनापासून अभिनंदन केले.
आता मी सतीशची आतुरतेने वाट पाहत होतो. साहजिकच होते ते, कारण आम्ही रोज जास्तीत जास्त काळ एकत्र असायचो आणि जेवणही बरोबर करायचो. थोड्या वेळाने सतीश आमच्या विभागात आला. आमची नजरानजर झाली. आमच्या मैत्रीच्या नात्याने तो आल्याआल्याच माझ्या बढतीबद्दल काही बोलेल अशी माझी अटकळ होती. परंतु, इथेच मला पहिला धक्का बसला. त्याने निर्विकारपणे त्याच्या कामास सुरवात केली.
मी त्याच्याजवळ जाऊन त्याला पेढा दिला. त्यावर त्याने “काय विशेष?” असा अनपेक्षित प्रश्न विचारला. हा मला बसलेला दुसरा धक्का होता. एव्हाना माझ्या बढतीची बातमी हॉस्पिटलभर आणि कर्णोपकर्णी अनुपस्थित लोकांपर्यंतही पोहोचली होती. त्यामुळे ती सतीशला माहिती नसणे जवळपास अशक्य होते. त्याच्या “काय विशेष” ला मी ,”माझ्या बढतीबद्दल”, असे उत्तर दिले. तिसरा धक्का मला आता बसायचा होता. “हं” एवढाच हुंकार काढून त्याने पेढा तोंडात टाकला. मग तो “पेढा मस्त आहे”, म्हणाला अन त्याच्या कामात गढून गेला.

दोन मिनिटे मी अगदी सुन्न झालो. माझ्या या आनंदाच्या प्रसंगी हॉस्पिटलमधील माझ्या सर्वात जवळच्या ‘मित्रा’कडून ‘अभिनंदन’ हा पंचाक्षरी शब्दही ऐकायला मी पारखा झालो होतो. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात एवढा नकारात्मक प्रतिसाद मी प्रथमच अनुभवत होतो. थोड्या वेळाने माझा पेढेवाटप कार्यक्रम संपला. नंतर रोजची जेवणाची वेळ झाली. सतीश व मी एकत्र जेवायला बसलो. त्या दिवशी मी चांगल्यापैकी कपडे केले होते. बुटांनाही चकाचक पॉलिश केले होते. जेवताजेवता सतीशने माझ्या पायांकडे पाहिले आणि “बूट छान आहेत” असे म्हणाला. जेवण संपेपर्यंत तो तसा अबोलच होता. माझ्या बढतीचा विषय तर त्याने कटाक्षाने टाळला.

माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात पेढे वाटण्याचे अनेक प्रसंग आले होते. किंबहुना सर्वांच्याच आयुष्यात ते कधीना कधी येतात. परंतु अशा प्रसंगी, “ अरे वा, छान झालं” असे न म्हणणारी व्यक्ती मला अद्याप भेटली नव्हती. द्वेष, मत्सर, असूया इत्यादी गुण हे मानवी स्वभावाचेच भाग आहेत. प्रत्येकाच्या ठायी ते वास्तव्य करतातच. पण एखाद्याच्या आनंदाच्या प्रसंगी वरकरणी तरी त्याचे अभिनंदन वा कौतुक करणे, ही व्यावहारिक सभ्यता असते. बहुसंख्य लोक ती पाळताना दिसतात. एखाद्याजवळ आपण आपला आनंद व्यक्त केल्यावर त्याने ‘अरे वा’ वगैरे काहीही नाही म्हटले तरी चालेल, हा विचार म्हणून ठीक आहे. पण, तेवढी स्थितप्रज्ञता आपल्यात असायला आपण साधुसंतच असायला हवे. ते नसल्यामुळे आपला अपेक्षाभंग होतो. किंवा ‘फलाची अपेक्षा न धरता कर्म करीत राहा’ हे पचवणे भल्याभल्यांना संपूर्ण आयुष्य खर्ची पडले तरी जमत नाही. मी तर तेव्हा जेमतेम तिशीत होतो.

