बदामाचे पेढे (बदाम कतलीचे व्हेरिएशन)

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 August, 2017 - 21:17
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप बदाम
१ कप साखर (भारतात करत असाल तर पाऊण कपही पुरावी - इथली पुळण तुलनेत थोडीशी अगोड असते)
अर्धा कप दूध
केशर
चमचाभर तूप
बाकी सजावटीसाठी आवडीनुसार सुकामेवा / केशरकाड्या इ.

क्रमवार पाककृती: 

मी बदाम कोमट पाण्यात रात्रभर भिजत ठेवले होते, इथल्या गार हवेत खराब होत नाहीत.
जर उष्ण हवामानात करत असाल तर अगदी कडकडीत पाण्यात तासभर भिजवून घ्या.
दूध गरम करून त्यात केशर खलून घ्या.
चांगले भिजले की बदाम काहीसे फुगून मऊ होतात आणि सालंही सहज निघून येतात.
मग सोललेले बदाम, साखर आणि दूध एकत्र करून ब्लेन्डरमधून छान बारीक वाटून घ्या. वाटताना लागल्यास चमचा-दोन चमचे दूध आणखी घालू शकता.
जाड बुडाच्या कढईत मंद ते मध्यम आचेवर अगदी चमचाभरच तूप घालून त्यावर बदामाचं मिश्रण घाला.
सतत ढवळत रहा.
आपण दूध फार घातलेलंच नसल्यामुळे मिश्रण आळायला लगेच सुरुवात होते.
मिश्रणाचा गोळा व्हायला लागला आणि कडा कोरड्या व्हायला लागल्या की विस्तवावरून उतरवा आणि हाताला झेपेल इतपत गार होऊ द्या.
पेढ्यांऐवजी वड्या/कतली करायची असेल तर विस्तवावरून उतरवल्यावर तुपाचा हात लावलेल्या ताटली किंवा ट्रेमध्ये थापा आणि थंड झाल्यावर वड्या पाडा.
पेढ्यांसाठी थोडं गार झालं की मिश्रण चांगलं घोटून घ्या. मग हाताला पुसट तूप लावून घेऊन पेढे वळा.
पेढे वळताना वरून सुकामेवा/केशरकाड्या वगैरे लावा.

badam_pedha.jpg

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात वर दिसताहेत तसे १६ मध्यम आकाराचे पेढे झाले.
अधिक टिपा: 

साखर चवीनुसार कमीजास्त करू शकता.
कुठल्याही वड्या करताना सुरुवातीला थोडी कमीच साखर घालावी आणि मिश्रण विस्तवावून उतरवल्यावरही किंचित ओलसर वाटलं तर पिठीसाखर मिसळून घोटावं, म्हणजे छान वड्या पडतात.
बदाम भिजवण्याचा वेळ ३० मिनिटांत अर्थातच धरलेला नाही. Happy

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी. मंजुताई एकदम भारी दिसताहेत. अशा आकाराचा साचा आहे का ? त्याचा पण फोटो टाकाल का प्लीज ?

स्वाती रेसिपी मस्त आहे आणि पेढे पण अप्रतिम दिसत आहेत. मंजूताई तुमचे पण!!
मी म.ब. फेल असल्याने याच्या वाटेला जाउ का नको?

मी पण उरका पडला काल. मी पेढे वळायच्या ऐवजी वड्या पाडल्या. रंग मंजूताईंच्या मुदींसाअरखा आहे. चव अजून घेतली नाही. आज संध्याकाळी आरती ला नेवैद्य दाखवीन तेव्हा चाखीन.
मी आमंड मील वापरलं, दूध कमी वापरायला हवं होतं कारण ते इथे लिहिल्याप्रमाणे लगेच आळायला लागलं नाही. साखर विरघळून अजूनच पातळ झालं प्रथम मग माझा नेहेमीप्रमाणे धीर सुटला. ज्या गोष्टींत अशी साखर विरघळते तेव्हा घोटणं कधी थांबवायचं याबद्दल माझा नेहेमीच गोंधळ उडतो.

पेढे छान दिसताहेत. रेस्पी सोपी वाटतेय. करुन बघेन.

साखर विरघळून अजूनच पातळ झालं प्रथम मग माझा नेहेमीप्रमाणे धीर सुटला. ज्या गोष्टींत अशी साखर विरघळते तेव्हा घोटणं कधी थांबवायचं याबद्दल माझा नेहेमीच गोंधळ उडतो.>>>>>>शुम्पी, पुढे काय केलंत तेही सांगा. कदाचित उपयोगी पडेल मला Happy

सस्मित, घाबरू नका. लिहिलेला वेळ ३० मिनट ह्यावर डोळा ठेउन त्याप्रमाणे गॅस बंद केला तोवर पातळ साखर बहुतेक परत गोळा होइन हाताला जरा जड लागायला लागलं. मग गॅस बंद करून पण ढवळत बसले. वड्या अतिषय मउ , तलम आणि अमेझिंग चवीच्या झाल्यात. मी ७-८ खाल्ल्यावर घरच्यांना नम्र विनंती केली की प्लीज ह्या माझ्यापासून कुठेतरी लपवा Happy

मस्त झाले पेढे. एकदम सोपे आहेत. ग्राईंडर मधून एकदम बारीक नाही झालत, त्यामुळे एकदम तलम नाही वाटतेत. पण खाताना रवाळ चव भारी लागत्येय. वर शुम्पीने वापरली तशी बदमाची पावडर वापरुन केले पाहिजेत.
अमेरिकन साखर पाउण कपच घातली आणि पुरेसे गोड वाटले. करता करता बदाम पोटात गेल्याने कमी साखर पुरली असं ही असू शकतं. Proud

मी अजून केले नाहीयेत पण याच्यात खवा घालता येईल का? जर हो तर कधी व किती? माझ्याकडे नानकचा थोडा खवा उरलाय म्हणून विचारत आहे.

आज लक्ष्मी पूजनाला हे पेढे केले . बदाम मिल वापरले, बदाम भिजत घालून वाटण शक्य नव्हतं म्हणून . खूप सुंदर झाले . एरवी गोड न आवडणाऱ्याना ही आवडीने खाल्ले . आज नेहमीचे पेढे मिळणं इथे लंडन मध्ये शक्य नव्हतं पण ह्या पेढयांमुळे लक्ष्मीपूजन साग्र संगीत साजरं झालं.

स्वाती थँक यु सो मच.

IMG_20171019_201351.jpg

Pages