'प्रकरण' - श्री. सचिन कुंडलकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

आपल्याला वाटत असतं की, आपण रोजचं जगणं अगदी आरामात जगतोय. खातोय. पितोय. हिंडतोय. काम करतोय. एकटे किंवा कुणासोबत. आणि वरती आकाशामध्ये तो ढग येऊन थांबलेला कळतही नाही आपल्याला.

असंच वाटत असतं की, आकाश तर अगदी निरभ्र आहे वरती. कारण खरं म्हणजे गेले अनेक दिवस आपण वर पाहिलेलंच नसतं. पण एकदा कधीतरी नजर वर जाते आणि सगळा मामला लक्षात येतो. आपण प्रेमात पडलो आहोत. पहिल्यांदाच किंवा पुन्हा एकदा.

आता तो ढग दिसल्यानं आपल्याला बरं वाटतं. आपण जाऊ तिथे तो आपल्यासोबत येतोच. सगळी छतं पारदर्शी होतात. रात्री गच्चीवर जावं, गावाबाहेर हायवेवर जावं, कामामध्ये अगदी स्वतःला बुडवून घ्यावं तरी आता नजर सतत वर जायची थांबवता येत नाही. आपल्याला हलकं वाटू लागलं, आपली सवयच बदलते आणि आपण नकळत एकटे असताना हसत बसलेलो असतो. ते आता आपल्या हातात उरलेलं नसतंच. आता प्यायला घेतलेल्या प्रत्येक पाण्यात तो ढग दिसू लागतो. तो असा मोठा मोठा का होत चाललाय, याबद्दल धास्ती वाटू लागते.

आयुष्यात हे वारंवार होण्याचा मोहक, तापदायक आणि लोभस अनुभव मी घेत आलो आहे. काही वेळा आधी गोंडस छोट्या शुभ्र असणार्‍या निरभ्र आकाशाची स्वप्नं पाहिली आहेत. ती खरी झाली आहेत. पण अगदी सगळ्यात पहिल्यांदा प्रेमात पडलो होतो, त्याआधी आकाशाचा जो निळा रंग होता, तसाच चमकदार निळा रंग आजही प्रत्येक ढगाच्या आगमनापूर्वी कसा काय तयार होतो, याचं आश्चर्य मला वाटायचं थांबलेलं नाही.

सध्या माझ्या डोक्यावरच्या विस्तीर्ण स्वच्छ निळ्या आभाळात एक हसरा छोटा ढग येऊन थांबलेला आहेच. पण तो बेटा आपलं आकारमान आळोखेपिळोखे देऊन विस्तृत करणार याबद्दल मला तीळमात्र शंका नाही.

प्रेम करणं ही माणसाच्या मनाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आपल्यावर कुणीतरी प्रेम करावं अशी इच्छा होणं, ही याच प्रवृत्तीची दुसरी सहज अशी बाजू. आपण प्रेमात पडण्याचं थांबवू शकत नाही. आपलं वय काहीही असो. आपण एकटे असू वा दुकटे. प्रेमाला शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही आयाम असतात. काही व्यक्ती हे दोन्ही हात पसरून आपल्याला जवळ घेतात, तर काही एका हातानंच आपल्याला कुरवाळत राहतात.

शारीरिक प्रेम करण्याची इच्छा प्रबळ होणं पण ते करू शकण्याची परिस्थिती नसणं, या नितांतसुंदर अवस्थेत त्या प्रेमात पडलेल्या व्यक्ती एकमेकांना काही वेगळ्या जाणिवांची तेजस्वी करत असतात. ही प्रेमाची अवस्था सगळ्या आसमंतात नवी अस्वस्थता तयार करणारी आणि मनाला नवी ऊर्जा देणारी असते. मी ह्या अवस्थेमध्ये पूर्वी तडफडत असे. तो आता या अवस्थेत रेंगाळायला उत्सुक आणि सक्षम झाला आहे.

सुरुवातीला आपल्या मनाच्या मागण्याच फार कमी असतात. आपोआप काही वेळा झालेल्या भेटी, डोळे, आपलं समोरच्या व्यक्तीनं केलेलं कौतुक, एकमेकांसोबत चालताना कमी जास्त करावा लागणारा वेग, जुळलेल्या आवडीनिवडी; आणि मग जर व्हायचंच असेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात. त्या व्यक्तीचं नाव जरी उच्चारलं गेलं तरी श्वास वेगळे पदन्यास करू लागतो. सोपेपणा आणि सहजतेवर कसलातरी आश्वासक दाब पडायला लागतो. लाल सिग्नलला उभं असताना, लिफ्टमधून वरखाली प्रवास करत असताना, पोहण्याच्या तलावात तरंगताना किंवा बीअरचा दुसरा ग्लास रिचवताना मन फार जड व्हायला लागतं आणि आठवण नावाची गोष्ट आपलं पाऊल मनात रोवते. आणि अचानक त्या व्यक्तीच्या आठवणीसोबत एक उष्मा मनात तयार होतो. पुढील काही दिवसांत त्याचं एक उष्णतेत रुपांतर होणार असतं. त्या उष्णतेचा निचरा करताना मनाची घालमेल उडते आणि आपण वाचत असलेली पुस्तकं, ऐकत असलेलं संगीत पाहत असलेला पाऊस, वावरत असतो ते रस्ते त्या सगळ्याचा ताबा नकळत ती व्यक्ती घेऊन टाकते. माझ्या बाबतीत तर ती व्यक्ती ज्या शहरामध्ये राहत असते, त्या संपूर्ण शहरावरतीच तो ढग पसरलेला असतो. शहराच्या आधी येणारा डोंगर चढताना मला तो खालूनच हल्ली दिसू लागतोय. माझ्याआधीच पहाटे निघून तिथे जाऊन पोहोचलेला.

हे सगळं प्रत्येकाच्याच आयुष्यात वारंवार होत असतं. टाळता येत नाही. ज्या व्यक्तींच्या आईवडलांचं लग्न झालेलं असतं आणि ज्यांना स्वतः ते करायचं असतं, शिवाय आपल्या मुलांचं आणि त्यांच्या मुलांचंही लावून द्यायचं असतं, त्या व्यक्तींना मात्र आयुष्यात हे सगळं एकदाच व्हावं असं वाटत असतं. नव्हे ते एकदाच होतं असं ते मानूनही चालत असतात. त्यामुळे लग्नाच्या प्रेमाला ते प्रेम म्हणतात आणि त्याव्यतिरिक्त इतर प्रेमांना ते ’अफेअर्स’ म्हणतात. जुन्या बोली भाषेत त्याला ’प्रकरण’ असं म्हणतात.

प्रेमात एकदाच पडावं किंवा पडता येतं हे म्हणणं बाळबोध आहे. त्याचप्रमाणे लग्न नावाच्या दोन फुटी कुंपणात एकदा उभं राहिलं की, आभाळातल्या त्या ढगांपासून आपली सुटका होईल असं म्हणणं हे बालीशपणाचं आहे. लग्नानंतर जी माणसं पुन्हा कुणाच्या प्रेमात पडत नाहीत ती किती ओंगळ, कोरडी आणि कंटाळवाणी असावीत याची कल्पनाच न केलेली बरी.

त्यांच्यावर फक्त एक आणि एकच व्यक्ती प्रेमाचे थर लावीत बसलेली असते आणि तेसुद्धा त्याच डब्यात ब्रश बुचकळून समोरच्या व्यक्तीवर तसेच ओघळ आणत बसलेले असतात. आधी खूप वेळा, मग वर्षातून एक-दोन वेळा वाढदिवसाला वगैरे. बाकी वेळ सुकलेले रंग घेऊन इकडेतिकडे बघत बसून राहायचं. असे ओघळ आणून एकमेकांना चिणून टाकण्यातच त्यांचं आयुष्य संपून जातं.

