काथ्याकूट (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 8 September, 2017 - 16:17

"डिव्होर्सच कारण काय होतं?"
"इराचं अफेअर होतं ना"
"अफेअर? सवालच नाही!" नीरव म्हणाला.
मी नीरवकडे बघितले, एवढा आत्मविश्वास? कसा काय? एखादा माणूस जर ठामपणे एखादी गोष्ट सांगत असेल, तर विश्वास ठेवायचा?
"अनिकेतचं अफेअर आहे" नीरव पुढे म्हणाला.
"कशावरून?" नित्याने विचारले.
"मला इरा म्हणाली" नीरव म्हणाला.
"कधी?" मी विचारले.
"सात-आठ महिने झाले असतील" नीरव म्हणाला.

अफेअर म्हणजे भ्रष्ट्राचार! कोणाचं कुठे चालू आहे, माहित नसतं, पण चालू लोकांचा चालू असतो.

आज बऱ्याच दिवसांनी मी, नित्या आणि नीरव एकत्र, काहीतरी फ्रेंच नाव असलेल्या कॅफेत संध्याकाळी भेटलो होतो, नित्या वेळात वेळ काढून, नीरव फक्त अर्ध्या तासासाठी, मी आयुष्यात काही काम नव्हतं म्हणून आलो होतो, थोड्या वेळाने, मोबाइलवरच्या ऑनलाईन गप्पा थांबल्या, ऑफलाईन सुरु झाल्या, काय चालू आहे? जॉब कसा आहे? कॉन्टॅक्ट मध्ये कोण आहे? असे छान नवीन प्रश्न विचारले गेले, पण आम्ही स्वतःबद्दल काही न बोलता, इतरांबद्दल कमालीची अनास्था दाखवत बोलू लागलो, विषय होता, इरा आणि अनिकेतचा घटस्फोट!!

इरा आणि अनिकेत कॉलेज मध्ये भेटले, प्रॅटिकल्स लॅब मध्ये प्रेम झालं, कॅन्टीनमध्ये प्रेम फुललं, लेक्चर्स कमी, प्रेम जास्त केलं, "खूप प्रेम" केलं, साधं वगैरे प्रेम करायची तेव्हा पद्धतच नव्हती, आतासुद्धा तशी पद्धत नाही, पद्धतशीरपणे प्रेम सुरु होतं, कधीतरी भांडण करायचे, भांडण झाल्यावर, इराला आमची आठवण यायची, "तीन वर्षांची रिलेशनशीप कसं विसरू? " असे म्हणून रडायची, अगदी तेव्हापासून नीरव तिला "यु डिझर्व्ह बेटर" असे डायलॉग्ज मारायचा, मी आपलं लगेच अनिकेतला फोन करून इरा समोर त्याला झापायचो.
"इरा रडतेय...." असे म्हटल्यावर स्वतःची चूक नसताना, सॉरी म्हणायचा, दोघांचं लगेच पटायचं, 'पॅच अप' व्हायचं, मग परत दोघे प्रेमात पडायचे, आम्हाला, जगाला विसरायचे, आम्ही नेहमीप्रमाणे शहाणपण विसरायचो!!

या सगळ्यावर नित्या "इराने असं वागायला नको होतं" असं म्हणायची, मी ऐकून घ्यायचो, नित्या आणि इरा फेसबुक, इंस्टाग्रामवर "सोल सिस्टर्स" होत्या, साध्या मैत्रिणी नाहीत, सिस्टर्स!! ते पण सोल सिस्टर्स!! पण या दोघींचं फक्त फेसबुकवर पटलं, नाहीतर नेहमीच खटकलं!!
नीरवला इरा लय आवडायची, ते कधी त्याने सांगितलं नाही, कारण इरा काय भाव द्यायची नाही, पठ्याचे अनिकेतच्या नकळत बरेच प्रयत्न सुरु होते, तरी मी नीरवला समजावले, पण हा पठ्या मठ्ठच राहिला, प्रेमाचा त्रिकोण होण्याआधी नीरव फ्रेंडझोन झाला!!

