पाक कलांकारांवर टाकलेल्या बहिष्काराच्या निमित्ताने ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 October, 2016 - 12:43

जेव्हा पाकिस्तानशी आपले बिनसते तेव्हा पहिली कुर्‍हाड सिनेकलाकार आणि क्रिकेटपटूंवरच पडते हे आपल्याला नवीन नाही. वर्षानुवर्षे हे होत आले आहे. जेव्हा आपले त्यांच्याशी संबंध बिघडलेले असतात तेव्हा तेथील कलाकारांना आणि खेळाडूंना, त्यातही प्रामुख्याने क्रिकेटपटूंना आपले दरवाजे बंद होतात. जेव्हा आपण मैत्रीचे प्रस्ताव आणि अमन की आशा मोडमध्ये असतो तेव्हा कलाकारच काय तेथील राजकीय नेत्यांच्या सुद्धा गळाभेटी घेतल्या जातात.

सध्या बहिष्काराची तीव्रता नेहमीपेक्षा जास्त भासत आहे. पण पुढे कायम राहील याची खात्री नाही. दोन वर्षांनी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला वर भारत-पाकिस्तान एकदिवसीय सामना दोस्ती-कप म्हणून खेळवला गेला तरी मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. ईतके हे सवयीचे झाले आहे.

असो, यावर धागा काढायचे मनात होते. पण आधीच चालू असलेल्या वादात उगाच आपण तेल टाकायला नको म्हणून आतापर्यंत काढला नव्हता.
पण अनुराग कश्यपच्या एका ट्वीटने आज पुन्हा माझ्या डोक्यातील विचारांना बाहेर काढलेय.

तो काय म्हणतो बघा,
@narendramodi Sir you haven't yet said sorry for your trip to meet the Pakistani PM.. It was dec 25th. Same time KJo was shooting ADHM? Why?

बातमीची लिंक - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/anurag-ka...

एका दृष्टीने विचार करता पॉईंट आहे. ज्या काळात भारत-पाक संबंध एवढे छान होते की आपले पंतप्रधान श्री मोदी हे शरीफ यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायला पाकिस्तानात जाऊ शकतात, तर त्याच काळात पाकिस्तानी कलाकारांना घेऊन ज्या चित्रपटाचे शूटींग झाले, त्याविरोधात आता प्रदर्शनाच्या वेळी आवाज उठवणे चुकीचे आहे. ते पाकिस्तानी कलाकार आपला मोबदला घेऊन पसार झाले. आता जर हा चित्रपट डब्यात गेला तर आपल्या ईथल्या निर्मात्या आणि कलाकारांचेच नुकसान होणार.
मागे माझा स्वत:चा ईथे आतिफ अस्लम या गायकाबद्दल धागा होता. एक "गायक" म्हणून तो आजही माझा आवडीचा आहे. जो पर्यंत तो या भारत-पाक वादात भारताविरुद्ध गरळ ओकत नाही तो पर्यंत एक "कलाकार" म्हणूनही आवडीचा राहील. त्याने ईथे कैक हिट गाणी दिली आहेत. त्यानिमित्ताने कित्येक चित्रपटांत, कित्येक दिग्दर्शक निर्मात्यांसोबत काम केले असेल. कोणाकोणाविरुद्ध बहिष्कार टाकणार. ज्यांच्याविरुद्ध आपल्याला भडकावले जाईल त्यांच्या विरुद्ध? की सरसकट सर्वांविरुद्ध?

