तेंंडूलकर माफ करा, आम्ही अजूनही तुम्हाला समजू शकलो नाही !

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

kamala.jpg

सध्या तेंडूलकरांच्या "कमला" नाटकावर आधारीत, "कमला" याच नावाची मालिका चालू आहे.

मी ही मालिका पाहीली नाही. ती किती चांगली किंवा वाईट आहे हे मी सांगू शकत नाही.

सध्या सोशल मिडीयामधे ही मालिका किती भंकस आहे याबद्दल प्रतिक्रिया वाचतो आहे. प्रत्येक प्रेक्षकालाच आपले मत व्यक्त करायचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच.

पण काही प्रतिक्रियामधे "तेंडुलकरांचे नाटक करायचे धाडस तुम्हाला होतेच कसे?", "संहीता बदलताच कशी तुम्ही", "पेलता येत नाही तर कशाला तेंडुलकरांची नाटकं करायला जाता?" , "ही मालिका बंदच करायला पाहिजे" असा सूर दिसतो.

ही मालिका अत्यंत भंकस असेलही. आणि आज तेंडुलकर असते तर त्यांना ती पाहून खूप दु:खही झाले असते कदाचित.
पण त्यापेक्षाही कितीतरी जास्त दु:ख, "तेंडुलकरांचे नाटक करायचे धाडस तुम्हाला होतेच कसे?" या सारख्या वाक्यांचे झाले असते. "त्यांना एका मखरात बसवले गेले आहे आणि त्यांच्या त्या प्रतिमेचा उपयोग करून इतरांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य चेपण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातोय" याचे झाले असते.

माझा तेंडूलकरांचा काहीच अभ्यास नाही. मग माझी तेंडूलकरांबद्दल बोलायची लायकी आहे का?

हो आहे ! फक्त माझीच नाही तर तेंडुलकरांचे काहीही वाचलेल्या , पाहिलेल्या , मग ते अगदी तुटपुंजे का असो, त्या प्रत्येकाची तेंडूलकरांबद्दल बोलायची लायकी आहे. आणि हे मी तेंडूलकरांकरूनच शिकलो आहे.

आणि कुठल्याही दिग्दर्शकाला तेंडुलकरांचे नाटक/कलाकृती याचे त्याला योग्य वाटेल ते ईंटरप्रिटेशन करायचा अधिकार आहे.

आता हे ईंटरप्रिटेशन किती चांगले आणि किती वाईट होईल तो भाग वेगळा. आणि ते कसे वाटले हे सांगायचाही प्रत्येक वाचकाला/प्रेक्षकाला अधिकार आहेच. पण तो अधिकार्/ते स्वातंत्र्य अमुक व्यक्तींनाच असे ईंटरप्रिटेशन करता येईल, इतरांना करता येणार नाही असे सांगू शकत नाही.

जाता जाता: २००२ साली प्रिया गेल्यावर, तेंडुलकर अमेरिकेत आले होते. त्यातले बरेच दिवस ते बॉस्टनलाही राहिले होते. माझ्याकडेही राहून गेले आहेत. त्या दिवसात एक माणूस म्हणून, मुलगी गेल्याच्या दु:खाने व्यतिथ झालेला बाप म्हणून, त्यांना जवळून बघायला मिळालं. आपल्याला मखरात बसवलं जातंय, एका चौकटीत बसवून आपल्या प्रतिमेचा उपयोग करून काही विचारांना दाबलं जातंय असं त्यांना जाणवायला लागलं होतं आणि त्याचा उबगही येत चालला होता.

ज्या व्यक्तिने आयुष्यभर त्याला काय वाटलं ते लिहिलं, अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी लढा दिला , तिचंच नाव , "त्यांना समजण्याची तुमची लायकी नाही म्हणून तुम्ही व्यक्त होऊ नका" असे म्हणण्यासाठी वापरण्यात येत असेल तर आपण तेंडूलकरांना समजूच शकलो नाही.

विषय: 
प्रकार: 

मी पण परत सहज दोन तीन भाग धावत बघितले तर ती सुविद्य पत्नी कमलाला नवऱ्यापासून दूर ठेवण्यासाठी कमलासारखीच वागायला जाते. कमला त्याचे बूट polish करते. पुसून देते. काढते- घालते म्हणून त्याची पहिली पत्नी तेच करते.

दिनेशदा तुम्हाला अजून माहिती असेल तर लिहा, त्यावेळेच्या घटनेबद्दल.

अन्जू, ही प्रत्यक्ष घटना आणि नाटक यात बराच काळ गेला होता. आणि त्याकाळात तशी पद्धत नसल्याने त्या व्यक्तींचा शोध घेऊन, तूमचे नाटकाबद्दलचे मत काय वगैरे कुणी विचारले नव्हते. त्या पत्रकारानेही कधी यावर मत दिल्याचे आठवत नाही.

