बाष्कळ बालिश बाहुल्यांचा खेळ - बाहुबली !

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 May, 2017 - 12:01

बाष्कळ बालिश बाहुल्यांचा खेळ - बाहुबली !

बाहुबली क्रमांक १ मी घरच्याघरी पाहिल्याने पैसे गेले नव्हते. वेळ गेला. पण आपण भारतीयांना तशीही वेळेची किंमत नसल्याने फारसे वाईट वाटले नव्हते. किंबहुना खरे सांगायचे तर थिएटरला जात पैसे घालवले नाही याचा आनंदच झालेला. पण हा आनंद वर्ष दोन वर्षच टिकला. कारण आज बाहुबली क्रमांक २ बघून आलो...

तशी काही ईच्छा आकांक्षा उत्सुकता नव्हतीच. पण गर्लफ्रेंडला बघायचाच असल्याने जाणे भागच होते. तिच्या सांगण्यानुसार "ऋ तू थिएटरात बघ, मगच तुला मजा येईल, पहिला भाग छोट्या स्क्रीनवर बघितलास त्यामुळे तुला मजा आली नाही" या युक्तीवादावर विश्वास नसूनही पर्याय नसल्याने होय महाराजा म्हणत थिएटरला पोहोचलो. असे ऐकून होतो की या चित्रपटासाठी तिकीटांचे भाव वाढवलेत. पण विश्वास ठेवा, त्यापेक्षा जास्त भाव पॉपकॉर्नचे वाढवून ठेवलेत. खरे तर त्याच नुकसानीला मनाला लाऊन घेतल्याने ईतरांना सावध करायला ईथे लिहितोय. अर्थात मी कितीही सावध केले तरी बघणारे बघणारच हे माहीत आहेच ... तरी आपण आपले कर्तव्य बजावायचे.

1) अविश्वसनीय करामती - हिरोच्या पहिल्याच एंट्रीला समजते की चित्रपटात अचाट शक्तीचे अफाट प्रयोग दाखवून लोकांचे मनोरंजन केले जाणार आहे.
ज्या मानवी क्षमतेच्या आवाक्याबाहेर आहेत अश्या कित्येक करामती हिरो करतो, आणि ज्या अचूकतेने करतो ते सारे अगदी टिपिकल सौथेंडियन स्टाईल आहे.
मागे 'नायक' सिनेमात मी अनिल कपूरला दोन बसच्या मधून एक पाय ईकडे तर एक पाय तिकडे असे सरसर वर चढताना पाहिले होते. यात बाहुबली सुसाट धावणारया बैलांवरून उड्या मारायचा खेळ करतो. एकूणच पुर्ण चित्रपटभर ईथून तिथे उड्या असा मारतो जसे बिनजाळीचा स्पायडरमॅनच..
बरं याच्या धनुष्यबाणाचा नेम ईतका अचूक की काय वर्णावे. कॅरममध्ये डबलशॉट खेळावेत तसे हा बाण मारतो. म्हणजे बघा, हा आणि देवसेना एकाच वेळी एकाच डुकराला बाण मारतात. पण याचा बाण आधी देवसेनाच्या ताशी 180 मैल वेगाने सोडलेल्या बाणाला टक्कर देत त्याला बाजूला सारतो, आणि मग तोच बाण आपली दिशा बदलत तितक्याच वेगाने धावणाऱ्या डुकराचा प्राण घेतो. काळ काम वेगाचे हे अचूक गणित जे केवळ रॉकेट सायण्टीस्टच कॉम्युटरच्या साहाय्याने सोडवू शकतात ते हा चुटकीसरशी नुसते सोडवतच नाही तर शंभर टक्के खात्रीने अंमलातही आणतो. ईतकेच नव्हे, तर आपल्या अचूकतेवर ईतका अहंकार की एकाच वेळी तीन तीन बाण असे काही सोडतो की त्यातील एक देवसेनाच्या डोक्यावरून तर उरलेले दोन तिच्या कानांजवळ शिट्टी वाजवत तिच्या मागे असलेल्या तीन शत्रूंचा वेध घेतात.
एक आपला सनी देओल होता जो साधासा हॅन्डपंप उखाडून फुशारक्या मारायचा. एक हा बाहुबली आहे जो पाकिटातून सिगारेट काढावी तसे झाड मुळापासून उखडतो.
भव्यदिव्यता तर काय म्हणावी, हजारो माणसे चाकू कोयते तलवारी घेऊन राडा करायला बाहुबलीच्या दिशेने धावत येतात पण हा जराही विचलित न होता तलवारीने सपासप कापत त्यातील दोनतीनशे जणांना बघता बघता यमसदनी धाडतो. पिक्चर संपल्यावर जेव्हा मला थिएटर बाहेर पडताना गर्दीला चिरत बाहेर पडणे अवघड जात होते तेव्हा बाहुबली हा काय महान योद्धा होता याचा साक्षात्कार झाला. जेव्हा बाहुबलीला कटप्पा मारतो (का मारतो ते मी नाही हा सांगणार) तेव्हा बाहुबलीसारखा योद्धा मरणे शक्यच नाही या निष्कर्शाप्रत मी आलेलो. त्यामुळे तो मेल्याचा सर्वात मोठा धक्का त्याच्या आई वा पत्नीपेक्षा एक प्रेक्षक म्हणून मला बसला.

