माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साबुदाणा खिचडी थोडा पाण्याचा हबका मारुन गरम करायला हवी. मग चिकटपणा आल्याने नाही तुटणार.
मला उपवासाची भाजणी तितकी आवडत नाही. कचकच लागते. या खिचडीचे वडे हि करता आले असते. शिजलेला वर्‍याचा भात पण घालता आला असता.

थंडीमूळे झाले असेल असे. भिजवताना एखादा कांदा किसुन टाकला, वा भाताची पेज टाकली तर उपयोग होतो. आताही जरा उन येईपर्यंत थांबले तर पिठ येईल.

ईडली डोश्याचे पीठ आंबवणे हिवाळ्यात जिकरीचे होते. मी अवन थोडा वेळ गरम करुन त्यात ठेवते. अवनमधला दिवा पुर्णवेळ सुरु ठेवते. पीठ चांगले आंबते. याशिवाय दुसरा काही मार्ग आहे का?

इडलीच्या पिठात नाही घालायचा कांदा. त्यावर केळीचे पान झाकायचे. यीष्ट वापरून पण फायदा होतो, पण थंडीत यातले कुठलेच उपाय चालत नाहीत. (अवन, ब्लँकेट वगैरे वापरावे लागतात.)
निकिता, पीठ भिजवताना कोमट पाणी वापरले तरी चालते. जर पिठात उडीद आणि मेथी असतील, तर पिठ सहसा दगा देत नाही.
चण्याची डाळ आणि किसलेला कच्चा बटाटा एकत्र करुन त्यावर कोमट पाणी ओतून झाकून ठेवायचे. त्या पाण्याला फेस आल्यानंतर त्या पाण्याने पिठ भिजवले, तरी ते फुगते.
नारळाच्या पाण्याने पिठ भिजवले तरी फुगते.

वड्यासाठी उड्दाच्या डाळीला भिजविताना जरा मोठे पातेले घ्यावे व भरपूर पाणी घालावे. ती थोडी एक्स्पांड होते भिजली की. शिवाय ३ तास तरी भिजू द्यावी. आमच्या इथे उल्टा प्रश्न येतो म्हण्जे जास्त फर्मेन्ट होते.
वाटून फ्रिज मध्ये ठेवावी लागते. नाहीतर फसफसते.

पोंगल वडा हा अगदी पोट भरीचा ब्रेफा आहे इथे दक्षिणेत.

दिनेशदा, माझ्यकडे ५०० ग्रॅम राजगिर्‍याचे पिठ आहे. मी ते नुकतेच विकत आणले. तर मला त्याचे काही करता येईल का? मी शीरा करणार होतो पण वर तुम्ही राजगिर्‍याच्या पिठाच्या पुर्‍यांचा उल्लेख केला म्हणून मला हा नवीन प्रकार करुन पहायला आवडेल. कृपया मला कृती देऊ शकाल का दिनेशदा? धन्यवाद.

कृति अशी काहि वेगळी नाही, नेहमीच्या पुर्‍यासारख्याच पुर्‍या. पिठ भिजवायला
कोमट पाणी वापर. या पिठात कच्चा बटाटा किसून, दाण्याचे कूट, मिरची टाकून
थालीपिठ पण करता येईल.

पीठ जास्त फर्मेंट होउ द्यायचे नसेल तर(पुरेसे फर्मेंट झाल्यावर) त्यात मीठ , हिरवी मिरची चिरुन घालावी, असे वाचले/ऐकले आहे. तशी वेळ न आल्यने आजमावलेले मात्र नाही.

इथलीच एक पाककृती वाचून मसूरची डाळ भिजवली होती. मोड आणण्यासाठी बराच वेळ नीट बांधून पण ठेवली ओवन मध्ये. पण मोड काही आले नाहीत. उलट त्या डाळीला वास मात्र यायला लागला. धुतल्यावर किंवा शिजवल्यावरपण नाही गेला. काय चुकलं माझं?

मसूरची डाळ Uhoh

डाळीला कसे मोड येणार नविना?
मोड येण्यासाठी आख्खे मसुर भिजवायला हवेत. मोड येण्यासाठी आख्ख धान्य वापरावं लागतं .

परवा नणंदेचे मिस्टर अचानक जेवायला आले. आमचा बायकांचा वरण भात मेनू होता फक्त. मग गड्बडीत पोळ्या भाजी कोशिंबीर केले. कुकरातून वरण काढले तर डाळ पूर्ण शिजली नव्हती. आता काय? मग त्यात
हिन्ग, हळद मीठ घालून मिक्षर मधून काढले व १.४ मिन मावेत गरम केले. खाली थोडी डाळ राहिली होती पण वरील लिक्विड पार्ट बरोबर झाला होता त्यामुळे इज्जत का फलुदा होते होते बच गयी. हे सर्व गड्बड
ते दोघे जेवायला बसल्यावर पोळी वगैरे जेवत होते तेवढ्यात. Happy

मामी, ब्रिलियंट! Happy
माझ्या आईची टिप : कायम डाळ धुवून किमान अर्धा तास भिजवून निथळत ठेवावी कुकरला लावायच्या अगोदर. हिवाळ्यात गरम पाण्यातच जरा भिजवावी. नाहीतर अनेकदा आयत्या वेळी डाळ अर्धवट शिजली गेल्याचे आढळते आणि मग तिला पूर्ण शिजवण्यासाठी गडबड उडते!

नविना, मी आख्खे मसूर नेहमी १०-१२ तास (रात्रभर) भिजवुन मग ज्या चाळणीत निथळते त्याच चाळणीत झाकून ठेवते. छान मोड येण्यासाठी एक दिवस आणि एक रात्र तरी ठेवावे लागतात. पण वास नाही लागला कधी. पुढल्या वेळी बांधुन ठेवु नकोस आणि अव्हनमध्ये पण ठेवु नकोस.

अच्छा, मी बांधून ठेवले आपले मटकीसारखे म्हणून असेल बहुतेक. आणि अव्हन्मधे पण ठेवले. जरा जास्तच त्रास झाला म्हणायचा त्याना. पुढल्या वेळी लक्षात ठेवीन. धन्यवाद सिंडरेला.

गेल्या आठवड्यात दोडक्याची भाजी केली. अतिसुगरणपणाचा झटका येऊन दोडक्याच्या सालींची चटणी करण्यासाठी फोडणीत साली आणि तीळ घातले. आणि मज्जा.... तेल त्या सगळ्या जिनसांच्या वर चांगलं अर्धाइंचभर आलं. Sad मग ते सगळं प्रकरण तसंच झाकून ठेवलं. इथे भुरका चटणीची पाकृ वाचली. मग घरी जाऊन त्या प्रकरणाच्या बुडाशी गॅस पेटवून त्यात चांगले मूठभर पोहे घातले. मंद गॅसवर बराच वेळ परतलं. थंड झाल्यावर त्यात मीठ, साखर, लाल तिखट घालून मिक्सरमधून एकदा फिरवलं. आणि काय झक्कास चटणी झाली महाराजा!!! Biggrin

Pages