'प्रकरण' - श्री. सचिन कुंडलकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

आपल्याला वाटत असतं की, आपण रोजचं जगणं अगदी आरामात जगतोय. खातोय. पितोय. हिंडतोय. काम करतोय. एकटे किंवा कुणासोबत. आणि वरती आकाशामध्ये तो ढग येऊन थांबलेला कळतही नाही आपल्याला.

असंच वाटत असतं की, आकाश तर अगदी निरभ्र आहे वरती. कारण खरं म्हणजे गेले अनेक दिवस आपण वर पाहिलेलंच नसतं. पण एकदा कधीतरी नजर वर जाते आणि सगळा मामला लक्षात येतो. आपण प्रेमात पडलो आहोत. पहिल्यांदाच किंवा पुन्हा एकदा.

आता तो ढग दिसल्यानं आपल्याला बरं वाटतं. आपण जाऊ तिथे तो आपल्यासोबत येतोच. सगळी छतं पारदर्शी होतात. रात्री गच्चीवर जावं, गावाबाहेर हायवेवर जावं, कामामध्ये अगदी स्वतःला बुडवून घ्यावं तरी आता नजर सतत वर जायची थांबवता येत नाही. आपल्याला हलकं वाटू लागलं, आपली सवयच बदलते आणि आपण नकळत एकटे असताना हसत बसलेलो असतो. ते आता आपल्या हातात उरलेलं नसतंच. आता प्यायला घेतलेल्या प्रत्येक पाण्यात तो ढग दिसू लागतो. तो असा मोठा मोठा का होत चाललाय, याबद्दल धास्ती वाटू लागते.

आयुष्यात हे वारंवार होण्याचा मोहक, तापदायक आणि लोभस अनुभव मी घेत आलो आहे. काही वेळा आधी गोंडस छोट्या शुभ्र असणार्‍या निरभ्र आकाशाची स्वप्नं पाहिली आहेत. ती खरी झाली आहेत. पण अगदी सगळ्यात पहिल्यांदा प्रेमात पडलो होतो, त्याआधी आकाशाचा जो निळा रंग होता, तसाच चमकदार निळा रंग आजही प्रत्येक ढगाच्या आगमनापूर्वी कसा काय तयार होतो, याचं आश्चर्य मला वाटायचं थांबलेलं नाही.

सध्या माझ्या डोक्यावरच्या विस्तीर्ण स्वच्छ निळ्या आभाळात एक हसरा छोटा ढग येऊन थांबलेला आहेच. पण तो बेटा आपलं आकारमान आळोखेपिळोखे देऊन विस्तृत करणार याबद्दल मला तीळमात्र शंका नाही.

प्रेम करणं ही माणसाच्या मनाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आपल्यावर कुणीतरी प्रेम करावं अशी इच्छा होणं, ही याच प्रवृत्तीची दुसरी सहज अशी बाजू. आपण प्रेमात पडण्याचं थांबवू शकत नाही. आपलं वय काहीही असो. आपण एकटे असू वा दुकटे. प्रेमाला शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही आयाम असतात. काही व्यक्ती हे दोन्ही हात पसरून आपल्याला जवळ घेतात, तर काही एका हातानंच आपल्याला कुरवाळत राहतात.

शारीरिक प्रेम करण्याची इच्छा प्रबळ होणं पण ते करू शकण्याची परिस्थिती नसणं, या नितांतसुंदर अवस्थेत त्या प्रेमात पडलेल्या व्यक्ती एकमेकांना काही वेगळ्या जाणिवांची तेजस्वी करत असतात. ही प्रेमाची अवस्था सगळ्या आसमंतात नवी अस्वस्थता तयार करणारी आणि मनाला नवी ऊर्जा देणारी असते. मी ह्या अवस्थेमध्ये पूर्वी तडफडत असे. तो आता या अवस्थेत रेंगाळायला उत्सुक आणि सक्षम झाला आहे.

सुरुवातीला आपल्या मनाच्या मागण्याच फार कमी असतात. आपोआप काही वेळा झालेल्या भेटी, डोळे, आपलं समोरच्या व्यक्तीनं केलेलं कौतुक, एकमेकांसोबत चालताना कमी जास्त करावा लागणारा वेग, जुळलेल्या आवडीनिवडी; आणि मग जर व्हायचंच असेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात. त्या व्यक्तीचं नाव जरी उच्चारलं गेलं तरी श्वास वेगळे पदन्यास करू लागतो. सोपेपणा आणि सहजतेवर कसलातरी आश्वासक दाब पडायला लागतो. लाल सिग्नलला उभं असताना, लिफ्टमधून वरखाली प्रवास करत असताना, पोहण्याच्या तलावात तरंगताना किंवा बीअरचा दुसरा ग्लास रिचवताना मन फार जड व्हायला लागतं आणि आठवण नावाची गोष्ट आपलं पाऊल मनात रोवते. आणि अचानक त्या व्यक्तीच्या आठवणीसोबत एक उष्मा मनात तयार होतो. पुढील काही दिवसांत त्याचं एक उष्णतेत रुपांतर होणार असतं. त्या उष्णतेचा निचरा करताना मनाची घालमेल उडते आणि आपण वाचत असलेली पुस्तकं, ऐकत असलेलं संगीत पाहत असलेला पाऊस, वावरत असतो ते रस्ते त्या सगळ्याचा ताबा नकळत ती व्यक्ती घेऊन टाकते. माझ्या बाबतीत तर ती व्यक्ती ज्या शहरामध्ये राहत असते, त्या संपूर्ण शहरावरतीच तो ढग पसरलेला असतो. शहराच्या आधी येणारा डोंगर चढताना मला तो खालूनच हल्ली दिसू लागतोय. माझ्याआधीच पहाटे निघून तिथे जाऊन पोहोचलेला.

