दाल में कुछ केसरी है!

Submitted by साती on 22 January, 2016 - 05:55

आम्ही डॉक्टरकी शिकत असताना आम्हाला "अन्नधान्ये बघून ओळखणे' असा एक प्रश्न प्रात्यक्षिक परीक्षेकरता होता,
यात तूरडाळ आणि केसरी डाळ यांच्यातील फरक स्पष्ट करणे जरा अवघडच.
नाजूकशी गोलसर तूरडाळ आणि चौकोनी जरा जाडसर केसरी/ लाखी डाळ.

image_70.jpg

(फूड सेफ्टी गेटवे डॉट कॉमवरून )

अधिक सुस्पष्ट चित्रे-

तूरडाळ-
image_76.jpg

लाखीडाळ/ केसरी डाळ
image_77.jpg

(वरिल दोन्ही चित्रे मायबोलीकर 'साधना' यांच्या सौजन्याने)

का बुवा इतक्या किचकट डाळी ओळखायला लावतात याचे उत्तर लगेच थिअरी क्लासात मिळाले.
"न्यूरोलॅथरिझम." म्हणजेच लॅथिरस सटायवम उर्फ केसरी डाळीमुळे होणारा मज्जासंस्थेचा एक आजार.

या आजारात केसरी डाळीतल्या एका विशिष्ट अमिनोअ‍ॅसिडमुळे आपल्या पायांकडे जे मेंदूकडून जाणारे पिरॅमिडल ट्रॅक असतात (पायांच्या हालचालींकरिता) ते मरण पावून पायामध्ये अपंगत्व येते. पाय हळूहळू शक्तिहीन तसेच कडक होत जातात.(याला वैद्यकीय भाषेत अप्पर मोटार न्यूरॉन साईन्स असे म्हणतात.) अशा दोन्ही पाय शक्तीहीन आणि कडक होण्याच्या आजाराला स्पास्टिक पॅराप्लेजिया म्हणतात.
आम्ही शिकायला येईपर्यंत हा आजार भारतातून जवळपास नष्टच झाला होता. त्यामुळे औषधोपचार किंवा इंटर्नल मेडिसीन या विषयाअंतर्गत हा आजार शिकायला मिळाला नाही फारसा.
या आजाराच्या उद्भवाची कारणे तसेच तो आजार नष्ट होण्याची कारणेही औषधोपचारांपेक्षा आर्थिक आणि सामाजिक अधिक होती. त्यामुळे आम्ही हा आजार शिकलो पी एस एम म्हणजे 'रोग प्रतिबंध आणि सामाजिक वैद्यकशास्त्र' या विषयात.

तर , भारतात हरितक्रांती होण्यापूर्वीची गोष्ट आहे.शेती उद्योग अत्यंत बेभरवशाचा. सिंचनाची भक्कम व्यवस्था नाही. अश्या परिस्थितीत त्यावेळी बर्‍याच राज्यांत केसरी डाळ्/लाखी डाळ किंवा ग्रास पी (Lathyrus sativum) चे उत्पादन घेतले जायचे. या डाळीला पाणी कमी लागत असल्याने तसेच भर उन्हाळ्यातही टिकून रहाण्याची या रोपाची क्षमता असल्याने शेतकर्‍यांना दुष्काळात हमखास मदतीचा हात देणारे पीक म्हणून याची ख्याती होती.अल्पभूधारक शेतकरी तर यावरच अवलंबून होते. त्याहून थोडे मोठे शेतकरी बाकीच्या पिकाबरोबर एक - दोन दळे हे पीकही लावत.बाकीची पीके पावसाअभावी बुडली तरी हे पीक वाचत असे. त्यामुळे गरज पडल्यास वापरता येई, पण त्याहून महत्वाचे म्हणजे जे भूमिहीन शेतकरी, आदिवासी इत्यादी लोक हे मोठे शेतकरी आपल्या शेतात राबवून घेत असत, त्यांचा पगार पसापसाभर या डाळीच्या रूपात व्हायचा.

गोरगरीब लोकांना दुष्काळाच्या काळात, बाकीच्या डाळी आणि अन्नधान्यांची टंचाई असेल त्या काळात ही डाळ हा एकच पर्याय . ही डाळ विस्तवावर जराशी उकडून त्यात थोडे मीठ आणि पाणी घालून वरण करणे किंवा डाळ दळून आणून त्या पीठाच्या जाडसर रोट्या करणे अश्या दोन पद्धतीने गोरगरीब ही डाळ खायचे.
श्रीमंत लोक मात्र यात इतर पिठे मिसळून त्याच्या लाडू, मिठाया बनवून खात. किंवा मस्त खदखद उकळून ,आमटी बनवून मग छान लिंबू पिळून भात किंवा गव्हाच्या रोटी/पोळीबरोबर खात.

