चलनबंदी संकटातून सावरण्याकरिता.

Submitted by साती on 21 November, 2016 - 07:02

८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून रुपये पाचशे व रुपये एक हजार मूल्य असलेल्या नोटा व्यवहारातून बाद करण्याचा क्रांतिकारी निर्णय भारतीय रिझर्व बँक व भारत सरकारतर्फे घेण्यात आला. या नोटा ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत बँक खात्यांमध्ये जमा करता येऊ शकतील आणि त्यानंतर ३१ मार्च २०१७ पर्यंत रिझर्व बँकेने ठरवून दिलेल्या ठराविक केंद्रांमध्ये स्पष्टीकरणासह त्या जमा करण्याचा एक अतिरिक्त पर्यायही उपलब्ध असेल. रोखीच्या व्यवहारात वापरात आणण्याकरिता नव्या पाचशे व दोन हजार रुपये मूल्यांच्या नोटा छापण्यात येत आहेत. त्यापैकी काही नोटा आता बँकांमार्फत सामान्य नागरिकांपर्यंत पोचल्याही आहेत.

जुन्या चलनातील रुपये हजार व पाचशेच्या नोटा बाद करून नव्या पाचशे व दोन हजार रुपये मूल्यांच्या नोटा व्यवहारात आणण्याचा निर्णय घेण्यामागील दोन महत्त्वाचे उद्देश सरकारकडून जाहीर केले गेले ते खालीलप्रमाणे:-
अनेकांनी बँकांच्या खात्यांमधून देवाणघेवाणीचे व्यवहार करायचे टाळून चलनी नोटांच्या माध्यमातून मोठ्या रकमेचे व्यवहार केले असून त्याची माहिती सरकारला न दिल्यामुळे सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडला आहे. हा बुडालेला महसूल सरकारच्या विविध खात्यांचा असू शकतो. जसे की, एखादा जमिनीचा व्यवहार रोखीत झाला तर त्यावरील हस्तांतरण शुल्क जे दुय्यम निबंधक कार्यालयाकडे भरले जाते, मुद्रांक शुल्क जे महसूल विभागाकडे जमा होते आणि विक्रेत्याला मिळणार्‍या नफ्यावरील मिळकत कर जो की आयकर विभागाचा हिस्सा आहे अशी सर्वच रक्कम शासनाच्या तिजोरीत जाण्यापासून वंचित झाली. त्याचप्रमाणे एखाद्याने बुडविलेला सीमाशुल्क कर, जकात कर, स्थानिक स्वराज्य संस्था कर किंवा शासकीय / बिगर शासकीय कर्मचारी यांनी खाल्लेली लाच, माहिती अधिकार कार्यकर्ते / पत्रकार यांनी ब्लॅकमेलिंग करून मिळविलेला पैसा, अपहरण अथवा जीवे मारण्याची धमकी देऊन गुन्हेगारांनी मिळविलेली खंडणी, भुरट्या व सराईत चोर व दरोडेखोरांनी लुटीतून मिळविलेली रक्कम इत्यादी ज्यांना थोडक्यात काळे धन या वर्णनाने ओळखले जाते व ज्यांनी कधी बँक खात्यांमध्ये प्रवेश केला नाही अशा नोटा या व्यवहारातून कायमच्या हद्दपार करणे.
बनावट चलन जे की शासकीय मुद्रणालयाव्यतिरिक्त इतरत्र छापले गेलेले असल्यामुळे शासनाचे नुकसान होत असल्याने अशा चलनी नोटा कायमच्या रद्द करणे.

हे दोन्ही उद्देश कितीही चांगले असले तरीही या दोन्ही उद्देशांच्या सिद्धीकरिता नोटाबंदीचा निर्णय योग्य होता का? हा निर्णय घेऊन आता दोन आठवडे होत आले असले तरीही सामान्य जनतेचे दैनंदिन व्यवहारात जे हाल होत आहेत ते पाहता हा प्रश्न कुणालाही पडणे साहजिकच आहे. अर्थात दोन आठवडे म्हणजे फारच किरकोळ कालावधी झाला. माननीय पंतप्रधान तर स्वतःच पन्नास दिवस त्रास सहन करा असे आवाहन करीत आहेत. तज्ज्ञ मंडळी तर इतक्या प्रचंड मूल्य असलेल्या नोटांचे पुनर्मुद्रण व सामान्य जनतेत वितरण होऊन परिस्थिती सुरळीत होण्याकरिता सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतही कालावधी लागू शकतो असा अंदाज व्यक्त करीत आहेत. जनतेला होणार्‍या त्रासाबद्दल विरोधी पक्षीयांपासून तर सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांपर्यंत सर्वचजण दबक्या अथवा चढ्या आवाजात बोलत आहेत.

