'प्रकरण' - श्री. सचिन कुंडलकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

आपल्याला वाटत असतं की, आपण रोजचं जगणं अगदी आरामात जगतोय. खातोय. पितोय. हिंडतोय. काम करतोय. एकटे किंवा कुणासोबत. आणि वरती आकाशामध्ये तो ढग येऊन थांबलेला कळतही नाही आपल्याला.

असंच वाटत असतं की, आकाश तर अगदी निरभ्र आहे वरती. कारण खरं म्हणजे गेले अनेक दिवस आपण वर पाहिलेलंच नसतं. पण एकदा कधीतरी नजर वर जाते आणि सगळा मामला लक्षात येतो. आपण प्रेमात पडलो आहोत. पहिल्यांदाच किंवा पुन्हा एकदा.

आता तो ढग दिसल्यानं आपल्याला बरं वाटतं. आपण जाऊ तिथे तो आपल्यासोबत येतोच. सगळी छतं पारदर्शी होतात. रात्री गच्चीवर जावं, गावाबाहेर हायवेवर जावं, कामामध्ये अगदी स्वतःला बुडवून घ्यावं तरी आता नजर सतत वर जायची थांबवता येत नाही. आपल्याला हलकं वाटू लागलं, आपली सवयच बदलते आणि आपण नकळत एकटे असताना हसत बसलेलो असतो. ते आता आपल्या हातात उरलेलं नसतंच. आता प्यायला घेतलेल्या प्रत्येक पाण्यात तो ढग दिसू लागतो. तो असा मोठा मोठा का होत चाललाय, याबद्दल धास्ती वाटू लागते.

आयुष्यात हे वारंवार होण्याचा मोहक, तापदायक आणि लोभस अनुभव मी घेत आलो आहे. काही वेळा आधी गोंडस छोट्या शुभ्र असणार्‍या निरभ्र आकाशाची स्वप्नं पाहिली आहेत. ती खरी झाली आहेत. पण अगदी सगळ्यात पहिल्यांदा प्रेमात पडलो होतो, त्याआधी आकाशाचा जो निळा रंग होता, तसाच चमकदार निळा रंग आजही प्रत्येक ढगाच्या आगमनापूर्वी कसा काय तयार होतो, याचं आश्चर्य मला वाटायचं थांबलेलं नाही.

सध्या माझ्या डोक्यावरच्या विस्तीर्ण स्वच्छ निळ्या आभाळात एक हसरा छोटा ढग येऊन थांबलेला आहेच. पण तो बेटा आपलं आकारमान आळोखेपिळोखे देऊन विस्तृत करणार याबद्दल मला तीळमात्र शंका नाही.

प्रेम करणं ही माणसाच्या मनाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आपल्यावर कुणीतरी प्रेम करावं अशी इच्छा होणं, ही याच प्रवृत्तीची दुसरी सहज अशी बाजू. आपण प्रेमात पडण्याचं थांबवू शकत नाही. आपलं वय काहीही असो. आपण एकटे असू वा दुकटे. प्रेमाला शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही आयाम असतात. काही व्यक्ती हे दोन्ही हात पसरून आपल्याला जवळ घेतात, तर काही एका हातानंच आपल्याला कुरवाळत राहतात.

शारीरिक प्रेम करण्याची इच्छा प्रबळ होणं पण ते करू शकण्याची परिस्थिती नसणं, या नितांतसुंदर अवस्थेत त्या प्रेमात पडलेल्या व्यक्ती एकमेकांना काही वेगळ्या जाणिवांची तेजस्वी करत असतात. ही प्रेमाची अवस्था सगळ्या आसमंतात नवी अस्वस्थता तयार करणारी आणि मनाला नवी ऊर्जा देणारी असते. मी ह्या अवस्थेमध्ये पूर्वी तडफडत असे. तो आता या अवस्थेत रेंगाळायला उत्सुक आणि सक्षम झाला आहे.

सुरुवातीला आपल्या मनाच्या मागण्याच फार कमी असतात. आपोआप काही वेळा झालेल्या भेटी, डोळे, आपलं समोरच्या व्यक्तीनं केलेलं कौतुक, एकमेकांसोबत चालताना कमी जास्त करावा लागणारा वेग, जुळलेल्या आवडीनिवडी; आणि मग जर व्हायचंच असेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात. त्या व्यक्तीचं नाव जरी उच्चारलं गेलं तरी श्वास वेगळे पदन्यास करू लागतो. सोपेपणा आणि सहजतेवर कसलातरी आश्वासक दाब पडायला लागतो. लाल सिग्नलला उभं असताना, लिफ्टमधून वरखाली प्रवास करत असताना, पोहण्याच्या तलावात तरंगताना किंवा बीअरचा दुसरा ग्लास रिचवताना मन फार जड व्हायला लागतं आणि आठवण नावाची गोष्ट आपलं पाऊल मनात रोवते. आणि अचानक त्या व्यक्तीच्या आठवणीसोबत एक उष्मा मनात तयार होतो. पुढील काही दिवसांत त्याचं एक उष्णतेत रुपांतर होणार असतं. त्या उष्णतेचा निचरा करताना मनाची घालमेल उडते आणि आपण वाचत असलेली पुस्तकं, ऐकत असलेलं संगीत पाहत असलेला पाऊस, वावरत असतो ते रस्ते त्या सगळ्याचा ताबा नकळत ती व्यक्ती घेऊन टाकते. माझ्या बाबतीत तर ती व्यक्ती ज्या शहरामध्ये राहत असते, त्या संपूर्ण शहरावरतीच तो ढग पसरलेला असतो. शहराच्या आधी येणारा डोंगर चढताना मला तो खालूनच हल्ली दिसू लागतोय. माझ्याआधीच पहाटे निघून तिथे जाऊन पोहोचलेला.

हे सगळं प्रत्येकाच्याच आयुष्यात वारंवार होत असतं. टाळता येत नाही. ज्या व्यक्तींच्या आईवडलांचं लग्न झालेलं असतं आणि ज्यांना स्वतः ते करायचं असतं, शिवाय आपल्या मुलांचं आणि त्यांच्या मुलांचंही लावून द्यायचं असतं, त्या व्यक्तींना मात्र आयुष्यात हे सगळं एकदाच व्हावं असं वाटत असतं. नव्हे ते एकदाच होतं असं ते मानूनही चालत असतात. त्यामुळे लग्नाच्या प्रेमाला ते प्रेम म्हणतात आणि त्याव्यतिरिक्त इतर प्रेमांना ते ’अफेअर्स’ म्हणतात. जुन्या बोली भाषेत त्याला ’प्रकरण’ असं म्हणतात.

प्रेमात एकदाच पडावं किंवा पडता येतं हे म्हणणं बाळबोध आहे. त्याचप्रमाणे लग्न नावाच्या दोन फुटी कुंपणात एकदा उभं राहिलं की, आभाळातल्या त्या ढगांपासून आपली सुटका होईल असं म्हणणं हे बालीशपणाचं आहे. लग्नानंतर जी माणसं पुन्हा कुणाच्या प्रेमात पडत नाहीत ती किती ओंगळ, कोरडी आणि कंटाळवाणी असावीत याची कल्पनाच न केलेली बरी.

त्यांच्यावर फक्त एक आणि एकच व्यक्ती प्रेमाचे थर लावीत बसलेली असते आणि तेसुद्धा त्याच डब्यात ब्रश बुचकळून समोरच्या व्यक्तीवर तसेच ओघळ आणत बसलेले असतात. आधी खूप वेळा, मग वर्षातून एक-दोन वेळा वाढदिवसाला वगैरे. बाकी वेळ सुकलेले रंग घेऊन इकडेतिकडे बघत बसून राहायचं. असे ओघळ आणून एकमेकांना चिणून टाकण्यातच त्यांचं आयुष्य संपून जातं.

मी वाढलोच मुळी प्रकरणांच्या शेतात. माझ्या नशिबानं माझ्या आजूबाजूला, कुटुंबात आणि शेजारात लग्नांइतकीच प्रकरणं घडत होती आणि फार लहान वयापासून मला त्या शब्दाबद्दल अतीव उत्सुकता होती. तशीच दुसरी उत्सुकता मला ’ठेवलेली बाई’ या या शब्दाबद्दल होती. मला कितीतरी दिवस त्या ठेवलेल्या बाया कशा दिसतात ते पाहायचं होतं. आमच्या कुटुंबातील काही व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे आणि माझ्या आईच्या मनाच्या मोकळेपणामुळे माझी फार लहान वयात अनेक प्रकरणांशी आणि ठेवलेल्या बायांशी गाठ पडली. त्यानंतरच्या आयुष्यात कुटुंबाच्या परिघाबाहेर पडून माझा मी प्रवास करायला लागलो तेव्हा मला अनेक मोकळ्या मनाचे, आनंदी ठेवलेले पुरुषही भेटले. यामुळे माझ्या सगळ्या उत्सुकता अगदी आळस दिल्यावर हाडं मोकळी होतात तशा मोकळ्या होत विरल्या.

