सोने : चकाकती प्रतिष्ठा

Submitted by कुमार१ on 26 July, 2017 - 04:39

सराफांच्या दुकानांमध्ये सोनेखरेदीसाठी झालेली झुंबड जर आपण पाहिली, तर क्षणभर ‘भारत हा गरीब आणि विकसनशील देश आहे’ या विधानावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सोन्याचे वेड हे प्राचीन असून समाजातील सर्व स्तरांमध्ये कमीअधिक प्रमाणात आढळतेच. अर्थातच हे वेड स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. अलंकार परिधान केल्याने स्त्री- सौंदर्याला उठाव येतो हे खरे; पण ते अलंकार महागड्या सोन्याचेच हवेत या अट्टाहासातून अखिल स्त्रीजातीची दोन वर्गांमध्ये सरळसरळ विभागणी झालेली दिसते. ती म्हणजे – सोने अंगावर घालणाऱ्या आणि घालू न शकणाऱ्या स्त्रिया.

सोने घालणाऱ्या स्त्रियांचा हव्यास हा कायम वाढताच राहतो, तर ते परवडू न शकणाऱ्या स्त्रियांच्या मनातील खंतही वाढतच राहते. अलीकडे झटपट श्रीमंत झालेल्या पुरूषांमध्येही सोने परिधान करण्याचे आकर्षण वाढीस लागले आहे. काही वर्षांपूर्वी अंगावर किलोभर सोने घालून त्याचे प्रदर्शन करणारे एक पुरुष लोकप्रतिनिधी पुणेकरांनी अगदी जवळून पाहिले होते.
माणसाच्या सोनेखरेदीमागे हौस आणि आर्थिक गुंतवणूक ही दोन कारणे अगदी उघड आहेत. आता या दोन मुद्द्यांचा स्वतंत्रपणे विचार करूयात.

आधी बघूया हौसेचा भाग. अंगावर भरपूर प्रमाणात सोने घातल्याने श्रीमंतीचे प्रदर्शन सहजगत्या होते. पण, त्याचबरोबर आपण चोर व लुटारुंच्या नजराही पटकन आकर्षित करतो. गळ्यातील सोनसाखळ्या ओढून पळवण्याचे प्रकार दिवसाढवळ्या सर्रास होतात आणि मोठ्या लूटमारीच्या प्रसंगात तर आपण सोन्यात गुंतवलेले आपले सर्वस्व गमावून बसतो. समाजातील आर्थिक विषमतेची दरी जोवर रुंदावतेच आहे तोवर चोरी-दरोड्याचे प्रमाणही वाढतेच राहणार, हे निःसंशय. अशा परिस्थितीत सोन्याच्या वेडाला आवर घालण्याऐवजी आपण सोन्याच्या विळख्यात आपल्याला गुंतवून का घेतो, हे एक न समजणारे कोडे आहे. निदान लांबच्या प्रवासांमध्ये तरी आपण अंगावर सोने न घातल्यास आपणच आपली सुरक्षितता वाढवतो हे समजायला हवे. ज्येष्ठ नागरिकांनी तर सोने परिधान करण्यापासून चार हात लांबच राहिलेले बरे.

सोने हा प्रतिष्ठेचा निकष फक्त माणसांमध्येच नाही तर तो माणसांनी निर्माण केलेल्या “देवां”मध्येही आहे! काही मोठ्या देवस्थानांमधील ‘देवां’ना सोन्याने मढविण्यात आले आहे आणि त्या सोन्याच्या वजनाच्या आणि किमतीच्या बढाया मारणारे भक्त(?)ही दिसून येतात. अशा प्रकारे आपण तथाकथित ‘देवां’नाही सोन्याच्या भोगवादी कोषात अडकवून त्यांच्यातले देवत्वच काढून घेतले नाही का?

