शून्याचं महत्व - 'कोर्ट' (Court - Marathi Movie)

Submitted by रसप on 23 April, 2015 - 02:09

सेकंद काटा १२ वर आला. घड्याळात ८ वाजून २५ मिनिटं झाली. सेकंद काटा १० वर आला. मी माझी नजर माझ्यासमोर असलेल्या ताटलीतील इडलीच्या शेवटच्या चतकोर तुकड्याकडे वळवली. त्यात काटा खुपसला. सांबारात बुचकळला. दुसऱ्या हातातील चमच्याने छोट्या वाटीतील चटणी घेतली. आधी ओली इडली आणि मग चटणी असं दोन्ही स्वत:च्या तोंडात भरवलं. लहान असताना आईने शिकवलं होतं. प्रत्येक घास ३२ वेळा चावायचा. ३२ मोजले. गिळलं. पाणी प्यायलो. आता घड्याळ्यात ८ वाजून पावणे सव्वीस मिनिटं झाली. मी उठलो. घराबाहेर येऊन माझ्या जुन्याश्या मोटरसायकलला कीका मारल्या. पाच कीका मारल्या. मग चोक दिला. त्यानंतर तिसऱ्या कीकला माझी फटफटी सुरु झाली. हेल्मेटच्या आत नकारात्मक हललेलं माझं डोकं, हेल्मेटसुद्धा हलल्यामुळे समोरच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीत उभं राहून ब्रश करणाऱ्या माणसाने पाहिलं आणि तो हिरवट दाढी वाढलेल्या गालांतल्या गालांत छद्मी हसला.
मग माझी मोटरसायकल ऑफिसच्या दिशेने.. काटा ४५ वर स्थिर...

अरे ऐका ना.. I mean वाचा ना..! माझं रोजचं आयुष्य आहे हे ! ह्यातल्या प्रत्येक डीटेलिंगला महत्व आहे.इडलीचा शेवटा चतकोर तुकडा माझ्या एकटेपणाचं प्रतीक आहे. त्यात घुसणारा काटा, सांबारातली डुबकी आणि चटणीसोबतचं चर्वण हे परिस्थितीच्या अत्याचाराचं प्रतीक आहे. मोटरसायकल चटदिशी चालू होत नाही, चोक दिल्यावरच चालू होते, त्यावर मी डोकं हलवतो, ह्याचा अर्थ मला कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. समोरच्या इमारतीतील मनुष्य माझ्यावर हसतो, तो हरामखोर, विघ्नसंतोषी दुनियेचा चेहरा आहे. हिरवट दाढी वाढलेला ओंगळवाणा. - इत्यादी.
पण तुम्ही हे वाचणार नाही. वाचलंत तरी तुम्हाला हे पटणार नाही. का? कारण हे वाचायला मिळावं ह्यासाठी मी तुमच्याकडून पैसे घेतलेले नाहीत. फुकट आहे ना हे. मग निरर्थकच असणार.

बरं. अर्थपूर्ण बघायचंय? मग जवळच्या चित्रपटगृहात जा. 'कोर्ट'चं तिकीट काढा. त्यातली पात्रं वेगळी आहेत, कथानक(?) सुद्धा वेगळं आहे. पण अभिव्यक्ती वरील परिच्छेदांतलीच. एकदम भारी! आता तुम्ही बरोबरच्या व्यक्तीशी चर्चा कराल - "किती रियालिस्टिक दाखवलंय ना सगळं? ते कोर्टातलं कामकाज तर अगदी जसंच्या तसंच. त्या वकिलांच्या लाईफ स्टाईल्समधला फरक पण छान दाखवलाय. म्हणजे तो पुरुष वकील एकटा राहत असतो. घरात मस्तपैकी दारू पिऊन टुन्न होतो. कधी मित्रांसोबत जाझ बारमध्ये जातो. आणि ती महिला वकील मात्र घरी आल्यावर नवरा-मुलांना स्वयंपाक करून जेवायला वाढते आहे. कधी बाहेर गेलेच तर 'सत्कार' खानावळीत.. वगैरे. सुंदर डीटेलिंग."