मी वाढलोच मुळी प्रकरणांच्या शेतात. माझ्या नशिबानं माझ्या आजूबाजूला, कुटुंबात आणि शेजारात लग्नांइतकीच प्रकरणं घडत होती आणि फार लहान वयापासून मला त्या शब्दाबद्दल अतीव उत्सुकता होती. तशीच दुसरी उत्सुकता मला ’ठेवलेली बाई’ या या शब्दाबद्दल होती. मला कितीतरी दिवस त्या ठेवलेल्या बाया कशा दिसतात ते पाहायचं होतं. आमच्या कुटुंबातील काही व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे आणि माझ्या आईच्या मनाच्या मोकळेपणामुळे माझी फार लहान वयात अनेक प्रकरणांशी आणि ठेवलेल्या बायांशी गाठ पडली. त्यानंतरच्या आयुष्यात कुटुंबाच्या परिघाबाहेर पडून माझा मी प्रवास करायला लागलो तेव्हा मला अनेक मोकळ्या मनाचे, आनंदी ठेवलेले पुरुषही भेटले. यामुळे माझ्या सगळ्या उत्सुकता अगदी आळस दिल्यावर हाडं मोकळी होतात तशा मोकळ्या होत विरल्या.

प्रकरणं करणारी माणसं, ठेवलेल्या बाया आणि ठेवलेले पुरुष हे नेहमीच आनंदी असतात. त्यांच्या आजूबाजूची माणसं मात्र सतत चिंतेत आणि खंगलेली असतात, असं मला दिसलं. शिवाय सतत आपण दुसर्‍याला ठेवू शकत नाही. आपल्या नकळत दुसर्‍या कुणीतरी आपल्याला ठेवलेलं असतं आणि आपल्याला ते लक्षातच आलेलं नसतं. त्यात फारच मजा येते. एकदा आमच्या नात्यातल्या एक बाई दुःखी होऊन अल्कोहोलच्या आहारी गेल्या, तेव्हा मी आईला त्याचं कारण विचारलं असता ती म्हणाली की, त्यांच्या नवर्‍याचं दु्सर्‍यापण एका बाईवर प्रेम आहे म्हणून त्यांचं असं झालं. अनेकांवर प्रेम करत राहता येतं. पण दुर्दैवानं आपलं आधी लग्न झालं असेल आणि घरी पोरंटोरं असतील तर घरच्या बाया पुरुषांना अशावेळी फार त्रास देतात. आईला त्या ठेवलेल्या बाईबद्दल जास्त सहानुभूती होती असं मला दिसलं. (मी लवकरच त्या बाईंना भेटलो, त्या फार गोड आणि सुंदर होत्या. त्या माझ्या कुणीच नव्हत्या. त्यांनी मला पिस्ते खायला दिले होते आणि पुढे काय करणार असं विचारलं होतं. तेव्हा मला माझ्या आजोबांप्रमाणे एसटीचा कंडक्टर व्हायचं होतं ते मी त्यांना सांगितलं होतं.)

मी स्वतः पहिल्यांदा प्रेमात पडलो तेव्हा मला हे उमगलं की, प्रेमासोबत माणसावर एक प्रकारचा हक्क सांगण्याची ऊर्मी उत्पन्न होते. ती व्यक्ती संपूर्णपणे आपली असावी असं वाटू लागतं, मनानं आणि शरीरानंसुद्धा. एवढंच नाही तर त्या व्यक्तीचा दिवसभराचा आणि त्यानंतरचा वेळ, तिच्या आवडीनिवडी ह्या सगळ्यांच्या बरोब्बर केंद्रस्थानी आपण असलो तरच त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम आहे अशी अट आपण नकळत घालतो. प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक शाखा प्रशाखा असतात आणि आपण त्या वृक्षासारख्या व्यक्तीमत्त्वाशी जोडला गेलेला एक भाग असतो, हे मला कधीही लक्षातच येत नसे. माझा जो कॅमेरामन आहे अमलिंदू, त्यानं मला एकदा सेटवर फार पूर्वी स्टिंग या गायकाची गाणी ऐकवली. त्यात ’If you love someone, set them free’ असं त्याचं एक गाणं आहे. ते गाणं ऐकायला आवडत असूनही मला वर्षानुवर्षं खरं म्हणजे कळलेलंच नव्हतं. माणूस आवडत असला तरी वर्षानुवर्षं कळलेलाच नसतो, तसंच गाण्याचं होतं.

हे होण्याचं कारण, स्त्री-पुरुषांची प्रेम जमताच ताबडतोब होणारी लग्नं, भावाबहिणींची भाऊबीजछाप प्रेमं, शोलेतल्या जयवीरूछापाची मैत्रीची गाणी एवढ्या तीनच कप्प्यांत माझ्या समाजानं मानवी नाती बसवली होती. सगळ्यांनी त्या तीन कुंपणांतच राहायचं. त्या कुंपणाबाहेर सगळं दुःख, बेजबाबदारपणा, अविचार आणि अश्लीलता आहे, असं मानून निमूट जगायचं.

थोडे दिवसांनी हे लक्षात आलं की, आकर्षण ही गोष्ट अपरीमीत आहे. ती थांबत नाही. त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणं हा मूर्खपणा आहे. कारण सोळासतराव्या वर्षी सुरू झालेली ही प्रेमात पडण्याची आणि आकर्षित होण्याची प्रक्रिया अजूनही मलातरी थांबवता आलेली नाही. एक मन, एक शरीर, एक भावनिक ओलावा माणसाला पुरा पडणं शक्यच नाही. निसर्गाचं असं काही म्हणणंच नाही. मग त्या सगळ्या ऊर्मींच्या विरुद्ध माणसाला कसं जाता येईल?

आयुष्याचा काही दीर्घ वा छोटा काळ एखादी व्यक्ती व्यापून टाकते. तो संपूर्ण काळ हा त्या व्यक्तीच्या नावाचा आणि रंगाचा असतो. तो काळ काही दिवसांचा वा अनेक दशकांचा असू शकतो. पण मग माणूस बदलतो. त्याला नवे अनुभव खुणावतात. त्याच्या बुद्धीची, शरीराची भूक विस्तारते. त्याच्या आवडीनिवडी बदलतात आणि तो माणूस नव्या आयुष्यासाठी ऊर्जा शोधायला लागतो. काहीवेळा सोबती असूनही तो एकटा पडतो, ज्याची कारणं स्पष्ट करता येत नाहीत. हे सगळं होण्यात आधीच्या व्यक्तीशी प्रतारणा अपेक्षित नसते, पण अनेक वेळा नात्यातली सरप्राईझेस्‌ संपलेली असतात. अशावेळी ज्याला आपण ’प्रकरण’ म्हणतो ती गोष्ट तयार होत असावी.

बहुतांश माणसांची प्रवृत्ती ही नातं जगासमोर मिरवण्याची असते. बहुतेक लग्नं ही त्याचसाठी केली जातात. जगाच्या साक्षीची गरज त्या माणसांचं नातं तयार होताना का लागत असावी? लग्न करण्याचा आणि दोन माणसांचं एकमेकांवर प्रेम असण्याचा अर्थाअर्थी संबंध आजच्या काळात राहिलेला नाही. पूर्वीही नसावा. सिनेमांचे ज्याप्रमाणे प्रीमिअर्स होतात त्याप्रमाणे माणसांची आयुष्यात लग्नं होतात. कुटुंबाच्या संपत्तीचं, गोतावळ्याचं, लागेबांध्यांचं आणि समाजातल्या त्या कुटुंबाच्या स्थानाचं ते आपापल्या परीनं केलेलं प्रदर्शन आहे. प्रेमाचा लग्नाशी संबंध नसतो. ते आपोआप तयार होतं आणि ते होणारच नसेल तर ते कितीही वेळा एकमेकांशीच लग्नं करत बसलं तरी होणार नसतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातले ते एकदाच घडणारे सोहळे असतात. अनेकजणांच्या आयुष्यात लग्न सोडल्यास पुढे काहीही भव्यदिव्य घडणारच नसतं, म्हणून ती माणसं फार हौसेनं सर्वांसमोर एका दिवसाच्या केंद्रस्थानी उभं राहून लग्न करून घेतात. फार तर फार बारशी आणि मुलांच्या मुंजी होतात. त्यानंतर थेट आपल्या मुलांची लग्नं. म्हणजे पुन्हा दुसर्‍या प्रीमिअर शोची संधी. आणि मग ते (कर्कश्श आणिे खर्चिक) चक्र अव्याहत पुढे चालू राहतं.

