चलनबंदी संकटातून सावरण्याकरिता.

Submitted by साती on 21 November, 2016 - 07:02

८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून रुपये पाचशे व रुपये एक हजार मूल्य असलेल्या नोटा व्यवहारातून बाद करण्याचा क्रांतिकारी निर्णय भारतीय रिझर्व बँक व भारत सरकारतर्फे घेण्यात आला. या नोटा ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत बँक खात्यांमध्ये जमा करता येऊ शकतील आणि त्यानंतर ३१ मार्च २०१७ पर्यंत रिझर्व बँकेने ठरवून दिलेल्या ठराविक केंद्रांमध्ये स्पष्टीकरणासह त्या जमा करण्याचा एक अतिरिक्त पर्यायही उपलब्ध असेल. रोखीच्या व्यवहारात वापरात आणण्याकरिता नव्या पाचशे व दोन हजार रुपये मूल्यांच्या नोटा छापण्यात येत आहेत. त्यापैकी काही नोटा आता बँकांमार्फत सामान्य नागरिकांपर्यंत पोचल्याही आहेत.

जुन्या चलनातील रुपये हजार व पाचशेच्या नोटा बाद करून नव्या पाचशे व दोन हजार रुपये मूल्यांच्या नोटा व्यवहारात आणण्याचा निर्णय घेण्यामागील दोन महत्त्वाचे उद्देश सरकारकडून जाहीर केले गेले ते खालीलप्रमाणे:-
अनेकांनी बँकांच्या खात्यांमधून देवाणघेवाणीचे व्यवहार करायचे टाळून चलनी नोटांच्या माध्यमातून मोठ्या रकमेचे व्यवहार केले असून त्याची माहिती सरकारला न दिल्यामुळे सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडला आहे. हा बुडालेला महसूल सरकारच्या विविध खात्यांचा असू शकतो. जसे की, एखादा जमिनीचा व्यवहार रोखीत झाला तर त्यावरील हस्तांतरण शुल्क जे दुय्यम निबंधक कार्यालयाकडे भरले जाते, मुद्रांक शुल्क जे महसूल विभागाकडे जमा होते आणि विक्रेत्याला मिळणार्‍या नफ्यावरील मिळकत कर जो की आयकर विभागाचा हिस्सा आहे अशी सर्वच रक्कम शासनाच्या तिजोरीत जाण्यापासून वंचित झाली. त्याचप्रमाणे एखाद्याने बुडविलेला सीमाशुल्क कर, जकात कर, स्थानिक स्वराज्य संस्था कर किंवा शासकीय / बिगर शासकीय कर्मचारी यांनी खाल्लेली लाच, माहिती अधिकार कार्यकर्ते / पत्रकार यांनी ब्लॅकमेलिंग करून मिळविलेला पैसा, अपहरण अथवा जीवे मारण्याची धमकी देऊन गुन्हेगारांनी मिळविलेली खंडणी, भुरट्या व सराईत चोर व दरोडेखोरांनी लुटीतून मिळविलेली रक्कम इत्यादी ज्यांना थोडक्यात काळे धन या वर्णनाने ओळखले जाते व ज्यांनी कधी बँक खात्यांमध्ये प्रवेश केला नाही अशा नोटा या व्यवहारातून कायमच्या हद्दपार करणे.
बनावट चलन जे की शासकीय मुद्रणालयाव्यतिरिक्त इतरत्र छापले गेलेले असल्यामुळे शासनाचे नुकसान होत असल्याने अशा चलनी नोटा कायमच्या रद्द करणे.

