तडजोड (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 3 July, 2017 - 06:22

"तुला भात रोज पाहिजेच असतो का? एक दिवस नसेल..."

"हो.. माझं त्याशिवाय जेवण होत नाही...."

"मग स्वतः कुकर लाव, करून घे" मी कुकर किचनच्या ओट्यावर आपटत म्हणाले, त्या आवाजाने नितीन दचकला, मी एवढी चिडेल असे त्याला वाटले नव्हते, तो माझ्याकडे बघत होता, त्याच्या डोळ्यात भीती होती, मी उजव्या हाताने कुकरचा दांडा घट्ट पकडला होता, माझे हात रागाने थरथरत होते, श्वास फुलला होता, घामाची धार केसातून, कपाळापर्यंत आली होती.

नितीन माझ्याकडे बघत एक पाऊल मागे सरकला, तसा मी कुकरवरचा हात सैल केला, मी पुढे झुकली गेले, या रागामुळे माझे अवसान गळाले होते, मी ओट्याचा आधार घेतला.

नितीन सावकाश दिवाणखान्यात गेला, सोफ्यावर बसला, त्याने टीव्ही लावला, मी टीव्हीच्या आवाजाने संतापले, सर्र्कन, एका क्षणात, मुठी आवळल्या गेल्या, मी हातात तोच कुकर घेतला, मी दिवाणखान्याकडे धावले, तो कुकर, नितीनच्या दिशेने भिरकावून दिला. तो जड कुकर नितीनपर्यंत पोहोचलाच नाही, त्याच्या पायापर्यंत गेला, तो बेसावध होता, हे त्याच्यासाठी अनपेक्षित होतं, तो दचकला, त्याने घाबरून माझ्याकडे बघितले, त्याने पाय वर केले, मांडी घालून सोफ्यावर रेलून बसला, पण माझ्या नजरेला नजर द्यायची त्याची हिम्मत झाली नाही.

नितीनने टीव्हीचा आवाज कमी केला, त्याच्या या थंड प्रतिक्रियेमुळे, मी घुसमुसत आमच्या बेडरूमकडे गेले, दरवाजा जोरात लावला, खोलीची भिंत हादरली, खिडकीच्या काचा थरारल्या, मी दाराची कडी लावली, मागे फिरले, खोलीच्या मध्यभागी येऊन उभी राहिले, वर पंख्याकडे बघितले.
"ह्या नितीनला ना..." मी काही पुटपुटणार तेवढ्यात माझ्या पायातले त्राण गेले, मी खाली कोसळले, मी इतकी दमले होते की खाली पडल्यावर मला कूस ही बदलता आली नाही, पण शांत झाले, रडायला लागले, ओरडून रडावसं, रडून ओरडावंसं वाटत होतं, पण पोटातल्या भुकेमुळे, घशातल्या तहानेमुळे, श्वास घेताना ही धाप लागत होती.

नितीन आणि माझ्या लग्नाला जेमतेम आठ महिने झाले होते, नवीन लग्न झाले तेव्हा स्वप्नवत दिवस होते, सगळं चांगलं होतं, सुदंर होतं, माझं होतं, स्वतःच होतं, प्रेमाचं होतं, हक्काचं होतं पण..पण मग नाही माहिती काय झालं, नितीनच्या छोट्या, छोट्या सवयींचा कंटाळा आला, त्रास होऊ लागला, मनस्ताप झाला, शेवटी तिरस्कार वाटू लागला.

नितीनचा मार्केटिंगचा जॉब होता, त्यामुळे सतत फिरती वर असायचा, आधी सोमवारी संध्याकाळी सातला तर शुक्रवारी यायला त्याला रात्रीचा एक वाजायचा आणि मग टीव्ही! नेहमीचं होतं! शनिवारी, रविवारी जरा कुठं बाहेर जाऊ म्हटलं की, वैतागायचा, खेकसायचा, नाहीतर घुम्यासारखा माझ्याकडे बघायचा! मला इतका राग यायचा ना, वाटायचं एक द्यावी ठेऊन.

