आयुष्याशी नक्की काय देवाणघेवाण करायची आहे, हा व्यवहार न समजलेल्या तीन मित्रांची कहाणी झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये दाखवली होती.
'जो अपनी आंखों में हैरानियाँ ले के चल रहें हो, तो जिंदा हो तुम
दिलों में तुम अपनी बेताबियाँ ले के चल रहें हो, तो जिंदा हो तुम'
ह्या जावेद अख्तर साहेबांच्या ओळींपर्यंत येऊन ती कहाणी थांबली होती. 'दिल धडकने दो'सुद्धा इथेच, ह्या ओळींच्या आसपासच आणून सोडतो.
१९७८ च्या 'गमन' मधील गझलेत 'शहरयार'नी म्हटलं होतं, 'दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूंढें!' बरोबर आहे. 'धडकना' हा तर दिलाचा स्थायी भाव. मात्र आजकाल स्वप्नं, अपेक्षा, जबाबदाऱ्या वगैरेंच्या रेट्यामुळे आपण आपल्याच 'दिला'ला आपल्याच छातीतल्या कुठल्याश्या कोपऱ्यात इतके लोटतो की त्याला धडकण्यासाठी 'अॅण्टी अँग्झायटी' औषधी गोळ्यांची उधारीची ताकद द्यायला लागते, 'कमल मेहरा'प्रमाणे.
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' ही तीन मित्रांची कहाणी होती आणि 'दिल धडकने दो' मध्ये आहेत तीन जोड्या. कमल मेहरा (अनिल कपूर) आणि नीलम (शेफाली शाह), कमल-नीलमची मुलगी 'आयेशा मेहरा' (प्रियांका चोप्रा) आणि तिचा नवरा 'मानव' (राहुल बोस) आणि कमल-नीलमचा मुलगा कबीर (रणवीर सिंग) आणि त्याचं प्रेम 'फराह अली' (अनुष्का शर्मा). कमल एक श्रीमंत उद्योगपती आहे. स्वत:च्या लग्नाचा ३० वा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने डबघाईला आलेल्या धंद्याला नवसंजीवनी देण्यासाठी काही व्यावसायिक मित्रांना एकत्र आणून, कुटुंब व जवळचे नातेवाईक ह्यांना घेऊन युरोपात क्रुझ ट्रीपचा प्लान तो बनवतो. ह्या 'फॅमिली-ट्रीप-मेड-पब्लिक' मध्ये मेहरा कुटुंबातले काही छुपे आणि काही खुली गुपितं असलेले प्रॉब्लेम्स समोर येतात आणि त्यापासून दूर पळणंही शक्य होत नाही. ते त्यांचा सामना करतात आणि ही क्रुझ ट्रीप त्यांना एका आनंदी शेवटाकडे पोहोचवते.
ती तशी पोहोचवणार आहे, हे आपल्याला माहित असतं का ? नक्कीच असतं. पण तरी पूर्ण पावणे तीन तास दिल 'मनापासून' धडकत राहतं !
'दिल धडकने दो' ची कहाणी खरं तर चोप्रा आणि बडजात्यांच्या पठडीची आहे. त्यांना 'जी ले अपनी जिंदगी' किंवा 'बचा ले अपने प्यार को' वगैरेसारखे डायलॉग इथे यथेच्छ झोडता आले असते. पण कौटुंबिक नाट्य असलं तरी त्याला संयतपणे हाताळलं असल्याने 'झोया अख्तर' टच वेगळा ठरतो. तगडी स्टारकास्ट असल्यावर चित्रपट भरकटत जातो, असा अनेक वेळचा अनुभव आहे. पण तसं होत नाही. बिनधास्त तरुणाईच्या विचारशक्तीच्या सक्षमतेवरचा नितांत विश्वास झोयाच्या सर्वच चित्रपटांत दिसून आलेला आहे. तो इथेही दिसतो, त्यामुळे मनाने तरुण असलेल्या प्रत्येकाला 'दिल धडकने दो' आवडला नाही, तरच नवल !
