बदामाचे पेढे (बदाम कतलीचे व्हेरिएशन)

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 August, 2017 - 21:17
badamache pedhe
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप बदाम
१ कप साखर (भारतात करत असाल तर पाऊण कपही पुरावी - इथली पुळण तुलनेत थोडीशी अगोड असते)
अर्धा कप दूध
केशर
चमचाभर तूप
बाकी सजावटीसाठी आवडीनुसार सुकामेवा / केशरकाड्या इ.

क्रमवार पाककृती: 

मी बदाम कोमट पाण्यात रात्रभर भिजत ठेवले होते, इथल्या गार हवेत खराब होत नाहीत.
जर उष्ण हवामानात करत असाल तर अगदी कडकडीत पाण्यात तासभर भिजवून घ्या.
दूध गरम करून त्यात केशर खलून घ्या.
चांगले भिजले की बदाम काहीसे फुगून मऊ होतात आणि सालंही सहज निघून येतात.
मग सोललेले बदाम, साखर आणि दूध एकत्र करून ब्लेन्डरमधून छान बारीक वाटून घ्या. वाटताना लागल्यास चमचा-दोन चमचे दूध आणखी घालू शकता.
जाड बुडाच्या कढईत मंद ते मध्यम आचेवर अगदी चमचाभरच तूप घालून त्यावर बदामाचं मिश्रण घाला.
सतत ढवळत रहा.
आपण दूध फार घातलेलंच नसल्यामुळे मिश्रण आळायला लगेच सुरुवात होते.
मिश्रणाचा गोळा व्हायला लागला आणि कडा कोरड्या व्हायला लागल्या की विस्तवावरून उतरवा आणि हाताला झेपेल इतपत गार होऊ द्या.
पेढ्यांऐवजी वड्या/कतली करायची असेल तर विस्तवावरून उतरवल्यावर तुपाचा हात लावलेल्या ताटली किंवा ट्रेमध्ये थापा आणि थंड झाल्यावर वड्या पाडा.
पेढ्यांसाठी थोडं गार झालं की मिश्रण चांगलं घोटून घ्या. मग हाताला पुसट तूप लावून घेऊन पेढे वळा.
पेढे वळताना वरून सुकामेवा/केशरकाड्या वगैरे लावा.

badam_pedha.jpg

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात वर दिसताहेत तसे १६ मध्यम आकाराचे पेढे झाले.
अधिक टिपा: 

साखर चवीनुसार कमीजास्त करू शकता.
कुठल्याही वड्या करताना सुरुवातीला थोडी कमीच साखर घालावी आणि मिश्रण विस्तवावून उतरवल्यावरही किंचित ओलसर वाटलं तर पिठीसाखर मिसळून घोटावं, म्हणजे छान वड्या पडतात.
बदाम भिजवण्याचा वेळ ३० मिनिटांत अर्थातच धरलेला नाही. Happy

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज या रेसिपीने केले पेढे. खूप सुंदर झाले आहेत. फोटो देता येत नाही त्यासाठी सॉरी.

मागे एकदा केले होते पण एकदम वाटीभsssर बदामाची खग्रास करायचा धीर होईना म्हणून थोडे काजू आणि शेवटचे उरलेले दोन सुके अंजीर ढकलून दिले होते. तेही चांगले झाले होते. पण आजचे नुसत्या बदामाचे जास्त आवडले.

मला साखर मात्र अर्धी वाटी पुरली. अगदी पुरेसे गोड झाले.

आज लक्ष्मी पूजनासाठी केले. खरं तर आज पेढे विकत आणता येतील तरी ही हे घरी केले. कारण नेहमीच्या पेढ्या पेक्षा हे जास्त आवडतात. बदाम पीठ विकत आणल्याने झटपट विना त्रास झाले.