( आजच्या काळात असे झालेच असते. )

हे भगवान ह्याचं एक पिक्चर पण आलेलं विकि आहे त्याचे. शबाना व दीप्ती नवल. आणि मार्क झुबेर?
http://en.wikipedia.org/wiki/Kamla_%28film%29

मूळ पत्रकार अश्विन सरीन. कमला ची तेव्हाची किंमत २३०० ( विकी रेफेरन्स.) इंडिअन एक्स्प्रेसचे ते पत्रकार होते. भिल्ल जमातीत ही प्रथा आहे असे विकीत लिहीले आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Bhil_people

न्युयॉर्क टाइम्स ची ११ ऑगस्ट १९८१ ची लिंक आहे त्यात त्या तेव्हाच मध्यमवयीन होत्या व सर्व धुरळा खाली बसल्यावर त्यांना मर्जी विरुद्ध एका सरकारी अनाथालयात डांबून ठेव्ण्यात आले होते. डील नुसार त्यांची सर्व काळजी व अपब्रिंगींग , खर्च त्यांच्या मालकाने करणे अपेक्षित असल्याने त्या मनातुन तिथे राहालया ना खुश होत्या.
http://www.nytimes.com/1981/08/11/world/price-of-woman-in-india-306-and-...

आता आजचा भाग बघणे आले. कमला सिनेमा यू ट्यूब वर ही असेल.
घरी जाउन शोधते.

धाग्याला वळण लावण्याचा उद्देश आजिबात नाही. पण हे एका मालकाची प्रॉप्र्टी वगैरे सहनच करू शकत नाही. आपले सोडा तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काय?

मलापण चर्चेला वेगळे वळण लावायचे नाहीये पण त्या घटनेबद्दल नक्की काय खरी माहिती ही उत्सुकता होती आणि दिनेशदा यांच्या पोस्टमुळे सत्य कळलं.

अमा तुमचेपण धन्यवाद.

मुळात पत्रकाराच्या भूमिकेवर पण नाटकात बोट ठेवले गेले आहे.
बायकांना वस्तू म्हणून विकले जातेय आणि तसे विकले जातेय हे सत्य जगापुढे पुराव्यासहित आणायला तो तिला विकत घेतोय.
विकल्या जाणार्‍या बायकांबद्दल कणव असली तरी कमला ही त्याच्यासाठी करीअरमधे पुढे नेणारी एक संधी असल्यासारखे होते.
कमलाचा लुक बदललेला, तिच्या चेहर्‍यावर तजेला आलेला त्याला चालत नाही कारण ती हालाखीतून आलेली आहे हे लोकांना पटणार नाही वगैरे.
सरीताला सवतीमत्सर वगैरे काही नसतो पण नवर्‍याच्या आयुष्यात आपण दासीपलिकडे काही आहोत की नाही असे प्रश्न तिला नक्की पडतात.
कमलालाही सवतीमत्सर नसतोच कारण ही आपल्याआधी आलेली, शिकलेली वगैरे म्हणजे हिचा मान मोठा हे तिला मान्य असते.
प्रेस कॉन्फरन्ससाठी कमलाला तयार व्हायला सांगितले जाते तेव्हा ती तुम्ही साहेबांबरोबर बाहेर जात जा बिंधास्त मी घर आणि मुलं सांभाळेन असं तीच सरिताला सुचवते.

हे नाटकात आहे.

साजिरा,

तुमचा वरचा प्रतिसाद वाचला.

१.
>> निव्वळ बोधाच्या पलीकडलं कलाकृतीत इतर बरंच काही बघायचं, जोखायचं असतं हो.

एखादा चोखंदळ कलाकृतीचा रसिक विविध अंगाने आस्वाद घेईल. कलाकृतीचा समग्र आस्वाद घेतल्यावर मागे शिकण्यासारखं जे उरतं तो बोध. प्रत्येकाचा बोध वेगवेगळाच असणार आहे.

सामान्य नाट्यरसिक किंवा नाट्यप्रेमी नाटकातून काहीतरी जाणून घेऊ इच्छितो. सबा पाहून तो अस्वस्थ होतोय. या अस्वस्थतेचं पुढे काय करायचं? का अस्वस्थता हेच अंतिम ध्येय आहे? तसं असेल तर अस्वस्थतेतून काय शिकता येईल?

नाटक लिहून झाल्यावर तेंडुलकरांची अस्वस्थता जाऊन तिथे हलकेपणा आला. हा हलकेपणा रसिकांपर्यंत पोहोचायला हवा का?

