रेल्वेमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: आपल्या सूचना व सल्ले. "विनंती स्वीकरली आहे"

Submitted by ऋग्वेद on 20 November, 2014 - 07:49

भारताच्या इतिहासात दुसर्यांदा महाराष्ट्राकडे देशाचे एक महत्वाचे असे "रेल्वे मंत्रीपद" मिळाले आहे. ( राम नाईक यांच्याकडे एनडीएच्या काळात आलेले होत परंतु ऑगस्ट ते ऑक्टोंबर १९९९ असे अवघे ३ महिनेच होते ) माननिय श्री. सुरेश प्रभुंसारख्या हुशार आणि कल्पक नेतृत्वाकडे हे पद गेल्याने नक्कीच अपेक्षा वाढली आहे. भारतीय अर्थकारणात रेल्वेचा सहभाग महत्त्वाचा आहे. रेल्वे ही भारताच्या नसनसातुन वाहत आहे. एक प्रमुख दळणवळणाचे साधन म्हणुन तसे स्वस्त आणि जलद मालवाहतुक साधन म्हणुन देखील रेल्वेचे भारतात मुख्य योगदान आहे.
आजपर्यंत जास्त रेल्वेमंत्रीपद हे उत्तर भारतात असणार्या नेत्यांनाच मिळत होती. त्यामुळे महाराष्ट्रामधुन भरघोस उत्पन्न मिळुन सुध्दा योग्य म्हणावे असा परतावा मिळाला नाही. महाराष्ट्रातुन एकुण उत्पन्ना पैकी जवळापास ५०% पेक्षा जास्त उपन्न रेल्वेला मिळते पण दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पाच्यावेळी महाराष्ट्राच्या तोंडाला पानेच पुसली जातात. अर्थात दरवेळेला महाराष्ट्रालाच वाटा मिळाला पाहिजे अशी मागणी नाही पण इमानदारीने पुढच्या स्टेशनवर जाण्याकरीता देखील रांग लावुन तिकिट काढणार्याला योग्य मोबदला मिळावा इतकी तरी रास्त अपेक्षा ठेवणे वागवे ठरणार नाही. सगळ्यांच सरकारांनी रेल्वे वाढवली तिचे उत्पन्न वाढवले बरीच कामे केली तरी लोकांच्या अपेक्षा पुर्ण झाल्या नाहीत. बर्याच जणांच्या अपेक्षा अवास्तव वगैरे असतील. रेल्वेखात्याने देखील स्वतःतर्फे बरीच अपेक्षा पुर्ण करण्याचा प्रयत्न केला असेलच. अश्या प्रयत्नातुनच आजची रेल्वे आपल्याला अनुभवायला मिळते हे खरे आहे. इंटरनेट ई - तिकिट वगैरे सुविधा अश्याच कल्पनेचा जन्म त्यातुन झाला. अश्या विविध कल्पनेतुन सुचनेतुन त्याप्रत्यक्षात उतरतील की नाही याची चाचपणी करता येईल. नुसते डब्बे वाढवुन फेर्‍यावाढवुन समस्येतुन समाधान मिळत नसते. बर्याच छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्यातुन चांगले उत्तम परिणाम येउ शकतात.
कोणी मुंबई लोकल ट्रेन बद्दल सल्ले देतील तर कोणी ज़ळगाव, कोल्हापुर स्टेशन वरील लांब पल्ल्यांच्या गाड्यांबाबत सल्ले सांगतील तर कोणी स्टेशन बद्दल तर कोणी रेल्वे रुळांबद्दल अश्या विविध उत्तम सल्ले गोळा करुन रेल्वेमंत्र्यांना देण्याचा मानस आहे ( त्यावर किती अंमलबजावणी होईल? , सल्ल्यांना गंभीरपणे घेतील का? वगैरे बद्दल सांगता येणार नाही परंतु मी स्वतः तरी सुरेश प्रभुं यांच्या पर्यंत पोहचतील या प्रयत्नात असणार आहे. )

काही सल्ले:-

१) जुलै महिन्यात रेल्वेखात्याने स्टेशन वर ट्रेन (लांबपल्ल्याची) येण्याच्या ३० मिनीट अगोदर रिझर्वेशन करण्याची सोय रद्द केली होती. ( चौकशी काउंटर वर अश्या प्रकारची तिकिटे मिळत होती हे बर्‍याच कमी जणांना माहीत असेल ) ती पुन्हा चालु केली पाहिजे. रिझर्वेशन मधुन रेल्वेला जास्त उत्पन्न मिळते तसेच ग्राहकाचे समाधान देखील होते. डब्ब्यात असणार्या मोकळ्या सीटचा काळाबाजार कमी प्रमाणात होतो. कारण पुढच्या स्टेशनवर त्या रिकाम्या असणार्या सीटचे रिझर्वेशन देखील होउ शकत असल्याने ती सीट दुसर्याला देउ शकत नाही. या सुविधेचा वापर जास्त लोकांनी करावा या करिता माहीती जनमानसांना योग्य माध्यमातुन देण्यात यावी.