आता बघूयात सोने आणि गुंतवणूक या मुद्द्याकडे. मुळात माणसाने सोने जवळ बाळगणे का सुरू केले असेल? सोने हा दुर्मिळ धातू असल्याने तो मोल्यवान ठरवण्यात आला. कौटुंबिक आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीत जवळ बाळगलेले सोने हा महत्वाचा आधार ठरतो. त्यामुळे आपली गुंतवणूक ही काही प्रमाणात तरी सोन्यात असावी, हे मान्य. मात्र या गुंतवणुकीचा अतिरेक हा आपण स्वतः आणि आपला देश अशा दोघांनाही फायदेशीर नसतो.
सोने उत्पादनाबाबत आपण स्वयंपूर्ण नसल्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात ते परदेशातून आयात करावे लागते. त्यासाठी आपल्याकडील बहुमूल्य परकीय चलन हे हौसेच्या कारणासाठी खर्ची पडते. मध्यंतरी एका अर्थतज्ञाचा लेख वाचनात आला होता. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले होते की आपण जर स्वतःला सच्चे देशभक्त समजत असू तर आपण सोने खरेदीचा हव्यास कटाक्षाने टाळला पाहिजे.

अलीकडे तर काही तज्ञ हे प्रत्यक्ष सोने खरेदीपेक्षा Gold bonds मध्ये पैसे गुंतवण्याचे आवाहन करत असतात. अशा गुंतवणूकीमुळे आपण सोनेचोरीपासून तर नक्कीच सुरक्षित असतो. तसेच ही गुंतवणूक ही प्रत्यक्ष सोन्याच्या अनुत्पादक गुंतवणुकीपेक्षा देशासाठी श्रेष्ठ ठरते. सर्व सुशिक्षितांनी विचार करण्यासारखा हा मुद्दा आहे. सोन्याला असलेले आंतरराष्ट्रीय महत्व बघता आपल्या देशाकडे सोन्याचा साठा असला पाहिजे. पण, निव्वळ हौसेखातर होणारी व्यक्तिगत सोने खरेदी आणि त्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन किती करायचे याचा विचार प्रत्येक सुजाण नागरिकाने केला पाहिजे.

( टीप : सदर लेखातील सोने आणि गुंतवणूक यासंबंधीची विधाने माझ्या सामान्यज्ञान व वाचनावर आधारित आहेत. त्यावर तज्ञांनी भाष्य केल्यास आनंद होईल).
*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे मतपरिवर्तन आत्ता झालेले नाही. Happy

एक दोन वर्षांपूर्वी गोल्ड बॉण्ड्स समजावून घ्यायचा प्रयत्न केला होता. पण कळले नाही म्हणून सोडून दिला. शेअर मार्केट मधल्या लोकांना वाटत असेल की त्यात काय आहे न समजण्यासारखे.

गोल्ड फंडस साठी वेगळा धागा असेल तर तो वर आणून त्यावर प्रश्न विचारीन नाहीतर कोणी एखादा धागा काढला तर त्यावर शंका निरसन करता येईल.

चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार! चर्चा समतोल झाली. एखाद दुसरा अपवाद वगळता कोणी व्यक्तिगत पातळीवर उतरले नाही, ही आनंदाची बाब आहे. कुठल्याही विषयाबाबत मतभिन्नता ही असणारच. आपण सगळे प्रौढ आहोत. त्यामुळे प्रत्येक जणच आपापल्या मताशी ठाम असतो. चर्चेचा फायदा एवढाच की आपल्याला त्या प्रश्नांची दुसरी बाजू समजते. मग त्यावर आपण विचारमंथन करू शकतो.

चर्चांदरम्यान बऱ्याचदा असा मुद्दा उपस्थित होतो की इथे मूठभर बुद्धीजीवी लोक मिळून जी चर्चा करतात त्याचा विशाल समाजावर काय परिणाम होणार? मुद्दा बरोबर आहे. पण, जर का एखादा बदल सामाजिक पातळीवर घडावा असे आपल्याला वाटत असेल, तर त्याची सुरवात ही कुठल्यातरी विचारी माणसापासूनच व्हावी लागते. त्याची कृती बघून अन्य विचारी माणसे तसे करण्याला प्रवृत्त होऊ शकतात. मग क्रमाक्रमाने असा बदल समाजाच्या अल्पशिक्षित व कष्टकरी वर्गापर्यंत झिरपू शकतो.