असो.
'कोर्ट' ही कहाणी लोकशाहीर नारायण कांबळे ह्या व्यक्तिरेखेची कहाणी नाही. चित्रपटाच्या नावावरूनच ती कशाची कहाणी आहे, हे समजुन यावं. ह्यातलं कोर्ट हे आपण वर्षानुवर्षे, दशकानुदशके, सिनेमानुसिनेमे जसं पडद्यावर पाहत आलो आहोत, तसं अजिबात नाही. खऱ्या कोर्टाची पायरी ज्यांनी चढलेली आहे, त्यांना हे व्यवस्थित माहित आहे की प्रत्यक्षातलं कोर्ट तसं नसतंच, जसं आपण सिनेमा व सिरियलींमधून पाहत असतो. प्रत्यक्षातलं कोर्ट जे मी पाहिलं आहे, ते हुबेहूब दिसलं आहे ते 'कोर्ट' मध्ये. ह्या चित्रपटाशिवाय इतर कुठेही मी कोर्टाचं इतकं अस्सल चित्रण दुसरं पाहिलेलं नाही. इथले वकील न्यायाधीशांच्या उरावर चढून डायलॉग पे डायलॉग, डायलॉग पे डायलॉग मारत नाहीत की इथले न्यायाधीश चित्रगुप्ताच्या पवित्र्यात बसून चेहरा ओढून लांब करून बोजड उर्दूमिश्रित हिंदीत फैसला सुनावत नाहीत. हे सगळं वास्तववादी चित्रण उत्तम जमलं आहे, ह्याबद्दल वादच नाही.

मात्र कोर्ट व नारायण कांबळेंचा विषय बाजूला राहून चित्रपट दोन्ही वकिलांच्या व न्यायाधीशांच्या खाजगी आयुष्याचंही वास्तववादी चित्रण दाखवतो, तेव्हा गोंधळ उडतो. जर कीसच पाडायचा असेल, तर ह्यात बघणाऱ्यानेही कीस पाडायला हवा. स्त्री वकील ट्रेनमधून घरी जाताना सोबतच्या बाईशी साडीबद्दल गप्पा मारते. ते सगळं गॉसिप साहजिकच घरच्यांवर पोहोचतं. तेव्हा वकीलीणबाई नवऱ्याला मधुमेह असल्यामुळे गोड, तेलकट जवळजवळ बंदच केलं आहे घरात आणि नंतर लगेच कोशिंबीरीत वाटीवर फोडणी ओततात ! हा विरोधाभास मुद्दाम दाखवला असेल, जेणेकरून त्या वकीलीणबाईंचा खोटारडेपणा समोर यावा, तर मात्र मानलं ह्या दृष्टीला !

दुसरं म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस किंवा गेंडा वगैरे कसे ढिम्म पडून/ बसून राहतात, तसा कॅमेरा प्रत्येक वेळी एका जागी बद्दकन् पडलेला राहतो. ज्या जागी पडद्यावरील पात्राला पोहोचायचं असतं, त्या जागेच्या बाजूलाच तो कॅमेरा असणार असतो, हे आपल्याला ते पात्र गल्ली/ बोळाच्या अगदी पार दुसऱ्या टोकापासून जेव्हा आत येतं तेव्हाच कळतं.

उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वीचा कोर्टाचा अखेरचा दिवस संपून न्यायाधीश उठून जातात. त्यानंतर एक-एक व्यक्ती न्यायालयातून बाहेर पडत जाते. आपल्याला तेव्हाच कळतं की सगळे बाहेर गेल्यावर एक जण सगळे दिवे एकेक करून बंद करेल, त्या खोलीचं दार लावेल, मग कॅमेरा हलेल. तसंच होतं. फक्त एकच अंदाज चुकतो. दार लावल्यावरही तो कॅमेरा जवळजवळ १०-१२ सेकंद अंधार चिवडत बसतो.

