दाल में कुछ केसरी है!

Submitted by साती on 22 January, 2016 - 05:55

आम्ही डॉक्टरकी शिकत असताना आम्हाला "अन्नधान्ये बघून ओळखणे' असा एक प्रश्न प्रात्यक्षिक परीक्षेकरता होता,
यात तूरडाळ आणि केसरी डाळ यांच्यातील फरक स्पष्ट करणे जरा अवघडच.
नाजूकशी गोलसर तूरडाळ आणि चौकोनी जरा जाडसर केसरी/ लाखी डाळ.

image_70.jpg

(फूड सेफ्टी गेटवे डॉट कॉमवरून )

अधिक सुस्पष्ट चित्रे-

तूरडाळ-
image_76.jpg

लाखीडाळ/ केसरी डाळ
image_77.jpg

(वरिल दोन्ही चित्रे मायबोलीकर 'साधना' यांच्या सौजन्याने)

का बुवा इतक्या किचकट डाळी ओळखायला लावतात याचे उत्तर लगेच थिअरी क्लासात मिळाले.
"न्यूरोलॅथरिझम." म्हणजेच लॅथिरस सटायवम उर्फ केसरी डाळीमुळे होणारा मज्जासंस्थेचा एक आजार.

या आजारात केसरी डाळीतल्या एका विशिष्ट अमिनोअ‍ॅसिडमुळे आपल्या पायांकडे जे मेंदूकडून जाणारे पिरॅमिडल ट्रॅक असतात (पायांच्या हालचालींकरिता) ते मरण पावून पायामध्ये अपंगत्व येते. पाय हळूहळू शक्तिहीन तसेच कडक होत जातात.(याला वैद्यकीय भाषेत अप्पर मोटार न्यूरॉन साईन्स असे म्हणतात.) अशा दोन्ही पाय शक्तीहीन आणि कडक होण्याच्या आजाराला स्पास्टिक पॅराप्लेजिया म्हणतात.
आम्ही शिकायला येईपर्यंत हा आजार भारतातून जवळपास नष्टच झाला होता. त्यामुळे औषधोपचार किंवा इंटर्नल मेडिसीन या विषयाअंतर्गत हा आजार शिकायला मिळाला नाही फारसा.
या आजाराच्या उद्भवाची कारणे तसेच तो आजार नष्ट होण्याची कारणेही औषधोपचारांपेक्षा आर्थिक आणि सामाजिक अधिक होती. त्यामुळे आम्ही हा आजार शिकलो पी एस एम म्हणजे 'रोग प्रतिबंध आणि सामाजिक वैद्यकशास्त्र' या विषयात.

तर , भारतात हरितक्रांती होण्यापूर्वीची गोष्ट आहे.शेती उद्योग अत्यंत बेभरवशाचा. सिंचनाची भक्कम व्यवस्था नाही. अश्या परिस्थितीत त्यावेळी बर्‍याच राज्यांत केसरी डाळ्/लाखी डाळ किंवा ग्रास पी (Lathyrus sativum) चे उत्पादन घेतले जायचे. या डाळीला पाणी कमी लागत असल्याने तसेच भर उन्हाळ्यातही टिकून रहाण्याची या रोपाची क्षमता असल्याने शेतकर्‍यांना दुष्काळात हमखास मदतीचा हात देणारे पीक म्हणून याची ख्याती होती.अल्पभूधारक शेतकरी तर यावरच अवलंबून होते. त्याहून थोडे मोठे शेतकरी बाकीच्या पिकाबरोबर एक - दोन दळे हे पीकही लावत.बाकीची पीके पावसाअभावी बुडली तरी हे पीक वाचत असे. त्यामुळे गरज पडल्यास वापरता येई, पण त्याहून महत्वाचे म्हणजे जे भूमिहीन शेतकरी, आदिवासी इत्यादी लोक हे मोठे शेतकरी आपल्या शेतात राबवून घेत असत, त्यांचा पगार पसापसाभर या डाळीच्या रूपात व्हायचा.

गोरगरीब लोकांना दुष्काळाच्या काळात, बाकीच्या डाळी आणि अन्नधान्यांची टंचाई असेल त्या काळात ही डाळ हा एकच पर्याय . ही डाळ विस्तवावर जराशी उकडून त्यात थोडे मीठ आणि पाणी घालून वरण करणे किंवा डाळ दळून आणून त्या पीठाच्या जाडसर रोट्या करणे अश्या दोन पद्धतीने गोरगरीब ही डाळ खायचे.
श्रीमंत लोक मात्र यात इतर पिठे मिसळून त्याच्या लाडू, मिठाया बनवून खात. किंवा मस्त खदखद उकळून ,आमटी बनवून मग छान लिंबू पिळून भात किंवा गव्हाच्या रोटी/पोळीबरोबर खात.

एकदा काय झालं, खूप मोठा दुष्काळ पडला. बिहार, मध्यप्रदेश ,महाराष्ट्र इत्यादी राज्यांतल्या काही जिल्ह्यांत अचानक या दुष्काळाच्या काळात पायांमध्ये पक्षाघात झालेले रूग्ण दिसू लागले. काही काही वाड्या-वस्त्यांतून या एकाच आजाराचे खूप रूग्ण दिसू लागले. कंबरेखाली कडक झालेला पाय, बसता उठता येत नाही, नितंबांवरिल स्नायू अगदी कृश होऊन आतली हाडे दिसू लागलेली अश्या अवस्थेतले रूग्ण.