त्यामुळे सोन्याच्या संदर्भात बोलायचे झाल्यास खालील बदलांची अपेक्षा आपण क्रमाक्रमाने ठेवू शकतो:
दागिन्यांची कमी खरेदी >> गुंतवणुकीसाठी सुवर्णरोख्याना प्राधान्य >> गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांचा अधिकाधिक विचार >> दागिन्यांचे प्रदर्शन हा जो मूलभूत instinct आहे, त्याबाबतीत आत्मपरीक्षण.

असो. हे जे काही लिहील ते अर्थातच “हे मा वै म “ आहे. सदस्यांच्या अन्य वा विरोधी मतांबाबत आदर आहे. अशाच साधकबाधक चर्चा माबोवर निरोगीपणे होवोत ही अपेक्षा. धन्यवाद.

करू द्या हो त्यांना आत्मरंजन.
आर्थिक साक्षरतेचा धडा लहानपणापासून संस्कारांत असावा असे तुम्हाला का वाटते ? त्याने धातुरूपी सुवर्ण गुंतवणूकीवर कसा लगाम लागणार आहे ?

मार्मिक, त्याचे असे आहे की कुठल्याही स्वरुपातला पैसा, धन, संपत्ती जर स्थिर अवस्थेत असेल तर ती तुम्हाला गरिब करत आहे असे समजावे. घरात ठेवलेल्या सोन्यात धन-संपत्ती अडकून बसते, द्रव्य होत नाही, वाहत नाही. त्यामुळे ती गरिब करत जाते. आज माझ्याकडे १ कोटी रुपयाचे सोने असेल, पण केवळ ते तसेच पडून राहिल्याने त्याची वृद्धी होत नाही, ज्या धनाची, संपत्तीची वृद्धी होत नाही ते नुकसानीत जाते, त्याचे मूल्य घसरते. २०१२ ला घेतलेले १ कोटी रुपयाचे सोने भले आज ३ कोटीचे झाले असेल, पण इन्फ्लेशनमुळे त्या तीन कोटीची किंमत पुर्वीच्या दिड कोटी इतकी असेल. तेच एक कोटी समजा कुठे शेअर्स, धंद्यात, गुंतवले असते तर त्याचे कदाचित १० किंवा पाचशे कोटीही झाले असते. आणि ह्या जर तर च्या बाता नाहीत. होतात ह्या गोष्टी...

गुंतवणूकहीन बचत ही अंततः गरिब करणारी गोष्ट आहे हे सर्वसामान्यांना कळणे गरजेचे आहे. सोने ही अशीच बचत आहे. आर्थिक साक्षरतेमध्ये हे शिकवता येईल. ज्या कारणासाठी सोने महत्त्वाचे आहे ते कारण किती तकलादू आहे व खरे नाही हे प्रबोधनातून पटवून देता येईल. तसेच पारंपरिक सोने जे विकायचे नाही, मोडायचे नाही वगैरे टॅबू आहेत ते मोडता येतील. नवीन सोने घेणे हे खड्ड्यात जाण्यासारखे आहे हे सोदाहरण, गणितासकट दाखवता येते. ह्या सर्व गोष्टी सांगायला, शिकवायला लागतात. त्यशिवाय कळत नसतात. जे फिल्दी रिच आहेत त्यांनी कितीही सोने घेऊ देत त्यांचा देशाच्या सोन्याच्या आयातीशी संबंधीत गोष्टींवर प्रभाव पडत नाही. सामान्यपणे उच्चमध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय व गरिब लोकच सोन्याचे दागिने घेण्यात पैसा उडवत आहेत असे माझे निरिक्षण आहे. अशांची संख्या जास्त असल्याने सोन्याची आयात वाढते आहे. अशांनाच आर्थिक साक्षरतेची नितांत गरज आहे, कारण या लोकांच्या 'श्रीमंतीच्या कल्पना' पारंपरिक मध्यमवर्गीय गरिबीवाल्या मानसिकतेतून आलेल्या आहेत. त्यांना मुळासकट बदलणे लॉन्ग टर्मसाठी सगळ्यांनाच फायद्याचे आहे.

