बाष्कळ बालिश बाहुल्यांचा खेळ - बाहुबली !

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 May, 2017 - 12:01

बाष्कळ बालिश बाहुल्यांचा खेळ - बाहुबली !

बाहुबली क्रमांक १ मी घरच्याघरी पाहिल्याने पैसे गेले नव्हते. वेळ गेला. पण आपण भारतीयांना तशीही वेळेची किंमत नसल्याने फारसे वाईट वाटले नव्हते. किंबहुना खरे सांगायचे तर थिएटरला जात पैसे घालवले नाही याचा आनंदच झालेला. पण हा आनंद वर्ष दोन वर्षच टिकला. कारण आज बाहुबली क्रमांक २ बघून आलो...

तशी काही ईच्छा आकांक्षा उत्सुकता नव्हतीच. पण गर्लफ्रेंडला बघायचाच असल्याने जाणे भागच होते. तिच्या सांगण्यानुसार "ऋ तू थिएटरात बघ, मगच तुला मजा येईल, पहिला भाग छोट्या स्क्रीनवर बघितलास त्यामुळे तुला मजा आली नाही" या युक्तीवादावर विश्वास नसूनही पर्याय नसल्याने होय महाराजा म्हणत थिएटरला पोहोचलो. असे ऐकून होतो की या चित्रपटासाठी तिकीटांचे भाव वाढवलेत. पण विश्वास ठेवा, त्यापेक्षा जास्त भाव पॉपकॉर्नचे वाढवून ठेवलेत. खरे तर त्याच नुकसानीला मनाला लाऊन घेतल्याने ईतरांना सावध करायला ईथे लिहितोय. अर्थात मी कितीही सावध केले तरी बघणारे बघणारच हे माहीत आहेच ... तरी आपण आपले कर्तव्य बजावायचे.

1) अविश्वसनीय करामती - हिरोच्या पहिल्याच एंट्रीला समजते की चित्रपटात अचाट शक्तीचे अफाट प्रयोग दाखवून लोकांचे मनोरंजन केले जाणार आहे.
ज्या मानवी क्षमतेच्या आवाक्याबाहेर आहेत अश्या कित्येक करामती हिरो करतो, आणि ज्या अचूकतेने करतो ते सारे अगदी टिपिकल सौथेंडियन स्टाईल आहे.
मागे 'नायक' सिनेमात मी अनिल कपूरला दोन बसच्या मधून एक पाय ईकडे तर एक पाय तिकडे असे सरसर वर चढताना पाहिले होते. यात बाहुबली सुसाट धावणारया बैलांवरून उड्या मारायचा खेळ करतो. एकूणच पुर्ण चित्रपटभर ईथून तिथे उड्या असा मारतो जसे बिनजाळीचा स्पायडरमॅनच..
बरं याच्या धनुष्यबाणाचा नेम ईतका अचूक की काय वर्णावे. कॅरममध्ये डबलशॉट खेळावेत तसे हा बाण मारतो. म्हणजे बघा, हा आणि देवसेना एकाच वेळी एकाच डुकराला बाण मारतात. पण याचा बाण आधी देवसेनाच्या ताशी 180 मैल वेगाने सोडलेल्या बाणाला टक्कर देत त्याला बाजूला सारतो, आणि मग तोच बाण आपली दिशा बदलत तितक्याच वेगाने धावणाऱ्या डुकराचा प्राण घेतो. काळ काम वेगाचे हे अचूक गणित जे केवळ रॉकेट सायण्टीस्टच कॉम्युटरच्या साहाय्याने सोडवू शकतात ते हा चुटकीसरशी नुसते सोडवतच नाही तर शंभर टक्के खात्रीने अंमलातही आणतो. ईतकेच नव्हे, तर आपल्या अचूकतेवर ईतका अहंकार की एकाच वेळी तीन तीन बाण असे काही सोडतो की त्यातील एक देवसेनाच्या डोक्यावरून तर उरलेले दोन तिच्या कानांजवळ शिट्टी वाजवत तिच्या मागे असलेल्या तीन शत्रूंचा वेध घेतात.
एक आपला सनी देओल होता जो साधासा हॅन्डपंप उखाडून फुशारक्या मारायचा. एक हा बाहुबली आहे जो पाकिटातून सिगारेट काढावी तसे झाड मुळापासून उखडतो.
भव्यदिव्यता तर काय म्हणावी, हजारो माणसे चाकू कोयते तलवारी घेऊन राडा करायला बाहुबलीच्या दिशेने धावत येतात पण हा जराही विचलित न होता तलवारीने सपासप कापत त्यातील दोनतीनशे जणांना बघता बघता यमसदनी धाडतो. पिक्चर संपल्यावर जेव्हा मला थिएटर बाहेर पडताना गर्दीला चिरत बाहेर पडणे अवघड जात होते तेव्हा बाहुबली हा काय महान योद्धा होता याचा साक्षात्कार झाला. जेव्हा बाहुबलीला कटप्पा मारतो (का मारतो ते मी नाही हा सांगणार) तेव्हा बाहुबलीसारखा योद्धा मरणे शक्यच नाही या निष्कर्शाप्रत मी आलेलो. त्यामुळे तो मेल्याचा सर्वात मोठा धक्का त्याच्या आई वा पत्नीपेक्षा एक प्रेक्षक म्हणून मला बसला.