प्रस्तुत प्रसंगात सतीश हा कुठल्याच प्रकारे माझा स्पर्धक नव्हता. त्याचे वय आणि अनुभव हे माझ्याहून कमी होते. मी एम डी होतो तर तो एम बी बी एस नंतरचा डिप्लोमा धारक.
तसेच नजरेत भरावे असे काही वेगळे कामही त्याने केलेले नव्हते. तेव्हा याप्रसंगी त्याचे माझ्यावर जळणे हे माझ्या आकलनशक्तीबाहेरचे होते. आमच्या संपूर्ण स्टाफपैकी माझे अभिनंदन न करणारी सतीश ही एकमेव व्यक्ती होती आणि या गृहस्थाला मी माझा सर्वात जवळचा मित्र धरून चाललो होतो !

या एका कडवट प्रसंगाने माझ्या आनंदावर अगदी विरजण पडले. अनेक दिवस हे सतीशचे वागणे माझ्या डोक्यातून जात नव्हते. किंबहुना वरिष्ठ पदावर काम करण्याचा उत्साहच कुणीतरी काढून घेतल्यासारखे वाटत होते. त्यावेळेस मला माझ्या पूर्वायुष्यातील दोन व्यक्तींच्या उद्गारांची प्रकर्षाने आठवण झाली.

मी शाळेत नववीत असताना माझ्या वर्गात सुदेश नावाचा विद्यार्थी होता. त्या वयातही त्याचे विचार परिपक्व होते. वर्गातील सर्वजण त्याला ‘अकाली प्रौढ’ म्हणत. तो एकदा आम्हाला गप्पांच्या ओघात म्हणाला होता, “आपण वर्गातील सर्वजण हे एकमेकांचे ‘परिचित’ आहोत. एकमेकांना ‘मित्र’ म्हणण्याची चूक कोणी करू नका कारण, मित्र हे खूप वरच्या पातळीवरचे नाते आहे.

तर दुसरे उद्गार मी एका दैनिकाच्या संपादकांच्या लेखात वाचले होते. त्यांनी लिहीले होते, “संकटकाळी जो उपयोगी पडतो तो खरा मित्र, ही मित्राची व्याख्या आता फार जुनी झाली आहे. सध्याच्या काळातील व्याख्या म्हणजे, आपल्या आनंदात मनापासून सहभागी होतो तो खरा मित्र !”
या दोन्ही उद्गारांची प्रचिती मला वरील प्रसंगातून पुरेपूर आली हे सांगायलाच नको.
…..
आज वरील घटनेनंतर २५ वर्षांनी मी त्याकडे तटस्थपणे बघू शकतो, हे नक्की. परंतु तेव्हा काय वाटले होते त्या ऊर्मितून हे लेखन झाले इतकेच.

********************************
( पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी सस्मित! इथे असे अनुभव मांडणे योग्य होणार नाही. माझे म्हणणे इतकेच की माणूस म्हट्ला की षडरिपू आलेच. त्यात मुळचा स्वभावही असतोच. जीवन शिक्षण वगैरे म्हटले तरी सातत्याने मनावर ताबा ठेवणे, मूळ स्वभावाच्या विपरित वर्तन हे शक्य नसते. जसा सहवास वाढतो, आणिबाणीचे प्रसंग एकत्र झेलणे होते तसे स्वभावदोषासकट वावरणेही वाढते. शाळेत मूल्य शिक्षण, जीवन शिक्षण असावे मात्र त्यामुळे अमुक गट स्वभावदोष बाजूला ठेवून वावरतो असे म्हणणे भाबडेपणाचे. परक्या समुहातील व्यक्तीशी तुमचा संपर्क हा 'हनिमून पिरीएड' इतकाच सिमित असेल तर स्वभावदोषांचा अनुभवही फारसा येणार नाही.

सस्मित सुरेख चौकार !

अर्थात लेखक म्हणून मला सर्व प्रकारच्या गोलंदाजीचा सामना करायचा आहे. तो मी आनंदाने करत आहे!
होऊन जाऊद्या लेखाचे post mortem. मला त्यात समाधान आहे. ☺

एव्हढे का अवघड असते अभिनंदन म्हणणे >> असेही स्वभावदोष असतात. त्यांना अशा वागण्यातून एक विचित्र समाधान मिळत असावे.

