मित्र नव्हे, परिचित !

Submitted by कुमार१ on 16 April, 2018 - 02:01

माझ्या वैद्यकीय कारकिर्दीच्या सुरवातीच्या टप्प्यातील हा प्रसंग आहे. एम.डी. ही पदवी प्राप्त करून मी एका हॉस्पिटलमध्ये सल्लागार म्हणून रुजू झालो. ते हॉस्पिटल नव्यानेच सुरू झाले होते. त्यामुळे माझ्यासह इतर सहकारीही पायाभूत उभारणीची कामे मन लावून करीत होते. हळूहळू हॉस्पिटलचा विस्तार होत गेला. मग तेथील डॉक्टरांची संख्याही वाढवण्यात आली. अशाच एका नवीन भरतीच्या वेळी माझ्या विभागात डॉ. सतीश हा माझा कनिष्ठ सहकारी म्हणून रुजू झाला. महिनाभरातच मी त्याच्याविषयी एक अंदाज बांधू शकलो. तो जरी फारसा हुशार नसला तरी तो नेमून दिलेली कामे व्यवस्थित करीत असे.

रोज जेवणाच्या सुटीत आम्ही दोघे एकत्र डबा खाऊ लागलो. त्या वेळेस मी विवाहित होतो तर तो अविवाहित. असंख्य विषयांवर आमच्या मनमोकळ्या गप्पा होत. त्यामध्ये क्रिकेट, राजकारण, नाटक-चित्रपट इ. नेहमीचे विषय तर असतंच, पण त्याचबरोबर स्त्री-पुरुष संबंध या तारुण्यसुलभ विषयाचाही समावेश असे. सतीश या विषयातील त्याच्या शंकांचे माझ्याकडून निरसन करून घेई. त्याचे असे कुतूहल पाहून मलाही माझ्या विवाहपूर्व दिवसांची आठवण होई! आमच्या विभागात आम्ही दोघेच डॉक्टर असल्याने आमची मैत्री दृढ होत गेली.

कालांतराने सतीशच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुली पाहणे सुरू केले. त्या ‘पाहण्याच्या’ कार्यक्रमांचा सविस्तर वृत्तांत तो मला दुसऱ्या दिवशी सांगत असे आणि बायको कशी असावी यावर माझा सल्लाही विचारत असे. यथावकाश त्याचे लग्न झाले. हळूहळू तो संसारात रमला. दोन वर्षात नोकरीतही रुळला.

एव्हाना आमचे हॉस्पिटल सुरू झाल्याला चार वर्षे झाली होती. आता हॉस्पिटलचा विस्तार करण्याचे व्यवस्थापनाने ठरवले होते. त्यामुळे आम्हा सर्वांची जबाबदारी अधिकच वाढत गेली. सतीश व मी दिलजमाईने रोजची कामे जास्त वेळ थांबून पूर्ण करीत होतो. त्यामुळे आमची मैत्री घट्ट होत गेली. आम्हा दोघांना एकमेकांच्या आयुष्यातील काही माहिती नाही असे काहीच उरले नाही.

दरम्यान मी नोकरीची चार वर्षे समर्थपणे पूर्ण केल्याने आणि वाढत्या जबाबदाऱ्या स्वीकारत असल्याने मी माझ्या बढतीचा प्रस्ताव वरिष्ठांपुढे मांडला. मग माझे मूल्यमापन करण्यात येऊन त्यांनी तो व्यवस्थापनापुढे ठेवला. थोड्याच कालावधीत मला ‘वरिष्ठ सल्लागार’ या पदावर बढती देण्यात आली. नवीन पदभार स्वीकारण्याचा दिवस होता १ जानेवारी. पगारामध्ये अर्थातच आकर्षक वाढ दिलेली होती.

नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला हे समजू शकेल की तिथल्या पहिल्या बढतीचा आनंद हा अवर्णनीय असतो. तरुणपणी योग्य वयात बढती मिळणे हा त्या व्यक्तीच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा असतो. मात्र जर का तुम्ही पहिल्याच पदावर बरीच वर्षे कुजलात, तर मात्र तुमची प्रगती नक्कीच खुरटते. माझ्याबाबतीत ही बढती योग्य वयातच झाली होती. त्यामुळे एक प्रकारचे चैतन्य माझ्यात संचारले होते.
बढतीचा आदेश स्वीकारतानाच कार्यालयातील अनेकांनी “डॉक्टर, पेढे पाहिजेत, खरे तर पार्टीच हवी’, असा गलका केला. त्याने मी खूप भारावून गेलो. आमचे संपूर्ण हॉस्पिटल म्हणजे एखाद्या मोठ्या कुटुंबांसारखेच होते. त्यामुळे मी दुसऱ्याच दिवशी त्या सर्वांना पेढे वाटण्याचे ठरवले. तारुण्यात आपण तसे शौकीन असतो. त्यानुसार माझ्या शहरातील सर्वात प्रसिद्ध मिठाईवाल्याकडून त्याच्याकडील सर्वात मोठ्या आकाराचे केशरी पेढे मी खरेदी केले.