१. सुरूवातीच्या काळात एका काठीच्या आधारावर चालणारे रूग्ण

image_71.jpg

(ही इमेज डॉक्टर्स हँगाऊट . कॉम या संस्थळावरून घेतलीय.)

image_72.jpg
(ही इमेज लुकफॉर डायग्नोसिस .कॉम या संस्थळावरून घेतलीय.)

२. नंतर दोन्ही पायांतली ताकद जाऊन दोन काठ्या घेऊन चालणारा रूग्ण.
image_73.jpg

( ही इमेज लुकफॉर डायग्नोसिस . कॉम या संस्थळावरून घेतलीय.)

३. एकाच गावातले अश्या प्रकाराने बाधित झालेले अनेक लोक.
image_74.jpg

(ही इमेज इंडियनएनवॉयर्नमेंट पोर्टल .ऑर्ग.इन या संस्थळावरून घेतलीय.)

अचानक असे रूग्ण कसे काय दिसायला लागले याचा विचार करताना लक्षात आलं की हे सगळे रूग्ण आहारात अक्षरश: तिन्ही त्रिकाळ या केसरी डाळीचे पदार्थ खातायत.

मग या डाळीचे आणि या रूग्णांचे अ‍ॅनालिसिस सुरु झाले. तेव्हा एक भयावह बाब समोर आली. या डाळीत एक प्रकारचे अमिनो अ‍ॅसिड असते. B -n-oxalyl-L-a-B diaminopropionic acid नावाचे.(आम्ही शिकताना याला BOAA असे संक्षिप्त रूप होते. आता B-ODAP हे रूप वापरतात. आता आपण तेच वापरू.) तर हे अमिनो अ‍ॅसिड ही डाळ खाणार्‍याच्या आतड्यांतून शोषून रक्तात मिसळल्यावर तिथून स्पायनल कॉर्डसच्या पायाला हालचालींचे सिग्नल देणार्‍या मज्जातंतूंकडे म्हणजे पिरॅमिडल ट्रॅक्सकडे जात होते. काही वेळा तिथून मेंदूमध्ये जे पिरॅमिडल ट्रॅकचे मज्जारज्जू निघतात तिथेही जाऊन ते नष्ट करत होते.
आता हे अमिनो अ‍ॅसिड याच पेशींना का नष्ट करते, पायाचेच मज्जारज्जू का डॅमेज करते ही एक मोठी बायोकेमिकल स्टोरी आहे. ते समजून घेणे हा या लेखाचा उद्देशही नाही तेव्हा ते इथेच सोडू.
हे नेमके कारण जरी १९६४ साली वैज्ञानिकांनी शोधून काढले तरी त्याआधीच केसरी डाळ आणि न्यूरोलॅथरिझमाचा संबंध लक्षात येऊन १९६१ सालापासूनच ह्या डाळीची पैदास करणे, विकणे आणि खाणे यांवर भारतात निर्बंध आले होते.

पण आपण भारतीय अतिहुशार! बंदी आली म्हणजे ती गोष्ट दुप्पट उत्साहाने करायची अशी आपली सवय. त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातही कित्येक दुष्काळी जिल्हे हे पीक घेत राहिले. आणि दिसण्यात असलेल्या साधर्म्यामुळे तूरडाळीत या स्वस्त डाळीची भेसळ करत राहिले.
आता वाचायला गंमत वाटेल पण काल एक १९८८ सालची पेपरातली बातमी वाचली 'तूरडाळीचे भाव किलोला १५ रु असे गगनाला भिडल्याने तूरडाळीत विषारी केसरी डाळीची भेसळ. गरीबांना ४ रु किलोवाली केसरी डाळ खाण्याशिवाय पर्याय नाही.' ही बातमी होती मध्यप्रदेशातील.
अश्या अनेक ठिकाणी बातम्या येतच होत्या. त्यामानाने न्यूरोलॅथरिझमचे रूग्ण काही नव्याने दिसत नव्हते. मग कुणीतरी शहाण्याने 'खरेच हा पक्षाघात केसरी डाळिमुळेच होतोय की आपली उगीच एक अफवा?' असा प्रश्न काढला.
खूप प्रयत्न करूनही हा आजार प्रयोग शाळेतील प्राण्यांत घडवून आणायचे शास्त्रज्ञांना इतकेसे स्पष्ट साधले नव्हते.
मात्र २०१२ साली हैद्राबादेतल्या आय सी एम आर ने कोकरांना ही डाळ खायला घालून त्यांच्यात हा आजार 'नि:संदिग्धपणे ' घडवून आणला.
आणि मग या आजाराबाबत संशोधनाचे एक नवे क्षितिज उघडले.
पुढल्याच वर्षी महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यात प्रत्यक्ष ही डाळ खाणार्‍या लोकांमध्ये केस स्टडी झाला. १०५ घरांतील ५९६ लोकांचा अभ्यास झाला. हे लोक केसरी डाळ बर्‍यापैकी नियमितपणे खात होते. मात्र मागच्या वीस पंचवीस वर्षांत यांपैकी कोणालाही हा आजार झाला नव्हता. अगदी कसून मज्जासंस्थेची तपासणी केली गेली तरी हा आजार झाला नव्हता. गंमतीची गोष्ट म्हणजे दोन आजोबा असे सापडले की ज्यांना त्यांच्या तरूणपणी हा आजार झालाय. पण नव्याने कुणालाही नाही.
या गावात असलेल्या केसरी डाळीच्या प्रजातीत हे विनाशक अमिनो अ‍ॅसिडच नसेल अशी कुणीतरी शंका काढली. तर त्याचीही चाचणी अगोदरच केली गेली होती. या गावात असणार्‍या डाळीच्या प्रजातीतही तेवढ्याच प्रमाणात हे अमिनो अ‍ॅसिड होते जेवढे फार पूर्वी न्युरोलॅथरिझमचे पेशंट्स सापडले तेव्हा खाल्ल्या जाणार्‍या डाळीत असायचे.