असे १०-१०, १२-१२, २०-२०, ३०-३० सेकंदांचे चिवडे गोळा केले तर सगळा निचरा करून चित्रपट, चित्रपट न राहता टीव्ही मालिकेचा एक भाग झाला असता. ह्यात कांबळेंचा वकील गाडी चालवताना स्टियरिंग व्हील व त्याच्या चेहऱ्यावर रोखलेल्या कॅमेऱ्याचे प्रत्येकी १०-१२ सेकंदांचे दोन शॉट्स, त्याची सुपर मार्केटमधली random खरेदी, तो पोलीस स्टेशनमध्ये जातो तेव्हाचा लांबलचक वॉक, कांबळेंना पोलिसांच्या गाडीतून कोर्टात नेल्यानंतर आवारात कामाची भिक मागणाऱ्या वकिलांचा वावर दाखवणारा शॉट, सगळ्यात शेवटी 'अर्नाळा बीच रिसॉर्ट'मध्ये शिरल्यावर न्यायाधीश महोदयांची दाखवलेली अनेक मिनिटांची अतिकंटाळवाणी सहल इ. अनेक दृश्यं समाविष्ट होऊ शकतात.

'कोर्ट'मधली सर्वोत्तम गोष्ट कुठली असेल तर दोन्ही पोवाडे आणि त्यांचं सादरीकरण. ढवळून काढणारे, चेव चढवणारे शब्द आणि ठसकेबाज सादरीकरण केवळ अप्रतिम आहे. पहिला पोवाडा खूप सुरुवातीला आहे. पण दुसरा बराच नंतर असल्याने तोपर्यंत मरगळ आलेली असते. तो पोवाडा गदागदा हलवून जागं करतो.

court-poster.jpg

अगदी थोडक्यात सांगायचं झालं, तर 'कोर्ट' पाहिल्यावर मला शाळेतल्या परीक्षा आठवल्या. प्रश्न असायचा 'सविस्तर उत्तर द्या.' 'सविस्तर' म्हणजे किमान पानभर तरी झालंच पाहिजे, असं असायचं. मला येणारं उत्तर ३-४ ओळींत संपणारं असायचं. मग मी दोन शब्दांत जागा सोडायचो. एका ओळीत ४-५ च शब्द राहतील, असं पाहायचो. अक्षरसुद्धा जरा मोठं काढायचो आणि अनावश्यक वाक्यं कोंबून लांबी, रुंदी वाढवत न्यायचो. बऱ्याचदा भरायचं अख्खं पान, कधी कधी तर पुढच्या पानावरसुद्धा पोहोचायचो. कधी कधी मात्र इतकं सगळं करूनही पान भरायचं नाही. In any case, चार ओळींच्या उत्तराला मिळाणाऱ्या गुणांपेक्षा अर्धा-एक गुण तर जास्तीचा माझ्या वाट्याला येत असे.
ह्या चित्रपटाला मी रेटिंग वगैरे देणार नाही कारण त्याला आधीच सर्वोच्च रेटिंग मिळालेलं आहे. पण म्हणणं इतकंच आहे की शून्य संकलन, शून्य छायाचित्रण, शून्य पटकथा, शून्य अभिनय अश्या सगळ्या शून्यांच्या आधी फक्त संवेदनशील विषयाचा स्पर्श असलेला '१' आकडा लावला की चढणारं प्रत्येक शून्य हजार/ लाख/ करोडों मोलाचं होतं. शून्याचं महत्व 'कोर्ट'मुळे कळलंय.

