माझ्या वैद्यकीय कारकिर्दीच्या सुरवातीच्या टप्प्यातील हा प्रसंग आहे. एम.डी. ही पदवी प्राप्त करून मी एका हॉस्पिटलमध्ये सल्लागार म्हणून रुजू झालो. ते हॉस्पिटल नव्यानेच सुरू झाले होते. त्यामुळे माझ्यासह इतर सहकारीही पायाभूत उभारणीची कामे मन लावून करीत होते. हळूहळू हॉस्पिटलचा विस्तार होत गेला. मग तेथील डॉक्टरांची संख्याही वाढवण्यात आली. अशाच एका नवीन भरतीच्या वेळी माझ्या विभागात डॉ. सतीश हा माझा कनिष्ठ सहकारी म्हणून रुजू झाला. महिनाभरातच मी त्याच्याविषयी एक अंदाज बांधू शकलो. तो जरी फारसा हुशार नसला तरी तो नेमून दिलेली कामे व्यवस्थित करीत असे.
रोज जेवणाच्या सुटीत आम्ही दोघे एकत्र डबा खाऊ लागलो. त्या वेळेस मी विवाहित होतो तर तो अविवाहित. असंख्य विषयांवर आमच्या मनमोकळ्या गप्पा होत. त्यामध्ये क्रिकेट, राजकारण, नाटक-चित्रपट इ. नेहमीचे विषय तर असतंच, पण त्याचबरोबर स्त्री-पुरुष संबंध या तारुण्यसुलभ विषयाचाही समावेश असे. सतीश या विषयातील त्याच्या शंकांचे माझ्याकडून निरसन करून घेई. त्याचे असे कुतूहल पाहून मलाही माझ्या विवाहपूर्व दिवसांची आठवण होई! आमच्या विभागात आम्ही दोघेच डॉक्टर असल्याने आमची मैत्री दृढ होत गेली.
कालांतराने सतीशच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुली पाहणे सुरू केले. त्या ‘पाहण्याच्या’ कार्यक्रमांचा सविस्तर वृत्तांत तो मला दुसऱ्या दिवशी सांगत असे आणि बायको कशी असावी यावर माझा सल्लाही विचारत असे. यथावकाश त्याचे लग्न झाले. हळूहळू तो संसारात रमला. दोन वर्षात नोकरीतही रुळला.
एव्हाना आमचे हॉस्पिटल सुरू झाल्याला चार वर्षे झाली होती. आता हॉस्पिटलचा विस्तार करण्याचे व्यवस्थापनाने ठरवले होते. त्यामुळे आम्हा सर्वांची जबाबदारी अधिकच वाढत गेली. सतीश व मी दिलजमाईने रोजची कामे जास्त वेळ थांबून पूर्ण करीत होतो. त्यामुळे आमची मैत्री घट्ट होत गेली. आम्हा दोघांना एकमेकांच्या आयुष्यातील काही माहिती नाही असे काहीच उरले नाही.
दरम्यान मी नोकरीची चार वर्षे समर्थपणे पूर्ण केल्याने आणि वाढत्या जबाबदाऱ्या स्वीकारत असल्याने मी माझ्या बढतीचा प्रस्ताव वरिष्ठांपुढे मांडला. मग माझे मूल्यमापन करण्यात येऊन त्यांनी तो व्यवस्थापनापुढे ठेवला. थोड्याच कालावधीत मला ‘वरिष्ठ सल्लागार’ या पदावर बढती देण्यात आली. नवीन पदभार स्वीकारण्याचा दिवस होता १ जानेवारी. पगारामध्ये अर्थातच आकर्षक वाढ दिलेली होती.
नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला हे समजू शकेल की तिथल्या पहिल्या बढतीचा आनंद हा अवर्णनीय असतो. तरुणपणी योग्य वयात बढती मिळणे हा त्या व्यक्तीच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा असतो. मात्र जर का तुम्ही पहिल्याच पदावर बरीच वर्षे कुजलात, तर मात्र तुमची प्रगती नक्कीच खुरटते. माझ्याबाबतीत ही बढती योग्य वयातच झाली होती. त्यामुळे एक प्रकारचे चैतन्य माझ्यात संचारले होते.
बढतीचा आदेश स्वीकारतानाच कार्यालयातील अनेकांनी “डॉक्टर, पेढे पाहिजेत, खरे तर पार्टीच हवी’, असा गलका केला. त्याने मी खूप भारावून गेलो. आमचे संपूर्ण हॉस्पिटल म्हणजे एखाद्या मोठ्या कुटुंबांसारखेच होते. त्यामुळे मी दुसऱ्याच दिवशी त्या सर्वांना पेढे वाटण्याचे ठरवले. तारुण्यात आपण तसे शौकीन असतो. त्यानुसार माझ्या शहरातील सर्वात प्रसिद्ध मिठाईवाल्याकडून त्याच्याकडील सर्वात मोठ्या आकाराचे केशरी पेढे मी खरेदी केले.
