सोने : चकाकती प्रतिष्ठा

Submitted by कुमार१ on 26 July, 2017 - 04:39

सराफांच्या दुकानांमध्ये सोनेखरेदीसाठी झालेली झुंबड जर आपण पाहिली, तर क्षणभर ‘भारत हा गरीब आणि विकसनशील देश आहे’ या विधानावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सोन्याचे वेड हे प्राचीन असून समाजातील सर्व स्तरांमध्ये कमीअधिक प्रमाणात आढळतेच. अर्थातच हे वेड स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. अलंकार परिधान केल्याने स्त्री- सौंदर्याला उठाव येतो हे खरे; पण ते अलंकार महागड्या सोन्याचेच हवेत या अट्टाहासातून अखिल स्त्रीजातीची दोन वर्गांमध्ये सरळसरळ विभागणी झालेली दिसते. ती म्हणजे – सोने अंगावर घालणाऱ्या आणि घालू न शकणाऱ्या स्त्रिया.

सोने घालणाऱ्या स्त्रियांचा हव्यास हा कायम वाढताच राहतो, तर ते परवडू न शकणाऱ्या स्त्रियांच्या मनातील खंतही वाढतच राहते. अलीकडे झटपट श्रीमंत झालेल्या पुरूषांमध्येही सोने परिधान करण्याचे आकर्षण वाढीस लागले आहे. काही वर्षांपूर्वी अंगावर किलोभर सोने घालून त्याचे प्रदर्शन करणारे एक पुरुष लोकप्रतिनिधी पुणेकरांनी अगदी जवळून पाहिले होते.
माणसाच्या सोनेखरेदीमागे हौस आणि आर्थिक गुंतवणूक ही दोन कारणे अगदी उघड आहेत. आता या दोन मुद्द्यांचा स्वतंत्रपणे विचार करूयात.

आधी बघूया हौसेचा भाग. अंगावर भरपूर प्रमाणात सोने घातल्याने श्रीमंतीचे प्रदर्शन सहजगत्या होते. पण, त्याचबरोबर आपण चोर व लुटारुंच्या नजराही पटकन आकर्षित करतो. गळ्यातील सोनसाखळ्या ओढून पळवण्याचे प्रकार दिवसाढवळ्या सर्रास होतात आणि मोठ्या लूटमारीच्या प्रसंगात तर आपण सोन्यात गुंतवलेले आपले सर्वस्व गमावून बसतो. समाजातील आर्थिक विषमतेची दरी जोवर रुंदावतेच आहे तोवर चोरी-दरोड्याचे प्रमाणही वाढतेच राहणार, हे निःसंशय. अशा परिस्थितीत सोन्याच्या वेडाला आवर घालण्याऐवजी आपण सोन्याच्या विळख्यात आपल्याला गुंतवून का घेतो, हे एक न समजणारे कोडे आहे. निदान लांबच्या प्रवासांमध्ये तरी आपण अंगावर सोने न घातल्यास आपणच आपली सुरक्षितता वाढवतो हे समजायला हवे. ज्येष्ठ नागरिकांनी तर सोने परिधान करण्यापासून चार हात लांबच राहिलेले बरे.

सोने हा प्रतिष्ठेचा निकष फक्त माणसांमध्येच नाही तर तो माणसांनी निर्माण केलेल्या “देवां”मध्येही आहे! काही मोठ्या देवस्थानांमधील ‘देवां’ना सोन्याने मढविण्यात आले आहे आणि त्या सोन्याच्या वजनाच्या आणि किमतीच्या बढाया मारणारे भक्त(?)ही दिसून येतात. अशा प्रकारे आपण तथाकथित ‘देवां’नाही सोन्याच्या भोगवादी कोषात अडकवून त्यांच्यातले देवत्वच काढून घेतले नाही का?