हे दोन्ही उद्देश कितीही चांगले असले तरीही या दोन्ही उद्देशांच्या सिद्धीकरिता नोटाबंदीचा निर्णय योग्य होता का? हा निर्णय घेऊन आता दोन आठवडे होत आले असले तरीही सामान्य जनतेचे दैनंदिन व्यवहारात जे हाल होत आहेत ते पाहता हा प्रश्न कुणालाही पडणे साहजिकच आहे. अर्थात दोन आठवडे म्हणजे फारच किरकोळ कालावधी झाला. माननीय पंतप्रधान तर स्वतःच पन्नास दिवस त्रास सहन करा असे आवाहन करीत आहेत. तज्ज्ञ मंडळी तर इतक्या प्रचंड मूल्य असलेल्या नोटांचे पुनर्मुद्रण व सामान्य जनतेत वितरण होऊन परिस्थिती सुरळीत होण्याकरिता सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतही कालावधी लागू शकतो असा अंदाज व्यक्त करीत आहेत. जनतेला होणार्‍या त्रासाबद्दल विरोधी पक्षीयांपासून तर सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांपर्यंत सर्वचजण दबक्या अथवा चढ्या आवाजात बोलत आहेत.

माझा मुद्दा वेगळाच आहे. ज्या उद्देशाने हा निर्णय घेतला गेला त्याच उद्देशांच्या पूर्तीकरिता हा निर्णय कितपत न्याय्य आहे याचा मला ऊहापोह करायचा आहे.
सर्वप्रथम काळ्या धनाचा मुद्दा घेऊ. ज्यांनी गैरमार्गाने पैसा कमावून अथवा शासनाचा महसूल बुडवून स्वतःजवळ काळे धन जमा केले आहे त्यांच्याकडील नोटा या आजवर बँक खात्यांत जमा झालेल्या नाहीत. त्या नोटा आताही बँकेत जमा होण्याची शक्यता कमीच. जरी त्या आता बँकेत जमा झाल्या तरीही त्यावरील कर / दंड योग्य प्रमाणात शासनाकडे जमा होणार म्हणजे त्या नोटा आता काळे धन न राहता पांढरे धन म्हणून ओळखले जाणार.
दुसरा मुद्दा बनावट नोटांचा. आता बनावट नोटा ओळखण्याची तपासणी यंत्रे बहुतेक बँकांमध्ये बसविण्यात आली आहेत. नोटा मोजण्याच्या (करन्सी काउंटर) यंत्रांमध्येच ही सोय आहे. अशा नोटा ८ नोव्हेंबरच्या निर्णयापूर्वी बँकेत जमा होण्याकरिता दाखल झाल्यावर लगेचच पकडल्या जात व आताही पकडल्या जातील. फक्त पूर्वी त्या व्यवहारात एकमेकांकडून स्वीकारल्या जात आणि स्वीकारणार्‍याची फसगत होऊन त्याचे आर्थिक नुकसान होई. आता त्या व्यवहारात एकमेकांकडून स्वीकारल्याच जाणार नसल्याने ही फसगत टळेल कारण जुन्या पाचशे व हजारांच्या सर्वच नोटा बाद होऊन नवीन नोटा व्यवहारात येऊ घातल्या आहेत. पण ही फसगत तरी पूर्णतः टळेल का? तर नक्कीच नाही, कारण बनावट नोटांमध्ये फक्त पाचशे व हजाराच्याच नोटा नसून शंभर, पन्नास, वीस व अगदी दहा रुपये मूल्यांच्याही बनावट चलनी नोटा व्यवहारात आहेत. फक्त जसजसे महागाई होऊन रुपयाचे अवमूल्यन होऊ लागले तसतसे लहान नोटा छापून त्यांचे वितरण करणे बनावट नोटांचे षडयंत्र चालविणार्‍यांना महाग होऊन बसल्याने त्यांनी मोठ्या नोटांवरच लक्ष केंद्रित केले होते. परंतु तरीही आर्थिक लाभ कमी असूनही लहान नोटांमध्ये पकडले जाण्याचा धोकाही कमी असल्याने लहान मूल्याच्या बनावट नोटाही व्यवहारात आस्तेकदम येतच होत्या आणि आहेतही. म्हणजे हजार व पाचशेच्या नोटा रद्द करून नव्या नोटा चलनात आल्या तरीही बनावट नोटांचा त्रास हा काही प्रमाणात तरी राहणारच.