कुमार यांच्या मूळ लेखात आणि तुम्हा दोघांच्या एकूण प्रतिसादात जो स्टॅन्ड तुम्ही घेतलाय त्यात काही चुकीचे आहे असे म्हणायचे नाही. पण मला तो स्टॅन्ड हाय मोराल ग्राउंड घेणारा वाटलाय. त्यातून 'इतर कसे मागासलेले, बावळट आहेत, आम्ही कसे सुधारलेले विचारी आहोत' असा सूर आढळतो आहे. आता हा माझ्या आकलनाचा दोष असु शकतो. तेव्हा क्षमस्व.

बचतगटातून मिळणारे छोटे कर्ज वापरुन गरिब बायकांना सोन्याचे दागिने घेतांना पाहिलंय... त्यामुळे आर्थिक साक्षरता किती आवश्यक आहे हे दिसत आहे.

कठीण आहे.
माझ्या प्रत्येक प्रतिसादात परकीय चलन व सोने खरेदी ह्यांचा संबंध ज्याला कळला असेल निदान त्याने तरी विचार करावा असं म्हटले आहे.
ज्याला पटतय त्याने स्वतःपासून सुरूवात करावी, आपल्या घरातील सदस्यांना त्याचे महत्व पटवून द्यावे हा मी माझा स्वतःचा अनुभव असल्यामुळे सांगितले तर तुम्हाला तो स्टॅन्ड हाय मोराल ग्राउंड घेणारा वाटतो?

दागिन्यांच्या 'शोबाजी' संबंधी थोडेसे :
मनाच्या सौंदर्याची मशागत करण्याऐवजी बाह्य सौंदर्यावरच लक्ष केंद्रित करण्याची बहुतेकांची प्रवृत्ती असते. त्यातूनच सोन्याचा मुलामा अंगावर चढवला जातो. खरे तर चेहर्‍यावरील हास्य हे सर्वात उत्तम 'सौंदर्यप्रसाधन' आहे.

कोणतेही सौंदर्य जर शो-ऑफ केले नाही तर इतरांना कळणार कसे की ते सुंदर आहे. कोणी दागिने घालून (सो-कॉल्ड) शारीरिक सौंदर्य शो-ऑफ करतात कोणी विद्वतत्प्रचुर लेख /मत-मतांतरे लिहून आम्ही किती बौद्धिक सुंदर (अर्थातच सो-कॉल्ड) शो-ऑफ करतात. मग, एक सौंदर्य दुसर्यापेक्षा चांगले किंवा वाईट कसे? भला, उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसी?!

दागिने घातल्याने शरीरसौंदर्य कसे दाखवता येते ते कळले नाही.
शो ऑफला 'प्रदर्शन' हा मराठी प्रतिशब्द आठवला. शारीरिक सौंदर्याचे प्रदर्शन करायचे आणखी मार्ग आठवले. तिथे जात नाही.
सोन्याच्या दागिन्यांनी फक्त सौंदर्यदृष्टीचे प्रदर्शन होते? की गळ्यात नवं काहीतरी घातलेलं असलं की परिचितांकडून कुठून केला, यासोबतच किती तोळ्यांचा, असाही प्रश्न अपेक्षित असतो?

अंगावर घालण्यासाठी सोन्याचे दागिने घडवायला माझा मुळीच विरोध नाही. पण हे आम्ही गुंतवणुकीसाठी करतोय, असं म्हणू नका, इतुकेच मागणे आहे. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
अडीनडीला ते दागिने मोडणारे लोक असतात. पण त्यांना सोन्याशिवाय अन्य पर्याय माहीत असतोच असं नाही. तो माहीत व्हायला हवा.

अंगावर घालण्यासाठी सोन्याचे दागिने घडवायला माझा मुळीच विरोध नाही. पण हे आम्ही गुंतवणुकीसाठी करतोय, असं म्हणू नका, इतुकेच मागणे आहे. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
अडीनडीला ते दागिने मोडणारे लोक असतात. पण त्यांना सोन्याशिवाय अन्य पर्याय माहीत असतोच असं नाही. तो माहीत व्हायला हवा.