प्रेमाची खरी मजा ते होताना कुणालाही न कळण्यामध्ये असते. आपल्यालाही ते होताना कळत नसेल तर त्या अनुभवासारखा दुसरा विलक्षण अनुभव नसतो. जी माणसं चारचौघांत मोकळं वावरत, आपापलं आयुष्य जगत कुणालाही न कळवता एकमेकांवर प्रेम करत राहतात त्या माणसांनी फार दुर्मिळ असा आनंद आपल्या आणि दुसर्‍या व्यक्तीच्या मनाला आणि शरीराला दिलेला असतो. त्यासाठी सतत सर्वांसमोर एकत्र राहण्याची, एकमेकांना भेटवस्तू द्यायची, एवढंच काय तर ’माझं तुझ्यावर प्रेम आहे’ हे एकमेकांना म्हणायचीही गरज नसते. असं प्रेम फार कमी वेळा आयुष्यात नशिबी येतं. ते ज्यांना ओळखता येतं, ओळखून रुजवता येतं, आणि रुजवून मान्य करता येतं ती माणसं फार ग्रेट असतात. आपल्या दोघांचं नातं काय आहे याची या गर्दीत कुणालाच कल्पना नाही. याच्याइतका सुंदर रोमान्स जगात दुसरा कोणताही नाही. मग त्या प्रेमात वय, राहणार्‍या शहरातलं अंतर, लग्न झालं की नाही, आपण यापुढे कधी भेटणार आहोत की नाही असे प्रश्न हळूहळू शांत होत जातात. ते व्हायला फार वेदना होतात, कष्ट करावे लागतात. पण होणार असेल तर ते सगळं आपोआप होतं. थोडं सहन करावं लागतं. यासाठी नशिबवान असावं लागतं आणि मोकळ्या मनाची स्वतंत्र ताकद घेऊनच जन्माला यावं लागतं. त्यात सुरक्षितता आणि हक्काचे एकमेकांवरचे हिशोब असून चालत नाही. ती तसली कामं नवराबायकोंची असतात. काही भेटी वेळ ठरवून अलेल्या मिनिटासेकंदाच्या असतात, तर काही भेटी संपूर्ण रात्री व्यापून उरतात. एकमेकांच्या शरीराचे गंध आठवण आली की मनाभोवती रुंजी घालू लागतात. अतिशय दुःखाच्या आणि वेदनेच्या क्षणांना त्या व्यक्तीचा नुसता चेहरा आठवला तरी मनावर फुंकर येते. आपल्याकडे त्या व्यक्तीनं दिलेली कोणतीही भेटवस्तू नसते, ना आपण दिलेली तिच्याकडे असते. एक खूण असते कसलीतरी. एखादा संकेत असतो. हस्ताक्षर असतं. इतर कुणालाही माहीत नसेल असं हाक मारायचं नाव असतं. ते पुरेसं असतं. त्या पलीकडे सतत आश्वासनं देण्याची गरज नसते. मुख्य म्हणजे भीती नसते. असुरक्षितता नसते. महिन्यामहिन्यांची शांतता मान्य असते. कुणाला काही सांगायचं नसतं. नावं जोडून घ्यायची नसतात. प्रत्येक भेट शेवटची असू शकते. कारण हक्क नसतो. पुढची भेट झाली तर मन फार मऊ आणि आनंदी होऊन जातं. जिकडेतिकडे सगळं बरं वाटू लागतं आणि ऊर भरून येतो.

असं सगळं होण्याला इंग्रजीमध्ये ‘अफेअर’ का म्हणतात? हे जर फेअर नसेल तर मग दुसरं काय फेअर असू शकतं?

प्रेमामधून तयार झालेल्या शारीरिक ताण्याबाण्यांना समजून घेण्याची उमज आजही आपल्या परिसरात तयार झालेली नाही. शारीरिकता हा बहुतांशी प्रेमाच्या संबंधाचा पाया असतो. ती एकतर्फीही असू शकते. असली तरी ती ओळखून एका अंतरावरून झेलायला शिकायला हवं. पावसाळा आनंदात जाणार असेल तर त्याला ती भेट देण्याचा मोठेपणा मनात हवा. शारीरिक संबंध आले नाहीत, होऊ शकले नाहीत या कारणानं अनेक नाती अतिशय गूढ आणि दाट होत जाण्याची शक्यता असताना आपण फार पटकन शारीरिकतेचा ठोस आग्रह धरत नात्यांची मजा संपवून टाकतो. याचं कारण त्याविषयी आपल्या मनात सतत असलेलं दडपण.

शारीरिक संबंध ही प्रेमाची पावती असू शकत नाही. तो प्रेम करण्याचा एक मोठा उद्देश असतो. काही वेळा तो उद्देश आपोआप आणि शांतपणे सफल होतो तर काही वेळा त्याच्या कोमटपणावर, उष्णतेवर आणि धगीवर अबोलपणे वर्षानुवर्षं दोन माणसांमधलं नातं फार मस्त आकार घेतं. याची मजा घेण्याची प्रवृत्ती जोपासायलाच हवी. शरीर सापडत जायला हवं. ते स्वप्नांमध्ये रंगवता यायला हवं. त्यासाठी ते न ठरवता अचानक कधी इकडून कधी तिकडून दिसायला हवं. त्यासाठी पाऊस असतो, मोठ्या गळ्यांचे सुंदर कपडे असतात, दरवाज्यांच्या फटी असतात. पहिल्या काही तीव्र शारीरिक संबंधांनंतर, शरीराची सरप्राईझेस्‌ जर संपली तर त्या दोन व्यक्तींना नात्याचा बाज टिकवून ठेवायला पुन्हा नव्यानं एकमेकांना काहीतरी सादर करावं लागतं. त्यापेक्षा ते होईल तेव्हा होऊ द्यावं. आपोआप.

प्रेमाप्रमाणेच शारीरिकता ही काही एका व्यक्तीशी बांधली गेलेली नसतेच. आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आपल्याला अनेक शरीरं आवडतात. काही जुन्या शरीरांमधला रस उडतो आणि नवी खुणावतात. ते सगळं होणं फार सुंदर आहे. शिवाय ते अपेक्षितही आहे. त्यामुळेच तर आपल्याला जाणिवांची वृद्धी होते. हे जर मान्य केलं नाही आणि आपल्याच दोघांच्या एकमेकांच्या शरीराची अट कुणी कुणावर घातली तर कालांतरानं कोणीतरी एक न सांगता त्याच्या सहजप्रवृत्तीनं जे करायचं ते करतोच. आपल्या आयुष्याचं अत्यंत पारंपरिक स्वरूप जगाला दाखवत बसणारे लोकही ते टाळू शकत नाहीत. मग त्यातून लपवणूक आणि त्रास होतो. भावनिक हिंसा तयार होत जाते आणि आपल्यापाशी असलेला सगळा आत्मसन्मान माणसं या कारणी घालवून फार बिचारी होऊ शकतात. त्यापेक्षा रात्री दोघांपैकी कुणी घरी आलं नाही तर दार लोटून घेऊन शांत झोपावं. काही दिवस आजमवावं, गप्पा मारून मोकळेपणा ठेवावा. माणसं नेहमी सगळीकडे फिरून परत घरी येतातच. ती आपलीच असतात.