कॉलेज संपलं, अनिकेतला नोकरी मिळाली, इराने एमबीएला ऍडमिशन घेतलं, अनिकेतने प्रपोज मारलं, इराने होकार दिला, दोघांचे लग्न करायचे ठरले, मग घरी सांगण्यात आलं, मग ते नेहमीच्या, टिपिकल गोष्टी सुरु झाल्या, घरच्यांचा विरोध, जातीचा प्रश्न, मुलाने गाडी घ्यावी का घर? मुलीने स्वयंपाक करावा का जॉब? यावर बरीच चर्चासत्र घडली मग बिघडली, वडिलांचा बीपी कमी झाला, आईचा फिवर वाढला, अनिकेतने जेवण तर इराने जीव सोडायचा प्रयत्न केला, अनिकेतला गुत्त्यावर तर इराला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं, घरातले मग "मुलांच्या मनाने होऊ दे" असं म्हणतं, परत बोलणी करायला तयार झाले, तरी "इराने लग्नात किती तोळे सोनं घालावं?" यावर सुमारे एक दिवस अखंड चर्चा झाली, दोन्ही घरातून पसंती मिळाली, मुहूर्त निघाला, लग्न लागले, तेव्हा नीरवने स्वतःच्या हाताने काढलेलं इराचं पोस्टर, भेट म्हणून दिलं, मी आपली चार डबे बासुंदी भेट दिली, लग्नाच्या दुसऱ्याच पंगतीत ती बासुंदी संपली!! तेव्हा नित्या मला "कोणी बासुंदी भेट देतं का?" असं म्हणून रागावली, पण नित्याने काय प्रेझेन्ट दिलं? का नाही दिलं? मला तर आता आठवतच नाही.

हिल्स स्टेशनवर, निसर्गाच्या सानिध्यात, जंगलात कुठेतरी हनिमून झाला, हनिमूनचे साधारण एकशे बारा फोटो शेअर झाले, त्यावर "मेड अन मॅड फॉर इच अदर" अशा प्रतिक्रिया आल्या, मला एक "मंद फॉर इच अदर" अशी छान कॉमेंट करायची होती, पण जाऊ दे, कशाला उगीच, जास्त लाईक्स आले तर? म्हणून मी टाळलं.

लग्नाला दीड एक वर्ष झालं असेल, संसाराचे दिवस सरताना, या दोघांनी आम्हाला बाजूला सारले, कधी आठवण आली की मेसेज करायचे, आता टॅग करतात!! केस कापले म्हणून एफबीवर पोस्ट करणारी इरा, घटस्फोट कसा, कधी, केव्हा झाला याचा थांगपत्ता लागू दिला नाही, कदाचित "दुःखाचं प्रदर्शन मांडायचं नसेल" असं वाटलं पण अचानक, इराने "आय डाय...व्हेन यु सेड गुडबाय.." अशी फेसबुकवर पोस्ट केली, सहाशे चोवीस लाईक्स, सत्तावन्न कंमेंट्स आल्या, इकडे अनिकेतने "स्वतःला वेळ..वेळेला किंमत देता येत नाही" अशी पोस्ट करून फेसबुक अकाउंट डिलिट केलं, मग लोकांचं "कोण कोणाला चीट करतंय?" यावर चिट चॅटिंग सुरु झालं.

आमच्या ग्रुप मधलं पहिलंच लग्न, पहिलाच डिव्होर्स!! इरा आणि अनिकेतच्या घटस्फोटाचं कारण कोणालाच माहित नव्हतं, कोणाला 'काय' माहित होतं, याच माहितीसाठी, मी, नित्या आणि नीरव खूप दिवसांनी भेटलो होतो. वेळात वेळ काढून कॉफीचे सिप घेत गॉसिप सुरु होतं, नित्याला वाटतं होतं की, इराने अफेअर केलं, नीरवला वाटतं होतं, अनिकेतचं अफेअर आहे, मला दोघांचं ही बोलणं अनफेअर वाटतं होतं.