एकदा काय झालं, खूप मोठा दुष्काळ पडला. बिहार, मध्यप्रदेश ,महाराष्ट्र इत्यादी राज्यांतल्या काही जिल्ह्यांत अचानक या दुष्काळाच्या काळात पायांमध्ये पक्षाघात झालेले रूग्ण दिसू लागले. काही काही वाड्या-वस्त्यांतून या एकाच आजाराचे खूप रूग्ण दिसू लागले. कंबरेखाली कडक झालेला पाय, बसता उठता येत नाही, नितंबांवरिल स्नायू अगदी कृश होऊन आतली हाडे दिसू लागलेली अश्या अवस्थेतले रूग्ण.

१. सुरूवातीच्या काळात एका काठीच्या आधारावर चालणारे रूग्ण

image_71.jpg

(ही इमेज डॉक्टर्स हँगाऊट . कॉम या संस्थळावरून घेतलीय.)

image_72.jpg
(ही इमेज लुकफॉर डायग्नोसिस .कॉम या संस्थळावरून घेतलीय.)

२. नंतर दोन्ही पायांतली ताकद जाऊन दोन काठ्या घेऊन चालणारा रूग्ण.
image_73.jpg

( ही इमेज लुकफॉर डायग्नोसिस . कॉम या संस्थळावरून घेतलीय.)

३. एकाच गावातले अश्या प्रकाराने बाधित झालेले अनेक लोक.
image_74.jpg

(ही इमेज इंडियनएनवॉयर्नमेंट पोर्टल .ऑर्ग.इन या संस्थळावरून घेतलीय.)

अचानक असे रूग्ण कसे काय दिसायला लागले याचा विचार करताना लक्षात आलं की हे सगळे रूग्ण आहारात अक्षरश: तिन्ही त्रिकाळ या केसरी डाळीचे पदार्थ खातायत.

मग या डाळीचे आणि या रूग्णांचे अ‍ॅनालिसिस सुरु झाले. तेव्हा एक भयावह बाब समोर आली. या डाळीत एक प्रकारचे अमिनो अ‍ॅसिड असते. B -n-oxalyl-L-a-B diaminopropionic acid नावाचे.(आम्ही शिकताना याला BOAA असे संक्षिप्त रूप होते. आता B-ODAP हे रूप वापरतात. आता आपण तेच वापरू.) तर हे अमिनो अ‍ॅसिड ही डाळ खाणार्‍याच्या आतड्यांतून शोषून रक्तात मिसळल्यावर तिथून स्पायनल कॉर्डसच्या पायाला हालचालींचे सिग्नल देणार्‍या मज्जातंतूंकडे म्हणजे पिरॅमिडल ट्रॅक्सकडे जात होते. काही वेळा तिथून मेंदूमध्ये जे पिरॅमिडल ट्रॅकचे मज्जारज्जू निघतात तिथेही जाऊन ते नष्ट करत होते.
आता हे अमिनो अ‍ॅसिड याच पेशींना का नष्ट करते, पायाचेच मज्जारज्जू का डॅमेज करते ही एक मोठी बायोकेमिकल स्टोरी आहे. ते समजून घेणे हा या लेखाचा उद्देशही नाही तेव्हा ते इथेच सोडू.
हे नेमके कारण जरी १९६४ साली वैज्ञानिकांनी शोधून काढले तरी त्याआधीच केसरी डाळ आणि न्यूरोलॅथरिझमाचा संबंध लक्षात येऊन १९६१ सालापासूनच ह्या डाळीची पैदास करणे, विकणे आणि खाणे यांवर भारतात निर्बंध आले होते.