२) मुंबईच्या लोकल ट्रेनचे डब्बे एकमेकांना आतुन जोडण्यात यावे. लांब पल्ल्यांच्या गाड्या या आतुन जोडलेल्या असतात. त्यामुळे गाडीतली गर्दी विभागली जाते लोक मोक़ळ्या जागेकडे धाव घेतात. परंतु लोकल ट्रेन मधे डब्बे जोडलेले नसल्याने गर्दी विशिष्ट डब्ब्यांमधेच खच्चुन राहते. याचे कारण रेल्वे स्टेशन्स वर असणारे पादचारी पुल. बर्याच स्टेशन्सवर पादचारीपुल हे सुरुवातीला आणि शेवटी असतात त्यामुळे त्यावरुन येणारी लोक स्टेशन वर आल्यावर तिथेच रेंगाळत राहतात ( ऑफिस मधुन व्यवसायमधुन काम करुन दमलीभागलेली लोक बर्याचदा असेच करतात हा अनुभव देखील आहे.) अश्यामुळे १२ डब्ब्याच्या गाडीमधले पहिले ३ आणि शेवटचे३ या डब्ब्यांमधे गर्दी अतिप्रचंड असते. मधल्या डब्यांमधे इतकी गर्दी नसते वर फर्स्ट क्लासचा मोठा डब्बा देखील मधे येत असल्याने त्याबाजुला लोक कमीच जातात. हेच जर डब्बे मधुन जोडले गेल्यास गाडी चालु झाल्यावर आपोआपच लोक मोकळ्या जागेकडे जातील. महिलांचा डब्बे आणि फर्स्ट क्लासचे डब्बे हे शेवटी आणि सुरुवातीला ठेवल्यास मधले जनरल डब्बे जोडु शकतात. उदा. १५ डब्ब्यांची गाडी मधे दोन्ही बाजुचा दीड डब्बा जर महिलांसाठी आरक्षित ठेवला आणि उरलेला अर्धा डब्बा महिलांकरीता फर्स्टक्लासचा ठेवल्यास सध्या असलेल्या जागेपैकी जास्त जागा महिलांना आणि फर्स्टक्लासवाल्यांना मिळेल. त्यानंतरचा १ डब्बा पुरुष फर्स्टक्लास साठी ठेवावा म्हणजे दोन्ही बाजुंनी ३-३ असे ६ डब्बे महिला आणि फर्स्टक्लास यांच्या वाटणीला येतील आणि त्या मधले ९ डब्बे जनरल होतील ते आतुन एकमेकांना जोडावे म्हणजे गर्दीची विभागणी होउन डब्ब्यांमधे जास्त गर्दी होणार नाही.

३) इंटरनेटचे युगः- आजकालच्या जमान्यात इंटरनेटचा वापर जास्त होउ लागला आहे. तिकिटघरांसमोर इतक्या रांगा लागलेल्या असतात की बारशाला जायचे असल्यास लग्नालाच पोहचतो की काय असे वाटु लागते. त्या मधे देखील सणावारांना आणि महिन्याच्या १-१० तारखेला जास्तच गर्दी असते. मासिक पास काढायचा राहुन जातो. मग सकाळी होणारी धावपळ होतच असते. एक तर ऑफिस मधुन २ तास गर्दीत उभे राहुन आल्यावर पासच्या रांगेत उभे राहण्याचे त्राण नसते तर सकाळी लोकल ट्रेन सुटु नये म्हणुन होत असलेली धावपळ दोन्ही ठिकाणी वेळ काही जमत नाही. मग लेटमार्क वगैरे वगैरे बर्याच गोष्टी घडतात. म्हणुन रेल्वेने मुंबई लोकल साठी वेगळी वेबसाईट सुरु करुन तिथे ई-पास / ई-तिकिट काढण्याची सोय ठेवावी. मोबाईल मधुन कंम्पुटर मधुन लोक हव्या त्यावेळी तिकिट्स पासेस काढु शकतात त्यामुळे त्यांचा वेळ देखील वाचेल. त्याचबरोबर "पेपर"ची बचत देखील मोठ्या प्रमाणात होईल तिकिट छपाईचा खर्च कमी होईल. मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा वापर देखील उपयोगी होउ शकतो.