हे सगळं प्रत्येकाच्याच आयुष्यात वारंवार होत असतं. टाळता येत नाही. ज्या व्यक्तींच्या आईवडलांचं लग्न झालेलं असतं आणि ज्यांना स्वतः ते करायचं असतं, शिवाय आपल्या मुलांचं आणि त्यांच्या मुलांचंही लावून द्यायचं असतं, त्या व्यक्तींना मात्र आयुष्यात हे सगळं एकदाच व्हावं असं वाटत असतं. नव्हे ते एकदाच होतं असं ते मानूनही चालत असतात. त्यामुळे लग्नाच्या प्रेमाला ते प्रेम म्हणतात आणि त्याव्यतिरिक्त इतर प्रेमांना ते ’अफेअर्स’ म्हणतात. जुन्या बोली भाषेत त्याला ’प्रकरण’ असं म्हणतात.

प्रेमात एकदाच पडावं किंवा पडता येतं हे म्हणणं बाळबोध आहे. त्याचप्रमाणे लग्न नावाच्या दोन फुटी कुंपणात एकदा उभं राहिलं की, आभाळातल्या त्या ढगांपासून आपली सुटका होईल असं म्हणणं हे बालीशपणाचं आहे. लग्नानंतर जी माणसं पुन्हा कुणाच्या प्रेमात पडत नाहीत ती किती ओंगळ, कोरडी आणि कंटाळवाणी असावीत याची कल्पनाच न केलेली बरी.

त्यांच्यावर फक्त एक आणि एकच व्यक्ती प्रेमाचे थर लावीत बसलेली असते आणि तेसुद्धा त्याच डब्यात ब्रश बुचकळून समोरच्या व्यक्तीवर तसेच ओघळ आणत बसलेले असतात. आधी खूप वेळा, मग वर्षातून एक-दोन वेळा वाढदिवसाला वगैरे. बाकी वेळ सुकलेले रंग घेऊन इकडेतिकडे बघत बसून राहायचं. असे ओघळ आणून एकमेकांना चिणून टाकण्यातच त्यांचं आयुष्य संपून जातं.

मी वाढलोच मुळी प्रकरणांच्या शेतात. माझ्या नशिबानं माझ्या आजूबाजूला, कुटुंबात आणि शेजारात लग्नांइतकीच प्रकरणं घडत होती आणि फार लहान वयापासून मला त्या शब्दाबद्दल अतीव उत्सुकता होती. तशीच दुसरी उत्सुकता मला ’ठेवलेली बाई’ या या शब्दाबद्दल होती. मला कितीतरी दिवस त्या ठेवलेल्या बाया कशा दिसतात ते पाहायचं होतं. आमच्या कुटुंबातील काही व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे आणि माझ्या आईच्या मनाच्या मोकळेपणामुळे माझी फार लहान वयात अनेक प्रकरणांशी आणि ठेवलेल्या बायांशी गाठ पडली. त्यानंतरच्या आयुष्यात कुटुंबाच्या परिघाबाहेर पडून माझा मी प्रवास करायला लागलो तेव्हा मला अनेक मोकळ्या मनाचे, आनंदी ठेवलेले पुरुषही भेटले. यामुळे माझ्या सगळ्या उत्सुकता अगदी आळस दिल्यावर हाडं मोकळी होतात तशा मोकळ्या होत विरल्या.

प्रकरणं करणारी माणसं, ठेवलेल्या बाया आणि ठेवलेले पुरुष हे नेहमीच आनंदी असतात. त्यांच्या आजूबाजूची माणसं मात्र सतत चिंतेत आणि खंगलेली असतात, असं मला दिसलं. शिवाय सतत आपण दुसर्‍याला ठेवू शकत नाही. आपल्या नकळत दुसर्‍या कुणीतरी आपल्याला ठेवलेलं असतं आणि आपल्याला ते लक्षातच आलेलं नसतं. त्यात फारच मजा येते. एकदा आमच्या नात्यातल्या एक बाई दुःखी होऊन अल्कोहोलच्या आहारी गेल्या, तेव्हा मी आईला त्याचं कारण विचारलं असता ती म्हणाली की, त्यांच्या नवर्‍याचं दु्सर्‍यापण एका बाईवर प्रेम आहे म्हणून त्यांचं असं झालं. अनेकांवर प्रेम करत राहता येतं. पण दुर्दैवानं आपलं आधी लग्न झालं असेल आणि घरी पोरंटोरं असतील तर घरच्या बाया पुरुषांना अशावेळी फार त्रास देतात. आईला त्या ठेवलेल्या बाईबद्दल जास्त सहानुभूती होती असं मला दिसलं. (मी लवकरच त्या बाईंना भेटलो, त्या फार गोड आणि सुंदर होत्या. त्या माझ्या कुणीच नव्हत्या. त्यांनी मला पिस्ते खायला दिले होते आणि पुढे काय करणार असं विचारलं होतं. तेव्हा मला माझ्या आजोबांप्रमाणे एसटीचा कंडक्टर व्हायचं होतं ते मी त्यांना सांगितलं होतं.)