हॉस्पिटलच्या उभारणीपासून आम्ही सगळे एकत्र राबलेले असल्यामुळे आमच्यात जिव्हाळा निर्माण झाला होता. त्यामुळे आमच्यातील कोणाच्याही आनंद वा दुखःद प्रसंगात सगळेच सामील होत. ठरवल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलभर फिरून पेढेवाटप सुरु केले. मला पहिला पेढा खरे तर सतीशला द्यायचा होता पण त्या दिवशी तो नेमका कामावर उशीरा येणार होता. म्हणून मी इतरांचे वाटप सुरु केले. त्या सगळ्यांनी माझे मनापासून अभिनंदन केले.
आता मी सतीशची आतुरतेने वाट पाहत होतो. साहजिकच होते ते, कारण आम्ही रोज जास्तीत जास्त काळ एकत्र असायचो आणि जेवणही बरोबर करायचो. थोड्या वेळाने सतीश आमच्या विभागात आला. आमची नजरानजर झाली. आमच्या मैत्रीच्या नात्याने तो आल्याआल्याच माझ्या बढतीबद्दल काही बोलेल अशी माझी अटकळ होती. परंतु, इथेच मला पहिला धक्का बसला. त्याने निर्विकारपणे त्याच्या कामास सुरवात केली.
मी त्याच्याजवळ जाऊन त्याला पेढा दिला. त्यावर त्याने “काय विशेष?” असा अनपेक्षित प्रश्न विचारला. हा मला बसलेला दुसरा धक्का होता. एव्हाना माझ्या बढतीची बातमी हॉस्पिटलभर आणि कर्णोपकर्णी अनुपस्थित लोकांपर्यंतही पोहोचली होती. त्यामुळे ती सतीशला माहिती नसणे जवळपास अशक्य होते. त्याच्या “काय विशेष” ला मी ,”माझ्या बढतीबद्दल”, असे उत्तर दिले. तिसरा धक्का मला आता बसायचा होता. “हं” एवढाच हुंकार काढून त्याने पेढा तोंडात टाकला. मग तो “पेढा मस्त आहे”, म्हणाला अन त्याच्या कामात गढून गेला.

दोन मिनिटे मी अगदी सुन्न झालो. माझ्या या आनंदाच्या प्रसंगी हॉस्पिटलमधील माझ्या सर्वात जवळच्या ‘मित्रा’कडून ‘अभिनंदन’ हा पंचाक्षरी शब्दही ऐकायला मी पारखा झालो होतो. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात एवढा नकारात्मक प्रतिसाद मी प्रथमच अनुभवत होतो. थोड्या वेळाने माझा पेढेवाटप कार्यक्रम संपला. नंतर रोजची जेवणाची वेळ झाली. सतीश व मी एकत्र जेवायला बसलो. त्या दिवशी मी चांगल्यापैकी कपडे केले होते. बुटांनाही चकाचक पॉलिश केले होते. जेवताजेवता सतीशने माझ्या पायांकडे पाहिले आणि “बूट छान आहेत” असे म्हणाला. जेवण संपेपर्यंत तो तसा अबोलच होता. माझ्या बढतीचा विषय तर त्याने कटाक्षाने टाळला.

माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात पेढे वाटण्याचे अनेक प्रसंग आले होते. किंबहुना सर्वांच्याच आयुष्यात ते कधीना कधी येतात. परंतु अशा प्रसंगी, “ अरे वा, छान झालं” असे न म्हणणारी व्यक्ती मला अद्याप भेटली नव्हती. द्वेष, मत्सर, असूया इत्यादी गुण हे मानवी स्वभावाचेच भाग आहेत. प्रत्येकाच्या ठायी ते वास्तव्य करतातच. पण एखाद्याच्या आनंदाच्या प्रसंगी वरकरणी तरी त्याचे अभिनंदन वा कौतुक करणे, ही व्यावहारिक सभ्यता असते. बहुसंख्य लोक ती पाळताना दिसतात. एखाद्याजवळ आपण आपला आनंद व्यक्त केल्यावर त्याने ‘अरे वा’ वगैरे काहीही नाही म्हटले तरी चालेल, हा विचार म्हणून ठीक आहे. पण, तेवढी स्थितप्रज्ञता आपल्यात असायला आपण साधुसंतच असायला हवे. ते नसल्यामुळे आपला अपेक्षाभंग होतो. किंवा ‘फलाची अपेक्षा न धरता कर्म करीत राहा’ हे पचवणे भल्याभल्यांना संपूर्ण आयुष्य खर्ची पडले तरी जमत नाही. मी तर तेव्हा जेमतेम तिशीत होतो.

