सोने : चकाकती प्रतिष्ठा

Submitted by हेमंतकुमार on 26 July, 2017 - 04:39

सराफांच्या दुकानांमध्ये सोनेखरेदीसाठी झालेली झुंबड जर आपण पाहिली, तर क्षणभर ‘भारत हा गरीब आणि विकसनशील देश आहे’ या विधानावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सोन्याचे वेड हे प्राचीन असून समाजातील सर्व स्तरांमध्ये कमीअधिक प्रमाणात आढळतेच. अर्थातच हे वेड स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. अलंकार परिधान केल्याने स्त्री- सौंदर्याला उठाव येतो हे खरे; पण ते अलंकार महागड्या सोन्याचेच हवेत या अट्टाहासातून अखिल स्त्रीजातीची दोन वर्गांमध्ये सरळसरळ विभागणी झालेली दिसते. ती म्हणजे – सोने अंगावर घालणाऱ्या आणि घालू न शकणाऱ्या स्त्रिया.

सोने घालणाऱ्या स्त्रियांचा हव्यास हा कायम वाढताच राहतो, तर ते परवडू न शकणाऱ्या स्त्रियांच्या मनातील खंतही वाढतच राहते. अलीकडे झटपट श्रीमंत झालेल्या पुरूषांमध्येही सोने परिधान करण्याचे आकर्षण वाढीस लागले आहे. काही वर्षांपूर्वी अंगावर किलोभर सोने घालून त्याचे प्रदर्शन करणारे एक पुरुष लोकप्रतिनिधी पुणेकरांनी अगदी जवळून पाहिले होते.
माणसाच्या सोनेखरेदीमागे हौस आणि आर्थिक गुंतवणूक ही दोन कारणे अगदी उघड आहेत. आता या दोन मुद्द्यांचा स्वतंत्रपणे विचार करूयात.

आधी बघूया हौसेचा भाग. अंगावर भरपूर प्रमाणात सोने घातल्याने श्रीमंतीचे प्रदर्शन सहजगत्या होते. पण, त्याचबरोबर आपण चोर व लुटारुंच्या नजराही पटकन आकर्षित करतो. गळ्यातील सोनसाखळ्या ओढून पळवण्याचे प्रकार दिवसाढवळ्या सर्रास होतात आणि मोठ्या लूटमारीच्या प्रसंगात तर आपण सोन्यात गुंतवलेले आपले सर्वस्व गमावून बसतो. समाजातील आर्थिक विषमतेची दरी जोवर रुंदावतेच आहे तोवर चोरी-दरोड्याचे प्रमाणही वाढतेच राहणार, हे निःसंशय. अशा परिस्थितीत सोन्याच्या वेडाला आवर घालण्याऐवजी आपण सोन्याच्या विळख्यात आपल्याला गुंतवून का घेतो, हे एक न समजणारे कोडे आहे. निदान लांबच्या प्रवासांमध्ये तरी आपण अंगावर सोने न घातल्यास आपणच आपली सुरक्षितता वाढवतो हे समजायला हवे. ज्येष्ठ नागरिकांनी तर सोने परिधान करण्यापासून चार हात लांबच राहिलेले बरे.

सोने हा प्रतिष्ठेचा निकष फक्त माणसांमध्येच नाही तर तो माणसांनी निर्माण केलेल्या “देवां”मध्येही आहे! काही मोठ्या देवस्थानांमधील ‘देवां’ना सोन्याने मढविण्यात आले आहे आणि त्या सोन्याच्या वजनाच्या आणि किमतीच्या बढाया मारणारे भक्त(?)ही दिसून येतात. अशा प्रकारे आपण तथाकथित ‘देवां’नाही सोन्याच्या भोगवादी कोषात अडकवून त्यांच्यातले देवत्वच काढून घेतले नाही का?

आता बघूयात सोने आणि गुंतवणूक या मुद्द्याकडे. मुळात माणसाने सोने जवळ बाळगणे का सुरू केले असेल? सोने हा दुर्मिळ धातू असल्याने तो मोल्यवान ठरवण्यात आला. कौटुंबिक आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीत जवळ बाळगलेले सोने हा महत्वाचा आधार ठरतो. त्यामुळे आपली गुंतवणूक ही काही प्रमाणात तरी सोन्यात असावी, हे मान्य. मात्र या गुंतवणुकीचा अतिरेक हा आपण स्वतः आणि आपला देश अशा दोघांनाही फायदेशीर नसतो.
सोने उत्पादनाबाबत आपण स्वयंपूर्ण नसल्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात ते परदेशातून आयात करावे लागते. त्यासाठी आपल्याकडील बहुमूल्य परकीय चलन हे हौसेच्या कारणासाठी खर्ची पडते. मध्यंतरी एका अर्थतज्ञाचा लेख वाचनात आला होता. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले होते की आपण जर स्वतःला सच्चे देशभक्त समजत असू तर आपण सोने खरेदीचा हव्यास कटाक्षाने टाळला पाहिजे.