याशिवाय काळे धन अथवा बनावट नोटा असणार्‍या ज्या नोटा जनता बँकेत भरणार नाही व स्वतःकडेच ठेवेल त्याव्यतिरिक्त बँकांमध्ये ३१ डिसेंबर २०१६ अखेर जमा होणार्‍या सर्वच हजार व पाचशेच्या नोटा या अधिकृतरीत्या पांढरे धन असणार आहेत. याच नोटा सरकार नंतर नष्ट करून त्याबदल्यात पुन्हा तितक्याच मूल्याच्या नवीन नोटांचे मुद्रण आणि वितरण याकरिता मोठा खर्च करणार. म्हणजे पाहा किती विरोधाभास आहे - ज्या बनावट किंवा काळे धन असलेल्या नोटा आहेत त्या ३१ डिसेंबर नंतरही बँकेबाहेरच राहणार तर तोवर बँकांमध्ये जमा झालेल्या नोटा या अधिकृत पांढरे धन असणार व सरकारी खर्चाने नष्ट होणार आणि ज्या बनावट किंवा काळे धन असलेल्या नोटा आहेत त्या बाहेरच राहिल्यामुळे सुरक्षित राहणार. त्यांचा व्यवहारात वापर न करता आल्याने त्यांचा संग्रहकर्त्याला काही उपयोग होणार नाही ही गोष्ट महत्त्वाची आहेच तरीही ते कागद मात्र सरकार नष्ट करणार नाही हे काहीसे विचित्र नाही का? आता ३१ डिसेंबर अखेरपर्यंत बँकेत जमा होणार्‍या पांढर्‍या धनातील हजार पाचशेच्या नोटा आणि त्या तारखेनंतरही बँकेबाहेरच असणार्‍या काळ्या धनातील हजार पाचशेच्या नोटा या दिसायला अगदी जुळ्या बहिणींप्रमाणे सारख्या असल्यानेच आतल्या चांगल्या नोटा बाहेर व्यवहारात न आणता त्यांना तिथेच नष्ट करून त्यांच्याऐवजी वेगळ्या दिसणार्‍या नोटा बाजारात आणणे म्हणजे बाहेर असणार्‍या काळ्या धनातील नोटांपेक्षा त्या वेगळ्या दिसल्यामुळे लोकांची फसगत न होता काळ्या धनातील नोटांना टाळून व्यवहार करणे जनतेला सुकर व्हावे हा सरकारचा सदहेतू आहेच याविषयी वाद नाही.

तरीही हा हेतू साध्य करण्याकरिता जुन्या नोटा नष्ट करून नव्या नोटा छापणे व पुरविणे याकरिता इतका प्रचंड मोठा खर्च करावयाची खरंच गरज होती का? त्याऐवजी सरकारने दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे व हजार रुपये मूल्य असलेले व बारकोडसारख्या सांकेतिक भाषेत अनुक्रमांक छापलेले हाय सिक्युरिटी हॉलमार्क अथवा होलोग्राम (अती सुरक्षित प्रमाणचिन्ह) स्टिकर्स बनवून ते सर्व बँकांना वितरित करायला हवे होते. त्यानंतर ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून जनतेला स्वतःजवळच्या १० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंतच्या सर्वच नोटा बँकांत जमा करण्याची सूचना करून त्यावर बँकांकडूनच नोटांच्या मूल्यानुसार त्या त्या प्रकारचे हॉलमार्क्स / होलोग्राम्स लावून घेण्याची व्यवस्था करण्यास सांगायला हवे होते. १ जानेवारी २०१७ नंतर बँकांसकट व्यवहारात इतरत्र कुठेही हॉलमार्क / होलोग्राम नसलेल्या नोटा अस्वीकृत ठरवून त्याला काळे धन ठरविता आले असते. हॉलमार्कचे वितरण आणि बँकांनी किती नोटांवर ते चिटकविले आणि खातेदारांना अदा केले यांच्या नोंदी ठेवणे हे फारसे अवघड गेले नसते. शिवाय या मार्गाने ज्यांनी दहा ते शंभर रुपयांमध्ये काळे धन साठविले आहे किंवा या मूल्यांच्या ज्या बनावट नोटा बाजारात आहेत त्याही बाद ठरविता आल्या असत्या. जुन्या नोटा नष्ट करणे, नव्या नोटांचे मुद्रण, वितरण यांचा खर्च, एटिएम मधील नोटांच्या रकान्यांची मापे बदलणे (रिकॅलिब्रेशन) या सर्वांचा खर्च, चलन तुटवड्यामुळे झालेली व्यवहारमंदी, रांगेत वाया जाणारे मनुष्यतास व होणारी प्राणहानी हे सर्व टाळता आले असते. अजूनही टाळता येऊ शकते.