2) स्पेशल ईफेक्ट - मला खरे तर या ताण्त्रिक बाबींवर हक्काने कॉमेंट करता यावे ईतका मी तज्ञ नाही. तसेच एक प्रेक्षक म्हणूनही माझ्या हे प्रकार फार आवडीचे नाहीत. बाहुबलीने यात जे काही केलेय ते करायला डमी वा स्टंटमॅन वापरायचा झाल्यास तो रजनीकांतच वापरावा लागेल अन्यथा ते स्पेशल ईफेक्टनेच साध्य होऊ शकते. त्यामुळे हे स्पेशल ईफेक्ट बाहुबली सोबतच पुर्ण चित्रपटभर पसरले आहेत. जेव्हा बाहुबली हिरोईनसोबत नाचत गात बोटीतून तिला आपल्या राज्यात नेत असतो तेव्हा काहीतरी करामत करत तो ती बोट हवेत उडवतो. गाणे संपल्यावर समजते की ते स्वप्न होते. पण पाहताना समजलेही नाही की ते स्वप्न होते. कारण बाहुबली स्पेशल ईफेक्टच्या सहाय्याने काहीही करू शकतो यावर माझा ईतका विश्वास बसला होता.

3) गाणी - या चित्रपटात गाणी तशी दुय्यमच भुमिका निभावणार याची खात्री होती. पण कशी का असेना तो वेळ काढावा लागतोच. तो असह्य व्हावा अशीच गाणी आहेत.

4) विनोद - पूर्वार्धात थोडाफार विनोदनिर्मितीचा प्रयत्न होता. सुदैवाने तो प्रयत्न थोडक्यातच आटोपला अन्यथा सौथेण्डियन विनोदाचा अत्याचार जो कधीतरी टीव्हीवर पाचदहा मिनिटांसाठी मनोरंजन करतो तो पडद्यावर सहन करने जीवावर आले असते.

5) अभिनय - चित्रपटाबद्दल चांगले लिहावे असे हे एकच. पण जाऊ दे. आज काही चांगले लिहायचा मूड नाही.

6) दिग्दर्शन - लार्जर दॅन लाईफ भव्यदिव्य दाखवणे यावरच मूल्यमापन होणार असेल तर बॉलीवूडमध्ये करण जोहार बाप ठरेल. पण त्याला नाते संबंधही चांगले दाखवता येतात. ईथे बराच बटबटीतपणा होता. सर्वात कमाल नाते तर सासूसुनेचे होते. स्वाभिमान आणि अहंकार काहीतरी फरक आहे की नाही. स्पष्टवक्तेपणा आणि फटकळपणा यातही फरक आहे की नाही. ती देवसेना राजमातेला तिच्या चुकीवर सुनवताना "आपको ईतनी भी बुद्धी नही है क्या" असले टोमणे भरदरबारात मारते. आणि हे एकदा नाही तर दोनतीनदा असे होते. मला खरेच त्या बाहुबलीची दया यायची. आता हा यात कसा सुवर्णमध्य काढतो याची उत्सुकता लागायची. पण शेवटी मेलाच त्यांच्या नादात Sad
कटप्पाने मारले वगैरे झूठ आहे सारे. त्या दोघींनी जरा समजूतदारपणा दाखवला असता तर बाहुबली आज जिवंत असता ..

7) राष्ट्रीय पुरस्कार - देऊन टाका आणखी एक. जर पहिल्याला दिला असेल तर ज्या कारणासाठी दिला ते कारण यात जरा जास्तच आहे. ज्यांना मजा आली पहिला भाग बघायला त्यांना दुसरा बघायला आणखी मजा येईल.