तेव्हा या आणि अश्या अनेक अभ्यासांतून लक्षात आलेली महत्त्वाची माहिती अशी-
१. केवळ केसरी डाळ खाण्याने हा आजार होतो असे नाही तर त्याबरोबरच अनेक इतर कारणे याला जबाबदार आहेत.
२. प्रत्येक प्रजातीच्या केसरी डाळीत असणारे घातक B -ODAP ह्या अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण वेगवेगळे आहे.
३.जर आपल्या आहाराच्या १/४ इतका भाग किमान ५० ते ६० दिवस ही डाळच असेल तर हा आजार होण्याची शक्यता वाढते.
४. ही डाळ कमीतकमी अर्धा तास भरपूर पाण्यात उकळून , ते पाणी फेकून मग डाळ खाल्ल्यास या डाळीतील घातक अमिनो अ‍ॅसिड नष्ट होते.
५.या डाळीत इतर डाळी मिसळून खाल्ल्यास आणि त्या मिसळलेल्या डाळींत गंधक असणारी अमिनोअ‍ॅसिड्स असल्यास या डाळितल्या विषाचा प्रभाव तर कमी होतोच पण त्यबरोबर शरीरास मिळणार्या एकंदर प्रथिनांची गुणवत्ता (quality of proteins) वाढते.
६. व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यास या डाळीतल्या विषारी अमिनो अ‍ॅसिडचे योग्य विघटन होत नाही.
७. काही व्यक्तींमधील पचनशक्ती आणि काही विशिष्ट एंझाईम्सच्या कमतरतेमुळेप्रत्येक व्यक्तीवर होणारा या विषारी द्रव्याचा प्रभाव वेगवेगळा आहे.

आता या माहितीचा उपयोग पाहूया.
१. केवळ केसरी डाळ खाण्याने हा रोग होत नाही- बरोबर. गरिबी, खायला दुसरे काहीच उपलब्ध नसणे, ही डाळ योग्य प्रकारे न शिजवणे ही कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत.
२. प्रत्येक प्रजातीत असणारे B-ODAP चे प्रमाण-- आपल्या घरात येणार्या डाळीतल्या या अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण किती आहे याचा अंदाज केवळ डाळ पाहून करणे शक्य नाही. शेतकरी फक्त अश्या प्रमाणित जातींचीच लागवड करतायत का यावर लक्ष ठेवणे भारतात या घडीला तरी अवघड आहे. इथे भांगेची शेतीसुद्धा गुपचूप केली जाते .
३.आहाराच्या १/४ भाग सलग ५०-६० दिवस-- हे टाळणे आपल्याला सहज शक्य आहे. पण गोरगरीबांना एकदा स्वस्त डाळ मिळायला लागली की ती पावभागच खाऊन बाकी महागडी डाळ खा म्हणून सांगणे कठिण आहे. उपाहारगृहांत/ मेसमध्ये/ खानावळीत हे तंत्र पाळलेच जाईल याची खात्री आपण बाळगू शकत नाही.
४.डाळ भरपूर पाण्यात , अर्धा तास उकळणे- गोरगरीबांना/ आदिवासी लोकांना दुष्काळाच्या काळात नेमके मुबलक पाणी आणि चुलीला इंधनच मिळत नाही. अक्षरशः जराशी मऊ झाली कि ही डाळ खातात.
तसेच उपाहारगृहांत/ खानावळीत/मेसमध्ये ही दक्षता घेतली जाईलच असे नाही.
५.या डाळीत इतर डाळी मिसळणे- ते शक्य झालं असतं तर काय महाराजा! तूरडाळ मिळत नाही आहे सध्या म्हणून तर ही डाळ प्रकाशात आलीय. दुसर्‍या डाळी खाणे शक्य असताना ही डाळ मुद्दाम खाऊन कोण पाहिल?
६.व्हिटॅमिन सी ची कमतरता-योग्य प्रमाणात लिंबू इळून ही डाळ खाल्ल्यास त्या अमिनो अ‍ॅसिडचे विघटन होईल. पण प्रत्येक वेळी लिंबू पिळायचे लाड पुरवायला गोरगरीबांना/ दुष्काळी गावातल्या/आदिवासी पाड्यातल्या लोकांना जमेल का?
७. व्यक्तिगणिक वेगळे इफेक्ट- या शक्यतेची चाचणी करणारी कुठलीही सोपी पद्धत उपलब्ध नाही. तुमच्यावर परिणाम दिसले तरच मागाहून कळणार. कोण मुद्दामहून हे परिणाम होतात का हे पहायला जाईल ?