पण आपण भारतीय अतिहुशार! बंदी आली म्हणजे ती गोष्ट दुप्पट उत्साहाने करायची अशी आपली सवय. त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातही कित्येक दुष्काळी जिल्हे हे पीक घेत राहिले. आणि दिसण्यात असलेल्या साधर्म्यामुळे तूरडाळीत या स्वस्त डाळीची भेसळ करत राहिले.
आता वाचायला गंमत वाटेल पण काल एक १९८८ सालची पेपरातली बातमी वाचली 'तूरडाळीचे भाव किलोला १५ रु असे गगनाला भिडल्याने तूरडाळीत विषारी केसरी डाळीची भेसळ. गरीबांना ४ रु किलोवाली केसरी डाळ खाण्याशिवाय पर्याय नाही.' ही बातमी होती मध्यप्रदेशातील.
अश्या अनेक ठिकाणी बातम्या येतच होत्या. त्यामानाने न्यूरोलॅथरिझमचे रूग्ण काही नव्याने दिसत नव्हते. मग कुणीतरी शहाण्याने 'खरेच हा पक्षाघात केसरी डाळिमुळेच होतोय की आपली उगीच एक अफवा?' असा प्रश्न काढला.
खूप प्रयत्न करूनही हा आजार प्रयोग शाळेतील प्राण्यांत घडवून आणायचे शास्त्रज्ञांना इतकेसे स्पष्ट साधले नव्हते.
मात्र २०१२ साली हैद्राबादेतल्या आय सी एम आर ने कोकरांना ही डाळ खायला घालून त्यांच्यात हा आजार 'नि:संदिग्धपणे ' घडवून आणला.
आणि मग या आजाराबाबत संशोधनाचे एक नवे क्षितिज उघडले.
पुढल्याच वर्षी महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यात प्रत्यक्ष ही डाळ खाणार्‍या लोकांमध्ये केस स्टडी झाला. १०५ घरांतील ५९६ लोकांचा अभ्यास झाला. हे लोक केसरी डाळ बर्‍यापैकी नियमितपणे खात होते. मात्र मागच्या वीस पंचवीस वर्षांत यांपैकी कोणालाही हा आजार झाला नव्हता. अगदी कसून मज्जासंस्थेची तपासणी केली गेली तरी हा आजार झाला नव्हता. गंमतीची गोष्ट म्हणजे दोन आजोबा असे सापडले की ज्यांना त्यांच्या तरूणपणी हा आजार झालाय. पण नव्याने कुणालाही नाही.
या गावात असलेल्या केसरी डाळीच्या प्रजातीत हे विनाशक अमिनो अ‍ॅसिडच नसेल अशी कुणीतरी शंका काढली. तर त्याचीही चाचणी अगोदरच केली गेली होती. या गावात असणार्‍या डाळीच्या प्रजातीतही तेवढ्याच प्रमाणात हे अमिनो अ‍ॅसिड होते जेवढे फार पूर्वी न्युरोलॅथरिझमचे पेशंट्स सापडले तेव्हा खाल्ल्या जाणार्‍या डाळीत असायचे.

तेव्हा या आणि अश्या अनेक अभ्यासांतून लक्षात आलेली महत्त्वाची माहिती अशी-
१. केवळ केसरी डाळ खाण्याने हा आजार होतो असे नाही तर त्याबरोबरच अनेक इतर कारणे याला जबाबदार आहेत.
२. प्रत्येक प्रजातीच्या केसरी डाळीत असणारे घातक B -ODAP ह्या अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण वेगवेगळे आहे.
३.जर आपल्या आहाराच्या १/४ इतका भाग किमान ५० ते ६० दिवस ही डाळच असेल तर हा आजार होण्याची शक्यता वाढते.
४. ही डाळ कमीतकमी अर्धा तास भरपूर पाण्यात उकळून , ते पाणी फेकून मग डाळ खाल्ल्यास या डाळीतील घातक अमिनो अ‍ॅसिड नष्ट होते.
५.या डाळीत इतर डाळी मिसळून खाल्ल्यास आणि त्या मिसळलेल्या डाळींत गंधक असणारी अमिनोअ‍ॅसिड्स असल्यास या डाळितल्या विषाचा प्रभाव तर कमी होतोच पण त्यबरोबर शरीरास मिळणार्या एकंदर प्रथिनांची गुणवत्ता (quality of proteins) वाढते.
६. व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यास या डाळीतल्या विषारी अमिनो अ‍ॅसिडचे योग्य विघटन होत नाही.
७. काही व्यक्तींमधील पचनशक्ती आणि काही विशिष्ट एंझाईम्सच्या कमतरतेमुळेप्रत्येक व्यक्तीवर होणारा या विषारी द्रव्याचा प्रभाव वेगवेगळा आहे.