एव्हढे का अवघड असते अभिनंदन म्हणणे
>>> एवढे काय एक्सपेकतेशन आहे अभिनंदन ऐकायचे? म्हणजे खोटे खोटे अभिनंदन हवय, जे मनापासून नाहीय.
अरे त्या मित्राला शॉक होता. आणि हे कॉमन आहे.. मॅनेजर कितीही मित्र मित्र म्हणून गप्पा मारत असला, आपण रात्र रात्र काम करतो पण क्रेडिट फक्त तोच घेतो.. का नाही वाईट वाटणार.
चल त्याला प्रोमोशन, काही टक्के पगारवाढ.. आपल्याला काय.. अरे निदान कौतुक तरी करावे..
मित्र मित्र म्हणवता आणि मग प्रोमोशन try करतोय हे का नाही सांगितले, अंधारात का ठेवले त्याला..
तो सगळं सांगतो , पूर्ण विश्वास ठेवतो.. सेम expect असेल ना त्याला पण.

फक्त डिग्री जास्त मोठी म्हणजे मी लायक वगैरे ठीक आहे पण त्याला पूर्वकल्पना तरी द्यायची.. तो लग्न सारख्या गोष्टीत पण तुम्हाला लूप मध्ये ठेवत होता.

आजच एका सिनियर कलिग च प्रोमोशन झालं, आणि त्याच्याशी कधी न बोलणारा दुसरा एक कलिग त्याला अभिनंदन करुन आला. मग आम्ही ह्या दुसर्याला जाम चिडवला, काय रे आज काय विशेष अभिनंदन वगैरे, तो म्ह्टला काही नाही odd man out वाटलं असतं म्हणून formality करुन आलो मला हात मिळवायचा नव्हता पण त्याने हात पुढे केला. Wink
बादवे, हा सिनियर त्याच्या क्लास्मेट मित्राला रिपोर्ट करतो, हुशार आहे पण धुर्त नाही म्हणुन मागे राहिला.(पोलिटिक्स जमलं नाही आणि त्याचा क्लासमेट खुप वर गेला टेक्निकली हुशार नसताना.)

असेही स्वभावदोष असतात. त्यांना अशा वागण्यातून एक विचित्र समाधान मिळत असावे.>> हो. समाधानापेक्षा राग/जळफळाट व्यक्त करायची चुकीची पद्धत म्हणता येईल. इथे मित्राचा परिचितच झालाय, मला तर मैत्रिण अनोळखी झाल्याचाही अनुभव आलाय. चालायचे!!

एवढे काय एक्सपेकतेशन आहे अभिनंदन ऐकायचे? म्हणजे खोटे खोटे अभिनंदन हवय, जे मनापासून नाहीय.>>> अहो पण पेढा, बुट छान म्हणता येतय ना मग ते पण म्हणून टाकायचे त्यात काय!!!
बाकी ते मनापासून आहे का नाही याला इथे अर्थ नाही. बेसिक मॅनर्स पाळता यायला हवेत.
तुझी बढती बघून माझा फार जळफळाट होतोय असे कोणी म्हणत नाही कारण ते बरे दिसत नाही. तसेच कोणी चांगली बातमी दिली तर अभिनंदन न करणे हेही बरे दिसत नाही.
राहता राहिला मैत्रीचा प्रश्न......तर ज्यांच्यात 'काय रे, एव्हढे प्रयत्न करत होतास मला कधी बोलला नाही?' किंवा 'अभिनंदन करायचे जड जातेय का तुला?' असा संवाद होऊ शकत नाही त्यांनी परिचितच राहिलेले बरे.

प्रत्येक माणूस स्वत:च्या बढतीचा हुशारीने वा धूर्तपणे.. त्याला जमतो त्याप्रकारे प्रयत्न करत असतो त्यामुळे ते मनाला लावून घेऊ नये. Happy

अरे भाई, सिधीसी बात है । आपल्या बरोबर चा माणूस प्रमोट झाला म्हणजे तो आता आपला बॉसच होणार असतो.
त्याचे अभिनंदन न करणारा आपल्याच पायावर धोंडा पाडतो.