माझा मुद्दा वेगळाच आहे. ज्या उद्देशाने हा निर्णय घेतला गेला त्याच उद्देशांच्या पूर्तीकरिता हा निर्णय कितपत न्याय्य आहे याचा मला ऊहापोह करायचा आहे.
सर्वप्रथम काळ्या धनाचा मुद्दा घेऊ. ज्यांनी गैरमार्गाने पैसा कमावून अथवा शासनाचा महसूल बुडवून स्वतःजवळ काळे धन जमा केले आहे त्यांच्याकडील नोटा या आजवर बँक खात्यांत जमा झालेल्या नाहीत. त्या नोटा आताही बँकेत जमा होण्याची शक्यता कमीच. जरी त्या आता बँकेत जमा झाल्या तरीही त्यावरील कर / दंड योग्य प्रमाणात शासनाकडे जमा होणार म्हणजे त्या नोटा आता काळे धन न राहता पांढरे धन म्हणून ओळखले जाणार.
दुसरा मुद्दा बनावट नोटांचा. आता बनावट नोटा ओळखण्याची तपासणी यंत्रे बहुतेक बँकांमध्ये बसविण्यात आली आहेत. नोटा मोजण्याच्या (करन्सी काउंटर) यंत्रांमध्येच ही सोय आहे. अशा नोटा ८ नोव्हेंबरच्या निर्णयापूर्वी बँकेत जमा होण्याकरिता दाखल झाल्यावर लगेचच पकडल्या जात व आताही पकडल्या जातील. फक्त पूर्वी त्या व्यवहारात एकमेकांकडून स्वीकारल्या जात आणि स्वीकारणार्‍याची फसगत होऊन त्याचे आर्थिक नुकसान होई. आता त्या व्यवहारात एकमेकांकडून स्वीकारल्याच जाणार नसल्याने ही फसगत टळेल कारण जुन्या पाचशे व हजारांच्या सर्वच नोटा बाद होऊन नवीन नोटा व्यवहारात येऊ घातल्या आहेत. पण ही फसगत तरी पूर्णतः टळेल का? तर नक्कीच नाही, कारण बनावट नोटांमध्ये फक्त पाचशे व हजाराच्याच नोटा नसून शंभर, पन्नास, वीस व अगदी दहा रुपये मूल्यांच्याही बनावट चलनी नोटा व्यवहारात आहेत. फक्त जसजसे महागाई होऊन रुपयाचे अवमूल्यन होऊ लागले तसतसे लहान नोटा छापून त्यांचे वितरण करणे बनावट नोटांचे षडयंत्र चालविणार्‍यांना महाग होऊन बसल्याने त्यांनी मोठ्या नोटांवरच लक्ष केंद्रित केले होते. परंतु तरीही आर्थिक लाभ कमी असूनही लहान नोटांमध्ये पकडले जाण्याचा धोकाही कमी असल्याने लहान मूल्याच्या बनावट नोटाही व्यवहारात आस्तेकदम येतच होत्या आणि आहेतही. म्हणजे हजार व पाचशेच्या नोटा रद्द करून नव्या नोटा चलनात आल्या तरीही बनावट नोटांचा त्रास हा काही प्रमाणात तरी राहणारच.