हॉस्पिटलच्या उभारणीपासून आम्ही सगळे एकत्र राबलेले असल्यामुळे आमच्यात जिव्हाळा निर्माण झाला होता. त्यामुळे आमच्यातील कोणाच्याही आनंद वा दुखःद प्रसंगात सगळेच सामील होत. ठरवल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलभर फिरून पेढेवाटप सुरु केले. मला पहिला पेढा खरे तर सतीशला द्यायचा होता पण त्या दिवशी तो नेमका कामावर उशीरा येणार होता. म्हणून मी इतरांचे वाटप सुरु केले. त्या सगळ्यांनी माझे मनापासून अभिनंदन केले.
आता मी सतीशची आतुरतेने वाट पाहत होतो. साहजिकच होते ते, कारण आम्ही रोज जास्तीत जास्त काळ एकत्र असायचो आणि जेवणही बरोबर करायचो. थोड्या वेळाने सतीश आमच्या विभागात आला. आमची नजरानजर झाली. आमच्या मैत्रीच्या नात्याने तो आल्याआल्याच माझ्या बढतीबद्दल काही बोलेल अशी माझी अटकळ होती. परंतु, इथेच मला पहिला धक्का बसला. त्याने निर्विकारपणे त्याच्या कामास सुरवात केली.
मी त्याच्याजवळ जाऊन त्याला पेढा दिला. त्यावर त्याने “काय विशेष?” असा अनपेक्षित प्रश्न विचारला. हा मला बसलेला दुसरा धक्का होता. एव्हाना माझ्या बढतीची बातमी हॉस्पिटलभर आणि कर्णोपकर्णी अनुपस्थित लोकांपर्यंतही पोहोचली होती. त्यामुळे ती सतीशला माहिती नसणे जवळपास अशक्य होते. त्याच्या “काय विशेष” ला मी ,”माझ्या बढतीबद्दल”, असे उत्तर दिले. तिसरा धक्का मला आता बसायचा होता. “हं” एवढाच हुंकार काढून त्याने पेढा तोंडात टाकला. मग तो “पेढा मस्त आहे”, म्हणाला अन त्याच्या कामात गढून गेला.
दोन मिनिटे मी अगदी सुन्न झालो. माझ्या या आनंदाच्या प्रसंगी हॉस्पिटलमधील माझ्या सर्वात जवळच्या ‘मित्रा’कडून ‘अभिनंदन’ हा पंचाक्षरी शब्दही ऐकायला मी पारखा झालो होतो. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात एवढा नकारात्मक प्रतिसाद मी प्रथमच अनुभवत होतो. थोड्या वेळाने माझा पेढेवाटप कार्यक्रम संपला. नंतर रोजची जेवणाची वेळ झाली. सतीश व मी एकत्र जेवायला बसलो. त्या दिवशी मी चांगल्यापैकी कपडे केले होते. बुटांनाही चकाचक पॉलिश केले होते. जेवताजेवता सतीशने माझ्या पायांकडे पाहिले आणि “बूट छान आहेत” असे म्हणाला. जेवण संपेपर्यंत तो तसा अबोलच होता. माझ्या बढतीचा विषय तर त्याने कटाक्षाने टाळला.
माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात पेढे वाटण्याचे अनेक प्रसंग आले होते. किंबहुना सर्वांच्याच आयुष्यात ते कधीना कधी येतात. परंतु अशा प्रसंगी, “ अरे वा, छान झालं” असे न म्हणणारी व्यक्ती मला अद्याप भेटली नव्हती. द्वेष, मत्सर, असूया इत्यादी गुण हे मानवी स्वभावाचेच भाग आहेत. प्रत्येकाच्या ठायी ते वास्तव्य करतातच. पण एखाद्याच्या आनंदाच्या प्रसंगी वरकरणी तरी त्याचे अभिनंदन वा कौतुक करणे, ही व्यावहारिक सभ्यता असते. बहुसंख्य लोक ती पाळताना दिसतात. एखाद्याजवळ आपण आपला आनंद व्यक्त केल्यावर त्याने ‘अरे वा’ वगैरे काहीही नाही म्हटले तरी चालेल, हा विचार म्हणून ठीक आहे. पण, तेवढी स्थितप्रज्ञता आपल्यात असायला आपण साधुसंतच असायला हवे. ते नसल्यामुळे आपला अपेक्षाभंग होतो. किंवा ‘फलाची अपेक्षा न धरता कर्म करीत राहा’ हे पचवणे भल्याभल्यांना संपूर्ण आयुष्य खर्ची पडले तरी जमत नाही. मी तर तेव्हा जेमतेम तिशीत होतो.
