कांदा-कैरीची चटणी (शिजवलेली)

Submitted by maitreyee on 25 January, 2018 - 13:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मोठी कैरी
१ मध्यम कांदा
गूळ किसून १ ते दीड वाटी - कैरीच्या आंबटपणावर अवलंबून
तिखट
मीठ
कढिपत्ता
नेहमीचे फोडणीचे साहित्य.

क्रमवार पाककृती: 

ही चटणी तशी साधीच आहे. (त्या ह्या म्हणतील उद्या वरण भाताची पण रेसिपी टाकाल तुम्ही. Wink ) पण माझी फेवरेट आणि आमच्या (आंब्याचा शिरा फेम) आईची अशीच एक पॉप्युलर रेसिपी आहे ही. हल्ली हल्ली मला बरोब्बर तिच्यासारखी टेस्ट जमायला लागली आहे Happy
एखादे दिवशी बोरिंग बेचव भाजी असली तरी या चटपटीत चटणीमुळे एकदम तोंडाला चव येते.
तर कैरी सालं काढून किसून घ्यायची. कांदा पण किसून घ्यायचा. मी कधी कधी चॉपर मधे करते दोन्ही. पण किसलेल्याचं टेक्स्चर जास्त आवडतं मला. कैरीच्या किसाचे चे प्रमाण कांद्याच्या साधारण दीडपट असलं पाहिजे.
जिरे, मोहरी हिंग, हळद कढिपत्ता घालून फोडणी करा. त्यात कैरी आणि कांद्याचा कीस एकत्रच घाला. कांद्याच्या किसाचा जरा कच्चट वास जाईपर्यन्त हे मिश्रण मंद आचेवर परतत रहा. तेल सुटायला लागेल. मग किसलेला गूळ, तिखट मीठ घाला. गूळ विरघळेपर्यन्त थोडा वेळ मंद आचेवर ठेवा. त्यानंतर गॅस बंद करा. चटणी तयार!
IMG_6949.JPG

वाढणी/प्रमाण: 
साधारण १ मध्यम बोल भरून होईल - किती खाता ते आपल्यावर अवलंबून
अधिक टिपा: 

या चटणीला मस्त लाल चकचकीत रंग येतो. चवीला फार तिखट नसते. आंबट गोड चव असते. पोळी, मेथी पराठे, साध्या ब्रेड च्या स्लाइस ला लावून किंवा साध्या मुगाच्या खिचडीसोबत साइड डिश म्हणून पण भारी लागते. दोनेक दिवस फ्रीजबाहेर पण व्यवस्थित राहते. माझ्याकडे त्यापेक्षा जास्त टिकत नाही पण टिकलीच तर दुसर्‍या दिवसानंतर फ्रीज मधे ठेवते मी.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच आहे रेसिपी . आणि चटणी असली वाटा घाटा नाहीये . कधी कधी मिक्सर मध्ये वाटायचा सुदधा कंटाळा येतो .

अरे वा, मस्तच!

आम्ही अशीच करतो पण कच्ची; ती अर्थातच टिकत नाही फार. आणि त्याला टक्कू/चटका वगैरे गोंडस/चटकदार नाव आहे.

हो मीही जरा जास्त घालते तिखट, पण चव तिखट पेक्षा आंबटगोड कडे झुकणारी असते. तरी तुम्ही गूळ कमी तिखट जास्त वगैरे प्रयोग करून पाहू शकता.

मस्तच. मी कच्ची चट्णी करते शेंगदाणे भाजलेले घालून. आता अशी करून बघेन. ही आणि दोन पोळ्या ब्रेफाच झाला की मस्त पैकी. सीझनच्या आधी टाकलीत ते बरे केलेत. मला छुंदा पण आवड्तो पण आपली मराठी चटणी असताना वो कायको करना.

मी कढीपत्ता वापरायचं सोडले.

अमा- कढिपत्ता वापरायचे का सोडले? म्हणजे आवड की हेल्थ रीझन्स - अ‍ॅलर्जी वगैरे? सहज कुतुहल म्हणून विचारतेय.

आता चांगल्या आंबट कैर्‍या >> नशीबवान आहात. आमच्या राज्यात आंबट कैर्‍या विकण्यावर कायद्याने बंदी आहे बहुतेक. छोट्या, मोठ्या, फिकट रंगाच्या, गडद हिरव्या, लालसर सर्व प्रकारच्या कैर्‍या आणून पाहिल्या. एकदाही व्यवस्थित आंबट असलेली कैरी मिळालेली नाहि. न्यू जर्सी आणि क्वीन्स मधल्या दुकानातून आणलेल्या कैर्‍या पण तशाच !
तरी एकदा करुन पहाणार ही रेसिपी.

मेधा, ह्या चांगल्या आंबट कैर्‍या आमच्या इंग्रोमधेच मिळतात. ते सुद्धा वेळेवर तिथे पोचलं तर! लागतो मटका कधी कधी!

या रेसिपी ने २,३ वेळा केली चटणी..अप्रतिम taste आली .खूप आवडली घरी सगळ्यांना..thank you मैत्रेयी:) अल्पनाचा सखुबत्ता जरा माग पडला यावेळी Happy
तुमची गवार बेसन कोफ्ते भाजी पण जाम famous आहे आमच्याकडे..गवार ला एकदम वेगळंच glamour मिळालं:)

अरे वा Happy थॅन्क्स. मी पण काल केली आहे ही चटणी. दर सीझन मधे २-३ वेळा होतेच.
काहींनी मागे फीडबॅक दिला होता की कांद्याचा वास नीटसा गेला नाही आणि कच्चट राहिला असे. तर कांदा तेलात आधी घालून जरा परतून मग कैरी घातली तर काम सोपे होते. कैरी लगेच शिजते तशी. ही सुधारणा करायची होती पण आता संपादन नाही करता येत.