प्रस्तुत प्रसंगात सतीश हा कुठल्याच प्रकारे माझा स्पर्धक नव्हता. त्याचे वय आणि अनुभव हे माझ्याहून कमी होते. मी एम डी होतो तर तो एम बी बी एस नंतरचा डिप्लोमा धारक.
तसेच नजरेत भरावे असे काही वेगळे कामही त्याने केलेले नव्हते. तेव्हा याप्रसंगी त्याचे माझ्यावर जळणे हे माझ्या आकलनशक्तीबाहेरचे होते. आमच्या संपूर्ण स्टाफपैकी माझे अभिनंदन न करणारी सतीश ही एकमेव व्यक्ती होती आणि या गृहस्थाला मी माझा सर्वात जवळचा मित्र धरून चाललो होतो !

या एका कडवट प्रसंगाने माझ्या आनंदावर अगदी विरजण पडले. अनेक दिवस हे सतीशचे वागणे माझ्या डोक्यातून जात नव्हते. किंबहुना वरिष्ठ पदावर काम करण्याचा उत्साहच कुणीतरी काढून घेतल्यासारखे वाटत होते. त्यावेळेस मला माझ्या पूर्वायुष्यातील दोन व्यक्तींच्या उद्गारांची प्रकर्षाने आठवण झाली.

मी शाळेत नववीत असताना माझ्या वर्गात सुदेश नावाचा विद्यार्थी होता. त्या वयातही त्याचे विचार परिपक्व होते. वर्गातील सर्वजण त्याला ‘अकाली प्रौढ’ म्हणत. तो एकदा आम्हाला गप्पांच्या ओघात म्हणाला होता, “आपण वर्गातील सर्वजण हे एकमेकांचे ‘परिचित’ आहोत. एकमेकांना ‘मित्र’ म्हणण्याची चूक कोणी करू नका कारण, मित्र हे खूप वरच्या पातळीवरचे नाते आहे.

तर दुसरे उद्गार मी एका दैनिकाच्या संपादकांच्या लेखात वाचले होते. त्यांनी लिहीले होते, “संकटकाळी जो उपयोगी पडतो तो खरा मित्र, ही मित्राची व्याख्या आता फार जुनी झाली आहे. सध्याच्या काळातील व्याख्या म्हणजे, आपल्या आनंदात मनापासून सहभागी होतो तो खरा मित्र !”
या दोन्ही उद्गारांची प्रचिती मला वरील प्रसंगातून पुरेपूर आली हे सांगायलाच नको.
…..
आज वरील घटनेनंतर २५ वर्षांनी मी त्याकडे तटस्थपणे बघू शकतो, हे नक्की. परंतु तेव्हा काय वाटले होते त्या ऊर्मितून हे लेखन झाले इतकेच.

********************************
( पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो तुमचा मित्रच होता हो.. परिचित जेलस नाही होत.. ते तटस्थ असतात, त्यांना काय फरक पडतो तुम्हाला प्रोमोशन मिळाले काय नाही मिळाले काय. पेढा मिळतोय करा अभिनंदन फॉर्मलिटी म्हणून.

दोस्त फेल हो जाये तो दुख होता है, लेकिन दोस्त फर्स्ट आ जाये तो ज़्यादा दुःख होता है ☺️

स्वाती २, चांगला प्रतिसाद, आभार

chraps, ☺
आता 3 Idiots पुन्हा पाहणे आले !

मला आलेला पन्नास वर्षापुर्वीचा एक अनुभव सान्गतो. त्यावेळी मी मुम्बैत परदेशी गेल्यावर पहिल्यान्दा आलो होतो. शाळा-कॉलेजापासूनओळखत असलेल्या एका मित्राकडे गेलो तेम्व्हा त्याने व त्याच्या भावाने माझी परदेशात राहुन सन्डास-बाथरूम स्वच्छ करावी लागते अशी चेष्टा करून मग तिथे राहण्यात काय फायदा. हे स्वत: दोन खोल्यामधे त्यान्च्या बायका आई बहिणी असे मिळून सात जण एका चाळीत रहात होते. काही वेळाने त्यानी माझा दोन वर्षाचा पुढे काय शिकणार आहे असे विचारले असतां मी आत्ता हे कसे सान्गता येईल असे मी म्हणालो त्यावर त्यानी त्यन्च्या एका मुलाला बोलावून तु कोण होणार असे विचारले तेव्हा तो मी डॉक्तर होणार असे तो म्हणला. मग हे दोघे म्हणतात बघ आमच्या देशतील मुले कशी शिकायला तयार असतात परदेशातील मुले याबाबतीत मागे असतात. त्यानन्तर मी जेव्हा जेव्हा मुम्बईला गेलो यान्च्यकडे कधीहि गेलो नाही.

लेख पटला चर्चाही छान चालू आहे..
तर चर्चेचा सारांश असा. आयुष्यात आपल्या ‘ओळखीचे’ अनेकजण असले तरी त्यातील ‘मित्र’ म्हणता येणारे एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात... अगदी सहमत..!
People work together, whether they work together or not..! so True.!