प्रस्तुत प्रसंगात सतीश हा कुठल्याच प्रकारे माझा स्पर्धक नव्हता. त्याचे वय आणि अनुभव हे माझ्याहून कमी होते. मी एम डी होतो तर तो एम बी बी एस नंतरचा डिप्लोमा धारक.
तसेच नजरेत भरावे असे काही वेगळे कामही त्याने केलेले नव्हते. तेव्हा याप्रसंगी त्याचे माझ्यावर जळणे हे माझ्या आकलनशक्तीबाहेरचे होते. आमच्या संपूर्ण स्टाफपैकी माझे अभिनंदन न करणारी सतीश ही एकमेव व्यक्ती होती आणि या गृहस्थाला मी माझा सर्वात जवळचा मित्र धरून चाललो होतो !
या एका कडवट प्रसंगाने माझ्या आनंदावर अगदी विरजण पडले. अनेक दिवस हे सतीशचे वागणे माझ्या डोक्यातून जात नव्हते. किंबहुना वरिष्ठ पदावर काम करण्याचा उत्साहच कुणीतरी काढून घेतल्यासारखे वाटत होते. त्यावेळेस मला माझ्या पूर्वायुष्यातील दोन व्यक्तींच्या उद्गारांची प्रकर्षाने आठवण झाली.
मी शाळेत नववीत असताना माझ्या वर्गात सुदेश नावाचा विद्यार्थी होता. त्या वयातही त्याचे विचार परिपक्व होते. वर्गातील सर्वजण त्याला ‘अकाली प्रौढ’ म्हणत. तो एकदा आम्हाला गप्पांच्या ओघात म्हणाला होता, “आपण वर्गातील सर्वजण हे एकमेकांचे ‘परिचित’ आहोत. एकमेकांना ‘मित्र’ म्हणण्याची चूक कोणी करू नका कारण, मित्र हे खूप वरच्या पातळीवरचे नाते आहे.
तर दुसरे उद्गार मी एका दैनिकाच्या संपादकांच्या लेखात वाचले होते. त्यांनी लिहीले होते, “संकटकाळी जो उपयोगी पडतो तो खरा मित्र, ही मित्राची व्याख्या आता फार जुनी झाली आहे. सध्याच्या काळातील व्याख्या म्हणजे, आपल्या आनंदात मनापासून सहभागी होतो तो खरा मित्र !”
या दोन्ही उद्गारांची प्रचिती मला वरील प्रसंगातून पुरेपूर आली हे सांगायलाच नको.
…..
आज वरील घटनेनंतर २५ वर्षांनी मी त्याकडे तटस्थपणे बघू शकतो, हे नक्की. परंतु तेव्हा काय वाटले होते त्या ऊर्मितून हे लेखन झाले इतकेच.
********************************
( पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )
कुमार जी नेहमी प्रमाणे उत्तम
कुमार जी नेहमी प्रमाणे उत्तम लेख, पण अशाच आशयाचा अजून एक लेख तुम्ही पुर्वी लिहिला असं वाटते आहे मला. त्यात भाषण वगैरे होतं असं पुसट आठवते आहे मला. असो...
माझं थोडं वेगळं मत आहे तुमच्या लेखाबद्दल.
तुम्ही तो प्रभावी लिहिला आहे यात काही शंकाच नाही, पण लेखात कुठेही दुसरी बाजू मला दिसली नाही.
तुमच्या मित्राची तुटक प्रतिक्रिया येण्यास अनेक कारणे असू शकतात.
*मी इतकी मेहनत करून सुद्धा शेवटी प्रमोशन याला कसं काय मिळाले. ( असूया)
* त्याच्या घरी काहीतरी मेजर प्रॉब्लेम असेल.
* तो उशिरा येणार आहे हे माहित असून तुम्ही पहिला पेढा त्याला द्यावा अशी कदाचित त्याची अपेक्षा असावी, आणि तुम्ही ते आधीच वाटायला सुरू केले म्हटल्यावर त्याला वाटले असेल की आपण याच्या मित्रयादीतून आता खाली गेलो, किन्वा हा आता याच्या लेव्हल च्या लोकांशीच बोलणार.
