'प्रकरण' - श्री. सचिन कुंडलकर

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

आपल्याला वाटत असतं की, आपण रोजचं जगणं अगदी आरामात जगतोय. खातोय. पितोय. हिंडतोय. काम करतोय. एकटे किंवा कुणासोबत. आणि वरती आकाशामध्ये तो ढग येऊन थांबलेला कळतही नाही आपल्याला.

असंच वाटत असतं की, आकाश तर अगदी निरभ्र आहे वरती. कारण खरं म्हणजे गेले अनेक दिवस आपण वर पाहिलेलंच नसतं. पण एकदा कधीतरी नजर वर जाते आणि सगळा मामला लक्षात येतो. आपण प्रेमात पडलो आहोत. पहिल्यांदाच किंवा पुन्हा एकदा.

आता तो ढग दिसल्यानं आपल्याला बरं वाटतं. आपण जाऊ तिथे तो आपल्यासोबत येतोच. सगळी छतं पारदर्शी होतात. रात्री गच्चीवर जावं, गावाबाहेर हायवेवर जावं, कामामध्ये अगदी स्वतःला बुडवून घ्यावं तरी आता नजर सतत वर जायची थांबवता येत नाही. आपल्याला हलकं वाटू लागलं, आपली सवयच बदलते आणि आपण नकळत एकटे असताना हसत बसलेलो असतो. ते आता आपल्या हातात उरलेलं नसतंच. आता प्यायला घेतलेल्या प्रत्येक पाण्यात तो ढग दिसू लागतो. तो असा मोठा मोठा का होत चाललाय, याबद्दल धास्ती वाटू लागते.

आयुष्यात हे वारंवार होण्याचा मोहक, तापदायक आणि लोभस अनुभव मी घेत आलो आहे. काही वेळा आधी गोंडस छोट्या शुभ्र असणार्‍या निरभ्र आकाशाची स्वप्नं पाहिली आहेत. ती खरी झाली आहेत. पण अगदी सगळ्यात पहिल्यांदा प्रेमात पडलो होतो, त्याआधी आकाशाचा जो निळा रंग होता, तसाच चमकदार निळा रंग आजही प्रत्येक ढगाच्या आगमनापूर्वी कसा काय तयार होतो, याचं आश्चर्य मला वाटायचं थांबलेलं नाही.

सध्या माझ्या डोक्यावरच्या विस्तीर्ण स्वच्छ निळ्या आभाळात एक हसरा छोटा ढग येऊन थांबलेला आहेच. पण तो बेटा आपलं आकारमान आळोखेपिळोखे देऊन विस्तृत करणार याबद्दल मला तीळमात्र शंका नाही.

प्रेम करणं ही माणसाच्या मनाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आपल्यावर कुणीतरी प्रेम करावं अशी इच्छा होणं, ही याच प्रवृत्तीची दुसरी सहज अशी बाजू. आपण प्रेमात पडण्याचं थांबवू शकत नाही. आपलं वय काहीही असो. आपण एकटे असू वा दुकटे. प्रेमाला शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही आयाम असतात. काही व्यक्ती हे दोन्ही हात पसरून आपल्याला जवळ घेतात, तर काही एका हातानंच आपल्याला कुरवाळत राहतात.

शारीरिक प्रेम करण्याची इच्छा प्रबळ होणं पण ते करू शकण्याची परिस्थिती नसणं, या नितांतसुंदर अवस्थेत त्या प्रेमात पडलेल्या व्यक्ती एकमेकांना काही वेगळ्या जाणिवांची तेजस्वी करत असतात. ही प्रेमाची अवस्था सगळ्या आसमंतात नवी अस्वस्थता तयार करणारी आणि मनाला नवी ऊर्जा देणारी असते. मी ह्या अवस्थेमध्ये पूर्वी तडफडत असे. तो आता या अवस्थेत रेंगाळायला उत्सुक आणि सक्षम झाला आहे.

सुरुवातीला आपल्या मनाच्या मागण्याच फार कमी असतात. आपोआप काही वेळा झालेल्या भेटी, डोळे, आपलं समोरच्या व्यक्तीनं केलेलं कौतुक, एकमेकांसोबत चालताना कमी जास्त करावा लागणारा वेग, जुळलेल्या आवडीनिवडी; आणि मग जर व्हायचंच असेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात. त्या व्यक्तीचं नाव जरी उच्चारलं गेलं तरी श्वास वेगळे पदन्यास करू लागतो. सोपेपणा आणि सहजतेवर कसलातरी आश्वासक दाब पडायला लागतो. लाल सिग्नलला उभं असताना, लिफ्टमधून वरखाली प्रवास करत असताना, पोहण्याच्या तलावात तरंगताना किंवा बीअरचा दुसरा ग्लास रिचवताना मन फार जड व्हायला लागतं आणि आठवण नावाची गोष्ट आपलं पाऊल मनात रोवते. आणि अचानक त्या व्यक्तीच्या आठवणीसोबत एक उष्मा मनात तयार होतो. पुढील काही दिवसांत त्याचं एक उष्णतेत रुपांतर होणार असतं. त्या उष्णतेचा निचरा करताना मनाची घालमेल उडते आणि आपण वाचत असलेली पुस्तकं, ऐकत असलेलं संगीत पाहत असलेला पाऊस, वावरत असतो ते रस्ते त्या सगळ्याचा ताबा नकळत ती व्यक्ती घेऊन टाकते. माझ्या बाबतीत तर ती व्यक्ती ज्या शहरामध्ये राहत असते, त्या संपूर्ण शहरावरतीच तो ढग पसरलेला असतो. शहराच्या आधी येणारा डोंगर चढताना मला तो खालूनच हल्ली दिसू लागतोय. माझ्याआधीच पहाटे निघून तिथे जाऊन पोहोचलेला.

हे सगळं प्रत्येकाच्याच आयुष्यात वारंवार होत असतं. टाळता येत नाही. ज्या व्यक्तींच्या आईवडलांचं लग्न झालेलं असतं आणि ज्यांना स्वतः ते करायचं असतं, शिवाय आपल्या मुलांचं आणि त्यांच्या मुलांचंही लावून द्यायचं असतं, त्या व्यक्तींना मात्र आयुष्यात हे सगळं एकदाच व्हावं असं वाटत असतं. नव्हे ते एकदाच होतं असं ते मानूनही चालत असतात. त्यामुळे लग्नाच्या प्रेमाला ते प्रेम म्हणतात आणि त्याव्यतिरिक्त इतर प्रेमांना ते ’अफेअर्स’ म्हणतात. जुन्या बोली भाषेत त्याला ’प्रकरण’ असं म्हणतात.

प्रेमात एकदाच पडावं किंवा पडता येतं हे म्हणणं बाळबोध आहे. त्याचप्रमाणे लग्न नावाच्या दोन फुटी कुंपणात एकदा उभं राहिलं की, आभाळातल्या त्या ढगांपासून आपली सुटका होईल असं म्हणणं हे बालीशपणाचं आहे. लग्नानंतर जी माणसं पुन्हा कुणाच्या प्रेमात पडत नाहीत ती किती ओंगळ, कोरडी आणि कंटाळवाणी असावीत याची कल्पनाच न केलेली बरी.

त्यांच्यावर फक्त एक आणि एकच व्यक्ती प्रेमाचे थर लावीत बसलेली असते आणि तेसुद्धा त्याच डब्यात ब्रश बुचकळून समोरच्या व्यक्तीवर तसेच ओघळ आणत बसलेले असतात. आधी खूप वेळा, मग वर्षातून एक-दोन वेळा वाढदिवसाला वगैरे. बाकी वेळ सुकलेले रंग घेऊन इकडेतिकडे बघत बसून राहायचं. असे ओघळ आणून एकमेकांना चिणून टाकण्यातच त्यांचं आयुष्य संपून जातं.