हो. ओके. आता जरा त्या मित्राच्या बाजूने बोलूया. चला, आता मी थोडा वेळ त्याची वकिली घेतो Biggrin


>> सतीश व मी दिलजमाईने रोजची कामे जास्त वेळ थांबून पूर्ण करीत होतो.
>> मी नोकरीची चार वर्षे समर्थपणे पूर्ण केल्याने आणि वाढत्या जबाबदाऱ्या स्वीकारत असल्याने मी माझ्या बढतीचा प्रस्ताव वरिष्ठांपुढे मांडला.

इथे तुमच्या बरोबरीने सतीशने सुद्धा ओव्हरटाईम करून खूप मेहनत घेतली आहे हे दिसून येते. तुम्हाला प्रमोशन मिळाले पण त्याला त्याच्या मेहनतीचे काय रिवार्ड मिळाले? पगारवाढ तरी मिळाली का? बहुतेक नसेल. त्यामुळेच जरी तो तुमचा स्पर्धक नसला तरी त्याला आपला वापर stepping stone सारखा झाला असल्यासारखे वाटणे खूप शक्य आहे. Betrayed feelings. म्हणूनच "डॉक्टरांनी माझ्या मैत्रीचा गैरफायदा घेतला आणि माझ्या डोक्यावर पाय ठेवून वर गेले" Lol वगैरे भावना त्याला नक्की झाली असणार. “डॉक्टर, पेढे पाहिजेत, खरे तर पार्टीच हवी" म्हणणारे आजूबाजूचे लोक होते. ते काय आम्ही पण म्हणू शकतो. फुकट पार्टी मिळाल्याशी मतलब. Happy पण सतीश तुमच्या अगदी जवळचा आणि बरोबरीने काम केलेला होता. त्याला कोणत्याही स्वरुपात त्याच्या मेहनतीचे रिवार्ड मिळाले असते तरी तो असा वागला नसता हे नक्की. “पेढा मस्त आहे”, “बूट छान आहेत” म्हणाला पण अभिनंदन म्हणाला नाही म्हणजे तुमचे प्रमोशन त्याला किती जिव्हारी लागले हे दिसून येते.

पण तुम्ही त्याच्या ह्या वागण्याचे निष्कर्ष काढून त्याच्या बाबत जजमेंटल होऊन थांबलात असे मला वाटते. इतका जवळचा मित्र मानत होतात तर मग केवळ अभिनंदन म्हणाला नाही म्हणून असे का केलेत? काही झाले तरी नंतर काही दिवसांनी वगैरे तुम्ही ह्या विषयावर त्याच्याशी बोलायला हवे होते व जवळचा मित्र अगम्य कारणाने दुखावलाय तर त्याला मन मोकळे करायची संधी तुम्ही द्यायला हवी होती असे मला वाटते.

"अरे काय झाले सतीश. मी मागचे काही दिवस पाहतोय तू पूर्वीसारखा नाही राहिलास"

"काही नाही ओ सर..."

"काही सल आहे का तुझ्या मनात? Lets talk about it man. Come on. What's big deal"

मग तो कसनुसे हसेल आणि म्हणेल "मजा नही आया सर..." आणि पुढे सांगुन टाकेल जे काय त्याला सलतंय ते.

कधी कधी फक्त shoulder to cry on दिला तरी लोक मोकळे होतात. नाती टिकून राहतात. नसता मोकळा झाला तरी तुम्हाला तरी एक समाधान लाभले असते की तुम्ही तुमच्या परीने मैत्री टिकवण्याच्या जास्तीतजास्त प्रयत्न केलात. Happy

झाले. वकिली संपली माझी Lol

दि गो चि, तुम्ही अगदी योग्य केलेत.
फिरून मला वर अतुल पाटील यांनी मांडलेला मुद्दा अधोरेखित करावा वाटतो :

मला सातत्याने असे वाटते कि आयुष्य जगताना ज्या क्वालिटीज आपण अवलंबणे आवश्यक असते, आणि त्या आपल्या ठाई स्वाभाविकपणे जर नसतील तर त्या शिकणे गरजचे असते, अशा क्वालिटीज शालेय जीवनात आपल्याकडे शिकवल्या जात नाहीत.

बी एस आभार
अतुल, चांगले वकील आहात ☺

झाले. वकिली संपली माझी >>> छान वकिली केली. हेही पटतंय.

अशा क्वालिटीज शालेय जीवनात आपल्याकडे शिकवल्या जात नाहीत. >>> खरंच! शिकवल्या गेल्या असत्या तर किती बरं झालं असतं.

>> सतीश व मी दिलजमाईने रोजची कामे जास्त वेळ थांबून पूर्ण करीत होतो.
>> मी नोकरीची चार वर्षे समर्थपणे पूर्ण केल्याने आणि वाढत्या जबाबदाऱ्या स्वीकारत असल्याने मी माझ्या बढतीचा प्रस्ताव वरिष्ठांपुढे मांडला.