मध्यंतरी व्हॉटसपवर एक खोडकर(!) मेसेज फिरत होता -- जिओच्या जाहीरातीत मॉडेल म्हणून "शाहरूख खान" झळकतोय. हा तोच शाहरूख खान आहे ज्याच्या आगामी चित्रपटात पाकिस्तानी कलाकार आहे. चला तर मग जसे आमीरविरोधात स्नॅपडीलवर बहिष्कार टाकला होता तसे शाहरूखबाबतही करूया. त्याच्या चित्रपटासोबतच "रिलायन्स जिओ सीम" वर सुद्धा बहिष्कार टाकूया. आणि जे नाही टाकणार त्यांची देशभक्ती फुकटात मिळणार्‍या डेटासाठी विकली गेली असा त्याचा अर्थ होईल.
बाकी रिलायन्स जिओच्या जाहीरातीसाठी जेव्हा मोदी आणि शाहरूख एकत्र येतात तेव्हा अश्या बहिष्कारामागील फोलपणा जाणवल्यावाचून राहत नाही.

जर सरकारनेच पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा नाकारला तर ते योग्य राहील.
जर आपल्या फिल्म ईंडस्ट्रीनेच असा स्टॅन्ड घेतला - आम्ही पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम नाही करणार तर ते योग्य राहील.
पण जर राजकारणाचा एक भाग म्हणून हे आपापल्या सोयीने होत असेल तर त्याला काही अर्थ नाही.
तसेच पाकिस्तान्यांशी संबंध तोडण्याची अपेक्षा फक्त बॉलीवूड आणि क्रिकेटर्स यांच्याकडून ठेवण्यातही हशील नाही.
आणि अश्या कधी लादल्या जाणार्‍या तर कधी उठवल्या जाणार्‍या बहिष्काराने पाकिस्तान नावाचा प्रॉब्लेम सुटणारही नाही.
पाकिस्तानसोबत ठेवायच्या संबंधांचे एक निश्चित धोरण राष्ट्रीय एकात्मतेसाठी फार गरजेचे आहे.

* तळटीप - मी अनुराग कश्यपच्या ट्वीटवर "एका दृष्टीने विचार करता पॉईंट आहे" असे म्हटले असले तरी मी त्याच्या ट्वीटशी सहमत आहे किंवा विरोधात आहे असे दोन्ही नाही. कारण त्याच्या ट्वीटमागचा नेमका हेतू मला माहीत नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी फिल्म ईण्डस्ट्रीतील नाही ना माझा कुठला व्यवसाय आहे ना मी अर्थशास्त्र विषय घेऊन कॉलेज वगैरे केलेय.
पण माझ्या अंदाजाप्रमाणे आणि कॉमनसेन्स प्रमाणे हातावर पोट असणारे सोडले तर ईतर सर्वांचाच व्यवहार क्रेडीटवर चालतो. ईथून पैसे आले की तुला फिरवतो आणि तो आणखी पुढे कोणाला. जर किमान अपेक्षापेक्षा कमी व्यवहार झाला तर या साखळीतील एकेकाचे पैसे अडकायला सुरुवात होणार. ज्याच्याकडे पैसा नावाची ताकद आहे तोच आपले पैसे सोडवणार आणि ज्याची तितकी चालत नाही ते मरणार.
तुम्ही दंगली करा, जाळपोळ करा, संप करा, बहिष्कार टाका... फटका नेहमी गरीब आणि सामान्य जनतेलाच बसतो हे एक वैश्विक सत्य आहे!

हर्पेन, माझी पोस्ट "चित्रपट - एक व्यवसाय" या अर्थाने या व्याख्येने होती.
आणि अजूनही कोणी चित्रपट हा निव्वळ पैश्याचा व्यवसाय नाही तर त्यापलीकडे आहे हे सांगणारी सुंदर पोस्ट लिहिली नाही.

पायरसी फक्त पाकिस्तानातून होते, चित्रपट प्रदर्शित न झाल्यास केवळ करण जोहरचं नुकसान आहे, हे अत्यंत चुकीचे मुद्दे आहेत.

तुम्ही एक चांगला कारागीर हात हायर करता तेव्हा त्यामागे सगळा माणूसच येतो अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे.