* तुमची अपेक्षा होती की त्याने अभिनंदन करावे पण त्याने केले नाही. कदाचित त्याला मनातून ते खरंच करावं वाटलं नसेल म्हणून त्याने केले नसेल. तुमच्या प्रमोशन बद्दल त्या दिवशी ज्या ज्या लोकांनी तुमचे अभिनंदन केले त्यातल्या किती जणांना खरंच आनन्द झाला होता हे तुम्ही सांगू शकाल काय? कदाचित तुमच्या मित्राला तोंड देखले अभिनंदन करायचे नसेल. त्याने ते नुसते शब्द उच्चारावे ही तुमची गरज होती का त्या वेळी? असा पण प्रश्न उपस्थित होतो.
* बर्याच वेळेला (काय नेहमीच खरं तर) असले गैरसमज हे फक्त अपेक्षाभंगामुळे होत असतात.
मुळात आपले काहीतरी चांगले झाले तर आपल्याला आनंद व्यक्त करावा वाटला, आपण छान छान दिसून पेढे वाटले झालं ते इतकंच असलं पाहिजे (हे माझं वैयक्तिक मत) त्यापुढे कुणी अभिनंदन केले नाही केले तर त्याने आपल्या यशाला काही चार चांद लागत नाहीत किंवा ते कमी होत नाही. मुळात कुणी अभिनंदन केले तरच आपले यश सर्टिफाय होते असे नाही. पण दुर्दैवाने आपण हा त्रयस्थ विचार करायला खूप उशिरा शिकतो.. पण तो वळवू शकतो असे नाहीच. मी इथे लिहिते आहे पण मला तो आचरणात आणायला जमेलच हे मी खात्रिलायक रित्या नाही सांगू शकत. हेच मानवी मन आहे.
थोडक्यात मला आनंद झाला, मला पेढे वाटावे वाटले, मी वाटले... बास... यापुढे हा प्रसंग असूच नये असे मला वाटते.
मी शिकतेय.
शिवाय कोण खरा मित्रं, कोण खोटा.. याच्या व्याख्या आपण का करतो? त्याने एखाद्याला एका चौकटित बान्धून घातले जाते (आपल्या मनात) एखादा अनेक वर्ष असलेला छान मित्र अचानक आपल्या एखाद्या मोठ्या अडचणिला नेमका उपलब्ध झाला नाही तर त्याची मैत्री खोटी ठरत नाही, किंवा रस्त्यात अचानक एखाद्याने आपल्याला अपघातात माणुसकीच्या नात्याने मदत केली तर लगेच तो आपला 'खरा मित्र' होतो असे नाही. ज्याचे जिथे कर्म लिहिलेले असते आणि जितके लिहिलेले असते तितके तो तिथे तिथे करतो. त्याला कशाला मैत्रिच्या व्याख्येच्या चौकटी?
डॉ. कुमार , खरं सांगु का? तो
डॉ. कुमार , खरं सांगु का? तो मित्र त्या स्थितीत कसा वागला हे आता मनातुन काढुन टाका. कारण आता पुढे जर तुम्हाला तो भेटला तर तुमचे मन पण त्या गोष्टींनी जडावलेले असणार. पण तरीही शक्य झाल्यास आणी परत तो भेटल्यास त्याला मोकळेपणाने या बद्दल विचारा. जर त्याने त्याचे मन मोकळे केले आणी ते कारण जेन्युईन असेल तर हे विसरुन जा. आणी जर त्याने विषय टाळला तर तो जेलस होता हे समजून दुर्लक्ष करा.
माणसांचे स्वभाव फार विचीत्र असतात. हा तर मित्र होता पण नातेवाईक सुद्धा असे वागतात. पण स्पष्ट बोलले तर मनात सल रहात नाही, आणी गैर समज दूर झाले तर मन पण नितळ पाण्यासारखे निवळशंख बनु शकते.
दक्षिणा व रशमी, मनमोकळ्या
दक्षिणा व रशमी, मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल आभार !
आपले यश त्यामुळे कमी होत नाही, हे कबूल. अभिनंदन करण्याची औपचारिकता १० पैकी ९ जण पाळतात. म्हणून हा प्रकार वेगळा वाटला आणि तो लेखाचा विषय झाला.
रश्मी..आता माझ्या मनात सल
रश्मी..
आता माझ्या मनात सल नाही, मी त्याकडे दुर्लक्ष केलेच आहे. १३वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखाचे हे पुन्हा प्रकाशन आहे इतकेच. मानवी स्वभावाचा एक पैलू त्यातून अधोरेखित केला आहे.
आयुष्यात ज्या गोष्टी सरळसोट, ठरल्या प्रमाणे आखीव रेखीव होतात त्यावरून सहसा लेखन वा अन्य कला निर्माण होत नाही. “कला ही वेदनेतून जन्म घेते”, असे आशा भोसले म्हणून गेल्या आहेत.
कुमारजी १३ वर्षापुर्वी घडलेला
कुमारजी १३ वर्षापुर्वी घडलेला प्रसंग म्हणजे तो घडला तेव्हा तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही शब्दात व्यक्त केलंत ते छानच झालं, त्या निमित्ताने चर्चा झाली आणि अनेकांची अनेकविध मतं वाचायला मिळाली.
मी पण अनेकदा मागे वळून पाहिले आणि असे प्रसंग जे मनाला दु:ख देवून गेले त्याबद्दल विचार करता आपण त्यावेळेला किती (उगिचच) आणि कसा त्रास करून घेतला असा विचार करून हसू तरी आले किंवा स्वतःची किव तरी वाटली, पण आयुष्याचं हेच गमक असावं, चटके देणार्या अनुभवातून जाऊन आपण शिकावं आणि पुढे जावं.
माझ्या पोस्टमध्ये काही अतिरेकी शब्द आणि भावना आल्या असतील आणि त्याने तुम्हाला नकळतपणे मी दुखावले असेल तर माफ करा.
मी जे वाटलं ते लिहिलं.
Dakshina, agree 100%
Dakshina, agree 100%
दक्षिणा,
दक्षिणा,
तुमचा प्रतिसाद मला आवडला आहे. त्यामुळे चर्चेची रंगत वाढली आहे. आता माझे लेखनाचे धोरण सांगतो.
एखाद्या प्रसंगातून मनात लेखनाची ठिणगी पडते. त्या विषयाला अनेक बाजू असू शकतात.
जर का मी त्या सर्वांचाच विचार करत बसलो तर एकतर लेखनच ठप्प होईल किंवा ते गुळुमुळू प्रकारचे असेल. त्यात दम नसेल.
वरील प्रसंगात मी त्यातली दुखरी नस पकडली आणि लेख झाला. त्यातील उरलेल्या बाजू वाचकांसाठी सोडून दिल्या. ☺
लोभ असावा !
एखाद्या प्रसंगातून मनात
एखाद्या प्रसंगातून मनात लेखनाची ठिणगी पडते. त्या विषयाला अनेक बाजू असू शकतात.
जर का मी त्या सर्वांचाच विचार करत बसलो तर एकतर लेखनच ठप्प होईल किंवा ते गुळुमुळू प्रकारचे असेल. त्यात दम नसेल. >>> छान विवरण केलेय. सहमत.
कमाल आहेत काही प्रतिक्रिया.
कमाल आहेत काही प्रतिक्रिया. प्रस्तुत लेखक हे डॉक्टर आणि त्यातून एमडी आहेत आणि तसा त्यांनी उपरोक्त लेखातच उल्लेख केला आहे. कोणीही सोमाजी गोमाजी एमडी होत नाही. आपल्यापैकी बहुतेकांना डॉक्टर (एमडी) होण्यासाठी किती वैचारिक परिपक्वता आणि गुणवत्ता लागते याची कल्पना असेलच. अशा व्यक्तीकडून एखाद्याच्या वागण्याचा चुकीचा अर्थ काढण्याची अतिशय मुलभूत चूक होऊ शकेल का? त्या व्यक्तीबाबत निर्णयाला येण्यापूर्वी त्यांनी हा इतका साधा विचार नक्कीच केला असेलच ना? आणि जरी तेंव्हा केला नसेल तरी मागच्या तब्बल पंचवीस वर्षात सुद्धा केला नसेल काय? "कदाचित ती व्यक्ती तेंव्हा अन्य अडचणीत असेल" अशा प्रकारच्या प्रतिसादावर एका वरिष्ठ एमडी डॉक्टरने "अरे हां! हे तर माझ्या लक्षातच आले नाही बुवा" अशी प्रतिक्रिया व्यक्त करणे आपल्याला अपेक्षित आहे का?
डॉ. कुमार, आवडला तुमचा
डॉ. कुमार, आवडला तुमचा प्रतीसाद.
नाय हो. त्यांची त्यावेळची
नाय हो. त्यांची त्यावेळची परिस्थिती, तो कलिग नक्की कसा होता हे पूर्ण जज करणारे वाचक कोण?
सगळं एकमेकाला धन ऋण चार्ज सारखं कॅन्सल करेल.
दे आर जस्ट एक्सप्लोरिंग पॉसिबलिटीज.आणि डॉ म्हणतात तसे, हे सगळे विचार आधीच केले तर जगात लिखाणच होणार नाही
सो लिखाण आणि प्रतीसाद दोन्ही बरोबर वाटतात.
इनामदार, धन्यवाद.
इनामदार, धन्यवाद.
