तेंंडूलकर माफ करा, आम्ही अजूनही तुम्हाला समजू शकलो नाही !

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago
Time to
read
1’

kamala.jpg

सध्या तेंडूलकरांच्या "कमला" नाटकावर आधारीत, "कमला" याच नावाची मालिका चालू आहे.

मी ही मालिका पाहीली नाही. ती किती चांगली किंवा वाईट आहे हे मी सांगू शकत नाही.

सध्या सोशल मिडीयामधे ही मालिका किती भंकस आहे याबद्दल प्रतिक्रिया वाचतो आहे. प्रत्येक प्रेक्षकालाच आपले मत व्यक्त करायचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच.

पण काही प्रतिक्रियामधे "तेंडुलकरांचे नाटक करायचे धाडस तुम्हाला होतेच कसे?", "संहीता बदलताच कशी तुम्ही", "पेलता येत नाही तर कशाला तेंडुलकरांची नाटकं करायला जाता?" , "ही मालिका बंदच करायला पाहिजे" असा सूर दिसतो.

ही मालिका अत्यंत भंकस असेलही. आणि आज तेंडुलकर असते तर त्यांना ती पाहून खूप दु:खही झाले असते कदाचित.
पण त्यापेक्षाही कितीतरी जास्त दु:ख, "तेंडुलकरांचे नाटक करायचे धाडस तुम्हाला होतेच कसे?" या सारख्या वाक्यांचे झाले असते. "त्यांना एका मखरात बसवले गेले आहे आणि त्यांच्या त्या प्रतिमेचा उपयोग करून इतरांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य चेपण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातोय" याचे झाले असते.

माझा तेंडूलकरांचा काहीच अभ्यास नाही. मग माझी तेंडूलकरांबद्दल बोलायची लायकी आहे का?

हो आहे ! फक्त माझीच नाही तर तेंडुलकरांचे काहीही वाचलेल्या , पाहिलेल्या , मग ते अगदी तुटपुंजे का असो, त्या प्रत्येकाची तेंडूलकरांबद्दल बोलायची लायकी आहे. आणि हे मी तेंडूलकरांकरूनच शिकलो आहे.

आणि कुठल्याही दिग्दर्शकाला तेंडुलकरांचे नाटक/कलाकृती याचे त्याला योग्य वाटेल ते ईंटरप्रिटेशन करायचा अधिकार आहे.

आता हे ईंटरप्रिटेशन किती चांगले आणि किती वाईट होईल तो भाग वेगळा. आणि ते कसे वाटले हे सांगायचाही प्रत्येक वाचकाला/प्रेक्षकाला अधिकार आहेच. पण तो अधिकार्/ते स्वातंत्र्य अमुक व्यक्तींनाच असे ईंटरप्रिटेशन करता येईल, इतरांना करता येणार नाही असे सांगू शकत नाही.

जाता जाता: २००२ साली प्रिया गेल्यावर, तेंडुलकर अमेरिकेत आले होते. त्यातले बरेच दिवस ते बॉस्टनलाही राहिले होते. माझ्याकडेही राहून गेले आहेत. त्या दिवसात एक माणूस म्हणून, मुलगी गेल्याच्या दु:खाने व्यतिथ झालेला बाप म्हणून, त्यांना जवळून बघायला मिळालं. आपल्याला मखरात बसवलं जातंय, एका चौकटीत बसवून आपल्या प्रतिमेचा उपयोग करून काही विचारांना दाबलं जातंय असं त्यांना जाणवायला लागलं होतं आणि त्याचा उबगही येत चालला होता.

ज्या व्यक्तिने आयुष्यभर त्याला काय वाटलं ते लिहिलं, अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी लढा दिला , तिचंच नाव , "त्यांना समजण्याची तुमची लायकी नाही म्हणून तुम्ही व्यक्त होऊ नका" असे म्हणण्यासाठी वापरण्यात येत असेल तर आपण तेंडूलकरांना समजूच शकलो नाही.

विषय: 
प्रकार: 

अतिशय सुंदर लिहिले आहेत अजय! समर्पक शब्द आणि नितळ भावना! अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा खूप महत्त्वाचा!

लेखातील भावना व संदेश दोन्ही भिडले.