- रणजित पराडकर

टीप :- प्रस्तुत लेखातील मतं माझी वैयक्तिक मतं आहेत. ती कुणाला पटावीत, अशी माझी अपेक्षा नाही, आग्रह तर नाहीच नाही. म्हणूनच त्यावर मी प्रतिवाद करीनच असेही नाही.
ह्या लेखावर, ह्यातील मतांवर टीका करावी. त्यांना विरोध करावा. स्वत:चे वेगळे मत अधिक ठामपणे मांडावे. ह्या सगळ्याने मला आनंद होईल. मात्र उपदेशकाचा वेश चढवू नये. मी कुणावर माझी मतं लादत नसल्याने, माझ्यावर काही लादायचा प्रयत्नही करू नये.

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/04/court-marathi-movie.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< ह्या चित्रपटाला मी रेटिंग वगैरे देणार नाही कारण त्याला आधीच सर्वोच्च रेटिंग मिळालेलं आहे. पण म्हणणं इतकंच आहे की शून्य संकलन, शून्य छायाचित्रण, शून्य पटकथा, शून्य अभिनय >>

आणि शून्य प्रेक्षकसंख्या देखील...

http://www.mimarathi.in/content/marathi-movie-court-show-cancel

http://www.loksatta.com/manoranja-news/marathi-movie-court-show-cancelle...

मी पण परवाच पाहिला आणि रसप ने अगदी अचूक परीक्षण केल आहे. शेवटची न्यायाधीशांची ट्रीप कशासाठी दाखवलेय ? अर्नाळा( का कर्नाळा नक्की आठवत नाहीये ) रिसोर्ट नी त्यांना फायनान्स पुरवला असेल का ? क्यामेरा एकाच दृशावर खूप वेळ ठेवण्याच पण प्रयोजन समजलं नाही. आणि शेवट तरी कसा ? काहीच कळल नाही. शेवट कसा करायचा हेच त्यांना समजल नाहीये. काहीही निर्णय किव्वा निदान न काढता एकदम धाडकन संपतो Happy

<<खऱ्या कोर्टाची पायरी ज्यांनी चढलेली आहे, त्यांना हे व्यवस्थित माहित आहे की प्रत्यक्षातलं कोर्ट तसं नसतंच, जसं आपण सिनेमा व सिरियलींमधून पाहत असतो. प्रत्यक्षातलं कोर्ट जे मी पाहिलं आहे, ते हुबेहूब दिसलं आहे ते 'कोर्ट' मध्ये. ह्या चित्रपटाशिवाय इतर कुठेही मी कोर्टाचं इतकं अस्सल चित्रण दुसरं पाहिलेलं नाही >> एवढ मात्र खर शंभर टक्के खर आणि शेवटपर्यत कंटाळा येत नाही हेही खरच Happy

<<शून्य संकलन, शून्य छायाचित्रण, शून्य पटकथा, शून्य अभिनय अश्या सगळ्या शून्यांच्या आधी फक्त संवेदनशील विषयाचा स्पर्श असलेला '१' आकडा लावला की चढणारं प्रत्येक शून्य हजार/ लाख/ करोडों मोलाचं होतं. :)>> आणि यालाही +१००००००००

