तेंंडूलकर माफ करा, आम्ही अजूनही तुम्हाला समजू शकलो नाही !

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

kamala.jpg

सध्या तेंडूलकरांच्या "कमला" नाटकावर आधारीत, "कमला" याच नावाची मालिका चालू आहे.

मी ही मालिका पाहीली नाही. ती किती चांगली किंवा वाईट आहे हे मी सांगू शकत नाही.

सध्या सोशल मिडीयामधे ही मालिका किती भंकस आहे याबद्दल प्रतिक्रिया वाचतो आहे. प्रत्येक प्रेक्षकालाच आपले मत व्यक्त करायचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच.

पण काही प्रतिक्रियामधे "तेंडुलकरांचे नाटक करायचे धाडस तुम्हाला होतेच कसे?", "संहीता बदलताच कशी तुम्ही", "पेलता येत नाही तर कशाला तेंडुलकरांची नाटकं करायला जाता?" , "ही मालिका बंदच करायला पाहिजे" असा सूर दिसतो.

ही मालिका अत्यंत भंकस असेलही. आणि आज तेंडुलकर असते तर त्यांना ती पाहून खूप दु:खही झाले असते कदाचित.
पण त्यापेक्षाही कितीतरी जास्त दु:ख, "तेंडुलकरांचे नाटक करायचे धाडस तुम्हाला होतेच कसे?" या सारख्या वाक्यांचे झाले असते. "त्यांना एका मखरात बसवले गेले आहे आणि त्यांच्या त्या प्रतिमेचा उपयोग करून इतरांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य चेपण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातोय" याचे झाले असते.

माझा तेंडूलकरांचा काहीच अभ्यास नाही. मग माझी तेंडूलकरांबद्दल बोलायची लायकी आहे का?

हो आहे ! फक्त माझीच नाही तर तेंडुलकरांचे काहीही वाचलेल्या , पाहिलेल्या , मग ते अगदी तुटपुंजे का असो, त्या प्रत्येकाची तेंडूलकरांबद्दल बोलायची लायकी आहे. आणि हे मी तेंडूलकरांकरूनच शिकलो आहे.

आणि कुठल्याही दिग्दर्शकाला तेंडुलकरांचे नाटक/कलाकृती याचे त्याला योग्य वाटेल ते ईंटरप्रिटेशन करायचा अधिकार आहे.

आता हे ईंटरप्रिटेशन किती चांगले आणि किती वाईट होईल तो भाग वेगळा. आणि ते कसे वाटले हे सांगायचाही प्रत्येक वाचकाला/प्रेक्षकाला अधिकार आहेच. पण तो अधिकार्/ते स्वातंत्र्य अमुक व्यक्तींनाच असे ईंटरप्रिटेशन करता येईल, इतरांना करता येणार नाही असे सांगू शकत नाही.

जाता जाता: २००२ साली प्रिया गेल्यावर, तेंडुलकर अमेरिकेत आले होते. त्यातले बरेच दिवस ते बॉस्टनलाही राहिले होते. माझ्याकडेही राहून गेले आहेत. त्या दिवसात एक माणूस म्हणून, मुलगी गेल्याच्या दु:खाने व्यतिथ झालेला बाप म्हणून, त्यांना जवळून बघायला मिळालं. आपल्याला मखरात बसवलं जातंय, एका चौकटीत बसवून आपल्या प्रतिमेचा उपयोग करून काही विचारांना दाबलं जातंय असं त्यांना जाणवायला लागलं होतं आणि त्याचा उबगही येत चालला होता.

ज्या व्यक्तिने आयुष्यभर त्याला काय वाटलं ते लिहिलं, अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी लढा दिला , तिचंच नाव , "त्यांना समजण्याची तुमची लायकी नाही म्हणून तुम्ही व्यक्त होऊ नका" असे म्हणण्यासाठी वापरण्यात येत असेल तर आपण तेंडूलकरांना समजूच शकलो नाही.

विषय: 
प्रकार: 

मालिका पाहिली नाही.
पण एकंदर चर्चेतले चिनूक्स आणि नीधप यांचे प्रतिसाद पटले आहेत.

लोकांना "त्यांना समजण्याची तुमची लायकी नाही म्हणून तुम्ही व्यक्त होऊ नका" असे म्हणायचे नसून ''त्यांच्या नावाचा वापर तुमचा फालतूपणा खपविण्यासाठी आणि तो ही त्यांचा विचारांच्या विसंगत पद्धतीने करू नका ' असे म्हणायचे आहे असे वाटते.