आता बघूयात सोने आणि गुंतवणूक या मुद्द्याकडे. मुळात माणसाने सोने जवळ बाळगणे का सुरू केले असेल? सोने हा दुर्मिळ धातू असल्याने तो मोल्यवान ठरवण्यात आला. कौटुंबिक आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीत जवळ बाळगलेले सोने हा महत्वाचा आधार ठरतो. त्यामुळे आपली गुंतवणूक ही काही प्रमाणात तरी सोन्यात असावी, हे मान्य. मात्र या गुंतवणुकीचा अतिरेक हा आपण स्वतः आणि आपला देश अशा दोघांनाही फायदेशीर नसतो.
सोने उत्पादनाबाबत आपण स्वयंपूर्ण नसल्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात ते परदेशातून आयात करावे लागते. त्यासाठी आपल्याकडील बहुमूल्य परकीय चलन हे हौसेच्या कारणासाठी खर्ची पडते. मध्यंतरी एका अर्थतज्ञाचा लेख वाचनात आला होता. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले होते की आपण जर स्वतःला सच्चे देशभक्त समजत असू तर आपण सोने खरेदीचा हव्यास कटाक्षाने टाळला पाहिजे.

अलीकडे तर काही तज्ञ हे प्रत्यक्ष सोने खरेदीपेक्षा Gold bonds मध्ये पैसे गुंतवण्याचे आवाहन करत असतात. अशा गुंतवणूकीमुळे आपण सोनेचोरीपासून तर नक्कीच सुरक्षित असतो. तसेच ही गुंतवणूक ही प्रत्यक्ष सोन्याच्या अनुत्पादक गुंतवणुकीपेक्षा देशासाठी श्रेष्ठ ठरते. सर्व सुशिक्षितांनी विचार करण्यासारखा हा मुद्दा आहे. सोन्याला असलेले आंतरराष्ट्रीय महत्व बघता आपल्या देशाकडे सोन्याचा साठा असला पाहिजे. पण, निव्वळ हौसेखातर होणारी व्यक्तिगत सोने खरेदी आणि त्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन किती करायचे याचा विचार प्रत्येक सुजाण नागरिकाने केला पाहिजे.

( टीप : सदर लेखातील सोने आणि गुंतवणूक यासंबंधीची विधाने माझ्या सामान्यज्ञान व वाचनावर आधारित आहेत. त्यावर तज्ञांनी भाष्य केल्यास आनंद होईल).
*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देशाचे परकीय चलन वाचावे म्हणून सोने खरेदी करू नका असा आर्जव करणारे, ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची तसदी तरी घेतात का असे एक 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' किंवा 'जाओ जाके पहले ऊस आदमी का साईन लेके आओ' टाईप बिनतोड अर्ग्यूमेंट करायचे राहिले ना अमित. Wink

चांगला लेख आणि चांगल्या विषयावरील समतोल चर्चा.
आता माझेही दोन पैसे:

१. सोन्याचे दागिने ही जीवनावश्यक गोष्ट नाही. तो हौसेचा भाग आहे पण, त्याचे अतिरेकी प्रदर्शन डोक्यात जाते.
२. सोने हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय नक्कीच नाही. तरीसुद्धा तोच एकमेव पर्याय आहे असे मानणाऱ्यानी भौतिक सोन्यात कमी आणि सुवर्णरोख्यात जास्त अशी गुंतवणूक करावी.
३. आपण लोक जे सोन्यात गुंतवणूक करतो त्यात ‘आर्थिक’ बरोबरच ‘मानसिक’ गुंतवणुकीचा ही भाग अधिक आहे. असे सोने हे पिढ्यानपिढ्या घरात राहिलेले दिसते. आपण समभाग वगैरे जेवढ्या सहज विकतो तेवढ्या सहज सोने विकत नाही. मला ही खास भारतीय मनोवृत्ती वाटते. वारशात मिळालेले सोने विकायचे हा विचार सुद्धा आपल्याला ‘पापी’ वगैरे वाटतो.
४. नागरिकांनी केलेली उत्पादक गुंतवणूक ही अनुत्पादक गुंतवणुकीपेक्षा केव्हाही चांगली, अगदी कोणत्याही देशासाठी.