तुम्ही स्वतःच्या बढतीसाठी प्रयत्न केलेत तसंच तुमच्या बरोबर काम केलेल्या सतीशच्या बढतीसाठी केलेलेत का? त्याचा उल्लेख दिसला नाही.
आमच्या आयटी इंडस्ट्री मध्ये आपल्या ज्युनियरच्या बढतीचा प्रस्ताव त्याच्या कामाची जवळुन माहीती असणार्‍या सिनियरने मांडायचा असतो.

Dakshina sarv pratisadana anumodan.
Kumar, hyani muddam sute dhage thevlet. Pan khari ghatna ahe tyamule pudhe kay jhale?

आमच्या आयटी इंडस्ट्री मध्ये आपल्या ज्युनियरच्या बढतीचा प्रस्ताव त्याच्या कामाची जवळुन माहीती असणार्‍या सिनियरने मांडायचा असतो.>>>>>>

आमच्या हॉस्पिटलमध्ये तसे नसते.
शिवाय तो डिप्लोमा धारक असल्याने बढती नसतेच. उलट एम डी धारक खूप वर जात राहतो .

आमच्या पुढच्या आयुष्यात काय झाले याची बऱ्याच जणांना उत्सुकता आहे. ती जरा ताणतो आहे कारण अजून प्रतिसाद येताहेत.
तो भाग रंजक आहे… जरा थांबा..

आणि हो , ते लिहिल्यावर अतुल माझी नक्की उलटतपासणी घेतील ! त्याची आधीच तयारी करतो ☺

सतीशच्या दृष्टीकोनातुन हाच प्रसंग.
डॉ. कुमार, तुम्हाला दुखवायचा अजिबात हेतु नाहीये. तरीही या काल्पनिक लिखाणात काही आक्षेपार्ह आढळल्यास क्षमस्व.
==================================================

माझ्या वैद्यकीय कारकिर्दीच्या सुरवातीच्या टप्प्यातील हा प्रसंग आहे. डॉक्टर झाल्यावर मी एका नविनच हॉस्पिटलमध्ये डॉ. कुमार (सल्लागार ) यांचा कनिष्ठ सहकारी म्हणून रुजू झालो. ते हॉस्पिटल नव्यानेच सुरू झाले होते. त्यामुळे माझ्यासह इतर सहकारीही पायाभूत उभारणीची कामे मन लावून करीत होते. नेमून दिलेली कामे मनापसुन चोख करण्याकडे मी सुरुवातीपासुन विषेश लक्ष देत होतो.

रोज जेवणाच्या सुटीत आम्ही दोघे एकत्र डबा खाऊ लागलो. त्या वेळेस डॉ. कुमार विवाहित होते तर मी अविवाहित. असंख्य विषयांवर आमच्या मनमोकळ्या गप्पा होत. त्यामध्ये क्रिकेट, राजकारण, नाटक-चित्रपट इ. नेहमीचे विषय तर असतंच, पण त्याचबरोबर स्त्री-पुरुष संबंध या तारुण्यसुलभ विषयाचाही समावेश असे. माझ्या शंकांचे मी कुमार कडुन निरसन करून घेई. वरिष्ठ/कनिष्ठ असा भेदभाव आमच्यात उरलाच नाही आणि मी कुमार यांना माझा जिवलग मित्र समजु लागलो. आमच्या विभागात आम्ही दोघेच डॉक्टर असल्याने आमची मैत्री दृढ होत गेली.

कालांतराने माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी मुली पाहणे सुरू केले. त्या ‘पाहण्याच्या’ कार्यक्रमांचा सविस्तर वृत्तांत मी त्यांना दुसऱ्या दिवशी सांगत असे आणि बायको कशी असावी यावर त्यांचा सल्लाही विचारत असे. यथावकाश माझे लग्न झाले. हळूहळू मी संसारात रमलो. नोकरीलाही दोन वर्षे उलटुन गेली.

एव्हाना आमचे हॉस्पिटल सुरू झाल्याला चार वर्षे झाली होती. आता हॉस्पिटलचा विस्तार करण्याचे व्यवस्थापनाने ठरवले होते. त्यामुळे आम्हा सर्वांची जबाबदारी अधिकच वाढत गेली. नविन लग्न असुनही मी कामात कधीच कुचराई केली नाही. कायम जास्त वेळ थांबुन कामं पुर्ण करण्याकडे माझा कल होता. डॉ कुमार बरोबर माझी मैत्री घट्ट होत गेली. आम्हा दोघांना एकमेकांच्या आयुष्यातील काही माहिती नाही असे काहीच उरले नाही.