20211103_155449.jpg

काल मी पण केले... थोडासा खवा होता घरात म्हणुन तो पण घातला. कॉस्टकोचं आल्मंड फ्लार वापरलं १ कप. एवढे झाले. वरती एवरेस्ट दुधाचा मसाला पेरलाय Happy बाकी बदाम काप वगैरे नव्हते सजवायला म्हणून Happy मस्त झाले चवीला. काल थोडे चिकट लागत होते मे बी अगदी ताजे असतील त्यामुळे असेल. आज परत टेस्ट करेन. Happy १०० वा प्रतिसाद Happy

किती एडिटलं Lol

pedhe.jpg

कातील पेढे. ( बातमी येऊ शकेल. पेढे बघून, जीव गेला. कारण नुसतेच बघितले खायला नाही मिळाले)
सही झालेत. ममोंचे तर लाजवाबच असतात. अंजली_१२ तोडीस तोड पेढे
अरे, मी ओरिजनल रेसिपी चं कौतुक केलंच नाही ह्या नादात. स्वाती खुपच सुरेख पेढे आणि रेसिपी.

सगळ्यांना थॅंक्यु.
स्वाती ला स्पेशल थॅंक्यु ह्या कमाल रेसिपी साठी.

थँक्यू धनुडी & वैदेही..
दुसर्‍या दिवशी न व्हते चिकट लागत. फ्रीजमधे ठेवले होते.

आज याचीच एक आणखी झटपट आवृती करून पाहिली.
२ कप बदाम पिठाला १ (१४ औंसांचा) कॅन स्वीटन्ड कन्डेन्स्ड मिल्क आणि दोन चमचे तूप. बाकी वेलची/केशर इ. आवडीनुसार.
पद्धत तीच - तुपावर हे मिश्रण परतायचं. कडा कोरड्या होत मिश्रण गोळा व्हायला लागलं की वड्या थापायच्या.
अगदी पाचेक मिनिटांत थापायला होतात!

2467D8ED-7C1B-436D-9DBA-463F6CF61E47.jpeg

काय सुरेख दिसतायत!!
मी दरवर्षी गणपतीच्या आरतीच्या वेळी प्रसाद म्हणून या रेसिपीने एकदा बदाम पेढे, (बहुतेक डॅफोडिल्स च्या रेसिपीने) काजू कतली करतेच.

बदामाचे पेढे ("बदाम कतलीचे व्हेरिएशन")..
हे मी वर्षानुवर्ष "बदामाचे कातील व्हेरिएशन" असे वाचतेय...
या गणपतीत नक्कीच करेन.. ( हे पण मी वर्षानुवर्ष ठरवतेय. )

मी वर्षानुवर्ष "बदामाचे कातील व्हेरिएशन" असे वाचतेय...>>> मी पण, Proud आणि म्हणूनच म्हणते कातील फोटो आलेत
त्या वड्या कसल्या नितळ दिसताएत . पेढे पण छान सगळ्यांचे

मस्त दिसतात पेढे.
:डोळ्यात बदाम बदाम: ही माबोफ्रेज यावरूनच आली असावी.
चितळेंच्या बाजूला दुकान घेतलेय का? Lol

जुई.के., मी २ कप बदाम पिठाला १ (१४ औंसांचा) कॅन स्वीटन्ड कन्डेन्स्ड मिल्क आणि दोन चमचे तूप हे प्रमाण वापरून केले होते.
१४ औंस म्हणजे साधारण ४०० ग्रॅम्स. म्हणजे तुम्हाला याच्या एक चतुर्थांश (अर्धा कप बदाम पीठ) लागेल बहुधा - आणि अगदी थोड्या ७-८च वड्या होतील.

धन्यवाद, आचार्य. Happy
चितळ्यांच्या कुठल्याही बाजूला काहीही घ्यायची माझी प्राज्ञा नाही. Proud

मुख्य चित्र म्हणून मी केलेले पेढे बघून मस्त वाटलं. त्यात थोडा आंब्याचा रस घातल्या मुळे रंग केशरी आला होता.
Admin / वेबमास्तर थॅंक्यु सो मच.

>> मुख्य चित्र म्हणून मी केलेले पेढे बघून मस्त वाटलं.>> हो, पण मला काही प्रयोजनच कळलं नाही कारण स्वातीने केलेल्या पेढ्यांचा फोटो नसता तर बाकी लावून चालला असता.
सगळ्यांचेच फोटो मस्त आहेत. हा एक पदार्थ काही मला जमला नव्हता.

Pages