प्रकरणं करणारी माणसं, ठेवलेल्या बाया आणि ठेवलेले पुरुष हे नेहमीच आनंदी असतात. त्यांच्या आजूबाजूची माणसं मात्र सतत चिंतेत आणि खंगलेली असतात, असं मला दिसलं. शिवाय सतत आपण दुसर्‍याला ठेवू शकत नाही. आपल्या नकळत दुसर्‍या कुणीतरी आपल्याला ठेवलेलं असतं आणि आपल्याला ते लक्षातच आलेलं नसतं. त्यात फारच मजा येते. एकदा आमच्या नात्यातल्या एक बाई दुःखी होऊन अल्कोहोलच्या आहारी गेल्या, तेव्हा मी आईला त्याचं कारण विचारलं असता ती म्हणाली की, त्यांच्या नवर्‍याचं दु्सर्‍यापण एका बाईवर प्रेम आहे म्हणून त्यांचं असं झालं. अनेकांवर प्रेम करत राहता येतं. पण दुर्दैवानं आपलं आधी लग्न झालं असेल आणि घरी पोरंटोरं असतील तर घरच्या बाया पुरुषांना अशावेळी फार त्रास देतात. आईला त्या ठेवलेल्या बाईबद्दल जास्त सहानुभूती होती असं मला दिसलं. (मी लवकरच त्या बाईंना भेटलो, त्या फार गोड आणि सुंदर होत्या. त्या माझ्या कुणीच नव्हत्या. त्यांनी मला पिस्ते खायला दिले होते आणि पुढे काय करणार असं विचारलं होतं. तेव्हा मला माझ्या आजोबांप्रमाणे एसटीचा कंडक्टर व्हायचं होतं ते मी त्यांना सांगितलं होतं.)

मी स्वतः पहिल्यांदा प्रेमात पडलो तेव्हा मला हे उमगलं की, प्रेमासोबत माणसावर एक प्रकारचा हक्क सांगण्याची ऊर्मी उत्पन्न होते. ती व्यक्ती संपूर्णपणे आपली असावी असं वाटू लागतं, मनानं आणि शरीरानंसुद्धा. एवढंच नाही तर त्या व्यक्तीचा दिवसभराचा आणि त्यानंतरचा वेळ, तिच्या आवडीनिवडी ह्या सगळ्यांच्या बरोब्बर केंद्रस्थानी आपण असलो तरच त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम आहे अशी अट आपण नकळत घालतो. प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक शाखा प्रशाखा असतात आणि आपण त्या वृक्षासारख्या व्यक्तीमत्त्वाशी जोडला गेलेला एक भाग असतो, हे मला कधीही लक्षातच येत नसे. माझा जो कॅमेरामन आहे अमलिंदू, त्यानं मला एकदा सेटवर फार पूर्वी स्टिंग या गायकाची गाणी ऐकवली. त्यात ’If you love someone, set them free’ असं त्याचं एक गाणं आहे. ते गाणं ऐकायला आवडत असूनही मला वर्षानुवर्षं खरं म्हणजे कळलेलंच नव्हतं. माणूस आवडत असला तरी वर्षानुवर्षं कळलेलाच नसतो, तसंच गाण्याचं होतं.

हे होण्याचं कारण, स्त्री-पुरुषांची प्रेम जमताच ताबडतोब होणारी लग्नं, भावाबहिणींची भाऊबीजछाप प्रेमं, शोलेतल्या जयवीरूछापाची मैत्रीची गाणी एवढ्या तीनच कप्प्यांत माझ्या समाजानं मानवी नाती बसवली होती. सगळ्यांनी त्या तीन कुंपणांतच राहायचं. त्या कुंपणाबाहेर सगळं दुःख, बेजबाबदारपणा, अविचार आणि अश्लीलता आहे, असं मानून निमूट जगायचं.

थोडे दिवसांनी हे लक्षात आलं की, आकर्षण ही गोष्ट अपरीमीत आहे. ती थांबत नाही. त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणं हा मूर्खपणा आहे. कारण सोळासतराव्या वर्षी सुरू झालेली ही प्रेमात पडण्याची आणि आकर्षित होण्याची प्रक्रिया अजूनही मलातरी थांबवता आलेली नाही. एक मन, एक शरीर, एक भावनिक ओलावा माणसाला पुरा पडणं शक्यच नाही. निसर्गाचं असं काही म्हणणंच नाही. मग त्या सगळ्या ऊर्मींच्या विरुद्ध माणसाला कसं जाता येईल?

आयुष्याचा काही दीर्घ वा छोटा काळ एखादी व्यक्ती व्यापून टाकते. तो संपूर्ण काळ हा त्या व्यक्तीच्या नावाचा आणि रंगाचा असतो. तो काळ काही दिवसांचा वा अनेक दशकांचा असू शकतो. पण मग माणूस बदलतो. त्याला नवे अनुभव खुणावतात. त्याच्या बुद्धीची, शरीराची भूक विस्तारते. त्याच्या आवडीनिवडी बदलतात आणि तो माणूस नव्या आयुष्यासाठी ऊर्जा शोधायला लागतो. काहीवेळा सोबती असूनही तो एकटा पडतो, ज्याची कारणं स्पष्ट करता येत नाहीत. हे सगळं होण्यात आधीच्या व्यक्तीशी प्रतारणा अपेक्षित नसते, पण अनेक वेळा नात्यातली सरप्राईझेस्‌ संपलेली असतात. अशावेळी ज्याला आपण ’प्रकरण’ म्हणतो ती गोष्ट तयार होत असावी.

बहुतांश माणसांची प्रवृत्ती ही नातं जगासमोर मिरवण्याची असते. बहुतेक लग्नं ही त्याचसाठी केली जातात. जगाच्या साक्षीची गरज त्या माणसांचं नातं तयार होताना का लागत असावी? लग्न करण्याचा आणि दोन माणसांचं एकमेकांवर प्रेम असण्याचा अर्थाअर्थी संबंध आजच्या काळात राहिलेला नाही. पूर्वीही नसावा. सिनेमांचे ज्याप्रमाणे प्रीमिअर्स होतात त्याप्रमाणे माणसांची आयुष्यात लग्नं होतात. कुटुंबाच्या संपत्तीचं, गोतावळ्याचं, लागेबांध्यांचं आणि समाजातल्या त्या कुटुंबाच्या स्थानाचं ते आपापल्या परीनं केलेलं प्रदर्शन आहे. प्रेमाचा लग्नाशी संबंध नसतो. ते आपोआप तयार होतं आणि ते होणारच नसेल तर ते कितीही वेळा एकमेकांशीच लग्नं करत बसलं तरी होणार नसतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातले ते एकदाच घडणारे सोहळे असतात. अनेकजणांच्या आयुष्यात लग्न सोडल्यास पुढे काहीही भव्यदिव्य घडणारच नसतं, म्हणून ती माणसं फार हौसेनं सर्वांसमोर एका दिवसाच्या केंद्रस्थानी उभं राहून लग्न करून घेतात. फार तर फार बारशी आणि मुलांच्या मुंजी होतात. त्यानंतर थेट आपल्या मुलांची लग्नं. म्हणजे पुन्हा दुसर्‍या प्रीमिअर शोची संधी. आणि मग ते (कर्कश्श आणिे खर्चिक) चक्र अव्याहत पुढे चालू राहतं.