एकदा १ जानेवारीला नविन वर्ष साजरं करायला मी सुट्टी घेतलेली. दुसर्‍या दिवशी मी जरा उशिराच कामाला पोचलो. सुट्टी नंतर तुंबलेली कामं निपटवायला मी टाईमपास न करता लगेच कामात गढुन गेलो. अचानक डॉ. कुमार आले आणि त्यांनी मला पेढा दिला. मी विचारलं "काय विशेष?" त्यावर त्यांनी "माझ्या बढतीबद्दल" असं त्रोटक उत्तर दिलं. मला धक्काच बसला. माझ्या घशातुन "हं" असा उद्गार तेव्हढा निघु शकला. दिवसाचे १२-१४ तास आम्ही एकत्र असायचो, अगदी नवरा-बायकोमधले शारिरीक संबंध अशा नाजुक खाजगी बाबी आम्ही एकमेकांना सांगायचो, पण कुमार यांनी ते त्यांच्या बढती साठी प्रयत्न करत आहेत याचा त्रोटक उल्लेखही कधी केला नव्हता. मी पटकन स्वतःला सांभाळायचा प्रयत्न केला आणि पेढा छान असल्याचं त्यांना सांगितलं. थोड्या वेळाने आम्ही जेवायला एकत्र गेलो. कुमारही आज फारसे बोलत नव्हते. त्यांना मिळालेली बढती, त्यामुळे त्यांना झालेला आनंद, त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न काहीच बोलले नाहीत ते. शेवटी हा अबोला मलाच असह्य झाला आणि काहीतरी बोलायचं म्हणुन मी त्यांच्या चकचकीत बुटांची तारीफ केली. पण तरीही कोंडी काही फुटली नाही. पुढचे जेवण शांततेतच झाले. एरवी मनापासुन घडाघडा बोलणारे कुमार, माझे जिवलग मित्र; नव्हे माझे वडील भावासारखे वागणारे कुमार आता बढती मिळाल्यावर एकदम फॉर्मल वागु लागलेले. माझ्या सारख्या कनिष्ठ डॉक्टरशी पुर्वीच्या सलगीने गप्पा मारणं त्यांना अवघड जात असावं बहुतेक. पुढे माझा हा समज पक्का होत गेला. ते एम डी होते तर मी साधा एम बी बी एस नंतरचा डिप्लोमा धारक असा फरक त्यांच्या वागण्यातुन जाणवु लागला. माझे वय, शिक्षण, अनुभव त्यांच्यापेक्षा कमी असलेल्याची पुसटशी जाणीव त्यांच्या वागण्यात होऊ लागली. खरंतर या सगळया बाबी खर्‍याच होत्या. माझी त्यांच्याबरोबर काहीच स्पर्धा नव्हती. त्यांच्याच बरोबरीने वेळी-अवेळी काम करुनही मी काही खास करत नाही असा त्यांचा सुर दिसु लागला.

नंतर कधीतरी या विषयावर विचार करताना मला जाणवलं की त्या दिवशी पेढा खाल्यावर मी पेढा छान आहे म्हणालो पण मला एव्हढा धक्का लागलेला की मी त्यांचं अभिनंदन करायला साफ विसरलो. पण आता वेळ निघुन गेलेली.

त्यांच्या बढतीनंतर आमचे संबंध दुरावलेच. त्यांच्या वागण्यात वरिष्ठ सल्लागार असण्याचा तोरा जाणवु लागला. आणि या गृहस्थाला मी माझा सर्वात जवळचा मित्र धरून चाललो होतो !

मी शाळेत नववीत असताना माझ्या वर्गात सुदेश नावाचा विद्यार्थी होता. त्या वयातही त्याचे विचार परिपक्व होते. वर्गातील सर्वजण त्याला ‘अकाली प्रौढ’ म्हणत. तो एकदा आम्हाला गप्पांच्या ओघात म्हणाला होता, “आपण वर्गातील सर्वजण हे एकमेकांचे ‘परिचित’ आहोत. एकमेकांना ‘मित्र’ म्हणण्याची चूक कोणी करू नका कारण, मित्र हे खूप वरच्या पातळीवरचे नाते आहे.

तर दुसरे उद्गार मी एका दैनिकाच्या संपादकांच्या लेखात वाचले होते. त्यांनी लिहीले होते, “संकटकाळी जो उपयोगी पडतो तो खरा मित्र, ही मित्राची व्याख्या आता फार जुनी झाली आहे. सध्याच्या काळातील व्याख्या म्हणजे, कीतीही मोठ्या पदाला पोचला तरीही आपल्या जुन्या मित्रांबरोबर जो पुर्वीचेच संबंध टिकवुन ठेवतो तोच खरा मित्र !”

या दोन्ही उद्गारांची प्रचिती मला वरील प्रसंगातून पुरेपूर आली हे सांगायलाच नको.
…..
आज वरील घटनेनंतर २५ वर्षांनी मी त्याकडे तटस्थपणे बघू शकतो, हे नक्की. परंतु तेव्हा काय वाटले होते त्या ऊर्मितून हे लेखन झाले इतकेच.

बाप रे. व्यत्यय, अतुलजी यांच्या पोस्ट्स वाचून एका गोष्टीकडे किती भिन्न दृष्टीकोनांतून पाहता येते हे कळलं..
लेखक पुढे काय झालं हे सांगतीलच पण वरील दोन गोष्टी वाचून दुसरी बाजूसुद्धा तितकीच दमदार असु शकते हे पटले.

व्यत्यय, चांगला प्रयत्न ! आवडला.