शारीरिक संबंध आले म्हणजे आपण दुसर्‍या व्यक्तीला आपले सर्वस्व दिले असं वाटणं म्हणजे एक सिनेमाकादंबर्‍यांमधून आलेला बावळटपणा आहे. आपला ‘स्व’ हा इतका स्वस्त असतो का, की तो या अनुभवानं लगेच गमावल्या जाऊ शकतो? हे सर्वस्व देण्याच्या भावनेचं खूळ इतकं प्रगाढ आहे की शारीरिक संबंध एकदा आला की लगेगच त्यापुढे प्रेम करण्याची सक्ती केली जाते. अनेक वेळा ते अव्यवहार्य असतं कारण पुन्हा लग्नाप्रमाणे शारीरिकतेचा प्रेमाशी संबंध असेलच असं नाही. आजच्या काळात जेव्हा मोकळेपणानं शारीरिक संबंध पहिल्या काही भेटींमध्ये होतात तेव्हा त्याचं स्वरूप आकर्षणाची धग शांत करण्याचं असतं. एकमेकांचा स्पर्श ओळखण्याचं आणि संवाद साधण्याचं असतं. कोणत्याही स्वरूपात ते सर्वस्व देण्याचं कधीही असू शकत नाही. अगदी लग्नाच्या नात्यातही नाही. नशिबानं आपण आता अशा काळात आहोत जिथे शारीरिकतेचा पुनरुत्पादनाशी कोणताही अपघाती संबंध नाही. असं असताना एकमेकांना दिल्या घेतलेल्या आनंदाची पुनरावृत्ती करण्याची सक्ती कुणीही कुणाला का करावी? तसं झालं तर वारंवार होणार्‍या किंवा न होऊ शकणार्‍या शारीरिकतेतून किती चांगलं प्रेम फुलत जाऊ शकतं! ते करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळायला हवं. ही निसर्गाची प्रेरणा आहे.

जर कुणावर कसलाही हक्कच सांगायचा नसेल तर मग प्रेम करणं ह्या गोष्टीला काय अर्थ उरला, अशी बर्‍याच जणांची समजूत असते. पण वर्षानुवर्षं टक्केटोणपे खाऊन, मनाला खोट्या समजुतीत पाडून, हक्काचं वजन तयार करून आपण प्रेमात असल्याचा देखावा जगापुढे साजरा करण्याची वेळ आपल्यावर कधीही येऊ नये. आपल्या मनातलं एखाद्या व्यक्तीवरचं प्रेम संपलं आहे हे ओळखायला आपण घाबरतो. ओळखलं तरी ते कबूल करणं आणि पुन्हा प्रेमात पडायला मनाला सक्षम करणं हे धाडसच आपण करत नाही.

आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रेमात पडून ते निभावणार्‍या व्यक्ती धाडसी असतात. खर्‍या असतात. पण आपल्या मनातले न्यूनगंड, परस्परांची झापडं आणि आपल्यातल्या भावनिक समृद्धीच्या अनुभवामुळे आपण लगेचच त्या व्यक्तींची ‘व्याभिचारी’ म्हणून हेटाळणी करून टाकतो. पण मनातल्या मनात प्रत्येकजण आपण तसं करू शकत नाही म्हणून कुढत असतो.

अनेक प्रेमं पचवून आणि रिचवून त्याचा गोतावळा सांभाळणारे स्त्रीपुरुष किती तेजःपुंज असतात. त्यांच्या मनाला आणि शरीराला सतत एक झळाळी असते. मला अशी अनेक माणसं माहिती असण्याचं आणि त्यांच्याशी दोस्ती असण्याचं सुदैव लाभलेलं आहे. त्या व्यक्ती सतत कात टाकत असतात. होत्याच्या नव्हत्या होतात. स्वरूपं पालटतात. ताण सहन करतात आणि बंद झालेल्या गुहांचे दगड फोडून वारंवार मोकळ्या प्रदेशात जात राहतात. त्या व्यक्तींना मनं आणि शरीरं हाताळण्याची सुंदर लकब गवसलेली असते. मध्ये येणार्‍या अंधार्‍या खोल्यांची, थरकाप उडवणार्‍या एकटेपणाची त्यांची भीती गेलेली असते. ते सगळं प्रेमासोबत येणार हे ते उमजून असतात. आपण बसलेलं विमान आपल्याला हवं तिथे कधीच उतरणार नसतं.

गरजेपेक्षा जास्त वर्षं फक्त एकमेकांसोबतच राहिलेल्या दोन माणसांना शेजारी-शेजारी उभं करून त्यांचा फोटो काढून पाहिला तर त्यांचे चेहरे बघून त्यांच्या नात्याविषयी सर्व कल्पना येते. बहुतेक वेळा खिन्न-हसते चेहरे असतात ते. त्यांच्या दारंखिडक्या नसलेल्या घराची गोष्ट सांगत असतात. आम्ही चाळीस वर्षं एकत्र काढली. पण कशी? एकटं पडण्याच्या भीतीनं एकमेकांना गच्च आवळून? की मोकळेपणानं-समजुतीनं अंतर कमीजास्त ठेवून? त्याउलट कोणत्यातरी प्रवासात महिनाभर भेटलेल्या आणि परत कधीच न सापडलेल्या मित्रांचे आणि मैत्रिणींचे फोटो पाहिले तर त्यांच्या चेहऱयावरचे भाव, ओसंडून सांडणारा आनंद पाहून मला तरी ते आयुष्य नक्की जगावंसं वाटेल.

माणसं आयुष्यात येणं जितकं साहजिक असतं तितकंच ती सोडून जाणंसुद्धा साहजिक असतं आणि त्या दोन्ही गोष्टी सोप्या नसतात. पण माणूस सोडून जाताना मनावर आणि अंगावर काही हलकी खूण सोडून गेला तर मात्र त्या ताटातुटीसारखा दुसरा एकमेवाद्वितीय अनुभव नाही.

आपण जागं व्हावं तेव्हा ती व्यक्ती शेजारी नसावी. बाहेर पाऊस पडत असावा. चिठ्ठीबिठ्ठी काही नसावी. पण आपण रात्री उतरवून ठेवलेलं काहीतरी ती व्यक्ती गुपचूप घेऊन गेली असावी. आपल्याला आनंदी थकव्यानं पुन्हा ग्लानी यावी हा आनंद सकाळी त्या व्यक्तीला दात घासताना बघण्याच्या आनंदापेक्षा किती चांगला आहे. तो प्रत्येकाला मिळो.

नात्यात नेहमी येऊन जाता आलं पाहिजे. येता यायला हवं आणि जाताही यायला हवं. केव्हा जायचं आहे हे जेव्हा एकमेकांना कळतं त्या माणसांची प्रकरणं सतत ताजी आणि मोहक राहतात. पण ते सगळं सापडायला थोडा वेळ लागतो. मधली वाट बघण्याची वेळ पण आवडायला लागते. परत घरी कुटुंबकबिल्यात जाऊन दात घासणार्‍या व्यक्तींकडे पाहून एक साळसूद हसू बाळगणं शिकून घ्यायला लागतं. असं सगळं चालू असलं की हातून फार चांगलं लिहून होतं, गाणी होतात, चित्रं उमटतात आणि साधा चहा बनवला तरी त्याला फार अस्मानी चव येते.

सतत कुणाचीतरी सोबत असण्याचा अलिखित नियम हे भारतीय समाजाचं फार मोठं दुर्दैव आहे. त्यातली सोबत महत्त्वाची न राहता ‘सतत’ हा शब्द फार मोठा करून ठेवला आहे आपण. टोळ्यांनी आणि जोडीनं सतत जागायला आपण आता रानावनातली किंवा कृषिसंस्कृतीतली माणसं उरलेलो नाही. आपल्यापैकी अनेकांना सोबत असण्याच्या पलीकडे, फक्त एकट्यानं शोधण्याचे, अनुभवण्याचे आयाम सापडते आहेत. पण तसं जगणं समृद्ध होऊ शकेल अशा आयुष्याच्या नव्या रचना, नवी-मोकळी नाती लेबल न लावता तयार करायला आपल्याला दुर्दैवानं घरात शिकवलं जात नाही. फोनच्या डिरेक्टर्‍यांप्रमाणे आपली नात्यांची लेबलांची डिरेक्टरी फार आऊटडेटेड झाली आहे. त्यात अनेक नवी माणसं नाहीत. अ‍ॅड करायची सोय नाही.