मी स्वतः पहिल्यांदा प्रेमात पडलो तेव्हा मला हे उमगलं की, प्रेमासोबत माणसावर एक प्रकारचा हक्क सांगण्याची ऊर्मी उत्पन्न होते. ती व्यक्ती संपूर्णपणे आपली असावी असं वाटू लागतं, मनानं आणि शरीरानंसुद्धा. एवढंच नाही तर त्या व्यक्तीचा दिवसभराचा आणि त्यानंतरचा वेळ, तिच्या आवडीनिवडी ह्या सगळ्यांच्या बरोब्बर केंद्रस्थानी आपण असलो तरच त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम आहे अशी अट आपण नकळत घालतो. प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक शाखा प्रशाखा असतात आणि आपण त्या वृक्षासारख्या व्यक्तीमत्त्वाशी जोडला गेलेला एक भाग असतो, हे मला कधीही लक्षातच येत नसे. माझा जो कॅमेरामन आहे अमलिंदू, त्यानं मला एकदा सेटवर फार पूर्वी स्टिंग या गायकाची गाणी ऐकवली. त्यात ’If you love someone, set them free’ असं त्याचं एक गाणं आहे. ते गाणं ऐकायला आवडत असूनही मला वर्षानुवर्षं खरं म्हणजे कळलेलंच नव्हतं. माणूस आवडत असला तरी वर्षानुवर्षं कळलेलाच नसतो, तसंच गाण्याचं होतं.

हे होण्याचं कारण, स्त्री-पुरुषांची प्रेम जमताच ताबडतोब होणारी लग्नं, भावाबहिणींची भाऊबीजछाप प्रेमं, शोलेतल्या जयवीरूछापाची मैत्रीची गाणी एवढ्या तीनच कप्प्यांत माझ्या समाजानं मानवी नाती बसवली होती. सगळ्यांनी त्या तीन कुंपणांतच राहायचं. त्या कुंपणाबाहेर सगळं दुःख, बेजबाबदारपणा, अविचार आणि अश्लीलता आहे, असं मानून निमूट जगायचं.

थोडे दिवसांनी हे लक्षात आलं की, आकर्षण ही गोष्ट अपरीमीत आहे. ती थांबत नाही. त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणं हा मूर्खपणा आहे. कारण सोळासतराव्या वर्षी सुरू झालेली ही प्रेमात पडण्याची आणि आकर्षित होण्याची प्रक्रिया अजूनही मलातरी थांबवता आलेली नाही. एक मन, एक शरीर, एक भावनिक ओलावा माणसाला पुरा पडणं शक्यच नाही. निसर्गाचं असं काही म्हणणंच नाही. मग त्या सगळ्या ऊर्मींच्या विरुद्ध माणसाला कसं जाता येईल?

आयुष्याचा काही दीर्घ वा छोटा काळ एखादी व्यक्ती व्यापून टाकते. तो संपूर्ण काळ हा त्या व्यक्तीच्या नावाचा आणि रंगाचा असतो. तो काळ काही दिवसांचा वा अनेक दशकांचा असू शकतो. पण मग माणूस बदलतो. त्याला नवे अनुभव खुणावतात. त्याच्या बुद्धीची, शरीराची भूक विस्तारते. त्याच्या आवडीनिवडी बदलतात आणि तो माणूस नव्या आयुष्यासाठी ऊर्जा शोधायला लागतो. काहीवेळा सोबती असूनही तो एकटा पडतो, ज्याची कारणं स्पष्ट करता येत नाहीत. हे सगळं होण्यात आधीच्या व्यक्तीशी प्रतारणा अपेक्षित नसते, पण अनेक वेळा नात्यातली सरप्राईझेस्‌ संपलेली असतात. अशावेळी ज्याला आपण ’प्रकरण’ म्हणतो ती गोष्ट तयार होत असावी.

बहुतांश माणसांची प्रवृत्ती ही नातं जगासमोर मिरवण्याची असते. बहुतेक लग्नं ही त्याचसाठी केली जातात. जगाच्या साक्षीची गरज त्या माणसांचं नातं तयार होताना का लागत असावी? लग्न करण्याचा आणि दोन माणसांचं एकमेकांवर प्रेम असण्याचा अर्थाअर्थी संबंध आजच्या काळात राहिलेला नाही. पूर्वीही नसावा. सिनेमांचे ज्याप्रमाणे प्रीमिअर्स होतात त्याप्रमाणे माणसांची आयुष्यात लग्नं होतात. कुटुंबाच्या संपत्तीचं, गोतावळ्याचं, लागेबांध्यांचं आणि समाजातल्या त्या कुटुंबाच्या स्थानाचं ते आपापल्या परीनं केलेलं प्रदर्शन आहे. प्रेमाचा लग्नाशी संबंध नसतो. ते आपोआप तयार होतं आणि ते होणारच नसेल तर ते कितीही वेळा एकमेकांशीच लग्नं करत बसलं तरी होणार नसतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातले ते एकदाच घडणारे सोहळे असतात. अनेकजणांच्या आयुष्यात लग्न सोडल्यास पुढे काहीही भव्यदिव्य घडणारच नसतं, म्हणून ती माणसं फार हौसेनं सर्वांसमोर एका दिवसाच्या केंद्रस्थानी उभं राहून लग्न करून घेतात. फार तर फार बारशी आणि मुलांच्या मुंजी होतात. त्यानंतर थेट आपल्या मुलांची लग्नं. म्हणजे पुन्हा दुसर्‍या प्रीमिअर शोची संधी. आणि मग ते (कर्कश्श आणिे खर्चिक) चक्र अव्याहत पुढे चालू राहतं.