उद्योगपतींच्या मुलांकडून, त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी खांद्यावर घेण्याची अपेक्षा खूप सुरुवातीपासून केली जाते. हा दबाव असा असतो की बहुतेक वेळी त्या मुलाला काही दुसरं करायचं असेल, तरी आपल्या इच्छांना मुरड घालावी लागते. 'कबीर'कडे एक मोठा व्यवसाय सांभाळायची कुवत आणि ते करायची इच्छाही नसते, ह्याची त्याला पदोपदी जाणीव होत असतानाही तो काही करू शकत नसतो. 'रणवीर सिंग' हा माझ्या मते एक साधारण क्षमतेचा, सामान्य चेहऱ्याचा कामचलाऊ नट आहे. पण 'कबीर'चं स्वत:शीच चाललेलं हे द्वंद्व त्याने चांगलं साकारलं आहे.
कबीरचा सगळ्यात जवळचा मित्र त्याचा लाडका कुत्रा 'प्लुटो'सुद्धा अनेक ठिकाणी सुंदर हावभाव दाखवतो ! त्याला आमिर खानने आवाज दिला आहे. जावेद अख्तर साहेबांच्या शब्दांना आमिरने उत्तम न्याय दिला आहे.
'अनुष्का शर्मा'ने, 'NH10', 'बॉम्बे वेलवेट' नंतर अजून एक दमदार सादरीकरण केलं आहे. स्वतंत्र विचारांची व ओतप्रोत आत्मविश्वास असणारी 'फराह' उभी करताना, उथळपणा व अतिआत्मविश्वास दिसण्याचा धोका होता. मात्र ह्यातली सीमारेषा व्यवस्थित ओळखून, कुठेही तिचं उल्लंघन न करता तिने आपली छाप सोडली आहे.
प्रियांकाची 'आयेशा'सुद्धा एक स्वयंपूर्ण स्त्री आहे. लग्न झाल्यावर, कुणाच्याही आधाराशिवाय संपूर्णपणे स्वत:च्या हिंमतीच्या व मेहनतीच्या जोरावर तिने तिचं स्वत:चं व्यवसायविश्व निर्माण केलेलं असतं. एक कर्तबगार स्त्री असूनही, केवळ एक 'स्त्री' असल्यामुळे तिच्यासोबत सासू, पती व आई-वडिलांकडून होणारा दुजाभाव आणि तो सहन करून प्रत्येक नात्याला पूर्ण न्याय देण्याचा तिचा प्रामाणिक प्रयत्न, त्यातून येणारं नैराश्य, त्यावर मात करून पुन्हा पुन्हा उभी राहणारी तिच्यातली मुलगी, पत्नी, सून, मैत्रीण तिने सुंदर साकारली आहे.
राहुल बोस आणि फरहान अख्तरला विशेष काम नाही. त्यातही राहुल बोसच्या भूमिकेला जराशी लांबी आहे. पण का कुणास ठाऊक तो सगळ्यांमध्ये मिसफिटच वाटत राहतो. कदाचित कहाणीचीही हीच मागणी आहे, त्यामुळे ह्या मिसफिट असण्या व दिसण्याबद्दल आपण त्याला दाद देऊ शकतो !
'शेफाली शाह'ची 'नीलम' प्रत्येक फ्रेमच्या एका कोपऱ्यात स्वत:ची स्वाक्षरी करून जाते ! तिचा वावर इतका सहज आहे की तिने स्वत:लाच साकार केलं असावं की काय असं वाटतं. मानसिक दबाव वाढल्यावर बकाबका केकचे तुकडे तोंडात कोंबतानाचा तिचा एक छोटासा प्रसंग आहे. त्या काही सेकंदांत तिने दाखवलेली चलबिचल अवस्था केवळ लाजवाब !
