धडकने का बहाना - (Movie Review - Dil Dhadakne Do)

Submitted by रसप on 7 June, 2015 - 00:47

आयुष्याशी नक्की काय देवाणघेवाण करायची आहे, हा व्यवहार न समजलेल्या तीन मित्रांची कहाणी झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये दाखवली होती.
'जो अपनी आंखों में हैरानियाँ ले के चल रहें हो, तो जिंदा हो तुम
दिलों में तुम अपनी बेताबियाँ ले के चल रहें हो, तो जिंदा हो तुम'
ह्या जावेद अख्तर साहेबांच्या ओळींपर्यंत येऊन ती कहाणी थांबली होती. 'दिल धडकने दो'सुद्धा इथेच, ह्या ओळींच्या आसपासच आणून सोडतो.

१९७८ च्या 'गमन' मधील गझलेत 'शहरयार'नी म्हटलं होतं, 'दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूंढें!' बरोबर आहे. 'धडकना' हा तर दिलाचा स्थायी भाव. मात्र आजकाल स्वप्नं, अपेक्षा, जबाबदाऱ्या वगैरेंच्या रेट्यामुळे आपण आपल्याच 'दिला'ला आपल्याच छातीतल्या कुठल्याश्या कोपऱ्यात इतके लोटतो की त्याला धडकण्यासाठी 'अ‍ॅण्टी अँग्झायटी' औषधी गोळ्यांची उधारीची ताकद द्यायला लागते, 'कमल मेहरा'प्रमाणे.

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' ही तीन मित्रांची कहाणी होती आणि 'दिल धडकने दो' मध्ये आहेत तीन जोड्या. कमल मेहरा (अनिल कपूर) आणि नीलम (शेफाली शाह), कमल-नीलमची मुलगी 'आयेशा मेहरा' (प्रियांका चोप्रा) आणि तिचा नवरा 'मानव' (राहुल बोस) आणि कमल-नीलमचा मुलगा कबीर (रणवीर सिंग) आणि त्याचं प्रेम 'फराह अली' (अनुष्का शर्मा). कमल एक श्रीमंत उद्योगपती आहे. स्वत:च्या लग्नाचा ३० वा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने डबघाईला आलेल्या धंद्याला नवसंजीवनी देण्यासाठी काही व्यावसायिक मित्रांना एकत्र आणून, कुटुंब व जवळचे नातेवाईक ह्यांना घेऊन युरोपात क्रुझ ट्रीपचा प्लान तो बनवतो. ह्या 'फॅमिली-ट्रीप-मेड-पब्लिक' मध्ये मेहरा कुटुंबातले काही छुपे आणि काही खुली गुपितं असलेले प्रॉब्लेम्स समोर येतात आणि त्यापासून दूर पळणंही शक्य होत नाही. ते त्यांचा सामना करतात आणि ही क्रुझ ट्रीप त्यांना एका आनंदी शेवटाकडे पोहोचवते.

ती तशी पोहोचवणार आहे, हे आपल्याला माहित असतं का ? नक्कीच असतं. पण तरी पूर्ण पावणे तीन तास दिल 'मनापासून' धडकत राहतं !
'दिल धडकने दो' ची कहाणी खरं तर चोप्रा आणि बडजात्यांच्या पठडीची आहे. त्यांना 'जी ले अपनी जिंदगी' किंवा 'बचा ले अपने प्यार को' वगैरेसारखे डायलॉग इथे यथेच्छ झोडता आले असते. पण कौटुंबिक नाट्य असलं तरी त्याला संयतपणे हाताळलं असल्याने 'झोया अख्तर' टच वेगळा ठरतो. तगडी स्टारकास्ट असल्यावर चित्रपट भरकटत जातो, असा अनेक वेळचा अनुभव आहे. पण तसं होत नाही. बिनधास्त तरुणाईच्या विचारशक्तीच्या सक्षमतेवरचा नितांत विश्वास झोयाच्या सर्वच चित्रपटांत दिसून आलेला आहे. तो इथेही दिसतो, त्यामुळे मनाने तरुण असलेल्या प्रत्येकाला 'दिल धडकने दो' आवडला नाही, तरच नवल !