साद, अभिप्राय आणि समतोल प्रतिसादाबद्दल आभार.

वारशात मिळालेले सोने विकायचे हा विचार सुद्धा आपल्याला ‘पापी’ वगैरे वाटतो. >> अगदी बरोबर! आपल्या प्रत्येकाच्या घरात आपल्या आजी-पणजी पासून चालत आलेला एक तरी दागिना नक्कीच सापडेल. काही वेळेस तर असे वा टते की सोने ही फक्त एका पिढीपुरती 'गुंतवणूक' नसून तो एक -दोन शतकांकरता केलेला ''साठा'' आहे.

धन्यवाद, कुमार१
सुशिक्षितांनी तरी भौतिक सोन्याऐवजी सुवर्ण-रोख्यांकडे वळावे असे मला वाटते
निदान चालू खात्यातील तूटीला धातूरूपी सोने खरेदीही जबाबदार आहे हे कळणार्‍यांनी तरी ई-गोल्ड स्वरुपात खरेदी करायला काय हरकत आहे ?ह्यामुळे परकीय चलनाची थोडीफार बचतही होईल व गुंतवणूकदाराच्या गुंतवणूकीला बाधाही पोचणार नाही. सरकारनी ज्या सुवर्ण योजना आणल्या आहेत त्यात सुवर्ण गुंतवणूकदाराचे नुकसान अजिबात होत नाही.
पर्याय असातानाही हट्टाने धातूरुपी सोन्यातच गुंतवणूक करायची व सरकारला निर्यात प्रोत्साहन व परकीय गुंतवणूकदारांना देशात गुंतवणूकीला प्रोत्साहनाचे सल्ले द्यायचे. म्हणजे आपली परकीय गंगाजळ वाढेल, रुपया मजबूत होईल, सोन्याची आयात स्वस्त होईल , मग ह्या डॉलरची कायदेशीर निर्यात करायची जबाबदारी हे सुवर्ण गुंतवणूकदार घेणार. व्वा!

गुंतवणूकीविषयी मी काही बोलणार नाही. वरती दोन्ही बाजूंनी फारच जोरदार चर्चा झालेली आहे. सोने वि. जमीन वि. स्टॉक इत्यादी.

दुसरा मुद्दा आहे तो दागिन्यांचा. दागिने जर सौंदर्य वाढविण्याकरिता महिलांना वापरायचेच असतील तर तिथे सोन्याला पर्याय नाही. महिलांची त्वचा नाजूक असल्याने दुसर्‍या धातूचे दागिन्यांमुळे रॅशेस उमटतात. तेव्हा दागिने असलेच तर सोन्याचेच, दुसरे नकोत.

वर्षातून फारतर १० वेळा मोठ्या समारंभांकरिता वापरण्यात येणार्‍या दागिन्यांकरिता मोठ्या प्रमाणात रक्कम अडकविण्यापेक्षा प्रत्येक लहानमोठ्या शहरात तनिष्क सारख्या कंपन्यांनी दागिने भाड्याने देण्याची (शक्यतो लग्नाच्या हॉलजवळ) स्कीम काढली तर पैसे गुंतून राहणे आणि दागिने चोरीची जोखीम या दोन्ही बाबी प्रचंड प्रमाणात घटतील.

प्रत्येक लहानमोठ्या शहरात तनिष्क सारख्या कंपन्यांनी दागिने भाड्याने देण्याची (शक्यतो लग्नाच्या हॉलजवळ) स्कीम काढली तर पैसे गुंतून राहणे आणि दागिने चोरीची जोखीम या दोन्ही बाबी प्रचंड प्रमाणात घटतील. >> दागिने भाड्याने देतांना भाड्याने घेणार्‍याचा बॅकग्राऊंड चेक, सोनाराकडे ठेवावे लागणारे मालाच्या किंमतीईतके पूर्ण हमीचे पैसे, दोन्ही पार्टीला करावा लागणारा दागिन्यांच्या ईंश्यूरंसचा खर्च, भाड्याने दिलेले परत घेतांना दरवेळी करावी लागणारी चाचणी, आऊट ऑफ फॅशन दागिन्यांची घडमोड आणि तरीही चोरी होऊ शकतेच.