मी वाढलोच मुळी प्रकरणांच्या शेतात. माझ्या नशिबानं माझ्या आजूबाजूला, कुटुंबात आणि शेजारात लग्नांइतकीच प्रकरणं घडत होती आणि फार लहान वयापासून मला त्या शब्दाबद्दल अतीव उत्सुकता होती. तशीच दुसरी उत्सुकता मला ’ठेवलेली बाई’ या या शब्दाबद्दल होती. मला कितीतरी दिवस त्या ठेवलेल्या बाया कशा दिसतात ते पाहायचं होतं. आमच्या कुटुंबातील काही व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे आणि माझ्या आईच्या मनाच्या मोकळेपणामुळे माझी फार लहान वयात अनेक प्रकरणांशी आणि ठेवलेल्या बायांशी गाठ पडली. त्यानंतरच्या आयुष्यात कुटुंबाच्या परिघाबाहेर पडून माझा मी प्रवास करायला लागलो तेव्हा मला अनेक मोकळ्या मनाचे, आनंदी ठेवलेले पुरुषही भेटले. यामुळे माझ्या सगळ्या उत्सुकता अगदी आळस दिल्यावर हाडं मोकळी होतात तशा मोकळ्या होत विरल्या.

प्रकरणं करणारी माणसं, ठेवलेल्या बाया आणि ठेवलेले पुरुष हे नेहमीच आनंदी असतात. त्यांच्या आजूबाजूची माणसं मात्र सतत चिंतेत आणि खंगलेली असतात, असं मला दिसलं. शिवाय सतत आपण दुसर्‍याला ठेवू शकत नाही. आपल्या नकळत दुसर्‍या कुणीतरी आपल्याला ठेवलेलं असतं आणि आपल्याला ते लक्षातच आलेलं नसतं. त्यात फारच मजा येते. एकदा आमच्या नात्यातल्या एक बाई दुःखी होऊन अल्कोहोलच्या आहारी गेल्या, तेव्हा मी आईला त्याचं कारण विचारलं असता ती म्हणाली की, त्यांच्या नवर्‍याचं दु्सर्‍यापण एका बाईवर प्रेम आहे म्हणून त्यांचं असं झालं. अनेकांवर प्रेम करत राहता येतं. पण दुर्दैवानं आपलं आधी लग्न झालं असेल आणि घरी पोरंटोरं असतील तर घरच्या बाया पुरुषांना अशावेळी फार त्रास देतात. आईला त्या ठेवलेल्या बाईबद्दल जास्त सहानुभूती होती असं मला दिसलं. (मी लवकरच त्या बाईंना भेटलो, त्या फार गोड आणि सुंदर होत्या. त्या माझ्या कुणीच नव्हत्या. त्यांनी मला पिस्ते खायला दिले होते आणि पुढे काय करणार असं विचारलं होतं. तेव्हा मला माझ्या आजोबांप्रमाणे एसटीचा कंडक्टर व्हायचं होतं ते मी त्यांना सांगितलं होतं.)

मी स्वतः पहिल्यांदा प्रेमात पडलो तेव्हा मला हे उमगलं की, प्रेमासोबत माणसावर एक प्रकारचा हक्क सांगण्याची ऊर्मी उत्पन्न होते. ती व्यक्ती संपूर्णपणे आपली असावी असं वाटू लागतं, मनानं आणि शरीरानंसुद्धा. एवढंच नाही तर त्या व्यक्तीचा दिवसभराचा आणि त्यानंतरचा वेळ, तिच्या आवडीनिवडी ह्या सगळ्यांच्या बरोब्बर केंद्रस्थानी आपण असलो तरच त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम आहे अशी अट आपण नकळत घालतो. प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक शाखा प्रशाखा असतात आणि आपण त्या वृक्षासारख्या व्यक्तीमत्त्वाशी जोडला गेलेला एक भाग असतो, हे मला कधीही लक्षातच येत नसे. माझा जो कॅमेरामन आहे अमलिंदू, त्यानं मला एकदा सेटवर फार पूर्वी स्टिंग या गायकाची गाणी ऐकवली. त्यात ’If you love someone, set them free’ असं त्याचं एक गाणं आहे. ते गाणं ऐकायला आवडत असूनही मला वर्षानुवर्षं खरं म्हणजे कळलेलंच नव्हतं. माणूस आवडत असला तरी वर्षानुवर्षं कळलेलाच नसतो, तसंच गाण्याचं होतं.

हे होण्याचं कारण, स्त्री-पुरुषांची प्रेम जमताच ताबडतोब होणारी लग्नं, भावाबहिणींची भाऊबीजछाप प्रेमं, शोलेतल्या जयवीरूछापाची मैत्रीची गाणी एवढ्या तीनच कप्प्यांत माझ्या समाजानं मानवी नाती बसवली होती. सगळ्यांनी त्या तीन कुंपणांतच राहायचं. त्या कुंपणाबाहेर सगळं दुःख, बेजबाबदारपणा, अविचार आणि अश्लीलता आहे, असं मानून निमूट जगायचं.

थोडे दिवसांनी हे लक्षात आलं की, आकर्षण ही गोष्ट अपरीमीत आहे. ती थांबत नाही. त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणं हा मूर्खपणा आहे. कारण सोळासतराव्या वर्षी सुरू झालेली ही प्रेमात पडण्याची आणि आकर्षित होण्याची प्रक्रिया अजूनही मलातरी थांबवता आलेली नाही. एक मन, एक शरीर, एक भावनिक ओलावा माणसाला पुरा पडणं शक्यच नाही. निसर्गाचं असं काही म्हणणंच नाही. मग त्या सगळ्या ऊर्मींच्या विरुद्ध माणसाला कसं जाता येईल?

आयुष्याचा काही दीर्घ वा छोटा काळ एखादी व्यक्ती व्यापून टाकते. तो संपूर्ण काळ हा त्या व्यक्तीच्या नावाचा आणि रंगाचा असतो. तो काळ काही दिवसांचा वा अनेक दशकांचा असू शकतो. पण मग माणूस बदलतो. त्याला नवे अनुभव खुणावतात. त्याच्या बुद्धीची, शरीराची भूक विस्तारते. त्याच्या आवडीनिवडी बदलतात आणि तो माणूस नव्या आयुष्यासाठी ऊर्जा शोधायला लागतो. काहीवेळा सोबती असूनही तो एकटा पडतो, ज्याची कारणं स्पष्ट करता येत नाहीत. हे सगळं होण्यात आधीच्या व्यक्तीशी प्रतारणा अपेक्षित नसते, पण अनेक वेळा नात्यातली सरप्राईझेस्‌ संपलेली असतात. अशावेळी ज्याला आपण ’प्रकरण’ म्हणतो ती गोष्ट तयार होत असावी.