माझ्या मनातला राग, ओठावर कधी आला ते कळले नाही, माझ्या नजरेतला द्वेष त्याच्यापर्यंत पोहचत तर होता, आता व्यक्त होत होता, त्याच्यासाठी कर्कश झाला होता.
नवीन लग्न झाल्यावर आम्ही भांडणे मोजायचो, आता आम्ही किती वेळा एकमेकांशी बोललो हे मोजायला लागलो होतो.

मी सुद्धा जॉब करत होते, पण घरी येऊन परत स्वयंपाक का करू? काय गरज आहे? सकाळी केलेलं याला चालत नव्हतं, म्हणून परत रात्री याच्यासाठी पोळ्या करा, सांगितलंय कोणी? मी इंजिनियर झाले ते पोळ्या करण्यासाठी का? अशी एकच गोष्ट नव्हती, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. मी तरी बाबांना म्हटले होते, नवरा निदान इंजिनियर असावा, असा बीकॉम, बेअक्कल नको, पण माझं कोण ऐकतय? करा लग्न, करा संसार!
मी अजून तशीच पडून होते, जेवले नव्हते, नीट उठता येत नव्हते, पण तरीही याने एकदा ही दार वाजवले नाही, मला मग कधी झोप लागली कोण जाणे, पण रात्री कधी तरी दाराचा आवाज झाला.

अगदी प्रेमळ आवाजात म्हणाला..
"साय.."
मला जाग आली होती, पण राग गेला नव्हता, मी तशीच पडून राहिले, पंख्याकडे बघत.
"साय..अग दार उघड"
"मी नाही उघडणार, तुला दार मोडता ही येणार नाही" मी ओरडणार होते, पण मी शब्द तिथेच गिळले, भूक लागली होती ना.

"सायली, दार उघड, असं का करतेस" नितीनचा आवाज वाढला, पण मी उठणार नव्हते, आज रात्री तर नाहीच नाही.
"सायली, एकदा दार उघड, मग लावून घे" नितीन परत म्हणाला.

मला खरंच उठता येत नव्हतं, किंवा उठायचं नव्हतं, काहीही असेल, मी परत झोपायचा प्रयत्न..
"सायली" नितीन जसा ओरडला तसा, त्याने दार ढकलायला सुरुवात केली, दारावर हात पाय मारू लागला, माझ्या नावाचा जयघोष करत!
पण मी पण आज काही केल्या उठणार नव्हते, बघू किती वेळ दार वाजवतोय.

थोड्या वेळाने दार वाजवणे बंद झाले.
मी झोपी गेले, मला पहाटेच जाग आली, जरा बरं वाटत होतं, मी उठले, दार उघडले, तसा दारावर डोकं ठेऊन झोपलेला नितीन आत कलंडला, त्याला जाग आली, मी त्याच्याकडे न बघत बाथरूमला जाऊ लागले, नितीन माझ्या मागे डोळे चोळत आला,
"साय ऐक ना, सॉरी रे, माझं चुकलं" नितीन मागे येत, विनवणी करायला लागला, मी त्याच्या चेहऱ्यावर बाथरूमचा दरवाजा लावला.
"ऐक ना सायली, काय झालं, सॉरी ना, माझं चुकलं, ऐक ना..."
मला काही बोलायचं नव्हतं, मी बाथरूम मधून बाहेर आले, नितीन माझ्या मागे मागे करत होता.

"सायली ऐक ना, काल रात्री मी घाबरलो" मी थांबले, मी त्याच्याकडे बघितले.
"तू असं का केलंस, दरवाजा का लावून घेतलास? मी घाबरलो होतो, प्लीज असं कधी करू नको प्लीज!" असे म्हणत त्याने माझा दंड पकडला, "हात सोड" मी शांतपणे, आवाजात जरब ठेऊन म्हणाले, त्याने लगेच हात सोडला.