'अनिल कपूर' मेहरा कुटुंबाचा प्रमुख दाखवला आहे. तो ह्या स्टारकास्टचाही प्रमुख ठरतो. त्याच्या कमल मेहरासाठी पुरेसे स्तुतीचे शब्द माझ्याकडे नाहीत. मी फक्त मनातल्या मनात त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या ! एका प्रसंगात आयेशाशी बोलताना आक्रमकपणे आवाज चढवून तो थयथयाट करतो. सहसा, असा तमाशा करताना कुणी उभं राहील, इथे-तिथे फेऱ्या मारेल, अंगावर धावून जाईल. पण हा माणूस खुर्चीत बसून आरडाओरडा करतो ! दुसऱ्या एका प्रसंगात मोबाईलवर बोलता बोलता त्याची नजर नको तिथे पडते आणि मग त्या व्यक्तींपासून लपण्यासाठी तो झाडामागे जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. ती दोन-पाच क्षणांची धावपळ त्याने जबरदस्त केली आहे.
फरहान अख्तर आणि जावेद अख्तरलिखित संवाद चुरचुरीत आहेत. अनेक जागी वनलायनर्स, पंचेस आणि शब्दखेळ करून तसेच काही ठिकाणी वजनदारपणा देऊन हे संवाद जान आणतात.
अनेक चित्रपटांनंतर चित्रपटातलं 'संगीत' चांगलं जमून आलेलं आहे. 'गर्ल्स लाईक टू स्विंग' आणि 'धक धक धक धक धडके ये दिल' ही गाणी तर छानच ! 'धक धक धक धक धडके ये दिल' हे अख्खं गाणं एका सलग 'शॉट'मध्ये चित्रित करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. ते निव्वळ अफलातून वाटलं !
शेवट थोडा अतिरंजित झाला असला, तरी एरव्ही 'दिल धडकने दो' वास्तवाची कास सोडत नाही.
ह्या आधीच्या चित्रपटांमुळे झोया अख्तरवर 'उच्चभ्रूंच्या मनोरंजनासाठी चित्रपट बनवणारी' असा शिक्का बसलेला असावा, 'दिल धडकने दो' हा शिक्का अजून गडद करेल. पण हेसुद्धा एक आयुष्य आहे आणि ते नक्कीच बघण्यासारखं आहेच. कारण कोपऱ्यात लोटल्या गेलेल्या दिलाला इथे एक 'धड़कने का बहाना' नक्कीच मिळतो.
रेटिंग - * * * *
http://www.ranjeetparadkar.com/2015/06/movie-review-dil-dhadakne-do.html
हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज ०७ जून २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-
'रणवीर सिंग' हा माझ्या मते एक
'रणवीर सिंग' हा माझ्या मते एक साधारण क्षमतेचा, सामान्य चेहऱ्याचा कामचलाऊ नट आहे. >>> निषेधच हो !!
जाऊ द्या, हा व्हिडीयो बघा. अगदी साधारण आहे पण (बोल्ड, अंडरलाईन्ड पण) कसला एंगेजिंग आहे!
https://www.youtube.com/watch?v=87fGylfQxKQ
@सीमंतिनी, 'रणवीर सिंग' हा
@सीमंतिनी,
'रणवीर सिंग' हा माझ्या मते एक साधारण क्षमतेचा, सामान्य चेहऱ्याचा कामचलाऊ नट आहे.
हे सगळे व्हिडीओ पाहिलेत मी. तो उत्तमरित्या माकडचाळे करू शकतो, हे.मा.वै.म. !!
मी थोडी म्हणल हे तुमच्या
मी थोडी म्हणल हे तुमच्या शेजार्यांचे मत आहे! तुमच्याच वर्तमानकालीन मताचा निषेध केला. पुन्हा हे तुमचे मत आहे सांगण्यात काय मतलब?? तुमचे मत तुम्ही कशाच्या आधारावर बनवले हे सविस्तर सांगितले तर चर्चा पुढे सरकते. चर्चा नको असेल तर सोशल साईटसवर लेख कशाला द्यायच? प्रिंट मिडीयातच ठेवलेला बरा की मग.
आज हे मत आहे, भविष्यात बदलेल अशी आशा करते. पण मी दिलेल्या व्हिडियोत फक्त माकडचाळे दिसले असतील तर....
रणवीर सिंगबाबत माझेही असेच मत
रणवीर सिंगबाबत माझेही असेच मत आहे.
मला तो क्रिकेट टीममधील रवींद्र जडेजा वाटतो.
अगदीच टुकार खेळाडू नाही पण फार तीसमारखानही नाही. अगदी वशिल्यानेच संघात आला असेही म्हणता येत नाही पण बस्स कप्तानचा लाडका असल्याने गरजेपेक्षा जास्त कौतुक आणि भाव मिळतो.
अनिल कपूरबद्दल ऐकून बरे वाटले. अमिताभनंतर आता मीच सुपर्रस्टार असे एकेकाळी त्यालाही वाटले असावे, पण सुपरस्टार बनायला स्टारडमपेक्षाही आणखी काही वेगळे लागते ते त्याच्यात नसल्याने ते नाही झाले.
शेफाली ही एक कमालीचे पोटेन्शिअल असलेली अभिनेत्री आहे पण ते ती सातत्याने वापरत का नाही याचे आश्चर्य वाटते. किंवा इथे खरे दिग्दर्शकाचे कसब असते.
प्रियांका चोप्रा, हिच्या तर सर्वच गोष्टींचा मी फॅन आहे. एकेकाळी माझे क्रश होती. आता तिचे ते वय गेले, पण उच्चकोटीच्या अभिनयाच्या जिवावर ही कायम एक लंबी रेस की घोडी राहणार.
अनुष्का शर्मा म्हटले की हल्ली बहुसंख्य क्रिकेटप्रेमींना विराटच आठवतो. दुर्दैवी असले तरी खरे आहे. यात तिची चूक नाही तरी उत्तमोत्तम भुमिका वठवून देखील वेगळी ओळख निर्माण करणे तिला जरा जड जातेय.
फरहान अख्तरला चित्रपटात भावखाऊ रोल नाही याचे मात्र अंमळ आश्चर्य वाटले. गुणी अभिनेता, पण समहाऊ मला त्याची स्टाईल नाही आवडत. रॉकऑन वगळता इतर कुठे फारसा भावला नाही.
असो, चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास
हा चित्रपट आवडेल की नाही सांगता येत नाही, मुळात बघायची तुर्तास फार इच्छा नाही, याचे कारण दुसर्या धाग्यावर लिहिले आहेच.
इथे वेगळ्या भाषेत सांगायचे तर मला उच्चभ्रू अन हायफंडू लोकांच्या प्रॉब्लेमशी रिलेट करता येत नाही वा ते फारसे समजतही नाहीत. या लोकांचा बेसिक प्रॉब्लेम हा असतो की यांना पैसा व प्रसिद्धी सोडायचीही नसते. खाऊच्या बरणीत हात अडकलेल्या माकडाची कथा असते. आणि ती तेव्हाच रिलेट होते जेव्हा ते माकड आपल्यासारखेच असेल.
चर्चा नको, असं नाही हो ! आता
चर्चा नको, असं नाही हो !
आता कशावरून बनवले म्हणाल तर त्याचा एकंदर वावर पाहूनच. त्याचे चित्रपट, विविध व्हिडीओज पाहूनच. मला तो साधारण कुवतीचाच वाटतो. काहीच विशेष असं त्यात दिसत नाही.
(आता मला हापूस सोडून दुसरा आंबा आवडत नाही, तर का आवडत नाही ह्याला काही उत्तर असत नाही ना ? ह्याचा अर्थ असाही नाही की मी इतर प्रकारचे आंबे खाल्लेच नाहीत !
)
सीमंतिनी सहमत, सोशलसाईटवर
सीमंतिनी सहमत, सोशलसाईटवर आपले मत देताना ते माझे मत आहे लिहून त्यावर चर्चा घडू न देणे यामागे काही लॉजिक नाही. असो. हा स्वतंत्र विषय आहे.
सगळे तुमचे मत असते. सार्वजनिक
सगळे तुमचे मत असते. सार्वजनिक फोरम वर मांडतात तेव्हा तुमच्या मतांवर प्रतिक्रिया येणारच. ते मत का असे आहे हे सांगण्याची जवाबदारी धागाकर्त्यावर असते. नुसते माझे मत आहे म्हणून सोडून देणे पटले नाही.