आजवर बँकेत जमा झालेल्या आणि ३० डिसेंबर अखेरीपर्यंत जमा होणार्‍या नोटा या अधिकृतरीत्या पांढरे धनच ठरणार आहेत. ह्या नोटा सरकारने अजून नष्ट केलेल्या नसून त्यांची कडेकोट संरक्षणाखाली साठवणूक केलेली आहेत (हा अजून एक अतिरिक्त भुर्दंड सध्या सोसला जातोय). त्याचप्रमाणे चलन तुटवड्यामुळे झालेले जनतेचे हाल पाहता आतापर्यंत नव्या नोटांचे मुद्रण आणि वितरण हे काही फार मोठ्या प्रमाणात झालेले दिसत नाही. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाहीये. आताच सरकारने व रिझर्व बँकेने या दिशेने पावले उचलावीत. हॉलमार्क / होलोग्राम्स बनविण्याचा आणि बँक खात्यांत जमा करण्यात येणार्‍या नोटांवर ते चिकटविण्याचा निर्णय घ्यावा. अगदी रुपये दहा मूल्यापासूनच्या सर्वच नोटांचा या योजनेत समावेश करावा म्हणजे त्या नोटांच्या माध्यमात असलेले काळे अथवा बनावट नोटाही बाद होऊ शकतील. त्यानंतर ३१ डिसेंबर २०१६ अथवा ते शक्य असल्यास ३१ मार्च २०१७ या तारखेनंतर हॉलमार्क / होलोग्राम नसलेल्या नोटांना बँक व इतरत्र सर्वच व्यवहारातून अस्वीकृत ठरवून काळे धन ठरवावे. मी सुचविलेल्या उपायाचा अवलंब केल्यास अत्यंत कमी खर्चात व त्रासात काळे धन आणि बनावट नोटा चलनातून बाद करण्याचे सरकारचे उद्देश साध्य होतील यात शंकाच नाही.

इतरत्र प्रकाशित!

(हा लेख माझे माबोमित्र श्री चेतन सुभाष गुगळे यांनी लिहिला असून त्याची एक प्रत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि आर बी आयचे गव्हरनर श्री उर्जित पटेल यांनाही पाठवलेली आहे.
सध्याच्या क्रायसिसवर कोणती उपाययोजना करता येईल असा विचार करत असताना त्यांनी हे मत मांडले आहे.
मायबोलीवर हा लेख प्रकाशित करताना त्यांची परवानगी घेतलेली आहे.)

या लेखातील विषयावर आणि सुचविलेल्या उपायांवर काही चर्चा इथे अपेक्षित आहे.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढे शुद्धीकरणाचे मनावर घेतले आहे तर त्यात देशभक्ती म्हणून मदत करतो असे म्हणायचे.

<<

लाय बॅक अँड एंजॉय इट, असं प्रसिद्ध वाक्य आहे ना?

मोदी ने *तयारी* नाही केली,
हा आलोचनेचा विषय होउ शकेल..
परंतु मोदी ने *तयारीच करु दिली नाही,*
हीच विरोधी पक्षांची खरी समस्या आहे..!