आपले योग्य आणि अमुल्य कल्पना, सल्ले आणि सुचना नक्कीच विचारात घेतल्या जातील.

धन्यवाद

------------------------------------------------------------------------------------

काही दिवसांपुर्वी श्री. सुरेश प्रभु यांना संपर्क केला होता आणि त्यांना एक विनंतीपत्र पाठवण्यात आले होते. त्यात या धाग्याचा आणि मायबोलीचा संदर्भ देउन इथे आलेल्या सुचना आणि सल्ल्यांना त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा मानस व्यक्त केला होता.
त्यानुसार श्री. सुरेश प्रभु यांच्याकडुन सुचना आणि सल्ले पाठवण्याचे उत्तर आले आहे.

आपल्या सुचना आणि सल्ले यांचे वर्गीकरण, मुद्देसुद आणि नीटनेटके करण्याचे काम चालु आहे. ते झाल्यानंतर ईमेल द्वारे आणि पत्राद्वारे त्यांच्यापर्यंत या मागण्या पोहचवण्यात येतील. आशा आहे की आपल्या सर्व सुचना मागण्यांची श्री. सुरेश प्रभु नक्कीच दखल घेतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन ऋग्वेद याबद्दल आणि या प्रयत्नांबद्दल आभार.

आजच सुरेश प्रभुंची मुलाखत आली आहे मटात (बहुधा), मुंबईच्या लोकल्स बद्दल.

ऋग्वेद आणि मयेकर, तुम्हा दोघांचे खास आभार! काम मोठं छोटं कसंही असो, त्यामागील कळकळ महत्त्वाची! Happy
आ.न.,
-गा.पै.

मनीष, माझ्या माहितीप्रमाणे विमानतळ असा स्टॉप आहे, पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आहे की नाही ते माहित नाही.

मयेकर आणी ऋग्वेद, दोघांचेही आभार. पत्र इथे शेअर केले तर आवडेल.

Okay metro from airports is a good idea. It may not be under railway ministry. >>> हो वेगळी मेट्रो असणे खूप उपयोगी असते. आणि ही मेट्रो वेगळीच असावी जसं इथे डीएमआरसी ही वेगळी एजंसी/ऑथॉरिटी आहे मेट्रो साठी तसंच.

ऋग्वेद, हाती घेतलेली कामगिरी नीट पार पाडल्याबद्दल अभिनंदन. Happy

Shri Suresh Prabhu,
Honourable Railway Minister,
Government of India,
New Delhi.

Sir,

Congratulations on being appointed the Railway Minister, Sir!
I had opened a page on a Marathi social networking site about what changes will people like to see in the operations of Indian Railways. Many netizens have contributed and submitted their ideas, suggestions and demands too.
if you permit, I will send this suggestions and demand to you by email.

Wishing you all the success in your new endeavor,

Thanking you,
Yours faithfully,

x
-----------------------------------------------------------------------------------

माननीय श्री. सुरेश प्रभू,
केंद्रीय रेल्वे मंत्री,
भारत सरकार,
नवी दिल्ली.

महोदय,

भारताचे रेल्वेमंत्री म्हणून आपली नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

एका मराठी संकेतस्थळावर भारतीय रेल्वेच्या कारभारात आपल्याला कोणकोणते बदल पाहायला आवडतील असा विषय आम्ही चर्चेला घेतला होता. त्यात अनेक सदस्यांनी भाग घेऊन आपल्या कल्पना, सूचना व मागण्याही नोंदवल्या आहेत.

त्या सर्व सुचना आणि मागण्या आपल्या अवलोकनार्थ व विचारार्थ पाठवल्यास चालतील काय ?

आपल्या या नव्या कार्यात आपणास यश मिळो या शुभेच्छा!

आपला विश्वासू

x

Okay metro from airports is a good idea. It may not be under railway ministry >> मेट्रो तर चांगली आहेच पण जर इंटरसिटी ट्रेन्सही चालू केल्या तर बाहेर गावाहून येणार्‍या आणी जाणर्‍या सगळ्यांचीच चांगली सोय होइल.