रणवीर सिंग मलाही नेहमीच
रणवीर सिंग मलाही नेहमीच ओवर्हाइप्ड वाटलायं
ऋन्मेऽऽष, महाराज आपण कोण
ऋन्मेऽऽष,
महाराज आपण कोण आहात, काय आहात मला माहित नाही. आपली काहीच माहिती उपलब्ध नाही. पण मी मात्र सोशल नेटवर्किंगवरच्या चर्चा कोळून प्यायलेलो आहे, ह्याबाबत संशयसुद्धा ठेवू नका.
इथे चर्चा करताना 'नेहमीच दुसऱ्याला त्याचं मत असण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याच्या मताचा व अधिकाराचा पूर्ण सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे' ह्याचं भान ठेवणं आवश्यक असतं. म्हणून 'माझे मत', 'वै. म.' असं लिहावं लागतं. जेणेकरून आपण आपला अधिकार सिक्युअर करतो आणि कर्तव्यपालनासाठी तयार असल्याचं दाखवून देतो.
अवांतर फार होऊन अॅडमीनने सूचना देण्याआधी इथेच थांबतो.
धन्यवाद !
आवडला पिक्चर. व्यावसायिक
आवडला पिक्चर. व्यावसायिक राहूनही जितकं वेगळेपण जपता येईल तितकं जपलंय.
अनिल कपूर, शेफाली छायाने जबरदस्त काम केलंय आणि प्रियांकानेही. दोघींनी अनेक ठिकाणी केवळ मुद्राभिनयाने वाह म्हणायला भाग पडले.
Anniversary पार्टीआधी शेफाली सजून आरशासमोर असते आणि अनिल कपूर तिला न बघता केवळ स्वतःचे केस सारखे करून बाहेर जातो त्यावेळचे तिचे भाव प्रभावी.
रणवीर सिंग कामाव्यतिरिक्त चाळे करतो पण काम फार समरसतेने करतो असे मला वाटते. भूमिकेचा बाऊ न करता स्वतःचे बेस्ट देणे त्याला चांगले जमते, पूर्वी क्रिकेटमध्ये सहवाग करायचा तसे काहीसे.
अनुष्का आणि दीपिका या आपल्या बरोबरीच्या नायिकांना मागे सोडत निघाल्यात. फार सहज वावर आहे अनुष्काचा.
बँड बाजा बरातप्रमाणे यातही अनुष्का रणवीर केमिस्ट्री मस्त वाटली.
जमलेला पिक्चर.
रसप, प्रत्येकाचे आपले
रसप,
प्रत्येकाचे आपले वैयक्तिक मत असणे आणि त्याचा आदर करणे हे बेसिक आणि बाय डिफॉल्ट गोष्टी झाल्या.
त्यावेगळे झाले तर आपण जरूर आक्षेप नोंदवा.
पण आपण बरेचदा "हे माझे वैयक्तिक मत आहे" हे बोल्ड करून लिहिता किंबहुना मागे एका लेखातही खाली तश्या तळटीपा टाकलेल्या ज्या चुकीच्या सिग्नल देतात. तुम्ही तुमचे मत खोडलेले स्पोर्टींगली घेउ शकत नाही आणि समोरच्याला तोडता असे काहीसे वाटते. तुमचा तसा हेतू नसला तरी तसे समोरच्याला वाटू शकते हे नम्रपणे नमूद करू इच्छितो. मी कदाचित अर्थ काढण्यात चुकतही असेन पण मी आपले प्रत्येक परीक्षण आवडीने वाचतो, आणि त्या नात्याने आपला हितचिंतकच आहे याची खात्री बाळगा.
>> पण आपण बरेचदा "हे माझे
>> पण आपण बरेचदा "हे माझे वैयक्तिक मत आहे" हे बोल्ड करून लिहिता किंबहुना मागे एका लेखातही खाली तश्या तळटीपा टाकलेल्या ज्या चुकीच्या सिग्नल देतात. <<
साफ चूक !
१. मी कधीच असं 'बोल्ड' करून लिहिलेलं नाही. आज प्रथमच केलं आहे.