प्रेमाची खरी मजा ते होताना कुणालाही न कळण्यामध्ये असते. आपल्यालाही ते होताना कळत नसेल तर त्या अनुभवासारखा दुसरा विलक्षण अनुभव नसतो. जी माणसं चारचौघांत मोकळं वावरत, आपापलं आयुष्य जगत कुणालाही न कळवता एकमेकांवर प्रेम करत राहतात त्या माणसांनी फार दुर्मिळ असा आनंद आपल्या आणि दुसर्‍या व्यक्तीच्या मनाला आणि शरीराला दिलेला असतो. त्यासाठी सतत सर्वांसमोर एकत्र राहण्याची, एकमेकांना भेटवस्तू द्यायची, एवढंच काय तर ’माझं तुझ्यावर प्रेम आहे’ हे एकमेकांना म्हणायचीही गरज नसते. असं प्रेम फार कमी वेळा आयुष्यात नशिबी येतं. ते ज्यांना ओळखता येतं, ओळखून रुजवता येतं, आणि रुजवून मान्य करता येतं ती माणसं फार ग्रेट असतात. आपल्या दोघांचं नातं काय आहे याची या गर्दीत कुणालाच कल्पना नाही. याच्याइतका सुंदर रोमान्स जगात दुसरा कोणताही नाही. मग त्या प्रेमात वय, राहणार्‍या शहरातलं अंतर, लग्न झालं की नाही, आपण यापुढे कधी भेटणार आहोत की नाही असे प्रश्न हळूहळू शांत होत जातात. ते व्हायला फार वेदना होतात, कष्ट करावे लागतात. पण होणार असेल तर ते सगळं आपोआप होतं. थोडं सहन करावं लागतं. यासाठी नशिबवान असावं लागतं आणि मोकळ्या मनाची स्वतंत्र ताकद घेऊनच जन्माला यावं लागतं. त्यात सुरक्षितता आणि हक्काचे एकमेकांवरचे हिशोब असून चालत नाही. ती तसली कामं नवराबायकोंची असतात. काही भेटी वेळ ठरवून अलेल्या मिनिटासेकंदाच्या असतात, तर काही भेटी संपूर्ण रात्री व्यापून उरतात. एकमेकांच्या शरीराचे गंध आठवण आली की मनाभोवती रुंजी घालू लागतात. अतिशय दुःखाच्या आणि वेदनेच्या क्षणांना त्या व्यक्तीचा नुसता चेहरा आठवला तरी मनावर फुंकर येते. आपल्याकडे त्या व्यक्तीनं दिलेली कोणतीही भेटवस्तू नसते, ना आपण दिलेली तिच्याकडे असते. एक खूण असते कसलीतरी. एखादा संकेत असतो. हस्ताक्षर असतं. इतर कुणालाही माहीत नसेल असं हाक मारायचं नाव असतं. ते पुरेसं असतं. त्या पलीकडे सतत आश्वासनं देण्याची गरज नसते. मुख्य म्हणजे भीती नसते. असुरक्षितता नसते. महिन्यामहिन्यांची शांतता मान्य असते. कुणाला काही सांगायचं नसतं. नावं जोडून घ्यायची नसतात. प्रत्येक भेट शेवटची असू शकते. कारण हक्क नसतो. पुढची भेट झाली तर मन फार मऊ आणि आनंदी होऊन जातं. जिकडेतिकडे सगळं बरं वाटू लागतं आणि ऊर भरून येतो.

असं सगळं होण्याला इंग्रजीमध्ये ‘अफेअर’ का म्हणतात? हे जर फेअर नसेल तर मग दुसरं काय फेअर असू शकतं?

प्रेमामधून तयार झालेल्या शारीरिक ताण्याबाण्यांना समजून घेण्याची उमज आजही आपल्या परिसरात तयार झालेली नाही. शारीरिकता हा बहुतांशी प्रेमाच्या संबंधाचा पाया असतो. ती एकतर्फीही असू शकते. असली तरी ती ओळखून एका अंतरावरून झेलायला शिकायला हवं. पावसाळा आनंदात जाणार असेल तर त्याला ती भेट देण्याचा मोठेपणा मनात हवा. शारीरिक संबंध आले नाहीत, होऊ शकले नाहीत या कारणानं अनेक नाती अतिशय गूढ आणि दाट होत जाण्याची शक्यता असताना आपण फार पटकन शारीरिकतेचा ठोस आग्रह धरत नात्यांची मजा संपवून टाकतो. याचं कारण त्याविषयी आपल्या मनात सतत असलेलं दडपण.

शारीरिक संबंध ही प्रेमाची पावती असू शकत नाही. तो प्रेम करण्याचा एक मोठा उद्देश असतो. काही वेळा तो उद्देश आपोआप आणि शांतपणे सफल होतो तर काही वेळा त्याच्या कोमटपणावर, उष्णतेवर आणि धगीवर अबोलपणे वर्षानुवर्षं दोन माणसांमधलं नातं फार मस्त आकार घेतं. याची मजा घेण्याची प्रवृत्ती जोपासायलाच हवी. शरीर सापडत जायला हवं. ते स्वप्नांमध्ये रंगवता यायला हवं. त्यासाठी ते न ठरवता अचानक कधी इकडून कधी तिकडून दिसायला हवं. त्यासाठी पाऊस असतो, मोठ्या गळ्यांचे सुंदर कपडे असतात, दरवाज्यांच्या फटी असतात. पहिल्या काही तीव्र शारीरिक संबंधांनंतर, शरीराची सरप्राईझेस्‌ जर संपली तर त्या दोन व्यक्तींना नात्याचा बाज टिकवून ठेवायला पुन्हा नव्यानं एकमेकांना काहीतरी सादर करावं लागतं. त्यापेक्षा ते होईल तेव्हा होऊ द्यावं. आपोआप.