सारांश - या गरीब लोकांच्या श्रीमंत देशात पैश्याचा चुराडा करायचे बरेच मार्ग आहेत. हा चित्रपट त्यातल्याच एका मार्गावर चालतो आणि आपल्यालाही नेतो.
जय हिंद !

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॅरी पॉटर च उल्लेख झालाय वरती, अहो तो बोलून चालून जादूची दुनिया असलेला चित्रपट होता. इथे दाखवताना मानवी पातळीवर प्रसंग घ्यायचे आणि रजनीकांतच्या बापालाही जमणार नाही असले अचाट साहस करायला लावायचे याला काय अर्थ आहे का.
त्यांना मग देव आणि राक्षस असं तरी दाखवायचं.
आणि हॅरी थोडे तरी लॉजिक पाळतो, इथे म्हणजे लॉजिक, पटकथा सगळं काही रानोमाळ पळून गेलंय.

तमाम कट्टरपंथींसाठी आणि शाहरुख द्वेषकर्यांसाठी एक सांगु इच्छितो की बाहूबलीच्या VFX साठी तब्बल २०-२५ कंपन्यांना काम दिले होते त्यातील एक रेडचिली ही शाहरूखची कंपनी आहे. प्रभास आणि अनिष्कावर चित्रित झालेले गाण्याचे VFX संपुर्णपणे रेडचिली च्या एक्स्पर्ट्सनी तयार केले आहे.
आणि मुख्य म्हणजे ज्याच्या पैश्यातून हा "थोर हिंदु संस्कृती दाखवणारा चित्रपट" तयार झाला तो म्हणजे "करण जोहर" आहे. Wink

मानवीपातळीवर अचाट साहस करतांना दाखवल्यामुळे कुनाच्या भावना दुखावल्यात का? आयोडेक्स लावा... Happy

मानवीपातळीवर अचाट साहस करतांना दाखवल्यामुळे कुनाच्या भावना दुखावल्यात का?

>>
असे अचाट साहस करणारा एक मानव भारतात आहे. बाहुबलीची प्रतिमा त्याहूनही उत्तुंग दाखवली म्हणून कदाचित भावना दुखावल्या गेल्या असाव्यात. Happy

फक्त बाहुबलीच नव्हे काय, तो अचाट भीमशक्तीचा त्याचा भाऊ, कटाप्पा, सगळ्या राण्या, राजमाता इतकेच काय कुठलाही साधा माणूस पण येतोय ते कायतरी उडून बिडून राहीला राव.

च्यामारी शेकडो फूट उंचीवरून पडून पण खरचटत नाही, जमिनीवर गुढगा आपटला की सरोवरात लाटा येतात, ढाली घेऊन सैनिक हवेत गोल गोल उडत जातात आणि पाय टेकताक्षणी लढायला लागतात.

कुणीतरी यांना ट्रॉय, ग्लॅडीएटर दाखवा रे...तिथेही पौराणिकच युद्धे घेतली आहेत, अतिशयोक्ती तिथेही आहे थोडीफार, पण हे म्हणजे शेवटी शेवटी असह्य होत गेलं

असे अचाट साहस करणारा एक मानव भारतात आहे. बाहुबलीची प्रतिमा त्याहूनही उत्तुंग दाखवली म्हणून कदाचित भावना दुखावल्या गेल्या असाव्यात.

रजनीअण्णांचा केवळ एकमात्र चित्रपट पाहिला तो म्हणजे रोबोट. आणि त्यातही अतिशयोक्ती असली तरी बरीच सुसह्य होती. मुळात रजनीअण्णा माणूस रुपात माणसासारखेच राहतात. गुंडापासून पळ काढतात.

आणि रजनीअण्णा काय आमचे काका, मामा नव्हेत त्यांच्याहून काही भारी दाखवल्याने भावना दुखवायला. च्यामारी, कुठल्याच हिरो, हिरवीनीशी काय घेणं देणं नाही आपल्याला. जे दाखवताय ते किमान बरं असावं अशी किमान अपेक्षा आहे.

आशुभौ, दर शुक्कीरवारी शेकड्यानी चित्रपट निघतात... फाइन आर्टवाला कमर्शियल धंदा हाय त्यो... आधी बनवावा लागतो, मग पब्लिक ओपिनियन देतं.. तेन्ला आवडलं तर पैसे वसूल, नायतर कोनत्या धुळीत पडलेत शेकडो दिग्दर्शक आणि त्यांचे हजारो चित्रपट माहिती नाहीओ लोकास्नी....