माझ्या भावना तुम्हाला बरोबर समजल्याने समाधान वाटले.
@ कुमार१,
@ कुमार१,
प्रांजळ अनुभवकथन आवडले.
उमदेपणाचे, भावना सुयोग्य शब्दात व्यक्त करता येण्याचे वरदान सर्वांनाच लाभत नाही. विशेषतः ईर्षा - मत्सर - हेवा असल्या भावना तर सर्रास अव्यक्त राहतात, शब्दांअभावी कृतीतून व्यक्त होतात.
तसेही कुठल्याही दोन व्यक्ती सारख्याच प्रसंगात तंतोतंत सारख्या व्यक्त होत नाहीत.
That’s why we humans are such an interesting species in the universe
अनिंद्य
कला ही वेदनेतून जन्म घेते”,
कला ही वेदनेतून जन्म घेते”, असे आशा भोसले म्हणून गेल्या आहेत. >>>> +11
तसेच उमर खय्याम यांचेही वाक्य प्रसिद्ध आहे :
वेदना आणि सृजन ही जुळी मुले आहेत.
कोणीही सोमाजी गोमाजी एमडी होत
कोणीही सोमाजी गोमाजी एमडी होत नाही. आपल्यापैकी बहुतेकांना डॉक्टर (एमडी) होण्यासाठी किती वैचारिक परिपक्वता आणि गुणवत्ता लागते याची कल्पना असेलच >> एका अर्थी तुमचं बरोबर आहे अगदी १००% आणि पुर्वीच्या काळात उच्च शिक्षणाने माणूस शहाणा होत असे.
पण सगळेच उच्चशिक्षित विचाराने परिपक्व असतात या वाक्याला माझी सहमती नाही.
अॅज अनु राईटली सेड, वुई आर ओन्ली एक्स्प्लोरिंग द पॉसिबिलिटिज, त्यात कुठेही कुमारजींना दुखावण्याचा अथवा त्यांच्या परिपक्वतेवर शंका घेण्याचा हेतू नाहिये.
पुन्हा एकदा स्पष्ट बोलल्याबद्दल माफी असावी.
अनिंद्य , आभार आणि सहमती.
अनिंद्य , आभार आणि सहमती.
म्हणूनच म्हणतात ना, की पृथ्वी वरील सर्व प्राणिमात्रांत माणूस हा ‘समजायला’ सर्वात अवघड प्राणी आहे.
व्यक्ती प्रथम माणुस आहे
व्यक्ती प्रथम माणुस आहे.उच्चशिक्षित वगैरे नंतर.माणुस म्हणुन असणार्या भावना या लक्षात घेतल्या पाहिजेत.
कोणीही सोमाजी गोमाजी एमडी होत
कोणीही सोमाजी गोमाजी एमडी होत नाही. आपल्यापैकी बहुतेकांना डॉक्टर (एमडी) होण्यासाठी किती वैचारिक परिपक्वता आणि गुणवत्ता लागते याची कल्पना असेलच >> एका अर्थी तुमचं बरोबर आहे अगदी १००% आणि पुर्वीच्या काळात उच्च शिक्षणाने माणूस शहाणा होत असे.
पण सगळेच उच्चशिक्षित विचाराने परिपक्व असतात या वाक्याला माझी सहमती नाही >>>> + ११११
व्यक्ती प्रथम माणुस आहे.उच्चशिक्षित वगैरे नंतर.माणुस म्हणुन असणार्या भावना या लक्षात घेतल्या पाहिजेत. >>> +१११
जेव्हा कोणी आपले लेख, कथा किंवा विचार सोशल साईट वर मांडते, अन जर तीथे वाचकांना प्रतीसाद देण्याची सोय आहे तर मग त्याला बरेवाईट हर तर्हेचे प्रतिसाद हे येणारच,
जर एखाद्याची नकारत्मक प्रतीसाद सहन करण्याची ईच्छा वा तयारी नसेल, जर त्याने त्यांना त्रास होणार असेल तर माझ्या मते अश्यांनी सोशल साईट वर काही लिहिणे टाळावेच.
कुमारजी मी जे वर लिहीलेय ते इन जनरल लिहीलेय कृपया ते व्यक्तीश: घेऊ नका
कुमार१,
कुमार१,
सुरेख लेख.आपल्या मित्राकडून अशी प्रतिक्रिया येणे निश्चितच दुखावणारी असते.दुर्दैवाने अशा माणसांची संख्या बरीच पाहिली आहे.दुसर्यांच्या अगदी साध्या साध्या चांगल्या गोष्टीं ऐकून/ पाहून चेहरा पडणे,त्याबाबत असूयेने बोलणे हे पाहिले /अनुभवले आहे. अरे वा अशी का बरे प्रतिक्रिया येत नाही असा प्रश्न पडतो.