चिनूक्स,
फक्त वगैरे कोणी म्हटलेले नाहीये.
पाकीस्तानातून पायरसी होतच नाही असं का भासवतोयस?
पाकीस्तानातून होणार्‍या पायरसी मुळे आख्ख्या चित्रपटसृष्टीचे जे नुकसान होते आहे त्याची आणि एका सिनेमाच्या जर का प्रदर्शित होऊ शकला नाही तर होणार्‍या संभाव्य नुकसानातील तुलनेची गोष्ट चालू आहे.

पाकिस्तानापेक्षा कित्येकपट अधिक पायरसी भारतातून भारतीयांमुळे होते.
पंधरावीस वर्षांपूर्वी पाकिस्तानातून भारतात सदफ इत्यादी कंपनीच्या सीड्या यायच्या, पण त्याच्या प्रती भारतातच तयार होत. किंबहुना पाकिस्तानातून येणार्‍या सीड्यांपेक्षा मलेशियातून होणार्‍या पायरसीचं प्रमाण अधिक होतं.
आता कोणी सीड्या वापरत नाही, त्यामुळे जी काय पायरसी होते ती आपणच बहुतांश करतो. डेक्कनला सीड्या विकणारे पाकिस्तानी नसतात. सिनेमा प्रदर्शित होताक्षणी टॉरेन्ट, यूट्यूब इत्यादी मार्गांनी तो उपलब्ध करून देणारे, डाऊनलोड करणारेही भारतीयच असतात. अनधिकृत मार्गांनी मराठी चित्रपट परदेशात दाखवणारे ठाण्यात राहतात, इस्लामाबादेत नाही.

उलट आता पाकिस्तानात चित्रपटांवर बंदी आल्यानं पायरसी वाढेल.

पाकिस्तानसोबत ठेवायच्या संबंधांचे एक निश्चित धोरण राष्ट्रीय एकात्मतेसाठी फार गरजेचे आहे.>>>> व्वा ! टाळ्या ! Proud कसलं सोप्प आहे, नाही का?

>>>. पाकिस्तानसोबत ठेवायच्या संबंधांचे एक निश्चित धोरण राष्ट्रीय एकात्मतेसाठी फार गरजेचे आहे.>>>> अरेच्च्या लेखातील हे वाक्य नजरेतुन सुटलेच होते की... Lol खरेच टाळ्या झाल्या पाहिजेत या वाक्याला...... !

चित्रपटाचं चित्रीकरण संपलं तरी प्रदर्शित झाल्यानंतरसुद्धा अनेकांची पोटं त्या चित्रपटावर अवलंबून असतात. त्यातही 'ऐ दिल है मुश्किल'सारखा चित्रपट असेल, तर अनेकांची बक्कळ कमाई होते.

>>> पाकिस्तानसोबत ठेवायच्या संबंधांचे एक निश्चित धोरण राष्ट्रीय एकात्मतेसाठी फार गरजेचे आहे <<<
या वाक्याचा कीस काढू गेल्यास अरे बापरे, इथे रण पेटेल.....
"परकीय देशांबरोबरील (येथे पाकिस्तान, अदरवाईज इस्रायेलचेही उदाहरण घेतले अस्ते Wink ) संबंध अन राष्ट्रीय एकात्मता" हा संबंध आधीच्या ६० वर्षांच्या कॉन्गी राजवटीत फारच जिव्हाळ्याने जोपासला गेला होता, त्याचे स्मरण झाले Proud
त्या "जिव्हाळ्यास" असा एकदम सुरुंग लागत असलेला पाहुन बर्‍याच जणांचा जीव कासावीस होणे साहजिकच आहे. Happy
पाकीकलाकारांच्या सिनेमासहीत यच्चयावत पाकी गोष्टींवर बहिष्कार घाला असे आवाहन ते काय उठले अन किती तो जीवाचा आटापीटा करुन , नफ्यातोट्याची गणिते मांडत, मानवतावादाचा दाखला देत, देशवासियांच्या नुकसानीचा बागुलबोवा दाखवित, बहिष्कार म्हणजे गुंडगिरीला प्रोत्साहन वगैरे मुक्ताफळे उधळीत, बहिष्कारास विरोध सुरु आहे..... तेव्हडे पुरले नाही तर चक्क मोदींची "अचानक पाक भेट" देखिल मध्ये आणलीये.... अरे कश्शाला इतके कष्ट घेतात लोकं? Lol