>>> करेक्ट. हेच माझेही मत आहे.

गुंतवणूकहीन बचत ही अंततः गरिब करणारी गोष्ट आहे हे सर्वसामान्यांना कळणे गरजेचे आहे. सोने ही अशीच बचत आहे. >>>>>>>>>>

@नानाकळा, गेल्या ५०-१०० वर्षाचा भारतातल्या सोन्याचा डेटा सोने हे गरिब करणारी गुंतवणुक आहे असे अजिबात दाखवत नाही. फक्त गेल्या ५ वर्षाचा डेटा बघु नका. सोन्यानी गेल्या २०-५०- १०० वर्षात इन्फ्लेशन पेक्षा बराच जास्त परतावा दिला आहे. सोन्या पेक्षा जास्त परतावे देणारे पर्याय असतील, पण सोने हा गरीब करणारा पर्याय नक्कीच नाही. ५-१०% गुंतवणुक सोन्यामधे करायला काहीहि हरकत नाही.

{{{ फक्त गेल्या ५ वर्षाचा डेटा बघु नका. सोन्यानी गेल्या २०-५०- १०० वर्षात इन्फ्लेशन पेक्षा बराच जास्त परतावा दिला आहे. }}}

यात तुम्ही ज्या सोन्याच्या वस्तू चोरीला गेल्यात त्यामुळे लोकांचा जो लॉस झालाय तो धरला का? लॉकरचे भाडे धरले का? आणि पूर्वीचा दर बघायचाच असेल तर १९९६ च्या सुमारास काही सहकारी बँकादेखील फिक्स डिपॉझिट्सवर १६% इतक्या दराने व्याज देत होत्या (त्या तेव्हा कर्जदारांना १८ ते २० टक्के इतका दर लावीत) ही बाब देखील लक्षात घ्या.

यात तुम्ही ज्या सोन्याच्या वस्तू चोरीला गेल्यात त्यामुळे लोकांचा जो लॉस झालाय तो धरला का? लॉकरचे भाडे धरले का? >>>>>>>> चोरी ** झालीय असा लॉस सोडुन दिला आहे, बाकी सर्व पकडा तरी सोन्याची गुंतवणुक ही फिक्स्ड इन्कम पेक्षा जास्त उपयोगी ठरली आहे. हे मी पूर्वीचे सांगितले, पुढे काय होईल हे कोणीच सांगु शकत नाही.
तसेही मी ५-१०% गुंतवणुक सोन्यात करावी असे लिहीले होते. प्रत्येकाच्या गरजे नुसार ती जास्त होऊ शकते. सोने मुख्य करुन हेजिंग म्हणुन फार चांगले उपयोगात येऊ शकते.

हे दोन मुद्दे समजुन घ्या
१ सोन्या मधल्या गुंतवणुकी ची क्रयशक्ती कमी होत नाही. समजा काही कारणांनी रुपया डॉलर च्या तुलनेत खुप घ्सरला तरी तुमच्या सोन्याच्या गुंतवणुकीचे मुल्य ( क्रयशक्ती ) कमी होणार नाही.
२. अराजकते सारख्या वेळात शेयर्स, एफडी कामी येत नाहीत, पण फिजिकल सोने उपयोगी येऊ शकते.
---------------------------------
**रुपीच्या ग्राहकांना अजुन पैसे मिळाले नाहित. अनेक २००७ मधले स्टॉक आता १०% किमतीला पण नाहीत. त्यामुळे धोका सर्व गुंतवणुकीत असतो

टोचा, तुमचे विवेचन चांगले आहे.
तेव्हा थोडीशी का होइना सोन्याची बिस्किटे घरात दडवून ठेवायची ! Bw

अराजकते सारख्या वेळात शेयर्स, एफडी कामी येत नाहीत, पण फिजिकल सोने उपयोगी येऊ शकते. >>
या निमित्ताने एक जुनी आठवण. जेव्हा पंजाबमधील दहशतवाद (खलिस्तान वगैरे) ऐन भरात होता त्याकाळी कित्येक कुटुंबे विस्थापित झाली होती. त्यांच्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की घरदार सोडताना जवळील सोन्याचा खूप आधार होता.
आता भौतिक सोन्यापेक्षा सुवर्णरोखे फायदेशीर आहेत किंवा कसे हे एखाद्या जाणकाराने लिहीले तर खूप आवडेल. ते दुवे देण्यापेक्षा इथे सोप्या मराठीत लिहायची गरज आहे.