असे आहेत या केसरी डाळीचे प्रताप. संशोधन करणं, त्यातून वेगवेगळे निष्कर्ष काढणं शास्त्रद्यांचे कामच आहे. मात्र त्यातून बाकीच्या सामाजिक / आर्थिक परिस्थितीचा विचार न करता आपल्याला सोयीस्कर भागाचेच अर्थ काढून धोरण राबवणे हे राजकारण्यांचे काम आहे.
केसरी डाळीवर संशोधन , केसरी डाळीचे दुष्परिणाम कमी करण्याबाबतचे संशोधन, एवढेच नव्हे तर केसरी डाळीतल्या औषधी घटकांवर संशोधन( हो, ते ही या डाळीत आहेतच) हे मागच्या अनेक सरकारांच्या काळात चालतच आलंय.
मात्र आत्ता इतर डाळींच्या किंमती गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर गेल्या असताना, बाजारात लोकांच्या आहारात असलेल्या तूरडाळीचा कृत्रिम किंवा खरा तुटवडा जाणवत असताना, भारतातल्या मुख्यत्वे तूरडाळ उत्पादन करणार्‍या प्रदेशात सलग तिसर्या वर्षी दुष्काळ पडलेला असताना मुद्दाम या केसरी डाळीच्या उत्पादनाला आणि विक्रीला राजरोस परवानगी देणं मलातरी चुकीचं वाटतंय.
तुम्हाला काय वाटतं?

......................................................................................
तळटीप-
१. चित्रे आंतरजालावरून घेतली आहेत. त्या मध्ये हा लेख वाचणार्‍यांच्या माहितीत भर पडावी इतकाच उद्देश आहे.
त्या त्या चित्राखाली कुठून घेतली याची लिंक दिली आहे.
२. हा लेख कुठेही शेअर केला तरी चालेल मात्र लेख 'मायबोलीवरिल डॉ.साती यांनी लिहिला आहे हे कृपया लिहा.
३. वेळ मिळेल तसा टाईप केल्याने व्याकरणाच्या असंख्य चुका आहेत , त्या हळूहळू निस्तरल्या जातील.
४. प्रतिसादांत जमेल तसे शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करेन.

(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही लाखी डाळ काय १-२ महिन्यात तयार नाही झालीय.
आधी हिचं पीक घेऊन मग तुरडाळ शिताफीने गडप केली.
जेणेकरुन ४०-५० किलो वाली लाखी २०० ने विकता यावी.

हाईट तर ही की बंदी असुन देखिल बाजारात खुलेआम विक्री चालली आहे.

धन्यवाद साती!

कठीण आहे सगळं...सरकार लोकांच्या जिवाशी खेळत आहे. आणि मी मिडियामध्ये पाहिलं तर या डाळीची फारशी 'बातमी'च झालेली नाही. विरोधकांनीही हे प्रकरण उचलून धरलेलं नाही. कोणालाच पर्वा नाही असं दिसतंय.

भारतात रहाणार्‍यांपैकी कुणाला इथे http://www.activism.com/en_IN/petitions.in पिटीशन क्रिएट करणं शक्य आहे का? मायबोलीवर लेख लिहिणं आणि बाकींनी तो सोशल मिडीयावर शेअर करणं, अवेअरनेस आणणं हा एक भाग झाला पण त्यापुढे काय? मी अनुने पान २ वर हे सुचवलं आहे पण त्याचं पुढे काही झालेलं दिसलं नाही.

कुठल्याही गोष्टीच्य गरजेपेक्षा कमी उत्पादन झाले की किंमती वाढतात. जास्त उत्पादन झाले तर किंमती कमी होतात.
In general if consumption remains same , २% उत्पादन कमी झाले तर २०% भाव वाढतात आणि जर २% ने उत्पादन वाढले तर २०% भाव कमी होतात. ( १०% उत्पादन वाढले की १००% कमी होत नाहीत कारण पहिल्या २% वाढीला किंमत ८०% होते , परत २% उत्पादन वाढले की ८०% चे २०% कमी होतात म्हणजे मुळ रक्मेच्या ६४% होतात आणि असे चालुच राहते. ) हा economic चा नियम आहे. कच्चा तेलाबद्दल आपण $२० पासुन भाव $१४७ वर जाउन परत $३० वर आलेले बघितले आहेत ते गरज आणि उत्पादन ह्यातिल तफावतीवरुन् झालेले आहेत.

भारतिय लोकासाठी तुरदाळ हा अविभाज्य घटक आहे. जरी किंमती वाढल्या तरी consumption कमी होत नाही . गरीब लोकाना रेशन वर तुरदाळ मिळते. मध्यम वर्गीय लोक भाववाढीला शिव्या देतात पण तेवढीच दाळ विकत घेतात.
पण मागील ३ वर्षातिल दुष्काळा मुळे उत्त्पन्न खुप कमी झाले आहे. भारताबाहेर ही दाळ फक्त मन्यमार आणि मेलवाई या दोन देशातच उगवली जाते. ह्या देशातील शेतावेर मलेशियन आणि सिंगापुर च्या किंपन्यानी कब्जा केलेला आहे. जेव्हा भारतातील दाळ बाहेर विकायला बंदी असते तेव्हा ही दाळ अनिवासी भारतातील लोकासाठी विकायला काढतात. त्यामुळे भारताला ही दाळ आयात करायला खुप कमी scope आहे.