या एकाच फोटोपुरत्या नकली नोट्स मर्यादित नाहीयेत . कित्येक ठिकाणी लपवलेल्या आहेत ज्या काश्मिरींना दंगे करण्यासाठी आणि सैनिकांवर दगडफेक करण्यासाठी वाटल्या जात होत्या . या नोटा कोणी छापल्या असतील सांगण्याची जरुरी आहे का ? नोटा रद्द झाल्यापासून काश्मीर थंडावल आहे . काश्मीर जिथे नोटा रद्द व्हायच्या आधी जाळपोळ होत होती त्याच काश्मीर मधले दंगलवादी -जाळपोळ करणारे अचानक समंजस कसे झाले ?

गेले 2 महिने दगडफेकीचे प्रमाण सातत्याने खाली येत होते,
जे आता अजून खाली आले आहे (पूर्ण थांबलेले नाही)
1) हिवाळा चालु झाला आहे, या हिवाळ्यात ट्रेंड घुसखोर सुद्धा आपल्या ऍक्टिव्हिटी बंद ठेवतात, हे तर सामान्य मानासे आहेत.
2) लोकांना कंटाळा आलाय, स्पष्ट उद्दिष्ट्य नसलेली कुठलीही ऍक्टिव्हिटी जास्त काळ सुरु राहणे कठीण असते याचे हि तसेच झालाय
3) जसे बाकीच्या भारतात लोक नव्या नोटांसाठी लाईन लावून उभे आहेत, काश्मिरी लोक सुद्धा त्यातूनच जात असतील.

दंगल घडवून आणण्या साठी खोट्या नोटा देणे इतके कॉमन असते तर, पूर्ण काश्मीर ची इकॉनॉमी खोट्या नोटांवर चालते असेच म्हणायला लागेल. आपल्याला दंगे घडावण्या साठी खोट्या नोटांमध्ये पैसे मिळत आहेत हे न समजण्या इतके काश्मिरी लोक मूर्ख नाहीत.

भले त्यांनि खोटे पैसे घेतले, तरी ते शेवटी बँकेत येणार, मग काश्मीर मधील बँकाना व्यवहारात खूप जास्त प्रमाणावर खोट्या नोटा आढळल्या अशा अर्थाचे काही माझ्या वाचनात आले नाही.

तेव्हा खोट्या नोटा आणि काश्मीर दंगे याचा सरळसोट संबंध मी तरी लावणार नाही.

आपल्याला दंगे घडावण्या साठी खोट्या नोटांमध्ये पैसे मिळत आहेत हे न समजण्या इतके काश्मिरी लोक मूर्ख नाहीत

हेच मलाही वाटते.

आपण फक्त मी /मला त्रास /याला त्रास/ त्याला त्रास करत बसतो .पण अशांत काश्मीर मध्ये सैनिकांना खाव्या लागण्याचा दगडांचा कोण विचार करणार ? आपण एवढे बधिर झालो आहोत का ? कि सामान्य माणसाच्या त्रासाशिवाय समाजातली ईतर घटकांना होणार त्रास पण आपल्याला दिसत नाही, तिथे सुद्धा आपण मला नाही वाटत असं काही होत असेल असा विचार करत बसणार आहोत का ? Sad .

सुजा,
काश्मीर मध्ये सैनिक दगडफेकीस सामोरे जात आहेत हे सत्य आहे, आणि त्याबद्दल मला दुःख वाटते/संताप येतो.
मात्र म्हणून, नोट बंदी मुळे काश्मीर मध्ये दगडफेक थांबली हे तुमचे गृहीतक खरे ठरत नाही.

आणि हे गृहीतक तपासण्यासाठी काही मुद्दे मांडले तर त्याला सैनिक दगड खात आहेत हे उत्तर असू शकत नाही.

असो.... धागा नोटबंदी कशासाठी ?असा नाहीये, तर " how to survive नोटबंदी" असा आहे,
त्यामुळे थांबतो.