तेंडुलकरांनी लिहिलेली होनी अनहोनी ही मालिका दूरदर्शन वर ९० सालच्या आसपास लागली होती त्यावेळी अंनिसने त्याचा जोरदार निषेध केला होता. कारण सदर मालिका अंधश्रद्धेचा प्रसार करते असा आक्शेप होता. त्यावेळी तेंडुलकर तुम्ही सुद्धा.. असे माझे मत होते. तें अंधश्रद्धांचा वापर मनोरंजनासाठी करतात अस मला वाटायच.
माणुस अंधश्रद्द असतो कारण अंधश्रद्ध असणे ही त्याची गरज असते असे तेंडुलकर म्हणतात - संदर्भ तिमिरातून तेजाकडे ले. नरेंद्र दाभोलकर, पृष्ठ ३८४

कमला मालिका चालू झाली तेव्हा फार कौतुकाने बघायला सुरूवात केली. मी नाटक वाचलं होतं पण पाहिलेलं नाही. मालिका सुमारे दीड एपिसोड इतकीच पाहू शकले त्यानंतर प्रोमोजमधून काहीबाही समजत राहिलं. गेल्या काही दुवसांत चॅनलने स्वतःहून जाहिरात करून कमला आणि शरयूचा वटसावित्रीचा उपास हे दळण चालू केलंय. त्यावर फेसबूकमध्ये बर्‍याच जणांनी आक्षेप नोंदवले आहेत. माझादेखील या मालिकेवर याच बाबतीत आक्षेप आहे.

तेंडुलकरांच्या संहितेमध्ये नसलेले प्रसंग घुसडले असते तर किमान ते त्या संहितेशी जुळवून घेणारे तरी असावेत अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे का? तेंडुलकरांनी लिहिताना काहीतरी एक स्वतंत्र विचार मांडण्यासाठी लेखन केलेलं आहे. त्या विचारापासून कोसो मैल दूर जाऊन मग वाट्टेल तसे प्रसंग घुसडत जाणं याला अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणत नाहीत आणि "आधारित" तर बिल्कुल म्हणत नाहीत. कचराच द्यायचा असेल तर तो "स्वतःचा" असा द्यावा. एक प्रथितयश लेखकाचे हक्क घ्यायचे "आधारित" असं नाव द्यायच आणि मग नेहमीचं रडंच गायचं याला काय म्हणणार? "इंटरप्रिटेशन" म्हणजे या कलाकृतीकडे बघायचा स्वतःछा दृष्टीकोन. "प्रेक्षकांना अमुक हवे आहे" ते त्या कलाकृतीमध्ये रॅप करून सर्व करणे नव्हे.

वर चिन्मयने विशाल भारद्वाजचं उदाहरण दिलेलंच आहे. त्यानं आजवर बर्‍याच साहित्यकृतींना पडद्यावर आणलंय पण ते आणताना मूळ "विचाराला" प्राधान्य दिलेलं आहे म्हणून त्याची प्रत्येक कलाकृती स्वतंत्र असूनही मूळ कलाकृतीशी प्रामाणिक राहते.. मराठीतलंच उदाहरण द्यायचं झालं दुनियादारी ही मालिका, पुस्तक आणि चित्रपट. तिन्ही एकमेकांपासून बर्‍यापैकी वेगळे आहेत. (त्यातही मालिका पुस्तकाशी बरीच प्रामाणिक होती हे मावैम) तरीही त्यांच्या फॉर्मबदलावर इतकी टीका झाली नाही. कारण कुठेतरी त्यामधला विचार समान होता.

कमला मालिकेचे चारपाच एपिसोड पाहिलेत तर तिथे तेंडुलकरांच्या "विचारांना" किती महत्त्व दिलंय ते समजून येईल.

आता इथेच बघा ना. घाटपांड्यांचा प्रतिसाद ’अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ म्हणून घेऊ आपण पण त्याचा या बाफच्या मुद्द्याशी काही संबंध आहे का? केवळ घाटपांड्यांना माहिती आहे ती टाकतायत असला प्रकार.
तर त्यावर ’असंबद्ध’ अशी टिका होणारच ना. या बाफवर कशाला? असे विचारले जाणारच ना.

तसलाच प्रकार आहे. कमला सिरीयलचा तेंडुलकरांच्या कमलाशी काहीच संबंध उरलेला नाही. तर तेंडुलकरांचे नाव कशाला किंवा तेंडुलकरांचे नाव घेऊन हे काय वेगळेच दाखवताय संबंध नसलेलं असंही होणारच ना.
त्याने अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी कशी काय होते?

