दाल में कुछ केसरी है!

Submitted by साती on 22 January, 2016 - 05:55

आम्ही डॉक्टरकी शिकत असताना आम्हाला "अन्नधान्ये बघून ओळखणे' असा एक प्रश्न प्रात्यक्षिक परीक्षेकरता होता,
यात तूरडाळ आणि केसरी डाळ यांच्यातील फरक स्पष्ट करणे जरा अवघडच.
नाजूकशी गोलसर तूरडाळ आणि चौकोनी जरा जाडसर केसरी/ लाखी डाळ.

image_70.jpg

(फूड सेफ्टी गेटवे डॉट कॉमवरून )

अधिक सुस्पष्ट चित्रे-

तूरडाळ-
image_76.jpg

लाखीडाळ/ केसरी डाळ
image_77.jpg

(वरिल दोन्ही चित्रे मायबोलीकर 'साधना' यांच्या सौजन्याने)

का बुवा इतक्या किचकट डाळी ओळखायला लावतात याचे उत्तर लगेच थिअरी क्लासात मिळाले.
"न्यूरोलॅथरिझम." म्हणजेच लॅथिरस सटायवम उर्फ केसरी डाळीमुळे होणारा मज्जासंस्थेचा एक आजार.

या आजारात केसरी डाळीतल्या एका विशिष्ट अमिनोअ‍ॅसिडमुळे आपल्या पायांकडे जे मेंदूकडून जाणारे पिरॅमिडल ट्रॅक असतात (पायांच्या हालचालींकरिता) ते मरण पावून पायामध्ये अपंगत्व येते. पाय हळूहळू शक्तिहीन तसेच कडक होत जातात.(याला वैद्यकीय भाषेत अप्पर मोटार न्यूरॉन साईन्स असे म्हणतात.) अशा दोन्ही पाय शक्तीहीन आणि कडक होण्याच्या आजाराला स्पास्टिक पॅराप्लेजिया म्हणतात.
आम्ही शिकायला येईपर्यंत हा आजार भारतातून जवळपास नष्टच झाला होता. त्यामुळे औषधोपचार किंवा इंटर्नल मेडिसीन या विषयाअंतर्गत हा आजार शिकायला मिळाला नाही फारसा.
या आजाराच्या उद्भवाची कारणे तसेच तो आजार नष्ट होण्याची कारणेही औषधोपचारांपेक्षा आर्थिक आणि सामाजिक अधिक होती. त्यामुळे आम्ही हा आजार शिकलो पी एस एम म्हणजे 'रोग प्रतिबंध आणि सामाजिक वैद्यकशास्त्र' या विषयात.

तर , भारतात हरितक्रांती होण्यापूर्वीची गोष्ट आहे.शेती उद्योग अत्यंत बेभरवशाचा. सिंचनाची भक्कम व्यवस्था नाही. अश्या परिस्थितीत त्यावेळी बर्‍याच राज्यांत केसरी डाळ्/लाखी डाळ किंवा ग्रास पी (Lathyrus sativum) चे उत्पादन घेतले जायचे. या डाळीला पाणी कमी लागत असल्याने तसेच भर उन्हाळ्यातही टिकून रहाण्याची या रोपाची क्षमता असल्याने शेतकर्‍यांना दुष्काळात हमखास मदतीचा हात देणारे पीक म्हणून याची ख्याती होती.अल्पभूधारक शेतकरी तर यावरच अवलंबून होते. त्याहून थोडे मोठे शेतकरी बाकीच्या पिकाबरोबर एक - दोन दळे हे पीकही लावत.बाकीची पीके पावसाअभावी बुडली तरी हे पीक वाचत असे. त्यामुळे गरज पडल्यास वापरता येई, पण त्याहून महत्वाचे म्हणजे जे भूमिहीन शेतकरी, आदिवासी इत्यादी लोक हे मोठे शेतकरी आपल्या शेतात राबवून घेत असत, त्यांचा पगार पसापसाभर या डाळीच्या रूपात व्हायचा.