जगातल्या सगळ्या central banks भरपूर सोनं बाळगून आहेत . मग सामान्य लोकं का नाही बाळगणार ? इथे सोनं म्हणजे चिप्स दागिने नाही .

@कुमार१ - माझे म्हणणे इतकेच होते की सोन्यामधल्या गुंतवणुकीला ही काही अर्थ आहे. आपण मराठी मध्यमवर्गीय दृष्टीकोनातुन कदाचित फार बरोबर वाटणार नाही सध्या . पण पैसे जास्त असतील तर कॅपीटल प्रिझर्व्हेशन खुप महत्वाचे ठरते. म्हणुनच लोक परदेशात गुंतवणुक करतात, डॉलर बाळगतात.

प्रत्येक अ‍ॅसेट क्लास महत्वाचा आहे. असे सरसकट मोडीत काढता येत नाही.

व पु काळे की प्रवीण दवणे? >> हा चांगल्या चर्चेत फाटे फोडण्याचा प्रकार आहे. आणी.....
आपण सर्व जे वेळघालवू लोक इथे जमलो आहोत ना त्यापेक्षा हे दोन लेखक हज्जारो पटीने चांगले आहेत.

@नानाकळा, ह्या लिंका बघा

3) In terms of percentage, the 35 years return (as given above) is as follows: FD-8.41%, Gold- 10.82%, Silver- 10.03% and Sensex- 16.72% (18.72% if dividend yield is as assumed above)

Traditional Indian households still swear by gold as a long-term asset and they have a valid reason for that. Gold has generated an annualised return of 13.66% in the last 15 financial years, marginally lower than the Sensex return of 13.97% during same period

https://wisewealthadvisors.com/2014/04/14/1980-to-2014-sensex-vs-fixed-d...

Read more at:
http://economictimes.indiatimes.com/articleshow/51771391.cms?utm_source=...

http://economictimes.indiatimes.com/markets/commodities/gold-returns-as-...

आता भौतिक सोन्यापेक्षा सुवर्णरोखे फायदेशीर आहेत किंवा कसे हे एखाद्या जाणकाराने लिहीले तर खूप आवडेल. >>>>>>
सुवर्णरोख्यां चे गुण
१. १ ग्रॅम पासुन ५०० ग्रॅम ( प्रत्येक वर्षी ) पर्यंत गुंतवणुक करता येइल. सरकारी असल्यामुळे सर्वात कमी धोक्याची
२. डिमॅट फॉर्म मधे उपलब्ध त्यामुळे लॉकर वगैरे ची गरज नाही. त्यामुळे नॉमिनेशन ची सोय पण उपलब्ध.
३. ८ वर्ष मुदत पण ५ वर्षाच्या पुढे गुंतवणुक काढुन घेता येइल.
४. स्टॉक मार्केट मधे ट्रेडींग करता येइल त्यामुळे पूर्णतः लिक्विड.
५. कर्जाच्या साठी तारण म्हणुन वापरता येइल.
६. सर्वात महत्वाचे २.७५% व्याज मिळेल. म्हणजे दुहेरी फायदा.

हे बघता स्वच्छ आणि कायदेशीर कमाई असलेल्यांना गोल्ड बाँड हे उत्तम साधन आहे.

टोचा, एकदम खुश तुमच्यावर ! आभार !!