टेलिव्हिजनच्या जगामधे क्वचित अपवाद वगळता हिंदी वा मराठी सिरीयल्स म्हणजे संपूर्णपणे रिग्रेसिव्ह, बुरसट विचारांचे ग्लोरिफिकेशन करणे यापलिकडे काहीही उरलेले नाहीये. कुठल्याही काळातली, कुठल्याही विषयावरची सिरीयल असो बायकांची व्रतेवैकल्ये, अत्यंत फडतूस पातळीवरचे किचन पॉलिटिक्स, चांगली/वाईट किंवा काळी/ पांढरी ठोकळेबाज व्यक्तिमत्वे याच मुद्द्याभोवती गोष्टी येतात कुठल्याही सिरीयलमधे. तेच इथेही होतेय.

दोन बायांपैकी कुणाचा वटसावित्रीचा उपवास नवर्‍याच्या हातून सुटेल? वगैरे फालतू कलाकारी करायला तेंडुलकरांचं नाव कशाला हवे?
तेंडुलकरांचं नाव वापरून टि आर पी खेचायचा आणि नेहमीचाच कचरा देत रहायचा याला व्यक्त होणे, इंटरप्रिटेशन वगैरे म्हणत नाहीत.

हे सगळं आधी लक्षात घ्या. आक्षेपांचे मुद्दे काय आहेत ते लक्षात घ्या. मग आक्षेप घेणार्‍यांना नावे ठेवा ना.

ज्या दांभिकपणाचा तेंडुलकरांनी कायमच विरोध केला त्याचेच ग्लोरिफिकेशन होणे याला अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणायचे का? बर.

सर्वसामान्यांना तेंडुलकर म्हणजे ही कमला सिरीयल म्हणून माहित होणार. हे किती चुकीचे आहे?

बाकी तेंडुलकर समजण्याची त्या मालिकेच्या लेखक दिग्दर्शक निर्मात्यांची कुवत नाही हे म्हणायचे प्रेक्षकाचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाही का?

अजय,
लेख पटला नाही. तेंडुलकर अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले, तरी अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे लिखित संहितेशी अप्रामाणिक राहणं नव्हे. आपण लिहिलेल्या संहिता कशा पद्धतीने प्रेक्षकांसमोर येतात, हे तेंडुलकर व्यवस्थित बघत असत. त्यांनी नवोदितांबरोबर काम केलं, तसं मोठ्या नावांबरोबरही. पण त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या संहितांमध्ये बदल करण्याची हिंमत कोणी दाखवली असेल, असं वाटत नाही. रंगीत तालीम 'सैल' झाली, संवादफेक योग्य नव्हती, ऐनवेळी बदल केला तर तेंडुलकर कसे वैतागत याच्या कथा त्यांच्याबरोबर काम केलेल्यांकडून ऐकल्या आहेत.

मालिकेबद्दलचा आक्षेप 'कमला'च्या विकृतीकरणाबद्दल आहे. तेंडुलकरांनी लिहिलेल्या संहितेशी प्रामाणिक न राहण्याबद्दल आहे. कथानक बदलायचं असेल, वाट्टेल ते घुसडायचं असेल, तर तेंडुलकरांचं नाव कशाला?

तेंडुलकरांच्या संहितेत उपासतापास नव्हते. मालिकेतला भडकपणा नव्हता. प्रेक्षकांचा तेंडुलकरांबद्दल, 'कमला'बद्दल गैरसमज होतोय, त्याचं काय?

ह्या आधी "कमला" नावाचा एक हिंदी सिनेमा तेंडुलकरांच्या ह्याच नाटकावर आला होता. हा सिनेमा जितका भंकस होता, त्यापेक्षाही ही कमला नावाची मालिका अधिक भंकस आहे हे माझे वयक्तिक मत. ह्याचे कारण नेहमीच्या डेलीसोपच्या वळणावर जाणारी मालिका आहे ही.

बाकी लेखातील भावनांशी सहमत!

कलाकारी फालतू आहे का नाही हे मला माहिती नाही.
पण टि आर पी मिळवणं आणि कचरा देणंच हे एखाद्याचं व्यक्त होणं असू शकतं. "अमूक पद्धतीनेच व्यक्त व्हा तरंच ते व्यक्त होणं आहे" असं आपण म्हणत असू तर ते चुकीचं आहे आणि त्याचं जास्त दु:ख तेंडुलकरांना झालं असतं.