२. मी अश्या तळटीपा माझ्या गझलांखाली टाकल्या होत्या, त्या आदरणीय प्रोफेसर देवपूरकर ह्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी. पण सिनेपरीक्षणाखाली अश्या टीपा दिल्याचे स्मरणात नाही.
>> तुम्ही तुमचे मत खोडलेले स्पोर्टींगली घेउ शकत नाही आणि समोरच्याला तोडता असे काहीसे वाटते. <<
मी जेव्हा अजाण बालक होतो, तेव्हा माझ्याकडून असे घडले असण्याची शक्यता आहे. पण आता एका अजाण बालकाचा बाप झाल्यामुळे मी सुजाण होण्याचा प्रयत्न करतो आहे, विश्वास ठेवावा !
(हा मात्र खरोखर शेवटचा प्रतिसाद, बरं का? ह्यानंतर काही संवाद साधायचा असल्यास विपुत भेटू. इथे विषयाला धरूनच बोलावे.)
धन्यवाद !
Chhan lihiley. SagaLe
Chhan lihiley. SagaLe aavaDate kalakar aahet. TyanchyasaThee baghenach
छान परीक्षण. शेफाली छाया
छान परीक्षण. शेफाली छाया तिच्या "बनेगी अपनी बात" कालखंडापासून आवडते.
कदाचित रसप ......तुम्ही या सीरियलचं नाव ऐकलंही नसणार!
असो......पिक्चर बघणार.
शून्याचं महत्व - 'कोर्ट'
शून्याचं महत्व - 'कोर्ट' (Court - Marathi Movie)
http://www.maayboli.com/node/53634
टीप :- प्रस्तुत लेखातील मतं माझी वैयक्तिक मतं आहेत. ती कुणाला पटावीत, अशी माझी अपेक्षा नाही, आग्रह तर नाहीच नाही. म्हणूनच त्यावर मी प्रतिवाद करीनच असेही नाही.ह्या लेखावर, ह्यातील मतांवर टीका करावी. त्यांना विरोध करावा. स्वत:चे वेगळे मत अधिक ठामपणे मांडावे. ह्या सगळ्याने मला आनंद होईल. मात्र उपदेशकाचा वेश चढवू नये. मी कुणावर माझी मतं लादत नसल्याने, माझ्यावर काही लादायचा प्रयत्नही करू नये.
- रणजित पराडकर
.--------;-----------
या विषयावरची माझी देखील ही शेवटची पोस्ट
प्रियांका चोप्रा, हिच्या तर
प्रियांका चोप्रा, हिच्या तर सर्वच गोष्टींचा मी फॅन आहे. एकेकाळी माझे क्रश होती. आता तिचे ते वय गेले,
>>
आणि तुझे काय तेच वय राहीले आहे का? चला यानिमित्ताने माबोला एक मराठी पिटर पॅन मिळाला.
छान परीक्षण रसप . चित्रपट
छान परीक्षण रसप . चित्रपट बघायच्या यादीत आहेच .
ऋन्मेऽऽष, 'कोर्ट' हा
ऋन्मेऽऽष,
'कोर्ट' हा राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित चित्रपट आहे आणि त्यावर मी माझी नापसंतीदर्शक मतं मांडली होती. त्यामुळे तसं स्पष्ट करणं आवश्यक होतं.
कृपया एका उदाहरणावरून सार्वत्रिक निकष काढू नका. 'शितावरून भाताची..' नेहमीच होत नसते ना !
'धडकना' हा तर दिलाचा स्थायी
'धडकना' हा तर दिलाचा स्थायी भाव. मात्र आजकाल स्वप्नं, अपेक्षा, जबाबदाऱ्या वगैरेंच्या रेट्यामुळे आपण आपल्याच 'दिला'ला आपल्याच छातीतल्या कुठल्याश्या कोपऱ्यात इतके लोटतो की त्याला धडकण्यासाठी 'अॅण्टी अँग्झायटी' औषधी गोळ्यांची उधारीची ताकद द्यायला लागते, 'कमल मेहरा'प्रमाणे.