एक स्पष्ट करतो. या घटनेतील दोघांची वये ३० च्या आत आहेत हे लक्षात घेऊन लेखाकडे बघावे.

आज जर पुन्हा असा प्रसंग घडला तर मी चुकूनही त्यावर लेखबिख लिहीणार नाही आता अनुभवाने आपण बेरड, गेंड्याच्या कातडीचे वगैरे झालेलो असतो.

प्रस्तुत प्रसंगात सतीश हा कुठल्याच प्रकारे माझा स्पर्धक नव्हता. त्याचे वय आणि अनुभव हे माझ्याहून कमी होते. मी एम डी होतो तर तो एम बी बी एस नंतरचा डिप्लोमा धारक.
तसेच नजरेत भरावे असे काही वेगळे कामही त्याने केलेले नव्हते.>>>>>>>>> हे, कुमार१ यांनी आधीच स्पष्ट केले आहे.शिवाय एखाद्याच्या आनंदात सहभागी न होता तसेच तो विषय मुद्दाम टाळणे यात सतीशने काय मिळवले? असूया करून त्याचे प्रमोशन झाले का? जरी त्याच्या स्वभावानुसार वाईट वाटले तरी सामाजिक सभ्यतेच्या संकेतानुसार त्याने अभिनंदन करायला हवे होतेच.

पण तुम्ही त्याच्या ह्या वागण्याचे निष्कर्ष काढून त्याच्या बाबत जजमेंटल होऊन थांबलात असे मला वाटते. >>>>> नाही पटले.कारण त्या उत्कटक्षणी असे धक्का देणारे वर्तन जिवलगाने केले तर त्याचा सल खूप खोलवर असतो.
माझ्या ४- ५ वीतील प्रसंग आहे.रिझल्ट्चा दिवस होता.फळ्यावर पहिल्या तिघांचीनावे लिहिली जायची.मी व माझ्या मैत्रिणीने निकाल पाहिला तर एक क्षण माझ्या मैत्रिणीचा चेहरा उतरला.पण दुसर्‍याच क्षणी तिने माझे अभिनंदन केले.(माझा पहिला व तिचा दुसरा नंबर आला होता.) हे जर एक लहान मुलगी करू शकते तर नोकरी करणार्‍या माणसाकडून अशावेळी मॅनर्स पाळण्याची अपेक्षा करणे गैर नाही.

तुम्ही स्वतःच्या बढतीसाठी प्रयत्न केलेत तसंच तुमच्या बरोबर काम केलेल्या सतीशच्या बढतीसाठी केलेलेत का? त्याचा उल्लेख दिसला नाही.>> हे ज्याने त्याने स्वतः करायचे असतात. असली समाजसेवा कोण करत का?

देवकी आणि मंदार ,
अत्यंत मार्मिक प्रतिसाद आहेत तुमचे . हे तटस्थपणे लिहितोय, मला अनुकूल आहेत म्हणून नाही.

>>असली समाजसेवा कोण करत का?
हाय कम्बख्त तुने दोस्ती की ही नही.

>> अत्यंत मार्मिक प्रतिसाद आहेत तुमचे . हे तटस्थपणे लिहितोय, मला अनुकूल आहेत म्हणून नाही.
Happy

हाय कम्बख्त तुने दोस्ती की ही नही. >> हे नुसते बोलायचे असते. कामाच्या ठिकाणाचे मित्र आणि लन्गोटीयार यात गल्लत होते आहे. उद्या जर साहेब म्हणाला तुमच्या एवजी तुमच्या मित्राला प्रमोट करतो मग बघुयात की दोस्ती... Happy असो...

प्रत्यक्ष घटनेतील अजून काही माहिती आता खुली करतो:

१. तेव्हा आम्ही ४ एम डी आणि तो एकटा डिप्लोमा वाला असे एकत्र होतो.
२. तेव्हा नोकरीत लागतातच डिप्लोमा धारकास कल्पना असते की त्याला बढती नाही, वार्षिक वेतनवाढ काय ती खरी.

३. अन्य ३ एम डी नाही त्याचे साधारण असेच अनुभव आले. ते लोक त्याला सतीश चे “नॉर्मल” वागणे समजतात !

४. माझा पेढा खाण्यापूर्वी त्याने जे छद्मी अल्पहास्य केले ते तर मी विसरुच शकत नाही. ( आठवा ‘ते’ महाभारतातील प्रसिद्ध छद्मी हास्य..)

५. घटनेच्या या तीव्रतेमुळे त्यानंतर 12 वर्षांने मी हा लेख लिहिला.
६. त्यानंतर 13 वर्षांने इथे पुनःप्रकाशित करावा वाटला याचे कारण माझ्यापेक्षा देवकी यांच्या प्रतिसादातील खालील वाक्यात आले आहे :
नात्यात एक दरी पडतेच,तिचा ठणका सौम्य होतो.पण वण कायम रहातो.