पत्र इथे टाकल्याबद्दल धन्यवाद ऋग्वेद.. जे अंतिम पत्र त्यांना पाठवाल (सूचनांसकट) तेही इथे टाका.

ऋग्वेद आणी मयेकरान्चे मनःपूर्वक अभिनन्दन आणी दोघानाही धन्यवाद या प्रश्नाचा पाठपुरावा केल्या बद्दल. तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

I only drafted the letter, which is nothing.But the initiative and efforts taken by Rigved are commendable.

<सर्व मोठ्या आणी पर्यटनाच्या दॄष्टीनं महत्त्वाच्या स्टेशन्सवर लॉकर्सची सोय.>

मनीष, अशी सोय उपलब्ध आहे असं ईशान्य रेल्वेचं संकेतस्थळ म्हणतंय. भारतभर व विशेषतः महाराष्ट्रात वस्तुस्थिती वेगळी आहे का?

ऋग्वेद यांचे आभार आणि अभिनंदन. मयेकरांच्या खारीच्या वाट्याबद्दल त्यांचेही आभार!

माननीय श्री. सुरेश प्रभू,
केंद्रीय रेल्वे मंत्री,
भारत सरकार,
नवी दिल्ली.

महोदय,

दिनांक 6 डिसेंबर 2014 चे माझे इमेल व त्याला आपण 13 डिसेंबर 2014 रोजी दिलेले उत्तर यांना अनुसरून www.maayboli.com या संकेतस्थळावर झालेल्या चर्चेतील निवडक मुद्दे आपल्या विचारार्थ पाठवीत आहे.

आपल्या सोयीसाठी हे इ-पत्र मराठी व इंग्रजीतून word documents च्या रूपात संलग्न केले आहे.

आपणास आपल्या कार्यातील यशासाठी तसेच नवीन वर्षासाठी शुभेच्छा!

आपला विश्वासू

या सर्व सूचना मायबोली www.maayboli.com या संकेतस्थळावर झालेल्या चर्चेतून एकत्र केल्या आहेत. या संकेतस्थळाचे सभासद जगभर विखुरलेले आहेत.

सर्वसाधारण सूचना :

ऋग्वेद :

१. तिकिट आरक्षण :- लांब पल्ल्याच्या गाड्यांची तिकिटे current counter वरून गाडी सुटण्याच्या वेळेच्या अर्धा तास आधीपर्यंत विकत घेण्याची सोय अलीकडेच रद्द केली गेली आहे, ती पुन्हा सुरू करून तशी माहिती प्रवाशांपर्यंत पोचवावी. यात प्रवाशांची सुविधा साधली जाईल व तिकिटांच्या काळाबाजारासही आळा बसेल.

२. आयआरसीटीसीमध्ये रेल्वे रिझर्वेशन पेमेंटच्यावेळी नेट बँकिंग, डेबिटकार्ड या ठिकाणी ’भारतीय स्टेट बँक’ , ’देना बँक’ इत्यादींसारख्या राष्ट्रीकृत बँकांचा पर्याय उपलब्ध नसतो. त्याऐवजी ‘आयसीआयसीआय’, ’ कोटक महिंद्रा बँक’ यांसारख्या खासगी क्षेत्रातील बँकांचे पर्याय जास्त असतात. त्यामुळे लोकांना खाजगी बँकांतूनच व्यवहार करावा लागतो. ऑनलाईन रिझर्वेशनकरिता सगळ्या राष्ट्रीकृत बँकांचा समावेश करावा.

भरत मयेकर

३. नवीन प्रकल्पांचा सपाट लावण्याऐवजी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावावेत.

४. रेल्वे स्थानकांवरील जागेचा व्यवासायिक उपयोग करून रेल्वेचे उत्पन्न वाढवण्याचे सूतोवाच पूर्वीच्या एका अर्थसंकल्पांमध्ये झाले होते. त्याची अंमलबजावणी व्हावी.

५. रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची स्थिती सुधारायची निकडीची गरज आहे.

कुमार१

६. सर्व गाड्यांमध्ये मध्ये जैविक शौचालये हवीत.

७ . गाडीतले जेवण चांगल्या प्रतीचे असावे सध्या 'शताब्दी' मधले देखील जेवण खराब प्रतीचे आहे.

८. फलाटावरील (येणार्‍या गाडीचे डबे थांबण्याचे स्थान दाखवणारे) इंडिकेटर्सवर अचूक माहिती दिसायला हवी.