गोरगरीब लोकांना दुष्काळाच्या काळात, बाकीच्या डाळी आणि अन्नधान्यांची टंचाई असेल त्या काळात ही डाळ हा एकच पर्याय . ही डाळ विस्तवावर जराशी उकडून त्यात थोडे मीठ आणि पाणी घालून वरण करणे किंवा डाळ दळून आणून त्या पीठाच्या जाडसर रोट्या करणे अश्या दोन पद्धतीने गोरगरीब ही डाळ खायचे.
श्रीमंत लोक मात्र यात इतर पिठे मिसळून त्याच्या लाडू, मिठाया बनवून खात. किंवा मस्त खदखद उकळून ,आमटी बनवून मग छान लिंबू पिळून भात किंवा गव्हाच्या रोटी/पोळीबरोबर खात.

एकदा काय झालं, खूप मोठा दुष्काळ पडला. बिहार, मध्यप्रदेश ,महाराष्ट्र इत्यादी राज्यांतल्या काही जिल्ह्यांत अचानक या दुष्काळाच्या काळात पायांमध्ये पक्षाघात झालेले रूग्ण दिसू लागले. काही काही वाड्या-वस्त्यांतून या एकाच आजाराचे खूप रूग्ण दिसू लागले. कंबरेखाली कडक झालेला पाय, बसता उठता येत नाही, नितंबांवरिल स्नायू अगदी कृश होऊन आतली हाडे दिसू लागलेली अश्या अवस्थेतले रूग्ण.

१. सुरूवातीच्या काळात एका काठीच्या आधारावर चालणारे रूग्ण

image_71.jpg

(ही इमेज डॉक्टर्स हँगाऊट . कॉम या संस्थळावरून घेतलीय.)

image_72.jpg
(ही इमेज लुकफॉर डायग्नोसिस .कॉम या संस्थळावरून घेतलीय.)

२. नंतर दोन्ही पायांतली ताकद जाऊन दोन काठ्या घेऊन चालणारा रूग्ण.
image_73.jpg

( ही इमेज लुकफॉर डायग्नोसिस . कॉम या संस्थळावरून घेतलीय.)

३. एकाच गावातले अश्या प्रकाराने बाधित झालेले अनेक लोक.
image_74.jpg

(ही इमेज इंडियनएनवॉयर्नमेंट पोर्टल .ऑर्ग.इन या संस्थळावरून घेतलीय.)

अचानक असे रूग्ण कसे काय दिसायला लागले याचा विचार करताना लक्षात आलं की हे सगळे रूग्ण आहारात अक्षरश: तिन्ही त्रिकाळ या केसरी डाळीचे पदार्थ खातायत.

मग या डाळीचे आणि या रूग्णांचे अ‍ॅनालिसिस सुरु झाले. तेव्हा एक भयावह बाब समोर आली. या डाळीत एक प्रकारचे अमिनो अ‍ॅसिड असते. B -n-oxalyl-L-a-B diaminopropionic acid नावाचे.(आम्ही शिकताना याला BOAA असे संक्षिप्त रूप होते. आता B-ODAP हे रूप वापरतात. आता आपण तेच वापरू.) तर हे अमिनो अ‍ॅसिड ही डाळ खाणार्‍याच्या आतड्यांतून शोषून रक्तात मिसळल्यावर तिथून स्पायनल कॉर्डसच्या पायाला हालचालींचे सिग्नल देणार्‍या मज्जातंतूंकडे म्हणजे पिरॅमिडल ट्रॅक्सकडे जात होते. काही वेळा तिथून मेंदूमध्ये जे पिरॅमिडल ट्रॅकचे मज्जारज्जू निघतात तिथेही जाऊन ते नष्ट करत होते.
आता हे अमिनो अ‍ॅसिड याच पेशींना का नष्ट करते, पायाचेच मज्जारज्जू का डॅमेज करते ही एक मोठी बायोकेमिकल स्टोरी आहे. ते समजून घेणे हा या लेखाचा उद्देशही नाही तेव्हा ते इथेच सोडू.
हे नेमके कारण जरी १९६४ साली वैज्ञानिकांनी शोधून काढले तरी त्याआधीच केसरी डाळ आणि न्यूरोलॅथरिझमाचा संबंध लक्षात येऊन १९६१ सालापासूनच ह्या डाळीची पैदास करणे, विकणे आणि खाणे यांवर भारतात निर्बंध आले होते.

पण आपण भारतीय अतिहुशार! बंदी आली म्हणजे ती गोष्ट दुप्पट उत्साहाने करायची अशी आपली सवय. त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातही कित्येक दुष्काळी जिल्हे हे पीक घेत राहिले. आणि दिसण्यात असलेल्या साधर्म्यामुळे तूरडाळीत या स्वस्त डाळीची भेसळ करत राहिले.
आता वाचायला गंमत वाटेल पण काल एक १९८८ सालची पेपरातली बातमी वाचली 'तूरडाळीचे भाव किलोला १५ रु असे गगनाला भिडल्याने तूरडाळीत विषारी केसरी डाळीची भेसळ. गरीबांना ४ रु किलोवाली केसरी डाळ खाण्याशिवाय पर्याय नाही.' ही बातमी होती मध्यप्रदेशातील.
अश्या अनेक ठिकाणी बातम्या येतच होत्या. त्यामानाने न्यूरोलॅथरिझमचे रूग्ण काही नव्याने दिसत नव्हते. मग कुणीतरी शहाण्याने 'खरेच हा पक्षाघात केसरी डाळिमुळेच होतोय की आपली उगीच एक अफवा?' असा प्रश्न काढला.
खूप प्रयत्न करूनही हा आजार प्रयोग शाळेतील प्राण्यांत घडवून आणायचे शास्त्रज्ञांना इतकेसे स्पष्ट साधले नव्हते.
मात्र २०१२ साली हैद्राबादेतल्या आय सी एम आर ने कोकरांना ही डाळ खायला घालून त्यांच्यात हा आजार 'नि:संदिग्धपणे ' घडवून आणला.
आणि मग या आजाराबाबत संशोधनाचे एक नवे क्षितिज उघडले.
पुढल्याच वर्षी महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यात प्रत्यक्ष ही डाळ खाणार्‍या लोकांमध्ये केस स्टडी झाला. १०५ घरांतील ५९६ लोकांचा अभ्यास झाला. हे लोक केसरी डाळ बर्‍यापैकी नियमितपणे खात होते. मात्र मागच्या वीस पंचवीस वर्षांत यांपैकी कोणालाही हा आजार झाला नव्हता. अगदी कसून मज्जासंस्थेची तपासणी केली गेली तरी हा आजार झाला नव्हता. गंमतीची गोष्ट म्हणजे दोन आजोबा असे सापडले की ज्यांना त्यांच्या तरूणपणी हा आजार झालाय. पण नव्याने कुणालाही नाही.
या गावात असलेल्या केसरी डाळीच्या प्रजातीत हे विनाशक अमिनो अ‍ॅसिडच नसेल अशी कुणीतरी शंका काढली. तर त्याचीही चाचणी अगोदरच केली गेली होती. या गावात असणार्‍या डाळीच्या प्रजातीतही तेवढ्याच प्रमाणात हे अमिनो अ‍ॅसिड होते जेवढे फार पूर्वी न्युरोलॅथरिझमचे पेशंट्स सापडले तेव्हा खाल्ल्या जाणार्‍या डाळीत असायचे.

तेव्हा या आणि अश्या अनेक अभ्यासांतून लक्षात आलेली महत्त्वाची माहिती अशी-
१. केवळ केसरी डाळ खाण्याने हा आजार होतो असे नाही तर त्याबरोबरच अनेक इतर कारणे याला जबाबदार आहेत.
२. प्रत्येक प्रजातीच्या केसरी डाळीत असणारे घातक B -ODAP ह्या अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण वेगवेगळे आहे.
३.जर आपल्या आहाराच्या १/४ इतका भाग किमान ५० ते ६० दिवस ही डाळच असेल तर हा आजार होण्याची शक्यता वाढते.
४. ही डाळ कमीतकमी अर्धा तास भरपूर पाण्यात उकळून , ते पाणी फेकून मग डाळ खाल्ल्यास या डाळीतील घातक अमिनो अ‍ॅसिड नष्ट होते.
५.या डाळीत इतर डाळी मिसळून खाल्ल्यास आणि त्या मिसळलेल्या डाळींत गंधक असणारी अमिनोअ‍ॅसिड्स असल्यास या डाळितल्या विषाचा प्रभाव तर कमी होतोच पण त्यबरोबर शरीरास मिळणार्या एकंदर प्रथिनांची गुणवत्ता (quality of proteins) वाढते.
६. व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यास या डाळीतल्या विषारी अमिनो अ‍ॅसिडचे योग्य विघटन होत नाही.
७. काही व्यक्तींमधील पचनशक्ती आणि काही विशिष्ट एंझाईम्सच्या कमतरतेमुळेप्रत्येक व्यक्तीवर होणारा या विषारी द्रव्याचा प्रभाव वेगवेगळा आहे.

आता या माहितीचा उपयोग पाहूया.
१. केवळ केसरी डाळ खाण्याने हा रोग होत नाही- बरोबर. गरिबी, खायला दुसरे काहीच उपलब्ध नसणे, ही डाळ योग्य प्रकारे न शिजवणे ही कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत.
२. प्रत्येक प्रजातीत असणारे B-ODAP चे प्रमाण-- आपल्या घरात येणार्या डाळीतल्या या अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण किती आहे याचा अंदाज केवळ डाळ पाहून करणे शक्य नाही. शेतकरी फक्त अश्या प्रमाणित जातींचीच लागवड करतायत का यावर लक्ष ठेवणे भारतात या घडीला तरी अवघड आहे. इथे भांगेची शेतीसुद्धा गुपचूप केली जाते .
३.आहाराच्या १/४ भाग सलग ५०-६० दिवस-- हे टाळणे आपल्याला सहज शक्य आहे. पण गोरगरीबांना एकदा स्वस्त डाळ मिळायला लागली की ती पावभागच खाऊन बाकी महागडी डाळ खा म्हणून सांगणे कठिण आहे. उपाहारगृहांत/ मेसमध्ये/ खानावळीत हे तंत्र पाळलेच जाईल याची खात्री आपण बाळगू शकत नाही.
४.डाळ भरपूर पाण्यात , अर्धा तास उकळणे- गोरगरीबांना/ आदिवासी लोकांना दुष्काळाच्या काळात नेमके मुबलक पाणी आणि चुलीला इंधनच मिळत नाही. अक्षरशः जराशी मऊ झाली कि ही डाळ खातात.
तसेच उपाहारगृहांत/ खानावळीत/मेसमध्ये ही दक्षता घेतली जाईलच असे नाही.
५.या डाळीत इतर डाळी मिसळणे- ते शक्य झालं असतं तर काय महाराजा! तूरडाळ मिळत नाही आहे सध्या म्हणून तर ही डाळ प्रकाशात आलीय. दुसर्‍या डाळी खाणे शक्य असताना ही डाळ मुद्दाम खाऊन कोण पाहिल?
६.व्हिटॅमिन सी ची कमतरता-योग्य प्रमाणात लिंबू इळून ही डाळ खाल्ल्यास त्या अमिनो अ‍ॅसिडचे विघटन होईल. पण प्रत्येक वेळी लिंबू पिळायचे लाड पुरवायला गोरगरीबांना/ दुष्काळी गावातल्या/आदिवासी पाड्यातल्या लोकांना जमेल का?
७. व्यक्तिगणिक वेगळे इफेक्ट- या शक्यतेची चाचणी करणारी कुठलीही सोपी पद्धत उपलब्ध नाही. तुमच्यावर परिणाम दिसले तरच मागाहून कळणार. कोण मुद्दामहून हे परिणाम होतात का हे पहायला जाईल ?

असे आहेत या केसरी डाळीचे प्रताप. संशोधन करणं, त्यातून वेगवेगळे निष्कर्ष काढणं शास्त्रद्यांचे कामच आहे. मात्र त्यातून बाकीच्या सामाजिक / आर्थिक परिस्थितीचा विचार न करता आपल्याला सोयीस्कर भागाचेच अर्थ काढून धोरण राबवणे हे राजकारण्यांचे काम आहे.
केसरी डाळीवर संशोधन , केसरी डाळीचे दुष्परिणाम कमी करण्याबाबतचे संशोधन, एवढेच नव्हे तर केसरी डाळीतल्या औषधी घटकांवर संशोधन( हो, ते ही या डाळीत आहेतच) हे मागच्या अनेक सरकारांच्या काळात चालतच आलंय.
मात्र आत्ता इतर डाळींच्या किंमती गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर गेल्या असताना, बाजारात लोकांच्या आहारात असलेल्या तूरडाळीचा कृत्रिम किंवा खरा तुटवडा जाणवत असताना, भारतातल्या मुख्यत्वे तूरडाळ उत्पादन करणार्‍या प्रदेशात सलग तिसर्या वर्षी दुष्काळ पडलेला असताना मुद्दाम या केसरी डाळीच्या उत्पादनाला आणि विक्रीला राजरोस परवानगी देणं मलातरी चुकीचं वाटतंय.
तुम्हाला काय वाटतं?

......................................................................................
तळटीप-
१. चित्रे आंतरजालावरून घेतली आहेत. त्या मध्ये हा लेख वाचणार्‍यांच्या माहितीत भर पडावी इतकाच उद्देश आहे.
त्या त्या चित्राखाली कुठून घेतली याची लिंक दिली आहे.
२. हा लेख कुठेही शेअर केला तरी चालेल मात्र लेख 'मायबोलीवरिल डॉ.साती यांनी लिहिला आहे हे कृपया लिहा.
३. वेळ मिळेल तसा टाईप केल्याने व्याकरणाच्या असंख्य चुका आहेत , त्या हळूहळू निस्तरल्या जातील.
४. प्रतिसादांत जमेल तसे शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करेन.

(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार्मास्युटिकल कंपन्या सुद्धा ह्या कृत्रिम तुटवड्यात सामील आहेत का? असतील कदाचित. म्हणजे खराब डाळ विकायची मग त्याचे दुष्परिणाम मग त्यावर औषध योजना.. आणि मग त्यातून फार्मा कम्पन्या सुद्धा बक्कळ पैशे कमावणार
>>

आओ, आवशध नैये.

आओ, आवशध नैये.
<<
कठीण वाक्यांचे अर्थः

"आओ, आवशध नैये." = अहो, (या आजारावर) औषध नाहिये.

*

कठीण अर्थांचे वाक्य :
औषध मॉडर्न मेडिसिनमधे नसेल हो. पतंजलीने एड्स बरा होतो, तर लाथिरिझम किस झाड की पत्ती. पॅरालिसिस असा चुटकी वाजवून बरा होतो. (फक्त बाबांचा डोळ्याचा / फेशिअल पॅरालिसिस बरा होत नाही. तो वेगळा आहे जरा Wink )

दीमा, अख्खी तूर मुंबईच्या बाजारात मला कधीच दिसली नाही, ( ओल्या शेंगा मात्र दिसतात ) हे आजचे नाही, मी शाळेत असताना कडधान्याचा तक्ता करायचा होता त्यावेळी देखील आई खुप दुकानात चौकशी करुन आली, पण मिळाली नाहीच.

तूर मिळालीच तर मऊ शिजवून घोटून वरण आमटीला नक्कीच पर्याय ठरू शकेल.

केनयात आणि आजूबाजूच्या देशातही तूर पिकते पण त्यांच्याकडे एक्स्पोर्ट सरप्लस नसावा.

अख्ख्या तुरीचे दाणे हिरवे ते तपकिरी ते काळपट या रंगांचे आणि गोल असतात.
अख्ख्या केसरडाळीचे दाणे पांढरे ते तपकिरी रंगाचे आणि चौकोनी असतात्त. (हाफ रेड्यूस्ड पावट्याची इमेज इमॅजिन करा.)

साती खूप धन्यवाद इतकी सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आमच्याकडे भरडलेल्या इतर डाळींचा जास्त वापर असल्याने मी टेन्शन फ्री आहे.टोमॅटो सार, चणा डाळीचे रसपाट वारंवार केले जाते त्यामूळे तूरीचा नंबर लवकर येत नाही. तरीही सावध केल्याबद्दल धन्यवाद !...

लाखी डाळीचा आकार पाहता हरभराडाळीत भेसळ करणे बरेच सोपे आहे.आतापर्यंत आम्ही तशी बरीच खाल्ली पण असेल.
अर्थात आमच्या आहारात आठवड्याचे सात दिवस पण तूरडाळ येत नाही(प्रोटिन नीडस साठी खायला हवी खरंतर) त्यामुळे अजून तरी जास्त चिंता नाही.(अर्थात बिग पिक्चर पाहता प्रकार बराच चिंताजनक आहे.) हा लेख व्हॉटसअ‍ॅप वर मूळ लिंक म्हणून शेअर केला आहे. बर्‍याच जणांनी धन्यवाद दिले, काही जणांनी 'अजून एक व्हॉटसअ‍ॅप्/फेसबुक अफवा' म्हणून फारसे लक्ष दिले नाही.

नाही नाही फालूदा करण्याचा उद्देश नाही, काही प्रकारचा ओडयंस आहे जो प्रत्येक मेडीकल पोस्ट गंभीर पणे घेऊन पाळतो आणि एक वर्ग आहे जो प्रत्येक मेडिकल पोस्ट 'अती ' समजतो.
पण बहुतांश लोकांनी लिंक नीट वाचली आणि त्याना यातली थोड़ी पार्श्वभूमी होती.

धन्यवाद. खूपच उपयुक्त लेख.

लाखी डाळीच्या वाढत्या भेसळीबद्दल माहित होते त्यामुळे काही महिन्यांपासूनच सेन्द्रिय तुर डाळ आमच्या शहरातल्या एका लहानशा ग्रीन शॉपमधून आणणे सुरु केले आहे. कडधान्ये, इतर डाळी यांचा समावेश आहारात वाढवला आहे. अंड्यांवरही जास्त भर देणे सुरु केले आहे. काल महालक्ष्मी सरसमधून चवळी आणि इतर अनेक कडधान्यांच्या डाळी मिळाल्या त्यांचीही पाकिटे आणली आहेत. तिथल्या या डाळी करुन विकणा-या महिला बचत संघटनांचे पत्ते आणि फोननंबर घेऊन ठेवले आहेत. थेट घाऊक वितरणाची काही सोय होऊ शकेल का बघायला हवे. त्यासंदर्भात त्यांच्याशी पत्रव्यवहार करायचा विचार आहे.

अख्खी तूर इथे एपीएमसीमध्येही विकत मिळत नाही. मी अख्खे चणे आणून घरी डाळ करते. माझ्याकडे जाते आहे. तूर मिळाली असती तर तिचीही डाळ केली असती.

आख्खे तूर दाणे मी आज जवळच्या दुकानात चौकशी केली. एक दुकानदार म्हणाला मी गेली १० वर्ष ठेवत नाही. दुसरा म्हणाला मी दोन वर्षे नाही ठेवत. कोणी नाही घेत पण तुम्हाला हवे असतील तर रामनगर भागात (डोंबिवली) एका दुकानात मिळतात.

आता कधी त्या भागात गेले तर विचारेन.

लहानपणापासून लाखी डाळ खायची नाही असेच ऐकले होते. पण मध्यंअतरी वाचनात आले की डॉ.कोथ्ठारी शांतिलाल कोठारी हे गेली तीस वर्षे या डाळीवरील बंदी उठआवी म्हणून प्रयत्न करत आहेत.

वरचे वाचुन शोध केल्यावर ही एक लिंक सापडली, पण याखाली काहीही चर्चा झालेली दिसत नाहीय.

http://infochangeindia.org/agriculture/features/nutritionist-protests-ba...

http://abpmajha.abplive.in/videos/nagpur-nutritionist-shantilal-kothari-...

http://timesofindia.indiatimes.com/city/hyderabad/Research-on-to-make-Ke...

साधना, बर्‍याच लिंक्स जुन्या आहेत.
एबीपीची मी पाहिली नाही, व्हीडिओ असल्याने (नेट्पॅक नाही तेवढा!)

पण त्यात जे काही आहे ते लेखात आहेच वरच्या.

अजून काही शंका असतील तर नक्की विचारा.

साती, माहितीबद्दल धन्यवाद. याबद्दल अजिबात माहिती नव्हती. आता तूरडाळ खाणे कमी करुन इतर डाळी / कडधान्ये खाणार. अनेकांनी असे केल्याने तरी डाळीची मागणी कमी होईल अशी अपेक्षा.

या लेखातली माहिती आईबाबांना दिली होती आणि घरी काम करणार्‍या ताईलापण दिली होती.
त्या ताईने सांगितले की अशी डाळ इथे मिळते पण ती कधी आणत नाही, मुळात तिच्याकडे जास्त डाळ खाल्ली जात नाही.

काल आईलापण ठाण्याच्या ग्रोसरी दुकानात अशी डाळ दिसली. दुकानदाराला विचारल्यावर त्याने ती लाखी डाळ आहे आणि त्याचे परिणाम त्याला माहिती आहेत असे सांगितले. पण ज्यांना परवडत नाही असे अनेक लोक येऊन 'स्वस्तवाली डाळ' आलीये ती द्या असे सांगतात. त्यांना तो ती देतो. ( आता मागणार्या लोकांना याचे परिणाम माहिती आहेत की कसे हे कळायला मार्ग नाही ) Sad

आणखी वर्षा दोन वर्षात ही डाळ खाल्ल्यामुळे दुष्परिणाम होऊन पाय लुळे पडलेले लोक आजुबाजूला दिसतील का याची भिती वाटतेय. शिवाय हा त्रास पुरुषांनाच जास्त प्रमाणात होणार असेल तर चालता येत नसल्याने पुरुष घरी आणि एकट्याने कमावण्यार्या बायका ओढाताण करत कुटूंब चालवत आहेत असे झाले तर....

बेकार आहे.
याबद्दल टिव्ही वरुन जास्तीत जास्त प्रबोधन होणे गरजेचे, जे लाखी डाळ स्वस्त म्हणून नाईलाजाने घेतात त्यांना निदान याचे परीणाम कसे टाळावे/कमी करावे याची बेसिक माहिती असणं हा त्यांचा हक्क आहे.परीणाम कळले तर टाळणं/कमी वापरणं नक्की जमवतील.पाय कायमचे जाणे यापेक्षा काहीही बरं.

साती,
अजिबात माहित नव्हतं. सविस्तर आणि सचित्र लेखासाठी खूप खूप धन्यवाद.
तुला हा लेख इंग्रजीत अनुवाद करुन टाकायचा असेल तर मी मदत करेन भाषांतरासाठी.

@ सातीजी:

अतिशय उत्तम आणि महत्वपूर्ण लेख. अतिशय कष्टाने ही माहिती लेखरुपात मांडून समोर आणल्याबद्दल धन्यवाद.

कालच्या पुणे-म.टा.ला लाखी डाळीवरच एक लेख आला आहे. त्यात ‘महाग तूरडाळीला उत्तम पर्याय’ असा एकंदर विचार मांडला आहे.
किती उलटसुलट मतप्रवाह आहेत !!

Pages