चाराण्याच्या कोंबडीसाठी बाराण्याचा मसाला असा प्र्कार आहे हा.

बिपिन, तुमची सूचना चांगली आहे. खरे तर भाड्याने दागिने हा व्यवसाय आत्ताही सुरु आहेच. पण फारच मर्यादित आहे व केवळ वधु-वर इत्यादी महत्त्वाच्या व्यक्ती सध्या त्याचा वापर करतात. तसेच ते खर्‍या दागिन्यांपेक्षा इमिटेशन ज्वेलरी, ऑर्नामेंटल ज्वेलरी हा प्रकार जास्त प्रचलित आहे.

यात मागे मी माहिती काढली असता, (विविध इनोवेटीव व्यवसाय कल्पनांचा अभ्यास करणे माझा छंद आहे) असे आढळले की खर्‍या सोन्याचे दागिने हा अंगावर मिरवण्याचा सोस आहे त्याचे मूळ मिरवण्यात नसून मालकी हक्कात आहे. सोने हे संपत्तीचे प्रतिक आहे, हे आपण कितीही तात्त्विक चर्चा केल्या तरी भारतीय मनातून पुसू शकत नाही. त्यामुळे सोने दाखवणे, सोन्याचे दागिने मिरवणे ही एक 'संपत्ती सुबत्तेचे प्रदर्शन' नावाची मानसिक गरज आहे. ते एक टोकन ऑफ अचिवमेंट, सिम्बॉल ऑफ प्रॉस्पॅरिटी आहे. जसे अतिशय श्रीमंत माणसे मर्सिडिज, बीमर, ऑडी वगैरे घेतात त्यात वाहनसुख हा मुद्दा नसून स्टेटस सिम्बॉल हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच असे दागिने भाड्याने घेतल्या जातील याला तितकासा प्रतिसाद मिळणार नाही. भविष्याचे सांगू शकणार नाही, पण आताच्या परिस्थितीत हे शक्य नाही. यात एक अजून असे की मर्क, बीमर भाड्याने घेतल्या जातात तेव्हाही 'ह्याचे भाडेही प्रचंड असते म्हणजे हा माणूस श्रीमंत आहेच' अशी प्रतिमा तयार होते. तशी काही दागिन्यांच्या बाबतीत होइल का याबद्दल साशंक आहे.

सोन्याचा हव्यास संपावा यासाठी खरी संपत्ती, खरी गुंतवणूक काय असते याबद्दल जास्तीत जास्त प्रचार प्रसार होणे गरजेचे आहे. सर्वच लोक उच्च विचारसरणी साधी राहणी या मताचे नसतात, आजकाल तर अशा लोकांचे प्रमाण खूप वाढलंय. आपल्याकडच्या वस्तू जगाला दाखवणे, ओनरशिप क्लेम करणे, आपण कुठेतरी सत्ताधारी आहोत हे दाखवणे ही प्राण्यांची बेसिक इन्स्टिन्क्ट आहे. त्याचा विचार केला तर सत्ता, संपत्तीचे अतिशय छोट्या सॅम्पलमध्येही प्रदर्शन करु शकणारी एकमेव गोष्ट सोनेच आहे. त्याच्या जवळपास दुसरे काहीही नाही. गडचिरोली जिल्ह्यात दूर जंगलात माझी शंभर एकर जमीन असली तरी पेडररोडच्या २००० स्क्वेअरफूट वाल्यापुढे मी गरिब असतो. सोन्याचे असे काही नसते. तुमच्या गळ्यात एक जरी दागिना सोन्याचा असला तरी तुम्ही संपन्न आहात हा मेसेज बघणार्‍याकडे जातो. तर असे असल्याने जास्तीत जास्त सोने घेत जाणे, दागिने घडवणे मिरवणे हा छंद ऑब्सेशनमध्ये बदलतोच.