“आपण वर्गातील सर्वजण हे एकमेकांचे ‘परिचित’ आहोत. ..... नोकरीच्या अगदी सुरुवातीच्या काळात एका सिनियरने असेच उदगार काढले होते.'ऑफिसमधली मैत्री वगैरे काही नसते,फक्त शिड्या असतात." त्यावेळी हे ऐकून विचित्र वाटले होते.पण कालावधीनंतर त्याची सत्यता पटलीच.
व्हिबी छान प्रतिसाद.
व्हिबी छान प्रतिसाद.
कुमारजींनी इनामदार यांच्या पोस्टला दिलेला दुजोरा, त्यानंतरच्या माझ्या पोस्टला ओलांडून अनिंद्य यांना दिलेला प्रतिसाद अप्रत्यक्षरित्या हे दाखवतो आहे की माझा कोणताही प्रतिसाद कुमारजींना आवडलेला नाही (असे मी धरून चालावे का?)
सोशली जेव्हा आपण व्यक्त होतो तेव्हा त्याला अनेक नजरा वाचणार, अनेक मेन्दू त्या गोष्टीचा विचार करणार आणि मते मान्डली जाणार हे लेखकानी गृहित धरले पाहिजे. (ते कुमारजीनी धरलेच असेल)
मी माझ्या कुवतीनुसार लेखावर अतिशय प्रामाणिक प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार,
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार, चांगली चर्चा.
दक्षिणा,
तुमचा प्र मला आवडल्याचे मी आधीच लिहिले आहे. गैरसमज नसावा. त्याचबरोबर इनामदार यांचेही प्रतिपादन पटले. आता या दोन्ही गोष्टी आवडायला हरकत नसावी !☺
किंबहुना मी तर असे म्हणतो की लेखकाने आपल्या लेखात एक दोन दुवे कच्चे सोडून द्यावेत. म्हणजे वाचकांना लिहायला काही तरी राहते. नाहीतर चर्चा काय होणार?
मी नेहमी सर्व वाचकांच्या मताचा आदर करतो. सहसा प्रतिवाद करत नाही. याचा अर्थ ते मला मान्य असतेच असे नाही. सर्व विचारांचे स्वागत आहे.
या लेखात सतीशच्या स्वभावाचा फक्त एक पैलू घेतलेला आहे. मला तो माणूस अंतर्बाह्य माहीत आहे पण त्याचे इतर गुणावगुण मी इथे आणणार नाही.
आता या दोन्ही गोष्टी आवडायला
आता या दोन्ही गोष्टी आवडायला हरकत नसावी ! >> नक्किच कुमारजी
चर्चा चांगली सुरू आहे हे नक्की.
VB व देवकी , तुमचेही प्र
VB व देवकी , तुमचेही प्र आवडले.
ती ‘शिड्या’ची उपमा आवडली. त्यावरून एक वचन आठवले:
People work together, whether they work together or not.
कुमार१, असे अनुभव मलाही
कुमार१, असे अनुभव मलाही माझ्या परिचित, नातेवाईक व अशा सुहृद म्हणवणाऱ्या अनेक जणांकडून
आले, येतात व येतील. पण मानवी जीवनात असे अनुभव गृहीत धरावे लागतात, असे वाटते.
चांगल्या चर्चेबद्दल आपणा
चांगल्या चर्चेबद्दल आपणा सर्वांचे आभार.
क्षणभर लेखातील व्यक्ती बाजूला ठेऊ.
तर चर्चेचा सारांश असा. आयुष्यात आपल्या ‘ओळखीचे’ अनेकजण असले तरी त्यातील ‘मित्र’ म्हणता येणारे एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात.
छान लेख. पुढे काय झालं,
छान लेख. पुढे काय झालं, त्याचे आणि तुमचे संबंध कसे राहिले? तुम्ही वरच्या पदाला गेल्यावर नंतर तुमचे एकत्र डबा खाणे, इतर गप्पा वेगैरे चालू राहिले का? हे जाणून घ्यायची इच्छा झाली.
तर चर्चेचा सारांश असा.
तर चर्चेचा सारांश असा. आयुष्यात आपल्या ‘ओळखीचे’ अनेकजण असले तरी त्यातील ‘मित्र’ म्हणता येणारे एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात.>>>>>> सहमत!
तुम्ही वरच्या पदाला गेल्यावर नंतर तुमचे एकत्र डबा खाणे, इतर गप्पा वेगैरे चालू राहिले का? हे जाणून घ्यायची इच्छा झाली.>>>>>>> खरंय.डॉ.उत्तर देतीलच. नात्यात एक दरी पडतेच,तिचा ठणका सौम्य होतो.पण वण कायम रहातो.