अलीकडे तर काही तज्ञ हे प्रत्यक्ष सोने खरेदीपेक्षा Gold bonds मध्ये पैसे गुंतवण्याचे आवाहन करत असतात. अशा गुंतवणूकीमुळे आपण सोनेचोरीपासून तर नक्कीच सुरक्षित असतो. तसेच ही गुंतवणूक ही प्रत्यक्ष सोन्याच्या अनुत्पादक गुंतवणुकीपेक्षा देशासाठी श्रेष्ठ ठरते. सर्व सुशिक्षितांनी विचार करण्यासारखा हा मुद्दा आहे. सोन्याला असलेले आंतरराष्ट्रीय महत्व बघता आपल्या देशाकडे सोन्याचा साठा असला पाहिजे. पण, निव्वळ हौसेखातर होणारी व्यक्तिगत सोने खरेदी आणि त्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन किती करायचे याचा विचार प्रत्येक सुजाण नागरिकाने केला पाहिजे.

( टीप : सदर लेखातील सोने आणि गुंतवणूक यासंबंधीची विधाने माझ्या सामान्यज्ञान व वाचनावर आधारित आहेत. त्यावर तज्ञांनी भाष्य केल्यास आनंद होईल).
*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याला परवडतात त्याप्रमाणे सोन्याचे दागिने खरेदी करून घालावेत>>
याबद्दल सहमत वामनराव. आणि घेताना काय करावे याची चांगली माहिती दिलीत.
अर्थात हे ज्यांना दागिने हौस म्हणुन घ्यायचे त्यांच्यासाठी. ज्यांना अशी हौस नाही आणि गुंतवणूक करायची आहे त्यांनी गोल्ड बार्स किंवा ऑनलाइन गुंतवणूक (योग्य माहिती काढुन) करावी. दागिने हा गुंतवणूकीचा पर्याय नव्हे.

पण हौस म्हणुन घेतात त्यांनी हौस आणि एक प्रकारची पुढच्या पिढीच्या हौशींसाठी गुंतवणूक म्हणायला हरकत नाही असे वाटते. तो कुणाला जनरल गुंतवणूकीसाठी सल्ला मात्र नसावा.
ज्यांना हौस आहे त्यांनी हौस भागवून घेतली आणि मग अपत्यांच्या लग्नात आता तेवढी हौस नाही म्हणुन थोडे ठेवून बाकीचे (मोडुन, नवीन घडणावळीचे, भर घालण्याचे वरचे पैसे देऊनही) आपल्या अपत्यांना दिले तर ती त्यासाठीची गुंतवणूक म्हणण्यास काही हरकत नाही. इतरत्र पैसे गुंतवले असते अथवा दागिन्यां ऐवजी गोल्ड बार्स घेतले असते तर जास्त रिटर्न्स मिळाले असते हे इथे लागु होत नाही. त्यात त्यांनी स्वतःची हौसही भागवली आहे.

सोने गुंतवणुकीचा पर्याय नाही कशापायी म्हणताय?
आमच्या नातेवाईकांत २-३ जणानी सोने घालून मुला च्या फ्लॅट साठी डाऊन पेमेंट केले.
ईथे सिंगापुरात १ साऊथ माणुस दोन्ही हातात अंगठ्या, ब्रेसलेट घालून असायचा. मागच्या आठवड्यात ते विकून मोकळ्या हातांनी आला. म्हणाला सोने केवढे वाढले..३ हजार ($) ला घेतले होते ते १३ हजारा ला विकलेय..

सोन्या-दागिन्यांच्या बाबतीत अगदीच उदासीन-निर्मोही असल्याने २०१७ सालचा हा लेख + चर्चा आज वाचली !

धागा “तेवता” ठेवण्याचे हेमंतकुमारांचे कसब वादातीत आहे.

या विषयातला तज्ञ नाही, माझ्या हुशारीने केलेल्या investments अनेकदा सपशेल फसल्या आहेत. पण तरी माझी तीन सोनेरी नाणी :

१} हिरेमोतीसोन्याचांदीच्या दागिन्यांची आवड असेल त्यांनी हवे तेव्हां हव्या त्या भावानी ते दागिने विकत घ्यावे, घालावे- मिरवावे. हौसेला मोल नाही, priceless pleasure.

२} Investment म्हणून सोने (in physical form) घ्यायचेच असेल तर ते bars किंवा वाळे / नाणी स्वरूपातले घ्यावे असा सल्ला जाणकार लोक देत असतात. म्हणजे कधी विकायचे झाल्यास घडणावळ / अन्य कारणानी loss of value होत नाही असा त्यांचा मुद्दा. पण गोची अशी की सोन्याचे भाव कितीही वाढले तरी भावनिक कारणांमुळे कुणी सहसा physical gold विकत नाही. जरी “गुंतवणूक” म्हणून सोने घेतले असले तरी. इथे profit booking होत नाही, गुंतवणूक encash होत नाही. म्हणजे परतावा virtual, unrealised.