प्रेमाची खरी मजा ते होताना कुणालाही न कळण्यामध्ये असते. आपल्यालाही ते होताना कळत नसेल तर त्या अनुभवासारखा दुसरा विलक्षण अनुभव नसतो. जी माणसं चारचौघांत मोकळं वावरत, आपापलं आयुष्य जगत कुणालाही न कळवता एकमेकांवर प्रेम करत राहतात त्या माणसांनी फार दुर्मिळ असा आनंद आपल्या आणि दुसर्‍या व्यक्तीच्या मनाला आणि शरीराला दिलेला असतो. त्यासाठी सतत सर्वांसमोर एकत्र राहण्याची, एकमेकांना भेटवस्तू द्यायची, एवढंच काय तर ’माझं तुझ्यावर प्रेम आहे’ हे एकमेकांना म्हणायचीही गरज नसते. असं प्रेम फार कमी वेळा आयुष्यात नशिबी येतं. ते ज्यांना ओळखता येतं, ओळखून रुजवता येतं, आणि रुजवून मान्य करता येतं ती माणसं फार ग्रेट असतात. आपल्या दोघांचं नातं काय आहे याची या गर्दीत कुणालाच कल्पना नाही. याच्याइतका सुंदर रोमान्स जगात दुसरा कोणताही नाही. मग त्या प्रेमात वय, राहणार्‍या शहरातलं अंतर, लग्न झालं की नाही, आपण यापुढे कधी भेटणार आहोत की नाही असे प्रश्न हळूहळू शांत होत जातात. ते व्हायला फार वेदना होतात, कष्ट करावे लागतात. पण होणार असेल तर ते सगळं आपोआप होतं. थोडं सहन करावं लागतं. यासाठी नशिबवान असावं लागतं आणि मोकळ्या मनाची स्वतंत्र ताकद घेऊनच जन्माला यावं लागतं. त्यात सुरक्षितता आणि हक्काचे एकमेकांवरचे हिशोब असून चालत नाही. ती तसली कामं नवराबायकोंची असतात. काही भेटी वेळ ठरवून अलेल्या मिनिटासेकंदाच्या असतात, तर काही भेटी संपूर्ण रात्री व्यापून उरतात. एकमेकांच्या शरीराचे गंध आठवण आली की मनाभोवती रुंजी घालू लागतात. अतिशय दुःखाच्या आणि वेदनेच्या क्षणांना त्या व्यक्तीचा नुसता चेहरा आठवला तरी मनावर फुंकर येते. आपल्याकडे त्या व्यक्तीनं दिलेली कोणतीही भेटवस्तू नसते, ना आपण दिलेली तिच्याकडे असते. एक खूण असते कसलीतरी. एखादा संकेत असतो. हस्ताक्षर असतं. इतर कुणालाही माहीत नसेल असं हाक मारायचं नाव असतं. ते पुरेसं असतं. त्या पलीकडे सतत आश्वासनं देण्याची गरज नसते. मुख्य म्हणजे भीती नसते. असुरक्षितता नसते. महिन्यामहिन्यांची शांतता मान्य असते. कुणाला काही सांगायचं नसतं. नावं जोडून घ्यायची नसतात. प्रत्येक भेट शेवटची असू शकते. कारण हक्क नसतो. पुढची भेट झाली तर मन फार मऊ आणि आनंदी होऊन जातं. जिकडेतिकडे सगळं बरं वाटू लागतं आणि ऊर भरून येतो.

असं सगळं होण्याला इंग्रजीमध्ये ‘अफेअर’ का म्हणतात? हे जर फेअर नसेल तर मग दुसरं काय फेअर असू शकतं?

प्रेमामधून तयार झालेल्या शारीरिक ताण्याबाण्यांना समजून घेण्याची उमज आजही आपल्या परिसरात तयार झालेली नाही. शारीरिकता हा बहुतांशी प्रेमाच्या संबंधाचा पाया असतो. ती एकतर्फीही असू शकते. असली तरी ती ओळखून एका अंतरावरून झेलायला शिकायला हवं. पावसाळा आनंदात जाणार असेल तर त्याला ती भेट देण्याचा मोठेपणा मनात हवा. शारीरिक संबंध आले नाहीत, होऊ शकले नाहीत या कारणानं अनेक नाती अतिशय गूढ आणि दाट होत जाण्याची शक्यता असताना आपण फार पटकन शारीरिकतेचा ठोस आग्रह धरत नात्यांची मजा संपवून टाकतो. याचं कारण त्याविषयी आपल्या मनात सतत असलेलं दडपण.

शारीरिक संबंध ही प्रेमाची पावती असू शकत नाही. तो प्रेम करण्याचा एक मोठा उद्देश असतो. काही वेळा तो उद्देश आपोआप आणि शांतपणे सफल होतो तर काही वेळा त्याच्या कोमटपणावर, उष्णतेवर आणि धगीवर अबोलपणे वर्षानुवर्षं दोन माणसांमधलं नातं फार मस्त आकार घेतं. याची मजा घेण्याची प्रवृत्ती जोपासायलाच हवी. शरीर सापडत जायला हवं. ते स्वप्नांमध्ये रंगवता यायला हवं. त्यासाठी ते न ठरवता अचानक कधी इकडून कधी तिकडून दिसायला हवं. त्यासाठी पाऊस असतो, मोठ्या गळ्यांचे सुंदर कपडे असतात, दरवाज्यांच्या फटी असतात. पहिल्या काही तीव्र शारीरिक संबंधांनंतर, शरीराची सरप्राईझेस्‌ जर संपली तर त्या दोन व्यक्तींना नात्याचा बाज टिकवून ठेवायला पुन्हा नव्यानं एकमेकांना काहीतरी सादर करावं लागतं. त्यापेक्षा ते होईल तेव्हा होऊ द्यावं. आपोआप.

प्रेमाप्रमाणेच शारीरिकता ही काही एका व्यक्तीशी बांधली गेलेली नसतेच. आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आपल्याला अनेक शरीरं आवडतात. काही जुन्या शरीरांमधला रस उडतो आणि नवी खुणावतात. ते सगळं होणं फार सुंदर आहे. शिवाय ते अपेक्षितही आहे. त्यामुळेच तर आपल्याला जाणिवांची वृद्धी होते. हे जर मान्य केलं नाही आणि आपल्याच दोघांच्या एकमेकांच्या शरीराची अट कुणी कुणावर घातली तर कालांतरानं कोणीतरी एक न सांगता त्याच्या सहजप्रवृत्तीनं जे करायचं ते करतोच. आपल्या आयुष्याचं अत्यंत पारंपरिक स्वरूप जगाला दाखवत बसणारे लोकही ते टाळू शकत नाहीत. मग त्यातून लपवणूक आणि त्रास होतो. भावनिक हिंसा तयार होत जाते आणि आपल्यापाशी असलेला सगळा आत्मसन्मान माणसं या कारणी घालवून फार बिचारी होऊ शकतात. त्यापेक्षा रात्री दोघांपैकी कुणी घरी आलं नाही तर दार लोटून घेऊन शांत झोपावं. काही दिवस आजमवावं, गप्पा मारून मोकळेपणा ठेवावा. माणसं नेहमी सगळीकडे फिरून परत घरी येतातच. ती आपलीच असतात.

शारीरिक संबंध आले म्हणजे आपण दुसर्‍या व्यक्तीला आपले सर्वस्व दिले असं वाटणं म्हणजे एक सिनेमाकादंबर्‍यांमधून आलेला बावळटपणा आहे. आपला ‘स्व’ हा इतका स्वस्त असतो का, की तो या अनुभवानं लगेच गमावल्या जाऊ शकतो? हे सर्वस्व देण्याच्या भावनेचं खूळ इतकं प्रगाढ आहे की शारीरिक संबंध एकदा आला की लगेगच त्यापुढे प्रेम करण्याची सक्ती केली जाते. अनेक वेळा ते अव्यवहार्य असतं कारण पुन्हा लग्नाप्रमाणे शारीरिकतेचा प्रेमाशी संबंध असेलच असं नाही. आजच्या काळात जेव्हा मोकळेपणानं शारीरिक संबंध पहिल्या काही भेटींमध्ये होतात तेव्हा त्याचं स्वरूप आकर्षणाची धग शांत करण्याचं असतं. एकमेकांचा स्पर्श ओळखण्याचं आणि संवाद साधण्याचं असतं. कोणत्याही स्वरूपात ते सर्वस्व देण्याचं कधीही असू शकत नाही. अगदी लग्नाच्या नात्यातही नाही. नशिबानं आपण आता अशा काळात आहोत जिथे शारीरिकतेचा पुनरुत्पादनाशी कोणताही अपघाती संबंध नाही. असं असताना एकमेकांना दिल्या घेतलेल्या आनंदाची पुनरावृत्ती करण्याची सक्ती कुणीही कुणाला का करावी? तसं झालं तर वारंवार होणार्‍या किंवा न होऊ शकणार्‍या शारीरिकतेतून किती चांगलं प्रेम फुलत जाऊ शकतं! ते करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळायला हवं. ही निसर्गाची प्रेरणा आहे.