आता या माहितीचा उपयोग पाहूया.
१. केवळ केसरी डाळ खाण्याने हा रोग होत नाही- बरोबर. गरिबी, खायला दुसरे काहीच उपलब्ध नसणे, ही डाळ योग्य प्रकारे न शिजवणे ही कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत.
२. प्रत्येक प्रजातीत असणारे B-ODAP चे प्रमाण-- आपल्या घरात येणार्या डाळीतल्या या अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण किती आहे याचा अंदाज केवळ डाळ पाहून करणे शक्य नाही. शेतकरी फक्त अश्या प्रमाणित जातींचीच लागवड करतायत का यावर लक्ष ठेवणे भारतात या घडीला तरी अवघड आहे. इथे भांगेची शेतीसुद्धा गुपचूप केली जाते .
३.आहाराच्या १/४ भाग सलग ५०-६० दिवस-- हे टाळणे आपल्याला सहज शक्य आहे. पण गोरगरीबांना एकदा स्वस्त डाळ मिळायला लागली की ती पावभागच खाऊन बाकी महागडी डाळ खा म्हणून सांगणे कठिण आहे. उपाहारगृहांत/ मेसमध्ये/ खानावळीत हे तंत्र पाळलेच जाईल याची खात्री आपण बाळगू शकत नाही.
४.डाळ भरपूर पाण्यात , अर्धा तास उकळणे- गोरगरीबांना/ आदिवासी लोकांना दुष्काळाच्या काळात नेमके मुबलक पाणी आणि चुलीला इंधनच मिळत नाही. अक्षरशः जराशी मऊ झाली कि ही डाळ खातात.
तसेच उपाहारगृहांत/ खानावळीत/मेसमध्ये ही दक्षता घेतली जाईलच असे नाही.
५.या डाळीत इतर डाळी मिसळणे- ते शक्य झालं असतं तर काय महाराजा! तूरडाळ मिळत नाही आहे सध्या म्हणून तर ही डाळ प्रकाशात आलीय. दुसर्‍या डाळी खाणे शक्य असताना ही डाळ मुद्दाम खाऊन कोण पाहिल?
६.व्हिटॅमिन सी ची कमतरता-योग्य प्रमाणात लिंबू इळून ही डाळ खाल्ल्यास त्या अमिनो अ‍ॅसिडचे विघटन होईल. पण प्रत्येक वेळी लिंबू पिळायचे लाड पुरवायला गोरगरीबांना/ दुष्काळी गावातल्या/आदिवासी पाड्यातल्या लोकांना जमेल का?
७. व्यक्तिगणिक वेगळे इफेक्ट- या शक्यतेची चाचणी करणारी कुठलीही सोपी पद्धत उपलब्ध नाही. तुमच्यावर परिणाम दिसले तरच मागाहून कळणार. कोण मुद्दामहून हे परिणाम होतात का हे पहायला जाईल ?

असे आहेत या केसरी डाळीचे प्रताप. संशोधन करणं, त्यातून वेगवेगळे निष्कर्ष काढणं शास्त्रद्यांचे कामच आहे. मात्र त्यातून बाकीच्या सामाजिक / आर्थिक परिस्थितीचा विचार न करता आपल्याला सोयीस्कर भागाचेच अर्थ काढून धोरण राबवणे हे राजकारण्यांचे काम आहे.
केसरी डाळीवर संशोधन , केसरी डाळीचे दुष्परिणाम कमी करण्याबाबतचे संशोधन, एवढेच नव्हे तर केसरी डाळीतल्या औषधी घटकांवर संशोधन( हो, ते ही या डाळीत आहेतच) हे मागच्या अनेक सरकारांच्या काळात चालतच आलंय.
मात्र आत्ता इतर डाळींच्या किंमती गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर गेल्या असताना, बाजारात लोकांच्या आहारात असलेल्या तूरडाळीचा कृत्रिम किंवा खरा तुटवडा जाणवत असताना, भारतातल्या मुख्यत्वे तूरडाळ उत्पादन करणार्‍या प्रदेशात सलग तिसर्या वर्षी दुष्काळ पडलेला असताना मुद्दाम या केसरी डाळीच्या उत्पादनाला आणि विक्रीला राजरोस परवानगी देणं मलातरी चुकीचं वाटतंय.
तुम्हाला काय वाटतं?

......................................................................................
तळटीप-
१. चित्रे आंतरजालावरून घेतली आहेत. त्या मध्ये हा लेख वाचणार्‍यांच्या माहितीत भर पडावी इतकाच उद्देश आहे.
त्या त्या चित्राखाली कुठून घेतली याची लिंक दिली आहे.
२. हा लेख कुठेही शेअर केला तरी चालेल मात्र लेख 'मायबोलीवरिल डॉ.साती यांनी लिहिला आहे हे कृपया लिहा.
३. वेळ मिळेल तसा टाईप केल्याने व्याकरणाच्या असंख्य चुका आहेत , त्या हळूहळू निस्तरल्या जातील.
४. प्रतिसादांत जमेल तसे शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करेन.