हे बघता स्वच्छ आणि कायदेशीर कमाई असलेल्यांना गोल्ड बाँड हे उत्तम साधन आहे. >>> चला, आपण यातच मोडतो बुवा ! उगा ते बिस्कुट वगैरे धान्याच्या डब्यात लपवून ठेवायचे म्हणजे आपण सोने-तस्कर झाल्यासारखे वाटते बघा. Bw

उगा ते बिस्कुट वगैरे धान्याच्या डब्यात लपवून ठेवायचे म्हणजे आपण सोने-तस्कर झाल्यासारखे वाटते बघा

>> आता हे काय नविन? कायदेशीर पेमेण्ट करुन कायदेशीर पावती घेऊन बिस्कुट - वीट वगैरे ठेवता येते घरात. कोणी तुम्हाला तस्कर म्हणणार नाही.

गुंतवणूक म्हणून सोनेच घ्यायचे असेल त्यांच्यासाठी सुवर्णरोखे हा पर्याय उत्तम आहे.

वर लिहिलेल्या फायद्यांत आणखी एक भर.

मुदतपूर्तीपर्यंत ठेवले, तर कॅपिटल गेन्स टॅक्स नाही. मुदती आधी स्टॉक मार्केटमध्ये विकले तर लागेल.

मिळणारं व्याज करपात्र असेल.

व्याज मिळेल+ नो कॅपिटल गेन्स टॅक्स + सोने घरात ठेवायची जोखीम नाही हे तीन फायदे. (सोन्याच्या तुलनेत)

सामान्य नागरिकांना सोने बिस्कीट / वीट स्वरुपात (बहुदा) आपल्या देशात साठविता येत नाही.

उगा ते बिस्कुट वगैरे धान्याच्या डब्यात लपवून ठेवायचे म्हणजे आपण सोने-तस्कर झाल्यासारखे वाटते बघा. >> Biggrin

हे सुवर्णरोखे कसे चालतात? म्हणजे आयबीआय आंतरराष्ट्रीय बाजारातून सोने विकत घेऊन ते फिजिकल स्वरूपात कुठे तरी साठवून ठेवते का? असं करत असेल तर परकीय चलन जाईल ना? का दुसऱ्या देशांत ते पैसे गुंतवते? यात व्याज कुठल्या पैशातून दिले जाते? सोने इंवेस्ट कसं करतात ज्यातून वृद्धी होईल? कुठे तरी, कुणाला तरी सोने ठेवावेच लागेल कारण ८ वर्षाअंती परतावा सोन्याच्या किंमतत द्यायची आहे.

भारत सोन्याचा वापर करणारा दुसऱ्या नंबरचा देश आहे सो जर ही स्कीम नीट इंप्लीमेंट झाली तर डिमांड / सप्लाय मध्ये सोन्याची किंमत कमी होईल असं मला वाटतं. (विथ फ्यु अझाम्प्षनस)
ह्यात व्याज दर २.७५ % आहे. भारतात सरकारी (==सुरक्षित ) एफडी मध्ये ८% व्याज मिळत असेल ना? तसेच व्यक्तीगणित गुंतवणूक मर्यादा साधारण दीड लाख प्रतिवर्ष आहे. ८ वर्षेही मुदत खूपच कमी आहे, असं मला वाटलं. फार इंतारेस्तिंग गुंतवणूक वाटली नाही मला.

सोने हे गुंतवणुकीला चांगले माध्यम नाही हे मला पटलेले आहे सो मी सोने गुंतवणूक म्हणून कधी घेणार नाही. पण फिजिकल सोने असलेले मला आवडते. नेहेमी नुसती वळी/ चिपा घेण्यापेक्षा अनेक देशांच्या सेन्ट्रल ब्यांका सोन्या/ चांदीची लिमिटेड सप्लाय असलेली कलेक्टरस कॉईन बाजारात आणतात. ती सोन्याच्या पर gram भावापेक्षा महाग असतात पण फिजिकल टच (वेष्टनाला / नाण्याला नाही) करता येतो. कधीमधी हौस म्हणून कुणाला भेट द्यायची झाली तर बेस्ट भेट आहे असं मला स्वतःला वाटतं. आरबीआय असं काही करत असेल तर कल्पना नाही.
प्रतिसाद शेवटी थोडा वेगळ्या विषयावर गेला. क्षमस्व.

Pages