तंदुरुस्त की नादुरुस्त : भाग ४

Submitted by कुमार१ on 19 March, 2018 - 02:07

(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)
भाग 3 : https://www.maayboli.com/node/65552
****************************
वयोगट १९-४९ : संसारामधी ऐस आपुला......

या भागात दोन उपविभाग पडतील – वय १९-२९ आणि ३०-४९. यांमध्ये सुचविलेली प्रत्येक चाचणी सर्वांसाठी करण्याची गरज नसते. गरजेनुसार अधिक जोखीम असलेल्या लोकांमध्ये संबंधित चाचणी केली जाते. प्रथम या दोन्ही उपविभागांना समान असणाऱ्या चाचण्यांची माहिती घेऊ.
खालील ४ आजारांसाठी चाचण्यांची शिफारस केली जाते. त्यापैकी पहिल्या २ अर्थातच स्त्रियांसाठी आहेत:

१. स्तनांचा कर्करोग
२. गर्भाशयाच्या cervix चा कर्करोग
३. उच्च कोलेस्टेरॉल पातळी आणि
४. HIV संसर्ग

स्तनांच्या कर्करोगाच्या चाचण्या:

१. स्त्रियांनी त्यांच्या विशीत असताना स्वतःच त्यांच्या स्तनांची तपासणी घरी नियमित करावी. त्यामध्ये पुढील गोष्टींकडे लक्ष द्यावे – तेथील त्वचेवर खळ व सुरकुती पडणे, फुगवटा येणे, एखादा भाग लाल होणे इ. काही संकेतस्थळांवर हा विषय सचित्र समजावून सांगितलेला आहे.
२. दर ३ वर्षांतून एकदा अशीच तपासणी योग्य त्या डॉक्टरकडून करून घ्यावी.

३. चाळीशीच्या पुढे वर्षातून एकदा mammography ही क्ष-किरणतंत्र चाचणी करावी. आता ही सर्वांसाठी का फक्त जोखीम असणाऱ्यांसाठी यावर तसे एकमत नाही.

४. आता या रोगाची अधिक जोखीम असणाऱ्या स्त्रिया अशा आहेत:

अ) आई किंवा बहिणींना स्तनांचा किंवा अंडाशयाचा कर्करोग असणे आणि त्यांच्यात संबंधित जनुकीय बिघाड असणे.
आ) लठ्ठपणा
इ) स्वतःची मासिक पाळी वयाच्या १३ व्या वर्षाआधी सुरु होणे
ई) स्तन दाट (dense) असणे
उ) अतिरिक्त मद्यपान
ऊ) १० ते ३० या वयात छातीची क्ष-किरण तपासणी बऱ्याचदा होणे.
ऋ) नेहमी रात्रपाळीत काम करणाऱ्या स्त्रिया

५. आता वरीलपैकी कोणताही मुद्दा लागू असल्यास डॉ च्या सल्ल्याने जनुकीय चाचण्यांची शिफारस केली जाते. ती चाचणी रक्त वा थुंकीवर करता येते. त्यात BRCA1 or BRCA2 या जनुकांमध्ये बिघाड (mutation) आहे की नाही ते पाहतात.

Cervix च्या कर्करोगाच्या चाचण्या:
या रोगाची वाढ खूप हळू असते. येथे चाळणी चाचण्यांचे महत्व खूप आहे. त्यामुळे कर्करोगाच्या पूर्वस्थितीतच त्याचे निदान शक्य होते. अशा स्थितीत त्यावर प्रभावी उपचार करता येतात. चाचणीच्या शिफारशी अशा आहेत:

१. २१-२९ या वयांत Pap Smear चाचणी दर ३ वर्षांतून एकदा करावी. यासाठी Cervix च्या भागात विशिष्ट ब्रशच्या सहाय्याने हलकेच स्त्राव घेतला जातो आणि मग त्यातील पेशींचे प्रयोगशाळेत निरीक्षण करतात.