याशिवाय काळे धन अथवा बनावट नोटा असणार्‍या ज्या नोटा जनता बँकेत भरणार नाही व स्वतःकडेच ठेवेल त्याव्यतिरिक्त बँकांमध्ये ३१ डिसेंबर २०१६ अखेर जमा होणार्‍या सर्वच हजार व पाचशेच्या नोटा या अधिकृतरीत्या पांढरे धन असणार आहेत. याच नोटा सरकार नंतर नष्ट करून त्याबदल्यात पुन्हा तितक्याच मूल्याच्या नवीन नोटांचे मुद्रण आणि वितरण याकरिता मोठा खर्च करणार. म्हणजे पाहा किती विरोधाभास आहे - ज्या बनावट किंवा काळे धन असलेल्या नोटा आहेत त्या ३१ डिसेंबर नंतरही बँकेबाहेरच राहणार तर तोवर बँकांमध्ये जमा झालेल्या नोटा या अधिकृत पांढरे धन असणार व सरकारी खर्चाने नष्ट होणार आणि ज्या बनावट किंवा काळे धन असलेल्या नोटा आहेत त्या बाहेरच राहिल्यामुळे सुरक्षित राहणार. त्यांचा व्यवहारात वापर न करता आल्याने त्यांचा संग्रहकर्त्याला काही उपयोग होणार नाही ही गोष्ट महत्त्वाची आहेच तरीही ते कागद मात्र सरकार नष्ट करणार नाही हे काहीसे विचित्र नाही का? आता ३१ डिसेंबर अखेरपर्यंत बँकेत जमा होणार्‍या पांढर्‍या धनातील हजार पाचशेच्या नोटा आणि त्या तारखेनंतरही बँकेबाहेरच असणार्‍या काळ्या धनातील हजार पाचशेच्या नोटा या दिसायला अगदी जुळ्या बहिणींप्रमाणे सारख्या असल्यानेच आतल्या चांगल्या नोटा बाहेर व्यवहारात न आणता त्यांना तिथेच नष्ट करून त्यांच्याऐवजी वेगळ्या दिसणार्‍या नोटा बाजारात आणणे म्हणजे बाहेर असणार्‍या काळ्या धनातील नोटांपेक्षा त्या वेगळ्या दिसल्यामुळे लोकांची फसगत न होता काळ्या धनातील नोटांना टाळून व्यवहार करणे जनतेला सुकर व्हावे हा सरकारचा सदहेतू आहेच याविषयी वाद नाही.

तरीही हा हेतू साध्य करण्याकरिता जुन्या नोटा नष्ट करून नव्या नोटा छापणे व पुरविणे याकरिता इतका प्रचंड मोठा खर्च करावयाची खरंच गरज होती का? त्याऐवजी सरकारने दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे व हजार रुपये मूल्य असलेले व बारकोडसारख्या सांकेतिक भाषेत अनुक्रमांक छापलेले हाय सिक्युरिटी हॉलमार्क अथवा होलोग्राम (अती सुरक्षित प्रमाणचिन्ह) स्टिकर्स बनवून ते सर्व बँकांना वितरित करायला हवे होते. त्यानंतर ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून जनतेला स्वतःजवळच्या १० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंतच्या सर्वच नोटा बँकांत जमा करण्याची सूचना करून त्यावर बँकांकडूनच नोटांच्या मूल्यानुसार त्या त्या प्रकारचे हॉलमार्क्स / होलोग्राम्स लावून घेण्याची व्यवस्था करण्यास सांगायला हवे होते. १ जानेवारी २०१७ नंतर बँकांसकट व्यवहारात इतरत्र कुठेही हॉलमार्क / होलोग्राम नसलेल्या नोटा अस्वीकृत ठरवून त्याला काळे धन ठरविता आले असते. हॉलमार्कचे वितरण आणि बँकांनी किती नोटांवर ते चिटकविले आणि खातेदारांना अदा केले यांच्या नोंदी ठेवणे हे फारसे अवघड गेले नसते. शिवाय या मार्गाने ज्यांनी दहा ते शंभर रुपयांमध्ये काळे धन साठविले आहे किंवा या मूल्यांच्या ज्या बनावट नोटा बाजारात आहेत त्याही बाद ठरविता आल्या असत्या. जुन्या नोटा नष्ट करणे, नव्या नोटांचे मुद्रण, वितरण यांचा खर्च, एटिएम मधील नोटांच्या रकान्यांची मापे बदलणे (रिकॅलिब्रेशन) या सर्वांचा खर्च, चलन तुटवड्यामुळे झालेली व्यवहारमंदी, रांगेत वाया जाणारे मनुष्यतास व होणारी प्राणहानी हे सर्व टाळता आले असते. अजूनही टाळता येऊ शकते.

