तेंंडूलकर माफ करा, आम्ही अजूनही तुम्हाला समजू शकलो नाही !

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

kamala.jpg

सध्या तेंडूलकरांच्या "कमला" नाटकावर आधारीत, "कमला" याच नावाची मालिका चालू आहे.

मी ही मालिका पाहीली नाही. ती किती चांगली किंवा वाईट आहे हे मी सांगू शकत नाही.

सध्या सोशल मिडीयामधे ही मालिका किती भंकस आहे याबद्दल प्रतिक्रिया वाचतो आहे. प्रत्येक प्रेक्षकालाच आपले मत व्यक्त करायचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच.

पण काही प्रतिक्रियामधे "तेंडुलकरांचे नाटक करायचे धाडस तुम्हाला होतेच कसे?", "संहीता बदलताच कशी तुम्ही", "पेलता येत नाही तर कशाला तेंडुलकरांची नाटकं करायला जाता?" , "ही मालिका बंदच करायला पाहिजे" असा सूर दिसतो.

ही मालिका अत्यंत भंकस असेलही. आणि आज तेंडुलकर असते तर त्यांना ती पाहून खूप दु:खही झाले असते कदाचित.
पण त्यापेक्षाही कितीतरी जास्त दु:ख, "तेंडुलकरांचे नाटक करायचे धाडस तुम्हाला होतेच कसे?" या सारख्या वाक्यांचे झाले असते. "त्यांना एका मखरात बसवले गेले आहे आणि त्यांच्या त्या प्रतिमेचा उपयोग करून इतरांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य चेपण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातोय" याचे झाले असते.

माझा तेंडूलकरांचा काहीच अभ्यास नाही. मग माझी तेंडूलकरांबद्दल बोलायची लायकी आहे का?

हो आहे ! फक्त माझीच नाही तर तेंडुलकरांचे काहीही वाचलेल्या , पाहिलेल्या , मग ते अगदी तुटपुंजे का असो, त्या प्रत्येकाची तेंडूलकरांबद्दल बोलायची लायकी आहे. आणि हे मी तेंडूलकरांकरूनच शिकलो आहे.

आणि कुठल्याही दिग्दर्शकाला तेंडुलकरांचे नाटक/कलाकृती याचे त्याला योग्य वाटेल ते ईंटरप्रिटेशन करायचा अधिकार आहे.

आता हे ईंटरप्रिटेशन किती चांगले आणि किती वाईट होईल तो भाग वेगळा. आणि ते कसे वाटले हे सांगायचाही प्रत्येक वाचकाला/प्रेक्षकाला अधिकार आहेच. पण तो अधिकार्/ते स्वातंत्र्य अमुक व्यक्तींनाच असे ईंटरप्रिटेशन करता येईल, इतरांना करता येणार नाही असे सांगू शकत नाही.

जाता जाता: २००२ साली प्रिया गेल्यावर, तेंडुलकर अमेरिकेत आले होते. त्यातले बरेच दिवस ते बॉस्टनलाही राहिले होते. माझ्याकडेही राहून गेले आहेत. त्या दिवसात एक माणूस म्हणून, मुलगी गेल्याच्या दु:खाने व्यतिथ झालेला बाप म्हणून, त्यांना जवळून बघायला मिळालं. आपल्याला मखरात बसवलं जातंय, एका चौकटीत बसवून आपल्या प्रतिमेचा उपयोग करून काही विचारांना दाबलं जातंय असं त्यांना जाणवायला लागलं होतं आणि त्याचा उबगही येत चालला होता.

ज्या व्यक्तिने आयुष्यभर त्याला काय वाटलं ते लिहिलं, अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी लढा दिला , तिचंच नाव , "त्यांना समजण्याची तुमची लायकी नाही म्हणून तुम्ही व्यक्त होऊ नका" असे म्हणण्यासाठी वापरण्यात येत असेल तर आपण तेंडूलकरांना समजूच शकलो नाही.

विषय: 
प्रकार: 

चर्चा वाचतोय मी..

हि घटना घडली त्यावेळच्या काही आठवणी. त्या पत्रकाराने आधी, भारतात अशी स्त्रियांची विक्री होत असल्याची बातमी दिली होती. त्यानंतर त्याने थेट पत्रकार परीषद घेऊन, अश्या विकत घेतलेल्या स्त्रीलाच ( कमला ) लोकांसमोर आणले. त्यावरून बरेच वादळ उठले. माझ्या आठवणीप्रमाणे त्याने त्या स्त्रीचे योग्य असे पुनर्वसन केले.