मी फ्रिज मधून दूध काढले, चहाचं भाडं बाहेर काढलं, "थांब मी करतो" माझ्या हातातून भाडं काढून घेत नितीन म्हणाला. मी त्याच्याकडे न बघत, दिवाणखाण्यात गेले, टीव्ही लावला, पण जशी मी सोफ्यावर बसले तसे मला जाणवले, माझी झोप पूर्ण झाली नाहीये, मी एका बाजूने कलंडले, परत झोपले.
नितीनने गरम चहाच्या कपाने, माझ्या दंडावर चटका दिला, तशी मी दचकून जागी झाले, नितीन हसला, मला हसवण्याचा प्रयत्न केला, पण मी रागाने बघत त्याच्या हातातून चहाचा कप घेतला, चहा पिऊ लागले.
"कसा झालाय?"
मी काही उत्तर दिले नाही.

"आपण एक मेड ठेऊ, ती करेल स्वयंपाक, मी वॉचमनला विचारतो, त्याच्या ओळखीची असेल कोणीतरी"
मी काही म्हटले नाही.

"तुला ऑफिसला सोडू?"
मला काहीच बोलायचं नव्हतं.

"वाटेत नाश्ता करू"
मी काही म्हटले नाही, मी चहा संपवला आणि ऑफिसला जायची तयारी करू लागले.

नितीनने माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण मला त्याचे तोंड सुद्धा बघायचं नव्हतं, अशी भांडण कधीतरी मधून होत असतं, पण आता सवयीचं झालं होतं. मला त्याच्या "सॉरी" चा आता कंटाळा येऊ लागला होता, काय तेच परत सॉरी आणि मी लगेच त्याला माफ करू का? कशाला? काय गरज आहे? आधी त्रास द्यायचा आणि मग फक्त सॉरी!!
मी त्याला काही न सांगता, घरातून निघाले, घराचा दरवाजासुद्धा लावला नाही.

संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेला, नितीन माझ्या ऑफिसला आला, असा अचानक कधी, आला नव्हता. मला त्याच्या बरोबर जायचं नव्हतं पण आमची भांडण जगजाहीर करायची नव्हती, काही गत्यंतर नव्हतं, मला त्याच्या बाईकवर बसावं लागलं, त्याने बोलायचा भरपूर प्रयत्न केला पण त्याला मी भीक घातली नाही, त्याने बाईक मॉल जवळ थांबवली.
"मी पिक्चरला येणार नाही" मी सावकाश म्हणले.
"अग चल ना, मस्त पिक्चर आहे, रिव्ह्यूज पण चांगले.."

मी बाईक वरून उतरले, शांतपणे चालायला लागले, तसा नितीन माझ्यामागे धावत आला, माझ्या समोर येऊन थांबला.
"थांब ना, ओके ऐक, इथेच जेवण करू, सुशी खाणार?" नितीनने विचारले, मला खूप भूक लागली होती, पण कंटाळा सुद्धा आला होता, सगळ्याचा, ह्याचा, सॉरीचा, लग्नाचा, या मॉलचा, या शहराचा..पण जाऊ दे, आता खाऊन घेऊ.

मला कधी जेवणावर राग काढता येत नाही, माझ्या मनात विचार डोकावला तशी मी खुद्कन हसले, स्वतःशीच आणि नितीनकडे चोरून बघितले, त्याचे लक्ष नव्हते, आता नको का तुला वरण भात? वरून तूप घेऊन? मी त्याच्याकडे बघत मनात म्हणत होते, त्याच्या लक्षात आले, त्याने भुवया उडवून "काय झाले" असे विचारले, मी साहजिकच नजर फिरवली.

मी खुप जेवले, नितीन माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण मीच टाळत होते, माझा राग अजून गेला नव्हता, आता हा दोन दिवस छान वागेल आणि परत पहिले पाढे पंचावन्न! पण असे काही झाले नाही, नितीन त्या रात्रीच्या भांडणापासून खूपच बदलला, कधी ओरडला नाही की कधी भांडला नाही, मी म्हणेल तसं, माझ्यासाठी, वेळ काढून, प्रेमाने वागत होता, मला फार आश्चर्य वाटले, याला कुठल्या चांगल्या भुताने पछाडले तर नाही ना? काय जादू झाली?
माझ्यासाठी हे चांगले दिवस होते, अगदी नवीन, लग्न झाल्यासारखे, मी परत एकदा आनंदात होते, चेहऱ्यावरून दिसून दिले नाही, अजून माझा राग कायम आहे असेच भासवले.