छान आहे हा बाफ Happy चर्चा आवडली. दुसर्‍या साइड ने तोच प्रसंग लिहिण्याचा एक्सरसाइज इन्टरेस्टिंग. आणि डॉ. कुमार यांनी पण तो पॉजिटिवली घेतला हे विशेष !!

<<< तो डिप्लोमा धारक असल्याने बढती नसतेच. उलट एम डी धारक खूप वर जात राहतो . >>>
हे इतर ठिकाणी पण खरे आहे. मला माझ्या बॉसने सरळ सांगितले होते की डिप्लोमाधारक लोकांशी प्रोफेशनली वाग, पण अगदी लंगोटीयार असे समजून वागू नकोस कारण उद्या तू त्यांचा बॉस बनणार आहेस, हे लक्षात ठेव.

डॉ. कुमार यांच्या मनातली तगमग मी समजू शकतो, कारण मलापण असे अनुभव आले आहेत.
खोटे खोटे का होईना पण त्याने अभिनंदन करायला हवे होते. कदाचित त्याला ती समज नसेल कदाचित.
Never step on tows that are attached to the ass you may have to kiss tomorrow.

चांगली चर्चा, वेग वेगळ्या बाजूने काय घडलं असावं हे वाचता आलं
प्रत्येकाची भावनिक परिपक्वता वेग वेगळ्या पातळीची असते,त्यानुसार प्रत्येक जण व्यक्त होत असतो
आपल्याला काय वाटतंय यापेक्षा आपण त्यावर कशा प्रकारे व्यक्त होतोय हे जास्त महत्वाचं असतं
प्रत्येक वेळी प्रत्येकाला हा सारासार विचार करणे जमतेच असे नाही आणि मग त्या प्रतिक्रियेमुळे माणसं दुखावली जातात,
असो चालायचंच.

ऋन्मेष -
आता हा धागा पाहिला आणि सारे प्रतिसाद वाचले.
दोन्ही बाजूंचे विचार वाचायला मजेशीर वाटले. खास करून विरुद्ध बाजूंचा विचार करणारे प्रतिसाद आवडले. कारण यातच खरी मजा असते Happy

कुमारजी आपले हे खालचे प्रतिसादातील वाक्य वाचले.
>>>>>>>>>
या लेखातील तो महा बेरकी आहे. तो मला “ बूट छान, पेढा मस्त” हे म्हणू शकतो त्याला ‘अभिनंदन’ शब्द मात्र जड जातो !
आमच्या बऱ्याच मित्रांचे त्याच्याबद्दलचे असेच अनुभव आहेत

>>>>>>>>>>
आपले आणखीही असेच काही प्रतिसाद आहेत. एकूण लेख आणि प्रतिसाद वाचून काही मुद्दे/विचार मनात आले.

१) वरीलप्रमाणे काही प्रतिसाद वाचताना असे वाटले की आपण त्या मित्राला व्हिलन बनवायच्या हेतूनेच लिखाण करत आहात.

२) जर सर्वांनाच एका व्यक्तीचे असे अनुभव येत असतील तर नक्कीच आपण म्हणता तसे तो मित्रच महाबेरकी असावा. खरे तर तुम्हा सर्वच मित्रांना त्याचा असा अनुभव आलेला तर त्याला मित्रयादीतून आधीच वगळायला हवे होते. बहुधा तुम्ही सर्वांनी हे अनुभव एकमेकांशी नंतर शेअर केले असावेत. आधी केले असते तर तुमच्या त्याच्याकडून अपेक्षाच नसत्या आणि अपेक्षाभंग झालाच नसता.

३) मुळात कामाच्या ठिकाणी कोणी मित्र नसतोच, असतात ते फक्त कलीग्ज! हे आपल्याला आधीच समजले असते तर आपला अपेक्षाभंग झाला नसता.

४) जसा तो तुमचा मित्र नव्हता तसेच तुम्हीही त्याचे मित्र नव्हता. तुमच्यातील सो कॉल्ड मैत्रीचे नाते दोन्ही बाजूंनी तकलादू धाग्यांचे होते. हे तुम्ही आजही समजून घेतलेत तरी "मैत्रीत धोका झाला" अशी जी मनात सल आहे ती कमी होईल.