जर कुणावर कसलाही हक्कच सांगायचा नसेल तर मग प्रेम करणं ह्या गोष्टीला काय अर्थ उरला, अशी बर्‍याच जणांची समजूत असते. पण वर्षानुवर्षं टक्केटोणपे खाऊन, मनाला खोट्या समजुतीत पाडून, हक्काचं वजन तयार करून आपण प्रेमात असल्याचा देखावा जगापुढे साजरा करण्याची वेळ आपल्यावर कधीही येऊ नये. आपल्या मनातलं एखाद्या व्यक्तीवरचं प्रेम संपलं आहे हे ओळखायला आपण घाबरतो. ओळखलं तरी ते कबूल करणं आणि पुन्हा प्रेमात पडायला मनाला सक्षम करणं हे धाडसच आपण करत नाही.

आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रेमात पडून ते निभावणार्‍या व्यक्ती धाडसी असतात. खर्‍या असतात. पण आपल्या मनातले न्यूनगंड, परस्परांची झापडं आणि आपल्यातल्या भावनिक समृद्धीच्या अनुभवामुळे आपण लगेचच त्या व्यक्तींची ‘व्याभिचारी’ म्हणून हेटाळणी करून टाकतो. पण मनातल्या मनात प्रत्येकजण आपण तसं करू शकत नाही म्हणून कुढत असतो.

अनेक प्रेमं पचवून आणि रिचवून त्याचा गोतावळा सांभाळणारे स्त्रीपुरुष किती तेजःपुंज असतात. त्यांच्या मनाला आणि शरीराला सतत एक झळाळी असते. मला अशी अनेक माणसं माहिती असण्याचं आणि त्यांच्याशी दोस्ती असण्याचं सुदैव लाभलेलं आहे. त्या व्यक्ती सतत कात टाकत असतात. होत्याच्या नव्हत्या होतात. स्वरूपं पालटतात. ताण सहन करतात आणि बंद झालेल्या गुहांचे दगड फोडून वारंवार मोकळ्या प्रदेशात जात राहतात. त्या व्यक्तींना मनं आणि शरीरं हाताळण्याची सुंदर लकब गवसलेली असते. मध्ये येणार्‍या अंधार्‍या खोल्यांची, थरकाप उडवणार्‍या एकटेपणाची त्यांची भीती गेलेली असते. ते सगळं प्रेमासोबत येणार हे ते उमजून असतात. आपण बसलेलं विमान आपल्याला हवं तिथे कधीच उतरणार नसतं.

गरजेपेक्षा जास्त वर्षं फक्त एकमेकांसोबतच राहिलेल्या दोन माणसांना शेजारी-शेजारी उभं करून त्यांचा फोटो काढून पाहिला तर त्यांचे चेहरे बघून त्यांच्या नात्याविषयी सर्व कल्पना येते. बहुतेक वेळा खिन्न-हसते चेहरे असतात ते. त्यांच्या दारंखिडक्या नसलेल्या घराची गोष्ट सांगत असतात. आम्ही चाळीस वर्षं एकत्र काढली. पण कशी? एकटं पडण्याच्या भीतीनं एकमेकांना गच्च आवळून? की मोकळेपणानं-समजुतीनं अंतर कमीजास्त ठेवून? त्याउलट कोणत्यातरी प्रवासात महिनाभर भेटलेल्या आणि परत कधीच न सापडलेल्या मित्रांचे आणि मैत्रिणींचे फोटो पाहिले तर त्यांच्या चेहऱयावरचे भाव, ओसंडून सांडणारा आनंद पाहून मला तरी ते आयुष्य नक्की जगावंसं वाटेल.

माणसं आयुष्यात येणं जितकं साहजिक असतं तितकंच ती सोडून जाणंसुद्धा साहजिक असतं आणि त्या दोन्ही गोष्टी सोप्या नसतात. पण माणूस सोडून जाताना मनावर आणि अंगावर काही हलकी खूण सोडून गेला तर मात्र त्या ताटातुटीसारखा दुसरा एकमेवाद्वितीय अनुभव नाही.

आपण जागं व्हावं तेव्हा ती व्यक्ती शेजारी नसावी. बाहेर पाऊस पडत असावा. चिठ्ठीबिठ्ठी काही नसावी. पण आपण रात्री उतरवून ठेवलेलं काहीतरी ती व्यक्ती गुपचूप घेऊन गेली असावी. आपल्याला आनंदी थकव्यानं पुन्हा ग्लानी यावी हा आनंद सकाळी त्या व्यक्तीला दात घासताना बघण्याच्या आनंदापेक्षा किती चांगला आहे. तो प्रत्येकाला मिळो.

नात्यात नेहमी येऊन जाता आलं पाहिजे. येता यायला हवं आणि जाताही यायला हवं. केव्हा जायचं आहे हे जेव्हा एकमेकांना कळतं त्या माणसांची प्रकरणं सतत ताजी आणि मोहक राहतात. पण ते सगळं सापडायला थोडा वेळ लागतो. मधली वाट बघण्याची वेळ पण आवडायला लागते. परत घरी कुटुंबकबिल्यात जाऊन दात घासणार्‍या व्यक्तींकडे पाहून एक साळसूद हसू बाळगणं शिकून घ्यायला लागतं. असं सगळं चालू असलं की हातून फार चांगलं लिहून होतं, गाणी होतात, चित्रं उमटतात आणि साधा चहा बनवला तरी त्याला फार अस्मानी चव येते.

सतत कुणाचीतरी सोबत असण्याचा अलिखित नियम हे भारतीय समाजाचं फार मोठं दुर्दैव आहे. त्यातली सोबत महत्त्वाची न राहता ‘सतत’ हा शब्द फार मोठा करून ठेवला आहे आपण. टोळ्यांनी आणि जोडीनं सतत जागायला आपण आता रानावनातली किंवा कृषिसंस्कृतीतली माणसं उरलेलो नाही. आपल्यापैकी अनेकांना सोबत असण्याच्या पलीकडे, फक्त एकट्यानं शोधण्याचे, अनुभवण्याचे आयाम सापडते आहेत. पण तसं जगणं समृद्ध होऊ शकेल अशा आयुष्याच्या नव्या रचना, नवी-मोकळी नाती लेबल न लावता तयार करायला आपल्याला दुर्दैवानं घरात शिकवलं जात नाही. फोनच्या डिरेक्टर्‍यांप्रमाणे आपली नात्यांची लेबलांची डिरेक्टरी फार आऊटडेटेड झाली आहे. त्यात अनेक नवी माणसं नाहीत. अ‍ॅड करायची सोय नाही.

अनुभव घेणं ही नेहमीच एकट्यानं करायची गोष्ट असते. ती जोडीनं करत बसता येत नाही. तुम्ही कितीही आकंठ प्रेमात बुडाले असलात तरीही. अनुभव जेव्हा मनात मावत नाही तेव्हा तो सांगितला जातो आणि यावेळी तो नक्की समजणार्‍या माणसासोबत गाढ होत जाते. त्याला समजुतीचं आणि ओळखीचं अंगण आणि कुंपण येतं. मग दिवाणखाना येतो आणि समजुतीचंच शय्यागृह येतं. त्यात इतरांना प्रवेश नसतो.

सगळ्यांना सगळं कधीच समजत नसतं हे यामागचं कारण आहे. एकाच माणसाला आपण म्हणत असलेलं सगळं समजावं असं वाटणं हीतर जवळजवळ हिंसा आहे. यातच आपल्या आयुष्यात एकापेक्षा जास्त जोड्या तयार होण्याचं सोपं आणि साधं कारण आहे.


***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' (दिवाळी - २०१३)


***

हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल सचिन कुंडलकर व सुजाता देशमुख (मेनका प्रकाशन) यांचे मनःपूर्वक आभार.


***
विषय: 
प्रकार: 

फार सुंदर लिहिलय! स्वत:ची प्रेमात पडल्यावरची खरी मेंटल प्रोसेस अत्यंत चपखल शब्दांत मांडली आहे. बरेचसे दृष्टिकोन त्यांचे वैयक्तिक द्रूष्टिकोन आहेत आणि त्यांनी स्वतःच लिहिलय त्याप्रमाणे माणूस स्वत:च्या मानसिक आणि शारिरिक गरजांमुळे प्रेम शोधायला बघतो त्यामुळे सगळ्यांनाच त्यांचा दृष्टिकोन पटेल असं नाही.एखाद्याला तशी काही गरजच नाही म्हंटल्यावर प्रश्नच मिटतो त्यामुळे ज्यांना गरज आहे किंवा नाही ह्यांनी एक मेकांना मुर्ख ठरवण्यात काहीच अर्थ नाही. ज्यांना अशा काही गरजा आहेत त्यांनी त्या कशा भागवाव्यात ह्याची फार सुरेख पद्धत मांडलीये कुंडलकरांनी.

