राजस्थानी दाल बाटी

Submitted by मानुषी on 4 November, 2014 - 07:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दाल : तूर डाळ १ वाटी, मूग डाळ व मसूर डाळ प्रत्येकी पाव वाटी, डाळ शिजवताना घालण्यासाठी हिंग, हळद, पाणी, १ तमालपत्र, फ़ोडणीसाठी तूप, हिंग, हळद, जिरे, वरून पेरण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला.
वाटण: २ कांदे, ७/८ लसूण पाकळ्या, २ सुक्या मिरच्या, एक छोटा आल्याचा छोटा तुकडा, सुक्या खोबऱ्याचा खीस अर्धी वाटी.

बाटी: २ वाट्या जाड/भरड दळून आणलेली कणीक, पाव वाटी रवा, १ चमचा तेल, चिमूटभर मीठ, चिमूटभर सोडा किंवा पाव चमचा बेकिंग पावडर. आप्पेपात्रात बाट्या तळण्यासाठी अगदी थोडं तूप.

http://www.maayboli.com/comment/edit/3337752

क्रमवार पाककृती: 

( इथे मारवाडी समाज बराच मोठा असल्याने त्यांच्या समारंभात दाल बाटीचा आस्वाद घेता येतो. आणि इथे एक दोन हॉटेलातही अगदी अप्रतीम दाल बाटी मिळते. तर सांगण्याचा मुद्दा हाच की दाल बाटी हा माझा एक आवडता पदार्थ झाला आहे. पण तो कसा करायचा याची ऑथेन्टिक रेसिपी माहिती नव्हती.

पण ४/५ वर्षापूर्वी पुण्यात आम्ही सगळ्या मैत्रिणी एका मैत्रिणीच्या घरी जमलो. तिथून तिच्या भोरच्या फार्म हाऊसवर रहायला गेलो. तिथे त्या मैत्रिणीने दाल बाटी केली. व्वा..........अजून चव जिभेवर आहे.
मग काय? अगदी समोरच एखादा पदार्थ केला गेला तर बर्‍याच गोष्टी क्लिअर होतात.
अगदी तस्संच झालं. फक्त या मैत्रिणीने या बाट्यांसाठी घरातली नेहेमीची कणीकच वापरली. आणि त्या बाट्या गॅसवर जाळी ठेऊन भाजल्या. मी त्यात थोडा बदल केला.
एक तर सगळा शाळेपासूनचा ग्रुप खूप दिवसांनी जमलेला.........त्यामुळे ती दाल बाटी विशेष चविष्ट लागली!)
असो.........तर दाल बाटीची माझी रेसिपी...........
दालः
वाटणः कांदे उभे चिरून थेंबभर तेलात चांगले छान परतून घ्यावे. बाजूला ठेवावेत, त्याच कढईत थेंबभर तेल टाकून २ सुक्या मिरच्या छान भाजून त्यातच खिसलेलं सुकं खोबरंही भाजून घ्यावं. मिरच्या भाजून झाल्यावर गॆस बंद करावा. तेवढ्या उष्णतेत खोबऱ्याचा खीस चांगला भाजला जातो. आता या सर्व भाजलेल्या जिनसांत वाटणाचे उरलेले जिन्नस घालून मिक्सरला छान वाटून घ्यावे.

दालः सगळ्या डाळी हिंग हळद घालून कुकरमधे छान शिजवून घ्या. झाकण पडल्यावर व्यवस्थित हाटून घ्या.
एक चमचा तुपाची फ़ोडणी करा. त्यात जिरं, हिंग, तमालपत्र टाकून त्यावर वरील वाटण परतून घ्या. मग शिजवलेल्या डाळींचं वरण घालून मिक्स करा. गरम मसाला, चवीपुरते मीठ घाला. एक उकळी काढा. गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
दाल तयार!