प्रेमाप्रमाणेच शारीरिकता ही काही एका व्यक्तीशी बांधली गेलेली नसतेच. आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आपल्याला अनेक शरीरं आवडतात. काही जुन्या शरीरांमधला रस उडतो आणि नवी खुणावतात. ते सगळं होणं फार सुंदर आहे. शिवाय ते अपेक्षितही आहे. त्यामुळेच तर आपल्याला जाणिवांची वृद्धी होते. हे जर मान्य केलं नाही आणि आपल्याच दोघांच्या एकमेकांच्या शरीराची अट कुणी कुणावर घातली तर कालांतरानं कोणीतरी एक न सांगता त्याच्या सहजप्रवृत्तीनं जे करायचं ते करतोच. आपल्या आयुष्याचं अत्यंत पारंपरिक स्वरूप जगाला दाखवत बसणारे लोकही ते टाळू शकत नाहीत. मग त्यातून लपवणूक आणि त्रास होतो. भावनिक हिंसा तयार होत जाते आणि आपल्यापाशी असलेला सगळा आत्मसन्मान माणसं या कारणी घालवून फार बिचारी होऊ शकतात. त्यापेक्षा रात्री दोघांपैकी कुणी घरी आलं नाही तर दार लोटून घेऊन शांत झोपावं. काही दिवस आजमवावं, गप्पा मारून मोकळेपणा ठेवावा. माणसं नेहमी सगळीकडे फिरून परत घरी येतातच. ती आपलीच असतात.

शारीरिक संबंध आले म्हणजे आपण दुसर्‍या व्यक्तीला आपले सर्वस्व दिले असं वाटणं म्हणजे एक सिनेमाकादंबर्‍यांमधून आलेला बावळटपणा आहे. आपला ‘स्व’ हा इतका स्वस्त असतो का, की तो या अनुभवानं लगेच गमावल्या जाऊ शकतो? हे सर्वस्व देण्याच्या भावनेचं खूळ इतकं प्रगाढ आहे की शारीरिक संबंध एकदा आला की लगेगच त्यापुढे प्रेम करण्याची सक्ती केली जाते. अनेक वेळा ते अव्यवहार्य असतं कारण पुन्हा लग्नाप्रमाणे शारीरिकतेचा प्रेमाशी संबंध असेलच असं नाही. आजच्या काळात जेव्हा मोकळेपणानं शारीरिक संबंध पहिल्या काही भेटींमध्ये होतात तेव्हा त्याचं स्वरूप आकर्षणाची धग शांत करण्याचं असतं. एकमेकांचा स्पर्श ओळखण्याचं आणि संवाद साधण्याचं असतं. कोणत्याही स्वरूपात ते सर्वस्व देण्याचं कधीही असू शकत नाही. अगदी लग्नाच्या नात्यातही नाही. नशिबानं आपण आता अशा काळात आहोत जिथे शारीरिकतेचा पुनरुत्पादनाशी कोणताही अपघाती संबंध नाही. असं असताना एकमेकांना दिल्या घेतलेल्या आनंदाची पुनरावृत्ती करण्याची सक्ती कुणीही कुणाला का करावी? तसं झालं तर वारंवार होणार्‍या किंवा न होऊ शकणार्‍या शारीरिकतेतून किती चांगलं प्रेम फुलत जाऊ शकतं! ते करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळायला हवं. ही निसर्गाची प्रेरणा आहे.

जर कुणावर कसलाही हक्कच सांगायचा नसेल तर मग प्रेम करणं ह्या गोष्टीला काय अर्थ उरला, अशी बर्‍याच जणांची समजूत असते. पण वर्षानुवर्षं टक्केटोणपे खाऊन, मनाला खोट्या समजुतीत पाडून, हक्काचं वजन तयार करून आपण प्रेमात असल्याचा देखावा जगापुढे साजरा करण्याची वेळ आपल्यावर कधीही येऊ नये. आपल्या मनातलं एखाद्या व्यक्तीवरचं प्रेम संपलं आहे हे ओळखायला आपण घाबरतो. ओळखलं तरी ते कबूल करणं आणि पुन्हा प्रेमात पडायला मनाला सक्षम करणं हे धाडसच आपण करत नाही.

आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रेमात पडून ते निभावणार्‍या व्यक्ती धाडसी असतात. खर्‍या असतात. पण आपल्या मनातले न्यूनगंड, परस्परांची झापडं आणि आपल्यातल्या भावनिक समृद्धीच्या अनुभवामुळे आपण लगेचच त्या व्यक्तींची ‘व्याभिचारी’ म्हणून हेटाळणी करून टाकतो. पण मनातल्या मनात प्रत्येकजण आपण तसं करू शकत नाही म्हणून कुढत असतो.

अनेक प्रेमं पचवून आणि रिचवून त्याचा गोतावळा सांभाळणारे स्त्रीपुरुष किती तेजःपुंज असतात. त्यांच्या मनाला आणि शरीराला सतत एक झळाळी असते. मला अशी अनेक माणसं माहिती असण्याचं आणि त्यांच्याशी दोस्ती असण्याचं सुदैव लाभलेलं आहे. त्या व्यक्ती सतत कात टाकत असतात. होत्याच्या नव्हत्या होतात. स्वरूपं पालटतात. ताण सहन करतात आणि बंद झालेल्या गुहांचे दगड फोडून वारंवार मोकळ्या प्रदेशात जात राहतात. त्या व्यक्तींना मनं आणि शरीरं हाताळण्याची सुंदर लकब गवसलेली असते. मध्ये येणार्‍या अंधार्‍या खोल्यांची, थरकाप उडवणार्‍या एकटेपणाची त्यांची भीती गेलेली असते. ते सगळं प्रेमासोबत येणार हे ते उमजून असतात. आपण बसलेलं विमान आपल्याला हवं तिथे कधीच उतरणार नसतं.