घाशीरामचं ईंटरप्रिटेशन तुम्ही असंच का केलं? तुम्हाला इतिहासाचा चांगला भाग दिसला नाही का? तुम्ही फक्त सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी स्टेजवर सेक्स आणता आणि त्या कचर्‍याला नाटक म्हणता असे आरोप खुद्द तेंडुलकरांवरतीही झाले आहे.

हा लेख वादोत्पादक असेल असे वाटलेच नव्हते. पण सगळे प्रतिसाद वाचल्यानंतरही हे वाक्यच पटत आहे.

>>>"अमूक पद्धतीनेच व्यक्त व्हा तरंच ते व्यक्त होणं आहे" असं आपण म्हणत असू तर ते चुकीचं आहे <<<

<टि आर पी मिळवणं आणि कचरा देणंच हे एखाद्याचं व्यक्त होणं असू शकतं.>
अगदी मान्य. पण हा कचरा स्वतःचा असावा, ही अपेक्षा. तेंडुलकरांना ज्या 'घाशीराम कोतवाल', 'सखाराम बाईंडर', 'गिधाडे' यांच्यासाठी त्रास सोसावा लागला, त्या त्यांच्या स्वतःच्या संहिता होत्या. त्यांत त्यांना जे काही म्हणायचं होतं, ते त्यांचं स्वतःचं होतं. 'कमला'ची संहिता तेंडुलकरांची आहे. जे मूळ नाटकात नाही, आणि जे करणं तेंडुलकरांना पसंत नव्हतं, ते मालिकाकारांनी करणं, हे पटत नाही. कचरा द्यायचा तो स्वतःचा द्या. हवा तेवढा कचरा द्या, अजिबात हरकत नाही. दुसर्‍याच्या चांगल्या वस्तूंचा कचरा करू नका, एवढंच म्हणणं आहे.

"अमूक पद्धतीनेच व्यक्त व्हा तरंच ते व्यक्त होणं आहे" असं आपण म्हणत असू तर ते चुकीचं आहे<<<
अमुक पद्धतीने नाही. तेंडुलकरांचं नाव लावताय तर तेंडुलकरच सादर करा. तुमचा कचरा 'हेच तेंडुलकर' म्हणून लोकांना देऊ नका असा मुद्दा आहे.

>> आणि त्याचं जास्त दु:ख तेंडुलकरांना झालं असतं. <<
हे तुमचं इंटरप्रिटेशन आहे.
तेंडुलकरांशी संवाद साधलेले तुम्ही एकटेच नाहीत.
तेंडुलकर स्वतःच्या संहितेच्या नेमकेपणाबद्दल आणि जो फोकस आहे तोच जावा याबद्दल किती आग्रही असत हे सांगणारे, त्यांच्याबरोबर चांगलं काम केलेले लोक आहेत.

चिन्मय,
ती मालिका " तेंडूलकरांच्या नाट्यकृतीवर आधारित" आहे, तेंडूलकरांची नाट्यकृती नाही.

हे जगात वेगवेगळ्या प्रकाराने होत असतेच. "पीग्मॅलियन" चे जेंव्हा "माय फेयर लेडी" झाले, तेंव्हा त्याचे म्युझि़कल झाले हे शॉ च्या अनेक फॅन ना पटले नाही. एका मोठ्या कलाकृतीला , थिल्लर , सवंग संगितीका केल्याची टीका झाली होती. आज माय फेयर लेडी इतके लोकप्रिय आहे की त्या टिकेबद्दल कुणी बोलत नाही.