DDD first look_0.jpg

उद्योगपतींच्या मुलांकडून, त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी खांद्यावर घेण्याची अपेक्षा खूप सुरुवातीपासून केली जाते. हा दबाव असा असतो की बहुतेक वेळी त्या मुलाला काही दुसरं करायचं असेल, तरी आपल्या इच्छांना मुरड घालावी लागते. 'कबीर'कडे एक मोठा व्यवसाय सांभाळायची कुवत आणि ते करायची इच्छाही नसते, ह्याची त्याला पदोपदी जाणीव होत असतानाही तो काही करू शकत नसतो. 'रणवीर सिंग' हा माझ्या मते एक साधारण क्षमतेचा, सामान्य चेहऱ्याचा कामचलाऊ नट आहे. पण 'कबीर'चं स्वत:शीच चाललेलं हे द्वंद्व त्याने चांगलं साकारलं आहे.

कबीरचा सगळ्यात जवळचा मित्र त्याचा लाडका कुत्रा 'प्लुटो'सुद्धा अनेक ठिकाणी सुंदर हावभाव दाखवतो ! त्याला आमिर खानने आवाज दिला आहे. जावेद अख्तर साहेबांच्या शब्दांना आमिरने उत्तम न्याय दिला आहे.

'अनुष्का शर्मा'ने, 'NH10', 'बॉम्बे वेलवेट' नंतर अजून एक दमदार सादरीकरण केलं आहे. स्वतंत्र विचारांची व ओतप्रोत आत्मविश्वास असणारी 'फराह' उभी करताना, उथळपणा व अतिआत्मविश्वास दिसण्याचा धोका होता. मात्र ह्यातली सीमारेषा व्यवस्थित ओळखून, कुठेही तिचं उल्लंघन न करता तिने आपली छाप सोडली आहे.

प्रियांकाची 'आयेशा'सुद्धा एक स्वयंपूर्ण स्त्री आहे. लग्न झाल्यावर, कुणाच्याही आधाराशिवाय संपूर्णपणे स्वत:च्या हिंमतीच्या व मेहनतीच्या जोरावर तिने तिचं स्वत:चं व्यवसायविश्व निर्माण केलेलं असतं. एक कर्तबगार स्त्री असूनही, केवळ एक 'स्त्री' असल्यामुळे तिच्यासोबत सासू, पती व आई-वडिलांकडून होणारा दुजाभाव आणि तो सहन करून प्रत्येक नात्याला पूर्ण न्याय देण्याचा तिचा प्रामाणिक प्रयत्न, त्यातून येणारं नैराश्य, त्यावर मात करून पुन्हा पुन्हा उभी राहणारी तिच्यातली मुलगी, पत्नी, सून, मैत्रीण तिने सुंदर साकारली आहे.

राहुल बोस आणि फरहान अख्तरला विशेष काम नाही. त्यातही राहुल बोसच्या भूमिकेला जराशी लांबी आहे. पण का कुणास ठाऊक तो सगळ्यांमध्ये मिसफिटच वाटत राहतो. कदाचित कहाणीचीही हीच मागणी आहे, त्यामुळे ह्या मिसफिट असण्या व दिसण्याबद्दल आपण त्याला दाद देऊ शकतो !

'शेफाली शाह'ची 'नीलम' प्रत्येक फ्रेमच्या एका कोपऱ्यात स्वत:ची स्वाक्षरी करून जाते ! तिचा वावर इतका सहज आहे की तिने स्वत:लाच साकार केलं असावं की काय असं वाटतं. मानसिक दबाव वाढल्यावर बकाबका केकचे तुकडे तोंडात कोंबतानाचा तिचा एक छोटासा प्रसंग आहे. त्या काही सेकंदांत तिने दाखवलेली चलबिचल अवस्था केवळ लाजवाब !