तसे आम्हाला यात नवल वाटत नाही, खुप पुर्वीपासुन "स्वदेशी" चा नारा घेऊन जेव्हा जेव्हा आवाहने केलि तेव्हा तेव्हाही अशाच प्रकारे विरोध होत गेला. गंमत आहे सगळी.

पाकी कलाकारांवर आधारीत चित्रपटावरील बहिष्काराच्या निमित्ताने, चित्रपटावर अवलंबुन असलेल्यांच्या पोटापाण्याची काळजी करणारे, जेव्हा "देशभरातील हिंदूंच्या देवस्थानांबाहेर" असलेल्या अनेकविध व्यावसायिकांच्या पोटापाण्याची जराही काळजी न करता केवळ "देवळे म्हणजे मुठभरांची दुकाने आहेत" असले आचरट ब्रिगेडी आक्षेप घेत देवळे/देवस्थाने बंद करा/देवाला रिटायर करा वगैरे हाकाटी मारतात, तेव्हा यांच्या असल्या दुटप्पी पणाचे नवल नाही वाटत.

हा चित्रपट ब्लॉकबस्टरच होणारे असे ज गृहितक कशाच्या जोरावर मांडण्यात येते आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातल्ये का? येणारे ना तो थेटरात फखा च्या जागी सैफ आणवून मगच ठरेल

बाकी पाकिस्तानापेक्षा कित्येकपट अधिक पायरसी भारतातून भारतीयांमुळे होते. वाला प्रतिवाद मजेशीर होता.

मुद्दा हा होता की सर्वसामान्य पाकीस्तानी आपल्या कलाकार / कलाकृतींवर फिदा असले तरी किंवा असल्यानेच आणि पाकी सरकारच्या आडमुठ्या धोरणाने आपल्या कलाकारांना तिकडे मैफीली करू न दिल्याचा / चित्रपट प्रदर्शित होऊ न दिल्याचा परिपाक काय झाला तर पायरसी.
आजवर पाकीस्तानी पायरसी मुळे झालेले नुकसान किती असावे?

भारतातून किती पायरसी होते हा चर्चाविषयच नाहीये.

उद्या आता
भारतीयांनी भारतीयांना मारलेल्यांची संख्या, कसाब, इतर पाकीस्तानी दहशतवादी लोकांनी केलेल्या हल्ल्यात मेलेल्या भारतीय नागरिकां च्या संख्येपेक्षा कमीच होती
असं वाचायला मिळेल तरी आश्चर्य वाटणार नाही.

>>>उद्या आता
भारतीयांनी भारतीयांना मारलेल्यांची संख्या, कसाब, इतर पाकीस्तानी दहशतवादी लोकांनी केलेल्या हल्ल्यात मेलेल्या भारतीय नागरिकां च्या संख्येपेक्षा कमीच होती
असं वाचायला मिळेल तरी आश्चर्य वाटणार नाही.>>> Proud

>>>> उद्या आता भारतीयांनी भारतीयांना मारलेल्यांची संख्या, कसाब, इतर पाकीस्तानी दहशतवादी लोकांनी केलेल्या हल्ल्यात मेलेल्या भारतीय नागरिकां च्या संख्येपेक्षा कमीच होती असं वाचायला मिळेल तरी आश्चर्य वाटणार नाही. <<<< Lol देअर यू आर... परफेक्ट...
खरे तर ही हसण्याची गोष्ट नाही, हे देखिल मिळेल हो वाचायला, थोडीच वाट बघा.....
तसे स्टॅटीस्टीक मास्टर्स आहेत भरपुर..... !
हेल्मेट सक्तिला विरोध करतानाही अशाच अवसानघातकी आकडेवार्यांचे युक्तिवाद मांडले गेले होते त्याचे स्मरण झाले.