अजयचा मुळ आक्षेप "तेंडुलकरांचे नाटक करायचे धाडस तुम्हाला होतेच कसे?" किंवा "ही मालिका बंदच करायला पाहिजे" याला आहे असे लेखातुन वाटते.
एखाद्याला मालिका आवडली नसेल तर तो त्यावर टिका करु शकतो पण "तेंडुलकरांचे नाटक करायचे धाडस तुम्हाला होतेच कसे?" किंवा "ही मालिका बंदच करायला पाहिजे" हे म्हणणे म्हणजे गळ्चेपी आहे/असावी.

विषय भरकटत चालला आहे असे वाटते.

ही मालिका बंदच करायला पाहिजे <<<
हे म्हणायचा प्रेक्षकांना पूर्ण हक्क आहे. ही गळचेपी नाही. प्रेक्षकांना जे नकोय ते नाकारू शकतात ते.

ही मालिका बंदच करायला पाहिजे <<<
हे म्हणायचा प्रेक्षकांना पूर्ण हक्क आहे. ही गळचेपी नाही. प्रेक्षकांना जे नकोय ते नाकारू शकतात ते. >>>>

Happy
प्रेक्षकांना जे नकोय ते नाकारू शकतातच ते. जरूर त्यांनी नाहि पहावी. ते स्वातंत्र्य कोणीच हिरावुन नाहि घेतले.
ज्यांना पाहिची आहे त्यांना पाहु द्यावी. त्यानाहि ते स्वातंत्र्य आहे ना ? आणी ज्यांना मालिका (कचरा का असेना) काढायची आहे त्यांनाहि ती काढायचे स्वांतत्र्य आहे ना ?

हेच लोजिक जर सर्वत्र लावायचे झाले (खरे तर हेच चालले आहे भारतात) तर सर्वच नाटक, सिनेमा, मालिका बंद करायला लागतील. बाहुबली का राज ! Sad

साती+१

नीधप | 7 June, 2015 - 17:58 नवीन

अरेरे...
>>>
+११११११११११११११११११११११११११

अरेरे...:स्मित:

>>आता इथेच बघा ना. घाटपांड्यांचा प्रतिसाद ’अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ म्हणून घेऊ आपण पण त्याचा या बाफच्या मुद्द्याशी काही संबंध आहे का?<<
मला वाटत जेव्हा तेंडुलकर आणी त्यांचे लेखनावर आधारित कमला असा विषय असतो त्यावेळी अपरिहार्य पणे विषय तेंडुलकरांभोवती चालू असतो. टू द पॉईंट बोला फक्त कमला बाबत बोला असा आग्रह जर आपला असेल तर मी त्याच्याशी सहमत नाही.
>>केवळ घाटपांड्यांना माहिती आहे ती टाकतायत असला प्रकार.<<
याला म्हणा हवं तर अभिव्यक्तीस्वातंत्र्य. न वाचण्याचे/ असहमत होण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहेच.

"आधारीत" (based on) या शब्दातून मिळणार स्वातंत्र्य किती प्रमाणात घ्यायचं हे सापेक्ष आहे.

काही उदाहरणे
बीबीसी ची नवीन शेरलॉक होम्स मालिका. Based on Arthur Conan Doyle's Sherlock Holmes"
त्यातले कित्येक प्रसंग पूर्ण बदलले आहे. Scandal in Bohemia मधली आयरीन अ‍ॅडलर नवीन सीरीज मधे डॉमिनेट्रिक्स आहे . शेरलॉकला नवीन गर्लफ्रेंड आहे.
CBS मधल्या इलिमेंटरीमधे डॉ वॉटसन एक चायनीज बाई आहे.
किंवा गेल्या वर्षी आलेल्या रॉबर्ट डाऊनी च्या चित्रपटात शेरलॉक होम्सला रजनीकांत बनवून टाकले आहे. शेरलॉक होम्सच्या नावाखाली किती कचरा घालता येईल याचं उत्तम उदाहरण आहे.

Casino Royale या इयान फ्लेमिंगच्या मूळ कथेवर आधारीत त्याच नावाचा जो नवीन चित्रपट २००६ मधे आला त्यातले संदर्भ (money related to terrorism plot) मूळ कथेत कुठेच नाही. किंवा त्याच नावाचा आणि त्याच कथेवर आधारित १९६७ मधला एक विनोदी चित्रपट, यात ६ तोतया जेम्सबाँड आणि एक खरा अशी गोष्ट आहे त्याचा मूळ कथेशी काही संबंधच नाही.