बहुतांश माणसांची प्रवृत्ती ही नातं जगासमोर मिरवण्याची असते. बहुतेक लग्नं ही त्याचसाठी केली जातात. जगाच्या साक्षीची गरज त्या माणसांचं नातं तयार होताना का लागत असावी? लग्न करण्याचा आणि दोन माणसांचं एकमेकांवर प्रेम असण्याचा अर्थाअर्थी संबंध आजच्या काळात राहिलेला नाही. पूर्वीही नसावा. सिनेमांचे ज्याप्रमाणे प्रीमिअर्स होतात त्याप्रमाणे माणसांची आयुष्यात लग्नं होतात. कुटुंबाच्या संपत्तीचं, गोतावळ्याचं, लागेबांध्यांचं आणि समाजातल्या त्या कुटुंबाच्या स्थानाचं ते आपापल्या परीनं केलेलं प्रदर्शन आहे. प्रेमाचा लग्नाशी संबंध नसतो. ते आपोआप तयार होतं आणि ते होणारच नसेल तर ते कितीही वेळा एकमेकांशीच लग्नं करत बसलं तरी होणार नसतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातले ते एकदाच घडणारे सोहळे असतात. अनेकजणांच्या आयुष्यात लग्न सोडल्यास पुढे काहीही भव्यदिव्य घडणारच नसतं, म्हणून ती माणसं फार हौसेनं सर्वांसमोर एका दिवसाच्या केंद्रस्थानी उभं राहून लग्न करून घेतात. फार तर फार बारशी आणि मुलांच्या मुंजी होतात. त्यानंतर थेट आपल्या मुलांची लग्नं. म्हणजे पुन्हा दुसर्‍या प्रीमिअर शोची संधी. आणि मग ते (कर्कश्श आणिे खर्चिक) चक्र अव्याहत पुढे चालू राहतं.

प्रेमाची खरी मजा ते होताना कुणालाही न कळण्यामध्ये असते. आपल्यालाही ते होताना कळत नसेल तर त्या अनुभवासारखा दुसरा विलक्षण अनुभव नसतो. जी माणसं चारचौघांत मोकळं वावरत, आपापलं आयुष्य जगत कुणालाही न कळवता एकमेकांवर प्रेम करत राहतात त्या माणसांनी फार दुर्मिळ असा आनंद आपल्या आणि दुसर्‍या व्यक्तीच्या मनाला आणि शरीराला दिलेला असतो. त्यासाठी सतत सर्वांसमोर एकत्र राहण्याची, एकमेकांना भेटवस्तू द्यायची, एवढंच काय तर ’माझं तुझ्यावर प्रेम आहे’ हे एकमेकांना म्हणायचीही गरज नसते. असं प्रेम फार कमी वेळा आयुष्यात नशिबी येतं. ते ज्यांना ओळखता येतं, ओळखून रुजवता येतं, आणि रुजवून मान्य करता येतं ती माणसं फार ग्रेट असतात. आपल्या दोघांचं नातं काय आहे याची या गर्दीत कुणालाच कल्पना नाही. याच्याइतका सुंदर रोमान्स जगात दुसरा कोणताही नाही. मग त्या प्रेमात वय, राहणार्‍या शहरातलं अंतर, लग्न झालं की नाही, आपण यापुढे कधी भेटणार आहोत की नाही असे प्रश्न हळूहळू शांत होत जातात. ते व्हायला फार वेदना होतात, कष्ट करावे लागतात. पण होणार असेल तर ते सगळं आपोआप होतं. थोडं सहन करावं लागतं. यासाठी नशिबवान असावं लागतं आणि मोकळ्या मनाची स्वतंत्र ताकद घेऊनच जन्माला यावं लागतं. त्यात सुरक्षितता आणि हक्काचे एकमेकांवरचे हिशोब असून चालत नाही. ती तसली कामं नवराबायकोंची असतात. काही भेटी वेळ ठरवून अलेल्या मिनिटासेकंदाच्या असतात, तर काही भेटी संपूर्ण रात्री व्यापून उरतात. एकमेकांच्या शरीराचे गंध आठवण आली की मनाभोवती रुंजी घालू लागतात. अतिशय दुःखाच्या आणि वेदनेच्या क्षणांना त्या व्यक्तीचा नुसता चेहरा आठवला तरी मनावर फुंकर येते. आपल्याकडे त्या व्यक्तीनं दिलेली कोणतीही भेटवस्तू नसते, ना आपण दिलेली तिच्याकडे असते. एक खूण असते कसलीतरी. एखादा संकेत असतो. हस्ताक्षर असतं. इतर कुणालाही माहीत नसेल असं हाक मारायचं नाव असतं. ते पुरेसं असतं. त्या पलीकडे सतत आश्वासनं देण्याची गरज नसते. मुख्य म्हणजे भीती नसते. असुरक्षितता नसते. महिन्यामहिन्यांची शांतता मान्य असते. कुणाला काही सांगायचं नसतं. नावं जोडून घ्यायची नसतात. प्रत्येक भेट शेवटची असू शकते. कारण हक्क नसतो. पुढची भेट झाली तर मन फार मऊ आणि आनंदी होऊन जातं. जिकडेतिकडे सगळं बरं वाटू लागतं आणि ऊर भरून येतो.

असं सगळं होण्याला इंग्रजीमध्ये ‘अफेअर’ का म्हणतात? हे जर फेअर नसेल तर मग दुसरं काय फेअर असू शकतं?

प्रेमामधून तयार झालेल्या शारीरिक ताण्याबाण्यांना समजून घेण्याची उमज आजही आपल्या परिसरात तयार झालेली नाही. शारीरिकता हा बहुतांशी प्रेमाच्या संबंधाचा पाया असतो. ती एकतर्फीही असू शकते. असली तरी ती ओळखून एका अंतरावरून झेलायला शिकायला हवं. पावसाळा आनंदात जाणार असेल तर त्याला ती भेट देण्याचा मोठेपणा मनात हवा. शारीरिक संबंध आले नाहीत, होऊ शकले नाहीत या कारणानं अनेक नाती अतिशय गूढ आणि दाट होत जाण्याची शक्यता असताना आपण फार पटकन शारीरिकतेचा ठोस आग्रह धरत नात्यांची मजा संपवून टाकतो. याचं कारण त्याविषयी आपल्या मनात सतत असलेलं दडपण.

शारीरिक संबंध ही प्रेमाची पावती असू शकत नाही. तो प्रेम करण्याचा एक मोठा उद्देश असतो. काही वेळा तो उद्देश आपोआप आणि शांतपणे सफल होतो तर काही वेळा त्याच्या कोमटपणावर, उष्णतेवर आणि धगीवर अबोलपणे वर्षानुवर्षं दोन माणसांमधलं नातं फार मस्त आकार घेतं. याची मजा घेण्याची प्रवृत्ती जोपासायलाच हवी. शरीर सापडत जायला हवं. ते स्वप्नांमध्ये रंगवता यायला हवं. त्यासाठी ते न ठरवता अचानक कधी इकडून कधी तिकडून दिसायला हवं. त्यासाठी पाऊस असतो, मोठ्या गळ्यांचे सुंदर कपडे असतात, दरवाज्यांच्या फटी असतात. पहिल्या काही तीव्र शारीरिक संबंधांनंतर, शरीराची सरप्राईझेस्‌ जर संपली तर त्या दोन व्यक्तींना नात्याचा बाज टिकवून ठेवायला पुन्हा नव्यानं एकमेकांना काहीतरी सादर करावं लागतं. त्यापेक्षा ते होईल तेव्हा होऊ द्यावं. आपोआप.

प्रेमाप्रमाणेच शारीरिकता ही काही एका व्यक्तीशी बांधली गेलेली नसतेच. आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आपल्याला अनेक शरीरं आवडतात. काही जुन्या शरीरांमधला रस उडतो आणि नवी खुणावतात. ते सगळं होणं फार सुंदर आहे. शिवाय ते अपेक्षितही आहे. त्यामुळेच तर आपल्याला जाणिवांची वृद्धी होते. हे जर मान्य केलं नाही आणि आपल्याच दोघांच्या एकमेकांच्या शरीराची अट कुणी कुणावर घातली तर कालांतरानं कोणीतरी एक न सांगता त्याच्या सहजप्रवृत्तीनं जे करायचं ते करतोच. आपल्या आयुष्याचं अत्यंत पारंपरिक स्वरूप जगाला दाखवत बसणारे लोकही ते टाळू शकत नाहीत. मग त्यातून लपवणूक आणि त्रास होतो. भावनिक हिंसा तयार होत जाते आणि आपल्यापाशी असलेला सगळा आत्मसन्मान माणसं या कारणी घालवून फार बिचारी होऊ शकतात. त्यापेक्षा रात्री दोघांपैकी कुणी घरी आलं नाही तर दार लोटून घेऊन शांत झोपावं. काही दिवस आजमवावं, गप्पा मारून मोकळेपणा ठेवावा. माणसं नेहमी सगळीकडे फिरून परत घरी येतातच. ती आपलीच असतात.