या प्रकरणात त्या पत्रकाराच्या पत्नीचा काहीहि सहभाग नव्हता ( हेही मला आठवतेय तसे ) तसेच त्या काळाच, अभी आपको कैसा लग रहा है टाईप पत्रकारीता नसल्याने, तसे काही झालेही असल्यास बातम्यात आले नाही.

या घटनेकडे तेंडूलकरांनी फारच वेगळ्या अ‍ॅंगलने बघितले. "तूमको कितनेमें खरीदा ? " हा सर्वस्वी त्यांचा कल्पनाविस्तार. मग त्यावर त्यांनी नाटक लिहिले.
मूळ प्रयोगात लालन सारंग आणि चारुशीला साबळे होते. चारुशीलाचा अभिनय इतका सुंदर होता कि याच नाटकाच्या हिंदी आणि इंग्रजी प्रयोगातही ही भुमिका तिनेच केली. ( पालेकरांनी सादर केलेल्या तेंडूलकर महोत्सवात हि भुमिका ज्योती सुभाष ने केली होती. )

तर सांगायचा मुद्दा असा कि मूळ बातमीकडे तेंडूलकरांनी फार वेगळ्या नजरेने बघितले. सदर मालिका ( मी बघितलेली नाही ) सादर करताना लेखकाला स्वतःचे इंटर्प्रिटेशन आणि त्यानुसार सादरीकरण करण्याचा पूर्ण हक्क आहे. पण केवळ प्रेक्षक ( आय मीन तेंचे प्रेक्षक ) खेचण्यासाठी तें नाव वापरणे मला नामंजूर आहे.

दिनेशदा धन्यवाद. मी तेच विचारणार होते कि मूळ नक्की काय घटना आहे आणि त्या कमलाचे काय झालं.

झिम्मा पुस्तकात विजयाबाईंनी, त्यांच्या आणि तेंडूलकरांच्या वादाबद्दल लिहिले आहे, त्यापैकी काही वाद तेंडूलकरांना संहीतेत बदल मान्य नव्हते म्हणून झाले होते.

स्वतः तेंडूलकरांनी पुरक लेखन केले आहे. त्याची दोन उदाहरणे आठवताहेत.
सखाराम बाईंडरच्या पाचव्या "बायको" विषयी त्यांनी हिज फिफ्थ वाईफ असा नाट्यांश लिहिला होता. ( त्याचे प्रयोग भारतात झाल्याचे आठवत नाही. ) तसेच त्यांच्या अशी पाखरे येती च्या कथानकावर "मुसाफीर" हा हिंदी चित्रपट निघाला. त्यावेळी दिग्दर्शकाला असे वाटले कि अरुण सरनाईकला काही पार्श्वभूमी नाही. ती चित्रपटाच्या दृष्टीने आवश्यक आहे. मग त्याला पुर्वार्ध जोडला गेला. त्याच्या हातून त्याच्या बायकोचा खून झालेला असतो, असे कथानक होते त्यात. ( चित्रपटात ही भुमिका मूनमून सेन ने केली होती. ) मुख्य भुमिकेत नासिरुद्दीन आणि रेखा होते.

सादरीकरण करताना फॉर्म बदलला तरी मूळ कथानकाला धक्का न लावताही सादरीकरण झालेच. अशी पाखरे वर पालेकरांनी " थोडासा रुमानी हो जाये" हा चित्रपट काढला होता. ( नाना पाटेकर, अनिता कंवर ) त्यासाठी म्यूझिकल हा फॉर्म निवडला होता. तो यशस्वी झाला असे म्हणवत नाही, कारण त्यातला नानाचा अभिनय प्रेक्षकांना आवडला असला तरी, संगीत फारसे गाजले नव्हते.

मुसाफीरला केरळची पार्श्वभूमी होती. पूढे जी मालिका सादर झाली ( डॉ. उत्कर्षा नाईक ) ती मूळ कथानकाशी प्रामाणिक होती.