<सर्वसामान्य पाकीस्तानी आपल्या कलाकार / कलाकृतींवर फिदा असले तरी किंवा असल्यानेच आणि पाकी सरकारच्या आडमुठ्या धोरणाने आपल्या कलाकारांना तिकडे मैफीली करू न दिल्याचा / चित्रपट प्रदर्शित होऊ न दिल्याचा परिपाक काय झाला तर पायरसी.>

भारतातली पायरसी कशामुळे होते? भारतातले कलाकार भारतातच आहेत ना?
पाकिस्तानातली पायरसी जेव्हा खरंच होत होती, तेव्हा हा बंदीचा विषय का आला नाही?

असो.

<येणारे ना तो थेटरात फखा च्या जागी सैफ आणवून मगच ठरेल >

ही अफवा आहे. असं काहीही होणार नाहीये आणि ते शक्यही नाही. पण ज्या अर्थी तुला ते खरं वाटतं आहे, त्याचा अर्थी मी इथे न लिहिणं अधिक चांगलं. Happy

ही अफवा आहे. असं काहीही होणार नाहीये आणि ते शक्यही नाही.
फवादचा रोल गेस्ट अ‍ॅपियरन्स असल्याने सैफला घेऊन रिशूट होणार असे वाचल्याचे आठवते आहे.
इतक्या कोटींच्या बजेटच्या खर्चात अजून थोडासा खर्च वाढेल पण चित्रपट तर रिलीज होईल अशा अपेक्षेने असे होऊ शकेलच ना!
त्यात काय अशक्यआहे. मी गंभीरपणे विचारतोय?
मी काही मिस करतोय का?

नाहीतरी शब्दांचे खेळच सुरू झालेत, तर मी का मागे राहू?
ऐ दिल है मुश्किलवर बंदी घातल्याने पाकिस्तानातून होणारी पायरसी थांबणार असेल तर आनंद आहे.

आदरणिय राजनाथ सिंग (सध्याचे गृहमंत्री आणि भाजपाचे माजी पक्षाध्यक्ष) यांनी सदर सिनेमाला संरक्षण देण्याचे मान्य केले आहे. चला देशभक्तहो, राजनाथ सिंगाचा निषेध करुया!

http://indianexpress.com/article/entertainment/bollywood/ae-dil-hai-mush...

>>>> नाहीतरी शब्दांचे खेळच सुरू झालेत, तर मी का मागे राहू?
ऐ दिल है मुश्किलवर बंदी घातल्याने पाकिस्तानातून होणारी पायरसी थांबणार असेल तर आनंद आहे. <<<< व्वा वा, बढीया Happy
मग हेच असेही का म्हणत नाहीत लोकं? की....
"ऐ दिल है मुश्किलवर बंदी घातल्याने पाकिस्तानातून होणारे हल्ले थांबणार असेल तर आनंद आहे." Proud
अर्थात म्हणतीलही म्हणा... काय सांगावे ! Wink

हर्पेन, तुमचे इथले प्रतिसाद वाचून सखेद आश्चर्य वाटले.
चित्रपटावर बंदी म्हणजे संधीविना चारित्र्यवान सारखे संधीविना देशभक्त बनण्याची सोय!
पाकिस्तानी कवयित्री फहमिदा रियाझ यांची 'तुम बिल्कूल हम जैसे निकले भाई' ही कविता सतत आठवते आजकाल! (लिंक :https://urduwallahs.wordpress.com/2015/03/27/tum-bilkul-hum-jaise-nikle/ ) तिकडेच निघालो आहोत आपण!
Grow up everyone! There are better ways to show your patriotism than banning film releases.