2) स्पेशल ईफेक्ट - मला खरे तर या ताण्त्रिक बाबींवर हक्काने कॉमेंट करता यावे ईतका मी तज्ञ नाही. तसेच एक प्रेक्षक म्हणूनही माझ्या हे प्रकार फार आवडीचे नाहीत. बाहुबलीने यात जे काही केलेय ते करायला डमी वा स्टंटमॅन वापरायचा झाल्यास तो रजनीकांतच वापरावा लागेल अन्यथा ते स्पेशल ईफेक्टनेच साध्य होऊ शकते. त्यामुळे हे स्पेशल ईफेक्ट बाहुबली सोबतच पुर्ण चित्रपटभर पसरले आहेत. जेव्हा बाहुबली हिरोईनसोबत नाचत गात बोटीतून तिला आपल्या राज्यात नेत असतो तेव्हा काहीतरी करामत करत तो ती बोट हवेत उडवतो. गाणे संपल्यावर समजते की ते स्वप्न होते. पण पाहताना समजलेही नाही की ते स्वप्न होते. कारण बाहुबली स्पेशल ईफेक्टच्या सहाय्याने काहीही करू शकतो यावर माझा ईतका विश्वास बसला होता.

3) गाणी - या चित्रपटात गाणी तशी दुय्यमच भुमिका निभावणार याची खात्री होती. पण कशी का असेना तो वेळ काढावा लागतोच. तो असह्य व्हावा अशीच गाणी आहेत.

4) विनोद - पूर्वार्धात थोडाफार विनोदनिर्मितीचा प्रयत्न होता. सुदैवाने तो प्रयत्न थोडक्यातच आटोपला अन्यथा सौथेण्डियन विनोदाचा अत्याचार जो कधीतरी टीव्हीवर पाचदहा मिनिटांसाठी मनोरंजन करतो तो पडद्यावर सहन करने जीवावर आले असते.

5) अभिनय - चित्रपटाबद्दल चांगले लिहावे असे हे एकच. पण जाऊ दे. आज काही चांगले लिहायचा मूड नाही.

6) दिग्दर्शन - लार्जर दॅन लाईफ भव्यदिव्य दाखवणे यावरच मूल्यमापन होणार असेल तर बॉलीवूडमध्ये करण जोहार बाप ठरेल. पण त्याला नाते संबंधही चांगले दाखवता येतात. ईथे बराच बटबटीतपणा होता. सर्वात कमाल नाते तर सासूसुनेचे होते. स्वाभिमान आणि अहंकार काहीतरी फरक आहे की नाही. स्पष्टवक्तेपणा आणि फटकळपणा यातही फरक आहे की नाही. ती देवसेना राजमातेला तिच्या चुकीवर सुनवताना "आपको ईतनी भी बुद्धी नही है क्या" असले टोमणे भरदरबारात मारते. आणि हे एकदा नाही तर दोनतीनदा असे होते. मला खरेच त्या बाहुबलीची दया यायची. आता हा यात कसा सुवर्णमध्य काढतो याची उत्सुकता लागायची. पण शेवटी मेलाच त्यांच्या नादात Sad
कटप्पाने मारले वगैरे झूठ आहे सारे. त्या दोघींनी जरा समजूतदारपणा दाखवला असता तर बाहुबली आज जिवंत असता ..

7) राष्ट्रीय पुरस्कार - देऊन टाका आणखी एक. जर पहिल्याला दिला असेल तर ज्या कारणासाठी दिला ते कारण यात जरा जास्तच आहे. ज्यांना मजा आली पहिला भाग बघायला त्यांना दुसरा बघायला आणखी मजा येईल.

सारांश - या गरीब लोकांच्या श्रीमंत देशात पैश्याचा चुराडा करायचे बरेच मार्ग आहेत. हा चित्रपट त्यातल्याच एका मार्गावर चालतो आणि आपल्यालाही नेतो.
जय हिंद !