'नाट्यकृतीवर आधारित आहे' हेही मान्य आहे. किंबहुना त्याबद्दल लिहिणारच होतो.
आपल्याकडे गेल्या शंभर-सव्वाशे वर्षांत शेक्सपीअरच्या अनेक नाट्यकृती आल्या. प्रत्येकानं आपापल्या कुवतीनुसार त्या कलाकृतीचा अर्थ लावला. विशाल भारद्वाजच्या 'ओंकारा'मध्ये 'बिडी जलईले' हे गाणं आहे. शेक्सपीअरच्या नाटकात आयटम साँग आणलं, म्हणून काहींनी टीका केली. पण ते 'आयटम साँग' मूळ कलाकृतीतच आहे, फक्त त्याचा फॉर्म वेगळा आहे. 'आधारित' असं लेबल दिलं, म्हणजे मूळ संहितेत नसलेला, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मूळ संहितेच्या आत्म्याशी फारकत घेतलेला कथाभाग आणता येतो का? 'घाशीराम'ची गाणी जॅझ पद्धतीनं गाणं आणि घाशीरामच्या बायका वटसावित्रीच्या दिवशी एकमेकींशी भांडतात असं दाखवणं, यांत फरक नाहीये का? 'पिग्मॅलियन'चा फॉर्म बदलणं वेगळं आणि हिग्गिन्सची आई एलिझाचा छळ करते, असं दाखवणं वेगळं.

>> आणि त्याचं जास्त दु:ख तेंडुलकरांना झालं असतं. <<
>हे तुमचं इंटरप्रिटेशन आहे.
>तेंडुलकरांशी संवाद साधलेले तुम्ही एकटेच नाहीत.

नीधप अगदी बरोबर. हे माझे इंटरप्रिटेशन आहे. पण मी त्यांच्याशी संवाद साधला म्हणून ते इंटरप्रिटेशन करतो आहे असे अजिबात नाही. जगातला कुणीही (त्यांना भेटला असो वा नसो) त्याला हवे ते इंटरप्रिटेशन करू शकतो.

तुम्ही पिग्मॅलियन वाचलंय आणि माय फेअर लेडी (नाटक वा सिनेमा) पाह्यलंय?

माय फेअर लेडी मधे पिग्मॅलियनमधला मूळ मुद्दा, फोकस, मूळ गंमत याला खूप कमी धक्का लागतो.

कमला सिरीयलमधे जे काय घडते त्याने तेंडुलकरांच्या कमला नाटकातल्या मुद्द्याला, आशयाला, फोकसला पूर्णपणे मूठमाती दिलेली आहे. केवळ पात्रांची नावे आणि कमलेला पत्रकाराने विकत घेऊन घरात आणून ठेवले एवढंच मूळ संहितेप्रमाणे आहे. बाकी नाटकाशी संबंध नाही मग तेंडुलकरांचे नाव का वापरावे?

>अगदी मान्य. पण हा कचरा स्वतःचा असावा, ही अपेक्षा. तेंडुलकरांना ज्या 'घाशीराम कोतवाल', 'सखाराम बाईंडर', >'गिधाडे' यांच्यासाठी त्रास सोसावा लागला, त्या त्यांच्या स्वतःच्या संहिता होत्या.

घाशीरामची संहीता त्यांची होती. पण त्यातल्या व्यक्तीरेखा त्यांच्या नव्हत्या. त्या व्यक्तीरेखांबद्दलचा समाजातला समज/आदर वेगळा होता.(तो खरा/खोटा होता हा भाग वेगळा). तुम्हाला अभिव्यक्तीस्वातंत्र हवे असले तर तुमच्या कलाकृतीत तुमची पात्रं घाला. आमच्यासाठी आदरणीय ऐतिहासिक व्यक्तींबद्दल असलं काही लिहून, इतिहास का बदलता" अशी टीका तेंडूलकरांवरही झाली होती. घाशीराममधल्या कचर्‍यामुळे , पुण्याच्या इतिहासाबद्दल लोकांमधे वाईट मत होईल अशी भिती तेंव्हाही व्यक्त झाली होती.

पण घाशीराममधे जे संदर्भ वापरले गेले ते इतिहासात आहेत. तेव्हाचे ऐतिहासिक दस्तावेज वाचले तर सहज कळेल.
त्यांनी इतिहासात ढवळाढवळ केली नव्हती.
लोकांनी टिका केली ती जनमानसातल्या इमेजला धक्का पोचला म्हणून.

'कमला' हे नाटक एका सत्यघटनेवर आधारलेलं आहे. या सत्यघटनेचा वापर करून तेंडुलकरांनी नाटक रचलं. तीच सत्यघटना वापरून मालिकाकर्त्यांना मालिका तयार करता आली असती, आपल्याला हवं ते कथानक वापरून, तेंडुलकरांचं नाव न वापरता.

