माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुद्ध लेबनीज दहीच आणते कुठल्याही अफगाणि, इराणी दुकानातून. आधी ग्रीक योगर्ट आणायचे.
आता हे आणले की मस्त हॅंड मिक्सीने फ्टले नी दूध मसाला घातला की झाले. आवड्लए बर्‍याच वेळा लोकांना. (त्यांना सांगायचे नाही आधी, खावून झाले की काही लोकं ... वाटलेच थोडे तरी काही वेगळे. पण त्यांनीच चार डाव घेवून खावून आधी तारीफ केली असते. Happy

मराठी कुडी, तू नविनच पोळ्या करायला लागली आहेस का? कारण तीन एक वर्षांपूर्वी सवय नसल्याने माझ्या पोळ्या अशाच होत असत.मी पण कणकेचे खूप ब्रँडस बदलले.पण आता सवय झाल्याने कुठल्याही कणकेच्या चांगल्या पोळ्या करु शकते.रुनीच्या टिप्स ट्राय कर नाहीतर हळूहळू सवय होईल तश्या चांगल्या पोळ्या जमतील Happy
इथे मिळणारी कणिक तशी ठीक असते.अजून एक पोळी लाटताना थोडी जाड लाटून बघ.

मराठी कुडी, आशिर्वाद चांगला आहे. मी तोच वापरते. सुजाताही चांगला आहे. कणकेत जरं रवाळ, खरखरीत कणीक आली असेल तरी पोळ्या बिघडतात. तसंच कणीक भिजवताना कोमट पाणी घातलंत तरी चालेल. हळूहळू अंदाज घेत घाला. खूप पाणी घातलं किंवा जास्त तेल घातलं तरी पोळ्यांचं तंत्र बिघडतं. तसंच कणीक भिजवून एक दहा पंधरा मिनिटं झाकून ठेवा आणि मग लाटायला घ्या. गॅस मध्यम असायला हवा.

पूर्वा, हो आत्ताच सुरुवात केलिये पोळ्या करायला. शिकायचा प्रयत्न करतीये. पहिली पोळी जाडच लाटलेली पण मग आतून कच्ची राहिली म्हणून पुढच्या पातळ लाटल्या.
सवयीचा पण प्रश्न असेल कदाचीत. Happy

सायो, मी गॅस एकदम हाय वर ठेवलेला. मध्यम वर ठेवून आणि गरम पाण्यात भिजवून पाहते आणि कळवते.
(मला अहो नका म्हणू. अग म्हट्ल तर जास्त बर वाटेल Happy )

मराठी कुडी, तुला पोळ्यांचा फार अनुभव नाही असं दिसतंय तेव्हा मी सुचवेन की चालत असल्यास आधी फुलके करुन बघ आणि हात बसला, सगळं तंत्र जमलं की पोळ्या कर.

गोल्डन टेम्पल कं.च्या कणकेची पोळी [फुलका] पांढरी-मऊ होते पण थंड झाली कि चिवट होते ..आशिर्वाद कं.च्या कणके चा फुलका थंड्/शीळा झाल्यावर ही मऊ रहातो..तेल्,गरम पाणी न घालता साध्या पाण्यात भिजवुन लगेच फुलके लाटले तरी मऊ रहातात....

चालेल, फुलके करुन बघते. फ्रोझन पोळ्या खाऊन नवरा आणि मी दोघेही खूप कंटाळलो म्हणून हा पोळ्यांचा प्रयत्न.
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद टीपांबद्द्ल. नक्की कळवेन कस जमतय सगळ. अ़जून मदतीची गरज भासेल बहुतेक.

काल दिवाळी करता म्हणुन चकल्या केल्या. छान झाल्या. चव पण छान होति आणि खुसखुशित पण झाल्या. पण तेल खुप प्यायल्या. माझं काय चुकलं असेल?
चकली चि भाजणि सा.बा. दळुन आणली होती. मी ५ कप पाणी उकळत ठेवलं. त्यात २ मोठे चमचे तेल घातलं. चवि प्रमाणे तिखट्,मिठ्,जिरे-धणे पावडर, तिळ घातले. मग त्यात ५ वाट्या भाजणी घातली. सगळं व्यवस्थित मिसळलं. पिठ पण छान घट्ट मिसळल्या गेलं.
पण इतकं तेल क पिलं ते नाहि समजलं.
काय चुकलं असेल?

अरुंधती, चकल्या बहुतेक पूर्णपणे तळल्या गेल्या नाहीत. तेलात चकली टाकल्यावर येणारे बुडबुडे पूर्ण थांबले होते का ? चकल्या काढल्यावर कढईवरच, (काठावर) झार्‍यात थोडा वेळ ठेवायच्या. मग एखाद्या कलत्या ताटात काढायच्या आणि मग कागदावर काढायच्या.
आता एक प्रयोग करता येईल. एखादी चकली एखाद्या टिश्यू पेपरमधे ठेवून कुस्करायची. चकलीत किती तेल मूरलेय ते कळेल. प्रत्येक चकली खाताना, तेवढे अनावश्यक तेल पोटात जाते.