शेवटचा अर्नाळा बीच प्रसंग तर हायलाईट आहे असे मला वाटले. त्यातले न्या. सदावर्तेंचे आणि त्यांच्या एका
नातेवाईकाचे संवाद ऐकले तर लक्षात येईल की सदावर्तेंचा सामाजिक जीवनातला वावर कसा आहे. नातेवाईकांच्या मुलाला हिअरींग disability आहे, ते त्याला गोमेद का काहीतरी घालायला सांगतात Happy अजून एका प्रसंगात आय टी मधे कसा जास्त पगार आहे ह्याबद्द्ल बोलतात (स्वतः न्यायाधीश असून सुद्धा.. ते म्हणतात ना its not always about money..authority matters.). त्यांचा एकंदर कोर्टामधला वावरपण पुस्तकी प्रोसिजर फॉलो करणे असाच आहे. १००-१५० वर्षांपूर्वीचे कायदे आहेत त्यांचे शब्दशः पालन करण्यात त्यांना धन्यता वाटते. त्यावेळी तो कायदा होता त्याचे intent तेव्हा काय होते आता १५० वर्शांनंतर तो लागू होईल काय? भारतातल्या प्रत्येक कायद्यातल्या प्रत्यके कलमासाठी Statement of Objects and Reason आहे. आज judiciary ची (किमान खालच्या कोर्टामधे तरी) ही अवस्था आहे की कोणी हे तपासून बघण्याची तसदी सुद्धा घेत नाही. कोर्टाने (कोर्ट = न्यायाधीश जसे की ह्या सिनेमात सदावर्ते कोर्ट) किमान त्यांना काय वाटते हे नोंदवणे तरी अपेक्षीत आहे (ज्याला obiter dicta म्हणतात). शेवटचा प्रसंगामधली सदावर्तेंनी मारलेली थप्पड ही जो कोणी झोपलेल्या judiciary ला जागे करेल त्या प्रत्येकाला आहे असे मला तरी वाटले.

अजून एका प्रसंगी व्होरा वकील एक व्याख्यान देत आहे human rights, freedom of speech असा काहिसा विषय आहे. त्याचे व्याख्यान चालू आहे आणि मधेच एक मॅन पंखा घेऊन येतो आणि व्याख्यान interrupt करून स्टेज वरती पंखा लावत बसतो स्मित human rights, freedom of speech स्मित.

एका प्रसंगात सरकारी वकिल म्हणते कोर्ट पण किती चोथा करत आहे ह्या केसचा सरळ त्या कांबळेला २० वर्षे आत टाकायचा, एक केस तरी निकाली लागेल. असा approach जर सरकारी वकिलाचा असेल तर परिस्थीती नक्कीच गंभीर आहे.

खरेतर कांबळे, सदावर्ते आणि सरकारी वकिल ह्यांची भाषा एक, ते एकमेकांच्या समाज जीवनाला ओळ्खतात
(सरकारी वकिलांचे आयुष्य दाखवले आहे त्यावरून हे लक्षात येईल). उलटपक्षी व्होराला कांबळेंची भाषापण येत नाही, त्याचा सामजिक स्तर वरचा आहे, तो जॅझ ऐकतो (गंमत म्हण्जे केस एका पोवाड्याभोवती फिरते), क्लबात जातो पण त्याला ह्युमन राईटस, एखादा कायदा आहे तर तो का आह ई. बाबतीत रस आहे.

कोर्ट माझ्यामते तरी judiciary ला (आणि थोड्या प्रमाणात legislative ला पक्षी parliament जे Victorian आणि draconian laws रद्द करत नाही) एक सणसणीत चपराक आहे. अ मस्ट वॉच.

<< टीप :- प्रस्तुत लेखातील मतं माझी वैयक्तिक मतं आहेत. ती कुणाला पटावीत, अशी माझी अपेक्षा नाही, आग्रह तर नाहीच नाही. म्हणूनच त्यावर मी प्रतिवाद करीनच असेही नाही.
ह्या लेखावर, ह्यातील मतांवर टीका करावी. त्यांना विरोध करावा. स्वत:चे वेगळे मत अधिक ठामपणे मांडावे. ह्या सगळ्याने मला आनंद होईल. मात्र उपदेशकाचा वेश चढवू नये. मी कुणावर माझी मतं लादत नसल्याने, माझ्यावर काही लादायचा प्रयत्नही करू नये. >>

ही टीप प्रचंड आवडली. धागाकर्त्याचा लेखनस्वामित्व हक्क मान्य करुनही ही टीप अगदी तंतोतंत जशीच्या तशी कॉपी पेस्ट करून प्रत्येक लेखाखाली डकविण्याचा प्रचंड मोह होत आहे. विशेषतः काही उतावळ्या व खोडसाळ प्रतिसादकांना (फक्त मायबोलीवरच नव्हे तर इतरही मराठी संकेतस्थळांवरील सर्वच ट्रोल्सबाबत हे मत) यातून योग्य समज मिळेल अशी अपेक्षा आहे.