सोन्याचा हव्यास संपावा यासाठी खरी संपत्ती, खरी गुंतवणूक काय असते याबद्दल जास्तीत जास्त प्रचार प्रसार होणे गरजेचे आहे. >>>> + १००००.

आपण स्वता सोने अजिबात अंगावर न घालता ते कृतीतून दाखवणे एवढे तरी करू शकतो. ते जरूर करायचे. निदान त्याचा आपल्या मुलांवर परिणाम झाला तरी चीज झाले. कुठल्याही बदलाची सुरवात ही व्यक्तीपासूनच व्हावी लागते.

वर मार्मिक यांनी त्यांच्या आईचे ( खोटे दागिने घालणे) उदा. दिले आहे. त्याची पुढची पायरी म्हणजे न घाबरता, अजिबात दागिने न घालता समारंभाला जाणे. निर्धार केला तर जमते. "लोक काय म्हणतील" ला फाट्यावर घेतले तरच काही बदल घडवता येतात.

नानाकळा, सोन्याच्या प्रदर्शन स्टेस्टस सिंबॉलवाल्या पोस्टला +७८६

कोणीतरी शेअर मार्केट मधील गुंतवणुकीबाबत अगदी नवख्यांना मार्गदर्शन होईल असा धागा काढा ना..

इकडे सोने घेऊ नका असा प्रचार केला जातोय हे सरकारला लग्गेच कळले बरे का,
त्यांनी सोन्यावरची इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याचा विचार सुरू केला आहे,
ट्रेड डेफिसीट पण कमी होतोय.... Wink
http://m.economictimes.com/news/economy/policy/government-may-reduce-imp...

भारतीय लोकांना देव-धर्म मानण्यापासून परावृत्त करण्याइतकेच सोन्यापासून परावृत्त करणे कठिण आहे. त्यामुळे सोन्याचे दागिने घालू नका, स्वतःपासून सुरुवात करा, देशावर उपकार करा, वगैरे उपदेश हे बुवाबाजीच्या नादी लागू नका, दगडात देव नसतो, उपासतापासनवस ह्या अंधश्रद्धा आहेत, देव मानणारे बुद्धीहीन मूर्ख आहेत. अशा धाटणीचे आहेत.

खरा, दूरगामी परिणाम करणारा उपाय हा सर्वंकष आर्थिक साक्षरता आहे. आर्थिक साक्षरता हा विषय आपल्या संपूर्ण देशात दुर्मिळ आहे. मला वाटते की आर्थिक साक्षरतेची चळवळ सुरु केलीत तर एकाच दगडात अनेक पक्षी मरतील. मुलांना लहानपणासूनच आर्थिकबाबतीत साक्षर करणे, तसे संस्कार शाळांमधून, घरांमधून केले जाणे गरजेचे आहे. संपत्ती, संपन्नता कशाला म्हणावे, ती कशी मिळवावी, टिकवावी याबद्दल आपल्या शाळांमधून घरांमधून, समाज-सभांमधून कधीच शिकवले जात नाही. ते आधी होणे गरजेचे. ते युद्धपातळीवर करता आले तर 'सोन्याच्या मागे लागू नका' असा उपदेश (ज्याचे हाय मोरल ग्राउंड दाखवण्याव्यतिरिक्त काहीही प्रयोजन नाही) करण्याची गरज भासणार नाही. इतर अनेक फायदे देशपातळीवर व व्यक्तिगत पातळीवर मिळतील.