९. पूर्वी बिगर-वातानुकूलित प्रथम वर्गाचे डबे असायचे. तसा एखादा तरी पुन्हा सुरू करावा. आपल्याकडे बारा महिने 'एसी' ची गरज नसते.

जयंत फाटक -

१०. प्रत्येक राज्यात, अगदी स्टेशन मास्तर पर्यंत, त्या-त्या राज्याचे रहिवासीच कर्मचारी असावेत; स्थानिक समस्यांची जाण त्यांना अधिक असल्याने त्यांच्याकडून योग्य ती माहिती मिळेल.

११. शक्य तिथे रेल्वेला समांतर रस्ते बांधणी (अर्थात बंदिस्त : समाजकंटकांचा उपद्रव होऊ नये म्हणून ) करावी. रेल्वे-अपघात झाला, तर रस्ते नसल्याने , अपघात स्थळी पोहोचण्याचा वेळ वाढतो आणि त्यामुळे अपघातातील मृत्यूदर वाढण्याची शक्यता असते.

१२. रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांना हटवावे.

१३. तिकीट-तपासनीसांची संख्या वाढवावी आणि मुख्यतः चालत्या गाडीत तिकीट तपासनीस, सुरक्षा अधिकार्‍यांसह ठेवावे . (फिरते तपासनीस असल्याने, मुद्दाम डूख ठेवून हल्ला करणार्‍यांचा त्रास कमी होऊ शकतो.)

मनीष

१४. प्रत्येक स्टेशनवर प्रत्येक फलाटावर येणार्‍या गाड्यांचे वेळापत्रक दाखविणार्‍या स्क्रीन्स असाव्यात.

१५. फ़लाटांची संख्या जागेअभावी वाढवणे शक्य नसेल तर बहुमजली स्टेशन करून प्रवाशांची सोय करावी.

१६. सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांपासून (कमीतकमी मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, बेंगळूरू) जवळच्या शहरांना आणि सिटी सेंटरला जायला ट्रेन्स चालू कराव्यात.

१७. सर्व मोठ्या रेल्वेस्टेशन्सवर योग्य दरात बहुमजली आणि सुरक्षित कार तसेच दुचाकी वाहनांच्या पार्किंगची वेगवेगळी सोय. यात लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म पार्किंग असले पाहिजेत.

हीरा

१८ भारतातल्या प्रत्येक स्टेशनला वृद्ध-महिला-बालके यांना सोयीचे असे पुरेसे उंच आणि पुरेसे लांब फलाट असलेच पाहिजेत. फलाटांची उंची हा जीवघेणा विषय झाला आहे.

मुंबई उपनगरी रेल्वेसंबंधी सूचना :

ऋग्वेद :

१. मुंबईतील उपनगरी गाड्यांमधील गर्दी विभागणे:-

मुंबईच्या उपनगरी गाड्यांचे डबे आतून लांब पल्ल्याच्या गाड्यांप्रमाणेच आतून जोडले जावेत. यामुळे टोकाला असलेल्या डब्यांमधली अधिक गर्दी गाडी सुरू झाल्यावर विभागली जाऊ शकेल. महिलांसाठीचे व प्रथमवर्गाचे डबे दोन टोकांना ठेवून उरलेले साधारण डबे मध्ये घेऊन आतून जोडावेत. सगळे नऊ डबे जोडता येत नसतील तर तीन-तीनच्या गटांत ते जोडता येतील.

२. इंटरनेटद्वारे मासिक पासेस आणि तिकिटः-

मुंबई उपनगरी सेवेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करून त्यावरून तिकिटे/पास काढायची व ती स्वत:च प्रिंट करायची सोय द्यावी. यामुळे प्रवाशांचा तिकिटांच्या रांगेतला वेळ वाचेल, तिकिटघरांसमोरच्या रांगा कमी होतील, रेल्वेचा छपाईचा खर्च कमी होईल. सध्याची पाससाठीची सुविधा किचकट आहे. कारण पास घरी आल्यानंतरच तो वापरला जाऊ शकतो. त्याऐवजी जर प्रिंट काढुन अथवा मोबाईल स्क्रिन वर घेउन वापरण्यास सुविधा द्यावी. यासाठी बारकोडचा वापर करता येईल. बारकोडसोबत निओकोडचाही वापर करता येईल, ज्यात पास काढल्याची तारीख व सुरुवातीच्या व शेवटच्या स्थानकाची माहिती नोंदवली जाईल. तिकीट तपासनीस मोबाईलचा वापर करून हे बारकोड/निओकोड तपासू शकतील. हीच पद्धत तिकिटांसाठीही वापरता येईल. (हे लिहून होईतो मोबाईल ऍप सुरू केलेत, त्याबद्दल आभार आणि अभिनंदन) (हे लिहून होईतो मोबाईल ऍप सुरू झाल्याचे वाचले. त्याबद्दल आभार आणि अभिनंदन) )