अनुभव घेणं ही नेहमीच एकट्यानं करायची गोष्ट असते. ती जोडीनं करत बसता येत नाही. तुम्ही कितीही आकंठ प्रेमात बुडाले असलात तरीही. अनुभव जेव्हा मनात मावत नाही तेव्हा तो सांगितला जातो आणि यावेळी तो नक्की समजणार्‍या माणसासोबत गाढ होत जाते. त्याला समजुतीचं आणि ओळखीचं अंगण आणि कुंपण येतं. मग दिवाणखाना येतो आणि समजुतीचंच शय्यागृह येतं. त्यात इतरांना प्रवेश नसतो.

सगळ्यांना सगळं कधीच समजत नसतं हे यामागचं कारण आहे. एकाच माणसाला आपण म्हणत असलेलं सगळं समजावं असं वाटणं हीतर जवळजवळ हिंसा आहे. यातच आपल्या आयुष्यात एकापेक्षा जास्त जोड्या तयार होण्याचं सोपं आणि साधं कारण आहे.


***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' (दिवाळी - २०१३)


***

हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल सचिन कुंडलकर व सुजाता देशमुख (मेनका प्रकाशन) यांचे मनःपूर्वक आभार.


***
विषय: 
प्रकार: 

प्रयत्न म्हणजे सध्याच्या रिलेशन्शीप मध्ये असलेल्या जोडीदाराशी परिपुर्ण असं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न.

वैद्यबुवा,

मी एक्झिस्टिंग नात्यातील व्यक्तीची बाजू घेत नाहीये. मला फक्त ते कबिल्यात परतण्यासाठी दार उघडे असेल हे ग्रूहित धरणे खटकले. पण तुम्ही म्हणत आहात तसे हाफ अ‍ॅस रीलेशनशिप मधील लोकांबाबत असेल तर त्यातल्या नो स्ट्रिंग्ज अ‍ॅटॅच प्रकरणात मर्जीनुसार येणे, काळ घालवणे, जाणे हे होणारच हे मी गृहितच धरतेय. मात्र रियालिटीत बहुतेक वेळा अशा प्रकरणात प्रत्येकाला हे जाणे येणे स्वतःच्या टाईमटेबलनुसार हवे असते. दुसर्‍या पार्टीचे टाईमटेबल त्याच्याशी मॅच झाले तर ठीक नाहीतर तमाशा ठरलेला. इनफॅक्ट स्वतः लग्नाच्या एकनिष्ठतेची शपथ मोडणारी ही मंडळी बरेचदा आपल्या प्रकरणाकडून निष्ठेची अपेक्षा ठेवण्याचा दुटप्पी करतानाही दिसतात.

बाकी 'एकंदरीत भारतीय समाजाचे दुर्दैव' , 'प्रेमामधून तयार झालेल्या शारीरिक ताण्याबाण्यांना समजून घेण्याची उमज आजही आपल्या परिसरात तयार झालेली नाही.' वगैरे शेरे वाचून करमणूक झाली. कुटुंब संस्थेचे महत्व फक्त भारतीयांनाच असा दावा केला जातो त्याचेच हे दुसरे टोक!

केदार, मतेमतांतरे सारे ठीक आहे आणि आपापल्या जागेवर बरोबर असेलही तुझ्या पोस्टचे मात्र फार नवल वाटले

प्रयत्न म्हणजे सध्याच्या रिलेशन्शीप मध्ये असलेल्या जोडीदाराशी परिपुर्ण असं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न.>>> म्हणजे प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही म्हणून दुसरीकडे प्रेम शोधायचं असं का? तसं असेल तर या सगळ्या चर्चेला काही अर्थ नाही. कारण लेख वाचल्यावर कुंडलकरांना एका 'परीपूर्ण' नात्यातून दुसर्‍य 'परीपूर्ण' नात्यात सहज जाता आलं पाहिजे असं मला वाटलं. नातं परीपूर्ण करायला वेळ, शक्ती, (मी त्यागही करावा लागतो लिहीणार होते, पण तो परत वादाचा मुद्दा ठरेल त्यामुळे तो शब्द बाद!) द्यावा लागतो. त्याबरोबर प्रेमासारखी भावना ही हवीच अन्यथा फक्त प्रोफेशनल नाती निर्माण होतील असं वाटत नाही का? मग असं परीपूर्ण नातं निर्माण झाल्यावर, जे हवं आहे ते याच नात्यात मिळतंय म्हटल्यावर त्याचसाठी परत दुसरीकडे जावसं वाटतं का? का? आणि असे दुसरीकडे बघावे/जावे लागत असेल तर त्याला परीपूर्ण नाते म्हणावे का? असे अनेक प्रश्न पडतात.

मी यावर्षी जुन महिन्यात पाऊस आला की एक ललित लेख लिहिणार आहे. पाउस कसा मनाला धुंद करतो, पहिला पाऊस आणि पहिलं प्रेम हे किती आनंददायक असतं, पहिल्या पावसामुळे येणार्‍या मातीचा सुवासाने कसं वेड लागतं, मित्रमंडळींबरोबर पावसात भिजण्यात किती मज्जा आहे, ज्यांनी हे सगळं अनुभवलं नाही ते किती रुक्ष मनोवृत्तीचे आहेत अन मला कशी त्यांची दया येते वगैरे सगळा मसाला घालून.

मग त्यावर मला अशा प्रतिक्रिया मिळतील का?:
१. अगदी वास्तवापासून दूर असलेलं लिखाण आहे. पावसाळ्यात होणार्‍या रोगराईबद्दल अन चिखलाबददल काहीच नाही? लेखिका स्वप्नाच्या दुनियेत रहाते वाटतं.
२. पावसाळा वगैरे सगळे चोचले आहेत. आम्हा दुष्काळग्रस्तांना प्यायला पाणी मिळत नाही अन हे चालले पावसात भिजायल. (हल्लीची/ पुणेकरांची/ कमावत्या मुलींची/ब्राम्हणांची/ ब्रिगेड्यांची.. टेक युअर पिक) नसती थेरं आहेत.
३. ह्यांना मित्रमंडळींबरोबर पावसात भिजायचं एवढं कौतुक आहे पण ताप आला तर शुश्रूषा करायला घरचे लोकच आठवतील ना? घरच्यांनी काय ठेका घेतलाय का?

नाही येणार. कारण ती पाव्सावरची सगळी "लेखिकेची" मतं आहेत, तिचा पावसाकडे पाहण्याचा दॄष्टीकोन आहे म्हणून सोडून दिलं जाईल. पण "विबासं"/प्रकरणं वगैरे जड विषयावर "ललित" जरी लिहिलं की ती लेखकाची मतं/पर्स्पेक्टिव्ह न रहाता, त्या ललित लेखनाचा जीव घेऊन त्याला "चर्चेत" रुपांतरित करण्यात येतं.
इट इज सो बोरिंग!

नोटः इथे कुठेही लेखक वाचकांन "असं करावं", "तसं करु नये" वगैरे प्रीचिंग करत नाहिये पण लेख अतिशय "ओपिनिअनेटेड" आहे, हे अगदी मान्यच. पण सगळ्या बाजुंचा विचार करुन लिहायला तो काही "विवाहबाह्य संबंध आणि त्याचे कुटुंब व समाजमनावर होणारे परिणाम" असा रिसर्चपेपर/ निबंध नाहिये. ज्यांना असे मुद्देसुद, सर्वबाजुसमावेशक, सगळ्या न्याय०अन्यायाचा एकाच लेखात न्यायनिवाडा करुन हवा असलेला लेख वाचायला आवडतो त्यांनी ललितलेखन/ कथा/ कविता थोडक्यात फिक्शन वाचायचे कष्ट घेऊ नये. हे म्हणजे चित्रात काळा अन पिवळाच रंग का वापरला, निळा का नाही असं विचारण्याइतकंच निरर्थक आहे.