इथे प्रत्येक जण आपापले विचार व्यक्त करतो आहे. त्याला उपदेश समजू नये, ही विनंती
प्रत्येकाची लेखन शैली वेगळी असते

{{{ इथे प्रत्येक जण आपापले विचार व्यक्त करतो आहे. त्याला उपदेश समजू नये, ही विनंती
प्रत्येकाची लेखन शैली वेगळी असते }}} +१

नानाकळा,
दागिने विकत घेण्याची ऐपत असणारे ते घेतीलच पण आता सध्या ऐपत नसणारेही कर्ज काढून घेत असल्याचे दिसते. तसेच वर्षातून काहीवेळाच वापरायचे आणि इतर वेळा बँकेच्या लॉकरचे भाडे भरायचे (+ दागिने काढायला आणि ठेवायला जाण्याकरिता वेळ आणि टॅक्सी खर्च) हा अपव्यय टाळण्याकरिता भाड्याने देण्याचा पर्याय सुचविला. काहीजण तर नक्कीच अमलात आणतील. ओला उबेर सारख्या टॅक्सी सर्विस आल्याने लोकांची स्वतःचे वाहन विकत घेण्याची मानसिकता कमी झाल्याचे दिसते, कारण प्रतिकिमी भाडे जास्त असले तरी स्वतःच्या वाहनाकरिता प्रचंड इनिशिअल इन्वेस्टमेंट, इयरली डिप्रिसेशन, इन्शुरन्स, मेन्टेनंन्स, ड्रायविंग फटीग, पार्किंग प्रॉब्लेम्स, ट्रॅफिक फाईन्स, अ‍ॅक्सिडेन्ट अ‍ॅण्ड थेफ्ट रिस्क पाहता स्वतःचे वाहन डिजेलवर २० अ‍ॅवरेज देत असतानाही (प्रतिकिमी ३.२५ रुप्ये खर्च) १२ रुपये प्रति किमी ची टॅक्सी अ‍ॅफोर्ड करणे जास्त सोयीस्कर वाटते. दागिन्यांबाबतही जास्त भाडे + डिपॉझिट देऊनही इतर झंझटीतून मुक्तता शिवाय प्रत्येक वेळी नवीन डिझाईन्स वापरता येणे हा दुहेरी फायदा आहेच.

आजकाल ओला-उबेर-एअरबीएनबी मॉडेल ची चर्चा जास्त आहे. प्रत्येक बाबतीत हे मॉडेल लागू करता येईल असे अनेकांना वाटत असते. पण दागिने आणि उपरोक्त सेवा यातला मुलभूत फरक तुम्ही लक्षात घेतला नाहीये. दागिन्यांबद्दलचे आकर्षण का आहे हे वरच्या पोस्टमध्ये सांगितले आहे.

'सजण्या'साठी दागिने घालणे ही कृती असेल तर ओल-उबेर मॉडेल उपयोगाचे ठरेल. पण सोन्याच्या दागिन्यांच्या बाबतीत ते एक्झॅक्टली तसे नाहीये.

कुमार अभिनंदन, खूप सुंदर धागा आणि अतिशय उपयुक्त चर्चा.
माझी पात्रता नाही यावर चर्चा करण्याची पण शिकले बरंच काही.
सर्वांचे प्रतिसाद अतिशय समतोल आणि उद्बोधक आहेत. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
सचिन काळे, मार्मिक गोडसे, नानाकळा, हायझेन्बर्ग फार सुंदर चर्चा... धन्यवाद __/\__

कुमार तुम्हाला असे विषय कसे सुचतात? Happy नेहमी छान माहितीपर किंवा बुद्धी ला खाद्य देणारे असतात म्हणून विचारलं Happy