आमच्याकडे नवीन कामवाली बाई आली, तरी हा माझ्यासाठी, माझ्या आवडीची डिश ऑर्डर करायचा, रोज कुठेतरी बाहेर घेऊन जायचा, एकदा तर माझ्यासाठी फुलं आणली, मला विचारावंस वाटलं, का इतकं चांगलं वागतोस? पण मी काही विचारले नाही, मी खुश होते, आनंदी होते. एक महिना हे सर्व चालू होतं, हा इतका कसा बदलला आहे, याचं आश्चर्य कमी आणि संशय वाढला होता, पण मी दुर्लक्ष करत होते, मी एका बॉस सारखं वागत होते, मी जे पाहिजे ते मागायचे आणि तो ते करायचा! एकदम आदर्श कर्मचारी झाला होता आणि मी एक खडूस बॉस!! पाहिजे तेव्हा, पाहिजे ते, पाहिजे तसं, काम करवून घेणारी! आपल्याला असं ऑफिस मध्ये वागता येत नाही, माज दाखवून, पण तशा वागण्याचा हेवा वाटतो, मग फक्त आपल्या घरीच कधीतरी असं वागण्याचा प्रयत्न करतो.

आमची कुकरची वरची भांडण होऊन आता एक महिना झाला होता, नितीन मला म्हणाला,
"उद्या मुंबईला जावं लागतंय, निदान एक आठवडा तरी थांबावं लागेल"
माझ्या चेहऱ्यावरची रेष सुद्धा हलली नाही. आता जरा कुठे मला आराम मिळेल, जरा कुठे मनासारखं वागता येईल.
सकाळी मला न उठवता तो मुंबईला पसार झाला आणि मला जरा कुठे स्वातंत्र मिळालं !!

मी माझ्या साऱ्या मैत्रिणींना गोळा केलं, माझ्या घरी मस्त पार्टी केली, ऑफिसला दांडी मारून हिल्स स्टेशनवर फिरायला गेले, हे किती छान होतं, फ्रेंड्स, फिरायला जाणं, गप्पा मारणं, निवांत, मनसोक्त, मनासारखं, मनापासून, जगणं, आपण उगीच लवकर लग्न केलं, जरा आरामात लग्न केलं असतं, तर किती मजा आली असती, चार पाच दिवस कसे गेले कळलं सुद्धा नाही, कोणाची कटकट नाही, की काही नाही, मस्त लाईफ होतं. मी किती तरी वर्षाने माझ्या आवडीची गाणी गात होते.

मी ट्रिप वरून परत घरी आले, बॅग ठेवली, या नितीनचा काही पत्ता नव्हता, "पोहचलास का?" असा एक मेसेज मी त्याला केला होता, त्याला सुद्धा त्याने "येस बॉस" असं उत्तर दिलं होतं, माझ्यासाठी एक नवीनच टोपणनाव शोधून काढलं होतं, पण त्यानंतर मी काही रिप्लाय नाही दिला, कशाला द्यायचा, करू दे ना त्याला रिप्लाय? मला माझ्या ट्रिपबद्दल काही सांगायचे नव्हतं, कशाला ना उगीच? याला जास्त काही गोष्टी सांगायलाच नकोत, उगीच फाटे फुटतात.