३. कल्याण स्थानकावर लोकल गाड्यांची योजना बरेचदा चुकीची होते. उदा. १-२-३ फलाटावर कर्जत मार्गाची लोकल आली तर ती जाताना कसारावरून येणार्‍या लोकलला मधे थांबवावे लागते. तसेच ४-५-७ फलाटावर कसारा मार्गाची लोकल आली तर ती जाताना कर्जतवरून येणार्‍या लोकलला थांबवावे लागते. यात वेळेचा अपव्यय तर होतोच, वर प्रवाशांनाही फलाट बदलून जाताना त्रास होतो. त्याऐवजी फ़लाट क्रमांक १-२-३ केवळ कसारा (अप आणि डाउन दोन्ही) लोकलसाठी तर ४-५-६ हे फ़क्त कर्जत (अप आणि डाउन) लोकलसाठी ठेवता येतील. असेच प्रकार अन्य काही स्थानकांवरही होत असण्याची शक्यता आहे.

४. मध्य रेल्वेवर गाड्या येण्याच्या वेळापत्रकानुसारच्या वेळा, तसेच गाडी लागण्याचा ठरलेला किंवा घोषणा केलेला प्लाटफ़ॉर्म नियमितपणे पाळला जात नाही. यामुळे प्रवाशांना अनेकदा फ़लाटावर थांबण्याऐवजी नाइलाजाने पुलावर थांबणे भाग पडते. गाड्या वेळेवर येणे किंवा ठरलेल्या फ़लाटावर लागणे यात तांत्रिक अडचणी येत असल्या, तरी किमान त्यासंबंधीची माहिती इन्डिकेटर्स व उद्घोषणांद्वारे प्रवाशांपर्यंत पोचवल्यास पुलांवरची अनावश्यक व धोकादायक गर्दी कमी होईल. प्रवाशांना शेवटच्या क्षणी धावाधाव करावी लागणार नाही. तसेच पुलांची संख्या वाढवून फ़लाटांच्या टोकाला असलेल्या पुलांच्या जोडीने मधोमधही पूल व जिने असावेत.

भरत मयेकर

५. रेल्वे स्थानकांना जोडून केलेले आकाशमार्ग (स्काय वॉक्स) , भुयारी मार्ग (सबवेज) यांचा वापर बहुसंख्य प्रवासी करत नाहीत , त्यामुळे ते भलत्याच कामांसाठी वापरले जातात, तिथे घाणीचे साम्राज्य होते तसेच मेंटेनन्सही नीट होत नाही. या गोष्टी बजेटशी संबंधित नाहीत. पण रेल्वे, मनपा आणि प्रवासी यांनी एकत्र येऊन यावर उपाय शोधणे गरजेचे आहे.

हीरा

६. मुंबईतील रेल्वेच्या फलाटांची उंची, लांबी वाढवण्याचे काम प्राधान्याने करायला हवे.

७. दक्षिण मुंबईतून पश्चिम रेल्वेवर कोणताही नवा रेलमार्ग सुरू करू नये. कुलाबा-सीप्झ मेट्रो तसेच विरार-चर्चगेट एलेवेटेड मार्गाचा पुनर्विचार करावा. कारण आता दक्षिण मुंबईतील लोकसंख्या आणि उद्योग झपाट्याने कमी होत आहेत. चर्चगेटहून सुटलेल्या लोकलगाड्यांना दादरनंतरच खरी गर्दी होते. त्यामुळे कुलाबा-दादर पट्ट्यासाठी नव्या कॉरिडॉरची; तेही अत्यंत खर्चिक अशा एसी उन्नत आणि भुयारी मार्गाची भविष्यात आवश्यकता राहाणार नाही. त्याऐवजी पूर्व-पश्चिम जोडमार्ग बांधावे.