.

.

हे सगळे तपशील.. ज्याने कोर्टाच्या वार्‍या केल्या आहेत, त्यालाच कळतील. त्या दृष्टीने मला हा चित्रपट बोल्ड वाटतो. भारतात मे. कोर्टाच्या अवमानाबद्दल जे नियम आहेत, ते बघता या चित्रपटाला मान्यता मिळावी याचेच कौतूक वाटतेय मला.

अशा प्रकारच्या चित्रपटात दोन टोकाचे रिव्यु येऊ शकतात. एक ज्याने हा चित्रपट पाहताना प्रत्येक फ्रेममध्ये स्वतः अर्थ शोधलाय व रिव्यु लिहिलाय. आणि दुसरा ज्याने हा अर्थ स्वतः शोधायचे नाकारुन तो अर्थ चित्रात स्वतःच दिसावा ही अपेक्षा ठेवलीय आणि अपेक्षाभंगाचा रिव्यु लिहिलाय. अधल्या मधल्या रिव्युला इथे जागाच नाही :). स्वत्:च अर्थ शोधताना मग एकाच फ्रेमचे अनेकांना वेगवेगळे अर्थ लागु शकतात. भारतात प्रदर्शित होणारे बहुसंख्य चित्रपट दुस-या प्रकारात येतात. पहिल्या प्रकारातले चित्रपट फार कमी येतात इथे. प्रेक्षकांना त्यांची सवय होईपर्यंत दोन टोकाचे रिव्यु येणार. द लंचबॉक्स हाही पहिल्या प्रकारातला चित्रपट होता.

मला हा चित्रपट पाहायला आवडेल. वेळ मिळाल्यास नक्कीच पाहिन.

<<शेवटचा प्रसंगामधली सदावर्तेंनी मारलेली थप्पड ही जो कोणी झोपलेल्या judiciary ला जागे करेल त्या प्रत्येकाला आहे असे मला तरी वाटले.शेवटचा प्रसंगामधली सदावर्तेंनी मारलेली थप्पड ही जो कोणी झोपलेल्या judiciary ला जागे करेल त्या प्रत्येकाला आहे असे मला तरी वाटले.>> ग्रेट लंपन Happy

विचार कितीही चांगले, उच्च, अन थोर मांडा, पण जर ते लोकांपर्यंत पोहोचवताच आले नाहीत तर व्यर्थ आहे.
रटाळ अन संथ चित्रपट कितीही उच्च मूल्य ठेऊन असले तरी मला याच कारणासाठी त्यांचा राग येतो.

अर्थात काही लोकांना असले चित्रपट अपील करू शकतात किंवा त्यांची बौद्धिक वा वैचारीक पातळी तेवढी असते की त्यांना असे चित्रपट झेपावेत.

पण जे आधीच विचारी अन सुज्ञ आहेत बस्स त्यांच्यापर्यंतच आपले विचार पोहोचवणे एवढाच हेतू असावा का?
जर हाच टारगेट ऑडियन्स असेल तर पुन्हा एकदा ते व्यर्थच आहे.

जर कोर्ट हा रटाळ आणि अगम्य असेल तर क्षमस्व!
मी अश्या चित्रपटांना एक चांगला विषय लोकांपर्यंत न पोहोचवताच वाया घालवला असेच म्हणतो.

पुरस्कारांसाठी अभिनंदन आणि शुभेच्छा !