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी काही म्हणा हं, पण तिकडे देवसेनेचे फोटु पाहिले, अन एकुण एक फोटोत कपाळावर ठसठशीत कुंकु लावलेली हिरॉईन सिनेमात झळकतीये म्हणल्यावर अगदी गहिवरुन आले हो....
नाहीतर गेली कित्येक वर्षात हिंदी सिनेमात "कुंकवाला" हद्दपारच करण्यात आलेले...
तसेच तो नायक.... कपाळाला गंध वगैरे लावलेले.... छान वाटतय बघायला !
या हिरो हिरॉइन च्या कपाळीचे गंध कुंकु बघायला तरी हा सिनेमा बघणारच.

मला ते एक दोन वर्षांच्या मुलांच्या वाढदिवसाला केलेले खर्चही व्यर्थ वाटतात. मुलाला कळायला लागले की त्या वयात खर्च केले तर तो त्याचा आनंद घेऊ शकतो तसेच त्याच्या आठवणीतही राहू शकते.

अहो रुंमेश भाई- ते वाढदिसव मुलाच्या आनंदासाठी नाही तर आई बाबा च्या आनंदा साठी असतात... आणि मुलांना पण माजा येते जेंव्हा खूप दुसरी मुले येतात पार्टी ला... खेळतात मस्त...
एक सेपरेट धागा काढा..

मै हू ना चित्रपटात शाहरूखचे नाव राम आहे.
त्यात त्याचा यावर डायलॉगही आहे, सच्चे मन से पुकारो, तो राम दिख ही जायेंग.

तसेच स्वदेश मध्ये त्याने रामावर मस्त भजनही म्हटलेय.
राम तेरे मन मे है, राम मेरे मन ने है, मन से रावण जो निकाले राम उसके मन मे है

अवांतर - आज मुंबई कलकत्ता बघायला ईडनवर आलाय. समोर दिसतोय.... बदाम बदाम बदाम

असो,
तर सांगायचा मुद्दा हा की चित्रपटात मूळचा रहीमही राम दाखवतात. त्यामुळे कपाळावार कुंकू लावलेली बाई बघावी तर प्रत्यक्षात, त्यासाठी सिनेमाला जाण्यात अर्थ नाही. फसवणूक होऊ शकते. कारण चित्रपट एक व्यवसाय आहे Happy

प्रत्यक्ष समोरासमोर ऐकलेला डायलॉग.
स्थळ: आमचे खेडेगाव. (मुस्लिम लोकसंख्या ४०%)
काळः १९९८
पात्रः तीशीतला एक मुस्लिम.
संवादः "हम वो शाहरुख को मुसलमान मानतेच नही. वो असली मुसलमान नही. पिच्चरोंमें वो टिका लगाता है, मंदिरोंमे भगवान के सामने माथा टिकाता, इस्लाम में ये सब करना हराम है, पैसे के लिये इमान बेच दिया वो, हम उसको मुसलमान बिल्कूल नही मानते."

-------------------------------------

काही मुसलमान त्याला आपले मानत नाहीत
काही हिण्दू नेहमी त्याला परकेच मानतात
तरीही तो या देशातला सर्वात मोठा सुपरस्टार आहे, ब्राण्ड आहे, जाहीरातीतून सर्वाधिक चमकणारा म्हणजेच लोकप्रिय चेहरा आहे.
याचाच अर्थ वरच्या काही लोकांची टक्केवारी नक्कीच फार नाही Happy

नक्कीच नाही, माझ्यासाठी प्रेरणादायी आहे शाहरुख.

एखादा चित्रपट पाहिल्यावर त्यातल्या अभिनेत्याचा हॅन्गओवर असतो आणि तो चार चार दिवस टिकतो हे मला कळले ते शाहरुखमुळे. त्याने एक्स्प्रेस कसे व्हावे ते शिकवले, कॉन्फिडन्स शिकवला, कन्विक्शन शिकवले. इम्प्रेस करायला शिकवले. बॉडी लॅन्गवेज वापरायला, स्वतःला कॅरी करायला, आपल्याच टेचात, धुंदीत जगायला शिकवले. त्याचा सिनेमा पाहिला की शाहरुख चं भूत अंगात शिरलेलं असायचं तीन चार दिवस. जणू आपुनच शारुक...