'घाशीराम'च्या बाबतीत तेंडुलकरांवर आरोप होता 'एकच बाजू' पाहिल्याचा. अगदी दुर्गाबाईंनीही अशी टीका केली होती. पण तरीही ती त्यांची स्वतःची कलाकृती होती. 'गांधी', 'आंबेडकर', 'नेताजी सुभाषचंद्र बोस', 'लिंकन' हे चित्रपट जसे, तसंच 'घाशीराम'. या चित्रपटांवरही टीका झाली, पण इथे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तू म्हणतोस तसा मुद्दा येतो. 'मला अमूक एका व्यक्तिमत्त्वावर किंवा त्या व्यक्तिमत्त्वाचा एकाच विशेषावर लक्ष केंद्रित करायचं होतं' असं नाटकककार म्हणू शकतो आणि तो त्याचा हक्क आहे.

एकदा नाटक लिहिल्यानंतर पुन्हा दुसर्‍याने त्यात त्याला हवे तसे बदल करणे, याला मी अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणणार नाही.

मी पिग्मॅलियन वाचलंय (पण सादर झालेलं पाहिलं नाही) आणि माय फेअर लेडी सिनेमा पाहिलाय.

>माय फेअर लेडी मधे पिग्मॅलियनमधला मूळ मुद्दा, फोकस, मूळ गंमत याला खूप कमी धक्का लागतो.
असं आज आपल्याला वाटतंय.

पण माय फेअर लेडीच्या फॉर्ममुळे एका चांगल्या नाटकाला गुळगुळीत, चकचकीत (किंवा वेगळ्या भाषेत अगदी मठ्ठ प्रेक्षकांना समजेल इतकं सोपं केलं गेलं) अशी टीका झाली होती. आणि तेंव्हा काही जणांच्या मते तो खूपच मोठा बदल होता.

अजय,
फॉर्म बदलणं आणि कथानक बदलणं यांत काहीच फरक नाहीये का? फक्त 'टीका झाली' असं म्हणून कसं चालेल?

'कमला'चा बॅले करणं आणि त्या पत्रकारासाठी दोघींनी कसलासा उपास करणं, यांत फरक आहे. बॅलेमुळे फॉर्म बदलतो, कथानक नव्हे.

व्यक्तिरेखांची नावे आणि एक घटना एवढे घेऊन वेगळेच काहीतरी दळण घालायचे आणि टि आर पी साठी जिथून नावे आणि घटना उचलली त्या कलाकृतीचे नाव देऊन लोकप्रियता कॅश करायला बघायची. असा सगळा खेळ आहे.

हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेल तर मुश्कील आहे.

>लोकांनी टिका केली ती जनमानसातल्या इमेजला धक्का पोचला म्हणून.

अगदी बरोबर. मग असं होतंय का की आपल्या मनात तेंडूलकरांबद्दल एक इमेज आहे. आणी त्या चौकटीला धक्का लागतोय याचा आपल्याला त्रास होतोय? हेच जर सोमाजी गोमाजी कापसे यांच्या नाटकावर आधारीत असं म्हटलं असतं तर मला नाही वाटत कुणाला काही फरक पडला असता. बरोबर?

मग त्रास नेमका कशाचा? तेंडुलकरांच्या नावाचा उपयोग करून प्रसिद्धी मिळवल्याचा? की संहिता बदलल्याचा?

<हेच जर सोमाजी गोमाजी कापसे यांच्या नाटकावर आधारीत असं म्हटलं असतं तर मला नाही वाटत कुणाला काही फरक पडला असता.>

सोमाजी गोमाजी कापसे यांच्या नाटकात बदल केला आहे, हेच लोकांना कळलं नसतं. त्यामुळे फरक पडला नसता.
'कमला'ला टीआरपी मिळाल्याबद्दल आक्षेप नाही. आक्षेप संहितेला धक्का लावणारे बदल केल्याबद्दल आहे. हे बदल 'अभिव्यक्तिस्वातंत्र्य' या मथळ्याखाली येत नाहीत.

>फॉर्म बदलणं आणि कथानक बदलणं यांत काहीच फरक नाहीये का?
आहे. पण त्या त्या काळात , जे बदल आज आपल्याला बदल वाटत नाही ते तेंव्हाही खूप मोठे वाटले होते.

>हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेल तर मुश्कील आहे.
मी हे सगळे चालू आहे हे योग्य आहे असे म्हणत नाही. पण त्या त्या बदलांच्या काळात , त्या त्या सामाजिक वर्गाला काही गोष्टी मुश्कील वाटत आल्या आहेत.

<पण त्या त्या काळात , जे बदल आज आपल्याला बदल वाटत नाही ते तेंव्हाही खूप मोठे वाटले होते.>

अजय,
मला वाटतं तू फक्त 'टीका' या एका शब्दाभोवती मुद्दे मांडतो आहेस. ती टीका कशाबद्दल, याला महत्त्व नाही का? फॉर्म बदलल्याबद्दल टीका तेव्हाही व्हायची, आजही होते. मी ज्या लोकांना फेसबुकावर 'कमला'बद्दल आक्षेप नोंदवताना बघितलं आहे, त्या सर्वांचा आक्षेप कथानकातील बदलाला आहे. वेगवेगळ्या नाटकांवर वेगवेगळ्या कारणांनी टीका झाली. कानेटकरांच्या अनैतिहासिक भाषेवर टीका झाली, गडकर्‍यांच्या 'प्रेमसंन्यास'वर झाली. पुलंवर ते 'अतिमध्यमवर्गीय असल्याचा आव आणतात' अशी टीका झाली. म्हणून 'टीका कशाबद्दल?' हे मला महत्त्वाचं वाटतं.

मग असं होतंय का की आपल्या मनात तेंडूलकरांबद्दल एक इमेज आहे. आणी त्या चौकटीला धक्का लागतोय याचा आपल्याला त्रास होतोय? <<<
खूपच घोळ घालताय की.

जनमानसात नाना फडणवीसाची जी इमेज होती त्यापेक्षा वेगळी बाजू (जी वास्तवाला धरूनच होती पण प्रचलित नव्हती) ती पुढे आणली म्हणून टिका झाली.

तेंडुलकरांची इमेज त्यांच्या लिखाणातून आहे. त्यांचे मूळ लिखाण आणि आणि त्याच्याशी पूर्णपणे फटकून असलेली सिरीयल यामधल्या फरकामुळे टिका

हे एकच कसे धरता येईल?

पिग्मॆलियन ते माय फेअर लेडी ही टिका आणि सध्याची टिका यात प्रचंड फरक आहे हे लक्षात न घेता केवळ टिका केली म्हणून झोडपत रहाणे यात काहीच अर्थ दिसत नाही.

आधारित याचा अर्थ जे काही बदल असतील ते मूळ कथानकाला, पॅथॉसला धक्का न लावता केले गेले पाहिजेत. त्याला धक्का लावला तर आधारित असण्याला काहीही अर्थ उरत नाही.

त्यामुळे जे काय चाललंय ते 'कमला' नाही हे उघड आहे. तर मग तिथे तेंडुलकरांचे नाव वापरायचे कारण काय?

इतके गचाळ नाही लिहायचे तेंडुलकर.

मी "नवीन कमला" मालिका पाहिली नाही. त्यामुळे कथानकातले सगळे बदल (किंवा कुठलेच बदल) मला माहिती नाही.
मला इतकेच वाटते, जेंव्हा आधारित म्हटले जाते तेंव्हा त्यात हवे ते बदल करण्याचे स्वातंत्र्य नवीन कलाकाराला असते कारण आधारित म्हणजे किती गाभा ठेवायचा आणि किती नाही याचे सर्वमान्य निकष नाहीत.

अजय,

मला तेंडुलकर आणि त्यांचं साहित्य याविषयी फारशी माहिती नाही. नाट्यचळवळ देखील फारशी माहीत नाही. तुमचे संदेश पटतात. पण इतरांचंही बरोबर वाटतं. तर सुरुवात म्हणून एक विचारतो.

लेखाच्या शीर्षकातल्या 'आम्ही' या शब्दाची ओळख आणि व्याप्ती काय आहे? केवळ तुम्ही, की तुमच्यासारखे समविचारी, की तेंडुलकरांचे चाहते, की संपूर्ण मराठी वाचकवर्ग? माझ्या तुटपुंज्या माहितीच्या आधारे आकलन करू पाहतो आहे. कितपत जमेल याची शंका आहे. जमल्यास मदत करणे. Happy

अ.न.,
-गा.पै.

Pages