गरजेपेक्षा जास्त वर्षं फक्त एकमेकांसोबतच राहिलेल्या दोन माणसांना शेजारी-शेजारी उभं करून त्यांचा फोटो काढून पाहिला तर त्यांचे चेहरे बघून त्यांच्या नात्याविषयी सर्व कल्पना येते. बहुतेक वेळा खिन्न-हसते चेहरे असतात ते. त्यांच्या दारंखिडक्या नसलेल्या घराची गोष्ट सांगत असतात. आम्ही चाळीस वर्षं एकत्र काढली. पण कशी? एकटं पडण्याच्या भीतीनं एकमेकांना गच्च आवळून? की मोकळेपणानं-समजुतीनं अंतर कमीजास्त ठेवून? त्याउलट कोणत्यातरी प्रवासात महिनाभर भेटलेल्या आणि परत कधीच न सापडलेल्या मित्रांचे आणि मैत्रिणींचे फोटो पाहिले तर त्यांच्या चेहऱयावरचे भाव, ओसंडून सांडणारा आनंद पाहून मला तरी ते आयुष्य नक्की जगावंसं वाटेल.

माणसं आयुष्यात येणं जितकं साहजिक असतं तितकंच ती सोडून जाणंसुद्धा साहजिक असतं आणि त्या दोन्ही गोष्टी सोप्या नसतात. पण माणूस सोडून जाताना मनावर आणि अंगावर काही हलकी खूण सोडून गेला तर मात्र त्या ताटातुटीसारखा दुसरा एकमेवाद्वितीय अनुभव नाही.

आपण जागं व्हावं तेव्हा ती व्यक्ती शेजारी नसावी. बाहेर पाऊस पडत असावा. चिठ्ठीबिठ्ठी काही नसावी. पण आपण रात्री उतरवून ठेवलेलं काहीतरी ती व्यक्ती गुपचूप घेऊन गेली असावी. आपल्याला आनंदी थकव्यानं पुन्हा ग्लानी यावी हा आनंद सकाळी त्या व्यक्तीला दात घासताना बघण्याच्या आनंदापेक्षा किती चांगला आहे. तो प्रत्येकाला मिळो.

नात्यात नेहमी येऊन जाता आलं पाहिजे. येता यायला हवं आणि जाताही यायला हवं. केव्हा जायचं आहे हे जेव्हा एकमेकांना कळतं त्या माणसांची प्रकरणं सतत ताजी आणि मोहक राहतात. पण ते सगळं सापडायला थोडा वेळ लागतो. मधली वाट बघण्याची वेळ पण आवडायला लागते. परत घरी कुटुंबकबिल्यात जाऊन दात घासणार्‍या व्यक्तींकडे पाहून एक साळसूद हसू बाळगणं शिकून घ्यायला लागतं. असं सगळं चालू असलं की हातून फार चांगलं लिहून होतं, गाणी होतात, चित्रं उमटतात आणि साधा चहा बनवला तरी त्याला फार अस्मानी चव येते.

सतत कुणाचीतरी सोबत असण्याचा अलिखित नियम हे भारतीय समाजाचं फार मोठं दुर्दैव आहे. त्यातली सोबत महत्त्वाची न राहता ‘सतत’ हा शब्द फार मोठा करून ठेवला आहे आपण. टोळ्यांनी आणि जोडीनं सतत जागायला आपण आता रानावनातली किंवा कृषिसंस्कृतीतली माणसं उरलेलो नाही. आपल्यापैकी अनेकांना सोबत असण्याच्या पलीकडे, फक्त एकट्यानं शोधण्याचे, अनुभवण्याचे आयाम सापडते आहेत. पण तसं जगणं समृद्ध होऊ शकेल अशा आयुष्याच्या नव्या रचना, नवी-मोकळी नाती लेबल न लावता तयार करायला आपल्याला दुर्दैवानं घरात शिकवलं जात नाही. फोनच्या डिरेक्टर्‍यांप्रमाणे आपली नात्यांची लेबलांची डिरेक्टरी फार आऊटडेटेड झाली आहे. त्यात अनेक नवी माणसं नाहीत. अ‍ॅड करायची सोय नाही.

अनुभव घेणं ही नेहमीच एकट्यानं करायची गोष्ट असते. ती जोडीनं करत बसता येत नाही. तुम्ही कितीही आकंठ प्रेमात बुडाले असलात तरीही. अनुभव जेव्हा मनात मावत नाही तेव्हा तो सांगितला जातो आणि यावेळी तो नक्की समजणार्‍या माणसासोबत गाढ होत जाते. त्याला समजुतीचं आणि ओळखीचं अंगण आणि कुंपण येतं. मग दिवाणखाना येतो आणि समजुतीचंच शय्यागृह येतं. त्यात इतरांना प्रवेश नसतो.

सगळ्यांना सगळं कधीच समजत नसतं हे यामागचं कारण आहे. एकाच माणसाला आपण म्हणत असलेलं सगळं समजावं असं वाटणं हीतर जवळजवळ हिंसा आहे. यातच आपल्या आयुष्यात एकापेक्षा जास्त जोड्या तयार होण्याचं सोपं आणि साधं कारण आहे.


***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' (दिवाळी - २०१३)


***

हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल सचिन कुंडलकर व सुजाता देशमुख (मेनका प्रकाशन) यांचे मनःपूर्वक आभार.