तेंची अनेक नाटके भाषांतरीत झाली. ते केवळ भाषांतरच होते. कथानकात बदल झाला नाही. सखाराम बाईंडर इंग्रजीत सादर झाले त्यात भारतीय रंगमंचावर कधीच सादर होऊ न शकणारी समीप दृष्ये होती. तरी कथानक बदललेले नव्हते.

येवढा वाद का?
वरच्या फोटूत एक बारीक पिवळा चौकोन आहे, त्यात लिव्हलय की "विजय तेंडुलकर यांच्या नाट्यकृतीवर आधारित"
आधारीत असे म्हणलय, नाट्यकृतीबरहुकूम असे नाही म्हणलय...

कमला वाचायला मिळाली कमला सरिता सरिता कमला काहिच तर फरक नाही!

असली नाटक स्टेजवर आणुन स्त्रियांना त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव निर्माण करुन देणार्‍या तेंडूलकरला सलाम.

चिनूक्स खूप धन्यवाद !!!!!

मला एक प्रश्न पडला आहे.
तेंडुलकरांनी "घाशीराम कोतवाल" हे नाटक ज्या घटनेवर/ऐकिव-ठाशीव ऐतिहासिक पुराव्यांवर/सत्यकथेवर/वा जुगवुन लिहीले, त्यात काही एक ऐतिहासिक आधार/नावे असलेली पात्रे घेतली होती.... लिहीताना सरळ सरळ "स्वत:ची अभिव्यक्ति वापरून" सदरची पात्रे त्यांना भावली वा त्यांना हवी तशी रंगविली होती.
तेव्हा त्या तशा रंगविण्यावर आक्षेप घेणार्‍यांना "बुर्झ्वा/प्रतिगामी" वगैरे विशेषणे डकवली गेली असल्याचे स्मरते.
आज वरील सेरीयलच्या पटकथालेखकांनीदेखिल, तेंडूलकरांनी रंगविलेली पात्रे थोडाफार बदल करून त्यांना हवीतशी रंगविली तर बिघडले कुठे?
अन त्यांच्यावर टीका करणार्‍यांना आता कोणती विशेषणे डकवावीत?

सेरीयलवरील टीकाकारांचे नेमके दुखतय कुठे तेच समजतच नाही.
का तेंडुलकरांच्या नाटकावर आधारीत सेरियल मधील बाईने चक्क "वडाला पूजावे" हेच नेमके पुरोगामी दुखणे आहे? Proud Wink
आमच्या कोकणात मेळे/नाटके यांचे पेव असते.... सिझनला ( नेमके केव्हा ते आठवत नाही) बहुधा गणपतींमधे अशी छोटेखानी नाटके सर्रास चालतात अन त्यात पौराणिक/देवदेवतांचा यथेच्छ विनोदी वापर करीत पण शेवटी त्याच पुराणातल्या जीवनविषयक तत्वाला हात घालीत घालित ही नाटके सादर होतात. नशिब आमचे की वरील सेरियलसारखे आक्षेप कोणी त्या नाटककारांबाबत अजुनतरि घेत नाहीये.

limbutimbu,

माझ्या मनातला प्रश्न चोरल्याबद्दल तुमचा निषेध! Proud

नाना फडणीस नामे उत्तरपेशवेकालीन ऐतिहासिक पुरूष कामलोलुप होता. तेंडुलकरांनी तेव्हढाच भाग उचलून त्यात स्वत:चा मालमसाला भरून घाशीराम मंचावर आणलं. ते पुरोगामी वगैरे पाऊल आहे. तर मग तेंडूलकरांच्या कल्पित (पण सत्याधारित) कादंबरीत पाणी घालून पैदा केलेल्या पाणचट मालिकेवर नक्की आक्षेप किमर्थे?

आ.न.,
-गा.पै.

टीप : मी घाको, कमला दोन्ही पाहिलेले वा वाचलेले नाहीत.

लिंबूकाका आणि गामापैलवान +१००

नाना फडणवीसांच्या आयुष्यातला महत्वाचा भाग हा अतिशय धोरणी आणि हुशार राजकारणपटू असण्याचा होता. हा मुख्य भाग सोडून 'तोच' भाग नाटकात आणला गेला, जो तोपर्यंत अनेकांना ठाऊकही नव्हता. अभिव्यक्तीस्वातंत्र्य!

चर्चेशी असंबद्ध प्रश्नं उपस्थित करून अमुकतमुक लोकांच्या अस्मितेचा प्रश्नं कसा उभा करावा हे वरिल चारपाच प्रतिसादांतून मस्त समजते.
Wink

सिरीयल धाक दाखवून बंद करू नये आणि ह्यांना 'तें' कळले का असले प्रश्न विचारू नये याच्याशी सहमत.
अर्थात कमला विकृत आणि पूर्णपणे विसंगत चिरफाड करून टयार्पीसाठी दाखवणे ह्याचाही निषेध.

साती, फोटोतल्या साडीत भगवे कमळ पण आहे Happy कुणाचे लक्ष गेलेले दिसत नाही.

समजा या मालिकेच्या निर्माता दिग्दर्शकाला विचारले तर तो प्रेक्षकांना हवे तेच आम्ही देतो, असेच म्हणेल. आता नेमके कुणाला हवेय विचारले तर .... !!

साती,

यात अस्मितेचा प्रश्न निश्चितच नाहीये. नाना फडणीस या माणसाचा कुणालाही भरोसा वाटंत नसे. तो आणि त्याचा चुलत भाऊ मोरोबादादा फडणीस हे पुण्यातले बदनाम लोकं होते. शेवटी त्याने स्वत:च्या भाच्याला पेशवेपदी बसवायचा घाट घातला होता. हे सगळं जरी खरं असलं तरी घाको मधून नानाच्या कृष्णकृत्यांचा यथोचित बोध होत नाही. नानाच्या लोलुपतेमुले पेशवाई बुडाली हे स्पष्टपणे दाखवलं असतं तरी चाललं असतं. ते सत्याला धरून आहे. पण घाको पडलं वस्तुस्थितीपासून शेकडो मैल दूर! ते बघून काय बोध घ्यावा? Uhoh

बोधाच्या विवेचानासाठी थोडं कलाकृतीच्या रसाकडे वळूया. नाटकाने नवरसांपैकी एक वा अधिक रसांचा परिपोष करावा, बरोबर? तर सखाराम बाईंडर बघून कुठल्या रसाची अपेक्षा ठेवावी?

सबा संबंधी स्वत: तेंडूलकर लिहितात :

>> - पुढे या नाटकाने कुठल्या तरी ओढीने माझ्याकडून स्वतःला लिहवून घेतले. लिहिताना, एखादी करकचली स्प्रिंग
>> ढिली पडत जावी, तसे क्रमशः हलके वाटत गेले. माझ्या आतले, मला जड झालेले काही नाटकात उतरले. ते किती
>> जड झाले होते हे उतरल्यावरच लक्षात आले. ते काय होते? माझ्यातला हिंसाचारी पुरुष? की स्त्रीवरच्या हिंसाचाराचा
>> माझ्या मनातला साचलेला निषेध? माझ्यातला सामाजिक दंभाचा विध्वंसक? की 'सुसंस्कृत' जगाने वाळीत
>> टाकलेल्या माणसांविषयीचा माझा पक्षपात? नक्की सांगणे कठीण आहे. मात्र जे होते ते अतिशय वैयक्तिक आणि
>> खूप आतले होते.

तेंडुलकरांना जे हलकं वाटलं त्याला शांतरस म्हणतात. ही शांती सबामधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचते का? की फक्त लेखकापुरती सीमित राहते? आणि प्रेक्षक फक्त अस्वस्थच राहतो? प्रेक्षकाचं मन क्षुब्ध राहिलं तर त्या कलाकृतीतून बोध घेता येईल का?

चर्चा व्हावी.

आ.न.,
-गा.पै.

अजयच्या या लेखावर वादविवाद होतील असे आधी वाटले नव्हते. साधा मुद्दा होता गळचेपीचा.
केवळ वाद घालायचेच आहेत म्हणुन वाद घालणार्यांना नमन.

गामा,

सुंदर प्रतिवाद!

मात्रः

>>>ते बघून काय बोध घ्यावा?<<<

बोध म्हणजे काय? आणि कमला सिरियल बोध देण्या-घेण्यासाठी असेल असे चर्चेवरून आपल्याला वाटत तरी आहे का? निर्मीतीतून बोध घेणे ह्यापलीकडे असलेल्या इतर गोष्टीच अधिक महत्त्वाच्या असतात असे आपले माझे गरिबाचे मत! Happy

(बाकी तुमच्या ह्या मुद्याचा सदर चर्चेशी काय संबंध आहे हे जरा उशीरा गल्लीत पोचतंय)

लेख आणि सगळे प्रतिसाद वाचले. हुश्श!
रच्याकने, फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्यच (कसही असलं तरी) महत्वाच आहे तर माबो वरती इतके आयडीज का उडतात, असा प्रश्न पडला.