बाटी:
बाटीचे सर्व साहित्य फ़ूड प्रोसेसरमधून मळा.(तूप सोडून बाकीचे). पाणी अंदाजाने घाला. पिठाचा गोळा अगदी घट्ट असावा.
हा पिठाचा गोळा १ तास झाकून ठेऊन द्या. १ तासाने मग आप्पेपात्राच्या खळग्यांचा अंदाज घेऊन त्यात मावणारे गोळे बनवा.
गोळे बनवताना कणीक घट्ट असावी. व ती खूप मळू नये. ओबडधोबडच असू द्यावी. म्हणजे त्यात हवा राहून बाट्या हलक्या होतील. तळहातावर कणीक घेऊन दुस़ऱ्या हाताने अलगद दाब देत गोलगोल फ़िरवून गोळे बनवावेत.
एका मोठ्या पातेल्यात भरपूर पाणी उकळायला ठेवा. आधण आल्यावर निम्मे गोळे या उकळीच्या पाण्यात टाका. आधी हे गोळे तळाशी असतील. शिजल्यावर ते पाण्यात वर येऊन तरंगू लागतील. मग ४/५ मि. झाकण ठेऊन शिजवा. गॅस बंद करून या बाट्या एका फ़डक्यावर निथळा. गॅसवर आप्पेपात्रात थोडं थोडं तूप टाकून आप्पेपात्र गरम झालं की मग या चांगल्या कोरड्या झालेल्या बाट्या चांगल्या भाजून घ्या. एका बाजूने चांगल्या खरपूस झाल्या की मग पलटा. ३/४ मिनिटांनी गॅस बंद करा. भाजताना या आप्पेपात्रावर झाकण ठेवा.
एका बाऊलमधे २ बाट्या ठेवा. तळहाताने कुस्करा. त्यावर भरपूर दाल घालून वरून थोडं तूप घालून खायला द्या.
याच बाट्या गरम असतानाच कुस्करून त्यात फ़क्त तूप आणि पिठी साखर घालूनही चविष्ट लागतात.
यासाठी प्रत्येकाने एखादी तरी बाटी बाजूला ठेवावी.

वाढणी/प्रमाण: 
जसा ताव माराल तसे................
अधिक टिपा: 

बाटीसाठी कणीक भरड/जाड वेगळी दळून आणावी. घरातल्या नेहेमीच्या बारीक कणकेच्या बाट्या इतक्या चांगल्या होत नाहीत.
हा पदार्थ करण्यासाठीचा आयडियल आदर्श सीझन येऊ घातला आहे. तस्मात......थंडीत या पदार्थाची लज्जत काही औरच!
दाल बाटी, गट्टीका साग आणि चुरमा असा ऑथेन्टिक राजस्थानी मेनू म्हणजे अगदी तोंपासु!

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पाक़कृती, बाटी बनविण्यासाठी अप्पेपात्राचा वापर करण्याची शक्कल पण चांगली.

थेंब थेंब तेलातुपातली दाल बाटी म्हणजे अगदी अस्सल मारवाडी पदार्थ वाटतच नाही.>>> एकदम बरोबर.

पुर्ण भांडभरून देशी तुप असते आणि त्यात ह्या बाट्या सोडलेल्या असतात त्या भांड्यातुन चमच्याने उचलायच्या आणि डाळीच्या वाटीत कुस्करतात किंवा नुसत्या कुस्करून नंतर वरून डाळ घेतात.

आता ते चुरमा दाल बाटीमध्ये {बाटीच्या आत चुरमा }कसा भरतात ?ही चुरमा बाटी उज्जैन मांडू (मप्र) अबूला खाल्ली आहे.>>>>> Srd, दाल बाटी आणि चुरमा असा बहुतेक राजस्थानी मेनु असतो, ह्यातील दाल बाटीची पाककृती मानुषींनी लिहिली आहे आणि चुरमा वेगळा प्रकार असतो. तुम्ही जो पदार्थ म्हणत आहात तो वेगळा पदार्थ असु शकतो.

चुरमा वेगळा प्रकार असतो. तुम्ही जो पदार्थ म्हणत आहात तो वेगळा पदार्थ असु शकतो.>>>>>>>>+१००
हं....बाटीच्या आत चुरमा भरंण्याचं हे काही माहिती नाही.
वा मंजू......... लगेच केलीसही दाल बाटी! छान दिसतीये!