>>> There are better ways to show your patriotism than banning film releases. <<<
असतीलही,
पण सध्या तरी असे दिसते की या प्रकारे फिल्म प्रदर्शनास कडाडून विरोध झाला, तरच "देशी निर्माते" निव्वळ धंद्याकरता वा कुणाच्या इच्छापूर्तिकरता, उठसुठ पाकीस्तानी कलाकारांना मिठ्या मारायला जायचे बंद होतील.

there are much more and better ways to show your patriotisum by keeping sympathy & business relations with Indian artists असे चित्रपट निर्मातेदिग्दर्शकांना सांगायची वेळ आली आहे, व चित्रपटावरील बंदीच्या मागणीतुन हे सांगितले जातय. (अस समजा हव तर.... Proud )

हर्पेन, तुमचे इथले प्रतिसाद वाचून सखेद आश्चर्य वाटले.

जिज्ञासा, नक्की काय खटकले ते सांगणार का .
पाकीस्तानी कलाकारांना भारतात काम करायला परवानगी देऊ नये ह्या मताचा मी पुरस्कर्ता आहे. माझी मनोभुमिका अशी का झाली ते ही मी सांगीतले आहे.

चित्रपटावर बंदी घालण्याच्या बाजूने मी तरी काही म्हटले नाहीये. पण कजो व्यावसायिक तडजोड म्हणून फवाद खानवाला भाग सैफला घेऊन पुनर्चित्रित करणार असेल आणि असे करताना त्याला जो काही तोटा होणार त्याकरता नुकसान नुकसान म्हणून इतका आरडाओरड करण्याची काहीही गरज नाही असेच माझे मत आहे.

सगळ्यांनाच (आपल्या विरोधी असले तरी) आपापले मत बनवायचा / व्यक्त करायचा अधिकार मान्य आहेच Happy

जिज्ञासा, नक्की काय खटकले ते सांगणार का .>> जर तुम्ही चित्रपट प्रदर्शित होण्यावर घातलेल्या बंदीच्या बाजूने नसाल तर चांगलच आहे. मग मला काही म्हणायचे नाही Happy
बाकी वैयक्तिक मत जरूर असावे पण केवळ तेच एक योग्य मत आहे असे समजू नये. आणि कोणत्याही प्रकारे आपले मत दुसर्‍यावर लादू नये (जे प्रदर्शनावरील बंदीने घडते आहे). ह्या सिनेमावर बंदी घालण्याची काही गरज नाहीये. चित्रपटावर बंदी घालून आपल्या देशभक्तीची (आणि बुद्धीची) कमाल मर्यादा मनसेने दाखवली आहेच.
अजून तरी पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करणे बेकायदेशीर नाही. मग चित्रपटावर बंदी कशासाठी?

>>> अजून तरी पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करणे बेकायदेशीर नाही. मग चित्रपटावर बंदी कशासाठी? <<<<
पठाणकोट उरी हल्ल्यानंतर तरी ते "बेकायदेशीर" ठरावे/ ठरविण्याकरता सरकार व जनतेने पुढाकार घ्यावा म्हणून उचललेले आंदोलनात्मक पाऊल आहे.
चित्रपटावर बंदी घालून आपल्या देशभक्तीची (आणि बुद्धीची) कमाल मर्यादा मनसेने दाखवली आहेच , तिच्याशी मी सहमत.

Grow up everyone! There are better ways to show your patriotism than banning film releases.>> +१

देशभक्ती ही फक्त "शो ऑफ" करायची गोष्टच नाहिये मुळी..

धन्यवाद जिज्ञासा, आणि काय हे! निदान प्रतिसाद वाचायचे तरी Wink मी परत जाऊन वाचले माझे सगळे प्रतिसाद माहित्ये ! Happy

आजचा माझा यु टू? दिवस च आहे बहुतेक.

Pages