दिनेशदा, चकल्या पूर्णपणे तळल्या गेल्या होत्या. तेल चान्गले कडकडित तापले होते. आणि तुम्हि म्हणता त्या प्रमाणे बुड्बुडे पण थांबले होते.
उकड काढताना तेल कमी पडलं असेल का?

मी काल आप्पे केले होते पण ते आतुन कच्चे राहीले. असे का झाले असेल? मी २ वाट्या तांदुळ १ वाटी चणा डाळ १ वाटी उडीद आणि थोडे पोहे

आणि आता ते खुप उरले आहेत तर त्याचे काय करता येईल?

अरुंधती, म्हणजे तेल चकलीतच मूरले (राहिले). मी वर सांगितल्याप्रमाणे एखादी चकली कागदात चुरली, तर दिसून येईल ते. अश्या तळलेल्या पदार्थातले तेल काढून टाकण्यासाठी एक घरगुति आणि एक औद्योगिक उपकरण मिळते.
आणखी एक शक्यता आहे, कढईला एखादे छिद्र असेल तर त्यातून तेल गळून गेले असेल. (आमच्या घरी झाले होते असे. )

अरुंधती, मी काही फार मोठी सुगरण आहे अस नाही, पण एक गोष्ट खटकते आहे, पाणी कप ने आणि भाजणी वाटीने असं का? सगळं सारख्या मापाने का नाही?
प्रमाण - १ भांड भाजणी, ३/४ भांड पाणी, २ चमचे (भाजी वाढायचा चमचा - टे. स्पू.) तेल, इतर पदार्थ चवीनुसार.
घेतलेली उकड थोडी घट्ट असावी. सैल असली तर चकल्यांना काटा नीट येत नाही आणि त्या तेल पितात. (अर्थात चकल्या पाडायला त्रास पण होत नाही. घट्ट उकडीला जरा नेट लागतो.)

अरे वा ! स्निग्धा हे माझ्या लक्षातच आले नव्हते. भिजवलेले पिठ सैल झाले कि, केकवर आयसिंग
केल्यासारख्या चकल्या होतात.

आत्ता लाजोच्या रेसेपीने नारळ बर्फी केली. याआधी दोन्ही वेळेला मस्त झाली होती, पण यावेळी प्रमाण घेताना घोळ घातला किंवा अजून काही केलं. त्या बर्फीच्या वड्या पडत नाहीयेत. अगदीच लगदा वाटतोय. आता त्याचं काय करावं? सुधारायचा काही चांस?
अजून एक लॉट करायचाय बर्फीचा उद्या. पण तरीही बराच नारळ उरेल. (२ मोठ्ठे नारळ आणले होते). त्यातनं उद्या दुपारीच गावाला जायचय. त्या नारळाचं काय करावं? आमच्याकडे स्वैपाकात नारळ खातच नाहीत, त्यामूळे फ्रिझर मध्ये ठेवूनही जास्त उपयोग होणार नाही.

अल्पना, एकावेळी एक मिनीट असे करत थोडे मायक्रोवेव्ह करत रहावे लागेल. मागे केले आहेस म्हणाजे तुला कन्सिस्टंसी माहिती आहे त्यामुळे तसे होईपर्यन्त मिश्रण आळवावे लागेल.

नारळाची बर्फी करता येईल उरलेल्या नारळांची.

खात नसले तरी एक दिवस वेगळे पद्ध्तीचे जेवण म्हणून नारळाचे वाटण करून चिकन करी, टोमॅटोचे सार वगैरे बनवून खिलवू शकतेस सासरच्यांना. :)( फु. स.)

त्या वड्यात बारीक रवा भाजून जरासे आणखी तूप घालून थाप. मग अवन मध्ये ठेव १०-१५ मिनीटे. होतील नीट.

म्हणजे परत ते मिश्रण मायक्रोव्हेव करु ना? मला वाटलं होतम एकदा, थोडंसं मायक्रोव्हेव करून बघावं, पण उगिच नविन भानगड नको व्हायला, म्हणून आधी इथे विचारलं.
नारळाच्या वड्या सोप्प्या असतात का करायला? मी फक्त खाल्ल्याच आहेत. जमलंच तर (म्हनजे वेळ मिळाला तर) करेन, नाहीतर कामवालीला देते नारळ.

मितान,
थोडासा (१ किलो रव्याच्या लाडवांसाठी १ कप) कच्चा पाक करून घाल त्या मिश्रणात, थोडे कोमट झाल्यावर लाडू वळ. काहीच नाही जमले, तर मुलांमधे वाटून संपवून टाक.

स्वाती, आधीच खूप गोड झालंय ते मिश्रण !
आत्ता मी नुसते उकळते पाणी घालून घालून तो खडक फोडला Proud
आता तू म्हणतेस तर थोडे कोमट असतानाच लाडू वळते. गार झाल्यावर पण कडक झाले तर रोज एक दुधात उकळवून रव्याची खीर देईन सर्वांना Biggrin

Pages