बदामाचे पेढे (बदाम कतलीचे व्हेरिएशन)

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 August, 2017 - 21:17
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप बदाम
१ कप साखर (भारतात करत असाल तर पाऊण कपही पुरावी - इथली पुळण तुलनेत थोडीशी अगोड असते)
अर्धा कप दूध
केशर
चमचाभर तूप
बाकी सजावटीसाठी आवडीनुसार सुकामेवा / केशरकाड्या इ.

क्रमवार पाककृती: 

मी बदाम कोमट पाण्यात रात्रभर भिजत ठेवले होते, इथल्या गार हवेत खराब होत नाहीत.
जर उष्ण हवामानात करत असाल तर अगदी कडकडीत पाण्यात तासभर भिजवून घ्या.
दूध गरम करून त्यात केशर खलून घ्या.
चांगले भिजले की बदाम काहीसे फुगून मऊ होतात आणि सालंही सहज निघून येतात.
मग सोललेले बदाम, साखर आणि दूध एकत्र करून ब्लेन्डरमधून छान बारीक वाटून घ्या. वाटताना लागल्यास चमचा-दोन चमचे दूध आणखी घालू शकता.
जाड बुडाच्या कढईत मंद ते मध्यम आचेवर अगदी चमचाभरच तूप घालून त्यावर बदामाचं मिश्रण घाला.
सतत ढवळत रहा.
आपण दूध फार घातलेलंच नसल्यामुळे मिश्रण आळायला लगेच सुरुवात होते.
मिश्रणाचा गोळा व्हायला लागला आणि कडा कोरड्या व्हायला लागल्या की विस्तवावरून उतरवा आणि हाताला झेपेल इतपत गार होऊ द्या.
पेढ्यांऐवजी वड्या/कतली करायची असेल तर विस्तवावरून उतरवल्यावर तुपाचा हात लावलेल्या ताटली किंवा ट्रेमध्ये थापा आणि थंड झाल्यावर वड्या पाडा.
पेढ्यांसाठी थोडं गार झालं की मिश्रण चांगलं घोटून घ्या. मग हाताला पुसट तूप लावून घेऊन पेढे वळा.
पेढे वळताना वरून सुकामेवा/केशरकाड्या वगैरे लावा.

badam_pedha.jpg

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात वर दिसताहेत तसे १६ मध्यम आकाराचे पेढे झाले.
अधिक टिपा: 

साखर चवीनुसार कमीजास्त करू शकता.
कुठल्याही वड्या करताना सुरुवातीला थोडी कमीच साखर घालावी आणि मिश्रण विस्तवावून उतरवल्यावरही किंचित ओलसर वाटलं तर पिठीसाखर मिसळून घोटावं, म्हणजे छान वड्या पडतात.
बदाम भिजवण्याचा वेळ ३० मिनिटांत अर्थातच धरलेला नाही. Happy

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages