दाल में कुछ केसरी है!

Submitted by साती on 22 January, 2016 - 05:55

आम्ही डॉक्टरकी शिकत असताना आम्हाला "अन्नधान्ये बघून ओळखणे' असा एक प्रश्न प्रात्यक्षिक परीक्षेकरता होता,
यात तूरडाळ आणि केसरी डाळ यांच्यातील फरक स्पष्ट करणे जरा अवघडच.
नाजूकशी गोलसर तूरडाळ आणि चौकोनी जरा जाडसर केसरी/ लाखी डाळ.

image_70.jpg

(फूड सेफ्टी गेटवे डॉट कॉमवरून )

अधिक सुस्पष्ट चित्रे-

तूरडाळ-
image_76.jpg

लाखीडाळ/ केसरी डाळ
image_77.jpg

(वरिल दोन्ही चित्रे मायबोलीकर 'साधना' यांच्या सौजन्याने)

का बुवा इतक्या किचकट डाळी ओळखायला लावतात याचे उत्तर लगेच थिअरी क्लासात मिळाले.
"न्यूरोलॅथरिझम." म्हणजेच लॅथिरस सटायवम उर्फ केसरी डाळीमुळे होणारा मज्जासंस्थेचा एक आजार.

या आजारात केसरी डाळीतल्या एका विशिष्ट अमिनोअ‍ॅसिडमुळे आपल्या पायांकडे जे मेंदूकडून जाणारे पिरॅमिडल ट्रॅक असतात (पायांच्या हालचालींकरिता) ते मरण पावून पायामध्ये अपंगत्व येते. पाय हळूहळू शक्तिहीन तसेच कडक होत जातात.(याला वैद्यकीय भाषेत अप्पर मोटार न्यूरॉन साईन्स असे म्हणतात.) अशा दोन्ही पाय शक्तीहीन आणि कडक होण्याच्या आजाराला स्पास्टिक पॅराप्लेजिया म्हणतात.
आम्ही शिकायला येईपर्यंत हा आजार भारतातून जवळपास नष्टच झाला होता. त्यामुळे औषधोपचार किंवा इंटर्नल मेडिसीन या विषयाअंतर्गत हा आजार शिकायला मिळाला नाही फारसा.
या आजाराच्या उद्भवाची कारणे तसेच तो आजार नष्ट होण्याची कारणेही औषधोपचारांपेक्षा आर्थिक आणि सामाजिक अधिक होती. त्यामुळे आम्ही हा आजार शिकलो पी एस एम म्हणजे 'रोग प्रतिबंध आणि सामाजिक वैद्यकशास्त्र' या विषयात.

तर , भारतात हरितक्रांती होण्यापूर्वीची गोष्ट आहे.शेती उद्योग अत्यंत बेभरवशाचा. सिंचनाची भक्कम व्यवस्था नाही. अश्या परिस्थितीत त्यावेळी बर्‍याच राज्यांत केसरी डाळ्/लाखी डाळ किंवा ग्रास पी (Lathyrus sativum) चे उत्पादन घेतले जायचे. या डाळीला पाणी कमी लागत असल्याने तसेच भर उन्हाळ्यातही टिकून रहाण्याची या रोपाची क्षमता असल्याने शेतकर्‍यांना दुष्काळात हमखास मदतीचा हात देणारे पीक म्हणून याची ख्याती होती.अल्पभूधारक शेतकरी तर यावरच अवलंबून होते. त्याहून थोडे मोठे शेतकरी बाकीच्या पिकाबरोबर एक - दोन दळे हे पीकही लावत.बाकीची पीके पावसाअभावी बुडली तरी हे पीक वाचत असे. त्यामुळे गरज पडल्यास वापरता येई, पण त्याहून महत्वाचे म्हणजे जे भूमिहीन शेतकरी, आदिवासी इत्यादी लोक हे मोठे शेतकरी आपल्या शेतात राबवून घेत असत, त्यांचा पगार पसापसाभर या डाळीच्या रूपात व्हायचा.

गोरगरीब लोकांना दुष्काळाच्या काळात, बाकीच्या डाळी आणि अन्नधान्यांची टंचाई असेल त्या काळात ही डाळ हा एकच पर्याय . ही डाळ विस्तवावर जराशी उकडून त्यात थोडे मीठ आणि पाणी घालून वरण करणे किंवा डाळ दळून आणून त्या पीठाच्या जाडसर रोट्या करणे अश्या दोन पद्धतीने गोरगरीब ही डाळ खायचे.
श्रीमंत लोक मात्र यात इतर पिठे मिसळून त्याच्या लाडू, मिठाया बनवून खात. किंवा मस्त खदखद उकळून ,आमटी बनवून मग छान लिंबू पिळून भात किंवा गव्हाच्या रोटी/पोळीबरोबर खात.

एकदा काय झालं, खूप मोठा दुष्काळ पडला. बिहार, मध्यप्रदेश ,महाराष्ट्र इत्यादी राज्यांतल्या काही जिल्ह्यांत अचानक या दुष्काळाच्या काळात पायांमध्ये पक्षाघात झालेले रूग्ण दिसू लागले. काही काही वाड्या-वस्त्यांतून या एकाच आजाराचे खूप रूग्ण दिसू लागले. कंबरेखाली कडक झालेला पाय, बसता उठता येत नाही, नितंबांवरिल स्नायू अगदी कृश होऊन आतली हाडे दिसू लागलेली अश्या अवस्थेतले रूग्ण.

१. सुरूवातीच्या काळात एका काठीच्या आधारावर चालणारे रूग्ण

image_71.jpg

(ही इमेज डॉक्टर्स हँगाऊट . कॉम या संस्थळावरून घेतलीय.)

image_72.jpg
(ही इमेज लुकफॉर डायग्नोसिस .कॉम या संस्थळावरून घेतलीय.)

२. नंतर दोन्ही पायांतली ताकद जाऊन दोन काठ्या घेऊन चालणारा रूग्ण.
image_73.jpg

( ही इमेज लुकफॉर डायग्नोसिस . कॉम या संस्थळावरून घेतलीय.)

३. एकाच गावातले अश्या प्रकाराने बाधित झालेले अनेक लोक.
image_74.jpg

(ही इमेज इंडियनएनवॉयर्नमेंट पोर्टल .ऑर्ग.इन या संस्थळावरून घेतलीय.)

अचानक असे रूग्ण कसे काय दिसायला लागले याचा विचार करताना लक्षात आलं की हे सगळे रूग्ण आहारात अक्षरश: तिन्ही त्रिकाळ या केसरी डाळीचे पदार्थ खातायत.

मग या डाळीचे आणि या रूग्णांचे अ‍ॅनालिसिस सुरु झाले. तेव्हा एक भयावह बाब समोर आली. या डाळीत एक प्रकारचे अमिनो अ‍ॅसिड असते. B -n-oxalyl-L-a-B diaminopropionic acid नावाचे.(आम्ही शिकताना याला BOAA असे संक्षिप्त रूप होते. आता B-ODAP हे रूप वापरतात. आता आपण तेच वापरू.) तर हे अमिनो अ‍ॅसिड ही डाळ खाणार्‍याच्या आतड्यांतून शोषून रक्तात मिसळल्यावर तिथून स्पायनल कॉर्डसच्या पायाला हालचालींचे सिग्नल देणार्‍या मज्जातंतूंकडे म्हणजे पिरॅमिडल ट्रॅक्सकडे जात होते. काही वेळा तिथून मेंदूमध्ये जे पिरॅमिडल ट्रॅकचे मज्जारज्जू निघतात तिथेही जाऊन ते नष्ट करत होते.
आता हे अमिनो अ‍ॅसिड याच पेशींना का नष्ट करते, पायाचेच मज्जारज्जू का डॅमेज करते ही एक मोठी बायोकेमिकल स्टोरी आहे. ते समजून घेणे हा या लेखाचा उद्देशही नाही तेव्हा ते इथेच सोडू.
हे नेमके कारण जरी १९६४ साली वैज्ञानिकांनी शोधून काढले तरी त्याआधीच केसरी डाळ आणि न्यूरोलॅथरिझमाचा संबंध लक्षात येऊन १९६१ सालापासूनच ह्या डाळीची पैदास करणे, विकणे आणि खाणे यांवर भारतात निर्बंध आले होते.

पण आपण भारतीय अतिहुशार! बंदी आली म्हणजे ती गोष्ट दुप्पट उत्साहाने करायची अशी आपली सवय. त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातही कित्येक दुष्काळी जिल्हे हे पीक घेत राहिले. आणि दिसण्यात असलेल्या साधर्म्यामुळे तूरडाळीत या स्वस्त डाळीची भेसळ करत राहिले.
आता वाचायला गंमत वाटेल पण काल एक १९८८ सालची पेपरातली बातमी वाचली 'तूरडाळीचे भाव किलोला १५ रु असे गगनाला भिडल्याने तूरडाळीत विषारी केसरी डाळीची भेसळ. गरीबांना ४ रु किलोवाली केसरी डाळ खाण्याशिवाय पर्याय नाही.' ही बातमी होती मध्यप्रदेशातील.
अश्या अनेक ठिकाणी बातम्या येतच होत्या. त्यामानाने न्यूरोलॅथरिझमचे रूग्ण काही नव्याने दिसत नव्हते. मग कुणीतरी शहाण्याने 'खरेच हा पक्षाघात केसरी डाळिमुळेच होतोय की आपली उगीच एक अफवा?' असा प्रश्न काढला.
खूप प्रयत्न करूनही हा आजार प्रयोग शाळेतील प्राण्यांत घडवून आणायचे शास्त्रज्ञांना इतकेसे स्पष्ट साधले नव्हते.
मात्र २०१२ साली हैद्राबादेतल्या आय सी एम आर ने कोकरांना ही डाळ खायला घालून त्यांच्यात हा आजार 'नि:संदिग्धपणे ' घडवून आणला.
आणि मग या आजाराबाबत संशोधनाचे एक नवे क्षितिज उघडले.
पुढल्याच वर्षी महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यात प्रत्यक्ष ही डाळ खाणार्‍या लोकांमध्ये केस स्टडी झाला. १०५ घरांतील ५९६ लोकांचा अभ्यास झाला. हे लोक केसरी डाळ बर्‍यापैकी नियमितपणे खात होते. मात्र मागच्या वीस पंचवीस वर्षांत यांपैकी कोणालाही हा आजार झाला नव्हता. अगदी कसून मज्जासंस्थेची तपासणी केली गेली तरी हा आजार झाला नव्हता. गंमतीची गोष्ट म्हणजे दोन आजोबा असे सापडले की ज्यांना त्यांच्या तरूणपणी हा आजार झालाय. पण नव्याने कुणालाही नाही.
या गावात असलेल्या केसरी डाळीच्या प्रजातीत हे विनाशक अमिनो अ‍ॅसिडच नसेल अशी कुणीतरी शंका काढली. तर त्याचीही चाचणी अगोदरच केली गेली होती. या गावात असणार्‍या डाळीच्या प्रजातीतही तेवढ्याच प्रमाणात हे अमिनो अ‍ॅसिड होते जेवढे फार पूर्वी न्युरोलॅथरिझमचे पेशंट्स सापडले तेव्हा खाल्ल्या जाणार्‍या डाळीत असायचे.

तेव्हा या आणि अश्या अनेक अभ्यासांतून लक्षात आलेली महत्त्वाची माहिती अशी-
१. केवळ केसरी डाळ खाण्याने हा आजार होतो असे नाही तर त्याबरोबरच अनेक इतर कारणे याला जबाबदार आहेत.
२. प्रत्येक प्रजातीच्या केसरी डाळीत असणारे घातक B -ODAP ह्या अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण वेगवेगळे आहे.
३.जर आपल्या आहाराच्या १/४ इतका भाग किमान ५० ते ६० दिवस ही डाळच असेल तर हा आजार होण्याची शक्यता वाढते.
४. ही डाळ कमीतकमी अर्धा तास भरपूर पाण्यात उकळून , ते पाणी फेकून मग डाळ खाल्ल्यास या डाळीतील घातक अमिनो अ‍ॅसिड नष्ट होते.
५.या डाळीत इतर डाळी मिसळून खाल्ल्यास आणि त्या मिसळलेल्या डाळींत गंधक असणारी अमिनोअ‍ॅसिड्स असल्यास या डाळितल्या विषाचा प्रभाव तर कमी होतोच पण त्यबरोबर शरीरास मिळणार्या एकंदर प्रथिनांची गुणवत्ता (quality of proteins) वाढते.
६. व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यास या डाळीतल्या विषारी अमिनो अ‍ॅसिडचे योग्य विघटन होत नाही.
७. काही व्यक्तींमधील पचनशक्ती आणि काही विशिष्ट एंझाईम्सच्या कमतरतेमुळेप्रत्येक व्यक्तीवर होणारा या विषारी द्रव्याचा प्रभाव वेगवेगळा आहे.

आता या माहितीचा उपयोग पाहूया.
१. केवळ केसरी डाळ खाण्याने हा रोग होत नाही- बरोबर. गरिबी, खायला दुसरे काहीच उपलब्ध नसणे, ही डाळ योग्य प्रकारे न शिजवणे ही कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत.
२. प्रत्येक प्रजातीत असणारे B-ODAP चे प्रमाण-- आपल्या घरात येणार्या डाळीतल्या या अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण किती आहे याचा अंदाज केवळ डाळ पाहून करणे शक्य नाही. शेतकरी फक्त अश्या प्रमाणित जातींचीच लागवड करतायत का यावर लक्ष ठेवणे भारतात या घडीला तरी अवघड आहे. इथे भांगेची शेतीसुद्धा गुपचूप केली जाते .
३.आहाराच्या १/४ भाग सलग ५०-६० दिवस-- हे टाळणे आपल्याला सहज शक्य आहे. पण गोरगरीबांना एकदा स्वस्त डाळ मिळायला लागली की ती पावभागच खाऊन बाकी महागडी डाळ खा म्हणून सांगणे कठिण आहे. उपाहारगृहांत/ मेसमध्ये/ खानावळीत हे तंत्र पाळलेच जाईल याची खात्री आपण बाळगू शकत नाही.
४.डाळ भरपूर पाण्यात , अर्धा तास उकळणे- गोरगरीबांना/ आदिवासी लोकांना दुष्काळाच्या काळात नेमके मुबलक पाणी आणि चुलीला इंधनच मिळत नाही. अक्षरशः जराशी मऊ झाली कि ही डाळ खातात.
तसेच उपाहारगृहांत/ खानावळीत/मेसमध्ये ही दक्षता घेतली जाईलच असे नाही.
५.या डाळीत इतर डाळी मिसळणे- ते शक्य झालं असतं तर काय महाराजा! तूरडाळ मिळत नाही आहे सध्या म्हणून तर ही डाळ प्रकाशात आलीय. दुसर्‍या डाळी खाणे शक्य असताना ही डाळ मुद्दाम खाऊन कोण पाहिल?
६.व्हिटॅमिन सी ची कमतरता-योग्य प्रमाणात लिंबू इळून ही डाळ खाल्ल्यास त्या अमिनो अ‍ॅसिडचे विघटन होईल. पण प्रत्येक वेळी लिंबू पिळायचे लाड पुरवायला गोरगरीबांना/ दुष्काळी गावातल्या/आदिवासी पाड्यातल्या लोकांना जमेल का?
७. व्यक्तिगणिक वेगळे इफेक्ट- या शक्यतेची चाचणी करणारी कुठलीही सोपी पद्धत उपलब्ध नाही. तुमच्यावर परिणाम दिसले तरच मागाहून कळणार. कोण मुद्दामहून हे परिणाम होतात का हे पहायला जाईल ?

असे आहेत या केसरी डाळीचे प्रताप. संशोधन करणं, त्यातून वेगवेगळे निष्कर्ष काढणं शास्त्रद्यांचे कामच आहे. मात्र त्यातून बाकीच्या सामाजिक / आर्थिक परिस्थितीचा विचार न करता आपल्याला सोयीस्कर भागाचेच अर्थ काढून धोरण राबवणे हे राजकारण्यांचे काम आहे.
केसरी डाळीवर संशोधन , केसरी डाळीचे दुष्परिणाम कमी करण्याबाबतचे संशोधन, एवढेच नव्हे तर केसरी डाळीतल्या औषधी घटकांवर संशोधन( हो, ते ही या डाळीत आहेतच) हे मागच्या अनेक सरकारांच्या काळात चालतच आलंय.
मात्र आत्ता इतर डाळींच्या किंमती गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर गेल्या असताना, बाजारात लोकांच्या आहारात असलेल्या तूरडाळीचा कृत्रिम किंवा खरा तुटवडा जाणवत असताना, भारतातल्या मुख्यत्वे तूरडाळ उत्पादन करणार्‍या प्रदेशात सलग तिसर्या वर्षी दुष्काळ पडलेला असताना मुद्दाम या केसरी डाळीच्या उत्पादनाला आणि विक्रीला राजरोस परवानगी देणं मलातरी चुकीचं वाटतंय.
तुम्हाला काय वाटतं?

......................................................................................
तळटीप-
१. चित्रे आंतरजालावरून घेतली आहेत. त्या मध्ये हा लेख वाचणार्‍यांच्या माहितीत भर पडावी इतकाच उद्देश आहे.
त्या त्या चित्राखाली कुठून घेतली याची लिंक दिली आहे.
२. हा लेख कुठेही शेअर केला तरी चालेल मात्र लेख 'मायबोलीवरिल डॉ.साती यांनी लिहिला आहे हे कृपया लिहा.
३. वेळ मिळेल तसा टाईप केल्याने व्याकरणाच्या असंख्य चुका आहेत , त्या हळूहळू निस्तरल्या जातील.
४. प्रतिसादांत जमेल तसे शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करेन.

(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लेख साती. सरकारच्या निर्णयाबाबत बोलण्याइतपत विषयाचे ज्ञान नाही. इतकीच आशा वाटते की हे सगळे त्या संबंधितांनाही माहीत असेल आणि असा निर्णय उथळ हेतूने घेतला जाणार नाही. ह्या निर्णयाच्या कारणमीमांसेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांव्यतिरिक्त काही ठोस माहिती निदान येथे तरी कोणाकडे नसेल. त्यामुळे ह्या धाग्यावर वाद होणार नाहीत असा अंदाज आहे. माहितीपूर्ण लेखावर प्रतिसादही छान यावेत अशी इच्छा!

-'बेफिकीर'!

थोड्या प्रमाणात माहीत होतं पण ही चांगली डिटेल माहिती मिळाली, धन्यवाद, ही डाळ खाऊन काय होते ते टीव्हीवर जाहिरात करूँ दाखवता येईल का? ज्याना गरीबीमुळे नाइलाज आहे त्याना निदान त्यातल्या त्यात कमी प्रमाणात खाता येईल, खरं म्हणजे कोनालाच खावी लागू नये ही प्रार्थना.

५.या डाळीत इतर डाळी मिसळणे- ते शक्य झालं असतं तर काय महाराजा! तूरडाळ मिळत नाही आहे सध्या म्हणून तर ही डाळ प्रकाशात आलीय. दुसर्‍या डाळी खाणे शक्य असताना ही डाळ मुद्दाम खाऊन कोण पाहिल?
<<
मी_अनु,

मुद्दाम वेगळी विकत आणायची गरज नाही. आपल्याकडे एकदा लीगलाईज झाली की ही डाळ आपोआप आपणा सगळ्यांनाच जशी पेट्रोलमधे रॉकेल भेसळ असतेच, तशी तूर/मसुरीच्या डाळीत मिसळून मिळेल. फिकर नॉट.

लाखी(केसरी) डाळ ,खाण्यात जास्त आली तर स्नायूंना इजा होऊन अपंगत्व येते असं वाचलं होते तसेच बरेच थिकाणी ही डाळ खाऊनही काही अपाय होत नाही असंही एका लेखात वाचल्याचे आठवते.पण सातींच्या लेखामुळे नेमके काय ते कळले.

चांगली माहिती.
सर्च केला तर तुम्ही म्हणता तसं खूप काळ अती सेवन वाईट म्हटलंय. प्रमाणात सेवन अपायकारक नाही असं वाचलं. (कारण यात प्रथिनं आणि इतर बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत.) अर्थात लेखातील शेवटच्या भागात तुम्हीही हेच म्हटलंय की तूर डाळीची आवाक्याबाहेर किंमत म्हणून संपूर्ण संशोधनपूर्व उत्पादन हे हानिकारक आहे.
समजा उद्या दिलीच परवानगी, तर भेसळ चालू होईल गृहीत धरून डाळ कुकर मध्ये शिजवून पाणी फेकून द्यायचं, तुरडाळ कमी प्रमाणात खाऊन मुग, उडीद, मसूर खायच्या ज्यात भेसळ नाही करता येणार. लिंबू आणि इतर क जीवनसत्त्व खायचं, आठवड्यात २-३ दिवस वरण खायचं रोज नाही असं करून ते पुरेसं असेल का?

पण फक्त डेव्हील्स अ‍ॅड्वोकेट अर्ग्युमेंट म्हणून, तशा अनेक गोष्टी अती केल्या की अपायकारक असतातच, मग ह्यात थ्रेशोल्डपेक्षा जास्त अपाय होतो किंवा कुठल्या गोष्टी कशा रेग्युलेट करतात किंवा पब्लिक पॉलिसी ठरवताना कशी ठरवतात?

अमितव,

एंजल्स अ‍ॅडव्होकेट म्हणून असा विचार करून पहा,

तूरडाळ खाऊन पॅरालिसिस होण्याची शक्यता = शून्य.
ही डाळ खाऊन पॅ.हो.श. = १० लाखात १. (प्रत्यक्षात बरीच जास्त आहे)

हा १० लाखातला १ आपल्या घरातल्या एकाद्या एंजलला झाला तर चालेल का?

या बातमीबद्द्ल कालच एका रेडीओ चॅनेलवर ऐकलं India is desparate to go for a lentil variety that was previuosly banned अशी काही सुरुवात होती, तेव्हापासून हा भुंगा डोक्यात होता आणि हा लेख वाचला.

अतिशय अभ्यासू लेख लिहिला आहेस साती. ज्यांना ही माहिती एकंदरित आहे किंवा नेटवर वाचून मिळवू शकतात ती लोकं आपला पर्याय निवडू शकतात पण ज्यांना गरिबीमुळे स्वस्त पर्याय शोधावे लागतात त्यांचा विचार कोण करणार?

२. हा लेख कुठेही शेअर केला तरी चालेल मात्र लेख 'मायबोलीवरिल डॉ.साती यांनी लिहिला आहे हे कृपया लिहा.
>>>
उद्या व्हॉटसपवर शेअर करतो येथील लिंक नावासह..

खुप छान लेख.
या ८० च्या दशकातल्या बातम्या आठवताहेत मला. आमच्या घरी रंगाने केशरी दिसते म्हणून मसूरडाळ पण बंद करण्यात आली होती.

या डाळीचे इतरही काही गुणधर्म आहेत का ? तळणीच्या पदार्थात या डाळीचे पिठ मिसळत असत ( खास करुन बटाटेवड्यांच्या ) असे मधे वाचले होते.

गल्फ आणि आजूबाजूंच्या देशात फूल ( फाऊल ) बीन्स म्हणून एक कडधान्य खातात, त्यानेही नजर अधू होते असे म्हणतात. हे कडधान्य मी खाल्ले आहे, चवीला फणसाच्या बियांसारखे लागते. पण तेव्हा ही माहिती नव्हती. आपल्याकडे हे कडधान्य नाही मिळत.

याबद्दल वाचलं होतं पण इतक्या डिटेलमधे माहीत नव्हतं. साती, धन्यवाद.

आता हे अमिनो अ‍ॅसिड याच पेशींना का नष्ट करते, पायाचेच मज्जारज्जू का डॅमेज करते ही एक मोठी बायोकेमिकल स्टोरी आहे. >>> ही स्टोरी पण सांग ना. उत्सुकता वाटतेय.

धन्यवाद साती. लहानपणी ह्या डाळीबद्दल थोडेफार ऐकले होते. आणि दिनेश नी सांगितल्याप्रमाणे आमच्या पण घरात मसुर डाळ खात न्हवते.

पण ह्या वर्षीचा दुश्काळ बघता देशाची दाळीची गरज पुर्ण होणारी नाही. अश्या वेळी काही तरी उपाय हे केला पाहिजे.

सातीनी सांगितल्या प्रमाणे ही दाळ जर दुसर्या दाळीत मिसळुन खल्ली तर आजार तर होत नाहीत पण प्रथिनांची गुणवत्ता (quality of proteins) वाढते. ह्यावर गुगल सर्च केल्यावर वाचण्यात आले की स्पेन मध्ये ही दाळ दुसर्या दाळी बरोबर मिक्स करुन खायला हरकत नाही पण केसरी दाळीचे प्रमाण ५०% पेक्षा कमी पाहिजे.

जर ही दाळ थोड्या प्रमाणात तुरदाळीत मिसळली तर लोकाच्या गरजा पण पुर्ण होतिल आणि healthy food मिळेल.
पण ५०% पेक्षा कमि केसर दाळ मिक्स होईल किंवा हे दाळीचे मिश्रण योग्य आहे हे कोण ठरवणार.

Saatee, velat vel kadhun liheelyabaddl anek dhanyavaad. Didn't know the details of this issue.

Is the masoor dal dineshda has mentioned different from this kesharee daal?

Pages