२. या रोगाची अधिक जोखीम असणाऱ्या स्त्रिया अशा:
अ) HPV या विषाणूंचा संसर्ग होणे. हा संसर्ग लैंगिक संबंधातून होतो.
आ) लैंगिक संबंध लवकरच्या वयात चालू करणाऱ्या स्त्रिया
इ) अनेक जोडीदारांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या
ई) एड्स-बाधित आणि
उ) धूम्रपान करणाऱ्या.

अशा स्त्रियांसाठी Pap चाचणी दरवर्षी सुचवण्यात येते.

३. जेव्हा Pap चाचणीचे निष्कर्ष ‘नॉर्मल’ पेक्षा वेगळे असतात तेव्हा HPV DNA test ही पुढची चाचणी करण्यात येते. या विषाणूच्या अनेक प्रजाती असून त्यातील काहींमुळे हा कर्करोग होतो.

• उच्च कोलेस्टेरॉल पातळी आणि HIV संसर्ग याबद्दलच्या चाचण्यांचे विवेचन या लेखमालेच्या तिसऱ्या भागात आलेले आहे. आता रक्तातील एकूण सर्व मेद-पदार्थांचा अंदाज घ्यावा. त्या चाचणीला Lipid Profile म्हणतात. त्यात एकूण कोलेस्टेरॉल व त्याचे LDL-c, व HDL-c हे दोन प्रकार आणि TG यांचा समावेश असतो.
या विषयाचे अधिक विवेचन माझ्या ‘कोलेस्टेरॉल’ वरील लेखात वाचता येईल :
(https://www.maayboli.com/node/64397)
• ३०-४९ या वयोगटासाठी लठ्ठपणाच्या चाचणीची शिफारस केलेली आहे. बऱ्याच लोकांचे बाबतीत तारुण्यात वजन योग्य असते पण चाळीशीच्या आसपास ते अतिरीक्त होऊ लागते. अशांनी आता नियमित वजन करून स्वतःच्या BMI वर लक्ष ठेवणे हितावह असते. याचबरोबर वर्षातून एकदा रक्तदाब बघणे हेही फायद्याचे असते.
लठ्ठपणा, उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह, उच्चरक्तदाब आणि करोनरी हृदयविकार हे सर्व एकत्र नांदणारे आजार आहेत याची दखल घेतली पाहिजे.

• चाळीशी ओलांडलेल्या स्त्रिया जर अनिश्चित(non-specific) स्वरूपाच्या तक्रारी घेऊन डॉक्टरकडे वारंवार जात असतील तर त्यांची थायरॉइडची TSH चाचणी करणे हितावह असते.
** ** **

पुढील वयोगटाकडे जाण्यापूर्वी मला दोन मूलभूत चाळणी चाचण्यांबद्द्ल लिहावे वाटते. या दोन्ही तशा ‘वयोगट-विरहीत’ आहेत. जेव्हा आपल्याला एखाद्या कारणास्तव शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र सादर करायचे असते तेव्हा या कराव्या लागतात. त्या अशा आहेत:

१. Hemogram: यामध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी, लाल व पांढऱ्या पेशींची संख्या आणि संबंधित माहिती मिळते.

२. लघवीची सामान्य (Routine) तपासणी: यात लघवीत ग्लुकोज, प्रथिन, स्फटिकासारखे पदार्थ आणि जंतूसंसर्ग दर्शवणारे दोष आहेत का ते पहिले जाते.

शारीरिक तपासणी बरोबर या दोन्हीचे रिपोर्ट्स व्यवस्थित असतील तर ‘साधारणपणे व्यक्ती तंदुरुस्त आहे’ असा शेरा देता येतो. पण त्यात काही दोष निघाल्यास पुढील चाचण्या करण्याची दिशा मिळते.

या चाचण्यांची गरज प्रामुख्याने खालील प्रसंगी असते:
१. एखाद्याला संस्थेत नोकरीत रुजू करून घेण्यापूर्वी
२. खेळाडू आणि गिर्यारोहक जेव्हा मोठ्या स्पर्धा/ मोहिमांवर निघतात तेव्हा
३. काही ‘जीवन विमापत्र’ (policy) इ. काढताना आणि
४. कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी.