शेक्स्पीयरवर आधारीत जगातल्या अनेक भाषेतल्या वेगवेगळ्या कलाकृतींमधे असे अनेक बदल केले गेले आहेत.
उदा:एका कलाकृतीत (Boys from Syracuse) मूळ नाटकात वर्णन केलेल्या कालावधीपेक्षा , काही शतके अगोदर जर comedy of errors झाले असते तर ते कसे हे दाखवण्यासाठी खूपच लेखन स्वातंत्र्य घावे लागले आहे.

पण हे सगळे आधारीतच आहे आणि त्या त्या लेखकाने त्याचे वेगळे ईंटरप्रिटेशन केले आहे. आणि त्या त्या वाचक्/प्रेक्षकवर्गाला ते आवडले आहे.

माझा मूळ मुद्दा नवीन कमला मधे किती कचरा घातला असा नसून , असा कचरा (त्याला कचराच म्हणायचे असेल तर) घालायचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य त्या दिग्दर्शकाला आहे हा आहे.

मालिका नाही माहित्,पण नीधप आणि चिनूक्स यांचे प्रतिसाद पटले.

लोकांना "त्यांना समजण्याची तुमची लायकी नाही म्हणून तुम्ही व्यक्त होऊ नका" असे म्हणायचे नसून ''त्यांच्या नावाचा वापर तुमचा फालतूपणा खपविण्यासाठी आणि तो ही त्यांचा विचारांच्या विसंगत पद्धतीने करू नका ' असे म्हणायचे आहे असे वाटते.>>>>>> सातींनी , प्रतिसादांचे सार सांगितले आहे .+१

चिनूक्सजी , नीधपजी आणी सातीजी यांचेशी सहमत.

>>आधारीत" (based on) या शब्दातून मिळणार स्वातंत्र्य किती प्रमाणात घ्यायचं हे सापेक्ष आहे.

पण हे स्वातंत्र्य अमर्याद नाही. मर्सीडीझ कारला फक्त टायर्स होंडाचे लावले आणी ती कार मर्सिडीझ म्हणून विकली तर समजण्यासारखे आहे. पण फक्त टायर्स ओरिजिनल ठेवून बाकी सर्व पार्ट होंडाचे घालून ती कार मर्सिदीझ म्हणून विकणे अनएथिकल आहे.

अजयजींनी दिलेली बाकीची उदाहरणेही अप्रस्तुत आहेत असे नम्रपणे सुचवावेसे वाटते. त्या उदाहरणामध्ये मूळ कथानकाला धक्का लागलेले दिसत नाही. कालानुरुप केलेले बदल, इंटरप्रीटेशन ई म्हणत येइल.

इथे आक्षेप 'कचरा' घालण्याला नसून तो कचरा मूळ कथेतल्या विचाराच्या एकदम विरुद्ध असण्याला आहे. हीच सिरियल 'विमला' नावाने आली असती तर कुणीही आक्षेप घेतला नसता. याहूनही रद्दड सिरियल्स आहेतच, त्या बंद करा असे कुणी म्हणत नाहिये.

'उंबरठा' चित्रपटावर आधारित मालिका येइल. ठीक. त्यान नायिकेच्या व्यक्तीरेखेला अनुरूप प्रसंग ('कचरा') घालण्यात येईल. ठीक. पण केवळ टी आर पी साठी नायिका वट सावित्री, करवा चौथ, ऋशी पंचमी करताना दाखवणे, नायिकेच्या जावेने सोन्याचा हार चोरला असा प्रसंग घुसविणे, असे फालतू पाणी घतले तर ते मात्र आक्षेपार्ह असेल, इथे व्यक्ती स्वातंत्र्याचा संबंध नाही. एवढी हौस असेल तर उंबरठा हे नाव वापरू नका.

जेन ऑस्टीनच्या अभिजात कलाकृतीवर आधारीत Pride and Prejudice and Zombies मधे मूळ व्यक्तीरेखा झाँबी झालेल्या दाखवल्या आहेत. आणि त्याही पलीकडे जाऊन नवीन लेखकाने जेन ऑस्टीनलाच सहलेखक असे लिहले आहे.
http://www.nytimes.com/best-sellers-books/2009-07-05/overview.html हे पुस्तक २००९ मधे बेस्ट सेलर ठरले होते.

जर जेन ऑस्टीनची एलिझा , झाँबीशी लढाई करण्यासाठी कराटे/कुंग फू शिकते (आणि त्या पुस्तकावर मुखपृष्ठावरच जेन ऑस्टीनचे नाव आहे) तर नवीन "कमला" मधे कमला आणि शरयूने उपास केला तर काय हरकत आहे?