५) आपल्या कलीग्जवर जळणे नॉर्मल आहे. दहापैकी नऊ जण हे करतात. भले मग तुम्ही उरलेल्या एकात असाल तरी हे स्विकारा.

येनीवेज,
या निमित्ताने या विषयावर साधारण माझे दोन जुने धागे होते ते आठवले, त्यांची जाहीरात करतो.

१) फ्रेंन्ड अ‍ॅण्ड कलीग्ज ! - https://www.maayboli.com/node/50993

२) ऑफिसमधील राजकारणाचे अनुभव - https://www.maayboli.com/node/50997

लेख आवडला आणि पटला. तुम्ही प्रतिसादात आलेले मुद्देही पॉझिटिवली घेतले आहेत हे चांगलंच आहे. पर्सनली मला चर्चा जरा ताणल्यासारखी वाटली. कामाच्या ठिकाणी जिथे काँपिटिशन असते तिथे असे अनुभव येणारच. दोन्ही पार्टीजना आपापल्या बाजूही असणारच. तुम्ही इथे तुमच्या बाजूने लिहिलंत. त्यावर दुसरी बाजू इतकी ताणायची गरज नव्हती असं वाटलं.

आपल्याला असे अनुभव येतात तेव्हा दुसर्‍या बाजूचाही विचार करायला हवा, असा धडा या लेखावरची चर्चा वाचून मिळाला.
मलाही सतीशच्या बाजूने विचार करायला आवडेल.
लेखातली ही दोन वाक्ये - "त्यामुळे आमची मैत्री घट्ट होत गेली. आम्हा दोघांना एकमेकांच्या आयुष्यातील काही माहिती नाही असे काहीच उरले नाही."
"एव्हाना माझ्या बढतीची बातमी हॉस्पिटलभर आणि कर्णोपकर्णी अनुपस्थित लोकांपर्यंतही पोहोचली होती. त्यामुळे ती सतीशला माहिती नसणे जवळपास अशक्य होते."

एकत्र ठेवून वाचली तर असं दिसतंय की सतीशला आपल्या अत्यंत जवळच्या, मित्रसमान वरिष्ठ सहकार्‍याच्या बढतीची बातमी इतर चार लोकांना मिळते तशीच मिळालीय. मित्राच्या तोंडून, खूप आधी मिळालेली नाही.

मी सतीश असतो, तर या प्रकाराने मनाच्या एका कोपर्‍यात नक्कीच दुखावला गेलो असतो. (हॉस्पिटलच्या प्रगतीत मलाही सहभागी करून घेत , माझ्या सहकार्‍याप्रमाणे माझाही पगार वाढला होता की नाही, हा भाग आणखी वेगळा. त्यात असूया ते अन्याय अशी कोणतीही छटा येऊ शकते.)

पण अशावेळी त्या वरिष्ठ सहकार्‍याचं, जो आता आणखीनच वरिष्ठ झाला होता, उपचारापुरतं तरी का होईना, अभिनंदन केलं असतं की नाही? तो सहकारी ती गोष्ट इतकी मनात ठेवणारा असेल, हे मला तेव्हा कळलं होतं की नाही? अभिनंदन न करण्याच्या माझ्या कृत्याचा माझ्या कामावर, रेकॉर्डवर आणि आमच्या संबंधांवर होणार्‍या संभाव्य परिणामांची मला त्याक्षणीतरी तमा वाटली होती की नाही? (की अशा वेळी पर्याय शोधायची गरजच अधिक वाटली असेल? )
असे आणखी प्रश्न पडले.

प्रतिसाद आवडले.