८. ठाणे- बोरिवली/अंधेरी लोकल हवीच हवी. सध्याच अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेलला खूप गर्दी असते. अंधेरी स्टेशनवर गर्दीच्यावेळी ट्रेन सोडून द्यावी लागते. हा मार्ग लवकरच अपुरा ठरणार हे नक्की. तेव्हा आतापासूनच ठाणे-बोरिवली मार्ग विचारात घ्यावा. ह्या मार्गावर (घोडबंदर रोड मार्गे) भरपूर प्रवासी वाहतूक चालते. शिवाय बोरिवली-विरार मार्गावरचा ताणही ठाणे-बोरिवली मार्गामुळे थोडाफार कमी होईल.

नवीन रेल्वे मार्गांसाठीच्या मागण्या

हीरा

१. मुंबई-पुणे आणि मुंबई-नासिक मार्ग चौपदरी करावा.

२. पुणे-नासिक थेट रेल्वे असावी. पुण्यात लोकल रेल्वे हवीच.

३. उत्तर महाराष्ट्र रेल्वेजाळ्याच्या बाबतीत फारच कमनशिबी आहे. मुंबई-नागपूर एक आडवा महारेलमार्ग अपुरा आहे.

४. खेडोपाडी लोकांना दळणवळणाची स्वस्त आणि जलद साधने हवी आहेत. नवे रेल मार्ग आणि विद्यमान मार्गांवर अधिक वारंवारिता हवी आहे.. आज कोंकण मार्गावर इतकी गर्दी असते की आरंभबिंदूवरच गाडीत शिरताना अपघात झालेले आहेत. वर्धा-नागपूर मार्गावर सकाळी लोकांना कामधंद्यासाठी नागपूर गाठायचे असते तेव्हा आरक्षित डब्यांत लोक मेंढरांसारखे घुसतात. बसलेल्या लोकांना जबरदस्तीने सरकायला लावून एका बाकावर चारचार पाचपाच लोक दाटीवाटीने बसतात.

५. मराठवाड्यातले एक थोर पत्रकार, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक कै. सुधाकरराव डोईफोडे यांच्या रेल्वेसंघर्षसमितीने बर्‍याच सूचना आणि त्यांचा पाठपुरावा केला होता. त्यांच्या नांदेड विभाग दक्षिणमध्य रेल्वेतून काढून मध्य रेल्वेला जोडावा या आणि इतर अनेक सूचनांवर कार्यवाही व्हावी. या समितीवर मराठवाड्यातील नामवंतांनी मौलिक काम केले आहे. नुसत्या सूचनाच नव्हेत तर कार्यवाहीतल्या अडचणी, फायदेतोटे, प्रोजेक्ट-रिपोर्ट यांसकट अनेक बारीकसारीक गोष्टी- ज्याला ग्राउंडवर्क म्हणता येईल अशा, आधीच अस्तित्वात आहेत. या आयत्या अभ्यासाचा आतातरी वापर व्हावा.

मनीष

६. पुणे ते कोल्हापूर दुपदरीकरण आणी विद्युतीकरण.

७. पुणे - कोल्हापूर इंटरसिटी एक्सप्रेस (चेअरकारवाली, दिवसाला कमीत कमी एक)

८. सांगली - कोल्हापूर इंटरसिटी ट्रेन्स (चेअर कार्सवाल्या)

नितीनचंद्र

९. लोणावळा ते पुणे चौपदरी रेल्वे मार्ग मंजुर झालेला असल्यास लवकरात लवकर प्रत्यक्षात आणावे आणि त्याच्यावर लोकलची वारंवारता वाढवावी जेणेकरुन रस्त्यांवरचा ताण कमी होईल

-सुशांत-

१० बीड - नगर - कल्याण रेल्वे.

Srd

११. कल्याण-डोंबिवली-दिवा -ऐरोली-तुर्भे असा रेल्वेमार्ग फास्ट लाईनकडून कित्येकवर्षे असूनदेखील तो सुरू केला गेलेला नाही . कृपया तो लवकरात लवकर सुरू करावा.

१२. नाशिक मनमाडला जाण्यायेण्याकरिता तपोवन पंचवटीव्यक्तिरिक्त आणखी गाड्या असाव्यात. सगळे डबे जनरल असतील तरी हरकत नाही. युपीबिहारच्या गाड्यांना ठाण्याच्या अलिकडूनच प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे त्यापुढच्या स्थानकांवरून लोकांना बराच त्रास सहन करावा लागतो.