मला फार आवडलं ते म्हणजे प्रेमात "अंतर" आहे ह्या गोष्टीकडे नकारात्मकपणे न बघता त्यातून निर्माण होणार्‍या ओढीला स्विकारणे आणि त्याहीपेक्षा त्यातली मजा जाणून ती पुरेपुर उपभोगणे हा विचार. खुप सुंदर, तरल आणि माझ्यामते प्रेमाचे मचुअर असे स्वरुप मांडले आहे.
लेख इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद चिनूक्स! Happy

मला हा लेख आवडला. विशेषतः
>> प्रेमाची खरी मजा ते होताना कुणालाही न कळण्यामध्ये
हा भाग.

बाकी 'अफेयर', तेजःपुंज वगैरे गोष्टी मी सोडून दिल्या. Happy मूळ मुद्दा एकदम पटणेबल आहे. की मनुष्य हा एक-जोडीदार-व्रती प्राणी नाही. त्यामुळे एकदा प्रेमात पडून झाल्यावर (!) दुसर्‍या कोणाच्यातरी प्रेमात पडणे यात विशेष नाही. शिवाय १:१ हा तसाही पाश्चिमात्य Wink नियम आहे. आपल्याकडे बहुपत्नित्वाची प्रथा हल्ली हल्ली पर्यंत होती. लग्नाचा करार/ कमिटमेंट ही मुख्यत्वे त्यातून उत्पन्न होणारी संतती / संपत्ती सांभाळण्याच्या दृष्टीने आहे. त्यामुळे
>> नशिबानं आपण आता अशा काळात आहोत जिथे शारीरिकतेचा पुनरुत्पादनाशी कोणताही अपघाती संबंध नाही.
हा मुद्दा महत्त्वाचा आहे असे मला वाटते.

म्हणजे एका वाक्यात सांगायचे तर फॅमिली युनिट म्हणून जबाबदार्‍या (होम लोन, मुले बाळे, दुखणीखुपणी) निभावण्यासाठी टीम म्हणून एका जोडीदाराशी लग्न करावे; पण त्या जोडीदाराच्या वेळ, विचार, शरीरावर मोनोपली सांगू नये. हा विचार मला पटतो. कुंडलकरांचे म्हणणे असे वाटले की असे मुक्त राहिल्याने सर्जनशीलता वाढते; एकंदरित आनंदी वाटते वगैरे तर तो त्यांचा अनुभव/ मत म्हणता येईल. ते सिद्ध करण्यासाठी रँडमाइज्ड डबल ब्लाइंडेड क्लिनिकल ट्रायल घेणे कठीण आहे. Wink

रँडमाईज्ड डबल ब्लाईंडेड क्लिनिकल ट्रायल...

ही ट्रायल डबल ब्लाईंडेड कशी होईल?
क्लायंटला आपण मोनोगॅमस गटात आहोत की पॉलीगॅमस हे कळेलच ना?
Wink

फारतर सिंगल ब्लाईंडेड करता येईल.

मनुष्य हा मोनोगॅमस प्राणी नाही लिहिल्यावर लगेच आपल्याकडे बहुपत्नीत्वाची प्रथा आहे हे लिहिल्याने हा प्रतिसाद फारच स्फोटक झाला आहे.
म्हणजे
-एकतर बायका या मनुष्य नसतात.
-बायका या पॉलिगॅमस नसतात
असा काहितरी स्वर लागतोय.
तर माझ्याकडून याचा निषेध!
Wink

कुंडलकरचे जे काही वाचले ऐकले त्यात तो खुपच एकांगी विचार करतो असे मला वाटले. ह्या वरच्या लेखातही ते जाणवते.... नी, वरदा, अकु, अगावा +१

पेशवा +१

लेख चांगला आहे. पण नंतर थोडासा आऊट ऑफ फोकस वाटतोय. मी आधीच्या प्रतिक्रियेत म्हटलं तसं, या लेखाने अनेक प्रश्न पडले. म्हणून पुन्हा पुन्हा वाचला. मुक्त प्रेमाचा मुद्दा पटला. पण मुक्त शारिरिकतेबद्दल लिहीताना पुन्हा शारिरिकता प्रेमाशी रिलेट कशाला केली आहे? म्हणजे 'सो कॉल्ड व्याभिचार' ग्लोरिफाय करायचा आहे का? का तो व्याभिचार नाहीच असं म्हणायचं आहे?

परत घरी कुटुंबकबिल्यात जाऊन दात घासणार्‍या व्यक्तींकडे पाहून एक साळसूद हसू बाळगणं शिकून घ्यायला लागतं >>> हे तर अजिबात नाही पटलं. हा एकदम करून सवरून मी मोकळा असा स्टँड वाटतोय.

माझ्यामते जे कुठलं नातं आहे, लग्नाचं आणि लग्नाबाहेरचं, त्यात फसवणूक नसावी. हे नात्यांच्या आत-बाहेर करणं आतल्या आणि बाहेरच्या नात्यांना माहीती असावं आणि मान्यही असावं. जे चाललंय ते म्युच्युअल असावं. इथे मला दुसर्‍या बाजूचा विचार केलेला दिसत नाहीये.

अजूनही लेख समजून घ्यायच्या प्रोसेस मधे आहे. सो फार पडलेल्या प्रश्नांपैकी काही मांडले.

मला फार बेसिक प्रश्न पडत आहेत! कुंडलकरांना ह्या लेखात अपेक्षित असलेलं प्रेम एकतर्फी नाहीये ह्या समजुतीतून खालची वाक्य लिहिली आहेत! (जर तसं नसेल तर मला माफ करा!!)

मी दुसऱ्या व्यक्तीशी कसं वागावं तर दुसऱ्याने माझ्याशी जसे वागलेले मला आवडेल तसे मी दुसऱ्याशी वागावे अशा मताची मी आहे. अर्थात जे माझ्या बाबतीत घडू नये असं मला वाटतं ते मी दुसऱ्याच्या बाबतीत घडू देणार नाही. आणि मी नाही सहन करणार माझ्या पार्टनरचं "अफेयर"! मला माहिती नाही मी नक्की काय करेन पण आनंदाने accept नक्कीच करणार नाही. I will certainly not find that romantic! Get out of the relationship with me and do whatever you want. But don't cheat on me.It is not okay!

ज्यांना हा लेख पटला/आवडला/भावला आहे त्यांना मला विचारायचे आहे की हे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रेमात पडणे वगैरे ऐकायला फार romantic आहे (yeah, of course!) पण उद्या तुमच्या जोडीदाराने असे केले तरी तुम्हाला ते romantic च वाटेल का? आणि जर ते romantic वाटणार नसेल तर मग हा दुटप्पीपणा नाही का?

लेख काहीच्याकाही मोठा झालाय त्यामुळे शेवटपर्यंत वाचायचा जरा कंटाळाच आला. आवडला/ नाही काही कळत नाहीये. हे असं सगळं पुस्तकांमध्ये वाचायलाच बरं वाटतं. रिअल लाईफमध्ये झाल्यास डोकेदुखी होऊ शकते. वाचताना मधेच मला तेरूओची आठवण आली.

माझ्यामते जे कुठलं नातं आहे, लग्नाचं आणि लग्नाबाहेरचं, त्यात फसवणूक नसावी. हे नात्यांच्या आत-बाहेर करणं आतल्या आणि बाहेरच्या नात्यांना माहीती असावं आणि मान्यही असावं. जे चाललंय ते म्युच्युअल असावं. इथे मला दुसर्‍या बाजूचा विचार केलेला दिसत नाहीये.>>

मी दुसऱ्या व्यक्तीशी कसं वागावं तर दुसऱ्याने माझ्याशी जसे वागलेले मला आवडेल तसे मी दुसऱ्याशी वागावे अशा मताची मी आहे. अर्थात जे माझ्या बाबतीत घडू नये असं मला वाटतं ते मी दुसऱ्याच्या बाबतीत घडू देणार नाही. आणि मी नाही सहन करणार माझ्या पार्टनरचं "अफेयर"! मला माहिती नाही मी नक्की काय करेन पण आनंदाने accept नक्कीच करणार नाही. I will certainly not find that romantic! Get out of the relationship with me and do whatever you want. But don't cheat on me.It is not okay!>>

ही दोन मते वाचून मला शबानाचा मासूम आठवला. जेंव्हा तिला आपल्या पतीच्या जुन्या संबंधाबद्दल कळते तेंव्हा तिची होणारी मानसिक तळमळ शबानाने खूप छान रित्या पडद्यावर चितारली आहे.