३} वरील दोन्हीपेक्षा हा मध्यममार्ग जास्त पटतो व तो स्वत: यशस्वीरित्या वापरला आहे.

- कुटुंबाचे धन म्हणून सोने हे “दागिने” रूपातच विकत घ्यावे (त्यासाठी वर वामन राव आणि अन्यजणांनी दिलेले सर्व valuable inputs अमलात आणावे).

- आवड असलेल्या घरातील मेंबरांनी ते यथायोग्य ल्यावे-वापरावे-भोगावे.

- नवीन asset creation साठी (यथा नवीन घर, जमीन, दुकान, गाळा वगैरे विकत घेण्यासाठी down payment) मोठ्या रकमेची गरज भासल्यास सोन्याचे दागिने “न विकता” त्यावर बँकांकडून gold loan घ्यावे. हे कर्ज competitive interest rates ला मिळते; आपल्या दागिन्यांच्या मार्केट रेटच्या ६०-७०% एवढी रक्कम. … पैश्याची गरज भागते, नवीन financial asset तयार होतो, परतफेड झाल्यावर आपले दागिने “जसे होते तसे” परत मिळतात, वाडवडिलांचे दागिने मोडले-विकले हा सल रहात नाही. आपले सोने आणि घेतलेल्या नवीन घराच्या/ दुकानाच्या/ प्लॉटच्या किंमती सहसा चढ्याच रहातात. सोने गहाण ठेवतांना भावना मात्र थोडा काळ बाजूला ठेवाव्या लागतात ( ते तर सोने विकण्याची वेळ आली तरी आहेच)

आता तुम्ही म्हणाल की दागिन्यांऐवजी सोन्याची बिस्किटे-नाणी गहाण ठेवली तर ? तर लक्षपूर्वक ऐका:

भारतात कोणतीही nationalised bank/ बहुतांश गोल्ड लोन कंपन्या gold loan फक्त सोन्याच्या “दागिन्यांवरच” देतात, वाळे-बिस्किट-नाण्यांवर नाही.

विश्वास नाही बसत ना ? माझ्या सांगण्यावर, AI, Google ज्ञानावर न विसंबता प्रत्यक्ष चौकशी करा. हातच्या सोनकंकणालाही आरसा वापरा.

वि.सू. : प्रतिसाददाता वित्तसल्लागार नाही. वापरलाच तर आपापल्या व्यक्तिगत हुशारी-जबाबदारीवर वरचा सोनेरी फॉर्म्यूला वापरावा.

हौसेबद्दल प्रश्नच नाही, आणि कोणी कितपत करावी याबद्दलही आपापल्या आवडीनुसार असणार, आपल्याला परवडत , वाटत असेल तेवढी करावी. त्यात लोन घेऊन परफेड करुन भावनिक गुंतवणूक असलेले दागिने सोडवणे सुद्धा आले, वैयक्तिक बाब आहे तिथे फक्त व्यवहारी दृष्टीकोन चालणार नाही.

पण गुंतवणूक म्हणुन घेतले तर सोन्याचे कॉईन्स, बिस्किटे, बार्स सुद्धा लोक विकण्यास तयार नाही त्याला इलाज नाही. परत आपापल्या भावना.

LIC विविध पॉलिसीज (टर्म इन्शुरन्स सोडुन) - लाईफ पण इन्शुअर्ड रहाते, शेवटी बोनस सकट पैसे पण मिळतात आणि हवे तर मध्ये लोन सुद्धा घेता येते कमी व्याज दरात. तसेच हे सुद्धा. कारण याचे पर्याय, त्यात होणारे फायदे माहीत करून घेण्यास कुणाकडे वेळ नसतो अथवा माहित असले तरी जमत नाही.

हे दागिन्यांची हौस करण्याबद्दल नव्हे तर गुंतवणूकीच्या पर्यायातील (५ -१० % सोने/चांदी) याबद्दल.

सोने चांदी विसरा ! आता तांबे ठरतोय गुंतवणूकदारांचा नवीन पर्याय . . .
(Copper is the next gold)

https://economictimes.indiatimes.com/industry/indl-goods/svs/metals-mini...

https://www.loksatta.com/nashik/copper-emerges-as-a-strong-investment-op...

टीथर या अमेरिकी कंपनीने कित्येक टन सोन्याचा साठा जमवून स्वित्झर्लंडमधील अवाढव्य भूमिगत बंकरमध्ये ठेवला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या बंकरचे स्थान गुपित ठेवलेले आहे या कंपनीने गेल्या तिमाहीत अनेक मध्यवर्ती बँकांपेक्षाही जास्त सोने खरेदी केले असल्याचे म्हटले आहे. सोन्याच्या सातत्याने वाढत असलेल्या किमतींसाठी अशी खरेदी काही प्रमाणात जबाबदार असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

https://timesofindia.indiatimes.com/business/international-business/teth...

Pages