(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललिता,
त्या लेखात आलेले-
१. ही डाळ इतर डाळी/प्रोटिन्सबरोबर घेत्ल्यास हाय प्रोटीनयुक्त आहे
२. काही आजारांत औषधी आहे
३. उत्पादन करण्यास स्वस्त आणि सोपी आहे
४. हिची कमी टॉक्सिक वाणे उपलब्ध आहेत

या चारही मुद्द्यांचा विचार माझ्या लेखात केला गेला आहे.
उलटसुलट काही नाही.
एकाच डाळीचे फायदे तोटे सांगितले आहेत दोन्हीकडे.
मात्र जनतेने आपापला विचार करून आपली डाळ निवडायची आहे.
Happy

रैना,
नक्की मला मदत घ्यायला आवडेल.
सध्या दुसर्‍या एका कामात आहे.
मग आपण हा लेख इंग्रजीत करू. तुला ईपत्र पाठवते.

लेख वाचलेल्या, शंका विचारलेल्या, लाईक/ शेअर केलेल्या सगळ्याच मायबोलीकरांचे आभार.

इथे त्रास हा आहे कि फक्त डाळभात खाणारे लोक खूप आहेत, अतिगरीब आहेत. नुसता भात जात नाही म्हणून डाळीचे पाणी सोबत असते. हाय प्रोटीन डायट परवडला असता तर मग तूरडाळच विकत घेतली असती सरळ.

बंदी असतानाही हि डाळ वापरात होती आणि तरीही डाळीने लकवा मारल्याच्या केसेस फारशा रिपोर्ट होत नाहीयेत. एका मोठ्या भागात अशा केसेस खूप आठळल्याचे खूप वर्षांपूर्वी वाचलय, नंतर काही वाचनात आले नाही, त्यावरून कमी धोकादायक वाणे वापरात असावी असे मानण्यास वाव आहे. पण हा केवळ अंदाज. पेपरात काय रिपोर्ट करायचे याचे ठोकताळे कालानुरूप बदलत गेलेत. कदाचित कोणाला अशा केसेस रिपोर्ट करण्यात टीआरपी दिसला नसेल म्हणून रेपोर्टींग झाले नसेल. यापुढच्या काळात मात्र जर अशा केसेस आढळल्या तर नक्की रिपोर्ट होतील. त्या निमित्ते सत्य परिस्थिती कळेल.

काल दुकानात गेले असताना ह्या डाळीची परत चर्चा झाली. तो म्हणाला की बहुतेक करुन मजुर लोक ही डाळ घेतात आणि घेताना सोबत मुग आणि मसुर डाळही घेतात. तिन्ही डाळी एकत्र करुन ते वापरतात. आधी तुर वापरत होते आता ही वापरतात तुरीच्च्या जागी. तिन डाळी एकत्र केल्याने त्यांना चवीत फरक पडत नसावा असे तो म्हणाला. आरोग्याची अर्थात आम्ही चर्चा केली नाही. कधीपासुन ही डाळ मिळतेय विचारल्यावर तो म्हणाला की गेले कित्येक वर्षे बाजारात मिळतेय पण माझ्याकडे लोक आता विचारायला लागले म्हणुन मी आणायला लागलो.

बहुतेक तिन्ही डाळी मिक्स करून खाल्ल्यावर या डाळीचे न्यूरॉटॉक्सिक इफेक्ट होणार नाहीत असे वाटते.
तरिही खरे काय ते साधारण चार पाच वर्षे गेल्यावरच कळेल.

सगळेच मिक्स करुन खातात असे नसेल. दुकानदाराने त्याचा अनुभव सांगितला. पण बहुतेक वेळा झोपडीत राहणारी मंडळी बाहेर बसुन चुलीवर भलीथोरली भाकरी बनवतात आणि ती डाळीसदृश्य प्रकाराबरोबर खातात हे पाहिलेय. दिवसभराच्या मेहनतीनंतर आपल्यासारखे डाळ भात भाजी चपाती असे वेगवेगळे करत बसायला जमत नसेल. आमच्याइथे सतत बांधकामे चालु आहेत आणि बहुतेक मजुर तिथेच आजुबाजुला कुटूंबा समवेत राहतात . त्यामुळे त्यांचे राहणिमानही येताजाता नजरेला पडते.

Pages