***
विषय: 
प्रकार: 

जिज्ञासा,

>> समजा, एका लेखकाने त्याच्या पुस्तकातून सतत खरे बोला, दुसऱ्यांना फसवू नका असा उपदेश केला आणि तुम्ही ते
>> पुस्तक वाचून त्या माणसाबद्दल खूप आदर आणि प्रेम बाळगू लागलात. काही वर्षांनी तुम्हाला कळलं की नंतर काही
>> वर्षांनी त्या लेखकाला खोटे बोलणे आणि लोकांच्या पैशाची अफरातफर करणे ह्या आरोपाखाली अटक झाली तर
>> तुम्हाला कसं वाटेल?

सहमत. जेफरी आर्चर या रहस्यकथालेखकास अफरातफरीच्या आरोपाखाली तुरुंगवास झाला तेव्हा त्याच्या अनेक चाहत्यांची अशीच काहीशी प्रतिक्रिया होती. रहस्यकथांमध्ये शेवटी सत्याचाच विजय झालेला दाखवायचा असतो. त्यामुळे लेखकास एक प्रकारचा नैतिक अभिनिवेश वाचकांकडून आपोआप चिकटवला जातो. त्याचा भंग झालेला पाहवत नाही.

आ.न.,
-गा.पै.

हे जरा अवांतर होतंय पण जिद्न्यासा, माणसाचं लिखाण आणि वैयक्तिक आयुष्य यात वाचक नेहमीच गल्लत करतात. लिहीणं ही एखाद्या ठराविक विषयाची, कालमर्यादित प्रतिक्रीया असते. अनेक लेखक नव्या नव्या पुस्तकांतून इव्हॉल्व्ह होताना आपण पाहिले आहेत. यावर बरंच काही लिहीण्यासारखं आहे पण तो इथला विषय नाही.

माणसाचं लिखाण आणि वैयक्तिक आयुष्य यात वाचक नेहमीच गल्लत करतात.>>> इंटरेस्टींग. मी काही लेखक वगैरे नाही, पण बरेचदा लेखकांच्या वैयक्तिक आयुष्यातले अनुभव त्यांच्या लेखनात उतरताना दिसतात. असे होत नाही का? त्यावरून त्या लेखकाला जज करायला जाऊ नये हे खरे. पण म्हणून त्या लेखकाचे प्रत्येक लेखन सकस असेलच असं नाही (आठवा "Pack of Lies" :फिदी:).

आशूडी, (अवांतर पुढे चालवत) लेखकाच्या कलाकृतीवरून त्याला एक व्यक्ती म्हणून judge करू नये हे मला ही पटतं आणि मी तसं करत नाही. पण जेव्हा लेखक non fiction especially autobiography लिहितो (A bridge across forever is an autobiographical love story) तेव्हा तो स्वतःचे विचार लिहित असतो. जेव्हा त्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये तफावत आढळते तेव्हा अपेक्षाभंग होतोच! उदा. मी माझ्या पर्यावरणाच्या लेखांमधून कागद/पाणी इ. वाचवा असे लिहित असेन आणि माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात ह्या गोष्टी अविचाराने वाया घालावीत असेन तर माझ्या शब्दांवर कोण विश्वास ठेवेल? There needs to be some alignment between your thoughts and action else those discrepancies become quite glaring and disappointing. This is especially true when it happens with authors whom you idolize at the young age. It may sound too ideal कारण हे सोपे नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं तुकोबा उगीच म्हणाले नाहीत. आता अनुभवातून शहाणे होऊन ती ही अपेक्षा (दुसऱ्यांकडून) सोडून द्यायला शिकले आहे. स्वतःच्या बाबतीत मात्र ती सूट घ्यायची वेळ येऊ नये असं वाटतं!

जि, मलाही आधी तुझ्यासारखं वाटायचं. पण आता असं लक्षात आलंय की आपली स्वतःची मतं/विचार काळाप्रमाणे बदलत असतात. त्यामुळे आपण स्वतःच आधी लिहिलेलं वाचलं की असं वाटतं, हे मीच लिहिलंय का? Happy
तुलाही हा अनुभव येईल कदाचित. मग कदाचित तुला असे लेखक "फेक" वाटणार नाहीत. Happy
बरेचदा जेव्हा लिहिलं तेव्हा आपल्याला खरंच तसं वाटत असतं. पण नंतर तेवढी इन्टेन्सिटी/पॅशन त्या विषयाची/मताची रहात नाही. मुडी/क्रेझी/इन्टेन्स लोकांना तर सतत असं होत असावं.

अधिकार आणि अपेक्षांच्या ओझ्यातून प्रेमभावना मुक्त नाही .. कधी प्रेम हा एक भ्रम ठरतो. पण त्या वेळी ते संपूर्ण अपरिवर्तनीय आणि पर्याय नसलेलं सत्य वाटत असतं.
''प्यारको प्यारही रहने दो कोई नाम ना दो''..

पुस्तक वाचलेले नाही म्हणून बेसिक प्रश्न - त्याला मस वाटली असेले ती सोलमेट. तिला पण वाटला होता का तो सोलमेट का ती वर्क इन प्रोग्रेस म्हणून त्याला बघत होती?? त्याचा ब्रेक अप झाला आणि त्याने ब्रेक अप केला ह्यात बराच फरक आहे.