अजय नि विरोधी पक्ष... दोघांनाही हे मान्य आहे

  • तेंडूलकर उत्तम लेखक होते.
  • प्रस्तुत मालिकेत कचरा ओतण्याच काम चालू आहे.

विरोधी पक्षाचा आक्षेप :
मालिकेबद्दलचा आक्षेप 'कमला'च्या विकृतीकरणाबद्दल आहे. तेंडुलकरांनी लिहिलेल्या संहितेशी प्रामाणिक न राहण्याबद्दल आहे. कथानक बदलायचं असेल, वाट्टेल ते घुसडायचं असेल, तर तेंडुलकरांचं नाव कशाला?

ही मालिका अत्यंत भंकस असेलही. आणि आज तेंडुलकर असते तर त्यांना ती पाहून खूप दु:खही झाले असते कदाचित. हे वरिल लेखात अजय यांनीही म्हटले आहेच.

थोडक्यात काय दोन्ही पक्ष उच्चतम कलाकृतींचे फॅन असतील. किंबहुना दोन्ही पक्षांचा पिंडच मुळी त्याप्रकारच्या साहित्यकृतींवर पोसला गेला असेल. फक्त फरक एवढाच आहे.
इतरत्र (फेसबुक..इ..) ज्या टोन मध्ये आक्षेप नोंदवला जात आहे. ती टोन अजय यांना खटकते. तेंडुलकरांना मखरात बसवलं जातंय ते खटकतंय.

धर्माच्या व्याख्येत जर आजच्या काळाप्रमाणे बदल करायचा ठरवल्यास... समान विचार असणारे, सर्वांचे आयड्ल समान आसणारे, त्या विचारांशी नि त्या आयड्ल शी प्रामाणिक असणार्‍यांचा समूह.
मग घोड् पुन्हा तिथेच आलयं कि आमच्या आयड्लला तुम्ही धक्का दिलाच कसा... बस हेच त्यांना म्हणायचं असावं.

स्वाती_आंबोळे,

>> कलाकृती प्रबोधनासाठी असतात का? असाव्यात का? का?

हो आणि नाही दोन्ही मतप्रवाह आहेत. कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला अशा या दोन बाजू आहेत.

घाकोमधून ऐतिहासिक बोध घ्यावा का? तेंडुलकरांच्या मते हे ऐतिहासिक नाटक नाही. नाटकातील नाना, घाशीराम या प्रवृत्ती आहेत. अर्थात नाटकातून ऐतिहासिक बोध घेणे इष्ट नाही. तर मग नाना फडणीस या नावाचं प्रयोजन काय, असा प्रश्न उद्भवतो.

माझ्याकडे उत्तरं नाहीत. कोणी शोधायला मदत केली तर स्वागत आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

बेफिकीर,

तुमचा इथला संदेश वाचला. उलट क्रमाने प्रतिसाद देतोय.

१.
>> निर्मीतीतून बोध घेणे ह्यापलीकडे असलेल्या इतर गोष्टीच अधिक महत्त्वाच्या असतात असे आपले माझे गरिबाचे मत!
>> (बाकी तुमच्या ह्या मुद्याचा सदर चर्चेशी काय संबंध आहे हे जरा उशीरा गल्लीत पोचतंय)

निर्मिती करणाऱ्या कलाकाराला अभिव्यक्तीस्वातंत्र्य असतं. मग आस्वादकाला बोध घ्यायचं स्वातंत्र्य असायला काय हरकत आहे?

बोधासंबंधीच्या मुद्द्याचा चर्चेशी घनिष्ट संबंध आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य, रचना (फॉर्म), सादरीकरण, संहिता इत्यादि भारदस्त शब्दांच्या आधारे चर्चा चालली होती. म्हणजेच कथानकातून बोध घेण्याजोगं नक्कीच काहीतरी असणार. कलाकृती निव्वळ रंजनापुरती मर्यादित असेल तर इतकी घनघोर चर्चा अनाठायी ठरावी.