द्सरं असं की तुमची अपेक्षा, तिचा आदर आहे, पण सिनेमाकर्त्यावर लादणे (कलाकृती कशी असावी अशी अपेक्शा व्यक्त करणे म्हणजे लादणेच होय बरं का!) चुकीचे आहे बघा... आता असं असतं की कमर्शियल सिनेमाने तुम्हाला 'जे कबूल केलंय, ते दाखवलं नाही, कबूल केल्यापेक्षा भलतंच दाखवलं' तर असे आक्षेप जब्रा बरोबर असतात. पण 'तुमच्या अपेक्षेप्रमाणे' चित्रपटात दिसलं नाही ह्याला सिनेमाकर्ते जबाबदार नाहीत.... नोंद करुन घ्या अ‍ॅन्टी-बाहुबली-पिप्पल.... Wink

(आणि हे मजामस्करीत लिहितोय, कुनाच्याबी भावना दुकावल्यातर मी जबाबदार न्हाय...)

प्रभास आणि अनुष्काची केमिस्ट्री मस्त!! पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग खरंच मस्त झालाय. >>> +१ अनुष्का शेट्टीसाठी तीनदा पाहिला , तीरंदाजी आणि तलवारबाजी करताना कसली से# दिसते , अजुन एकदा सिनेमा बघण्याची इच्छा आहे Wink Proud

आजकाल पिच्चर आवडण्यासाठी तुम्हाला त्यातला हिरो हिंदु का मुस्लिम, तो चॅरिटी करतो का नाही, त्याची पाकिस्तानविषयक काय मतं आहेत, डायरेक्टर ची मतं हिंदुत्ववादी आहेत का उलट इत्यादी गोष्टींवर अवलंबून रहावे लागते. त्यावरुनच दोन्ही कँपमधली लोकं ठरवतात पिच्चरला चांगलं म्हणायचं की वाईट ते.
हळूहळू माझ्यासारखे सैराट आवडणारे मनुवादी किंवा कट्यार आवडणारे कम्युनिस्ट किंवा बाहुबली अजिब्बात न आवडणारे हिंदुत्ववादी आता म्युझियममध्येच सापडणार.

आजकाल पिच्चर आवडण्यासाठी तुम्हाला त्यातला हिरो हिंदु का मुस्लिम, तो चॅरिटी करतो का नाही, त्याची पाकिस्तानविषयक काय मतं आहेत, डायरेक्टर ची मतं हिंदुत्ववादी आहेत का उलट इत्यादी गोष्टींवर अवलंबून रहावे लागते. त्यावरुनच दोन्ही कँपमधली लोकं ठरवतात पिच्चरला चांगलं म्हणायचं की वाईट ते.
हळूहळू माझ्यासारखे सैराट आवडणारे मनुवादी किंवा कट्यार आवडणारे कम्युनिस्ट किंवा बाहुबली अजिब्बात न आवडणारे हिंदुत्ववादी आता म्युझियममध्येच सापडणार.
+ १००००

५००-५०० रुपयाचे चे तिकीट काढून असल्या चित्रपटावर पैसे खर्च करण्यापेक्षा शहीद जवानांच्या रिलिफ फंड मधे टाकावे. >> ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील याची गॅरंटी काय??? शहिदांसाठी काही करायचा आणि पिक्चर दोनदा बघण्याचा संबंध काय???

नताशा, सहमत. सिनेमा आहे, सिनेमा समजून आनंद घ्यावा.

आजकाल पिच्चर आवडण्यासाठी तुम्हाला त्यातला हिरो हिंदु का मुस्लिम, तो चॅरिटी करतो का नाही, त्याची पाकिस्तानविषयक काय मतं आहेत, डायरेक्टर ची मतं हिंदुत्ववादी आहेत का उलट इत्यादी गोष्टींवर अवलंबून रहावे लागते. त्यावरुनच दोन्ही कँपमधली लोकं ठरवतात पिच्चरला चांगलं म्हणायचं की वाईट ते.>>> अगदी.
हे सगळे कधीपासून सुरु झाले? गेल्या ६० वर्षात न झालेल्या गोष्टींच्या यादीत हा 'प्रत्येक गोष्टीत पोलरायझेशन'चा येडचापपणा अ‍ॅड करा.

सारांश - या गरीब लोकांच्या श्रीमंत देशात पैश्याचा चुराडा करायचे बरेच मार्ग आहेत. हा चित्रपट त्यातल्याच एका मार्गावर चालतो आणि आपल्यालाही नेतो. >>>>>> एकदम सही ! प्रचंड अनुमोदन !!