पहिल्या दोन वर्षात भारतात जो साठा होता तो वापरला गेला . आता ह्या वर्षात खुप कमी साठा आहे. जर ह्या वर्षी गरजे एवढे पिक नाही आले ( ज्याची शक्यता जास्त आहे) तर पुढे दाळीचे भाव खुप जास्त राहाण्याची शक्यता आहे.
आणि भाव चढे असल्याने आणि दुश्काळात लाखी दाळ सहज उगवत असल्याने (आणि तुर येत नसल्यामुळे) त्याचे पिक काढले जात आहे. गरीब शेतक्र्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. आणि जर शेतकरी पिकवत असेल तर law enforcement करणे अवघड आहे. विरोधक पण ह्या प्रकरणाला उचलु शकत नाहीत काण त्याचा राज्यात पण हेच चालु आहे. कर्णाटकात कोग्रेस चे सरकार आहे पण तिकडे पण ह्या दाळीचे उत्पन्न केले जाते. तिच गोष्ट आपल्या राज्याची, गुजरात म. प्र. जिथे बिजेपी आहे. ,
बाकीच्या दाळीचे मात्र बर्याच देशात उगवतात. मुग चायना , थायलंड मध्ये, छोले middle east, राजमा अमेरिकेत, मसुर जवळपास सर्व देशात (फक्त रंग वेगळा असतो). त्यामुळे त्याचा किमती वाढतिल पण तुरदाळी एवढ्या नाही वाढणार.
याला उपाय तुरदाळीचे consumption कमी करणे. आमच्या पुरते म्हणायचे झाले तर पुर्वी आम्ही रोज तुरदाळ खात होतो , हा लेख वाचल्यापासुन आठवड्यात ५ दिवस खायचे ठरवले आहे. एक तर तुरदाळीचे consumption कमी करण्यात हातभार लागेल. आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे जर आमच्या तुरदाळीत जर लाखी दाळीची भेसळ असेल तर total food intake मध्ये तिचे प्रमाण कमी असेल. बाकीचे दिवस मुगदाळ, मसुर किंवा मुगाची आमटी.

वडलाचा दोन्ही वेळेचे डबा बाहेरुन येतो आणि त्यात लाखी दाळ असण्याची शक्यता खुप जास्त आहे. त्याना ती दाळ उकळुन घ्यायला सांगितले आहे.

साती माहीती बद्दल धन्यवाद.

लाल(मी लाल ऐकल होता.) डाळ वाईट अस फक्त माहीत होत. का आणि कशी ओळखाय्ची हे आता कळल.

जब्‍त दाल में से 70% जमाखोरों को ही वापस, आरटीआई का खुलासा

देश में दालों की जमाखोरी के खिलाफ हुई सरकार की कार्रवाई में एक नई जानकारी सामने आई है। महाराष्ट्र सरकार ने दालों के जब्त भंडार में से 70 प्रतिशत उनके मूल मालिकों को ही वापस कर दिया। ”

आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली ने खाद्य एवं नागरिक आपूर्ति एवं उपभोक्ता संरक्षण विभाग में दो अर्जियां दायर कर कार्रवाई के दौरान जब्त भंडार और वापस की गई दाल के साथ-साथ जमाखोरों के खिलाफ दर्ज मामलों के बारे में सूचना मांगी थी।

विभाग ने अपने जवाब में कहा कि चार जनवरी 2016 तक मुम्बई, ठाणे, अमरावती, औरंगाबाद, पुणे, नासिक, काेंकण मंडलों में कुल 123028 टन अरहर दाल और खाद्य तेल जब्त किया गया। जब्त की गई दाल एवं खाद्य तेलों की मात्रा में से 85546 टन यानी करीब 70 प्रतिशत को उन्हीं मालिकों को जारी कर दिया गया। विभाग के उप सचिव एस एस सुपे ने कहा कि विभाग के पास अभी भी 37480.608 टन दाल एवं खाद्य तेल है

http://www.outlookhindi.com/business-and-economy/policies/70-pc-of-seize...

कुठल्याही गोष्टीच्य गरजेपेक्षा कमी उत्पादन झाले की किंमती वाढतात. जास्त उत्पादन झाले तर किंमती कमी होतात.
<<

साहेब अख्खी तूर ८० रु. मॅक्स.
तूरडाळ २००-३००₹ असे का?

साती, अतिशय उत्तम लेख. इथे तज्ज्ञ दृष्टीकोनातून मते मांडल्याबद्दल धन्यवाद Happy
या डाळीवर बंदी असली तरी लहानपणापासूनच अशी एक विषारी डाळ असते व ती दुकानात मिळतेही हे माहित आहे. तेव्हा बंदीचं पालन कितपत होत होतं हाही संशोधनाचाच विषय आहे..

माझ्या अ‍ॅकेडेमिक इंटरेस्टसाठी - या डाळीचं पीक दख्खनच्या ताम्रपाषाणयुगातही घेतलं जात होतं. जळलेले दाणे सापडले आहेत. पण बहुतेक मूग, मसूर, तूर, हरभरा, कुळीथ अशा विविध द्विदलांबरोबर सेवन होत असल्याने कमी प्रमाणात खाल्ले जात असावे. कारण मिळालेल्या कुठल्याही सांगाड्यावर पक्षाघाताचा परिणाम झाल्याचे दिसलेले नाही (मुळात या डाळीने झालेल्या आजाराची चिन्हे हाडांवर दिसत/राहत असावीत असे गृहितक मी धरले आहे). ज्याअर्थी तेव्हापासून ही डाळ माहित आहे, त्याअर्थी नंतरही ही डाळ कमीप्रमाणात का होईना वापरात असणार. फक्त त्याचे पुरावे मिळाले/मिळवलेले नाहीत किंवा बारकाईने तपासले नाहीत..

आमच्या इथे बंगालमधे मुख्य डाळ मसूर, व नंतर मूग, हरभरा असल्याने तूर क्वचितच खाल्ली जाते. पण आता घरी आणताना मी तपासून बघेन.

हा लेख लिंकसहित काही जणांना ईमेल करते आहे.

