बदामाचे पेढे (बदाम कतलीचे व्हेरिएशन)

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 August, 2017 - 21:17
badamache pedhe
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप बदाम
१ कप साखर (भारतात करत असाल तर पाऊण कपही पुरावी - इथली पुळण तुलनेत थोडीशी अगोड असते)
अर्धा कप दूध
केशर
चमचाभर तूप
बाकी सजावटीसाठी आवडीनुसार सुकामेवा / केशरकाड्या इ.

क्रमवार पाककृती: 

मी बदाम कोमट पाण्यात रात्रभर भिजत ठेवले होते, इथल्या गार हवेत खराब होत नाहीत.
जर उष्ण हवामानात करत असाल तर अगदी कडकडीत पाण्यात तासभर भिजवून घ्या.
दूध गरम करून त्यात केशर खलून घ्या.
चांगले भिजले की बदाम काहीसे फुगून मऊ होतात आणि सालंही सहज निघून येतात.
मग सोललेले बदाम, साखर आणि दूध एकत्र करून ब्लेन्डरमधून छान बारीक वाटून घ्या. वाटताना लागल्यास चमचा-दोन चमचे दूध आणखी घालू शकता.
जाड बुडाच्या कढईत मंद ते मध्यम आचेवर अगदी चमचाभरच तूप घालून त्यावर बदामाचं मिश्रण घाला.
सतत ढवळत रहा.
आपण दूध फार घातलेलंच नसल्यामुळे मिश्रण आळायला लगेच सुरुवात होते.
मिश्रणाचा गोळा व्हायला लागला आणि कडा कोरड्या व्हायला लागल्या की विस्तवावरून उतरवा आणि हाताला झेपेल इतपत गार होऊ द्या.
पेढ्यांऐवजी वड्या/कतली करायची असेल तर विस्तवावरून उतरवल्यावर तुपाचा हात लावलेल्या ताटली किंवा ट्रेमध्ये थापा आणि थंड झाल्यावर वड्या पाडा.
पेढ्यांसाठी थोडं गार झालं की मिश्रण चांगलं घोटून घ्या. मग हाताला पुसट तूप लावून घेऊन पेढे वळा.
पेढे वळताना वरून सुकामेवा/केशरकाड्या वगैरे लावा.

badam_pedha.jpg

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात वर दिसताहेत तसे १६ मध्यम आकाराचे पेढे झाले.
अधिक टिपा: 

साखर चवीनुसार कमीजास्त करू शकता.
कुठल्याही वड्या करताना सुरुवातीला थोडी कमीच साखर घालावी आणि मिश्रण विस्तवावून उतरवल्यावरही किंचित ओलसर वाटलं तर पिठीसाखर मिसळून घोटावं, म्हणजे छान वड्या पडतात.
बदाम भिजवण्याचा वेळ ३० मिनिटांत अर्थातच धरलेला नाही. Happy

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल ह्या पद्धतीने बदाम कतली केली. मी कॉस्कोतलं बदामाचं पीठ वापरलं. इथे दिलेल्या प्रमाणानुसार दुध घालून थोडावेळ भिजवून ठेवलं होतं. साखर पाऊण कपच घातली, अजून कमी पण चालली असती. कृती एकदम तंतोतंत पाळून, योग्यवेळी गॅस बंद केला. एकदम मउसूत, सुबक, चविष्ट वगैरे वड्या झाल्या. रेस्पी करता धन्यवाद स्वाती. Happy

अंदाजे किती दिवस टिकतात हे पेढे.. म्हण्जे उद्या कार्यक्रम असेल तर आज केले तर चालतिल का? गणपतीच्या वेळी करायचा विचार आहे,, मोदकाच्या छोट्या पात्रात..आधी एकदा ट्राय करुन बघेनच

पद्धतीने बदाम कतली केली. मी कॉस्कोतलं बदामाचं पीठ वापरलं. इथे दिलेल्या प्रमाणानुसार दुध घालून थोडावेळ भिजवून ठेवलं होतं. >>>>> अगदी हेच विचारणार होते. धन्यवाद!

शुगोल, मी दीड वाटी बदाम मिल ला एक वाटी साखर घेतली . अर्धी वाटी दुधात बदाम मिल पंधरा वीस मिनिट भिजत ठेवलं. नंतर साखर मिसळून गॅस वर ठेवून ढवळत राहिले . पट्कन आळलं मिश्रण . कालथा उभा राहतो ही माझी खूण आहे मिश्रण झाल्याची. खाली उतरवल्यावर वेलची पावडर, थोडं केशर घातलं आणि साधारण गार झाल्यावर वळले. मस्तच झाले होते. मऊसर आणि तरी ही खुटखुटीत. मी लागोपाठ दोन वेळा केले . लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज दोन्ही दिवशी केले. दीड वाटीचे मोठे मोठे बारा तेरा झाले.

दीड वाटी मिल ला एक वाटी साखर ठिक्क होते.

काल मुहुर्त सापडला आणि बदाम कतली पार पडली. खूप छान झाली आहे. मी कॉस्ट्कोत मिळणारं अलमंड फ्लोर वापरलं. साखर जवळपास तेवढीच घेतली. (एक दोन मूठी कमी एवढंच!)
स्वाती खूप धन्यवाद!
ममो , तात्काळ प्रतिसाद आणि उपयुक्त टीपांबद्दल खूप धन्यवाद!

कॉस्ट्कोत मिळणारं अलमंड फ्लोर >> असं मिळतं रेडिमेड!! बघायला पाहिजे मग!
कशाला वापरत असतील इतर लोक ते? असा प्रश्न पडला. केक ?