आजवर बँकेत जमा झालेल्या आणि ३० डिसेंबर अखेरीपर्यंत जमा होणार्‍या नोटा या अधिकृतरीत्या पांढरे धनच ठरणार आहेत. ह्या नोटा सरकारने अजून नष्ट केलेल्या नसून त्यांची कडेकोट संरक्षणाखाली साठवणूक केलेली आहेत (हा अजून एक अतिरिक्त भुर्दंड सध्या सोसला जातोय). त्याचप्रमाणे चलन तुटवड्यामुळे झालेले जनतेचे हाल पाहता आतापर्यंत नव्या नोटांचे मुद्रण आणि वितरण हे काही फार मोठ्या प्रमाणात झालेले दिसत नाही. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाहीये. आताच सरकारने व रिझर्व बँकेने या दिशेने पावले उचलावीत. हॉलमार्क / होलोग्राम्स बनविण्याचा आणि बँक खात्यांत जमा करण्यात येणार्‍या नोटांवर ते चिकटविण्याचा निर्णय घ्यावा. अगदी रुपये दहा मूल्यापासूनच्या सर्वच नोटांचा या योजनेत समावेश करावा म्हणजे त्या नोटांच्या माध्यमात असलेले काळे अथवा बनावट नोटाही बाद होऊ शकतील. त्यानंतर ३१ डिसेंबर २०१६ अथवा ते शक्य असल्यास ३१ मार्च २०१७ या तारखेनंतर हॉलमार्क / होलोग्राम नसलेल्या नोटांना बँक व इतरत्र सर्वच व्यवहारातून अस्वीकृत ठरवून काळे धन ठरवावे. मी सुचविलेल्या उपायाचा अवलंब केल्यास अत्यंत कमी खर्चात व त्रासात काळे धन आणि बनावट नोटा चलनातून बाद करण्याचे सरकारचे उद्देश साध्य होतील यात शंकाच नाही.

इतरत्र प्रकाशित!

(हा लेख माझे माबोमित्र श्री चेतन सुभाष गुगळे यांनी लिहिला असून त्याची एक प्रत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि आर बी आयचे गव्हरनर श्री उर्जित पटेल यांनाही पाठवलेली आहे.
सध्याच्या क्रायसिसवर कोणती उपाययोजना करता येईल असा विचार करत असताना त्यांनी हे मत मांडले आहे.
मायबोलीवर हा लेख प्रकाशित करताना त्यांची परवानगी घेतलेली आहे.)

या लेखातील विषयावर आणि सुचविलेल्या उपायांवर काही चर्चा इथे अपेक्षित आहे.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चलन बंदीतून सावरायचा असाही एक उपाय. व्हाट्सऍप वरून साभार

ATM Queue

She : Hi, Can you withdraw 2500₹ for me. The queue is too long.

Guy : Don't worry, We can withdraw 2.5 Lakhs if you wish.

८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून जनतेला स्वतःजवळच्या १० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंतच्या सर्वच नोटा बँकांत जमा करण्याची सूचना करून त्यावर बँकांकडूनच नोटांच्या मूल्यानुसार त्या त्या प्रकारचे हॉलमार्क्स / होलोग्राम्स लावून घेण्याची व्यवस्था करण्यास सांगायला हवे होते >>> यात एक गोची झाली असती. सगळे 'टेबलखालचे पैसे' आरामात स्टिकर्स मिरवत फिरले असते. त्यामुळे उपाय चालला नसता व त्याला पण नावे ठेवली गेली असती.

खरेतर ' टेबलाखालचे लपवलेले पैसे कसे खोटे पाडावेत' असे धागे, अशा चर्चा.. बीजेपीने हे सर्व करण्याआधी व्ह्यायला हव्या होत्या म्हणजे काही जबरदस्त कल्पना पण माबो.वर सुचवल्या असत्या. आता 'हे करायला हवे होते' अशा ज्या सुचना इथे येताहेत त्या फक्त बिजेपीने घेतलेल्या निर्णयाच्या कल्पनेतच थोडे फेरबदल करून सुचवत आहेत सर्व लोक. जी पावले उचलली गेलीत तीच पावले अजुन योग्य प्रकारे कशी उचलली गेली असती हे लिहीत आहात. नवीन काही कल्पना वाचायला मिळाल्या नाहीत.