तसंही आपल्या भारतीयांच्या साठी सगळ्यात कवडीमोलाची चीज म्हणजे माणसाचा जीव असते. दुसर्‍याचा गेला तर काय फरक पडतो? इतके कोटीकोटी लोक आहेत की... फक्त तो एक आपल्या कुणाचाही असू शकतो याची जाणीव फारशी आपण करून घेत नाही. किंवा आपल्यापुरतं बघून ती शक्यता आपल्यापुरती कमी करतो. इतरजण गेले खड्ड्यात.. तेव्हा यथा प्रजा तथा राजा असं सरकार आपणच आपल्यासाठी निवडत असतो....

मस्त माहीती ! पण या लाखीडाळीवरील बंदी उठविण्याबाबत डॉ कोठारी हे गेल्या कित्येक वर्षांपासुन लढा देत आहेत. मध्यंतरात याडाळीवरील बंदी अंशत: मागे घेतली असे वाटते.
हा व्हिडीओ
http://abpmajha.abplive.in/videos/nagpur-nutritionist-shantilal-kothari-...

साहिल शहा यांचा प्रतिसाद अतिशय माहितीपूर्ण आहे.

दीड मायबोलीकरांचा प्रश्नही तितकाच तार्किक आहे.

मागणी / पुरवठा यांच्यातल्या व्यस्ततेनुसार किंमतीतले चढ उतार होत असतात. डाळी / तांदुळ हे धान्य प्रकार शेतकरी - मिल - व्यापारी या साखळीमार्गे बाजारात येत असतात. त्यातील मिल व व्यापारी हे सधन व तगडे खिलाडी असल्याने त्यांनी साठवणूक केली असल्याची शक्यता बरीच आहे. जर त्यांच्याकडे खरंच असा प्रचंड साठा असेल तर तूरडाळीला पर्याय उपलब्ध झाला (आणि तो लाखी डाळीचाच असावा असे नव्हे तर आधी एका प्रतिसादात कुणीतरी सांगितल्याप्रमाणे तमिळनाड़ू पॅटर्नप्रमाणे इतर प्रथिनयूक्त धान्यांचाही असू शकतो) तर आपोआपच हे साठेबाज आपल्या गोदामातील डाळ रास्त भावात बाजारात आणतील.

राहिता राहिला प्रश्न तूरडाळीची टंचाई व त्यावर तोडगा म्हणून लाखी डाळी वरील बंदी उठविण्याच्या सरकारी निर्णयाचा आणि त्याबद्दल त्यांना दोष देण्याचा तर यावर इतकेच म्हणता येईल की काही दशकांपूर्वी डाळीपेक्षाही अत्यावश्यक अशा अन्नधान्याची अर्थात गव्हाची टंचाई झाल्याचा इतिहास कुणाला आठवतोय का? तेव्हाही टंचाईच्या काळात विदेशाहून आणलेला लाल गहू जनावरांनीही खाण्याच्या लायकीचा नाहीय अशी टीका झाली होती. अर्थात म्हणून आता या सरकारने दिलेली लाखी डाळ खावी असे माझे म्हणणे नाही. भारतीय सरकार मग ते कुठल्याही पक्षाचे असो ते जनतेच्या प्रश्नांविषयी उदासीनच असते असे त्या त्या वेळी असलेल्या विरोधी पक्षीयांचे मत असते. सामान्य माणसाला खरी वस्तुस्थिती कळेलच असे नाही. त्याने स्वतःची काळजी स्वतःच घेणे सोयीस्कर.

ती काळजी कशी घ्यावी (म्हणजे डाळ उकळून पाणी फेकावे इत्यादी उपाय) धागालेखिकेने सविस्तर नमूद केले आहेच. तसेच तमिळनाडू पॅटर्ननुसार इतर कडधान्ये खाण्याचा मार्गही प्रतिसादांत सुचविला गेला आहेच.

साहेब अख्खी तूर ८० रु. मॅक्स.
तूरडाळ २००-३००₹ असे का?

अख्या तुरीपासुन तुर बनेपर्यन्त वजनात २०% घट होती आणि मजुरी पण जाते तरीपण ८० रुपये आणि २०० रुपये एवढी तफावत नसायला पाहिजे.

असे असेल तर शेतकर्यानी संघटीत झाले पाहिजे आणि योग्य भाव मिळवला पाहिजे. १९७२ च्या आधी तेल उत्पादन करणारे देश संघटीत न्हवते तेव्हा त्याना भाव मिळत न्हवता. पण त्यांनन्तर त्याना योग्य भाव मिळायला लागला.
पण गरजेपेक्षा जास्त उत्पन्न झाले तर कोणिच काही करु शकत नाही . म्हणुनच OPEC नी काही केले तरी सध्या तेलाचे भाव चढे नाहित. हीच गोष्ट उसाची पण आहे. तसेच गरजेपेक्षा कमी उत्पादन होणार असेल तर भाव वाढणारच.

जहां डाल डाल पर सोने की चिडीया करती है बसेरा..