२.
>> आणि कमला सिरियल बोध देण्या-घेण्यासाठी असेल असे चर्चेवरून आपल्याला वाटत तरी आहे का?

माहीत नाही. मी बघितली नाही. इतर लोकांच्या म्हणण्यानुसार मालिका पाणी घालून पातळ केलेली आहे. बोधापासून दूर असल्याने ती तेंडुलकर या नावाशी प्रतारणा आहे.

३.
>> बोध म्हणजे काय?

बराच मूलभूत आणि अवघड प्रश्न आहे. महर्षी व्यासांनाही हाच प्रश्न पडला होता. आख्खं महाभारत लिहून झाल्यावर त्यांना कळेना की हे काय लिहून बसलो आपण! सुष्टांचा दुष्टांवर विजय इतकंच म्हंटलं तर महाभारत एक प्रदीर्घ परीकथा ठरते.

म्हणूनच व्यासांनी हरिवंश लिहिलं. त्यालाच महाभारतातला १९ वा अध्याय म्हणतात. त्यात श्रीकृष्णाच्या म्हणजे साक्षात भगवंतांच्या लीलांचं वर्णन आहे. श्रीकृष्णाची भक्ती करणे हा महाभारतातून सामान्यजनांनी घ्यायचा बोध आहे.

कल्पना करा आज जर श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतरला तर आश्चर्यचकित होईल. कशामुळे माहितीये? Happy गीतेला देशीविदेशी प्रचंड लोकप्रियता लाभलेली पाहून! त्याला दोन कारणांसाठी आश्चर्य वाटेल. गीता हे एक खाजगी संभाषण होतं. ते संजयाने सार्वजनिक केलं. पण त्यातून सामान्य माणसाला अशी काय स्फूर्ती मिळाली? हे पाहिलं आश्चर्य. दुसरं आश्चर्य म्हणजे गीता ही अर्जुनासारख्या उच्चकोटीच्या कर्तृत्ववान क्षत्रियासाठी सांगितली होती. तिचा सुमार वकुबाच्या सर्वसामान्य माणसाशी काय संबंध? सामान्य लोकांत इतकी लोकप्रिय का?

या दोन्ही आश्चर्यांचं मूळ हरिवंशात आहे. श्रीकृष्ण अवतारी पुरूष आहे हे हरिवंश वाचून कळतं. अन्यथा इतर कितीतरी उपदेश महाभारतात ठिकठिकाणी भरला आहे. ज्ञानोबा माउलींनी निरुपणार्थ गीताच निवडली. अर्वाचीन काळी लोकमान्य टिळकांना गीतारहस्य लिहावंसं वाटलं. गीतेला हे स्थान हरिवंशामुळे मिळालंय.

तर आता बोध म्हणजे काय, ते सांगायचा प्रयत्न करतो. आस्वादकाला कलाकृतीतून शिकण्यासारखं जे काही असतं त्याला बोध म्हणतात.

आ.न.,
-गा.पै.

कल्पना करा आज जर श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतरला तर आश्चर्यचकित होईल. कशामुळे माहितीये? स्मित गीतेला देशीविदेशी प्रचंड लोकप्रियता लाभलेली पाहून! त्याला दोन कारणांसाठी आश्चर्य वाटेल. गीता हे एक खाजगी संभाषण होतं. ते संजयाने सार्वजनिक केलं. पण त्यातून सामान्य माणसाला अशी काय स्फूर्ती मिळाली? हे पाहिलं आश्चर्य. दुसरं आश्चर्य म्हणजे गीता ही अर्जुनासारख्या उच्चकोटीच्या कर्तृत्ववान क्षत्रियासाठी सांगितली होती. तिचा सुमार वकुबाच्या सर्वसामान्य माणसाशी काय संबंध? सामान्य लोकांत इतकी लोकप्रिय का?>>>>