'अनिल कपूर' मेहरा कुटुंबाचा प्रमुख दाखवला आहे. तो ह्या स्टारकास्टचाही प्रमुख ठरतो. त्याच्या कमल मेहरासाठी पुरेसे स्तुतीचे शब्द माझ्याकडे नाहीत. मी फक्त मनातल्या मनात त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या ! एका प्रसंगात आयेशाशी बोलताना आक्रमकपणे आवाज चढवून तो थयथयाट करतो. सहसा, असा तमाशा करताना कुणी उभं राहील, इथे-तिथे फेऱ्या मारेल, अंगावर धावून जाईल. पण हा माणूस खुर्चीत बसून आरडाओरडा करतो ! दुसऱ्या एका प्रसंगात मोबाईलवर बोलता बोलता त्याची नजर नको तिथे पडते आणि मग त्या व्यक्तींपासून लपण्यासाठी तो झाडामागे जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. ती दोन-पाच क्षणांची धावपळ त्याने जबरदस्त केली आहे.

फरहान अख्तर आणि जावेद अख्तरलिखित संवाद चुरचुरीत आहेत. अनेक जागी वनलायनर्स, पंचेस आणि शब्दखेळ करून तसेच काही ठिकाणी वजनदारपणा देऊन हे संवाद जान आणतात.

अनेक चित्रपटांनंतर चित्रपटातलं 'संगीत' चांगलं जमून आलेलं आहे. 'गर्ल्स लाईक टू स्विंग' आणि 'धक धक धक धक धडके ये दिल' ही गाणी तर छानच ! 'धक धक धक धक धडके ये दिल' हे अख्खं गाणं एका सलग 'शॉट'मध्ये चित्रित करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. ते निव्वळ अफलातून वाटलं !

शेवट थोडा अतिरंजित झाला असला, तरी एरव्ही 'दिल धडकने दो' वास्तवाची कास सोडत नाही.
ह्या आधीच्या चित्रपटांमुळे झोया अख्तरवर 'उच्चभ्रूंच्या मनोरंजनासाठी चित्रपट बनवणारी' असा शिक्का बसलेला असावा, 'दिल धडकने दो' हा शिक्का अजून गडद करेल. पण हेसुद्धा एक आयुष्य आहे आणि ते नक्कीच बघण्यासारखं आहेच. कारण कोपऱ्यात लोटल्या गेलेल्या दिलाला इथे एक 'धड़कने का बहाना' नक्कीच मिळतो.

रेटिंग - * * * *

http://www.ranjeetparadkar.com/2015/06/movie-review-dil-dhadakne-do.html

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज ०७ जून २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-

14 - Dil Dhadakne Do - 07-Jun-15.JPG

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ॠ हाच बघा........ कथा आणि पी सी रोल साठी +10000000 मी नाही पाहीला, पैसे संपले तवेमरी त माधवन ला पाहुन;-) Sad

लिहा कसा वाटला ते!!!

मी वाचु शकत नाही,PC गंडलाय......सो

अचानक निघालेल्या व्यक्तीगत आणि महत्वाच्या कामामुळे या विकेंडचा स्लॉट गेला फुकट.. अन्यथा काल रात्री पर्यंत बघायचे नक्की केले होते.. आता बहुतेक पुढच्या विकेंडला जाणे झाल्यास जुरासिक वर्ल्डचा नंबर लावावा लागणार आणि हा राहणारच.. काही का असेना, इथे एवढी चर्चा वाचल्यावर हा बघायचा ऐन मोक्याला राहिला याची चुटपुटच लागली .. Sad

मला आवडला हा पिक्चर. रसप यांचं परीक्षणही चांगलं वाटलं.

अनिल कपूर रॉक्स! आजही त्या ताज्या दमाच्या अ‍ॅक्टर्सना मागे टाकत 'गल्ला गूडीयाँ' मधे तो जे बेभान नाचलाय त्याला तोड नाही. रसपनी परीक्षणात लिहीलेले ते दोन सीन्स खरंच अफलातून केले आहेत त्याने.

शेफाली छाया या आधी इतकी कधीच आवडली नव्हती. पण या सिनेमात लाजवाब परफॉर्मन्स वाटला तिचा.