इब्लिस

१३. उत्तर महाराष्ट्र अर्थात धुळे व नंदुरबार जिल्हा, तसेच जळगावचे अमळनेर, चोपडा हे तालुके येथून दररोज किमान १००-१२५ लक्झरी बसेस भरून मुंबई व तितक्याच पुण्याला जात असतात. धुळ्याहून मुंबईसाठी फक्त दोन बोग्या आहेत, ज्या चाळीसगावहून अमृतसर एक्स्प्रेसला लागतात व पहाटे साडेतीन-चारला कुर्ल्याला पोहोचतात. तेथून निघणारी गाडी रात्री साडेबाराला निघते. असे असूनही या बोगीत गच्च गर्दी असते. तेथून गाडी सुरू केली तर किमान एक रेल्वेभरून प्रवासी रोज मिळतील व त्यातले निम्मे एसीचे तिकिट काढणारे असतील. तसेच मनमाड - धुळे - इंदूर रेल्वेलाईन देखील लवकर सुरू करावी

बेफीकिर

१४ सिकंदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेसला पुणे - हैदराबाद प्रवास करण्यास पुणे-हैदराबाद व्होल्वोपेक्षा अधिक वेळ का लागतो याची कारणे कृपया तपासावीत आणि योग्य कारवाई करावी

पिल्या

१५ मराठवाड्यात रेल्वेचे जाळे विस्तारावे.

निवांत पाटील

१६ कोल्हापूर - मिरज दुपदरी मार्ग.

१७ बेळ्गाव - कोल्हापूर - कराड नवीन मार्ग.

१८ कोल्हापूर - रत्नागिरी नवीन मार्ग.

या तीन मार्गांवर प्रवासी संख्या लक्षात घेऊन मार्ग काढण्यात यावा.

प्रथम म्हात्रे

१९ खूप वर्षे रखडलेला पनवेल -अलिबाग मार्ग सुरू व्हावा आणि पनवेल - रोहा दुपदरी करावा

भाऊ नमसकर

२० सध्या, दक्षिण विदर्भ हा पश्चिम महाराष्ट्राशी रेल्वेने थेट जोडलेला नाही ( नागपूर मार्गेच वाहतूक होते). या प्रस्तावानुसार महाराष्ट्रात पूर्व- पश्चिम अशी थेट रेल्वे सेवा उपलब्ध होईल व चंद्रपूर, गडचिरोली या अविकसित जिल्ह्यांचा विकासाचा मार्ग बर्‍याच प्रमाणात खुला होईल. रेल्वेमंत्र्यानी या सर्व प्रस्तावांवर व त्यावरील कार्यवाहीवर नजर टाकणं हितावह होईल.

नंदिनी

२१ मंगलोर- बंगलोर आणि बंगलोर चेन्नै असा रेल्वेमार्ग उपलब्ध असताना मंगलोरवरून ट्रेन अख्खा केरळ आणि अर्धा तमिळनाडू फिरत दक्षिण भारतभ्रमण का करते हा अनाकलनीय प्रश्न आहे. तीच गोष्ट गोवा चेन्नै ट्रेन रूट. ही ट्रेन चेन्नै-तमिळनाडू- केरळ-कोस्टल कर्नाटका करत गोव्याला जाते त्यापेक्षा चेन्नै बंगलोर-कर्नाटक-बेळगांव असा रूट का घेत नाही?

डॉ. मंदार देशमुख

२२. मनमाड-मुदखेड विद्युतीकरण आणि दुहेरीकरण.

२३ वर्धा-यवतमाळ-नांदेड-लातूर-पंढरपूर हा नवा लोहमार्ग.

मायबोलीकरांच्या आलेल्या मागण्या आणि सल्ले यांचे विस्तृतीकरण आणि संकलन करुन श्री. सुरेश प्रभु यांना ईमेल केला आहे. तसेच रजिस्टर पत्र देखील पाठवण्यात आलेले आहे.

सर्व प्रतिसादकर्त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानतो.

धन्यवाद

धन्यवाद ऋग्वेद.

बहुतेक सगळ्या महत्त्वाच्या स्थानकांवर क्लोकरूम आहेत >> क्लोकरूम किती रिलायबल आणि सुरक्षित आहेत माहिती नाही. मी ऑटोमेटेड वैयक्तिक लॉकर्स म्हणत होतो (पैसे टाका आणि २४ तास लॉकर वापरा, बँकातल्या लॉकर्स सारखे पण आकाराने मोठे ज्यात मोठ्या बॅगा बसू शकतात)

सर्वांचे मागण्या सल्ले समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कुणाचे काही राहिले असल्यास क्षमस्व.

धन्यवाद

अ‍ॅडमिन यांना धागा बंद केला तरी चालेल. Happy

Pages