२.
>> सहा-आठ दशकांपुर्वीचा कलाजीवन वाद इतक्या वर्षांनंतर फारच आऊटडेटेड झालेला आहे. बरीच स्थित्यंतरं
>> त्यानंतर झाली, परदेशी कलाकृती आणि कलेकडे बघण्याची नजर आपल्याकडे थोडीफार झिरपू शकली,
>> असंख्य आयाम मिळाले, आणि कलाजीवनवाद हा तद्दन हास्यास्पद ठरला. ते वर बोध-प्रबोधनासाठी आज
>> कलाजीवनाचा आधार- हेही असंच हास्यस्पद वाटतंय.

बरीच स्थित्यंतरं झाली तरी पक्ष तेच आहेत. Happy कक आणि जीक यांतला वाद हास्यास्पद असेलही. पण हे दोन स्वतंत्र दृष्टीकोन असून ते अनंतकाळ तसेच राहणार आहेत, याबद्दल शंका नको.

३.
>> ते नवरस वगैरे कलाकारासाठी नसावेत हो.

का बरं? कलाकाराला झालेली जाणीव जशीच्या तशी रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रसांचा आधार घेता येतो.

४.
>> तेंडूलकरांचं मागचे पुढचे संदर्भ सोडून एकच वाक्य तुम्ही वर उद्धृत केलं आहे, आणि त्यातून 'ते शांतीसाठी
>> लिहित होते' असा निष्कर्ष काढून मोकळेही झालात.

अस्वस्थतेतून कलाकृती घडणे ही वैश्विक प्रक्रिया आहे. याच वैश्विक प्रक्रियेच्या संदर्भात तेंडुलकरांचं वाक्य उद्धृत केलंय.

ते शांतीसाठी लिहित होते असा माझा दावा अजिबात नाही. तेंडुलकरांसारखा मोठा लेखक लिहितो ते स्वान्तसुखाय. सखाराम बाईंडर लिहिल्यावर त्यांना शांतीने अस्वस्थतेला विस्थापित केल्याचा अनुभव आला. हा अनुभव देखील रसिकांपर्यंत पोहोचायला हवा होता का?

कलाकाराला जी जाणीव होते ती रसिकांपर्यंत पोहोचवायचं कलाकृती हे माध्यम आहे, बरोबर? तर ही जाणीव पूर्णपणे पोहोचली पाहिजे का? की केवळ कलाकाराला अभिप्रेत आहे तेव्हढीच पोहोचावी?

निर्णय अर्थात कलाकाराच्या हाती आहे.

५.
>> उलट अस्वस्थ होण्यासाठी आणि अस्वस्थ करण्यासाठी तेंडूलकरांनी सारं लिखाण केलं आहे.

असं तुम्ही म्हणता. पण तेंडुलकरांना हेच अभिप्रेत होतं का?

नाना फडणीस वगैरे ऐतिहासिक नावं वापरल्याने प्रेक्षकांचा रोख (फोकस) भलतीकडे वळला. ते वेगळ्याच कारणांसाठी अस्वस्थ झाले! Wink वैयक्तिक मत. Happy

असो.

हे सगळं लिहिलंय त्यातून जो बोध होईल तो कमला मालिकेला लावून पहायचा बेत आहे. (हे मी बरोबर बोललो का? मालिका त्या दर्जाची दिसंत नाहीये!)

आ.न.,
-गा.पै.

जयवंत दळवींच्या अधांतरी या कादंबरीवर 'आधारित' हसरतें' ही हिंदी मालिका पूर्वी झी टीव्ही वर लागत असे. सुरुवातीचा कथाभाग सारखा असला तरी नंतर त्यात बरीच वाढ केली गेली होती, म्हणजे मूळ कादंबरीत नसलेल्या किंवा बिनमहत्त्वाच्या असलेल्या व्यक्तिरेखा मालिकेत आणल्या होत्या. दळवींचं नाव सुरुवातीला तरी श्रेयनामावलीत येत असे, नंतर पाणी घालायला लागल्यावरही ते येत होतं की नाही ते माहिती नाही.
पण माझ्या मते तरी चर्चा आणि टीका ही त्या त्या कलाकृतीच्या दर्जावरच केली जावी, तिचे मूळ लेखन कुणाचे आहे आणि त्या तुलनेत ही कशी आहे, मूळ लेखनाच्या गाभ्याला धक्का लागला आहे का हे प्रश्न फार महत्त्वाचे मानू नयेत.
व्यक्ती आणि वल्ली वर ('आधारित ' की काय ते माहिती नाही)जी मालिका अल्फा मराठीवर लागायची, त्यातल्या व्यक्तिरेखा मला तरी फारशा आवडल्या नव्हत्या, पण म्हणून त्यामुळे पुलंच्या मूळ लेखनाचा काही अपमान झाला असं मला वाटत नाही.

Pages