मुलांना लहानपणासूनच आर्थिकबाबतीत साक्षर करणे, तसे संस्कार शाळांमधून, घरांमधून केले जाणे गरजेचे आहे. >> सहमत.
संपत्ती, संपन्नता कशाला म्हणावे, ती कशी मिळवावी, टिकवावी याबद्दल आपल्या शाळांमधून घरांमधून, समाज-सभांमधून कधीच शिकवले जात नाही. >> याची काही सर्वमान्य व्याख्या आहे का? कुणाला पेंटिंग संपत्ती वाटेल, कुणाला तो कागदाचा तुकडा वाटेल. संपत्ती मिरवणे ही काहीची गरज असेल. पैसा आला की तो टिकवलाच पाहिजे हे तरी तुम्ही कोण सांगणार? कुणाला तो उपभोगावासा वाटतोय तर त्याला कमी लेखून हाय मोराल पाथ घेणारे दांभिक नाहीतच का?
मस्त मोठ्ठ घर, हाय क्लास कार, दाग दागिने, परदेश भ्रमंती यात मी कष्ट करून मिळवलेला पैसा घालवला तर मला जज करणारे तुम्ही (नाना पर्सनली तुम्ही नाही.. जनरली बोलतोय) कोण?

अमितव, सध्या मी रिच डॅड पुअर डॅड मध्ये सांगितलेल्या सिद्धांतांवर आधारित प्रतिसाद देत आहे. तुमचे काही वेगळे मत असू शकते.

नाना, तुम्ही जे सांगताय ते मला व्यक्तीशः पटतंय. पण तेच बरोबर आणि सगळ्यांनी तेच करावं यावर फक्त आक्षेप आहे.

अहो, माझे सुरुवातीपासूनचे प्रतिसाद बघाल तर तुमच्या माझ्या विचारात फरक नाही असेच दिसेल.

मी फक्त आर्थिक साक्षरता असावी हे मत मांडलंय, कुणी खर्च करुच नये किंवा मनमानीच करावी ह्याबद्दल उपदेश देत नाहीये. एखाद्याला करोडोची संपत्ती रात्रीत फुंकून सकाळी रस्त्यावर यायचं असेल तर आपण कोण सांगणार त्याला...? आवड आपली आपली.

तर आर्थिक साक्षरता आणि जीवनशैली ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. महिना दहा हजार कमवणारा असो की दर सेकंदाला दहा लाख रुपये कमवणारा असो, आर्थिक साक्षरता दोहोंसाठी तितकीच गरजेची आहे. सायकल चालवणारा असो की प्रायवेट जेटमध्ये उडणारा, दोघांनाही आ सा चे महत्त्व तितकेच आहे. जसे जगायला हवा पाणी अन्न लागते तशीच व तितकीच आ सा आजच्या जगात गरजेची झाली आहे.

आता असे की खर्‍या सोन्यात गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे नाही असे वर बर्‍याच जणांनी सांगितले आहे. तेही बरोबर आहे. सोन्याच्या दागिन्यांत गुंतवणूक करणे चुकीचे आहे हे माझे मत आहे. पण जर कोणी १९८० साली घेतलेले रिलायन्सचे शेअर आज विकून बायकोला शंभर ग्रॅमचा चपलाहार -ग्रॅममागे ८०० रुपये मजुरी देऊन, २० टक्के तांबं घालून- घेत असेल तर आपण कोण त्याला असे करु नका हो म्हणणारे? कोणीच नाही. असते एकएकाची हौस मौज... त्याला राष्ट्रीय आपत्ती डिक्लेअर करणे जरा अती होते आहे.

ह्या सगळ्या कलकलाटाऐवजी सर्वांना फायदेशीर ठरेल असा आर्थिक साक्षरतेचा धडा लहानपणापासून संस्कारांत असावा असे माझे मत आहे. त्याने वैयक्तिक व राष्ट्रीय दोन्हींच्या प्रगती साधल्या जातात. मग असे हाय मोराल उपदेश करायची वेळ येणार नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. जे चुकीचेही असू शकेल....