शारीरिक संबंध आले म्हणजे आपण दुसर्‍या व्यक्तीला आपले सर्वस्व दिले असं वाटणं म्हणजे एक सिनेमाकादंबर्‍यांमधून आलेला बावळटपणा आहे. आपला ‘स्व’ हा इतका स्वस्त असतो का, की तो या अनुभवानं लगेच गमावल्या जाऊ शकतो? हे सर्वस्व देण्याच्या भावनेचं खूळ इतकं प्रगाढ आहे की शारीरिक संबंध एकदा आला की लगेगच त्यापुढे प्रेम करण्याची सक्ती केली जाते. अनेक वेळा ते अव्यवहार्य असतं कारण पुन्हा लग्नाप्रमाणे शारीरिकतेचा प्रेमाशी संबंध असेलच असं नाही. आजच्या काळात जेव्हा मोकळेपणानं शारीरिक संबंध पहिल्या काही भेटींमध्ये होतात तेव्हा त्याचं स्वरूप आकर्षणाची धग शांत करण्याचं असतं. एकमेकांचा स्पर्श ओळखण्याचं आणि संवाद साधण्याचं असतं. कोणत्याही स्वरूपात ते सर्वस्व देण्याचं कधीही असू शकत नाही. अगदी लग्नाच्या नात्यातही नाही. नशिबानं आपण आता अशा काळात आहोत जिथे शारीरिकतेचा पुनरुत्पादनाशी कोणताही अपघाती संबंध नाही. असं असताना एकमेकांना दिल्या घेतलेल्या आनंदाची पुनरावृत्ती करण्याची सक्ती कुणीही कुणाला का करावी? तसं झालं तर वारंवार होणार्‍या किंवा न होऊ शकणार्‍या शारीरिकतेतून किती चांगलं प्रेम फुलत जाऊ शकतं! ते करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळायला हवं. ही निसर्गाची प्रेरणा आहे.

जर कुणावर कसलाही हक्कच सांगायचा नसेल तर मग प्रेम करणं ह्या गोष्टीला काय अर्थ उरला, अशी बर्‍याच जणांची समजूत असते. पण वर्षानुवर्षं टक्केटोणपे खाऊन, मनाला खोट्या समजुतीत पाडून, हक्काचं वजन तयार करून आपण प्रेमात असल्याचा देखावा जगापुढे साजरा करण्याची वेळ आपल्यावर कधीही येऊ नये. आपल्या मनातलं एखाद्या व्यक्तीवरचं प्रेम संपलं आहे हे ओळखायला आपण घाबरतो. ओळखलं तरी ते कबूल करणं आणि पुन्हा प्रेमात पडायला मनाला सक्षम करणं हे धाडसच आपण करत नाही.

आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रेमात पडून ते निभावणार्‍या व्यक्ती धाडसी असतात. खर्‍या असतात. पण आपल्या मनातले न्यूनगंड, परस्परांची झापडं आणि आपल्यातल्या भावनिक समृद्धीच्या अनुभवामुळे आपण लगेचच त्या व्यक्तींची ‘व्याभिचारी’ म्हणून हेटाळणी करून टाकतो. पण मनातल्या मनात प्रत्येकजण आपण तसं करू शकत नाही म्हणून कुढत असतो.

अनेक प्रेमं पचवून आणि रिचवून त्याचा गोतावळा सांभाळणारे स्त्रीपुरुष किती तेजःपुंज असतात. त्यांच्या मनाला आणि शरीराला सतत एक झळाळी असते. मला अशी अनेक माणसं माहिती असण्याचं आणि त्यांच्याशी दोस्ती असण्याचं सुदैव लाभलेलं आहे. त्या व्यक्ती सतत कात टाकत असतात. होत्याच्या नव्हत्या होतात. स्वरूपं पालटतात. ताण सहन करतात आणि बंद झालेल्या गुहांचे दगड फोडून वारंवार मोकळ्या प्रदेशात जात राहतात. त्या व्यक्तींना मनं आणि शरीरं हाताळण्याची सुंदर लकब गवसलेली असते. मध्ये येणार्‍या अंधार्‍या खोल्यांची, थरकाप उडवणार्‍या एकटेपणाची त्यांची भीती गेलेली असते. ते सगळं प्रेमासोबत येणार हे ते उमजून असतात. आपण बसलेलं विमान आपल्याला हवं तिथे कधीच उतरणार नसतं.

गरजेपेक्षा जास्त वर्षं फक्त एकमेकांसोबतच राहिलेल्या दोन माणसांना शेजारी-शेजारी उभं करून त्यांचा फोटो काढून पाहिला तर त्यांचे चेहरे बघून त्यांच्या नात्याविषयी सर्व कल्पना येते. बहुतेक वेळा खिन्न-हसते चेहरे असतात ते. त्यांच्या दारंखिडक्या नसलेल्या घराची गोष्ट सांगत असतात. आम्ही चाळीस वर्षं एकत्र काढली. पण कशी? एकटं पडण्याच्या भीतीनं एकमेकांना गच्च आवळून? की मोकळेपणानं-समजुतीनं अंतर कमीजास्त ठेवून? त्याउलट कोणत्यातरी प्रवासात महिनाभर भेटलेल्या आणि परत कधीच न सापडलेल्या मित्रांचे आणि मैत्रिणींचे फोटो पाहिले तर त्यांच्या चेहऱयावरचे भाव, ओसंडून सांडणारा आनंद पाहून मला तरी ते आयुष्य नक्की जगावंसं वाटेल.

माणसं आयुष्यात येणं जितकं साहजिक असतं तितकंच ती सोडून जाणंसुद्धा साहजिक असतं आणि त्या दोन्ही गोष्टी सोप्या नसतात. पण माणूस सोडून जाताना मनावर आणि अंगावर काही हलकी खूण सोडून गेला तर मात्र त्या ताटातुटीसारखा दुसरा एकमेवाद्वितीय अनुभव नाही.

आपण जागं व्हावं तेव्हा ती व्यक्ती शेजारी नसावी. बाहेर पाऊस पडत असावा. चिठ्ठीबिठ्ठी काही नसावी. पण आपण रात्री उतरवून ठेवलेलं काहीतरी ती व्यक्ती गुपचूप घेऊन गेली असावी. आपल्याला आनंदी थकव्यानं पुन्हा ग्लानी यावी हा आनंद सकाळी त्या व्यक्तीला दात घासताना बघण्याच्या आनंदापेक्षा किती चांगला आहे. तो प्रत्येकाला मिळो.

नात्यात नेहमी येऊन जाता आलं पाहिजे. येता यायला हवं आणि जाताही यायला हवं. केव्हा जायचं आहे हे जेव्हा एकमेकांना कळतं त्या माणसांची प्रकरणं सतत ताजी आणि मोहक राहतात. पण ते सगळं सापडायला थोडा वेळ लागतो. मधली वाट बघण्याची वेळ पण आवडायला लागते. परत घरी कुटुंबकबिल्यात जाऊन दात घासणार्‍या व्यक्तींकडे पाहून एक साळसूद हसू बाळगणं शिकून घ्यायला लागतं. असं सगळं चालू असलं की हातून फार चांगलं लिहून होतं, गाणी होतात, चित्रं उमटतात आणि साधा चहा बनवला तरी त्याला फार अस्मानी चव येते.