वर जी मते मांडली आहे ना माझ्यामते लेखक नेमक्या ह्या दोन मताबद्दल बोलतो आहे की जर तुम्हाला तुमच्या उदा. नवर्‍या वा बायको च्या प्रेमाबद्दल माहिती पडले तर त्याला सहजपणे स्विकारा आणि तुम्ही सुद्धा एकदा स्वतःमधे डोकावून बघा की तुम्हाला असे एखादे प्रेम आहे का जे तुम्ही नाकारले, त्याचा बाऊ केला, चालीरिती समाज ह्यांना घाबरलात, स्वत:ची कमीटमेन्ट मधे आणलीत आणि जोडीदाराने आपल्याशी प्रतारणा केली असे वाटून घेतले. मग ते नाते तोडले वा तोडून टाकावे असेही तुम्हाला वाटले. सचिन नेमक्या ह्या प्रश्नाबद्दल इथे बोलतो आहे.

मासूम मध्ये सुप्रिया मेलेली असते, नसिरही मूव्ह ऑन झालेला आहे. तिचे मूल स्वीकारायचं की नाही एवढाच शबानापुढे प्रश्न असतो. (तो सोडवणे ही सोप नाही हे मान्य). पण इथे जि किंवा रमड म्हणत आहे ती इजाजत सारखी सिच्युएशन - अनुराधा पटेल घरातून गेली तरी नसिर अजूनही मनातून गुंतलेला आहे. रेखाला तिच्याबद्द्ल माहिती आहे पण तरी तिला नसिर तेजःपुंज वाटत नाही!!

तिचे मूल स्वीकारायचं की नाही एवढाच शबानापुढे प्रश्न असतो.>>

हे अस वाटण फार वरवरच आहे.. आतमधे अजून खूप काही दुखावलेलं असतं.

प्रेम करुन प्रतारण "न" करणे ही एक बाजू मासूममधे दाखवली आहे. तर प्रेम करुन प्रतारणा करणे ही बाजू 'अर्थ' मधे दाखवली आहे. त्यामुळे, रमड वर तू जे व्याभिचाराबद्दल बोललिस ना तर सचिन इथे हे म्हणत आहे की तुम्ही प्रेम करा पण कुणाशी प्रतारणा करु नका. कुणाची फसवणूक करु नका. प्रेम हे आदर्श राहू द्या.

==
जर हा लेख युरपमधे किंवा अमेरिकेमधे लोकल भाषांंमधे जर अनुवादीत करुन प्रकाशित केला तर ती लोक म्हणतील हा लेख लिहायची तशी गरज नाही. आमच्या कल्चर मधे हे सगळे उघडपणे चालत.

जर हा लेख युरपमधे किंवा अमेरिकेमधे लोकल भाषांंमधे जर अनुवादीत करुन प्रकाशित केला तर ती लोक म्हणतील हा लेख लिहायची तशी गरज नाही. आमच्या कल्चर मधे हे सगळे उघडपणे चालत.
>>>
बी, तुम्ही तुम्हाला काय वाटते ते जरूर लिहा. मात्र अशी सरसकट चुकीची विधाने करु नका. मी जवळून बघितलेल्या युरोपातील दोन देशात व आत्ता इथे अमेरिकेतील राज्यातल्या संस्कृतिमध्ये ओपन मॅरेज, पॉलिगामी, अफेअर्स, विवाहबाह्य/रिलेशनबाह्य संबंध ना उघडपणे चालतात ना त्याला समाजमान्यता वा प्रतिष्ठा आहे. नवरा-बायको वा बॉयफ्रेन्ड्/गर्लफ्रेंड हे आपल्या जोडिदाराकडून वर्तमान नात्याबाबत निष्ठा असणे अपेक्षित धरतात.
प्रतारणेचे जितके भारतात प्रमाण असेल तितकेच कदाचित इथे असेल.
भारत व इथला एक महत्त्वाचा फरक म्हणजे भारतात शारिरीक संबंध हे बहुतांश (किमान मागल्या माझ्या पिढीपर्यंत) लग्नापासून सुरू होत तर पाश्चिमात्य संस्कृतिंमध्ये त्याचा लग्नाशी'च' असलेला संबंध तुटलेला आहे.

मी जवळून बघितलेल्या युरोपातील दोन देशात व आत्ता इथे अमेरिकेतील राज्यातल्या संस्कृतिमध्ये ओपन मॅरेज, पॉलिगामी, अफेअर्स, विवाहबाह्य/रिलेशनबाह्य संबंध ना उघडपणे चालतात ना त्याला समाजमान्यता वा प्रतिष्ठा आहे>>

टण्या, तुझ्यापेक्षा जास्त देश मी पाहिले आहेत आणि भारताबाहेर माझा सहवास २० वर्ष जुना आहे. मी अनेक लोकात मिसळलेलो आहे. फक्त आपल्या भारतिय बुद्धीला वा आशियामधील लोकांच्या बुद्धीला हे असे संबंध पटत नाही. अमेरिकेत किती पटापट ही लोक आपला जोडीदार बदलतात. त्याची, तिची मुले स्विकारतात. हॉट डेटींगला जातात. नाईटलाईफचा अनुभव घेतात. नाही पटले तर वेगळे होतात. घटस्पोट घेतात. आणि हे सगळ काही सहज करतात. ह्यातले एक टक्काही आपण करत नाही. कदाचित तु ज्या लोकांमधे मिक्स अप होत असशील तो समूह फार वेगळा असेल. पण आम जनतेला हे प्रेमप्रकरण फार आम वाटते तिथे असे माझे निरिक्षण आहे.

आणि प्रश्न प्रतिष्ठेचा नाही तर मला माझे आयुष्य आनंदाने घालविण्याच्या स्वातंत्र्याचे आहे. जर प्रतिष्ठेचाच विचार केला तर मग लग्न केलेल्या जोडीदाराला भर रस्त्यात किस करणेही प्रतिष्ठीत नाही.

सचिन इथे हे म्हणत आहे की तुम्ही प्रेम करा पण कुणाशी प्रतारणा करु नका. कुणाची फसवणूक करु नका. प्रेम हे आदर्श राहू द्या. >>>
बी, सचिन हे असं नेमकं कुठे म्हणालाय ते काही मला सापडलं नाही.

या लेखाप्रमाणे वागायचं असेल तर लग्न/कुटुंब पद्धत डिझॉल्व्ह करून टाकावी. म्हणजे कोणालाच प्रॉब्लेम नको. हे असं आवडतात त्या त्या व्यक्तिंबरोबर राहाणं आणि अशी सगळी नाती सांभाळताना हातचा एक ठेवणं हे तितकंसं पटलं नाही. माझं मत इतकंच आहे की हे असं करायचंच असेल तर तुमच्या या सगळ्याच नात्यांना त्याची कल्पना द्या. प्रेम आहे तर मान्य करा ओपनली. लपवणं तरी कशाला? साळसूदपणे घरी परतून एकनिष्ठतेचे दावे करू नका. याचा कुठेतरी उल्लेख व्हायला हवा होता असं नक्कीच वाटलं. नाती आदर्श नकोत एकवेळ पण निदान पारदर्शक तरी असावीत.

रमड, तुला असे नाही वाटत का तुझी ही अपेक्षा खूप जास्त आहे??? आयुष्याच्या वेगवेगळ्या सेट अपसेट मधे खूप काही घडत असते. कधी नकळत तर कधी वाहून जातो मनुष्य म्हणून घडत. जर जोडीदाराने पारदर्शन रहावे म्हणून सगळ काही सांगितल तर तडा जाऊ शकेल त्या नात्याला. तेंव्हा प्रतारणा न करता आपल्या आयुष्यातील काही भाग खाजगी ठेवलेलाच जास्त बरा ह्या विचारचा मी आहे.

ज्यांना हा लेख पटला/आवडला/भावला आहे त्यांना मला विचारायचे आहे की हे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रेमात पडणे वगैरे ऐकायला फार romantic आहे (yeah, of course!) पण उद्या तुमच्या जोडीदाराने असे केले तरी तुम्हाला ते romantic च वाटेल का? आणि जर ते romantic वाटणार नसेल तर मग हा दुटप्पीपणा नाही का?>>

वाइट नक्कीच वाटेल.romantic नाही वातणार. पण मझ्या नात्याचा पराभव शांतपणे स्वीकारुन पुधे जायला आवदेल.पोरे बाळे आणी पैशांचा प्रश्न असेल तर त्या front वर पुरेशी security मात्र वसुल करणार सर्व कायदेशीर बाबीम्चा विचार करुन.