'१९५० साली मी ५ वर्षांचा असताना आमच्या शेजार्यांनी त्यांचे आईसक्रीमपॉट आम्हाला उसने दिले नाही'
'मी इयत्ता चवथीत असताना माझा नवीन ड्रेस बघून मैत्रिणींची जळजळ झाली'
'आठवीत संस्कृतमधे ९५ गुण मिळाल्यावर आमच्या शेजारणीची खोचक कमेंट लक्षात आहे'
असले लेख, प्रतिसाद 'मला' आवडत नाहीत. You are 'supposed' to growup and move on. जमलं तर इतरांकडे बघा म्हणजे आपण किती छोट्या गोष्टी अजूनही विनाकारण उकरून काढून चिवड्त बसतो लक्षात येईल किंवा येणारही नाही....

पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )>>>> आता त्या लेखाची प्रत व आताचे लिखाण यातील तफावत नेमकी काय आहे या मुद्दा कुणी कसा मांडला नाही?

@ प्रकाश,

मुख्य बदल असे केलेत:
१. अनावश्यक वाक्यांची काटछाट
२. मी एम डी व तो डिप्लोमा आहे याची भर घातली. त्यामुळे तो माझा स्पर्धक नव्हता हे वाचकांना कळते.

इतक्या वर्षाने लिहुलेल्या लेखात सुद्धा ती भावना वा टोचणी जाणवलीच.
अपेक्षाभंगच असतो तो. आपणच वाढवलेल्या अपेक्षा. असो.
मी माझ्यापुरता काढलेला मार्ग, मूव ऑन आणि स्टे अवे.

—-
मला अनुभवातून कळलेले,
आपल्याला दुसर्‍याबद्दल जे व जसे वाटते, ते तसेच दुसर्‍याला वाटणे वा वाटावे हि चुकीची अपेक्षा आहे.

काहीही कारण नसताना दुसर्‍यावर जळणारी माणसे असतातच. इथे मायबोलीवर दिसलीत उदाहरणे जी सतत कुजके नासके टोमणे मारून एखाद्याला टारगेट करून टवाळकी करतात त्यामागे जेलसीच दिसून येते.

आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या व्यक्तीबरोबर मैत्री करूच नये. वाचताना अतिशय डिस्क्रिमिनेटीव वाटेल पन कडू सत्य आहे. कारण ईन्सिक्युर्ड माणसं इतकी आहेत भरलेली ती कधीच दुसर्‍याचे चांगले बघू शकत नाहीत.

असो.

पण यातूनच साहित्य निर्माण होत असते हे नाकारुन चालणार नाही. >>>>> +111

एक उदा. देतो.
श्री ना पेंडसेंनी त्यांची एक कादंबरी ४० वर्षांपूर्वीच्या आयुष्यातील घटनेनंतर लिहिली होती.
विचारांचे लोणचे मुरायला कितीही काळ लागू शकतो, असं ते म्हणाले होते.
आणि लेखनासाठी स्वतः ची वेदना याहून दुसरा उत्तम विषय नसतो.

>>>>>इतका जवळचा मित्र मानत होतात तर मग केवळ अभिनंदन म्हणाला नाही म्हणून असे का केलेत? काही झाले तरी नंतर काही दिवसांनी वगैरे तुम्ही ह्या विषयावर त्याच्याशी बोलायला हवे होते व जवळचा मित्र अगम्य कारणाने दुखावलाय तर त्याला मन मोकळे करायची संधी तुम्ही द्यायला हवी होती असे मला वाटते.
"अरे काय झाले सतीश. मी मागचे काही दिवस पाहतोय तू पूर्वीसारखा नाही राहिलास"<<<<<<
दोन्ही भावनेचे गुलाम झालेले. Happy

>> जपनी लोकं पण त्यांचे स्वभावदोष घेवूनच बाहेर पडतात. इथे गेली २२ वर्षं बघतेय. वरवर बघता लक्षात येत नाही पण रोजचेच झाले की व्यवस्थित जाणवतात.

प्रमाण आपल्यापेक्षा खूपच कमी आहे. तीच २२ वर्षे भारतात काढली अशी कल्पना करून पहा Happy

शिष्टाचार शिक्षणाबद्दल :

काहींचे शिक्षण घरातून तर काहींचे शाळेतून मिळेल. पण आपण प्रौढ झाल्यावर जर जगात डोळसपणे वावरलो तर बऱ्याच गोष्टी आपल्या आपण शिकू शकतो.

Pages