सतत कुणाचीतरी सोबत असण्याचा अलिखित नियम हे भारतीय समाजाचं फार मोठं दुर्दैव आहे. त्यातली सोबत महत्त्वाची न राहता ‘सतत’ हा शब्द फार मोठा करून ठेवला आहे आपण. टोळ्यांनी आणि जोडीनं सतत जागायला आपण आता रानावनातली किंवा कृषिसंस्कृतीतली माणसं उरलेलो नाही. आपल्यापैकी अनेकांना सोबत असण्याच्या पलीकडे, फक्त एकट्यानं शोधण्याचे, अनुभवण्याचे आयाम सापडते आहेत. पण तसं जगणं समृद्ध होऊ शकेल अशा आयुष्याच्या नव्या रचना, नवी-मोकळी नाती लेबल न लावता तयार करायला आपल्याला दुर्दैवानं घरात शिकवलं जात नाही. फोनच्या डिरेक्टर्‍यांप्रमाणे आपली नात्यांची लेबलांची डिरेक्टरी फार आऊटडेटेड झाली आहे. त्यात अनेक नवी माणसं नाहीत. अ‍ॅड करायची सोय नाही.

अनुभव घेणं ही नेहमीच एकट्यानं करायची गोष्ट असते. ती जोडीनं करत बसता येत नाही. तुम्ही कितीही आकंठ प्रेमात बुडाले असलात तरीही. अनुभव जेव्हा मनात मावत नाही तेव्हा तो सांगितला जातो आणि यावेळी तो नक्की समजणार्‍या माणसासोबत गाढ होत जाते. त्याला समजुतीचं आणि ओळखीचं अंगण आणि कुंपण येतं. मग दिवाणखाना येतो आणि समजुतीचंच शय्यागृह येतं. त्यात इतरांना प्रवेश नसतो.

सगळ्यांना सगळं कधीच समजत नसतं हे यामागचं कारण आहे. एकाच माणसाला आपण म्हणत असलेलं सगळं समजावं असं वाटणं हीतर जवळजवळ हिंसा आहे. यातच आपल्या आयुष्यात एकापेक्षा जास्त जोड्या तयार होण्याचं सोपं आणि साधं कारण आहे.


***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' (दिवाळी - २०१३)


***

हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल सचिन कुंडलकर व सुजाता देशमुख (मेनका प्रकाशन) यांचे मनःपूर्वक आभार.


***
विषय: 
प्रकार: 

प्रकरणापुरते प्रेम आणि प्रकरणांच्या निमित्ताने व प्रकरणांच्या व्याप्तीपुरते प्रेम याबद्दल चांगला लेख. परंतु बंधनातील प्रेमाबद्दलची गृहितके ही सर्वसामान्यीकरण केल्यासारखी वाटली. लेखकाने नोंदवलेली काही निरीक्षणे मात्र तंतोतंत पटली. प्रकरणे करणारी माणसे तुलनेने रसरशीत, जीवनाचा आनंद भरभरून लुटणारी व काही अंशी आत्ममग्न असल्याचे पाहिले आहे. आणि त्याच वेळी त्यांचे जोडीदार हतोत्साही, निराश किंवा कडवट झालेले पाहिले आहेत.

बाकी 'प्रेम' हा विषय मुळातच गहन व प्रचंड व्याप्तीचा आहे. त्याचे खूपसे पैलू आहेत. या एका पैलूवर केलेले हे भाष्य इथे आणल्याबद्दल धन्यवाद चिनूक्स.

Affair हा शब्द fairness शी दूर दूर पर्यंत संबंधित नाही. अफेयरचे मूळ फ्रेंच शब्द आहे - करणे अशा आशयाचा. फेयर चे मूळ इंग्रजी शब्द आहे - सुंदर ह्या अर्थाने. फेयरचा विरूध्दार्थ 'अनफेयर' असा आहे, लेखक सूचित करतो तसा 'अफेयर' नाही. आधीच एस.एम.एस मुळे इंग्रजीची वाट लागते त्यात अशी अजून चांगल्या लेखकांकडून भर! शाब्दिक खेळ किंवा कोटी करण्याच्या नादात मूळ अर्थ सौंदर्याची वाट कशाला लावावी??

प्रेमाला शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही आयाम असतात. >> दोन्ही लिहीले आहे पण एकूण लेखाची मांडणी दोनच आयाम असतात अशा गृहितकावर आहे. प्रेम रिचवलेली लोक तेजपुंज असतात का ते मूळात तेजपुंज असतात म्ह्णून अनेक वेळा ब्रेक अप करतात. मरतुकड्यांच्या एकदा तरी कुणी प्रेमात पडेल का?? आणि पडले तर तो ब्रेक अप करून तेजपुंज होईल का?? असे अनेक बेसिक प्रश्न मला पडले लेख वाचून !

लेखातील बरीच वाक्यं खूप आवडली पण तरी संपूर्ण लेख वाचल्यावर गोंधळ उडाल्यासारखं झालंं.

अफेअरवरची कोटी मलाही खटकली. इंग्लिशमध्ये ते शक्य-अशक्य असा विरुद्ध अर्थ मनात येण्यापेक्षा fair- a fair असे मनात येईल. आत्ताच रंगभूमीवर आलेल्या A fair deal- Affair deal ह्या नाटकाच्या शीर्षकात ही कोटी बरोबर वापरलीय.

>>अनेक प्रेमं पचवून आणि रिचवून त्याचा गोतावळा सांभाळणारे स्त्रीपुरुष किती तेजःपुंज असतात. त्यांच्या मनाला आणि शरीराला सतत एक झळाळी असते.<<

हा माणूस असलं फालतू कसं काय लिहू शकतो?
तेज:पुंज???
कमॉन..
आधी संयतपणे फुलत जाणारा लेखातला रोमान्टीसिजम बेगडी होत गेलाय.
ठीक.
आयुष्य पणाला लावायची निष्ठा ते मनस्वी फक-फरगेटमधलं तितकंच ओरिजनल पण क्षणिक प्रेम इथवर आणि मधल्या असंख्य शेड्स् मध्ये प्रेम वावरत असते. उगाच समाजाला आणि चालींना शिव्या घातल्या की आकलनाचा मर्यादितपणा काही अंशी झाकतो.

मला दोन मोठे विरोधाभास जाणवतात.
१. संस्कृती/समाज (सध्याचा भारतीय) "शारीर" प्रेमाला काहीसं उणावतो. दुय्यम समजतो. एकटेपणाला कमी लेखतो.
शारीर प्रेमाची महत्ता सांगायला नैसर्गिकतेचा आधार घेतला जातो असं जाणवतं. नैसर्गिक उर्मींना दाबू नये असं लेखक सुचवू पाहतो.
२. आपण वनसंस्कृतीत नाही (म्हणजे पुरेसं सर्वस्वी नैसर्गिक कलानं जगत नाही), आणि वनसंस्कृतीत एकटं राहता येत नाही.

ही बंधनं, कुटुंबव्यवस्था, दुकट्यापणाचा सोस हे ही सारं नैसर्गिक आहे, आणि ते काही आज अचानक उगवलं नाहीय. त्या अशा असण्याला अनेक पदर आहेत आणि ते एका लेखात निप्टून काढण्याइतके सोपे नाहीत हा साध्या समंजसपणाचा अभाव मला जाणवतो.

यु आर गेटिंग प्रेडिक्टेबल कुंडलकर. आवरा.