"अनिकेत थोडा व्हायलन्ट..." नीरवचे तर्क सुरु झाले होते.
"व्हायलन्ट?" मला धक्काच बसला, इराची बाजू घेत, नीरव फारच बाऊ करत होता.
"भांडण झालं होत तर....त्याने तिचा हात मुरगळला... "
"इराने तुला सांगितलं?" मी परत विचारलं, मला उत्तर माहित होतं.
नीरवने कॉफी पीत होकारार्थी मान डोलावली.
"केतकी एकदा त्यांच्या घरी.... " नित्या सांगायला लागली.
"तुला केतकी भेटते?" मी पटकन विचारले.
माझा प्रश्न ऐकून नित्या हसली, मी नीरवकडे बघितले, तो माझ्याकडे न बघत गालातल्या गालात हसला, मी काही बोलणार तेवढ्यात..
"तिने तुला अनब्लॉक केलं का?" असं मला म्हणून नित्या हसायला लागली, नीरवने हसत माझ्या पाठीवर थोपटले, मी आपला मान खाली घालून कॉफी पिऊ लागलो.

केतकी....

केतकी...इरा आणि नित्याची मैत्रीण..कधीतरी आमच्या ग्रुपमध्ये अन सारखी माझ्या मनात येत असे, मी तिची अन तिचीच नेहमी वाट बघायचो. केतू..आय मिस यु यार.. कॉलेजमध्ये, मी केतकीवर मोजून सात कविता केल्या, फेक अकाउंटने तिला पाठवल्या, पण तिने माझं खरं अकाउंट ब्लॉक केलं, तिला कसं समजलं? हे मला आज ही माहित नाही!! मग मी अजून एक फेक अकाउंट काढलं, पण आठवी कविता कधी सुचली नाही,
मस्त होती ती कविता...काय होती बरं.. तुझ्या घराबाहेरचा पाऊस..तुझी भिजायची हौस..तुझी...

"अरे पुढे काय.. केतकी काय म्हणाली.." नीरवने नित्याला विचारले, माझी तंद्री भंगली.
"अरे हो.. केतकी त्यांच्या घरी गेली होती...टीव्हीवर अनिकेतला मॅच, तर इराला स्प्लिट्सव्हिला बघायचं होतं, यावरून दोघांचं वाजलं, इराने चिडून अनिकेतला रिमोट फेकून मारला....त्याच्या डोळ्याला लागला" असं म्हणून नित्या सँडविचवर सॉस लावून खाऊ लागली.
"इरा पण व्हायलन्ट...?" मी विचारलं.
"नाही यार... ती काय व्हायलन्ट होणार" नीरव द वकील म्हणाला.
"पण.." मी एवढं बोलून थांबलो पुढे म्हणालो "तुला केतकी म्हणाली की..तिच्या समोर इरा आणि अनिकेतचं वाजलं?"
"हो..." नित्या म्हणाली.
मी काही बोललो नाही, विचार करू लागलो, हे दोघ ही माझ्याकडे बघू लागले, तुमच्या घरी एखादा जुना मित्र आला, तर तुम्ही टीव्ही बघणार का गप्पा मारणार?
"म्हणजे?" माझ्या चेहऱ्यवरचे भाव वाचत नित्या म्हणाली, मी नीरवकडे बघितले, त्याची ट्यूबलाईट पेटली.
"लुक..केतकी कान्ट लाय... तिला असं खोटं बोलून काय मिळणार?" नित्याने केतकीची बाजू घेतली.

तुम्ही नेहमी तुमच्या मित्राची बाजू घेता? मित्र आहे म्हणून? का नकळत त्याची बाजू घेतली जाते? माझी शंका नित्याने रास्त ठरवली, मी विचार करू लागलो, केतकी म्हणाली की तिच्या समोर भांडण झालं, इराने रिमोट मारला, अनिकेतला लागला, ते पण डोळ्यावर!! इरा वाईट ठरते, अनिकेतची द्या येते, पण खरंच इरा अनिकेत इतकं टोकाचं भांडले? पण मग इराला वाईट ठरवून केतकीला काय मिळणार? का केतकी आणि अनिकेत.....?

मी नीरवकडे बघितले, नीरव शांतपणे खुर्चीत रेलून बसला, तोही विचार करत होता, बऱ्याचवेळा असचं होतं, घटस्फोट झाला की, खरं कारण कळतच नाही! बायको म्हणते नवऱ्याचा दोष आहे, नवरा म्हणतो बायकोचा! तुम्ही ज्याचे मित्र असाल त्याची बाजू घ्यावी लागते, त्याचीच बाजू खरी वाटते! मित्राची बाजू अन चिवड्यातील काजू नकळत निवडले जातात!!