अजुन एक नोटः ही सगळी "माझी", "स्वत:ची" मतं आहेत. (आजकाल असं डिस्क्लेमर द्यावं लागतं म्हणे. म्हणजे कमी ठोकतं पब्लिक Proud )

स्वाती२, विचाराची नेमकी लाईन लक्षात घेऊन त्यावर प्रतिक्रिया दिलीत ह्याबद्दल थँक्युच म्हणायला हवे तुम्हाला. नाहीतर एरवी नेमकी लाईन लक्षात आणून देण्यातच माणूस अर्धमेला होतो. Happy

दुसर्‍या पार्टीचे टाईमटेबल त्याच्याशी मॅच झाले तर ठीक नाहीतर तमाशा ठरलेला. इनफॅक्ट स्वतः लग्नाच्या एकनिष्ठतेची शपथ मोडणारी ही मंडळी बरेचदा आपल्या प्रकरणाकडून निष्ठेची अपेक्षा ठेवण्याचा दुटप्पी करतानाही दिसतात.>>>>>. बरोबर. मी दुटप्पी लोकांबाबत बोलत नसून ऑनेस्टली प्रयत्न करुन नंतर अनेक कारणांनी पुढे इन्कंपॅटिबिलिटी निर्माण झालेल्या रिलेशन्शीप्सबाबत बोलत होतो. कित्येक वेळा लग्न करताना ही मंडळी खरोखरच आनंदात असतात पण पुढे ज्या पद्ध्तीनी त्यांचं रिलेशन्शीप सरकतं त्यात कधी कधी त्यांची काही चूक नसते पुढे ही इन्कंपॅटिबिलिटी वाढण्यामध्ये.

अंजली, आता फार विस्तारात लिहित नाही. I think I've said enough. Probably more than I should've.
I just think everyone should consider his viewpoint on love without getting hung up on morals.

लेख वाचला, चर्चाही चांगली चालू आहे.
मुळात कोणत्याही नात्यात (ते शारीरीक असो, मानसिक असो, समाजानं स्वीकारलेलं असो, वा नसो) इनव्होल्ह असलेल्या दोघांचीही समृद्धी होणं आवश्यक आहे. ही समृद्धी, ग्रोथ त्या त्या नात्यासाठी कोणत्याही पातळीवरची असू शकते. पण जिथे एक समृद्ध होतो आणि दुसरा पिचत राहतो, ते नातं हेल्दी रहात नाही.
शिवाय " समोरच्यात काहीतरी कमी आहे म्हणुन मी दुसरीकडे काही शोधतोय्/शोधतीये" असं न समजता ' माझ्या बुद्धीची, जाणीवा-नेणीवांची गरज वाढल्याने किंवा बदलल्याने' कोणी दुसर्‍या नात्यात गुंतू शकतं, हेच मुळी आपल्या समाजात अजूनही स्वीकारलं जात नाही. इथे इगो दुखावण्याचा प्रश्न येतो, हक्काचा प्रश्न येतो आणि म्हणुन जुनी नाती कटू होतात.
अनेकदा समजत असूनही स्वीकारलं जात नाही... कारण एकदा लग्न झालं की जगातल्या सगळ्या गोष्टी त्याच व्यक्तीबरोबर केल्या पाहिजेत, सर्व विषय त्याच व्यकीशी बोलले पाहिजेत, सर्व गोष्टी त्या एका व्यक्तीतच शोधल्या पाहिजेत - हे आपलं कंडीशनींग आहे. याच्या जरा कुठे बाहेर काही विचार केला तरी लगेच त्याचे अर्थ बदलले जातात.
मुळात आपल्याकडे 'लंग्नसंस्था खूप ओव्हर्हाईप्ड' आहे. आयुष्यातले प्रत्येक निर्णय, प्रत्येक अर्थ- अनर्थ, प्रत्येक विचार हा कधी सरळ तर कधी वळणं घेत, कोणत्या ना कोणत्या मार्गाने शेवटी 'लग्नसंस्थेपाशीच ' का यायला हवा?
या दृष्टीकोनातून विचार करता ह्या लेखात जो विषय मांडला गेला आहे ते विषय डिस्कस करण्याची, आणि त्यात कोणत्याही एका बाजूला आडून न राहता, केवळ शब्दांत न गुंतता त्यातल्या मतितार्थापर्यंत पोचण्याची गरज आहे.
काय चूक, काय बरोबर , कोणती बाजू योग्य -अयोग्य हा मुद्दाच नाहीये इथे.
'समाजात असंही असू शकतं.. आणि असं असेल तर ते स्वीकारायला हवं, त्याकडे व्यापक दृष्टीकोनातून बघायला हवं' इतकंच सांगतो हा लेख...

एकच भाग मला पर्सनली आवडला नाही तो म्हणजे - विचाराने, अनुभवाने मी समृद्ध झालो आहे हे सांगताना लेखक दुसर्‍यांना कमी का लेखतो? हे निदान माझ्या विचारांच्या पलिकडचं आहे.
ही अनुभूती आहे... कोणाला होते, कोणाला नाही. सिंपल.
साधं आहे - तू मोठा असशील, तर तुझ्या अनुभवामुळे, तुझ्या मोठेपणामुळे. लोकं लहान आहेत म्हणून किंवा त्यांना लहान दाखवून कोणी मोठा होत नाही.
अजून एक म्हणजे 'एकदा का एक किनारा सोडून तुम्ही दुसर्‍या किनार्‍याकडे जायला लागलात्/पोचलात' की आधीच्या किनार्‍यावर इतर लोक काय करतात, त्यांना काय अनुभव यायला हवेत, जे आत्ताचे त्यांचे अनुभव आहेत ते कसे 'खुजे' आहेत यावर भाष्य करण्यात बुद्धी, शक्ती, क्रीएटीव्हीटी का खर्च करावी?

अहो बुवा, मी मोरॅलिटीविषयी बोलत नाहीये. इनफॅक्ट मी, त्याचा विचार बाजूला ठेवू असंच म्हणत आहे. पण कुंडलकरांना अभिप्रेत असलेलं प्रेम म्हणा अथवा प्रकरण इतकं सहज होत नाही ही फॅक्ट आहे. त्यातून येणारी गुंतागुंत -सगळीच भावनिक, नात्यातली वगैरे - अपरीहार्य आहे, जे कुंडलकर सोयीस्करपणे इग्नोर करत आहेत असा माझा मुद्दा होता.

अंजली, ओके. आलं लक्षात. मला नाही वाटत ते इग्नोअर किंवा सिंप्लिफाय करत आहेत. त्याचा उल्लेख केला नसल्यामुळे आपण तसं गृहित धरतो पण माझ्यामते (वर मी इब्लिसांशी बोलत असताना लिहिलय तसं) परिणाम , गुंतागुंत न गृहित धरता असं काही करतील इतके लेखक इम्मचुअर वाटत नाहीत. He only concentrates on the feeling of love and not on what goes on along with it. His "prakarans" almost feel like these mini crushes people have on each other.
Sometimes they go beyond those crushes, in that case it was always meant to be as the existing relationship they're in was never whole.

अहो आपल्याकडे अमिताभ, राज बब्बर, बोनी कपूर, धर्मेंद्र, कमल हसन, राजेश खन्ना, आमीर खान, सैफ अली खान, शाहरूख खान, सलमान खान, अक्षय कुमार आणि कैक सारे सगळ्यांनी एकेका प्रकारचे प्रेमळ ऊदाहरण घालून दिलेले असतांना, सगळे पर्म्युटेशन्स कॉंबिनेशन्स रिअल सीनॅरिओ मध्ये 'अँड दे लिव्ड हॅपिली एवर आफ्टर' असे प्रुवन असतांना Uhoh , हे सगळे लोक प्रचंड यशस्वी व सन्मानाचे हकदार असतांना ( नोटः- कोणालाही त्यांनी जे केले त्याबद्दल तुरुंगात डांबलेले नाही म्हणजे ते बेकायदेशीर नाही) पुन्हा नव्याने हे चूक की बरोबरचे त्रैराशिक मांडण्यात काय हशील आहे?