(पुन्हा आपण दर्जाबद्दल बोलत नसून नवीन दिग्दर्शकाला/नवीन लेखकाला कितपत स्वातंत्र्य असायला हवे याबद्दल बोलतो आहोत).

मायबोलीवर बऱ्याच दिवसांत साहित्यिक वाद झाला नव्हता म्हणून हा सुरू केला असेल तर ठीक आहे,
नाहीतर.............

काहीही हं श्री. अजय! Proud

Pride and Prejudice and Zombies <<<
असे नाव घेतले जाते तेव्हा ते मूळ व्यक्तिरेखेपासून फारकत घेणारे आहे हे उघड आहे.
बाकी ते मी पाह्यलेले नसल्याने किती आणि कसे याबद्दल मला काही माहित नाही.

कमला आणि सौभाग्य असे नाव केले असते तर आम्ही पण काही म्हणालो नसतो.

(पुन्हा आपण दर्जाबद्दल बोलत नसून नवीन दिग्दर्शकाला/नवीन लेखकाला कितपत स्वातंत्र्य असायला हवे याबद्दल बोलतो आहोत).<<< कितीही स्वातंत्र्य घ्या, कितीही दर्जा उच्च अथवा नीच करा. पण जे सादर करताय ते जर एक प्रेक्षक म्हणून मला आवडत नसेल, तर मी ते मत व्यक्त केल्यास माझे अभिव्यक्तीस्वातंत्र्य मान्य करा.

> पण जे सादर करताय ते जर एक प्रेक्षक म्हणून मला आवडत नसेल, तर मी ते मत व्यक्त केल्यास माझे अभिव्यक्तीस्वातंत्र्य मान्य करा.
ते पूर्ण मान्य आहेच. आणि त्या सादरीकरणाकडे दुर्लक्ष करून आर्थिकदृष्ट्या ते बंद पाडायचेही स्वातंत्र्यही तुम्हाला आहेच. कार्यक्रमाच्या प्रायोजकांच्या वस्तू न विकत घेऊनही हवा तो परिणाम साधणे शक्य आहे. आणि ते तसे होतही असते. कार्यक्रम आवडला नसेल तर आणखी हजार जणांना तसे सांगा. तेही स्वातंत्र्य तुम्हाला आहेच.

पण मुळात लेखकाला अमुक तमुक बदल करण्याचा अधिकारच नाही, किंवा बळजबरी करून कार्यक्रम बंदच पाडला पाहिजे या सारख्या मतांना माझा विरोध आहे.

वर लिहल्याप्रमाणे
ज्या व्यक्तिने आयुष्यभर त्याला काय वाटलं ते लिहिलं, अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी लढा दिला , तिचंच नाव , "त्यांना समजण्याची तुमची लायकी नाही म्हणून तुम्ही व्यक्त होऊ नका" असे म्हणण्यासाठी वापरण्यात येऊ नये.

वर स्वाती_आंबोळे यांनी लिहीलंय तसंच वाटतंय की 'बऱ्याच दिवसांत साहित्यिक वाद झाला नव्हता म्हणून हा सुरू केला असेल तर ठीक आहे' ... Happy

चिनूक्स आणि नीधप यांच्या म्हणण्याला अनुमोदन.

'इंटरप्रिटेशन' म्हणजे काय - इथे अजयच्या मांडणीत गडबड वाटते. मुद्द्याच्या समर्थनासाठी त्यांनी बरीच उदाहरणं दिलीत. त्यातल्या एका उदाहरणाविषयी - शेरलॉकची अनेक इंटरप्रिटेशन्स आली तरी कथानकात, शेरलॉकच बदमाश/व्हिलन/क्रिमिनल मास्टरमाइंड आणि मोरिआर्टी हीरो; असं इंटरप्रिटेशन नाही ना केलेलं कुणी? बाकी आजूबाजूचा साज काय आहे ते राहू दे बदलत, त्याचा नाही त्रास होणार.

आपापल्या बायसची कदाचित जाणीवही नसलेल्या प्रेक्षका/वाचकांसमोर, बायकांची दुय्यमता चरचरीत अधोरेखित करुन मांडणं - का केलं असावं तेंडुलकरांनी? प्रेक्षकांनी खूष व्हावं, 'अस्संच चालू राहिलं पाहिजे' / 'कित्ती भारी आहे नाही ही गुलामी - मलाही एकदा करुन पाहायचं आहे (दुधाचा ग्लास, वटसावित्रीचा उपास इ.इ.)' असं प्रेक्षकांना वाटावं - हे तेंडुलकरांना जरातरी अभिप्रेत होतं का?