"तुला काय म्हणायचं ते चांगलचं कळतंय" 'चांगलचं' शब्दावर मान हलवत नित्या मला म्हणाली, नित्या डिचवली गेली, मी काही बोललो नव्हतो, माझ्या डोक्यातले विचार हिने कसे काय वाचले?
"केतकीला बॉयफ्रेंड आहे...." नित्या पुढे म्हणाली.
काही झालं तरी नित्या केतकीची बाजू घेणार, आमची मैत्री अजून नाजूक होणार, त्यामुळे मी हा विषय ताणला नाही, कारण त्राण नव्हते, कशाला ना उगीच, एकतर खूप दिवसांनी भेटलो होतो, त्यात असं काही बोलून कोणी दुखावलं गेलं तर? म्हणून मी गप्प बसलो, पण "केतकीचा बॉयफ्रेंड..." हे ऐकून मी सेंटी झालो, उगीच केतकीचा विषय निघाला अन मग चिघळला!!

तेवढयात नीरवने मोबाइल हातात धरून हात वर नेला, मी नकळत मोबाइलकडे बघितले, माझी मान आपसूकच उजव्या बाजूला कलंडली, उजव्या हाताने केस आवरले, डोळे मोठे झाले, डावी भुवई वर झाली, चेहऱ्यावर स्मितहास्य आले, नीरवने पटापट सेल्फी काढायला सुरुवात केली!!
"ऐ मी पण..." असं म्हणत नित्याने तिच्या बाजूने सेल्फी काढल्या.
मग प्रकाश शोधण्यात आला, प्रकाश कुठल्याच फोटोत येईना, प्रकाशचा बारका भाऊ फ्लॅशला बोलावले, तरी फोटो भंगार आले, मग फिल्टर लावून आम्ही गोरे झालो, एकदंरीत सत्तावीस सेल्फी काढल्या गेल्या, त्यातल्या चार सेल्फीज लगेच शेअर झाल्या, टॅगा ट्यागी झाली, "जेव्हा मित्र खास...फ्रेंडशिप लास्टस..." अशा मथळ्या खाली, फोटोज शेअर झाले, तीन मिनिटानंतर त्या पोस्टवर...
"ऐ मला नाही बोलावलंत"
"अकेले अकेले....."
"कुठे आहात....?"
"कधी भेटला होतात....?" अशा लगेच कमेंट्स आल्या.
नित्याच्या पोस्टला जरा वेगळ्या कमेंट्स आल्या, चार कॉमेंट्स तिला "क्युटी..." म्हणून तर, एका पोराने तिला "एन्जल.." म्हणून कमेंट केली, "मंगळवार आहे...नॉन व्हेज खाऊ नका.." अशी एक कमेंट आली, हे दोघे ही कमेंट्सला रिप्लाय देण्यात गुंतले, मला परत भूक लागली, मी एक फ्रेंचवाले चिकन सॅन्डविच, कोल्ड कॉफी मागवली, नित्याने माझ्याकडे बघत मान डोलावली.
"काय?" मी तिला विचारले.
"अरे किती...पोट बघ किती सुटलंय..." नित्या मला म्हणाली.
नित्या चवळीची शेंग होती असे अजिबात नाही, पण दुसऱ्याला जाड ठरवलं की, आपण बारीक आहोत असे वाटू लागते, मी काही बोललो नाही, काय बोलणार? मग चार मिनिटं वजन कमी कसे करावे यावर नीरव बोलला, मी माझे दुसरे सँडविच संपवू लागलो.

"इराचं अनिकेतच्या घरच्यांशी पटत होतं" असं म्हणत नित्याने तिचं सँडविच खात, वाक्याच्या शेवटचा "का?" गिळला.
"पटत नव्हतं का?" नीरवने तिला विचारले.
"मला नाही माहित...मी विचारतेय.." नित्याने विचारले.
"अनिकेत मला काही बोलला नाही" मी म्हणालो.
"पण एकदा तो म्हणाला होता..." नित्या एवढंच म्हणाली, मोठा पॉंज घेतला, माज केला.
"काय.?" मी तिला विचारले.
"काही नाही..हेच की एवढं पटलं नाही..." नित्या म्हणाली.
आधी अफेअर होतं, मग व्हायलंट झाले, आता घरच्यांशी पटत नव्हतं.. बरीच कारणं डोकावू लागली!!
"अनिकेतने जॉब चेंज केला ना" नीरवने अगदी सहज विचारले.
"हो..आधीच्या जॉब मध्ये सॅलरी कमी होती" मी म्हणालो.