वैश्विक नैतिकता असा काही प्रकार अस्तित्वात तरी आहे का? नैतिकतेची परिभाषा व्य्क्तीनुरूप बदलणार असेल आपल्याला पटते ते आपण करावे, फारच वाटले तर लिहून काढावे लिहितांना स्वतःलाच कारणे द्यावीत, दुषणॅ द्यावीत अगदी प्रशस्तिपत्रकही द्यावे.

फारच छान पोस्ट्स वाचायला मिळाल्या.
नताशा, धन्यवाद! हे एक ललित (तेही व्यक्तिगत अनुभवावर) आहे असा विचार मी केला नव्हता. अर्थात त्याने मला न पटणाऱ्या गोष्टी पटायला लागतील असं नाही पण I am able to give some benefit of personal opinion to the author. एकूण माझ्या लक्षात आलं आहे की नैतिकता ही एक व्यक्तिगत (personal) गोष्ट आहे. [personal =,व्यक्तिगत not equal to private=खाजगी]. It (morality) is one of the core values
that defines you. Everyone's morality depends on one's personality and temperament. Some people may not find happiness in any kind of binding relationships like marriage. Sachin Kundalkar seems to be advocating such non-binding relationships. But in doing so he unnecessarily puts many derogatory comments on people who value binding relationships and that put me off the most!

ह्या सगळ्या चर्चेवरून मला माझी झालेली एक गमतीशीर निराशा आठवली. रिचर्ड बाख माझा अत्यंत आवडता लेखक! त्याचं The bridge across forever हे पुस्तक मला जाम म्हणजे जाम आवडलं होतं!!(आहे?) Based on his own search for the soul-mate, meeting her, their love-story and married life..it felt like reading a real life dream-come-true kind of a love story (and so it was)! मी खूपच प्रेमात पडले होते त्या पुस्तकाच्या! अमेरिकेत आल्यावर एकदा त्याच्या एका पुस्तकाचा संदर्भ शोधायला म्हणून त्याचं विकी पेज उघडलं आणि कळलं की रिचर्ड बाखची तीन लग्न झाली आहेत आणि जिच्याबरोबरच्या प्रेम कहाणीवर पुस्तक लिहिलं तिच्याशी १९९७ साली घटस्फोट झाला! त्या दिवशी इतकं वाईट वाटलं मला..विश्वासघात झाल्यागत! I had believed in their love story, in his words. I thought their love was eternal but it didn't even last more than 20 years!
It was a big big moment of realization for me! त्यानंतर हे असले प्रेमाचे ललित लेख वाचले की वाटत, असले न निभणारे शब्दांचे बुडबुडे निरर्थक असतात. ही temporary kick/high देणारी so called ethereal वाटणारी नाती असण्यापेक्षा एक boring पण steady relationship कधीही चांगलं. (इति. माझं व्यक्तिगत मत सगळ्या आवश्यक डिस्क्लेमर्स सकट! )

चिनूक्स, हा लेख इथे टाकल्याबद्दल आभारी आहे. तेव्हा दिवाळी अंकात लेख आवडला नव्हता रादर वाचून फार विचित्र वाटलं होतं. आता इथली चर्चा वाचून किमान गूड फॉर हिम नॉट फॉर मी ह्या मतावर आले आहे.

त्यानंतर हे असले प्रेमाचे ललित लेख वाचले की वाटत, असले न निभणारे शब्दांचे बुडबुडे निरर्थक असतात. ही temporary kick/high देणारी so called ethereal वाटणारी नाती असण्यापेक्षा एक boring पण steady relationship कधीही चांगलं. >>

+१
Happy

<<ही temporary kick/high देणारी so called ethereal वाटणारी नाती असण्यापेक्षा एक boring पण steady relationship कधीही चांगलं. >>

+१

It was a big big moment of realization for me! त्यानंतर हे असले प्रेमाचे ललित लेख वाचले की वाटत, असले न निभणारे शब्दांचे बुडबुडे निरर्थक असतात. ही temporary kick/high देणारी so called ethereal वाटणारी नाती असण्यापेक्षा एक boring ..>>> To each her own असं मानलं तरी हे विधान एक जनरलायझेशन म्हणून मान्य नाही. प्रत्येक गोष्ट आयुष्यात त्याच इंटेन्सिटीची राहावी, कायम राहावी हे मानणंच अमानवी आहे. माणसं बदलतात, परिस्थिती बदलते. कोणे एके काळी ज्याच्याशिवाय एक क्षण चैन पडत नाही तो आता जरा वेळ समोर नसला तर बरं अशीही फेज येते. म्हणजे सुरवातीला वाटलेली बेचैनी, तेव्हा घेतलेल्या आणाभाका, लिहीलेली प्रेमपत्रं, झालेल्या कविता, केलेले एसेमेस सगळं निरर्थक? शब्दांचे बुडबुडे? निष्पाप जीवांची निर्घृण हत्या वाचल्यावर वाटतं ना काहीतरी अस्वस्थ तसं वाटलं मला हे वाक्य वाचून. प्रत्येक गोष्ट ही त्या त्या वेळेची डिमांड असते. बाखला स्वत:ची लव्हस्टोरी लिहावीशी वाटली, त्याने लिहीली म्हणजे त्याने कधीच तिच्यापासून वेगळं होऊ नये असं नाही. जी काय परिस्थिती असेल त्यात नसेल जमत दोघांना एकत्र असणं पण म्हणून वीस वर्षांपूर्वीचं ते प्रेम, त्यावर त्याबद्दल लिहीलेलं खोटं, निरर्थक ठरत नाही.कुणी प्रेमात वेडं होऊन काही लिहायचंच नाही कारण काय माहीत बुवा नंतर ब्रेकप झालं तर! असं ठरवलं असतं तर सगळ्याच साहित्यात किती रूक्षता, कोरडेपणा आला असता! भंगलेल्या प्रेमाच्या या लिहीलेल्या आठवणी आयुष्यात कधीकधी मोरपिसं ठरतात. संदर्भ, व्यक्ती सगळं बदललेलं असलं तरी त्या शब्दातून आपण जुन्या स्वत:ला पुन्हा भेटतो. वर कुंडलकरांनी हेच लिहीलंय की या काळात काहीतरी सुंदर असं लिहीलं जातं. कारण ते उत्कटतेतून उमटतं. उत्कटतेला क्षणांचा शाप आहे. कदाचित पान उलटेपर्यंतही तिचं पाऊल टिकणार नाही, पण म्हणून अजून ओल्या असलेल्या शाईत लिहीलेलं सारं निरर्थक बुडबुडे? तो क्षण तुम्ही जगलायत हे तरी कबूल असावं निदान. अशा तुकड्या तुकड्यात जमलेल्या आठवणीत तर आपलं खरं प्रतिबिंब सापडू शकतं.

वर जे आशूडीने लिहिलं आहे मी तसचं काहीसं लिहायला आलो होतो पण तोवर तिचे उत्तर पाहिले.
जिज्ञासा बाखचे प्रेम २० वर्ष राहिले हेही नसे थोडके. माझ्यामते प्रत्येक प्रेमाला सुरुवात आणि शेवट असतो. फक्त एक आईचे प्रेम असे असते की ज्यात कधीच बदल होत नाही. म्हणून मातृत्व थोर मानले जाते. नवरा बायको जरी मरेपर्यंत एकमेकांच्या सोबत राहतात पण ते एकत्र राहतात म्हणून त्यांच्यात प्रेम आहे असेही नसते.

अमेरिकेत ब्रेक अप्स, एक दोन तीन विवाह, घटस्पोट हे फार कॉमन झालेल आहे आशियाच्या तुलनेने.

प्रत्येक गोष्ट आयुष्यात त्याच इंटेन्सिटीची राहावी, कायम राहावी हे मानणंच अमानवी आहे. माणसं बदलतात, परिस्थिती बदलते. >>

+१

त्यानंतर हे असले प्रेमाचे ललित लेख वाचले की वाटत, असले न निभणारे शब्दांचे बुडबुडे निरर्थक असतात. ही temporary kick/high देणारी so called ethereal वाटणारी नाती असण्यापेक्षा एक boring पण steady relationship कधीही चांगलं. >>> +१ Happy

नताशा छान पोस्ट!!