काही ठिकाणी रिलेट होऊनही भयंकर कंटाळवाणा वाटलेला लेख. अनेक गोष्टींचं उगाचच सरसकटीकरण केलं आहे. वरती याच मताच्या काही कमेन्ट्स आल्या आहेतच तेव्हा पुनरावृत्ती करत नाही.

आपण आपल्याला भावलेल्या, रुचलेल्या, जमलेल्या मार्गावर अगदी आत्मविश्वासाने उत्तमपणे चालावं पण म्हणून तोच मार्ग जास्त खरा, प्रतिभेला पोषक, जीवनाचा जास्त आनंद देणारा वगैरे जस्टिफिकेशन्स द्यायला जाऊ नयेत. आपण जसं आणि जे जगतो, किंवा जे आपल्याला आवडतं, करावंसं वाटतं त्याचं प्रत्येकच वेळी तत्वज्ञान केलंच पाहिजे असं नाहीये....

>> असं सगळं चालू असलं की हातून फार चांगलं लिहून होतं, गाणी होतात, चित्रं उमटतात आणि साधा चहा बनवला तरी त्याला फार अस्मानी चव येते.>> हे तर भयंकर विनोदी आणि बालीश वाटलं. कारण मग हे असं चालू नस्लं तर असं काहीच होणार नाही असं सूचन केल्यासारखं वाटतं आणि आयुष्यात काहीच इतकं बायनरी अपोझिशन्समधे नसतं...

प्रत्येकाचंच स्वत:वर सर्वात जास्त प्रेम असतंच. पण लेखकाचं जरा आणखीच जास्त आहे Wink

पुन्हा एकदा वाचला..

मागच्या प्रतिसादात चिनुक्स यांचे आभार मानायचे राहिले..
चिनुक्स हे इथे टाकल्याबद्दल अत्यंत आभारी आहे .. धन्यवाद __/\__

=========

लेखात काहीतरी आहे, ज्याला खूप विरोध करावासा वाटतोय ..
पण हे लिहिलं अशा सुंदर प्रकारे आहे कि मन बंड करतय ..
.....

लेखाने आयुष्याची इतकी लोभसवाणी डायमेन्शन दाखवून दिलीये कि , खूपच ..

.....

इतके समजूतदार आणि जेन्युsन लोक .. कधी आयुष्यात भेटतील का .?
खरच नशीबवान असतील ते ज्यांना हे भेटतील ...
आणि,
ते लोक धैर्यवान असतील जे तसं कोणीतरी मिळण्याची वाट पाहत राहतील,
वाटेत कुठे घसरून पडणार नाहीत..

.....

हा लेख वाचण्यासाठीही एक बुद्धिचातुर्य हवे, एक अचाsssट अशी प्रगल्भता हवी ..

.....

असा लेख लिहूनही लेखकास चंगळवादी , व्यभिचारी कोणी ठरवू पाहत नाही..
यातच लेखकाचे पांडित्य अधोरेखित होते ..

.....

आपल्याला हेच म्हणायचं होत अगदी.. पण आपण स्वतःला इतके बेमालूमपणे फसवत होतो कि .....

.....

असो ..

माहेरच्या दिवाळी अंकात वाचला होता. पण हा पूर्ण लेख नाहीये का? त्या लेखातल्या मला आठवणाऱ्या काही काही गोष्टी वरच्या लेखात नाहीयेत बहुतेक. समहाउ मला त्यावेळी पण काहीतरी विचित्र वाटलं होतं लेख वाचून आणि आत्ता देखिल तसंच वाटलं!

It is possible that one falls in love multiple times with different persons during the life-time. But then there is another important aspect of love, which is commitment. Being poly amorous and being committed are two mutually exclusive things. How can you ever advocate/justify infidelity? You can't!! When you are committed to a person in a relationship, any kind of cheating is immoral. If you cheat it's probably not the end of the world, but it is certainly end of the commitment in that relationship.

शब्दांचे मोहक खेळ करून चुकीच्या गोष्टीला over-glorify केल्यासारखं वाटलं. माझ्या मनाला लेखातले विचार पटले नाहीत.

चक् चक् जि, किती प्रश्न नि किती ती मीमांसा. सापडलाय त्यांना लोकांचा तेजःपुंज होण्याचा फॉर्म्यूला तर कायतरी फिडेलिटी-बिडेलीटी घालतेस मधेच! Wink Happy
लेखाचे शीर्षक 'प्रकरण' ऐवजी - Eleven reasons why Salman is Tejapunj असे असते तर माबो ऐवजी रिडीफ/ याहू असल्या जास्त रिडरशिप असलेल्या साईटवर गाजला असता.

कुंडलकरांची स्वत:ची मतं ह्या दृष्टीकोनातून वाचला तर लेख आवडला. बराचसा पटला मात्र नाही.

वरदा आणि जिज्ञासा + १

इंटरेस्टींग प्रिमाईस पण फारच जनरलाईज्ड अ‍ॅक्झीयम्सवर आधारित.
सोबत हवी त्यातल्या सततवर भर नको हे तर मान्यच पण हे प्रस्थापित सामाजिक चौकटीत होऊच शकत नाही हा टोन एकतर कमी अनुभव किंवा तीव्र कन्फर्मेशन बायस दर्शवतो.
वेगवेगळ्या कारणासाठी, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, पुनःपुन्हा एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडणे, नात्यामधली अम्युझमेंट न संपणे, ह्याचाही आनंद फार मोठा असतो. फक्त लेखकाप्रमाणे 'हाच' आनंद तुमच्या आनंदापेक्षा जास्त चांगला असतो असे ठणकवायचे धाडस माझ्यात नाही.

फालतू लेख आणि कथांचे माहेर ही आपली परंपरा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने राबवित असल्याबद्दल माहेर नियतकालिकाचे अभिनंदन.

https://docs.google.com/file/d/0B9-2hmnBdOPQNTA5ZWUwMjMtYWJhNy00ZTg3LWEx...

बी यांची प्रतिक्रिया ही पहीली पायरी आणि त्यावरील आशुडी यांची प्रतिक्रिया ही दुसरी पायरी चढुन गेल्यावर,
प्रत्येकासाठी त्याच्या मताप्रमाणे / ईच्छेप्रमाणे पुढील पायरी जस जसे पाय ठेवत जाउ तसे तयार होत जातील.
हे असे "स्वतःचे वयक्तीक" आनंद देणारे मार्ग शोधणे बरोबरच आहे; तोपर्यंतच
जोपर्यंत या नवीन तयार होणा-या वाटा प्रेत्येकाच्या वयक्तीक आहेत आणि त्यामुळे दुस-या कोणाचेही - पार्टनरचेही - नुकसान होत नाही.

बाकी जिज्ञासा, सीमंतिनी आणि आगाउ यांना +१०००

सिमंतिनी आणि वरदा +१
काही मतं आवडली, फारच पटली. काही मतं अजिबात पटली नाहीत.
मानसिक, शारिरीक हे दोनच आस्पेक्ट म्हणजे प्रेम?
आकर्षणं सतत होऊ शकतात (त्यांची पूर्तता हा विषय वेगळा) पण प्रेम असे कसे धडाधड होऊ शकते? किंवा जे एकानंतर एक धडाधड होते ते म्हणजे आणि तेवढेच प्रेम कसे काय?
मला संस्कृती, कुटुंब वगैरे गप्पा मारायच्या नाहीत. सहजीवन हे अनेक पातळ्यांवर ओव्हररेटेड होऊ शकते आणि ते प्रेमातली गंमत पिळून काढून फेकून देऊन ओझे बनू शकते हे पण मान्य आहे. एखादी व्यक्ती शरीराने आवडू शकते एखादी मानसिक पातळीवर, एखादी अजून वेगळ्या प्रकारे कनेक्ट होऊ शकते. हे सगळे आवडणे, कनेक्ट होणे क्षणिक असू शकते किंवा दीर्घकालही असू शकते. हे पण समजण्यासारखे.