मी विचार करू लागलो, कोणाला दोष द्यायचा? इराला? का अनिकेतला? कोण खोटं बोलतंय? कोण खरं बोलतंय? ते कसं ठरवायचं? काय कारण असेल? कशाने नातं तुटलं?
अशा गोष्टी शोधून काढून काय उपयोग? का वेळ घालवायचा? गॉसिप वाईटच!
पण तरी सुद्धा खरं कारण काय होतं, ते जाणून घेण्याचा प्रयत्न होतोच, पण असं खरं कारण, शोधून काढणं, गॉसिप करणं, कुटाळकी करणं, बरोबर आहे का? असे काहीतरी नैतिक विचार कधी नव्हे ते माझ्या मनात येऊ लागले, आयला काय होतं या कोल्ड कॉफीत??

माझं सँडविच संपलं, पोट अन मन भरलं, झोप येऊ लागली, डोकं काही चालेना, इकडे नित्याला कोणाचे तरी मेसेज, फोन येत होते, नीरव पण कोणाबरोबर तरी चॅटिंग करत होता. मी माझा मोबाइल काढून बघितला, आयला मला कोण कधी मेसेजचं करत नाही!!
थोड्या वेळाने..मग त्या नेहमीच्या गप्पा सुरु झाल्या, हा काय करतो? ती काय करते? तो दिसला होता, ती बघून हसली होती, हे सगळं बोलून झाले, याला त्याला नावं ठेवण्यात आली, मग काही बोलायला उरलं नाही, तरी मी काहीतरी विषय शोधून काढले, नोटबंदी झाल्यामुळे मंदी येईल का? चायना माल, चायना हॉटेल्स पण बंद करायला पाहिजेत, असे काही तात्विक विचार, तावातावाने मांडण्यात आले.

मग विषय, आशय संपले, परत कधी भेटायचं? गोव्याला कधी जायचं? माथेरानला तरी जाऊ, यावर परत गप्पा झाल्या, "तुम्ही ठरवा मग मला सांगा" नित्या म्हणाली, "मला तर वेळच नाहीये" नीरव म्हणाला, मग मीच आपला रिकामटेकडा ठरलो!
मग बिल देण्यात आलं, चॉकलेटची बडीशेप मिळाली नाही म्हणून, माझा मूड गेला, रमत गमत रेस्टॉरंटच्या पार्किंग मध्ये आलो, नित्याला बराच उशीर झाला, ती पटकन निघून गेली, मी आणि नीरव मागे राहिलो.

"हिला बराच राग आला..तू केतकी बद्दल बोललास तेव्हा..." नीरव मला म्हणाला.
"अरे पण मी काही म्हणालोच नाही.." मी लगेच उत्तर दिले.
"जाऊ दे यार..तुला माहितेय ना ती कशी आहे..." नीरव एवढं बोलून थांबला, त्याने त्याची बाईक बाहेर काढली, बाईकवर बसला, माझ्याकडे बघत म्हणाला
"आपण एकदा..अनिकेतला भेटू..तो आज का नाही आला?"
"काय माहित..कॉलला उत्तर पण दिले नाही.." मी म्हणालो..
"इरा का नाही आली?" मी नीरवला विचारले.
"नित्या असल्यावर कशी येणार?" नीरव म्हणाला, हसला.
"ते पण आहे म्हणा...."

नीरवने मला कुठे सोडू का विचारले, मी नाही म्हणालो, मला थोडं चालायचं पण होतं, मी बाहेर आलो रस्ताच्या कडेने चालू लागलो, मग थोडं बरं वाटलं, एक रिक्षा थांबवली, रिक्षात बसलो, मी थोडा विचार केला, मोबाइल काढला, व्हाट्सअपवर एक मेसेज पाठवला...
"केतकीला कसं कळलं की मीच कविता पाठवत होतो?"
"हे देवा....नाही माहित रे....आता मधूनच केतकीचं काय....?" माझ्या मेसेजला लगेच उत्तर आलं.
"असचं... सहज आठवलं म्हणून.. " मी दुसरा मेसेज पाठवला.
"कुठे आहेस...मिस यु हनी... येतोयस ना..."
"थोड्या वेळात पोहचेन...." मी मेसेजला उत्तर दिलं.
"गुड...लव्ह यु...."
"लव्ह यु टू...." मी इराच्या मेसेजला उत्तर पाठवलं.