प्रियांकाचा वावर मस्त आणि कामही छान केलंय. छान कॅरी करते ती स्वतःला.

रणवीर, अनुष्का ठीक वाटले. फरहानला तर इतका स्कोपच नाहीये. सगळ्यात जास्त वाईट कशाचं वाटलं असेल तर ते राहुल बोसचं! वाया घालवलाय त्याला. दुसर्‍या कोणाला घेतलं असतं तरी चाललं असतं असं वाटून गेलं. फक्त मिसफिट दिसण्याकरता इतका गुणी कलाकार वाया का घालवावा?

पिक्चरचं टोटल पॅकेज मस्त! रविवार सत्कारणी लागला Happy

अवगुणी(!) कलाकार घेतला तर तो प्रियांका बरोबर फिट्ट वाटला असता Wink कुणी ना कुणी गुणीच फुकट घालवावा लागणार होता.
प्रियांकाच्या रोलसाठी आधी करीनाला विचारले होते म्हणे. करीना- राहुल बोस चमेली मध्ये हिट पेयर होती. आवडले असते ते दोघे परत एकत्र बघायला.
गल्ला गुडिया + १००

>> प्रियांकाच्या रोलसाठी आधी करीनाला विचारले होते म्हणे. <<

मी पण हे कुठेसं वाचलं किंवा ऐकलं होतं. करीना असणार होती. आणि रणवीर सिंगच्या जागी रणबीर कपूर. करीनाला भाऊ रणबीरसोबत काम करण्यात खूप इंटरेस्ट होता. पण नंतर रणबीरने वेळेअभावी हा सिनेमा सोडला आणि करीनाचाही 'मूड' गेला !
रणवीरऐवजी रणबीरने मजा आणली असती, पण करीनाऐवजी प्रियांका आली, हे चांगलंच झालं. करीना बऱ्याचदा मला 'ओव्हर' वाटते. असो !

(हेही वै.म. च बरं का ? विरोधी मतं आवडतील, पण माथी मारू नका म्हणजे झालं !! Light 1 )

Ranbir Kappor is looking like a spent force now-Besharam, Bombay velvet, Roy etc. Ranveer singh has performed well & looks perferct for this role.

करियर ओरिएंटेड मुलगी एकटीच नव्हे तर एकाकी रहाते हा नवा स्टेरिओटाईप आहे. झोयाने तो केला नाही हे मला विशेष आवडले. +१००००००००

राहुल बोसला मिसफिट दिसण्यासाठीच घेतले गेले बहुतेक.

https://www.youtube.com/watch?v=V1-oSFrPamE

करिना-रणबीर एकदम सही वाटले असते. ती एकटी असेल तेव्हा लाऊड वाटू शकते. पण समदीच कपूर आळीतली मंडळी जमा झाली कि सारं सोबून दिसतंय बगा!!
( रिप्लेस कोणी कोणास केले इन्फो सिनेमाच्या विकीपिडिया पेज वर आहे.)

मंदार डी अनुमोदन> रणवीर कपूरला फारसे काही येत नाही. तो ह्रितिकच आहे. हिम्बो गोरा पंजाबी मुंडा टाइप. खूप ओव्हर रेटेड आहे. रणवीर सिंग आजिबात आवडत नाही पण इथे बरे काम केले आहे. रीडिफ वर कुणी तरी ह्या रणबिर सिंग ला कोणी बॉलिवूडचा रस्ता दाखवला त्याला पोकळ बांबूने मारले पाहिजे अश्या अर्थाचे काही तरी लिहीले आहे आता बाजिरावाच्या व्यक्तिरेखेचे काय करतो कोण जाणे.

बघितला . जाम स्लो वाटला पण बोर नाही झालं

शेफाली छाया या आधी इतकी कधीच आवडली नव्हती. पण या सिनेमात लाजवाब परफॉर्मन्स वाटला तिचा >>> कोण शेफाली छाया ???? पूर्ण वेळ ती नीलम मेहरा च वाटली . बाकीचे कधी अनिल कपूर कधी प्रियन्का कधी अनुश्का वाटतात , ती फक्त नीलू Happy

परमीत सेठी चा ललित सूद हॅन्डसम .