हे म्हणजे, पांढर्‍या शुभ्र कापसाविषयी लिहीलेल्या कथेचं 'इंटरप्रिटेशन' करताना पडद्यावर प्रेक्षकांना गडद-काळा-कापूस दिसणं आहे Happy

जाऊ दे, खरंतर हे मुद्दे आधी मांडले गेलेत चर्चेत. पण तरीही अजयनी आणखीन उदाहरणं दिली, तेव्हा 'इंटरप्रिटेशन'च्या अर्थाचा घोळ होतोय एवढंच म्हणायचं होतं.

Sad अशी सिरीयल निघाली आहे माहिती नव्हते. ते चित्रात रू ८००० टॅग का तिच्या गळ्यात. दिप्ती नवलचा सिनेमा होता, त्यात मूळात तिला २०० का २००० ला विकत घेतलेली असते ना? हे कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन अ‍ॅडजस्ट करून काय??

>मलाही एकदा करुन पाहायचं आहे (दुधाचा ग्लास, वटसावित्रीचा उपास इ.इ.)' असं प्रेक्षकांना वाटावं - हे तेंडुलकरांना जरातरी अभिप्रेत होतं का?
ते नव्हतंच. त्याबद्दल प्रश्न नाही. प्रश्न हा आहे तेंडूलकरांना ते अभिप्रेत नसलं तरी, नवीन लेखकाला, दिग्दर्शकाला ते मांडायचं असेल तर त्याला ते अभिव्यक्ती स्वातंंत्र्य आहे का? आणि तेंडूलकरांचं नाव घेतलं नसतं तर ते स्वातंत्र्य आहे याला बहुतेक जणांची सहमती आहे. नावात थोडेसे बदल केले तरी ते चालेल असंही वर लिहलं गेलें आहे. जर तेंडूलकरांच्या कमला नाटकामधल्या पात्रांवर आधारीत, स्वतंत्र कलाकृती, असं म्हटलं तर ते पटेल का?

>बाकी आजूबाजूचा साज काय आहे ते राहू दे बदलत
इथेच मोठा प्रश्न आहे. किती मोठा बदल चालू शकेल याचे निकष काळानुसार बदलत आहे. आणि मराठीत अजून नसले तरी इतर भाषांमधे होत आहेतच. Pride and Prejudice and Zombies मधे म्हटलं तर खूप मोठे बदल आहेत , म्हटलं तर नाहीत. काही व्यक्तीरेखा आता बायसेस्क्शुल दाखवल्यामुळे , प्रेमाची समीकरणंच बदलून गेली आहेत. पण सहलेखक म्ह्णून जेन ऑस्टीनचं नाव आहे, आणि ती जिवंत नाही. हे संपूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य नवीन लेखकाचं (Seth Grahame-Smith) आहे.
(या विषयाचा शोध घेतांना असं दिसलं की जेन ऑस्टीन जिवंत नसतानाही, सहलेखक म्हणून अनेक पुस्तकं ती गेल्यावर प्रकाशित झाली आहेत)

पण म्हणून "जेन ऑस्टीन झेपत नाही तर लिहताच कशाला?" , "तुम्ही जेन ऑस्टीनचं नाव बदनाम करता आहात" किंवा "हे पुस्तक बॅन करा" अशा प्रतिक्रिया आलेल्या मला तरी माहिती नाही. उलट ते २००९ मधे Nytimes बेस्ट सेलर ठरले.

उद्या तेंडुलकरांच्या नाटकावर आधारीत पण तीच पात्रं घेऊन नवीन नाटक लिहलं गेलं, आणि ते नाटक मूळ नाटककाराच्याच भूमिकेशी सुसंगत असलंच पाहिजे असा आग्रह आपण धरला तर ते खरं अभिव्यक्ती स्वातंत्र्य होईल का? हे म्ह़णजे जो पर्यंत आम्हाला(किंवा तेंडूलकरांना पाहिजे असलेल्या साच्यात) पटतंय तो पर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य आहे, आम्हाला पटलं नाही तर मात्र ती तुमची अभिव्यक्ती वगैरे काही नाही असं म्हणण्यासारखं आहे.

चिनूक्स आणि नीधपच्या मूळ मुद्द्याला अनुमोदन.
विकु, उत्तम पोस्ट.
इंटरप्रिटेशन आणि आर्टीस्टीक लिबर्टीचा अर्थ एखाद्या पात्राचा/कथानकाचा मूळचा स्वभाव, तो जर्म, ते स्टेटमेंट मारुन टाकणे असा नसतो. शरतचंद्रांचा, भंसाळीचा आणि अनुराग कश्यपचा देवदास कितीही वेगळे 'दिसले' तरी त्यांचे 'देवदास'पण बदललेले नाही.