काथ्याकूट: नित्याचं ब्रेकअप

................................

- चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मज्जा आली....
शेवट असा नसता तरीही कथा आवडलीच असती.
संवाद फार छान जमलेत.

चार डबे बासुंदी भेट दिली<<<< Lol

आधी फक्त रहस्यकथा होत्या, त्या छान होत्या, पण आता रहस्या बरोबर निखळ विनोद जोडला आहे, त्यामुळे कथा मस्त खुशखुशीत होतं आहेत, पुन्हा पुन्हा वाचावी अशी कथा आहे...

तुमचा बेस्ट टेस्ट फ्रेंडने सगळं खरं आपल्याला सांगावं, पण कधी कधी असं होतं नाही, त्या माणसाला सांगता येत नाही, तुमच्यावर तेवढा विश्वास नसतो, तुम्ही लेक्चर द्याल, असं वाटतं, बरीच कारणं असतात, पण नंतर कळालं की, आपण जास्त काही विचारू नये, कारण कालांतराने, गोष्टी बाहेर येतात, सगळयांना कळतात...>>> अगदीच भा.पो बघ.
एकदम पटल Wink Proud Happy

भारी आहे !! Lol
मधलं मधलं सगळं वर्णन पण मस्त आहे ! Happy

चैतन्य,
आता नाम शबाना सारखे, ही मूळ कथेतील पात्रांच्या , स्वतन्त्र तरीही रिलेटेड स्टोरीज , जसे नित्याचा ब्रेकअप लिहिता येतील का बघ,
मागे "गृप" कथे बरोबर तसा प्रयोग झालेला

@सिम्बा
छान कल्पना आहे, नित्याच्या ब्रेकअप वर लिहण्याचा प्रयत्न नक्की करेन Happy

Gargi1402, विवेक. टकमक टोक, स्वस्ति, maitreyee, हिमु, Manaskanya, पराग, सिंडरेला, अदिति, बस्के, पलक,

धन्यवाद...तुम्हा सगळयांना कथा आवडली हे बघून खूप छान वाटलं Happy Happy Happy

शेवट असा नसता तरीही कथा आवडलीच असती>> +१
काही पॅरा तर अगदी अगदी >> +१
मस्तं सुटसुटीत, साधं, सोपं, सहज वाटलं सगळं. आवडली कथा. आता तुमच्या बाकीच्या पण कथा वाचून काढते.

भारीये...छान..आवडली
गूढ कथा लिहणारा माणूस...एकदम विनोदी झालाय Lol

मस्त लिहिली आहे.
टोटल स्मूथ वर्णन आहे. आवडलीच. शेवटचा ट्विस्ट नसता तरी काही फरक पडला नसता. रादर तुम्ही केलेलं ग्रुप आणि एकेक व्यक्तीचं आणि त्यांच्या एकमेकांशी वागण्याचं वर्णन यातच फार मजा आली.

सोनू. rmd, ऋतु_निक, निस्तुला, नंद्या, अमितव
तुम्हा सगळयांना कथा आवडली, हे बघून फार छान वाटलं, या प्रतिक्रियांमुळे जास्तीत जास्त लेखन करण्याचं बळ मिळतं Happy

@कल्पना१
तुमचं बरोबर आहे Lol
गूढ अन विनोदी दोन्ही लिहिण्याचा प्रयत्न सुरु ठेवेन...

मजेशीर आहे...
केतकी वरची कविता...तुझ्या घराबाहेरचा पाऊस..तुझी भिजायची हौस<<<<<
पूर्ण कविता वाचायला आवडेल Happy

मस्त जमलीय..
कोट्या फार छान झाल्यात..
ट्विस्ट तर तुमच्या सगळ्याच कथेत असतो.... Happy

Pages