इथे मात्र मध्यमवर्गीय जोडीदाराला गोष्टी जड जाउ शकतात. Happy

अगदी मान्य. वाहून जातो म्हणून घडत असेलही. पण पुन्हा पुन्हा वाहून जाणं मान्य नाही. एकदा होऊ शकतं. सतत घडलं तर वाहून जाणं कसं? ते मुद्दाम उडी घेण्यासारखं आहे. अपेक्षा अ‍सलीच तर इतकीच आहे की 'मी वाहून गेलो/गेले आणि ते तसं वाहणं मला आवडतंय' हे तुम्ही तुमच्या लग्नाच्या जोडीदाराला सांगणं आणि 'मी फक्त वाहवतोय/वाहवतेय, यात मला गुंतून पडायचं नाहीये. मी माझ्या घरीच परतणार आहे' याची कल्पना आधीच तुम्ही प्रेम करताय त्या माणसाला देणं. निरपेक्ष प्रेम वगैरे कथाकवितांमधे तरी असतं किंवा ती एक अंधश्रद्धा असते. मानसिक गुंतवणूक होत राहते, वाढत राहते आणि ते नॅचरल आहे. आणि असं झालं की मग या प्रेमात पडलेल्या दुसर्‍या व्यक्तिने काय करायचं?

आपल्या सोयीनुसार मुक्त प्रेम ही कन्सेप्ट वापरू नये असं मला वाटतं. तुम्ही प्रेमात पडलात तेव्हा ज्या सिच्युएशन मधे होतात त्या तश्याच राहात नाहीत. सो तो बदल दोन्ही बाजूंकडून तसाच स्वीकारला गेला आहे का हे वेळोवेळी पडताळून पाहीलंच पाहीजे. एका माणसाचा पाय अडकलेला आणि दुसरा मोकळा असं नसावं ही अपेक्षा जास्त आहे असं मला तरी नाही वाटत.

तेंव्हा प्रतारणा न करता आपल्या आयुष्यातील काही भाग >>> प्रतारणा तर झालेलीच असणार ना ऑलरेडी! ती न करता हा मुद्दा कसा येतो? आणि प्रतारणा कोणाशी नेमकी? काय व्याख्या आहे प्रतारणेची?

arc, पण मझ्या नात्याचा पराभव शांतपणे स्वीकारुन पुधे जायला आवदेल.>>नात्याचा पराभव? मला नात्याचा पराभव होण्यापेक्षा अपमान झाल्यासारखं वाटेल.

रमड, सगळ्या मुद्द्यांना +१ आणि आधीच्या अकुच्या मुद्द्यांना पण +१ कारण मला जे म्हणायचं आहे ते व्यवस्थित मराठीत ती लिहिते आहे. का कोण जाणे ह्या विषयावर पटापट मराठीतून लिहिणं जमत नाहीये..शब्द/वाक्य सुचत नाहीयेत.

बी, सरसकटीकरण कशाला? प्रत्येक समाजात सर्व प्रकारची माणसं सापडतात. ही खूप पर्सनल गोष्ट आहे आणि समाजाच्या धारणेवरून त्यातील प्रत्येक व्यक्तीबद्दल मत बनवता येणं शक्य नाही. चित्रपटाची उदाहरणं काही खरी नव्हेत..ती गोष्ट असते फक्त!
मी पर्सनल प्रश्न विचारला आहे कारण मला माझ्या विचारांपेक्षा वेगळे विचार ऐकायचे आहेत. I am open to them. I am curious to hear the other angle. मला पटतील किंवा नाही ती वेगळी गोष्ट आहे.

चर्चा छान सुरु आहे. लेख पूर्ण वाचला नाही..खूपच मोठा आहे.

लेख लिहिणारा स्वतःच्या रेफरन्स पॉईन्टने लिहितो, वाचणारा स्वतःच्या रेफरन्स पॉईन्टने इंटरप्रिट करतो.

इथे सचिन कुंदलकर हे लेखक-फिल्ममेकर ओपनली गे आहेत. त्यामुळे त्यांचा वेगळा perspective असू शकतो असं मला वाटतं. शिवाय त्यांचे रेफरन्स पॉईन्ट आहेत त्यामध्ये त्यांनी लिहिलय की लहानपणापासून खूप विवाहबाह्य संबंध बघितलेत...त्यानंतर भारतातील LGBT विश्व बघितलंय..चित्रपटसृष्टी बघितली आहे. All that has shaped his opinions, whereas some of us have opinions shaped and influenced by majority happy marriages within the traditional social norms that we have seen while growing up. मला कुठेतरी या लेखात 'गे' म्हणून होत असलेली या देशातली त्यांची घुसमट दिसली. मे बी, तुम्ही लग्न करुन सेटल असाल किंवा आज सिंगल असलात तरी पुढेमागे तसा योग जुळून आल्यास लग्न करुन सेटल होण्याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध असला, तर तुम्ही लग्नसंस्थेच्या इतके विरोधात जाणार नाही? पण ज्यांना तो पर्यायच समाज देत नाही..त्यांना विवाहसंस्था, एकनिष्ठता फोल वाटू शकेल? आपल्याकडे साठीच्या पुढच्या आजीअजोबांनी लग्न केलं तर आपण कौतुक करतो, 'हाऊ क्यूट' म्हणतो (उदा. उत्तरायण चित्रपट)...पण हे सर्व स्ट्रेट लोकांसाठीच आहे.
दुसरं म्हणजे- with all the due respect and support to the LGBT movement, स्ट्रेट लोक LGBT चा point of view कितपत समजून घेऊ शकतात? आ णि LGBT स्ट्रेट लोकांचा point of view कितपत समजून घेऊ शकतात? म्हणजे एखादया पारंपारिक नवर्‍याला बायकोविषयी वाटणारा पझेसिव्हनेस, प्रोटेक्टिव्ह instinct, प्रेम किंवा पारंपारिक बायकोला नवर्‍याविषयी वाटणारं प्रेम, पझेसिव्हनेस, अभिमान, आधार हे लेखक पूर्णपणे समजून घेऊ शकलाय का? नसल्यास, ती inadequacy लेखात दिसते आहे का?

जिनज्ञासा पराअभ्वाऐवजी अप्मान झालाय हे मान्य केले तरी स्वतःला त्रास करुन घेनार नाही असे म्हनायचे आहे मला. समोरच्या मान्साने निर्णय घेतलाच आहे तर आपल आपण स्वार्थ बघावा ह्या मताची मी आहे.
सगळीकडे अस्मितेचे प्रश्न आनता येत नाहीत.
अर्थात हा approach वाधत्या वयाचा परिणाम आहे.

विषय निघालाच आहे तर माझ्या ओलखीतलि केस म्ला माहीत आहे. एका मुलीचे वयाच्या २१ व्या वर्‍शी गे मुलशी लग्न झाले. मुल्गा स्वभावाने गोड होता.लग्नानंतर दोघे पर्देशी राहणार होते. पण तो गे आहे कलल्यावर ही चिडली आणि ६ महिन्यात घतस्फोट केस केली.त्यनीही काही आधेवेधे न घेता घतस्फोटाला मान्यता दिली..त्या नंतर अत्यंत वाइट घरात हिचे लग्न झाले. पुरेसा छळ सहन केल्यावर तिथुन बाहेर पडली.

सुदैवाने पायावर उभी आहे, पण तिला मनापासुन वातते पहिल्या नवृयाला घटस्फोट नसता तर बरे झाले असते.

लग्नापासून सुरू होत तर पाश्चिमात्य संस्कृतिंमध्ये त्याचा लग्नाशी'च' असलेला संबंध तुटलेला आहे.>> हे मला नाही कळले.

१ अर्थ असा आहे कि ल्ग्न न करता दोन लोक शारीरिक संबध ठेवतात तर ठिक आहे.
२ रा अर्थ असा आहे की ल्ग्न बाह्य शारिरिक संबध कुठलीही मान्सिक गुंतवणुक न करता ठेवले तर ते तिथे चालते. असा नसवा अर्थ उर्वरित पोष्त वाचल्यास.

हा लेख मी माहेरमधे वाचला होता. त्याला परत का प्रसिद्धी दिली जातेय त्याची कारणे मूळ पोस्ट मधे वाचल्याची आठवताहेत. ( आता दिसत नाहीत. )

हा लेख प्रथम वाचताना तो आवडतो कारण हे काहीसे आपल्या मनातीलच सुप्त ईच्छांचे रुप आहे असे काही क्षण वाटते. पण जर बारकाईने वाचला तर ( निदान मला तरी ) काही उल्लेख आक्षेपार्ह वाटतात. हा लेख म्हणजे लेखकाची
वैयक्तीक मते आहेत हे मान्य असले तरी आक्षेपार्ह वाक्यांबद्दल माझीही, अर्थातच वैयक्तीक मते आहेतच.