>> कशाला वापरत असतील इतर लोक ते? असा प्रश्न पडला. केक ?
बाकीच्या गोष्टींचं माहित नाही पण फ्रेन्च मॅकारोन्स असतात त्याकरता वापरतात.
https://www.joyofbaking.com/frenchmacarons/MacaronsRecipe.html

मी पण केले होते हे पेढे ह्या गणपतीत.. चव छान आली होती पण बहुतेक अजून थोड्या वेळ आटवायला पाहिजे होते.
दिवाळीत परत करणार Happy

ही रेसिपी आमच्याकडे फार आवडली आहे, बदाम साखर , नावाला दुध आणी म्हणायला थोड तुप अशा इन मिन साडे तिन साहित्यात उत्तम पदार्थ होतो ( बदाम वड्या मी याआधी केल्यात पण त्यात खवा वैगरे घालुन वेगळ व्हेरिएशन होत ) तर दोनदा या वड्या केल्या आणी दुसर्‍यान्दा करताना दुध जास्त झाल्याने मिश्रण बरच पातळ झाल होत मधेच सगळ ढवळत बसायचा कन्टाळा यायला लागला मग सगळ मायक्रोव्हेव च्या भान्ड्यात घालुन मायकोर्व्हेव्हलाच केल्या आणी पटकन विनासायास वड्या झाल्या
तेव्हा काल तिसरी बॅच करण्यात आलेली आहे, माय्कोर्व्हेव्ह ला २ -२ मिनिट अस करत १६-१८ मिनिटात वडि होते (पॅनमधे केल तरी तेवढाच वेळ लागतो ) प्र्त्येक २ मिनिटानी चमच्याने हलवुन मात्र घ्यायच .
(माझ मिश्रण खिरीच्या कन्टिटन्सि च होत सुरवातिला तुमचा ब्लेन्डर पॉवरफुल आणी मिश्रण घट्ट असेल तर वेळ कमी लागेल कदाचित)

दोन वेळा करून पाहिलं. दोन्हीवेळा मिक्स्चर पुर्णपणे आळलं नाही . खुप मऊ राहिल. मग सरळ मोठा गोळा करून (बदाम पावडर मध्ये वर खाली केला) कणीकेत भरून पोळ्या लाटल्या. फुटल्या पण ठिक लागल्या.
पाणी/दुध हार्डली घातलेलं . साखर घातल्यावर पातळ झाल. नंतर खुप वेळ गॅस वर ठेवूनही पातळ राहिलं. एकदा बदाम गरम पाण्यातून काढून साल काढून केले आणि एकदा तयार बदाम पावडर घेतली. हलव्यासारखी कंन्सिस्टंसी आली. पेढे झाले नाहीत.
शुगोल कॉस्टको बदाम पावडर वापरून , किती वेळ लागला? I must be doing something wrong. काजु कतली जमते मला चांगली पण ती पाकातली असते. हे त्यापेक्षा इझी असून का जमत नाहीये.

प्राजक्ता , तु मायक्रोवेव्ह मध्ये सुरुवातीपासूनच ठेवलेलस का ?

प्राजक्ता , तु मायक्रोवेव्ह मध्ये सुरुवातीपासूनच ठेवलेलस का ?>> हो! म्हणजे पहिल्या वेळेस पुर्ण पॅन मधेच केल्या तेव्हा जरा मउसरच राहिल्या मग द्सर्‍या वेळेस गोळा जमायला लागला तेव्हा मायक्रोव्हेव केल

कडासुद्धा कोरड्या व्हायला लागल्या नाहीत?
हलव्याइतकं पातळ म्हणजे बहुधा साखर जास्त होते आहे. साखर आता घालते आहेस त्याच्या निम्म्याने घालून बघ - अधिक टिपांमध्ये लिहिलंय त्यानुसार नंतर लागेल तशी घाल.

(नाहीतर काजूकतलीचीच जमणारी रेसिपी यालाही वापरण्याचा ऑप्शन आहेच. Happy )

मी आज हे करून बघितले . सोपं प्रकरण आहे
वर दिलेल्या प्रमाणात माझे 15 पेढे झाले. जरा मऊसर राहिलेत फक्त..
किती दिवस टिकतात हे ?
IMG_20190902_170128-01~2.jpeg

जाई छानच झालेत ग .

मी अगणित वेळा केले आणि प्रत्येक वेळी उत्तमच जमले. हे लेटेस्ट केलेले आठ दहा दिवसांपूर्वी.

IMG_20190810_110102919_0.jpg

थँक्स ममो .

तुमचे पेढे एकदम सुबक झालेत . मला तसे जमायला खूप प्रॅक्टिस लागेल .

एक प्रश्न आहे . हे पेढे थोडे मऊसर राहतात का ?

नाही चांगले खुंटखुटीत होतात. TExture अगदी normal पेढ्यासारखं येत बदामात असलेल्या ऑइल मुळे. नेक्स्ट टाईम अजून थोडावेळ गॅसवर ठेव मिश्रण. कोरडं झालं तर दुधाचा हात लावून मळून पेढे वळ.

अग मी त्यात आंब्याचा रस घातलाय म्हणून रंग केशरी दिसतोय एवढंच . तुझे पण सुपरचं झालेत.

अग मी त्यात आंब्याचा रस घातलाय म्हणून रंग केशरी दिसतोय एवढंच . तुझे पण सुपरचं झालेत.>>>>
ममोताई, कुठला पल्प वापरला? टिनमधला चालेल का? मी हे उद्या करीन. स्वाती, थँक यु फॉर धिस रेसिपी.

Pages