दक्षिणा, मनापासून आभार. तुम्ही माझे अभिनंदन केलेत त्यात तुमच्या मनाचा मोठेपणा दिसतो. त्याबद्दल तुम्हालाही दाद देतो.
माझी पात्रता नाही यावर चर्चा करण्याची पण शिकले बरंच काही. >> नाही, असे समजू नका. या वि षयातले आपण कोणीही तज्ञ नसलो तरी एक नागरिक म्हणून आपण आपले विचार जरूर व्यक्त करावेत. इथे जे काही लिहीले जाते ते सर्व " हे मा वै म" यातच मोडते . Bw

कुमार तुम्हाला असे विषय कसे सुचतात? >>> सभोवतालाचे निरिक्षण आणि त्यावर विचार करण्याची सवय. बस्स, एवढेच.

आर्थिक साक्षरतेने फार काही फरक पडेल असं वाटत नाही. गुरुपुष्यामृत मुहुर्ताच्या दिवशी MBA finance वालेही सोनारांच्या दुकानासमोर रांगेत उभे असतात, सर्वसामान्यांची तर बातच सोडा. सरकार आपापल्यापरीने लोकांना सोने खरेदीचे पर्याय उपल्ब्ध करून देत असते, परंतू अंधश्रद्धा, भावना, शोबाजीमुळे लोकांना सोने बाळगण्यापासून परावृत्त करणे कठीण आहे. ज्याला पटतय त्याने स्वतःपासून सुरूवात करावी, आपल्या घरातील सदस्यांना त्याचे महत्व पटवून द्यावे , सरकार करेल, समाज बदलेल ह्याची वाट बघण्यापेक्षा हे सोपे आहे.

मला सोनं न घेता गोल्ड बॉण्ड्स मध्ये वगैरे गुंतवणूक करायची आहे. पण कशी करायची ते काही कळले नाही. कोणीतरी सांगेल का कसे करायचे कोणते बॉण्ड्स चांगले वगैरे.

साध्या सरळ सोप्या मराठीत, इथे जा, हे करा हा फायदा हा तोटा असे हवे आहे.
इंटरनेट वर दोन चार ठिकाणी वाचून पाहिले. काही कळलं नाही.

ज्याला पटतय त्याने स्वतःपासून सुरूवात करावी, आपल्या घरातील सदस्यांना त्याचे महत्व पटवून द्यावे , सरकार करेल, समाज बदलेल ह्याची वाट बघण्यापेक्षा हे सोपे आहे.

>> मार्मिक, मला तरी हे फक्त हाय मोराल ग्राउण्ड घेणे वाटते आहे. 'सोन्याचा हव्यास सोडा' हे सांगणे नक्की कशासाठी आहे? व्यक्तीसाठी की देशासाठी? व्यक्तिसाठी असेल तर मुळात काहीच गरज नाही, ज्याची त्याची आवड, त्याचा त्याचा पैसा, त्याचं तो बघेल. त्याला उपदेश करायची गरज नाही. देशासाठी असेल तर सरकार करेल, समाज बदलेल हे बघणे आवश्यक आहे. मग तसे कायदे करणे, समाजप्रबोधन करणे गरजेचे आहे.

इथे जी चर्चा चालू आहे ते मूठभर विचारवंतांसाठी आहे का की सोन्याच्या आयातीमुळे परकिय चलनावर धाड घालणार्‍या बहुसंख्य समाजासाठी आहे.?

स्वतःपासून सुरुवात करावी वगैरे आदर्शवादी शामची आई भाषा करायची आणि देश-समाज वगैरे मोठमोठ्या हाताबाहेरच्या समस्यांवर 'चिंता करतो विश्वाची' छाप चर्चा करायची.... या तो घोडा बोलो या तो चतुर बोलो....

ज्याला पटतय त्याने स्वतःपासून सुरूवात करावी
ज्यांना पटत नाही त्यांनी करू नये. मी तर सोपा पर्याय सांगितला आहे. बळजबरी तर अजिबात नाही. आर्थिक साक्षरतेने हे कसं जमेल हे समजलं नाही मला.

चला, अतरंगी यांनी उत्पादक गुंतवणूकी च्या दृष्टीने वाटचाल केली आहे. त्यांचे अभिनंदन करुयात. ☺

Pages