साधनातैं नी दिलेली प्रचि टाकल्यानंतर गोंधळ वाढला माझा. दोन्ही सारख्याच दिसतात. आता मी आणलेली डाळ खरंच कुठली आहे हे समजत नाहीये

मला वाटते हा आजचा प्रॉब्लेम नाही आहे. गेल्या कित्येक वर्षांचा साचलेला प्रॉब्लेम आहे. आणि पुढच्या वर्षी पाऊस नीट झाला नाही तर अजून वाढेल.
पाऊस कमी झाला मान्य. पण भूजल पातळ्या काही अचानक खोल गेल्या नाही आहेत. मराठवाड्यातल्या पूर्वीच्या बारमाही विहिरी सुद्धा कोरड्या पडू लागल्या आहेत. (अनेक विहिरी तलाव गाळाने भरले आहेत हा मुद्दा वेगळाच)

सिंचनाचा प्रश्न राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर सुटायला हवा. कोणाचेही सरकार असो, विश्वस्ताने मालकासारखे वागू नये आणि देशाची वाट लावू नये. राजकीय रंग देऊन हा प्रश्न सुटणारा नाही.

भूजल पातळी सुधारणे, सिंचन प्रश्न सोडवणे, शेतकर्‍यांना इतर कमी पाण्याची पिके घेण्यास उद्युक्त करणे ह्याबाबत आपण काही करु शकतो का? कोणी करत आहे का? त्यात आपण स्वयंसेवक म्हणून जाऊ शकतो का.

कालच एका डेंटीस्ट टर्न्ड आयएएस ऑफिसरची माहिती वाचली. तो ओस्मानाबाद मध्ये सिंचनावर बरेच काम करत आहे. असे काही इतर कुठे होत आहे का. (अहमदनगर मधील हिरवे बाजारात झाले होते ना?) मग तसे सगळीकडे का होऊ शकत नाही.

सगळ्यांना धन्यवाद!

सायो, तुम्ही म्हणता पिटीशन फाईल करा, पण सिस्टीमशी लढायला जेवढा वेळ आणि बेरडपणा लागतो तितका माझ्यात नाही.
इथे माबोवर कुणाच्यात असेल असे वाटतही नाही.
तुम्ही दिलेल्या साईटवर पाहिल्यास अशा प्रकारच्या पिटीशन्सना प्रींट घेऊन कचर्‍याची टोपली दाखवायचीही संबंधित लोक तसदी घेणार नाहीत हे नक्की.
मूळात या निर्णयाविरुद्ध लढताना आपण नक्की किती जणांशी , किती लॉबीजशी पंगा घेऊ हेच आपल्याला कळणार नाही.

काँग्रेसने या निर्णयाविरुद्ध आवाज उठवायला सुरूवात केलीय असं आजच वाचलं. दुसरा कुठला सनसनाटी इश्यू निर्माण होऊपर्यंत ते ही पाठपुरावा करतील, मग नविन इश्यूच्या मागे लागतील.

एक सामान्य नागरिक म्हणून मी काय करेन तर सगळ्या शक्यतांचा विचार करून तूरडाळ नेहमी पारखून घेईन.
लाखी डाळ कितीही आरोग्यवर्धक म्हणून प्रूव्ह झाली तरी सध्यातरी मी खाणार नाही किंवा घरातल्यांना देणार नाही.
महिन्यातले जवळपास २८-२९ दिवस पूर्ण शाकाहारी असल्याने वर एका प्रतिसादात दिलेय तसे इतर मार्गांनी कुटूंबाची प्रोटीन्सची गरज भागवायचा प्रयत्न करेन.

बाकी प्रत्येकाने एवढ्या माहितीच्या आधारे आपला निर्णय आपण घ्यायचाय!

पिटीशन फाईल करा >>

हे नव्हतं वाचलं. मी इंडीयन नोनी विरुद्ध एफडीए कडे लेखी आणि फोनद्वारे तक्रार नोंदवलेली होती. मला फोन आले. त्यानंतर एकदा स्टेशनच्या त्या स्टॉकिस्टवर धाड पडली. त्याची बातमी पण झाली. पण लगेचच नोनी ने वृत्तपत्रात जाहीरात दिली की एफडीए ची कारवाई अन्याय्य होती. त्यामुळे ग्राहकांनी गैरसमज करून घेऊ नयेत.

मी फोन केला पुन्हा तर उडवाउडवीची उत्तरं मिळू लागली. मग मला सांगितलं की इंडीयन मेडीकल असोसिएशन च्या अखत्यारीत ही केस येते. बराच पाठपुरावा झाला होता. मला नोनी वाल्यांचेही फोन आले. जाऊ द्या म्हणून.

आयएमए बद्दल काही लिहीत नाही. पण मग पाठपुरावा सोडून दिला.

तेच कपोचे!
अश्या प्रसंगात आपल्याला माहितच नसतं की यात गुंतलेले हितसंबंधी कोण आहेत.
मी केवळ सरकारच्या निर्णयाविरुद्ध कोर्टात जाईन आणि उद्या विदर्भ नाहीतर एम्पीतला कुणी लाखीडाळचा साठेबाज चिडून उठेल.

आयएमए??
आयेमेचा काय संबंध भो?

*

@ साहिल शहा :
>>
असे असेल तर शेतकर्यानी संघटीत झाले पाहिजे आणि योग्य भाव मिळवला पाहिजे. १९७२ च्या आधी तेल उत्पादन करणारे देश संघटीत न्हवते तेव्हा त्याना भाव मिळत न्हवता. पण त्यांनन्तर त्याना योग्य भाव मिळायला लागला.
पण गरजेपेक्षा जास्त उत्पन्न झाले तर कोणिच काही करु शकत नाही . म्हणुनच OPEC नी काही केले तरी सध्या तेलाचे भाव चढे नाहित. हीच गोष्ट उसाची पण आहे. तसेच गरजेपेक्षा कमी उत्पादन होणार असेल तर भाव वाढणारच.
<<

तेच म्हणतोय साहेब मी.