सध्या बऱ्याच संस्थांमध्ये नोकरीत रुजू करून घेण्यापूर्वी वरील चाचण्यांव्यतिरिक्त ग्लुकोज-पातळीचाही आग्रह धरला जातो. ************************************
भाग ५ : https://www.maayboli.com/node/65663
(क्रमशः )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखात म्हटल्याप्रमाणे नेहमी रात्रपाळीत काम करणाऱ्या स्त्रियांना स्तनांच्या कर्करोगाचा जास्त धोका का असतो ?

@ साद:
नेहमी रात्रपाळीत काम करणाऱ्या स्त्रियांना स्तनांच्या कर्करोगाचा जास्त धोका का असतो ?>>>>

कारण त्यांच्या हॉर्मोनसचा नैसर्गिक ताल ( rhythm) बिघडतो. म्हणून हवाई सुंदरींना जोखीम खूप जास्त असते.

नोकरीत रुजू करून घेण्यापूर्वी ग्लुकोज-पातळीचाही आग्रह धरला जातो..........

जबाबदारीच्या मोठ्या पदांवर काम करणाऱ्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची भेट हमखास मिळते, न मागता Happy

३० - ४९या वयांत शरीराचे वजन योग्य प्रमाणात राखणे खूप महत्वाचे आहे. उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह, उच्चरक्तदाब आणि करोनरी हृदयविकार हे आजार लठ्ठपणाशी निगडित आहेत हे सर्वांना माहीत आहेच.

पण आता यांत कर्करोगाचीही भर पडली आहे. जर B M I बराच काळ 30 च्यावर राहिला तर पन्नाशी च्या आतच काही कर्करोग होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये मोठे आतडे, थायरॉइड, स्वादुपिंड, स्तन आणि गर्भाशय यांच्या कर्करोगाचा समावेश आहे. लठ्ठ व्यक्तींमध्ये या रोगांची वाढही झपाट्याने होते.

सध्या पुणे विविध भारतीवर सकाळी ७.१० ला एक सरकारी जाहिरात लागते. त्यात अशी माहिती आहे:

‘सर्व सरकारी रुग्णालयांत वय ३० चे पुढील लोकांची ग्लुकोज पातळी व रक्तदाब तपासणी मोफत.’

यातून शासन या आजारांबद्दल जनजागृती करीत आहे ही समाधानाची गोष्ट आहे.

कालच Lipid Profile टेस्ट केली. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. या लेखामुळे त्यातल्या शब्दांचा अर्थ नीट समजला.
पुन्हा एकदा धन्यवाद

चांगला सार्वजनिक उपक्रम

भारतात गर्भाशय-मुखाच्या कर्करोगाचा प्रादुर्भाव खूप आहे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे. त्या दृष्टीने ३५-४५ वयोगटातील स्त्रियांची चाळणी चाचणी करणे महत्वाचे आहे. HPV-DNA अशी ही चाचणी असते.

हे काम सार्वजनिक पातळीवर काही संस्था करीत आहेत. त्यापैकी ‘आय शेअर’ ही एक. त्यांच्या नव्या उपक्रमात पुणे जिल्ह्यातील १०,००० महिलांची ही चाचणी मोफत करण्यात येणार आहे. इच्छुकांना त्याचा लाभ घेता येईल. संबंधित लेख इथे वाचता येईल:

https://www.esakal.com/saptarang/saptarang-dr-nikhil-phadke-write-hpv-va...

दरवर्षी ऑक्टोबर महिना हा 'स्तन-कर्करोग जागरूकता' महिना म्हणून पाळला जातो. या रोगाचे प्रमाण समाजात लक्षणीय आहे.

ज्या स्त्रियांचे बाबतीत त्याचा कौटुंबिक इतिहास असतो, त्यांनी संबंधित चाळणी चाचण्या करून घेणे हितावह असते.

स्तन-कर्करोगाच्या उपचारांत क्रांतिकारक बदल घडवणारे सर्जन डॉ. बर्नार्ड फिशर यांचे नुकतेच अमेरिकेत निधन झाले. ती शस्त्रक्रिया सोपी करणे तसेच औषधांचा सुयोग्य पूरक वापर ही त्यांच्या पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत.

आदरांजली !