>>> यातले हिन्दी शब्द बाकी मराठि वाक्यरचनेत फारच खटकतायत, उगिच आक्खा पॅराग्राफ जडबन्बाळ झालाय!
'रणवीर सिंग' हा माझ्या मते एक साधारण क्षमतेचा, सामान्य चेहऱ्याचा कामचलाऊ नट आहे>> रिअली?? आय डोन्ट अॅग्री!
रणविर सिंग मलाही नाही आवडत
रणविर सिंग मलाही नाही आवडत त्यासाठी कारण काहीही नाही.
मलाही तो टुकार आणि माकडचाळे करणाराच वाटतो.
परिक्षण आवडलं. लवकरच मूव्ही पहाण्यात येईल.
फरहान अख्तर मला फार फार फार फार फार आवडतो
छान लिहिलंय. आवडलं. (पण ते
छान लिहिलंय. आवडलं.
(पण ते 'छाप सोडली' फारच ऑड वाटतं, ब्वा! मराठीतला शब्दप्रयोग 'छाप पाडणे' असा आहे. बाकी कुणाला नाही जाणवत का हे?)
कबीरचा सगळ्यात जवळचा मित्र
कबीरचा सगळ्यात जवळचा मित्र त्याचा लाडका कुत्रा 'प्लुटो'सुद्धा अनेक ठिकाणी सुंदर हावभाव दाखवतो ! त्याला आमिर खानने आवाज दिला आहे.>>> कोणाला? प्लुटोला?
रणजीत, प्रत्येक वाक्याशी सहमत
रणजीत, प्रत्येक वाक्याशी सहमत आहे. मस्त लिहिलंयस. मला खुप आवडला. खरं तर जिंनामिदोचा सिक्वलही म्हणायला हरकत नसावी.
मी कास्टिंग डायरेक्टर नंदिनी श्रीकांतलाही मोठ्ठं श्रेय देईन. आणि कोरिओग्राफर कुणी सीझर आहे त्या व्यक्तिलाही. इलेक्ट्रिफायिंग डान्सेस आहेत.
झोयाचं प्रेझेंटेशन फारच देखणं असतं आणि त्या सगळ्यात ती विषय हरवू देत नाही हे विशेष.
रसप, तुम्ही किती आंबे खाल्ले
इंफर्मेशन ओव्हरलोडच्या काळात माझ्यासारखे जनरल पब्लिक कंटेंट क्युरेशनसाठी समीक्षकांचा आधार घेते. अशावेळी लोकप्रियतेखातर/ तत्त्व म्हणून केवळ पॉसिटीव्ह मत देणे, किंवा आकसापोटी निगेटीव्ह मत देणे किंवा वैयक्तिक मत देणे हे हेल्पफुल ठरत नाही. सिनेमाचा साधार स्ट्रेंथ-विकनेस अॅनलिसीस करणे हे फायद्याचे ठरते. उदा: रणवीरचा सामान्य चेहरा आहे हे क्षणभर मान्य केले तरी त्या भूमिकेत तो कसा शोभला हे सांगणे गरजेचे. त्याचा चेहरा राम-लीला किंवा बँड-बाजा मध्ये एकदम शोभला. उलट लेडिज वि. रिकी बहलमध्ये चेहर्यापेक्षा त्याच्या हाय एनर्जीवर सिनेमा पेलावा लागला. ह्या सिनेमात तो वाटला का पंजाबी अनिलचा पुत्तर? हो!
ह्या क्षेत्रात पदार्पण झालेच आहे तर आपण फाईन-ग्रेन्ड अॅनलिसीस देत राहाल अशी आशा आहे. वाचकांना निश्चित मदत होते.
मला आवडला सिनेमा, तसा
मला आवडला सिनेमा, तसा घीसापीटा विषय , बर्यापिकी स्लो सुद्द्धा आहे पण मस्तं डॉयलॉग्ज , खास झोया अख्तर टच.. त्यामुळे कसला मस्तं साकारला गेलाय सिनेमा :).


रणवीरसिंग , अनिल कपुर , शेफाली शाह तिघांचा अभिनय फार मस्तं !