नितीनचा मेसेज आला नाही, मी दमले होते, तशीच झोपून राहिले, मस्त झोप झाल्यावर उठले, सगळी कामं आरामात करत होते, घरात पसारा दिसत होता, मी घर आवरायला घेतलं, कपडे धुवायचे होते, नितीनचे कपाट उघडले, नितीनची एक ही वस्तू कपाटात नव्हती. मी माझे कपाट उघडले, माझ्या गोष्टी जागेवरच होत्या, जश्याच्या तशा!! मग चोरी? नाही, पण माझ्या गोष्टी तर तश्याच होत्या, पण मग.. मी घरभर फिरले, नितीनच्या वस्तू शोधत, ब्रश पासून चप्पलांपर्यंत सर्व गोष्टी गायब होत्या, नितीनचे कपडे, त्याचं सामान, त्याच्या रोज वापरायच्या गोष्टी, सर्व काही, घरातून नाहीसं झालं होतं, मग याच्या वस्तू कुठे गेल्या? हा मुंबई वरून परत कधी आला? मला का नाही सांगितलं? याच सगळं सामान कुठंय?

मी पटकन नितीनला फोन केला, कॉलला काहीच उत्तर आले नाही, फोन केला एकदा, दोनदा आणि बऱ्याच वेळा, पण त्याचा फोन लागला नाही, मी दुसऱ्या नंबरने फोन केला त्याने माझा आवाज ऐकून फोन कट केला. मी त्याला व्हाट्सअँप वर मेसेज केले, पण काही उत्तर मिळाले नाही. माझी नजर त्याच्या व्हाट्सअँप स्टेटस वर गेली, त्याने अगदी मराठीत एका शब्दाचा स्टेटस ठेवला होता, अशा परिस्थितीत ते बघून मी हसले सुद्धा, तो शब्द होता "सुटका"

मी जरा शांत बसले, नेमकं काय होतं आहे याचा विचार करू लागले आणि हळू हळू गोष्टी उलगडायला लागल्या, माझी आणि नितीनची सुरुवात तर छान होती मात्र आमचं त्यानंतर सगळंच बिघडलं, पटलं मात्र काहीच नाही. हे आमच्या दोघांच्या मनात कुठेतरी साचलेलं होतं, त्यामुळे आम्ही दोघेही गुदमरलेलं होतो.

एकमेकांपासून वेगळं कधीतरी होणारच होतो, पण मग भांडणं करून, त्रास देऊन, अपमान करून, अपमान पुरवून कशाला ना ब्लड प्रेशर वाढवायचं? सहज वेगळं होता येतील, हे न सांगता नितीनने करून दाखवलं. त्याला एका चांगल्या वळणावर निरोप घ्यायचा होता, त्याने स्वतःला ही त्रास करून घेतला नाही आणि मला ही त्रास होणार नाही याची काळजी घेतली.
नातं प्रत्येक दिवशी तुटत असताना, त्याने एका क्षणात सगळे संबंध तोडले.

त्यानंतर मी आणि नितीन कधी भेटलो नाही, बोललो नाही, आम्ही भेटलो ते घटस्फोट घेताना, त्याचे दोन मित्र त्याच्या बरोबर आले होते, नितीन मोजकंच बोलला आणि निघून गेला. कायमचा. आम्ही वेगळे झालो ते चुकीचं होतं की बरोबर हा प्रश्न उरतच नाही, पण आम्ही कसे वेगळे झालो हे माझ्या कायम लक्षात राहील.

कधी आठवण आली मी त्याचे व्हाट्सअँप स्टेटस बघते, त्यावरून कळते की तो काय करत असेल, अजूनपण एकाच शब्दाचे स्टेटस ठेवतो, त्याने एकदा "लिसा" नावाने स्टेटस ठेवला होता, नवीन मुलगी भेटली वाटतं? का माझी आठवण आली म्हणून? काही असेल, त्याच्या सायलीची आता मात्र लिसा झाली होती.

-चैतन्य रासकर
https://www.facebook.com/chaitanya.raskar.5

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान !

नाही आवडली कथा...इतकं टोकाचं भांडणारी लोक मला खरच आवडत नाहित...हे.मा.वै.म.
बाकी तडजोड नाव का दिलंय कथेला ते नाही कळलं

ती पोरगी थोडी सायको वाटली,
माझ्या एका मित्राची बायको आहे अशी, घरगुती भांडणात नवऱ्याला आणि स्वतः:ला इजा करून घेणारी.
बाकी नितीन शहाणा निघाला,

@mr.pandit @बोबडे बोल @Mayur Mahendra ...@चैत्राली उदेग @कल्पना१ @र।हुल @पाथफाईंडर

धन्यवाद Happy

@सिम्बा

मला वाटतं की दोघांनी तसं ताणलं, यात दोष कोणाला देऊ नये, कधीतरी परिस्थिती बिकट असते, बऱ्याच गोष्टीचा ताण असतो, काय करावे ते कळत नाही, आणि मग आपण काहीतरी वेडेपणा करतो, त्याचा दुसऱ्याला त्रास होतो, किंवा आपण स्वतःला त्रास करून घेतो, खरतर तेव्हा स्वतःला किंवा दुसऱ्याला त्रास कसा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी आणि जर शेवट करायचा असेल तर तो कमी गोड होऊ शकतो

आवडली कथा. परफेक्ट रेखाटलंय दोघांचं नातं.
नितिनचा निर्णय खरंच वेगळाच आहे.
शेवटी लिसाने गुढ तयार केलंच.

अप्रतिम, छान कथा, सायलीच्या मनातील गुंतागुंत अगदी सहजपणे दाखवली आहे, शेवट ही अनपेक्षित आहे, खूप आवडली

छान कथा..
शेवटी लिसाने गुढ तयार केलंच. >> +१

कथा नाही आवडली.
एक वाक्य चांगलंच खटकलं >> नवरा निदान इंजिनियर असावा, असा बीकॉम, बेअक्कल नको >> बी कॉम करणारे बेअक्कल असतात असं जनरलायझेशन का?

दक्षिणा ताई,
बीकॉम जरी असला तरी त्याने शेवटी निर्णय व्यवस्थित घेतला, भांडणे केली नाहीत, तो हुशार आहे हेच दाखवले आहे, मी स्वतः बीकॉम आहे, मला नाही वाटत जनरलायझेशन वगैरे केलेल आहे,

@सनव @मेघा. @सस्मित @टकमक टोक @चैत्रगंधा @नँक्स

धन्यवाद, तुमच्या प्रतिक्रिया वाचून छान वाटलं Happy

माझ्या मते "सायलीची लिसा झाली" याचे दोन अर्थ होऊ शकतात, एकतर नितीन आता सायलीपेक्षा अत्यंत विरोधी व्यक्तिमत्व असलेल्या मुलीच्या प्रेमात आहे किंवा या सर्व प्रकारामुळे सायलीच्या मानसिकतेमध्ये खूप बदल झाला आहे त्यामुळे, हा बदल तिच्या या वाक्यातून तिला जाणवला.

@दक्षिणा
दक्षिणा यांचा राग मी समजू शकतो.
मी सामान्यीकरण (जनरलायझेशन) केलेलं नाही, कारण माझा त्यावर विश्वास नाही.
सायलीला एका इंजिनियर असेलेल्या व्यक्तीशी लग्न करायचे होते, तिची ही साधी अपेक्षा होती, पण तसे काही झाले नाही, ती खंत तिच्या मनात सलत होती, जेव्हा भांडणे झाली तेव्हा नितीनच्या प्रत्येक गोष्टीच्या राग तिला आला, त्याच्या खाण्या पिण्याच्या सवयी, त्याचा अबोलपणा, त्याचे शिक्षण, तिला वेळ न देणं हे सर्वकाही!
इथे इंजिनियर सरस असतात किंवा बीकॉम करणारे सरस नसतात, असे सांगण्याचा कुठलाही हेतू नव्हता, भावनिक बुद्धिमत्ता आणि शैक्षणिक बुद्धिमत्ता ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

निस्तुला आणि राहुल, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात Happy

मलाही नाही आवडली हि कथा.... "अति" च वाटलं सगळं.

(तुमच्या आधीच्या कथा वाचल्या आहेत, त्यामुळे हि तितकी नाही पटली)

@अॅमी @अदिति

धन्यवाद Happy आता मी गुढ कथाच लिहितोय, लवकरच पोस्ट करेन.

Pages