ही पाकृ पाहिल्यापासून कधीतरी खाऊन बघावी असा विचार मनात घोळत होता. कामामुळे प्रयोग करण्याइतका निवांतपणा नाही त्यामुळे मनातल्या बाट्यांवर समाधान मानावे लागत होते. पण देव दयाळू आहे! काल एका मैत्रिणीने तिची नानी तिच्या घरी आली आहे त्यामुळे जेवायला बोलावले होते. मैत्रीण वाराणसीची पण तिची नानी राजस्थानची आहे! त्यामुळे अस्सल राजस्थानी बेत होता..अर्थात दाल-बाटी, चुरमा, गट्टे की सब्जी, कढी!! यम्म! How more authentic can it get! Happy Happy

अरे वा ,,जिज्ञासा..........उसगावात इतका ऑथेन्टिक मेन्यु!

हा धागा रोज वर येतोय आणि दालबाटी+चुरमे के लड्डू, आलू की सब्जी, खट्टी चटनी, कढी हे सगळे पदार्थ समोर फेर धरतात. मला दालबाटी फक्त त्यासोबत मिळणार्‍या चुरमे के लड्डू साठीच आवडायची.

आता त्यातही तितकंच तूप जातं. तुपाचं मोहन घालून वळलेले रवा-कणकेचे गोळे तुपात तळायचे, ते गार करून त्यांचा चुरा करायचा, तो पुन्हा तुपावर खरपूस भाजायचा मग नेहमीसारखे लाडू वळायचे.

कॅलरी काउंटर लपवून ठेवून करून खावेसे वाटताहेत.

भरत कशाला कॅलरीज मोजता(;:स्मितः).....असं माझ्या पद्धतीने करून पहा ना. (म्हणजे तुम्ही पदार्थ करता असं आठवतंय हं ...!)
जे काही घ्यायचं ते बाटीवर घ्या ना तूप थोडंसं! हाकानाका!

मस्तच आहे.

मी श्रीरामपुरला खाल्ली तेव्हा एवढी टेस्टी नव्हती पण खुप वर्षापुर्वी मध्य प्रदेशमधे मावशीकडे खाल्ली होती, अगदी बाट्या चुलीत भाजलेल्या वगैरे ती एक्सलंट होती आणि अजुनही त्याची चव जिभेवर आहे.

अगदी बाट्या चुलीत भाजलेल्या वगैरे ती >>> येस येस ह्या बाट्या डायरेक्ट जगरावर (शेण्यांचा निखारा करुन त्यात डायरेक्ट हे गोळे टाकायचे) भाजलेल्या पण असतात. त्या मात्र तळायच्या नाहित. त्याचा चुरा करुन त्यावर वरंअ / दाल व तुप ओतायचे.
तोंपासु. गावाला गेल्याशिवाय हे मिळणे नाहि. इथे कुठे गवर्‍या मिळणार? अन मिळाल्या तरी त्याचा विस्तव कसा करणार? जौद्या झाल.

लवकरच मोठ्या प्रमाणात करायची म्हणून काल थोड्या प्रमाणात करून बघितली. जरासा मोह होत असतानाही आगाऊपणा करून स्वतःचं काही वेगळं न घालता तंतोतंत पाककृतीनुसार केली. चवीला अप्रतिम झाली आहे. मानुषीताई, खूप धन्यवाद!

डाळीचा रंग फिका वाटला. म्हणून तुपात थोडं काश्मिरी मिर्चीचं तिखट पोळवून वरून घालावं असं वाटलं. पण मोहं टाळला. ते बरंच झालं.

बाट्या ५ मिनिटं उकळून आतवर व्यवस्थीत शिजल्यासारख्या वाटल्या नाहीत म्हणून आणखी ५-६ मिनिटं खळखळ उकळत्या पाण्यात शिजवल्या एवढाच काय तो फरक.

daal-baati-1-maayboli.jpg

अरे वा! मृण्मयी करून फोटो पण डकवलेस! कौतुक आहे तुझं!
पण खरंच ओगले आजी म्हणतात पाहुण्यांवर नवीन पदार्थाचा प्रयोग नको. त्यामुळे तू थोड्या प्रमाणात आधी करून पाहिलंस ते बरंच झालं!
आणि धन्यवाद काय?? इट्स माय प्लेझर!

Pages