कुत्र्याचा अभिनय आणि वापर किती क्युट!
त्यामानाने प्रियांका- अनुष्का कमी पडतात.. अनुष्काचा फार कंटाळा आलाय , डान्सर म्हणून शोभतही नाही..इतक्यत किती सिनेमे आले तिचे बॅक टु बॅक!
फरहान अख्तरच्या लक बाय चान्स मधे इषा शर्वाणि होती, ती असायला हवी होती डान्सर च्या रोल मधे !
प्रियांका आणि अनुष्काला एकत्र पहाताना दोघींपैकी कोणाचा लिपजॉब जास्तं भीषण अशी स्पर्धा दिसते
फरहान अख्तरचा छोटासाच रोल पण काय मस्तं! टोटल फिदा
स्पॉयलरः
त्याचे काही संवाद , काही एक्स्प्रेशन्स तर टाळ्या आहेत अगदी..
जेंव्हा राहुल बोस आणि फरहान ची प्रियांकाचा बेस्ट फ्रेंड अशी ओळख होते, प्रियांका राहुलला सांगते कि तो अमेरिकेला गेला म्हणून काँटॅक्ट नाही राहिला, त्यावेळी फरहानची एक्स्प्रेशन्स कमाल आहेत !
ज्या सीन मधे राहुल बोसच्या " आय अलाउड माय वाइफ" ला तो जे उत्तर देतो, कित्ती सुरेख उत्तर आणि किती जेन्युइन , कळकळीनी बोललाय फरहान , तमाम बायकांनी टाळ्या वाजवल्या थिएटर मधे
शेवटच्या लाइफबोट् ड्राम्याआधी प्रियांका त्याला विचारते , " मेरा इन्तजार करोगे' ? त्यावर फरहान चं उत्तर आणि त्यावेळी त्याचं एक्स्प्रेशन्स .. awww moment !:)
जाऊ द्या, हा व्हिडीयो बघा.
जाऊ द्या, हा व्हिडीयो बघा. अगदी साधारण आहे पण (बोल्ड, अंडरलाईन्ड पण) कसला एंगेजिंग आहे!
https://www.youtube.com/watch?v=87fGylfQxKQ
<<
वॉव झकास आहे ही लिंक सी !!!
यु मेड माय डे .. पहातेय .. नॉस्टॅलजिया.. रणवीर बरोबर डॉयलॉग्ज म्हणतेय मी पण
This guy is so amazing :).
स्पॉयलरला +१ लाख
स्पॉयलरला +१ लाख
थोडा स्लो आहे पण मला आवडला..
थोडा स्लो आहे पण मला आवडला.. नुरीचे ड्रेसेस .. एकुण कपडेपट मस्त!!
स्पाॅयलरला +१
मला आवडला चित्रपट. मस्तं
मला आवडला चित्रपट. मस्तं आहे.
प्लूटोचा आवाज अमिरखानचा होता? तसा वाटला नाही.
मेहरा कुटुंबातल्या प्रत्येकाने मस्तं अभिनय केलाय.
शेवट मात्रं अ आणि अ आहे.
अनुष्काला बघून 'ई...' असं झालं.
प्रियांका आणि अनुष्काचे टोकदार ओठ जाणवून देण्यासाठी विनाकारण लिपकीसेसचे सीन्स घातलेत असे वाटतं.
पण सिनेमा खूप सुंदर शूट केलाय.
क्रूजमधले सीन्स पाहून टायटॅनिकची आठवण येत होती.
स्वतःच्या बिझनेस अस्पिरेशन्ससाठी मुलांच्या व्यक्तिगत आयुष्याचा बळी देणार्या सो कॉल्ड बिजनेसमन फॅमिलीज नेहमी पहात असल्याने तो भाग व्यवस्थितच पटला.
आणि हो, शेफाली छायाला माझ्याकडून फाईव्ह स्टार्स!
पिक्चर चांगलाय अनिल कपूर
पिक्चर चांगलाय
अनिल कपूर अप्रतिमरित्या म्हणतो "बेटा प्लेन चाहिये?"
Pages