प्रथमच तुमचं परीक्षण अजिबात पटलेले नाही!
मला तरी हा चित्रपट अजिबात कंटाळवाणा वगैरे वाटला नाही, उलट एक सरिअल डार्क कॉमेडी पाहल्यासारखे वाटले. मध्यम वर्गात सामाजिक जबाबदारीबाबत असलेल्या उदासीनतेवर सुद्धा जबरदस्त भाष्य आहे. एकच त्रुटी वाटली कि लांबी थोडी कमी चालली असती; त्याने कदाचित अधिक परिणामकारक झाला असता. पण तुमच्या लेखातील शून्य वगैरे टीका अति/करायची म्हणून केल्यासारखी वाटत आहे.

आज गेलो होतो हो तुमच्या "कोर्टात! "

आजपर्यंत मी पाहिलेल्यातला हा एक अत्यंत वेगळया म्हणजे वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. सगळा चित्रपट म्हणजे कोर्टाशी संबंधीत असलेलं एक रुटीन लाइफच आपण एकत्रित पहातो..या पेक्षा अधिक काहिही नाही. शाहीर पोवाड्यांचे कार्यक्रम करत असतो. एका कार्यक्रमातील एका पोवाड्याच्या काहि ओळी या गटारात जीव दिलेल्या कामगाराने ऐकलेल्या असतात. आणि "कामगारांनो जीव द्या तुम्ही", अश्या त्या ओळींच्या आशयानी प्रेरीत होऊनच त्यानी जीव दिलाय ,असं पोलिस आणि सरकारी वकिलीण बाईचं म्हणणं असतं. ती या गोष्टीला सिद्ध करण्यासाठी आरोपीच्या पूर्वायुष्याचे दाखले केस स्ट्राँग करायला देत असते. आरोपीचा वकिल ते अतीशय मुद्देसूदपणे खोडतंही असतो. यातच ढिसाळ पोलिसी कारभार्,न्यायव्यवस्थेचा साचलेपणा..इत्यादी गोष्टी आपल्याला दिसत रहातात. या सगळ्यात साध्या कोर्टातून पुढच्या कोर्टात येथेपर्यंतचाच प्रवासच दाखविला गेलेला आहे. पुढच्या कोर्टातलं (चारपाच हियरींगपैकी)एक हियरींग संपत. न्यायाधीश पुढची तारीख सुनावतो. कोर्टाचं कामकाज थांबतं .नंतर सगळे उठून निघून जातात. सेवक एकेक लाइट बंद करुन कोर्टरूमचा दरवाजा लाऊन घेतो..आणि निघून जातो. अंधुक प्रकाशातील कोर्टरूम आपल्याला दिसत राहते. नंतर तो न्यायाधीश कोर्ट कामकाजातून सुट्टी मिळाल्यामुळे आपल्या सगळ्या लोकांबरोबर पर्यटन स्थळी ट्रीपला जाण्याचा एक रुटीन प्रसंग येतो. तिथे तो दुसर्‍या दिवशी सकाळी बागेत पेंगत असतो. मुलं येऊन "भ्भो" करतात.मग तो त्यांच्यातल्या एकाला मारतो.. आणि मग संपतो शिनूमा. हा आपल्या सिनेमॅटीक माईंडसेटपच्या बाहेरचा सिनेमा आहे. आणि काहि क्षणांनंतर दिग्दर्शकाचं नाव झळकून चित्रपट संपतो. पुढचा कोर्टकेस अनेक वर्ष लोंबकाळत चालण्याचा भाग आपण कल्पनेनी ओळखायचा.!
संपूर्ण चित्रण पहाताना एकसलग कथा असली तरी आपल्याला ती अत्यंत कंटाळवाणी होऊन जाते. मला वाटतं या न्यायपद्धतीच्या फेर्‍यात अडकल्यानंतर "आपलं काय होऊ शकतं?", याचा जीताजागता अनुभव कुठलाच मीठमसाला न लावता,आणि कसलाही परिणाम-साधायला न जाता,तो दिग्दर्शकानी आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे 'आपण कोर्टकचेरीच्या फेर्‍यात अडकलो,तर आपल्या मनाला ते किती झेपेल?' याचा प्रत्येकाला अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट अगदी आदर्श आहे. आपापल्या पचनशक्तीनुसार याचा प्रत्येक प्रेक्षकाचा अनुभव हा निराळाच होणार..हेच या चित्रपटाचं वेगळेपण आणि यशही आहे. मी आज दुपारी जेंव्हा हा चित्रपट बघितला,तेंव्हा मी बराचसा कंटाळलो. माझ्या हिशेबी मसालेभात खाणार्‍याला आजार्‍याची खिचडी मिळाल्यासारखी गत झाली. काही प्रेक्षक वैतागले..काही उठून गेले..काहि जण कचकाऊन कॉमेंट्स टाकून एंजॉय करून घेऊ लागले.. काहि जण बघूच आता..शेवटी तरी काहि असेल्,म्हणून बसून राहिले. पण शांतपणे पाहून समाधानी मनानी आमच्यापैकी जवळपास एकंही जण उठला नाही! हे या "उत्कृष्ट भारतीय चित्रपट पुरस्कार" विजेत्या चित्रपटाच यश आहे. आंम्हा उत्सवप्रीय भारतीयांना असा चित्रपट,अशी मांडणी मनापासून आवडायला अजून शंभर वर्ष तरी नक्की आहेत.