छान अनुभव कथन!
छान अनुभव कथन!
जे लोकं नुसतेच परिचित या गटात असतात ते बरेचदा शिष्ठाचाराला धरुन वर्तन करतात. त्यांच्या भावना तुमच्यात गुंतलेल्या नसतात. साहजिकच मोजून मापून वर्तन होते. आनंदाच्या क्षणी तुमच्यासाठी योग्य शब्दात आनंद व्यक्त केला जातो आणि दु:खात दु:ख! मात्र जे लोकं या परिचित गटाच्या पुढल्या कक्षेत मात्र सुहृद गटाच्या बाहेर असे असतात त्यांच्याकडून बरेचदा आपला अपेक्षाभंग होतो. एकमेकांत भावना गुंतलेल्या असतात मात्र त्यात प्रसंगी हेवा-मत्सरही यासारख्या भावनाही असतात. तशी परीस्थिती निर्माण झाली की त्या उफाळूनही येतात. काही जण त्याला योग्य वाट करुन देतात तर काहींना हे जमत नाही आणि मग या मित्रासारखे दुखावणारे वर्तन घडते.
>>सतीश व मी दिलजमाईने रोजची कामे जास्त वेळ थांबून पूर्ण करीत होतो.>>
कदाचित सतीशलाही त्याच्या कष्टाचे काहीतरी बक्षिस मिळावे अशी अपेक्षा असावी. तुमच्या सारखे प्रोमोशन नाही पण तुमच्या रेकमेंडेशनने थोडी पगारवाढ/बोनस वगैरे अपेक्षा असावी. तुम्ही तुमच्या प्रोमोशनचा प्रस्ताव मांडला, तुम्हाला प्रोमोशन मिळाले पण त्याला जास्तीचे कष्ट करुन जर काहीच बक्षिस/श्रेय मिळाले नसेल तर त्याला कदाचित आपण मैत्रीखातर इतकी मेहनत केली आणि पदरात काहीच पडले नाही, बक्षिस याला एकट्यालाच असे वाटून मन कडवट झाले असावे. त्या तुम्ही प्रोमोशनसाठी प्रयत्न करत आहात हे सतीशला माहित नसेल तर तो अधिकच दुखावला असेल. स्वभावाने साधा असल्यास, नाराजी चुकीच्या पद्धतीने व्यक्त झाली असेल. मी सतीशच्या वागण्याचे समर्थन करत नाहीये पण कथेची दुसरी बाजू -एक शक्यता व्यक्त केली इतकेच.
शिल्पा, सहमत. पण त्याही
शिल्पा, सहमत. पण त्याही परिस्थितीत तुम्ही अभिनंदन केलेत हे महत्वाचे. या लेखातील तो महा बेरकी आहे. तो मला “ बूट छान, पेढा मस्त” हे म्हणू शकतो त्याला ‘अभिनंदन’ शब्द मात्र जड जातो !
त्याला बाकी सगळं बोलता आलं पण माझ्यासारखं स्वतःच्या भावना न लपवता अभिनंदन करता आलं नसेल म्हणजे त्याचा त्या वेळचा त्याला जाणवणारा प्रॉब्लेम जास्त मोठा असावा :)) असतात असेही लोक, कदाचित त्यांनाच जास्त गरज असते आपली.
कदाचित त्याचीही काही अपेक्षा असेल पगारवाढ, बढतीसारखी . तुम्हाला मिळालं त्याला नाही. त्या वयात तो ते योग्य wayने सांगू शकला नसेल. आता त्याच्याशी कॉन्टॅक्ट आहे का , अजूनही अढी घेऊनच आहे का , तुमच्याशी आणि इतरांशी? तसे असेल तर आता इतक्या वर्षांनंतर स्वभावात बदल होणे अवघड आहे.
खऱ्या मैत्रीमध्ये जर- काय रे तू इतका गप्प गप्प का? तुला आनंद नाही झाला का माझ्या प्रमोशनचा अस म्हणू शकत नसाल तर ती तेवढी घट्ट मैत्री नसावीच. खरं तर असं फार कमी लोकांशी बोलता येतं. आणि तशीही आजकाल कोणतीच मैत्री तेवढी घट्ट वाटतच नाही.... आसपासचे लोक परिचित आणि मित्र याच्या मध्ये कुठेतरी लटकत असतात. माणसाच्या मनाचा अंदाज येऊन त्यावर अंदाज बांधणे मोठं काम आहे.
चाचणी प्रतिसाद
चाचणी प्रतिसाद
Pages