सुजा, काश्मिर मधे सैनिकांना आणि सामान्य जनतेला भोगाव्या लागणार्‍या त्रासाबद्दल कुणाचेही दुमत नाही, पण बँकांसमोरच्या रांगा आणि त्यांचा त्रास यांची तुलना करणे मला पटत नाही. या चलन बदलाचे व्यवस्थापन नीट झाले नाही हेच सत्य आहे. याबाबतीत सरकारचा अंदाज चुकला. किती लोक बँकेत येतील, किती नोटा छापाव्या लागतील,
त्या कशा उपलब्ध करुन देता येतील याचा अभ्यास / अंदाज नीट झाला नाही. २००० च्या जागी, २०० च्या नोटाही छापता आल्या असत्या.

स्रुजा, कश्मीरमध्ये पैसे देऊन दगडफेक घडवली जात होती हे उघड सत्य होते आणि ते अनेकांना माहीत होते. पण त्या नोट्या खोट्या नव्हत्या, खर्‍याच होत्या. आपण दिलेला फोटो हा मॉर्फ्ड वाटतो. असे अनेक फोटो जालावर फिरत असतील. कोणता अतिरेकी नोटांसह आपला फोटो उघड उघड काढू देईल? या माणसाची झोपण्याची पोज़िशन, भिंतीला कृत्रिमपणे, अनैसर्गिकपणे टेकवलेले त्याचे डोके वगैरे डीटेल्स पहा. असो, या खर्‍या नोटा रद्द झाल्यामुळे दगडफेक्यांचा पुरवठा तात्पुरता थांबला आहे. कश्मिरी लोकांना दहशतवादाचा मार्ग चुकीचा आहे हे कळेल तेव्हा दगडफेक आपोआप थांबेल. तसेही पीओके मध्ये सर्जिकल स्ट्राइक करून सीमेवरचा गोळीबार बंद झाला का? उलट तो वाढला आहे. दोन्ही बाजूंनी.

सगळ्या वाईट गोष्टी परत परत होतच असतात. सृष्टीचा नियम आहे तो आणि जगाचा देखील . एखाद्या मोठ्या चोराला फाशी देऊन चोर्या थांबत नाहीत/बलात्कारल्याला फाशी देऊन बलात्कार हि थांबत नाहीत किव्वा एका कसाबला फाशी देऊन अतिरेकी हल्लेही थांबत नाहीतच हे सामान्य माणसाला माहिती आहेच . पण निदान हे काही काळाकरता तरी कमी करण्यासाठी म्हणून कुठलीच ऍक्शन घ्यायचीच नाही हे कुठलं लॉजिक ?

मी आधीच्या धाग्यावर लिहिल्या प्रमाणे ( खरं खोटं माहित नाही ) ८० वर्षांपूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी " प्रॉब्लेम ऑफ रुपी " या त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवल आहे कि भ्रष्टाचार रोखण्यासाठी देशाने दर दहा वर्षांनी नोटा बदलल्या पाहिजेत." आज ८० वर्षांनी देशाला बाबासाहेबांचे अर्थ शास्त्रीय विचारांचे महत्व समजू लागलं आहे "हे तर (बाबासाहेबांचे विचार )मान्य आहेत कि नाही?. का ते पण नाही ?

माझ्या मते मी आणखी काही सांगू शकत नाही .ज्याला जसा विचार करायचा असेल तसं . शेवटी सुप्रसिद्ध म्हण आहेच " घोड्याला तुम्ही पाण्यापर्यंत नेऊ शकता पण पाणी प्यायचं कि नाही हे त्याच त्यानीच ठरवायचंय." तुम्ही किती किती लोकांना खुश ठेवणार ?. जस सामान्य माणसाला त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांचं लोकांना ( नातेवाईक /परिचित /मित्रमैत्रिणी इत्यादी इत्यादी ) खुश ठेवणं शक्य नाहीये तसच मोदींनाही अख्या भारतातल्या सगळ्याच्या सगळ्या लोकांना खुश ठेवणं शक्य नाहीयेच तर केवळ अशक्य आहे . तुमच आपल चालू दे. येणार काळच ( किव्वा वरचा बसलेला सर्व शक्तिमानच ) ठरवेल काय होईल ते Happy

खोट्या नोटा सापडल्या का?