आता निदान वरकमाई करणारे घाबरले, आम्ही लोक जास्तीतजास्त ई-पे वापरू लागलो, पक्क्या पावत्याचाच आग्रह धरू लागलो, हे असंही होउ शकतं या भितीने पैशाचा साठा करणार्‍यांनी तसे करायचे कमी केले तरी तो मोठाच फायदा.

चिनुक्स, भरत वगैरे 'ज्या लोकांना त्रास होतोय त्यांना काय मदत आपण करू शकतो' असा धागा काढावा म्हणजे आमच्यासारखे दुर रहाणारे निदान व्हाट्सपवर ते सर्वांना पाठवू शकतो. या दोघांची नावे घेतलीत कारण त्यांनी याबद्दल खुप मनापासुन लिहिलेले आहे.

आणि सरकारने यात कशा प्रकारचे त्रास लोकांना झाले ते जाणून घेऊन अजुन काही पावले उचलावीत.

साधारण ३० वर्षांपुर्वी मुंबईत सुट्या नाण्यांची टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी बेस्ट ने रितसर कुपन्स छापली होती. हि कुपन्स त्यावेळी तिकिट काढण्यासाठी चालत शिवाय कंडक्टर कडे सुटे पैसे नसले तर तोही कुपन्सच देत असे.
हि कुपन्स तिकिटासारखीच दिसत पण त्यावर आकडे मोठे होते.

सुविधा सारख्या काही हॉटेल्स नी स्वतःची कूपन्स छापली होती. त्या काळात हे व्यवहार नाण्यांनी होत असत. त्या काळातली नाणी जड होती. सहा सात महिने हा प्रकार चालू होता. मग सरकारने स्टीलची हलकी नाणी परदेशात घडवून आयात केली. ती / तशीच नाणी आज चालू आहेत. ( समांतर चलन चालणार नाही, अशी अर्थतज्ञांनी ओरड केली होती. )

त्यापुर्वी कळवा / भायदंर / वाशी इथल्या खाड्यात, महालक्ष्मी देवळाच्या मागच्या समुद्रात लोक होलसेल मधे नाणी फेकत. ते मात्र एकदम बंद झाले होते.

१९८७-८८ साली नाणे टंचाई होती. ती बेस्टची कूपन्स तेव्हा कुठेही चालत असत. म्हणजे दूधवाला, पानवाला, किराणा दुकानदार देखिल ती घेत असत.

आज शेवटी व्यवहार ठप्प झाले आहेत याची कबुली दिली.. परी पलिस्तर मारलं आहेच.. म्हणे विकास दर अगदी २ टक्के नाही खाली जायचा ( मग काय १.९९ टक्के ) आणि म्हणजे २/३ महिन्यात सर्व सुरळीत होईल ( ५० दिवस म्हणाले होते ना ते ? )

साती, तुम्ही असं सांगता का, आता टेबलवर घेतलंच आहे तर एखादा हात, एखादा पाय.. किंवा फारतर डोळा नाहीतर कान जाणारच.. त्यात काय एवढं !!!

हा हा!

आम्ही पूर्वी एक ब्लँकेट कंसेंट घ्यायचो.
'आता मी स्वतःला यांच्या हाती सोपवलं आहे आता काहिही झालं किंवा जीवही गेला तरी आमचे आम्ही जबाबदार, डॉक्टर नाही.'

पण कोर्टाने १०-१२ वर्षापूर्वीच ही प्रथा मोडूनकाढली.

आत्ता प्रत्येक अवयव, प्रत्येक प्रोसिजर एक्सप्लेन करून त्यातील रिस्क वेगवेगळी सांगून वेगवेगळी कन्सेन्ट घ्यावी लागते.

इथं काय झालंय तर एकाच पायाच्या बोटाला ड्राय गँगरीन झालाय तर बाकी सगळा पाय सल्वेजेबल असतानाही बाय लॅटरक अबोव्ह नी अँप्युटेशन केलंय.

मे १४ ला ३१ टक्क्यांनी दिलेलं वर्डिक्ट १२५ करोड लोकांसाठी ब्लँकेट कन्सेंट ठरलीय.