कुठलाही गॉडफादर नसतांना, फॅमिली सपोर्ट नसतांना किंग खान होणे सोपे नव्हतेच, पण आपण ते करु शकतो, आपलं आयुष्य आपल्या टर्म्सवर आपल्याला पाहिजे तसं घडवू शकतो हा विश्वास -गरजेच्या वयात- देणारा शाहरुख होता,

प्रतिकूल परिस्थितीत आशा जीवंत ठेवणारी प्रेरणा देणारी जी व्यक्तिमत्वे आहेत त्यात अमिताभ आणि शाहरुखला नेहमीच धन्यवाद देईल... कोणी काही म्हणो. Wink

काल मस्तपैकी एकटीने थेटरात जाऊन भेळ खातखात पाहिला. सिनेमा प्रचंड आवडला. मनावाला अशक्य असणारे वीरप्रसंग आहेत खरे पण पण त्या सर्व कल्पना मस्त आहेत म्हणुन मजा येते. मुळात परीकथाच ही, त्यात सामान्य माणसाच्या मारामार्‍या शोधत कसले बसताय? त्याकरता आहेतना सलमानचे. Happy

मोठ्या पडद्यावर सर्व पहाताना, करीम/क्रीम यांचे संगीत, मागे चालत रहाणारी जोशपुर्ण गाणी, श्लोक चित्रपटगृहातल्या जबरदस्त स्पिकर्सवर ऐकताना मस्त वाटते.
डबिंग दिलेल्यांचे आवाज आवडले. केळकरांचा आवाज शोभलाय नायकाला. आता इतर डबिंग कोणी केलेत ते शोधायचे आहेत पण नायिकेचे व 'मा'चे पण आवडले.
देवसेना सुंदर दिसली तर आहेच पण तिचा राजकन्यचा डौल जास्त आवडला. दुसर्‍या धाग्यावर लिहिलेले तिचे प्रसंग मस्त आहेतच. आणि चक्क तिला जेव्हा बाळ होणार असते तेव्हा ती जाडपण दिसते, म्हणजे चेहरा वगैरे. देवसेनेसाठी अजुन ३-४ वेळेला पहावा लागेल.

आणि...... अ म रे न्द्र बा हु ब ली प्र भा स ...... राजाचा रुबाब असा काही रंगवलाय त्याने की बास्स. आणि तरीही चेहर्‍यावर फाजिल आत्मविश्वास नाही. देवसेनेबरोबर बाण चालवायच्या सिनमधे त्याची बाण चालवत जी एन्ट्री आहे ती पोज पाहुन वावावा झाले. ऋन्मेषने दुसर्‍या धाग्यात लिहिल्याप्रमाणे खरंच प्रभासने कमाल केलीये. अगदी बोटे कापल्यावरच्या सिनमधे तो दरबारात चालत येतो ती चालपण पहात रहावी अशी आहे. खुप काळानी एक सिनेमा पाहुन मजा आली कारण हिंदीतल्या नेहमीच्या गोर्‍या, कारण नसताना स्टाईल मारणर्‍या हिरोंना पाहुन कंटाळा आला होता.
आता प्रभासच्या अमरेन्द्रसाठी १०-१२ वेळा पहावा लागेल. Happy

जाताजाता, प्रभासच्या मुलाखती पाहिल्या. काय साधा माणूस आहे. डोक्यात अजुन हवा गेली नाही.

खरंच... प्रभास आणि अनुष्का फार फार च आवडले.... त्यापुढे तमन्ना अजिबात म्हणजे अजिबातच नाही आवडली... सुंदर पण नाही वाटली आणि अभिनय फार तोकडा या दोघांसमोर...
शिवगामी रम्याचा अभिनय म्हणजे खणखणीत... कटप्पा ऑल टाइम फेव आहे चेन्नई एक्सप्रेस पासून... राणाने पण खलनायक बाहुबलीला सूट होईल असा दाखवला आहे....

ऋन्मेSSष, ऋन्मेSSष, ऋन्मेSSष,
तुम्ही आता निवडणुकीला उभे रहा - कुठलाहि पक्ष असो, भरघोस बहुमताने निवडून याल. कशावरहि धागा काढाल तर पाचशे लोक येणार बघायला, लिहायला. मग तो धागा सिनेमा आवडला नाही म्हणून असो, कुणि तुमची टिंगल केली इंग्रजी येत नसण्याबद्दल असो, आपले पाच सहाशे प्रतिसाद नक्की.
तर माझे ऐका - निवडणुकीला उभे रहा. निवडणूक जिंकलीत की मग नोकरी, काम धंदा याची फिकीर नाही - नुसते सेल्फि काढल्यासारखे धागे काढत रहायचे - पं नेहेरूंचा जास्तीत जास्त वर्षे पंतप्रधान रहाण्याचा विक्रम मोडाल.

Pages