काही काही पंचेस केवळ मस्त .

बटर नाईफ वाला सीन जाम खुद्कन हसवणारा , रण्वीर सिंग चे एक्स्प्रेश्न आणि आवाजाचा टोन जबरी.
काही सीन्स केवळ एक्स्प्रेश्नस नी मस्त घेतले आहेत .

हॉस्पिटल रूम मध्ये शेवटी जेन्व्हा कबीर त्याचे प्लॅन्स सान्गतो , तेन्व्हा प्रियांकाचे मोठे डोळे ,बाकी दोघांचे फ्रीझ चेहरे , नंतर जेन्व्हा कबीर खुर्ची घेउन बसतो तेन्व्हा ईतके वेळ उभी असलेली आयेशा हळूच टेबलावर सरकून बसते , मस्तच .

पण दिग्दर्शनात सिनेमा अपुरा पडतो अनेकदा हे का? असे उगाच वाटते. ( ते वाटण्याचे कारण झोयाचा सिनेमा हे आहे) उदा. ती नुरी बेशुद्ध पडण्याची (शेवटी) काय गरज होती? म्हणजे त्यातून काय साधले

ते आधीच ठरलेले असते ना, रणवीर तिला नाकारणार आणि मग अतिशय दु:खात असलेल्या तिला राणा येऊन सावरणार आणि तिच्या फॅमिलीचे मन जिंकणार. नंतर शेवटच्या दृष्याआधीही रणवीर नुरीला भेटुन आता तु तयार राहा म्हणुन सांगतो. आणि मग नंअर प्लॅननुसार त्याचे संवाद म्हणतो पण नुरीच्या लक्षात येत नाही, मग तो "तो" संवाद परत एकदा तिच्याकडे बघुन ठासुन म्हणतो तेव्हा तिच्या लक्षात येते आणि ती लगेच "बेशुद्ध" पडते. बेशुद्ध पडल्यावरही तिला हसु आवरत नसते. राणा तिला उचलुन वाराबिरा घालायला लागतो आणि मग ती अशी दु:खाने बेशुद्ध पडलेली पाहुन राणाचा बाबा तिला गोड मुलगी म्हणतो आणि रणवीरला शिव्या घालतो त्यावरुन आपण समजायचे की तो पुढे जाऊन तिला सुन म्हणुन स्विकारणार आणि हा मोठ्या प्लॅनमधला एक छोटा प्लॅन यशस्वी होणार. नाहीतर त्यांची फॅमिली हिस्टरी लक्षात घेता नुरी-राणा ह्या लव्हबर्डची जोडी जुळणे अशक्य होते.

बेशुद्ध पडल्यावरही तिला हसु आवरत नसते >>> आणि नंतर रणवीर जो गोंधळ घालतो तेन्व्हा तीही पटकन उठुन बसते आणि मग सगळ्यान्च्या लक्षात येत तसं परत चक्कर येउन पडते ही ! Happy

मला हॉस्पिटल आणि तो शेवटचा हे दोन्ही सिन्स जबरी आवडले. हॉस्पिटलच्या सिनमध्ये रणविर खुर्ची घेऊन बसतो तेही अफाट आहे. शेवटाची धावपळ मी केवळ फार्सिकल म्हणुन पाहिली आणि म्हणुन खुप एऩ्ऑय करु शकले. मजा आली खुप.

चित्रपट अध्येमध्ये रेंगाळतो विषेशतः अनुष्का आणि रणविरचे सिन्स खुप कंटाळा आणतात कारण कथा पुढे घेऊन जायला त्या दोघांच्या उपकथानकाची अजिबात मदत होत नाही. अगदी रणवीर-नुरी जोडी जमवायची भानगडसुद्धा अनुष्कामुळे फसते असे दाखवलेले नाही. ती भानगद अनुष्का नसती तरीही तेवढीच फसली असती. पण त्या दोघांचे जिममधले गाणे बघायला खुप आवडले. गाण्याची सुरवात अगदी मस्त केलीय.