प्रेमाचे विविध अनेक आस्पेक्ट सुटे करून, प्रत्येक गरज वेगळी हे बघण्याची मानसिकता संपूर्ण समाजात जोवर येत नाही तोवर व्यवस्था अपरिहार्यच आहे.

परत शारीर, मानसिक आणि अजून १०० पातळ्या सुट्या केल्या तरी प्रेम हे प्रकरण अंगुळभर वेगळे राहतेच... त्याचे काय करायचे कुणास ठाऊक.

मात्र प्रेमात असणे मस्त असते आणि प्रेमात असताना माणसे मस्त दिसतात हे फारच पटलं.

आगाऊलाही +१
'हाच' आनंद इतर आनंदांपेक्षा वरचढ हे ठणकावून सांगणे गमतीशीर आहे.

वेगवेगळ्या कारणासाठी, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, पुनःपुन्हा एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडणे, नात्यामधली अम्युझमेंट न संपणे, ह्याचाही आनंद फार मोठा असतो.>>>>>>>>>>>> लाखो अनुमोदन.

हेच ते वाटलेलं असला उथळ एकांगी लेख वाचल्यावर.

प्रेम आणि क्रश ह्यात खूप फरक आहे. माझ्यामते इथे लेखकाना क्रश अपेक्षित आहे. क्रशेस हे होतच राहतात. असे म्हणतात एखादा क्रश जर ३ महिन्याच्यावर कायम राहिला तर ते प्रेम समवावे. आणि हे मला तरी खरेच वाटते. मधे मी एका व्यक्तीच्या प्रेमात पडलो होतो. पण हे प्रेम फक्त ३च महिने मला जाणवले. पण खूप छान वाटत होते तेंव्हा Happy

जिज्ञासाला अनुमोदन.

अज्जुका छान पोस्ट.

आगावू, अम्युझमेंट न संपणे साठी अनुमोदन.

रच्याक्याने, क्रशला मराठीमधे काय म्हणतात येईल? क्रशचे स्पेलींग crush असे आहे म्हणजे चिरडणे Happy माझयमते ह्या क्रशला आपण 'ओढ' म्हणून शकतो. मला तुझ्याप्रति फार फार ओढ वाटते आहे .. अहाहा!!!

आणि ते जे गाणे दिले आहे ना वर 'If you are in love, set it free' त्याचा अर्थ खूप छान आहे पण बहुतेक इथे लेखकानी चुकीचा वा वर वर घेतला आहे. असे कुणा लेखकाला म्हणणे फार अपराधीपणाचे वाटते !!! माझ्यामते इथे ह्या गाण्याचा अर्थ इतकाच होतो की ज्यावर तुम्ही प्रेम करता त्याच्यावर अधिकार गाजवू नका. त्याला तुमच्य प्रेमात बांधून ठेवू नका. ती व्यक्ती फक्त तुमचेच ऐकेल.. तुमचा शब्द न शब्द पाळेल असा अंमल गाजवू नका.

पहिल्यांदा वाचल्यावर सगळा आवडलेला लेख पुन्हा वाचताना कुठेकुठे दाताखाली खडा आल्यासारखा खटकला. मग स्वतःचाच प्रतिसाद एकांगी वाटला.

वरदा, जिज्ञासा, रावळ, प्रतिसाद आवडले.

एका रिलेशनशिपमधून लीलया दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये उडी मारणारे लोक प्रस्थापित समाजाच्या चौकटी नियमांना पुरेसे मानत नाहीत असे चित्र सर्वसामान्यत: दिसते. परंतु मजेची गोष्ट अशी की त्यांनी आपल्या कुटुंबातील व इतर नातेसंबंधातील व्यक्ती या समाजचौकटींना व त्यातील नीतीनियमांना धरून आचरण करतील ही एक विरोधाभासी अपेक्षा ठेवलेली असते. (मी पाहिलेल्या उदाहरणांवरून). हे जाम विनोदी व स्वार्थी वाटते. कुटुंब वा आप्तांकडून असली अपेक्षा न ठेवता, त्यांना पूर्ण मोकळीक देऊन व स्वत: स्वीकारलेल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या समजूतदारपणे व स्वेच्छेने पूर्ण करणारे 'भ्रमर' मलातरी आजपावेतो अभावानेच दिसले! त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या इतर कोणीतरी पत्करल्या म्हणून त्यांचे निभावले. नाहीतर त्यांना 'चाईल्ड निग्लेक्ट', 'अॅबन्डन्मेंट', 'निग्लिजन्स' वगैरे अंतर्गत दंड सोसावा लागला असता.

अरेरे, फारच सामान्यीकरण झालेले दिसते शारीर प्रेमाचे. कुंडलकरांनी लिहीले म्हणजे ती त्याची स्वत:ची मतं असणार आणि ती सर्वमान्य नसणार हे तर माहीतच आहे.
लेख फिरतो 'प्रकरण' या प्रकाराभोवती. या उक्तीलाच एक गूढ, अंधारं पण मोहक सुगंधी वलय आहे. एखाद्या सुगंधानं आपण मूर्च्छित होऊन पडू ही माहिती कदाचित सर्वांनाच असते. अनेक जण त्या सुगंधापासून स्वत:चा बचाव करत दूर पळतात. काही जण माफक प्रमाणात झेपेल एवढाच तो सुगंध घेतात. काही जण चोरून प्यायलेल्या पहिल्या दारूच्या घोटासारखी ती मजा घेतात पण कुण्णाला सांगत नाहीत. पण एकदा तो सुगंध श्वास भरून घेऊन तर पाहा, ग्लानी येऊन पडण्याची मजा काही और आहे, असं कुंडलकर म्हणतात. याचा अर्थ ज्यांना स्वत:ची कस्तुरी गवसलीये त्यांनी ती सोडून या गंधासाठी धावत सुटा असा नव्हे किंवा "हाच" सर्वोच्च सुगंध असंही नव्हे. अशी मूर्च्छा येऊन पडलेले फार क्वचित आपले अनुभव शेअर करत असतील,.याला कारणच मुळात वर आलेल्या सर्व प्रातिनिधिक प्रतिक्रिया.. प्रकरण होणं, ते झेलणं, ते पेलणं, ते निभावणं ही आजही चारचौघात सांगायची गोष्ट नाही. पण जर झालंच तर तो अनुभव खरंच फार उत्कटतेने सांगावासाही वाटतो. कधी कधी काहीच न सांगता फक्त मुरत जावंसं वाटतं. वर लिहीलंय तसं, या गर्दीत कुणालाच ठाऊक नाही आपलं नातं काय आहे.. हे इतकं पर्सनल रत्नजडीत फिलींग असं जाहीर मांडताक्षणी कवडीमोलाचं होतं. शरीर हे माध्यम आहे प्रेम व्यक्त करायचं. त्याला पावित्र्याचे, शपथांचे इतके लळेलोंबे चिकटवून आपण देवळात कायमच्या चिणलेल्या देवागत त्याचं महत्त्वच शून्य करून टाकलंय. जर तुम्हाला वाटत असेल की आता यापुढची प्रेमाची भाषा फक्त शरीरच बोलू शकतं,.तर गो फॉर इट! बस्स. एवढंच कुंडलकर सांगतात. प्रेमाला शारीर होऊ न देता आपण नीतीमत्तेची पायरी जपतो कदाचित पण प्रेमाची पुढची पायरी हुकतो. आता पुन्हा इथे तुम्ही म्हणू शकता, शरीर, सेक्स म्हणजेच प्रेम का तर नाही! उदाहरणच घ्यायचं तर, आपल्या पिढीनं कधी तासंतास वाट पाहिली नाही एसेमेस, फोन शिवाय, आणि आधीच्या पिढीने कधी स्काईपवरून दूरवरच्या जोडीदाराला आपण दिलेला शर्ट घातलेला डोळे भरून पाहिलं नाही. दोघांनीही काहीतरी हुकवलंच. पण हे म्हणजेच प्रेम का? नाही ना. या गोष्टी तर तंत्रावर अवलंबून पण शरीर तर तुमचं आहे ना! मग त्या अनुभवापासून स्वत:ला दूर का बांधून ठेवायचं, अर्थात मनातून हवं हवंस वाटताना! काहींना शरीरं नकोच असतात एकमेकांच्यामधे, त्यांचं प्रेम वेगळ्या तर्हेने फुलतंच. कुंडलकर फक्त एवढंच म्हणतात (बहुतेक) होता है जो.. हो जाने दो! Happy