तुम्ही ओपेकच्या तेलात बाहेर देशातली डाळ पकवू नका.

देशातच तूर ८० रुपये किलोने उपलब्ध आहे. डाळ करताना घट, मजूरी अन ट्रान्सपोर्ट किती जाते ते मला चांगले ठाऊक आहे. दालमिलवाले अनेक मित्र जवळच्या बैठकीत आहेत.

मुद्दा हा आहे, की भाव कृत्रीमरित्या फुगलेले आहेत.

टंचाईची परिस्थीती असेल, तर जास्त भाव देऊनही डाळ मिळणारच नाही. इथे सर्रास उपलब्ध आहे.

पण, यासाठी काहीही न करता सरकार तिसरेच "संशोधन" पब्लिश करून संशयास्पद अन्नपदार्थ खाऊ घालण्याचे काम करीत आहे.

या देशात, मॅगी नामक उत्पादनावर रामदेव नूडल्स लाँच होण्याआधी विषारी म्हणून बंदी येते. नंतर मॅगीही सुरू होते. सध्या लाखी डाळ लाँच होतेय, नंतर रामदेव तूरडाळ येईल हळूच थोडी स्वस्तात.

पुन्हा एकदा,

तूरडाळ घोटाळा सुरू आहे. व त्यावर पांघरूण घालून लोकांचे लक्ष तिसरीकडे वळवणे सुरू आहे.

अन ओपेक तुम्हीच काढला, म्हणून.

गेल्या १५ वर्षांतली क्रूड ऑलची ऑलटाईम लो प्राईस सुरू आहे. मार्केट लिंक्ड प्राईस सिस्टीम करून पेट्रोल स्वस्तच होईल हे सांगून येडी घालण्याचे काम कोण करते आहे?

बरं, पुन्हा एकदा. आयएमए ही डॉक्टरांची खासगी संघटना आहे. कोणतीही सरकारी/लेजिस्लेटिव्ह/क्वासीजुडिशिअलही पावर आयएमएला नाही.
तिच्या अखत्यारीत या संबंधातले काहीच नाही.

बघा दीडमा
तरी म्हटलं मी काही लिहीत नाही Lol

एफडीए म्हणत होते की नोनी ९९ आजार बरे करण्याचा दावा करतात. हे आयएमए च्या अखत्यारीत येतं. (औषधांचा परवाना वगैरे )

माझ्या मते अन्न आणि औषध प्रशासन हे एफडीए कडेच असले पाहीजे. आयएमए शी संपर्क साधला होता ओळख काढून. पण ते म्हणाले की ते फूड सप्लीमेंट आहे. आमचा संबंध नाही.

अहो कापोचे,

हे खरेच एफडीएचे काम आहे. आयएमएचा काहीच संबंध येतच नाही. आयएमए कुणालाही कसलाही परवाना वगैरे देऊ शकत नाही.

गल्लीत आपण बाळगोपाळ गणेशमंडळ कसं काढतो? तशी आयएमए ही अ‍ॅलोपथीच्या डॉक्टर लोकांची संघटना आहे. गणेशमंडळ तरी जास्त पावरफुल असते, आयएमए तितकीही नाही. Sad

भूजल पातळी हा फार वेगळा मुद्दा आहे वेल.
घे यंत्र, भोसक जमिनीत आणि मार विहीर हे करून फक्त पाणी मिळत नाही.
पाण्याचे नियोजन, नियमन ना आपल्या कुठल्याही सरकारला जमले ना समाजाला त्याची काही पडलेली आहे.
दूरदृष्टी आणि नियोजनाचा अभाव हे आपल्या देशाचं सर्वच पातळ्यांवर व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल.
निसर्ग बरा पाऊस पाडत होता त्यामुळे फटके पडले नाहीत तेवढे जोरदार इतकेच. अन्यथा सगळे रामभरोसेच चाललेय!!
असो हे खूपच अवांतर झालं...

सध्या डाळ बघून घेणे, प्रोटिन्सची गरज शक्यतो अंड्यांमधून भागवणे हे उपाय करता येण्यासारखे आहेत.

गोरगरिबांना, निदान खेड्यापाड्यातल्या तरी गरिबांना स्वतःच्या कुटुंबाची प्रोटिन्सची गरज अंड्यातून भागावी यापुरत्या चार कोंबड्या पाळता येणे शक्य आहे.

पाण्याचे नियोजन, नियमन ना आपल्या कुठल्याही सरकारला जमले ना समाजाला त्याची काही पडलेली आहे.
दूरदृष्टी आणि नियोजनाचा अभाव हे आपल्या देशाचं सर्वच पातळ्यांवर व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल.>> + ९९९...

ह्यातूनच खालावलेली भूजल पातळी..मग धान्याला पाणी मिळणार नाही, मग धान्याचे उत्पादन कमी .. मग धान्य आयात करावे लागणार.. (अर्थात हे माझे मत आहे.)

कृत्रिम तुटवडा ...

फार्मास्युटिकल कंपन्या सुद्धा ह्या कृत्रिम तुटवड्यात सामील आहेत का? असतील कदाचित. म्हणजे खराब डाळ विकायची मग त्याचे दुष्परिणाम मग त्यावर औषध योजना.. आणि मग त्यातून फार्मा कम्पन्या सुद्धा बक्कळ पैशे कमावणार

मी माझ्या परिने आजूबाजूच्या बायकांना (स्वयंपाक, घरकाम करायला येणार्‍या बायका) सांगायला सुरुवात केली आहे

Pages