पण बाकी सारे सिन्स अगदी लहान लहान असले तरी खुप मजा आणतात. दिव्या सेठचे एक्ष्प्रेशन्स बघण्यालायक.

चित्रपट पाहिला , थोडा वेगळा आहे म्हणून आवडला... शेवटची पाच मिनिटे बॉलीवूड केले पण बाकीचा बघायला छान होता...

पिक्चर आवडला. वेगवेगळी नातीसंबंध मस्त दाखवली.

मला बहिण-भावाचे (रणविर आणि प्रियांका) आणि मुलगी-वडिलाचे (प्रियांका आणि अनिल) सीन्स आवड्ले.

आमिरचा (प्लुटो) आवाज मध्ये मध्ये पीकेसारखा वाट्ला.

मी चित्रपट नाही बघितला, पण ते गर्ल्स वाँट टू गाणे यू ट्यूबवर बघितले. त्या गाण्याची सुरवात अगदी तंतोतंत शिकागो मधल्या शेवटच्या नाचावर बेतलीय ( रेने आणि कॅथरीनचा एकत्र नाच ) का असे करतात ?

अनुष्का एरवी अभिनेत्री म्हणून आवडत असली तरी नर्तिका म्हणून फारच थिटी वाटते. ( त्यापेक्षा रणवीर नर्तक म्हणून शोभला असता ) तिच्या जागी कतरीना हवी होती.

अखेरीस पाहिला आणि आवडला. खूप एन्जॉय केला मूव्ही. प्रियांका, रणवीर आणि शेफाली अतिशय चपखल. इन फॅक्ट रणवीर सिंग वॉज अ सर्प्राईज! तो एरवी ओव्हर द टॉप, लाऊड वाटतो, पण कबीरच्या भूमिकेत अगदी फिट्ट. फारच आवडला. त्याचे संवादही भारी आहेत. प्रियांकाची आयेशाची भूमिका लिहिलीच आहे फार सुंदर. तिने निभावली आहे अगदी मस्त. फरहानला संवादांसाठी पूर्ण मार्क. अनिल कपूर ओव्हररेटेड, ब्रूनो एकदमच गोड! इतकी पात्र असूनही प्रत्येक पात्राला व्यवस्थित न्याय दिला आहे. इथे लिहिलेल्या काही गोष्टींमुळे सिनेमा जास्त एन्जॉय करू शकलो Happy

प्लुटो हाय. लोक ब्रुनो ब्रुनो का करतात कळत नाही. ब्रुनो हे कुत्र्यांचे सार्वजनिक नाव असावे म्हणुन असेल कदाचित (आमच्या शेजारीही एक ब्रुनो आहे)

माझं मत थोडसं नीलिमा आणि केदार सारखं. अनिल, शेफाली मस्त, प्रियांका छान, रणवीर मला आधीच्या मूव्हीज मध्ये आवडलेला खरतर पण ह्या सिनेमात नाही आवडला १-२ सीन्स वगळता.

सिनेमा नाही पाहिला तरी चालेल. फारसं ग्रीस/टर्की पण जाणवलं नाही मला मोठ्या स्क्रीनवर बघून पण.

अधून मधुन कंटाळाच येत होता सिनेमात.

सिनेमा नाही पाहिला तरी चालेल. फारसं ग्रीस/टर्की पण जाणवलं नाही मला मोठ्या स्क्रीनवर बघून पण.

अधून मधुन कंटाळाच येत होता सिनेमात. >> +१०

सिनेमा नाही पाहिला तरी चालेल. फारसं ग्रीस/टर्की पण जाणवलं नाही मला मोठ्या स्क्रीनवर बघून पण.

अधून मधुन कंटाळाच येत होता सिनेमात. >> +१, अधून मधून स्लो... धक्के करुन पुढे न्यावा वाटला. टिव्हीवर बघीतला तरी चालेल असा आहे.
मात्र लोकांची कामं चांगली.

Pages