ही जाहिरात मी पहिल्यांदा पाहिली तेव्हा माझीही प्रतिक्रिया "हा काय विनोदी प्रकार आहे" अशीच झाली होती, मी मूळ 'कमला' वाचलेले किंवा पाहिलेले नाही, तरीही. विजय तेंडुलकरांच्या कथा व मराठी सिरीयल्स च्या पटकथा या दर्जाच्या बाबतीत बहुधा दोन विरूद्ध टोके समजली जात असतील, व टीपिकल मराठी सिरीयल्स मधले फालतू प्लॉट डिव्हाइसेस, "पाणी घालणे", आपल्या टारगेट प्रेक्षकवर्गाला तेच तेच प्रसंग दाखवत बसणे यामुळे मराठी सिरीय्लस बद्दल एक जनरल चीड आहे त्यामुळे त्यांनी या कथेला हात घालणे व त्यातही इतर टीपिकल मराठी सिरीयल्स मधले प्रसंग यात घुसडणे हे अनेकांना आवडले नसावे.

मला अजून एक आश्चर्य वाटते, या सिरीयल्स चा जो टार्गेट प्रेक्षकवर्ग आहे त्या वर्गाची 'स्टीरीओटाईप' इमेज धरली तर आवर्जून आम्ही विजय तेंडुलकरांच्या कथेवर सिरीयल करत आहोत असे मार्केटिंग करायची कोणाला गरज वाटेल असे वाटत नाही(*). मग हे कशाला केले असावे? तर बहुधा या कथेवर सिरीयल काढणे हे कमर्शियली फायदेशीर असावे, पण मूळ लेखकाला क्रेडिट द्यावेसे वाटल्याने ते दिले असेल.

(*) - या वर्गावर टीका करण्यासाठी हे लिहीलेले नाही. वास्तविक याच वर्गातील अनेकांनी पूर्वी कमला, घाशीराम सकट अनेक विविध नाटके पाहिलेली आहेत, पण सध्या तसे काहीही संध्याकाळी टीव्हीतून समोर येत नाही त्यामुळे तो वर्गही ते विसरला असेल, हे माझ्या काही नातेवाइकांच्या पॅटर्न वरून वाटते. नाहीतर पूर्वी बालगंधर्व, भरत नाट्यमंदिर, टिस्मा वगैरे ठिकाणी लागणारी दर्जेदार नाटके हाच वर्ग त्यांच्या तरूणपणी पाहात असे. पण एकूणच सध्याच्या चॅनेल्सच्या मार्‍यातून निर्माण झालेल्या पॉप्युलर मराठी कल्चर मधे असले 'हेवी स्टफ' मागे पडत चालले आहे. आणि कोठे आलेच तर ते शोधून काढून आवर्जून जाउन बघणे यातील अनेकांना आता अवघड झाले आहे.

प्रथम धागा वाचला तेव्हा प्रामाणिकपणे पटला व तसे लिहिले. नंतर झालेली चर्चा / वाद हे घाईघाईत वाचत असताना डोक्यावरून जात होते. तसेही तेंडुलकरांबाबत काहीही माहिती नसताना 'माहिती असणार्‍यांचे मुद्दे वाचणे' इतकेच जमत होते. आज सकाळी धागा आणि जवळपास ८० टक्के प्रतिसाद शांतपणे पुन्हा वाचले.

ह्या विषयातील अज्ञानी बालक असल्यामुळे वाचकांनी मोठ्या मनाने माझा हा प्रतिसाद दखलप्राप्त तरी समजावा अशी अपेक्षा आहे.

===============

१. आधारीत असणे - मूळ संहितेवर आधारीत असलेले कथानक जर तंतोतंत मूळ संहितेशी / कथानकाशी मिळतेजुळते असायला हवे असेल तर त्याला 'आधारीत' का म्हंटले जाईल? ती सरळ सरळ एक नवीन आवृत्ती (किंवा नवीन फॉर्ममधील तीच कलाकृती) होईल ना? तेंडुलकरांनी जे म्हंटले, लिहिले तेच दाखवले गेले पाहिजे अशी अपेक्षा असली तर त्याला आधारीत हा शब्द कशाला कोण वापरेल? मुळात मूळ कलाकृतीत जे काही फ्रेमवर्क / सांगाडा आहे तो वापरून त्यावर स्वतःचे काहीतरी वेगळे बनवणे हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यात नाही का मोडू शकत? तेही 'आधारीत' असे समर्थनीय प्रमाणातील श्रेय योग्य त्या नावाला देऊन? (येथे जे काही नवीन निर्माण केले गेले आहे त्याच्या गुणवत्तेबाबत काहीही म्हणायचे नाही आहे).