>>> इथं काय झालंय तर एकाच पायाच्या बोटाला ड्राय गँगरीन झालाय तर बाकी सगळा पाय सल्वेजेबल असतानाही बाय लॅटरक अबोव्ह नी अँप्युटेशन केलंय.
मे १४ ला ३१ टक्क्यांनी दिलेलं वर्डिक्ट १२५ करोड लोकांसाठी ब्लँकेट कन्सेंट ठरलीय. <<<<
डोण्ट थिंक सो........

बायदीवे, याच धर्तीवर बायपास सर्जरि / हर्ट ट्रान्स्प्लान्ट बद्दल काय म्हणू शकाल?

३१ टक्के काय आहे ?
याआधीची सरकारे १०० टक्के मतं घेऊन राज्य करत असत का ? कि त्यांचे निर्णय फक्त त्यांच्या मतदारांनाच लागू असत ?

आणि ती भूल उतरायच्या आत काही बॉडी पार्ट्स निकामी होऊ शकतात. ते निकामी होण्याच्या लायकीचेच होते, असंही म्हणता येतं.

ऑपरेशनच्या अपेक्षित परिणामांबद्दल बोलायला अजून बराच अवकाश आहे.

हा लेख चेसुगु ह्या अर्थतज्ञाचा आहे हे लेखाच्या सुरुवातीसच लिहिले असते तर विनाकारण वाचण्यात वेळ वाया गेला नसता....

ओ ट्रिपल अ,
तेच तर!
माझं नाव दिसलं म्हणून वाचलात तरी तुम्ही लेख!
Wink

आणि चेसुगु नाही चेतन सुभाष गुगळे!

हे पहा ईन्कम डिक्लेरेशन सुद्धा ईतके सोपे नाहीये... बर्याच अडचणी आहेत त्यात
आप्ल्या दरवर्शीच्या डिक्लेर ईन्कम पेक्शा खुप जास्त डिक्लेर केली तर त्याची चौकशी होऊ शकते

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/man-who-disclosed-rs-14000...

पेटिएम आणि फुकटच्या डेटापैकवर हळूच सोडलेल जिओमनी फुकटची देशसेवा करणार आहेत की आपल्याच खिशाला फाडणार. खरच माहिती हवीय.

णोटाबंदी आणि आदिवासी यावर कुणीतरी पी एच डी करायला गेले होते म्हणे . आदिवासी बोल्ले , आमच्यावर काय परिणामही नाही अन दुश्परिणामही नाही. आता सात दिवस रहायचे पी एच डी ला तर लगेच एका ओळीवर कसे परतायचे, असे म्हणून ते आदिवाश्याना एक गझल सांगत होते.
एक आदिवासी उठला अन एक भूर्जपत्र घेऊन आला. त्यावर अगम्य भाषेत कायतरी होते...
? हे काय ? गझल नवाझ बोल्ले ..
आदिवासी बोल्ला ... तुम्ही जी गालिबची गझल सांगताय , ती आमच्याच इथल्या एका खापर पणजोबाची आहे... सतराव्या शतकात मुघल बादशाने चांदीची नाणी बंद करुन तांब्याची नाणी चालू केली, तेंव्हा नाणीबंदी अन आदिवासी यावर पी एच डी करायला , गालिबजी तिथे आले होते .. आमच्यावर काय परिणाम नाही, या एकाच ओळीत प्रबंध संपल्यावर बाकीचा वेळ ते आदिवासी गझलांची भाषांतरे करत बसले अन मग त्याच गझला उर्दूत करुन ते पुढे महान गझलकार बनले!
-----
आता ह्यांचा गझलसंग्रह कधी येतोय कुणास ठाऊक !

Proud

नुकतेच एक विधेयक मंजूर झाले आहे, त्यानुसार कंपन्यांना राजकिय पक्ष्यांना देणग्या देण्यावर जे निर्बंध होते, ते काढून
टाकण्यात आले आहेत. तसेच ही माहिती गुप्त ठेवण्याचीही सोय केलेली आहे.
जिथे चर्चा होऊ शकली असती, अश्या राज्यसभेत हे मांडण्यातच आले नाही.

आनंद आहे !

बरं, त्या चलनबंदी संकटाचे पुढे काय झाले? कुणाच्या वाट्याला तो फेरा गेला? इलेक्शनच्या रिझल्ट्सवरुन तरी वाटतय की चलनबंदीचे संकट दोन्ही कॉन्गी/लाले अन शिवसेनेला भोवले. बरोबर ना?

Pages