कुमारजी, छान लिहिलंय.
सतीशच्या अश्या वागण्यामागे स्वाती१, शिल्पा, व्यत्यय इ. मंडळींनी यांनी मांडलेल्या शक्यताही आहेत. विशेषतः इतके जवळचे संबंध असताना तुमच्या बढतीबद्दल दुसर्‍या कोणाकडून समजण्याऐवजी तुमच्याकडूनच कळायला हवे होते, अशी अपेक्षा असणे स्वाभाविक वाटते.

>> त्यांच्या वागण्यात वरिष्ठ सल्लागार असण्याचा तोरा जाणवु लागला. आणि या गृहस्थाला मी माझा सर्वात जवळचा मित्र धरून चाललो होतो !

हा हा हा Lol Biggrin विरुद्ध बाजू मांडणारे स्क्रिप्ट भारी लिहिलंय. वरती स्क्रीन च्या एका कोपऱ्यात "नाट्य रुपांतर" असे दिसू द्या Biggrin

>> ते लिहिल्यावर अतुल माझी नक्की उलटतपासणी घेतील ! त्याची आधीच तयारी करतो

हा हा हा Proud

>> मी व माझ्या मैत्रिणीने निकाल पाहिला तर एक क्षण माझ्या मैत्रिणीचा चेहरा उतरला.पण दुसर्‍याच क्षणी तिने माझे अभिनंदन केले.(माझा पहिला व तिचा दुसरा नंबर आला होता.)

चालायचेच! व्यक्ती तितक्या प्रकृती Happy त्यात आणि तुम्ही दोघींनी एकत्रच अभ्यास केला असेल आणि त्यातही त्या मैत्रिणीने तुम्हाला अभ्यासात मदत केली असेल तर तिला मानलेच पाहिजे.

तुम्ही दोघींनी एकत्रच अभ्यास केला असेल आणि त्यातही त्या मैत्रिणीने तुम्हाला अभ्यासात मदत केली असेल तर तिला मानलेच पाहिजे.>>> तसे काहीही नव्हते.तिचा चेहरा उतरला असेल तो आपण दुसर्‍या आलो म्हणून.माझा पहिला नंबर आला म्हणून नव्हे.माझ्या घरीही माझ्या निकालापेक्षा तिचे कौतुक जास्त झाले होते.त्यावेळी मला एक क्षण वैफल्य वाटले होते.पण नंतर तिचा खिलाडूपणा दाद देण्यासारखाच होता हे पटले.असो हे अवांतर होतंय.

गजानन व अतुल, आभार व सहमती.
अवांतर:
काल दिवसभर मला या धाग्याच्या पान 2 वरून प्रतिसाद देताच येत नव्हता. एरर यायची. बाकी माबो व्यवस्थित. मोबाइल मधील कुकीज वगैरे साफ करून सुद्दा.
यावर जरा मार्गदर्शन हवे.
आज जर परत तसे झाले तर मला उत्तरे देता येणार नाहीत, याची नोंद घ्यावी ही वि.

अशा क्वालिटीज शालेय जीवनात आपल्याकडे शिकवल्या जात नाहीत. जसे जीवनाभिमुख शिक्षण जपानमध्ये वगैरे शाळांमध्ये देतात तसे. परिणामी कित्येक "सुशिक्षित" लोक आपले स्वभावदोष तसेच घेऊन बाहेर पडतात. >>>>
जपनी लोकं पण त्यांचे स्वभावदोष घेवूनच बाहेर पडतात. इथे गेली २२ वर्षं बघतेय. वरवर बघता लक्षात येत नाही पण रोजचेच झाले की व्यवस्थित जाणवतात. त्यात भीती हे मोटिवेशन असते तेव्हा तर बघायलाच नको.

स्वाती२, वरवर बघता लक्षात येत नाही पण रोजचेच झाले की व्यवस्थित जाणवतात. त्यात भीती हे मोटिवेशन असते तेव्हा तर बघायलाच नको.>>> ह्याबद्दल तुमचे अनुभव वाचायला आवडेल. इथे नको. वेगळा धागा किंवा तस संबंधित धागा असेल तर तिथे लिहाल का?

Shalet samajikmulyaa ani gunshikshan asa tas asaycha. Shravanbal, Aruni, sudama ashya goshti tevha sangitalya jaychya.
Baki changala leader hatakhalchya lokanna pudhe neto. Nahitar eka limit nantar pragati thambu shakte.

काय चर्चा काय चर्चा....>>>> Lol
खरंच काय चर्चा.
अरे असतात अशी जळकी कुसकी नासकी माण्सं. दुसरी बाजु, समोरच्याची मनस्थिती, त्याचं नाट्यरुपांतर काय नी काय.
इतके दिवस एकत्र राहिलो, काम केलं, सोबत होतो तर तोंड उचकटुन साधं अभिनम्दन म्हणता येउ नये माणसाला?
पेढा छाने, बुट छानेत एवढं बोलता येतं तर एक अभिनंदन शब्द बोलायलाच कसली मनस्थितीला आग लागलीये?

Pages