जिज्ञासा,
>>मी माझ्या पर्यावरणाच्या लेखांमधून कागद/पाणी इ. वाचवा असे लिहित असेन आणि माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात ह्या गोष्टी अविचाराने वाया घालावीत असेन तर माझ्या शब्दांवर कोण विश्वास ठेवेल? >>

खरे आहे. पण प्रेमासारख्या विषयात, तेही वीस वर्षांचा कालावधी विचारात घेतला तर अशी अपेक्षा नाही ठेवता येत. तुम्ही बदलता, समोरची व्यक्तीही बदलते. अपेक्षा बदलतात. असे होऊ शकते ना की सोलमेट म्हणून लग्न केले आता तसे नाते राहिले नाही म्हणून ओढून ताणून एकत्र रहाण्यापेक्षा त्या नात्याला निरोप दिला. मला तरी यात काही चुकीचे वाटत नाही. आता एखाद्या व्यक्तीने अमुक व्यक्ती माझी सोलमेट असे म्हणत आपली लवस्टोरी सांगितली आणि नंतर कळले की त्याच कालावधीत लपुन दुसरे प्रकरण सुरु होते तर फसवल्यासारखे वाटेल.

<प्रत्येक गोष्ट आयुष्यात त्याच इंटेन्सिटीची राहावी, कायम राहावी हे मानणंच अमानवी आहे. माणसं बदलतात, परिस्थिती बदलते. कोणे एके काळी ज्याच्याशिवाय एक क्षण चैन पडत नाही तो आता जरा वेळ समोर नसला तर बरं अशीही फेज येते. म्हणजे सुरवातीला वाटलेली बेचैनी, तेव्हा घेतलेल्या आणाभाका, लिहीलेली प्रेमपत्रं, झालेल्या कविता, केलेले एसेमेस सगळं निरर्थक? शब्दांचे बुडबुडे?>

<बरेचदा जेव्हा लिहिलं तेव्हा आपल्याला खरंच तसं वाटत असतं. पण नंतर तेवढी इन्टेन्सिटी/पॅशन त्या विषयाची/मताची रहात नाही. मुडी/क्रेझी/इन्टेन्स लोकांना तर सतत असं होत असावं.>

<खरे आहे. पण प्रेमासारख्या विषयात, तेही वीस वर्षांचा कालावधी विचारात घेतला तर अशी अपेक्षा नाही ठेवता येत. तुम्ही बदलता, समोरची व्यक्तीही बदलते. अपेक्षा बदलतात. असे होऊ शकते ना की सोलमेट म्हणून लग्न केले आता तसे नाते राहिले नाही म्हणून ओढून ताणून एकत्र रहाण्यापेक्षा त्या नात्याला निरोप दिला.>

मला ह्या सगळ्या गोष्टी पटत आहेत आणि हे असं होऊच शकत किंबहुना हे असंच होतं बहुतेक वेळा. मला जो अपेक्षाभंगाचा धक्का बसला तो त्यांच्या नात्याची intensity संपली म्हणून नव्हता तर त्यांचं नातं त्या प्रेमापलीकडे जाऊन चिरंतन झालं नाही ह्याचा होता. The ways in which you love a person are expected to change over the years. You can’t be those passionate lovers all your life. As partners you become parents, friends, guides, caregivers, caretakers everything for each other. You evolve together. I thought they would evolve together as beautifully as they fell in love! They would be that happy, loving old couple who lived happily ever after! ह्याचा अर्थ त्यांचं प्रेम खोटं होतं असा नाही पण ते निभावता आलं नाही हे ही तितकंच खरं. आणि मग जी गोष्ट संपून गेली तिचं वर्णन करणाऱ्या शब्दांना देखील फारसा अर्थ उरत नाही. त्या शब्दांचे खरे अर्थ त्या वेळेपुरतेच मर्यादित असतात. They don’t mean the same anymore isn’t it? ती “अक्षर” नसतात. कदाचित बाखला आत्ता मागे वळून बघताना हे काय निरर्थक लिहिलं आपण असं वाटत असेल हू नोज?

I feel that all of you are looking at this matter very subjectively and I am trying to be objective that’s why we have points of differences! प्रेमासारख्या नाजूक भावनेची objectively चिरफाड करणं दुष्टपणा आहे हे मला मान्य आहे. पण हा दुष्टपणा आपण सगळे जण करतच असतो! कारण भारती ताईंनी लिहिलंय तसं - अधिकार आणि अपेक्षांच्या ओझ्यातून प्रेमभावना मुक्त नाही! आणि I still stand by my view – की न निभावता येणाऱ्या उत्कट क्षणिक प्रेमापेक्षा शाश्वत आणि evolve होत जाणारं थोडं बोरिंग (= कमी उत्कट) प्रेम कधीही चांगलं (अगेन विथ ऑल द डिस्क्लेमर्स)!

My musings/मला वाटतं- ह्या शाश्वत प्रेमाच्या शोधाचा एक मार्ग narcissism कडे घेऊन जातो कारण आपलं प्रत्येकाचं स्वतःवर जितकं प्रेम आहे तितकं जगात कोणावरही नसतं आणि जे बर्यापैकी शाश्वत असतं! आणि दुसरा मार्ग देवाकडे घेऊन जातो!! कारण प्रेम एका पातळीच्यावर गेलं की त्याची भक्ती होते..सर्व संतांचं देवावर असंच उत्कट प्रेम असलं पाहिजे! and it seems that you are never disappointed when you love God! Again who knows!

सी, मला माहिती नाही की तो तिचा सोलमेट होता की नाही कारण गोष्ट त्याने लिहिली आहे. पण तिचं त्याच्यावर प्रेम होतं हे नक्की! Even after all this, the book is very beautiful! But now that you know what happens 20 years down the line, you read it with a pinch of salt! A lot of people want Leslie to write a book (so to say the other side of the story). Time will tell if she wants to tell that story!

आता लेख पुस्तके इ लिहून उगीच गॉसिपला भर दिली नाही हे लेस्लिने बरेच केले. तेव्हा प्रेम केले होते एवढ कळणे मला पुरेसे आहे Happy

Pages