Rofl

पुस्तक पूर्वी वाचलेले आहे. काल येथील चर्चेपासून स्फूर्ती घेउन एक भाग बघायचा प्रयत्न केला. ती कमला आहे तिचे पात्र थोडे निरागस, सर्व अ‍ॅ़क्सेप्ट करणारी अशी आहे. तर पत्नी जरा इन्सेक्युअर,
आता हा अजून काय करतो ह्या संभ्रमात पडलेली अशी दाखवली आहे. ती कमलाला दूर ठेवायचा मिषाने तिला रद्दी उपसायचे आणि कचरा सेपरेट करायचे मोठे काम देते. ही बिचारी करत राहते. हे मला खूप श्रूड वाटले. बायको चटणी बनवते तर नवर्‍याला ती कमलेने बनवली आहे असेच वाट्ते की लगेच ही असुरक्षित फील करते. सर्वात म्हणजे सर्वात विनोदी तो नवरा आहे. मुंबईच्या भाषेत येडा बनके पेडा खायेला है. बायको ने चटणी केली तर तिला म्हणतो किती छान ह्यासाठी तुला काहीतरी मोठे द्यायला पाहिजे. कमलाने एक महत्वाचा पेपर शोधून आणून दिल्यावर तिलाही तेच म्हणतो. सात आठ मिनिटे हेच संभाषण रिपीट मोड मध्ये!!! शेवटी वैतागून बंद केले. ही इज टेकिंग बोथ फॉर अ राइड. नॉट डन. कोणी का असेना.

असली भाषा, पात्रे आणि वातावरण निर्मीती तेंडुलकर नक्की वापरणार नाहीत. सिरीअल सुरू होण्या आधी एक सेकंद एक पाटी झळकते. ती धड वाचता आली नाही त्यात निर्मात्यांनी स्वतःची पोझिशन डिक्लेअर केलेली असेल.

कमला बिनधास्त हिरोला मालक म्हणते. अरेरे हॉरिबल. तिचे दागिने छान आहेत. पन हे म्हणजे काही मालिकातून चुकीचा संदेश दिला जातो पण लोक दागिने कपडे छान आहे तेच बघत राहतात. असे झाले.

गामा, निव्वळ बोधाच्या पलीकडलं कलाकृतीत इतर बरंच काही बघायचं, जोखायचं असतं हो. ते बोधापायी वरती जे काही लिहिलंय, ते फार असंबद्ध वाटतं आहे. आणि तो सहा-आठ दशकांपुर्वीचा कलाजीवन वाद इतक्या वर्षांनंतर फारच आऊटडेटेड झालेला आहे. बरीच स्थित्यंतरं त्यानंतर झाली, परदेशी कलाकृती आणि कलेकडे बघण्याची नजर आपल्याकडे थोडीफार झिरपू शकली, असंख्य आयाम मिळाले, आणि कलाजीवनवाद हा तद्दन हास्यास्पद ठरला. ते वर बोध-प्रबोधनासाठी आज कलाजीवनाचा आधार- हेही असंच हास्यस्पद वाटतंय.

तेंडुलकरांना जे हलकं वाटलं त्याला शांतरस म्हणतात. ही शांती सबामधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचते का? >> यावर तर काय बोलावे तेच कळत नाही. ते नवरस वगैरे कलाकारासाठी नसावेत हो. तेंडूलकरांचं मागचे पुढचे संदर्भ सोडून एकच वाक्य तुम्ही वर उद्धृत केलं आहे, आणि त्यातून 'ते शांतीसाठी लिहित होते' असा निष्कर्ष काढून मोकळेही झालात. हे सारंच भंपक आहे. उलट अस्वस्थ होण्यासाठी आणि अस्वस्थ करण्यासाठी तेंडूलकरांनी सारं लिखाण केलं आहे.
('सबामधून शांती' ही एखादी ओशोस्टाईल पंचलाईन म्हणून फेमस करायला हरकत नाही. :फिदी:)

ज्यावेळी तेंनी हे कथानक रचले होते त्यावेळी झालेली एक चर्चा आठवतेय.
पत्रकाराची पत्नी सुविद्य होती. आपला नवरा हे कशासाठी करतोय याची तिला पूर्ण कल्पना होती. तिला घरात आणून ठेवले म्हणजे तो लगेच तिच्याशी लग्न करेल ( ता काळातला शब्द "ठेवेल" ) याची शक्यता नव्हती, हे ती जाणून होती.

त्या कमलाला मात्र, आपल्याला कशासाठी आणले गेलेय याची कल्पना नव्हती. तिला हा माणूस आपल्याशी लग्न करेल किंवा ठेवेल, असेच वाटत होते. खरे तर तिचा एक वस्तू म्हणून ( सनसनाटी बातमी ) वापर केला गेला त्याबद्दल नाराजीचा सूरही होता.

Pages