या प्रश्नाच उत्तर सरकारने कुठेच न दिल्याने हे असले फोटो टाकून सरकारी भंपकपणाचे समर्थन भक्तगण करीत आहेत.

मला (आणि चेतनना) इथे नोटा पुन्हा छापण्यापेक्षा त्यांना हॉलमार्किंग करावे का याविषयी चर्चा अभिप्रेत आहे.

तसेच घाईघाईने नोटाबंदी करण्याऐवजी दुसरे काय व्यवस्थितपणे प्लान करता आले असते ज्यामुळे 'काळा पैसाही बाहेर आला असता, सामान्य लोकांना फार त्रासही झाला नसता आणि देशाला फारसा भुर्दंडही पडला नसता' या विषयी चर्चा!

नोटबंदीचा निर्णय योग्य की अयोग्य,त्यात देशहित आहे का, अतिरेक्यांना या हा फटका बसलाय का हे चर्चिण्यासाठी त्या त्याविषयांवर आधीच धागे आहेत.

सरकारी भंपकपणाचे समर्थन भक्तगण करीत आहेत.>> आणि तुम्ही विरोधक काय करताय. लोकांना फाड फाड बोलण्याची नाटक ? लोकांना घालून पाडून बोलण्याची नाटक ? काय स्वतःला समजतात काय विरोधक ? Angry

३-डी हॉलमार्क्/स्टिकरसाठी येईल त्यापेक्षा कमी खर्चात नवी नोट छापून होईल. मूळ गृहितकातच लोचा आहे असे दिसते.

काका, अगदी आपल्याला सुद्धा ३ड हॉलमार्क ऑर्डर देऊन बनवून घ्यायचा तर १-२ रुपयांत एक होलसेलात पडतो.

एक छानशी गुलाब्बो छापण्याचा खर्च ३-५ रू आणि वितरीत करेपर्यंतचा खर्च अजून ३ रू पकडा

आता ज्या जुन्या ५००-१००० च्या नोटा चलनात आहेत त्यांना छापायलाही २.५ रू प्रति नोट आणि २.५वितरित करायला खर्ची पडलेत.

आता त्यांना रिकॉल करून जमवून सिक्युरिटीत ठेवून पुन्हा विल्हेवाट लावायला आणखी खर्च येणार.
पर नोट १ रू धरला तरी प्रचंड खर्च!

तर हे सगळे खर्च टाळून हॉलमार्कींग करणं सोपं पडलं असतं आणि पॅनिक कमी झाली असती असं वाटतंय.

स्रुजा, आपले प्रतिसाद अवांतर करायला प्रवृत्त करीत आहेत. जर वाईट गोष्टी वारंवार घडत असतात आणि प्रतिवार केल्याने तात्पुरत्या थांबतात तर काही तरी 'न भूतो न भविष्यति' केल्याचा आव का आणावा? 'मास्टर स्ट्रोक'मुळे प्रश्न समूळ नष्ट केल्याचा दावा का करावा? 'सबसे पहले'चे ढोल का बडवावे? तिसरे चौथे बाळंतपण असतानाही पहिलटकरणीसारखे कौतुकाच्या अपेक्षेत सतत का राहावे? सगळ्यांनी आपले डोहाळे चुपचाप पुरवावे, त्यासाठी त्रास होतोय असा 'ब्र'ही काढू नये असे का समजावे? सतत 'पहिल्या प्रथम'चे ईवेंट्स का मिरवावे? असो. या धाग्यावर हे शेवटचे अवांतर.

हीरा, छान लिहिलेत.
फेसबुकावरची ही पोस्ट. (आनंद शितोळे यांचं चांगभलं!)