लग्नानंतर जी माणसं पुन्हा कुणाच्या प्रेमात पडत नाहीत ती किती ओंगळ, कोरडी आणि कंटाळवाणी असावीत याची कल्पनाच न केलेली बरी.

नंतर कितीही आव आणला असला तरी लेखाचा भार शारीर प्रेमावरच आहे. असे प्रेम पुन्हा न करणारी माणसे ओंगळ ? काय पण शब्द योजलाय !

प्रकरणं करणारी माणसं, ठेवलेल्या बाया आणि ठेवलेले पुरुष हे नेहमीच आनंदी असतात. त्यांच्या आजूबाजूची माणसं मात्र सतत चिंतेत आणि खंगलेली असतात, असं मला दिसलं.

या वाक्याचा शेवट, असं मला दिसलं केलाय म्हणून ठिक आहे. एरवी अशी माणसं नेहमीच आनंदी असतात, असे
जनरलायझेशन मला अजिबात मान्य नाही. तसं असतं तर देवदासी प्रथा बेकायदेशीर का ठरवली असती. माझा तरी असा अनुभव आहे कि अशी माणसेही, केवळ नाईलाज म्हणून असे नाते स्वीकारतात. त्यांना मनोमन लग्न व्हावे असे वाटत असते. माझ्याच ओळखीत एका व्यक्तीने कोर्ट मॅरेज केले. त्यातून एक मूलही जन्मले. पुढे
साळसूदपणे दुसरे लग्न केले. पहिल्या लग्नाचा कायदेशीर घटस्फोट झालेलाच नव्हता. पहिली स्त्री केवळ स्वतःच्या मूलाला नाव लावायला मिळावे म्हणून कोर्टात पोटगीच्या दाव्यासाठी गेली. त्यानंतर अर्थातच दुसरी पत्नी, जिचे ( म्हणतात ना, देवा ब्राम्हणाच्या साक्षीने वगैरे तसे ) लग्न लागले होते ती त्या काळच्या व्याख्येप्रमाणे
रखेल ठरली. तिघांचे आयुष्य ( आज तिघेही हयात नाहीत ) मी जवळून बघितले. ते सुखी होते असे खचितच
म्हणू शकणार नाही. दुसरी स्त्री तर मनोरुग्ण झाली होती.

हे होण्याचं कारण, स्त्री-पुरुषांची प्रेम जमताच ताबडतोब होणारी लग्नं, भावाबहिणींची भाऊबीजछाप प्रेमं, शोलेतल्या जयवीरूछापाची मैत्रीची गाणी एवढ्या तीनच कप्प्यांत माझ्या समाजानं मानवी नाती बसवली होती. सगळ्यांनी त्या तीन कुंपणांतच राहायचं. त्या कुंपणाबाहेर सगळं दुःख, बेजबाबदारपणा, अविचार आणि अश्लीलता आहे, असं मानून निमूट जगायचं.

आज अशी परिस्थिती राहिलीय का ? इथे अगदी मायबोली या छोट्या गटात मोकळी नाती नाहीत का ?
बायकोचा मित्र किंवा नवर्‍याची मैत्रिण, या नात्याने उघडपणे कुणी कुणाच्या घरात जाऊ शकत नाही ?
काही अपवाद वगळता, आज अनेकजण मनाने मोकळे झालेत नाहीतर सगळेच झुंझारराव तरी झाले असते
नाहीतर राख्यांची मागणी तरी वाढली असती.

फार तर फार बारशी आणि मुलांच्या मुंजी होतात. हे मूळ वाक्य. फार फार तर.. अशी शब्दयोजना असेल असे गृहीत धरतो. अपत्यजत्य, त्याच्या आगमनाचा आनंद आणि सोहळा हे भव्यदिव्य नसते, हे मला अजिबात पटलेले नाही.

असं सगळं होण्याला इंग्रजीमध्ये ‘अफेअर’ का म्हणतात? हे जर फेअर नसेल तर मग दुसरं काय फेअर असू शकतं?

याबद्दल अनेकांनी वर लिहिले आहेच.. सेट - असेट, वॉर्ड - अवॉर्ड, सेंट - असेंट या जोड्या विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या म्हणून अभ्यासक्रमात घालाव्यात का ? का "मज्जा" संस्था आणि "नर्व्हस" सिस्टीम असा पीजे मानून पुढे जावे ?

पण दुर्दैवानं आपलं आधी लग्न झालं असेल आणि घरी पोरंटोरं असतील तर घरच्या बाया पुरुषांना अशावेळी फार त्रास देतात.

मुलांना उद्देशून जो शब्द वापरलाय तो मला घृणास्पद वाटतोय. कायदेशीर विवाहातून जन्माला अलेल्या मुलांची
जबाबदारी पुरुषांनी घेऊच नये असे लेखकाला सुचवायचे आहे कि त्याबद्दल त्याच्या जबाबदारीची जाणीव
मातांनी त्याला करुन देऊ नये असे सुचवायचे आहे. आफ्रिकेत या म्हणावं, इथे अजूनही हिच परिस्थिती आहे.
आणि आपल्याकडच्या हिंदु मॅरेजेस अ‍ॅक्ट खालचे पोटगीचे सर्व दावे निरर्थक आहेत, असेही मत आहे का ?

शारीरिक संबंध आले म्हणजे आपण दुसर्‍या व्यक्तीला आपले सर्वस्व दिले असं वाटणं म्हणजे एक सिनेमाकादंबर्‍यांमधून आलेला बावळटपणा आहे. आपला ‘स्व’ हा इतका स्वस्त असतो का, की तो या अनुभवानं लगेच गमावल्या जाऊ शकतो?

हे वाक्य मला मान्य आहे पण ते दुसर्‍या रेफरन्स मधे. पुरुषी अत्याचार झालेल्या स्त्रीला आपण सर्वस्वच काय काहिही गमावलेले नाही, असा विश्वास देऊ शकलो तरच तिला स्वतःला आत्मसन्मानाने जगता येईल. पण लेखात अर्थातच हा संदर्भ नाही.

अनेक प्रेमं पचवून आणि रिचवून त्याचा गोतावळा सांभाळणारे स्त्रीपुरुष किती तेजःपुंज असतात.

कोण ते ? चार्ल्स सोभराज, लखोबा लोखंडे ??

आपण जागं व्हावं तेव्हा ती व्यक्ती शेजारी नसावी. बाहेर पाऊस पडत असावा. चिठ्ठीबिठ्ठी काही नसावी. पण आपण रात्री उतरवून ठेवलेलं काहीतरी ती व्यक्ती गुपचूप घेऊन गेली असावी. आपल्याला आनंदी थकव्यानं पुन्हा ग्लानी यावी हा आनंद सकाळी त्या व्यक्तीला दात घासताना बघण्याच्या आनंदापेक्षा किती चांगला आहे. तो प्रत्येकाला मिळो.

हाऊ रोमँटीक !! यालाच वन नाइट स्टँड म्हणतात नै ? लिगलाईज्ड करुन टाकाच्चा का ? म्हणजेच प्रत्येकाला मिळेल नै का तो.

असं सगळं चालू असलं की हातून फार चांगलं लिहून होतं, गाणी होतात, चित्रं उमटतात आणि साधा चहा बनवला तरी त्याला फार अस्मानी चव येते.

या वाक्यातल्या की या अक्षरानंतर च हे अक्षर जोडलेले नाही.. मग माझी काहीच हरकत नाही.

एकंदर हा लेख मला अति आव आणून लिहिलेला वाटतो.... शिरेलींत हेच असते ना !

@ दिनेश.

फारच छान प्रतिक्रिया. खरंच तुम्ही एवढे कष्ट घेऊन लेखातल्या आक्षेपार्ह बाबी नेमकेपणानं मांडल्या आहेत. मला तर इतकेही कष्ट घ्यायची इच्छाच झाली नाही या तद्दन फालतू लेखाकरिता.

<हा लेख मी माहेरमधे वाचला होता. त्याला परत का प्रसिद्धी दिली जातेय त्याची कारणे मूळ पोस्ट मधे वाचल्याची आठवताहेत. ( आता दिसत नाहीत. )>
हे असं काहीही झालेलं नाही. या लेखाला प्रस्तावनेची गरज नाही, असं मला वाटतं त्यामुळे प्रस्तावना लिहिलेली नाही. आधीही नव्हती. तुम्ही प्रस्तावना कुठे वाचली, हे मला कळत नाही. Happy

हर्पेन,
मायबोलीवर हा लेख लोकांना वाचता यावा, त्यावर चर्चा व्हावी, हा लेख इथे प्रसिद्ध करण्यामागे हेतू आहे. 'हा'च लेख का, या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, अशी अपेक्षा आहे. Happy

Pages