अतृप्त, साधना आणि लंपन छान लिहीले आहे ..

पिक्चर स्लो वाटू शकतो .. पण मला ती खूपच आवडला आणि अतिशय परिणामकारक वाटला .. सगळ्यांचं काम सुरेख झालं आहे ..

मिळेलही ऑस्कर. मिळाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. ऑस्कर देणारेसुद्धा मानवीच आहेत. काय करतील ह्याचा नेम नाही. 'स्लमडॉग' ला दिला होता की. 'जय हो' हे गाणं म्हणजे रहमानचं 'ऑस्कर'योग्य काम असेल, तर 'कोर्ट'लाही ऑस्कर मिळायलाच हवा.

कोर्ट ने सगळ्या सिनेमांच कोर्ट मार्शल केलं... एकदम ऑस्कर नामांकनासाठी निवड.. तिकडेहि असच घडावं Happy

टुकारातला टुकार सिनेमा ऑस्करला पाठवण्याची परंपरा जपल्याबद्दल संबंधितांचे अभिनंदन Proud

नेहमी उतरंड लावावी असेच काही नाही. समजा बाजू-बाजूला खोल्या (Compartments) करूयात. एका खोलीत्यांना तु हि रे ते वे. बॅक जाम आवडलं असेल... दुसर्‍या खोलीतल्यांना पीकू, मसान बेटर वाटतं असतील... ह्म्म्म तीसरी खोली असूच शकत नाही का?...

टुकारातला टुकार सिनेमा ऑस्करला पाठवण्याची परंपरा जपल्याबद्दल संबंधितांचे अभिनंदन >> खुपचं ठुसठुसतंय?? पर्सनल स्कोर सेटल करताय का बाळाजी? Proud

विठ्ठल, यात पर्सनल स्कोअरचा संबंध नाही. चांगलं ते चांगलं, आणि टुकार ते टुकार. बाकी ठुसठुसतंय हा शब्द वापरून तुम्ही तुमचा स्कोर सेटल करायला बघत आहात ते उघड मात्र झालं. Wink

शब्दाली, तथास्तु !
मी नवीन धागा काढेन Happy
विषय व्यापक आहे.
एका कोर्टापुरता मर्यादीत का ठेवा.

असो, मी अजूनही कोर्ट पाहिला नाही त्यामुळे हा निर्णय चूक की बरोबर हे मी सांगू शकत नाही.

मात्र कोर्ट चित्रपटाशी निगडीत सर्वांचेच मनापासून अभिनंदन आणि ऑस्करसाठी शुभेच्छा Happy

Pages