२. तेंडुलकरांचे नांव का वापरता? - ह्या आक्षेपावर असे म्हणावेसे वाटते की ते वापरले नसते तर ती चोरी आहे असे आपणच म्हंटले नसते का? 'स्वतःचा कचरा विकण्यासाठी तेंडुलकरांची संहिता भ्रष्ट स्वरुपात वापरली' असा ताशेरा आपण ओढला नसता का?

३. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या (वर काहींनी व्यक्त केलेल्या) व्याख्येनुसार 'आहे तेच व तितकेच तुमच्या पद्धतीने दाखवा व मूळ कलाकृतीचा व कलाकाराच्या प्रतिभेचा दर्जाही तोच ठेवा' अश्या अटी घालता येतील का? आत्ताच्या युगात आपण असे खरंच म्हणू शकतो का?

४. वेगवेगळे आक्षेप घेत असताना आपण नेमके कशामुळे 'हर्ट' झालो आहोत हे आपण बघतो आहोत का? तेंडुलकरांचे नांव वापरून भंकस निर्मीती समोर ठेवली व तेंडुलकरांच्या नावावर टी आर पी मिळवला ह्याचे दु:ख आहे का? ह्याचे दु:ख असल्यास आपल्यातील चांगली अभिरुची असलेला रसिक ते बोलत आहे, अभिव्यक्तीस्वातंत्र्याबाबत ठाम मते असलेला जाणकार नव्हे. दुसरा आक्षेप म्हणजे मूळ संहिताच कशी काय बदलता हा! हे आपल्यातील 'तेंडुलकरांचा भक्त' बोलत आहे, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता किंवा विरोधक नव्हे. उद्या एखादी अशीच 'आधारीत' परंतु कचरा कलाकृती जगन्मान्य झाली (मूळ निर्मात्याला योग्य ते श्रेय वगैरे देऊनही) तर त्या कचर्‍याला आपण 'हा कचराच आहे' असे फार तर म्हणत राहू शकू पण 'हा कचरा निर्माणच व्हायला नको होता' असे म्हणू शकू का? म्हणजे कदाचित मूळ आणि आधारीत ह्यापैकी कोणत्या कलाकृतीला अधिक रसिकाश्रय मिळतोय ह्यावरही आपल्याला तोंड उघडावे की बंद ठेवावे हे ठरवावे लागू शकेल. 'तेंडुलकर स्वतः वैतागत' असा आक्षेप घेताना आपण 'ह्या आजच्या निर्मात्यांना तेंडुलकर कसे होते हे माहीत तरी आहे का' अशी एक भूमिका घेत आहोत. अजय ह्यांचे म्हणणे असे दिसते की आज तेंडुलकर असते तर त्यांनीही 'कमला' मालिकेवर जहरी टीका केलीही असती, पण अशी मालिका निर्माणच होऊ नये असे ते कधीच म्हणाले नसते. आपल्यातील तेंडुलकरांचा फॅन, मालिकेबाबत उत्तम अभिरुची बाळगणारा रसिक प्रेक्षक आणि तेंडुलकरांच्या स्वभावाशी परिचय असणारा त्यांचा एक सहकारी असे तिघेही आपल्यातील 'अभिव्यक्तीस्वातंत्र्याची नवी व्याख्या असू शकते का' असे विचारणार्‍या एका प्रश्नकर्त्याला दाबत आहेत, असे मला वाटते.

चूक भूल द्यावी घ्यावी.

>अजय ह्यांचे म्हणणे असे दिसते की आज तेंडुलकर असते तर त्यांनीही 'कमला' मालिकेवर जहरी टीका केलीही असती, पण अशी मालिका निर्माणच होऊ नये असे ते कधीच म्हणाले नसते.

अगदी १००% बरोबर. धन्यवाद बेफिकीर.

ज्या तेंडुलकरांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी लढा दिला, आणि आता सर्वमान्य असले तरी त्यांच्या काळात लोकांना पटत नसलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे नवीन आयाम आपल्याला शिकवले, त्यांचंच नाव वापरून नवीन प्रयोगांना आपण दाबून टाका म्हणत असू तर त्यासारखा दुसरा मोठा विरोधाभास नाही.

Pages