असे कसे विनिता ताई. जर शाहरुख अमिर यांचे चित्रपट बघू नये ते पैसे सैनिकांना दान करावे अशी जेव्हा आरोळी कट्टरपंथी ठोकतात (त्यात इथले काही लोक सुध्दा आहेत) ते पैसे कसे पोहचतात? तसेच बाहुबलीचे पैसे ही पोहचतील ना? तेव्हा बरे असे प्रश्न कुणाला पडत नाही Wink

सारांश - या गरीब लोकांच्या श्रीमंत देशात पैश्याचा चुराडा करायचे बरेच मार्ग आहेत. हा चित्रपट त्यातल्याच एका मार्गावर चालतो आणि आपल्यालाही नेतो.

>>
व्वा! चित्रपट निर्मिती ‌क्षेत्रावर बंदी घालायला पाहिजे नाही का? Happy

गजोधर भाऊ, तुम्ही तुमच्या मार्गाने जा. कृपा करुन माझ्या पोस्टना टारगेट करु नका.
या धाग्यावर माझी ही शेवटची पोस्ट ___/\___

शेवटचा dialogue हा एपिक होता. जेव्हा भल्लालदेव देवसेनेला म्हणतो, " चलो देवसेना साथ मे मरते है " तिथे हहपुवा झाली.

हो ना, तो काय तिच्या प्रेमात होता असेच वाटले.
आधी पण तिला म्हणतो, इतकी वर्षे माझ्या सोबत राहिलिस आणि आता सोडून गेलीस, हे काय बरोबर नाही.
मुळात त्याला काय बायका पोरे दाखवली नाहीत, का म्हणे?
इतक्या मोठ्या वयाचा झाला तरी

मुळात त्याला काय बायका पोरे दाखवली नाहीत, का म्हणे? >> ओ दाखवली की पहिल्या भागात. त्याच्या मुलाचा शिरच्छेद शिवाडू करतो.
फक्त त्याची बायको कोण होती हे अजुन गुपित आहे. बहुदा ३ र्‍या भागात दाखवतील

तो मुलगा होता होय त्याचा, देवसेना हातात डोके घेऊन येते तो? मला वाटलं सावत्र भाऊ धाकटा

भावी राजा मेल्याचे फारसे कुणाला काही वाटत नाही का मग? त्या कपटी लुळ्या बापालाही नाही?

तिसरा भाग येणार असेल तर पाच वर्षांनी आणा मग. पंचवार्षिक योजनेचा लाभ घेऊन नागरिक बघू शकतील. तेव्हा तर तिकिटे काय दराने विकतील देव जाणे

भावी राजा मेल्याचे फारसे कुणाला काही वाटत नाही का मग? त्या कपटी लुळ्या बापालाही नाही? >>> तो भाग बहुदा एडीटींग मधे गेला. कारण जेव्हा हा प्रसंग घडतो त्यानंतर भुतकाळातील अमरेंद्र बाहुबलीची गाथा कटप्पा सांगायला सुरु करतो आणि त्यातच चित्रपट संपतो. दुसरा भाग सुध्दा भुतकाळातील अमरेंद्र बाहूबली वरुन सुरु होतो. चित्रपट जेव्हा वर्तमान काळात येतो तो पर्यंत अर्ध्याहून अधिक चित्रपट पुर्ण झालेला आहे. वर्तमान काळात आल्यावर शिवाडू सरळ युध्दाचीच घोषणा करताना दाखवले आहे. हे एडीटींग गंडल्याचे द्योतक आहे.

चलो देवसेना साथ मे मरते है " तिथे हहपुवा झाली.
>>>>>
हाहा अगदी अगदी Lol
मी तर आजूबाजुंच्या लोकांकडे बघू लागलो.. कोणाला तरी समजले का याने काय कॉमेडी डायलॉग मारला.. म्हणजे ते शक्ती कपूर सारखे व्हिलन असतात त्यांना मरता मरता हे शोभून जाते.. पण तू माणूस काय, तुझे कॅरेक्टर काय, आणि तू बोलतोयस काय

रामायणावरून घेतला आहे तो सीन. बल्लाळने देवसेनेला आपल्या ताब्यात ठेवणे आणि प्रेमात पडल्याने म्हणा का आणखी कुठल्या कारणाने गैरफायदा न घेता केवळ बंदी बनवून ठेवणे. तरी आठवतच होतो की कुठेतरी पाहिलाय हा सीन ..

Pages