मस्त लेख. या आधी वाचला होता. मध्यापर्यंत सुरेख लिहिलाय. नंतर डि-रेल होतो, पण ठीके Happy ते त्याचं प्रेम आहे, त्याचे अनुभव आहेत, त्याचं मत आहे. काही गोष्टी मात्र अगदी चपखल लिहिल्या आहेत त्याने. त्या तशा लिहायलाही प्रचंड कन्व्हिक्शन लागतं असं मला वाटतं.

खुलासा - मी फिडेलिटी, मोरॅलिटी, एथिक्स अशा कुठल्याही गोष्टी माझ्या प्रतिसादात विचारात घेतलेल्या नाहीत. किंवा त्याच्या बाजूने लिहिलेले नाही.
फक्त जर एखाद्याने/एखादीने लग्न केले असेल तर तुम्ही एका 'करारात' स्वखुशीने बांधून घेतलं आहे एवढंच लक्षात ठेवा. करार मोडता येतो अगदी सहजच, पण मग त्या करारात परतताना (जर परतायचंअसेल तर) गणितं बदललेली असणार किंवा पार्टनर वाईट वागणार हे उघडच आहे की, तक्रार कशाला करायची मग?

शिवाय भारतीय समाजात जो व्यक्तीवादी विचार फारसा नाही तो पाश्चात्य समाजातही गेल्या दीडदोन शतकांपर्यंत नव्हताच. आधुनिक जगात त्या समाजांची घडण तळापासून ढवळली गेली आणि नव्याने नातेसंबंधांची रचना झाली तशी आपल्याकडे झाली नाही म्हणून आपण समाज म्हणून आज खूप वेगळे आहोत.
शिवाय व्यक्तीस्वातंत्र्य, त्याला समाजात असणारी मानसिक जागा असणारे जे जगाचे भाग आहेत त्यात या सगळ्या विचारांप्रमाणे वागायला कमी लोकसंख्या, तुलनेने जास्त रिसोर्सेस, इ. ही मटेरिअ‍ॅलिस्टीक गोष्टी पोषक आहेत. त्याही आशियायी समाजांमधे - भारतात जास्तकरून - आहेतच असं नाही.

इतकं लिनीअर, एकपदरी दृष्टीकोनातून लेखकाने प्रकरणांकडे बघितलं त्याची गंमत वाटली

करेक्ट करेक्ट करेक्ट ..
वरचे बरेच मतं पटत आहेत ...

काहीतरी होतं खटकणारं .. पण मांडावस वाटल नाही ..
शब्दांच्या खेळात खूप अडकायला झाल सुरुवातीला ...

वेगवेगळ्या कारणासाठी, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, पुनःपुन्हा एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडणे, नात्यामधली अम्युझमेंट न संपणे, ह्याचाही आनंद फार मोठा असतो.>>>>>>>>>>>> हे ह्ज्ज्जार टक्के खरय ...

======

लख्ख फोकस एकदम डोळ्यावर मारल्यासारखा आहे हा लेख ..
काही काळ माणूस दिपून आंधळा होऊन जातो..
सावरल्यावर हळू हळू ती मागची काळी बाजू पण दुर्लक्षिण्यासारखी नाही हे कळू लागत..

वरचे प्रतिसाद वाचूनअसच सावरायला झाल .. धन्यवाद ..

<<सगळ्यांना सगळं कधीच समजत नसतं हे यामागचं कारण आहे. एकाच माणसाला आपण म्हणत असलेलं सगळं समजावं असं वाटणं हीतर जवळजवळ हिंसा आहे.>>

प्र्तिसादां वरुन लेखकाच्या या मताचा अनुभव येतोय .

इतकं लिनीअर, एकपदरी दृष्टीकोनातून लेखकाने प्रकरणांकडे बघितलं त्याची गंमत वाटली>> हम्म्!! ती त्याची मतं आहेत/ असावीत इतकं म्हणून आमच्यासारख्या वाचकांना तटस्थ राहता येईल खरंतर... पण लेखाचा 'बाकीच्यांना तुच्छ लेखणारा' सूर खटकतो, आणि मग त्यामुळे बाकी बर्‍याच गोष्टी खटकायला सुरूवात होते.

लेख आवदला. विरोधी मतेही पतली.

आर्थिक सुबत्ता असेल तर प्रेम करने सोप्पे असते. होम लोन्च्या ओझ्यने पिचलेला माणुस असा पेमाची मजा अनुभवत आहे हे डोळ्यासमोरे आनता येत नाहीइये.

तुम्हाला असा प्रेमात पडणार्‍यंचा ते मान्य करणार्‍या लोकांचा गट उप्लब्ध असने हाही मुद्दा आहेच. कलाकार मंडळींना इअतर व्यवसायिंकाच्या तुलनेत असा गट जास्त सहज उप्लब्ध असावा असा माझा कयास.

पण मग त्या करारात परतताना (जर परतायचंअसेल तर) गणितं बदललेली असणार किंवा पार्टनर वाईट वागणार हे उघडच आहे की, तक्रार कशाला करायची मग? >>> कुंडलकर तक्रार कुठे करतोय? उलट तसं असतंच हे तोही सांगतोय.

आधुनिक जगात त्या समाजांची घडण तळापासून ढवळली गेली आणि नव्याने नातेसंबंधांची रचना झाली तशी आपल्याकडे झाली नाही म्हणून आपण समाज म्हणून आज खूप वेगळे आहोत.>>> प्रकरणं मध्ययुगापासून आजतागायत होतच आहेत तरीही. त्यांचीच तर गंमत कुंडलकर सांगतो आहे.

फार चीरफाड न करता कुंडलकरचा प्रकरण या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन, त्यानिमिताने त्याच्या प्रेम या संकल्पनेसंदर्भातली मत एंजॉय करता आली तरंच या लेखात गंमत जाणवेल. तो काही कुठे जजमेन्टल वगैरे झाला आहे, किंवा त्याने पारंपरिकतेला तुच्छ लेखलय, आग्रही झालाय असं मला तरी वाटलं नाही बुवा.
उलट त्यातल्या साचेबद्धतेलाच कवटाळून बसण्यातला उपहास, त्याचं उदात्तीकरण करणार्‍यांच्या मानसिकतेचा उल्लेख व्यक्त झालाय फक्त. असो.

आर्थिक सुबत्ता आणि प्रेम आणि प्रकरणं यांचा संबंध खरंच असतो? मजा वाटली वाचून.

आशुडी, मस्त लिहिलेयस. मलाही लेखाच्या संदर्भात हेच् म्हणायचे होते. तु ते खुप सुंदररित्या मांडलेयस.

शर्मिला फडके +१ सहमत.

Pages