<<"15 ऑगस्ट 1947 ला रात्री बारा वाजता स्वतंत्र भारतासमोर पहिल्या भाषणात नेहरू असं म्हणाले होते का ?

" गेल्या दीडशे वर्षातली इंग्रजांनी केलेली घाण मला साफ करायची आहे "

किंवा सरदार पटेल असं म्हणाले होते का ?

" 500 वर्षांपासून अस्तित्वात असलेली संस्थान मी लगेच कशी खालसा करू ?">>

निर्णय मागे घ्या म्हणावं!
गाढवांनी निवडून दिलेला गाढव पीएम!
30 टक्क्यांचा मूर्खपणा बाकीच्यांना त्रास!!

अरे कणा मोडलाय.. नुसते वांदे नाहीत.
पुढच्या पिढ्या नक्कीच विचारतील तुम्ही कुठे शेण खायला गेलेलात?

{{{ तिसरे चौथे बाळंतपण असतानाही पहिलटकरणीसारखे कौतुकाच्या अपेक्षेत सतत का राहावे? सगळ्यांनी आपले डोहाळे चुपचाप पुरवावे, त्यासाठी त्रास होतोय असा 'ब्र'ही काढू नये असे का समजावे? सतत 'पहिल्या प्रथम'चे ईवेंट्स का मिरवावे? }}}

तुम्हाला ज्यांच्यावर टीका करायचीय त्यांच्यावर (च) थेट शब्दांत करा ना. उगाच असलं जेन्डर बायस्ड लिहून अजून अवांतर प्रतिसादांना आमंत्रण का देताय?

This thread is totally one sided. There are hardly any Modi supporter here. kahi maja nahi Happy

चिनूक्स, अर्थक्रांतीचं मुख्य ऑफिसही कोथरूडातच का?
Wink

असो, पण बोकिलबाबांनीही ही अर्थक्रांती त्यांच्या उद्देश्यानुसार झालेली नाही हे मान्य केलेले नाही.
आणि यातून केवळ फेक नोटा पकडल्या जातील, काळा पैसा नाही हे मान्य केले आहे.
कारण वर इकाका म्हणतात तसे पैसा कधीच काळा किंवा गोरा नसतो.
काळी असते ती वापरणार्‍याची मनोवृत्ती.
बोकिलबाबांच्या (काय मस्त वाटतं ना बाकीबाब म्हटल्यासारखं. म्हणून यांना काका नाही म्हणत मी!)
पाच पॉईंटावर मार्गक्रमणा केली असती तर कदाचित इतका त्रास झाला नसता.

मी फक्त एकच सुधारणा त्यात सुचवेन की सगळ्यात लहान डिनॉमिनेटरची नोट १००ची असावी, ५०ची नको.
कारण चार जणांच्या कुटूंबाला एकावेळी लागणार्‍या मिनिमम प्रोविजन्स आणायला कमीतकमी १०० रू लागतात.

बाकी हीरांनी क्रेडिट घेण्याविषयी जे म्हटले आहे तसेच जवळपास बोकिलबाबा म्हणतायत-

“The best thing about Islam is that it does not take credit for anything good that has happened. Everything is Inshalla (if Allah wills it) in Islam… We’d also like to take no credit for our good work; it’s Inshalla for us too,” sums up Bokil,

जिथे तिथे सैनिकांना मध्ये आणणार्यांनी वात आणलाय अगदी. सैनिक काश्मिरात दगड खातात म्हणून हे लोक पण स्वतःच्या डोक्यात रोज दगड. मारुन घेतात का कोण जाणे. माॅर्फ्ड फोटो पण न कळण्या एवढे बालिश असावेत असं वाटत नाही एकंदरीत. डोळ्यांवर ओढलेलं कातडं बाजूला केलं तर खरी परिस्थिती दिसेल कदाचित.

हाॅलमार्क लावण्याची युक्ती 10 ते 100 च्या नोटांवर करावी सरकारने. यानेही बराच फायदा होऊ शकतो.

Pages