इथेकुठेही लेखक वाचकांन "असं करावं", "तसं करु नये" वगैरे प्रीचिंग करत नाहिये पण लेख अतिशय "ओपिनिअनेटेड" आहे, हे अगदी मान्यच. पण सगळ्या बाजुंचा विचार करुन लिहायला तो काही "विवाहबाह्य संबंध आणि त्याचे कुटुंब व समाजमनावर होणारे परिणाम" असा रिसर्चपेपर/ निबंध नाहिये. >>>> +१

U have to read bridge across forever and other Bach books to understand what jidnyasa is saying. And now u know that they r divorced. But u shld have read that b4,knowing it..

स्वाती२ - पहीली पोस्ट छानच.

प्रेमाचे ललित लेख वाचले की वाटत, असले न निभणारे शब्दांचे बुडबुडे निरर्थक असतात>>>>>>

@जिज्ञासा + एकदम पटेश. +१११११११११११

स्वाती२ नेहमीप्रमाणे संयत भाषेतली नसली तरी पोस्ट आवडलीच! Happy

श्री कुंडलकरांबद्दल अजुन वाचायला आवडेल. अजिबात माहीत नाहीत हे लेखक!

वावा आशुडी! वरचा लेख माझ्यासाठी कांही जमला नाहीये.
पण तुझ्या सर्व प्रतिक्रीया एक सुरेख ललित! तुला काय म्हणायचय ते पोचतय आणि पटतय.

नताशा,
>>नाही येणार. कारण ती पाव्सावरची सगळी "लेखिकेची" मतं आहेत, तिचा पावसाकडे पाहण्याचा दॄष्टीकोन आहे म्हणून सोडून दिलं जाईल. पण "विबासं"/प्रकरणं वगैरे जड विषयावर "ललित" जरी लिहिलं की ती लेखकाची मतं/पर्स्पेक्टिव्ह न रहाता, त्या ललित लेखनाचा जीव घेऊन त्याला "चर्चेत" रुपांतरित करण्यात येतं.
इट इज सो बोरिंग!>>
पावसाकडे पहायचा 'अ' व्यक्तीचा दृष्टीकोन कसाही असला तरी तो त्याचा दृष्टीकोन म्हणून सोडून दिले जाते. विबांस वगैरे बाबत तसे होत नाही. कारण बर्‍याच जणांना प्रत्यक्ष नाही तरी अप्रत्यक्षपणे या प्रकरणांची अशी ना तशी झळ लागलेली असते. दोन माणसांच्या निर्णयाने अशा प्रकारात कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त कितीही लोकांची आयुष्य बदलतात. त्यात मुलं असल्यास काही वेळा ही उलथापालथ त्यांचे पुढले आयुष्य देखील कायमचे झाकोळून टाकू शकते. प्रकरणापायी आधीच्या कुटुंबाला वार्‍यावर सोडणे वगैरे झाले असेल तर त्याचे ओझे काही प्रमाणात अप्रत्यक्षपणे समाजावरही पडते. एकंदरीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष इनोसंट विक्टिम्स विचारात घेतले तर तीव्र प्रतिक्रिया येणे साहाजिक आहे. त्यातून असे ओपिनियेटेड, इतरांना कमी लेखत लिहिल्यावर तर होणारच ना!

>>प्रत्येक गोष्ट आयुष्यात त्याच इंटेन्सिटीची राहावी, कायम राहावी हे मानणंच अमानवी आहे. माणसं बदलतात, परिस्थिती बदलते. कोणे एके काळी ज्याच्याशिवाय एक क्षण चैन पडत नाही तो आता जरा वेळ समोर नसला तर बरं अशीही फेज येते. म्हणजे सुरवातीला वाटलेली बेचैनी, तेव्हा घेतलेल्या आणाभाका, लिहीलेली प्रेमपत्रं, झालेल्या कविता, केलेले एसेमेस सगळं निरर्थक? शब्दांचे बुडबुडे? निष्पाप जीवांची निर्घृण हत्या वाचल्यावर वाटतं ना काहीतरी अस्वस्थ तसं वाटलं मला हे वाक्य वाचून. प्रत्येक गोष्ट ही त्या त्या वेळेची डिमांड असते. बाखला स्वत:ची लव्हस्टोरी लिहावीशी वाटली, त्याने लिहीली म्हणजे त्याने कधीच तिच्यापासून वेगळं होऊ नये असं नाही. जी काय परिस्थिती असेल त्यात नसेल जमत दोघांना एकत्र असणं पण म्हणून वीस वर्षांपूर्वीचं ते प्रेम, त्यावर त्याबद्दल लिहीलेलं खोटं, निरर्थक ठरत नाही.>> +१

http://www.scientificamerican.com/article/fact-or-fiction-oxytocin-is-th...
सगळा ऑक्सीटोसीनचा परिणाम असतो ,ज्याच्या मेंदूत नॅचरली ऑक्सीटोसीन जास्त तयार होते वा ऑक्सीटोसीन रिसेप्टर्स जास्त आहेत, ते असे सतत प्रेमात पडतात व मग त्यांना सगळीकडेच ढग दिसु लागतो. गमतीचा भाग म्हणजे टेस्टेस्टीरॉन ऑक्सीटोसीनचा ईफेक्ट कमी करते, त्या मुळे पुरुष बरेचदा love ऐवजी lustचे शिकार होतात, पण स्त्रीयांचे तसे नसते त्यांचे प्रेम मात्र खरे प्रेम असते, कारण ऑक्सीटोसीन फुल मोडवर काम करते त्यांच्यात.

U have to read bridge across forever and other Bach books to understand what jidnyasa is saying. And now u know that they r divorced. But u shld have read that b4,knowing it..>>नानबा +१००० Thank you for saying this!

आशुडी, मला एका पातळीवर तू लिहिलेलं सगळं पटतंय आणि गम्मत म्हणजे मला वाटतं की आपण दोघी एकच गोष्ट म्हणतोय! माझा उद्वेग ह्यातूनच आलाय की जे इतकं उत्कट, शाश्वत प्रेम होतं ते असं नाहीसं कसं झालं? I thought it would mature into a more consistent, sustainable adult love which is forever. You have to read the book to actually understand Bach's philosophy of soulmates and love. He wrote two books with her (Leslie) in it. And 20 years down the line, they don't want to see each other anymore and then Bach goes ahead and marries third time! Wow!
मी बाखच्या शब्दांवर, त्यांच्या अर्थावर विश्वास ठेवला होता. मी प्रेमात होते त्या पुस्तकाच्या! आणि तो विश्वास तुटलेला पाहणं खूप वेदनादायी होतं Sad त्यानंतर माझा लेखकाच्या integrity वरचा विश्वास उडालेला आहे.
समजा, एका लेखकाने त्याच्या पुस्तकातून सतत खरे बोला, दुसऱ्यांना फसवू नका असा उपदेश केला आणि तुम्ही ते पुस्तक वाचून त्या माणसाबद्दल खूप आदर आणि प्रेम बाळगू लागलात. काही वर्षांनी तुम्हाला कळलं की नंतर काही वर्षांनी त्या लेखकाला खोटे बोलणे आणि लोकांच्या पैशाची अफरातफर करणे ह्या आरोपाखाली अटक झाली तर तुम्हाला कसं वाटेल? रिचर्ड बाख बद्दल माझं exactly असं झालं आहे. ज्या माणसाने इतकी सुंदर soulmate philosophy मांडली त्याचाच सोलमेट टिकला नाही! मग विश्वास तरी कसा ठेवायचा त्याच्या शब्दांवर? किंवा कोणाच्याही शब्दांवर! Your beliefs don't make you a good person, your behavior does! त्यामुळे मी आजकाल खऱ्या माणसांच्या फक्त आणि फक्त कृतीवर विश्वास ठेवते..शब्दांवर नाही.

Pages