साडेसातीचा प्रवास

Submitted by नितीनचंद्र on 1 November, 2014 - 01:45

२ नोव्हेंबर २०१४ रात्री ८ वाजुन ५४ मिनिटांनी शनि निरयन वृश्चिक राशी प्रवेश करतो. गेले साडेसात वर्ष पिडलेल्या कन्या राशीची साडेसाती पासुन सुटका होईल.

याच बरोबर साडेबावीस वर्षांनी धनु राशीला साडेसाती सुरु होते.

तुळ राशीची साडेसातीतली शेवटची अडीच वर्षे सुरु होतात तर वृश्चिकेला पाच वर्ष साडेसाती बाकी आहे.

या कालावधी विषयक अनेक गोष्टी व कथा लोकांनी वाचल्या असतील. अनुभवही घेतले असतील. खास जाणवते ती मानसीक पीडा आणि त्यातुन बदलणारी मानसीकता.

साडेसाती तुळ, वृश्चिक आणि धनु राशीला काय परिणाम जाणवेल हे जाणुन घेऊ या.

तुळ राशीला शेवटची अडीचकी आहे. शेवटची अडीचकी काही चांगले घडवुन जाते. तुळ राशीला शनि राजयोग कारक असल्याने किंवा तुळ राशीत शनि उच्चीचा असल्यामुळे पहिली अडिचकी सोडली तर दुसर्‍या आणि तिसर्‍या अडीचकीत फारसा त्रास होत नाही.

शेवटच्या अडिचकीत कुटुंबस्थानातुन किंवा धन स्थानातुन होणारे शनिभ्रमण हळु हळु सांपत्तीक स्थितीत सुधारणाच करेल. याचा वेग मंद असला तरी स्लो बट स्टेडी अश्या प्रकारचा असेल.

कुटुंबात शनि हा वाढ करणारा ग्रह नसुन कितीही हवे असले तरी कुटुंबातील सदस्य संख्या एका आकड्याने किमान कमी होताना काहिंना दिसते. अत्यंत वृध्द असे आजी - आजोबा यांचा या अडिचकीत वियोग होण्याची शक्यता असते तेव्हा लवकरच त्यांच्या जिवंतपणी आशिर्वाद घेण्याचे मनात आणा. त्यांच्या बरोबर काही काळ व्यतित करा. त्यांच्या इच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करा.

शेवटी अमर कोणीच होत नसते. पण मोठ्यांचे कृपाछ्त्र मात्र कायम रहावे असे वाटत असते. अश्या वेळी रुख रुख राहु नये या दृष्टिने हे लिहले आहे.

वृश्चिक राशीला ही मधली अडिचकी. प्रत्यक्ष चंद्रावरुन शनिचे भ्रमण होताना होणारा मानसीक त्रास लक्षात राहिल असा असतो. तुमच्या राशीला अनुरुप बदला घ्यायचा स्वभाव जरा अजुनही लांब ठेवा . शांत पणे पहात रहा काय घडते आणि का घडते या कडे. अनुकुल काळ येईल तेव्हा तुम्हाला सव्याज उट्टे काढायची संधी येणारच आहे. पहिलीच साडेसाती असेल तर आत्मपरिक्षणाची सवय याच काळात लागेल.

शनिवारी तेलाने मालीश करुन गरम पाण्याने स्नान करावे हा उपाय साडेसातीत करायला जुने व जाणते ज्योतिषी सांगतात. मनाचे व्यापार वाढतात तेव्हा शरीरातले रक्ताभिसरण वाढवणे सुखद अनुभव देते असा काहिसा प्रकार यामागे असावा.

शनि हा शिक्षक आहे. जे नुकसान होते यातुन मोठा धडा मिळतो याकडे लक्ष द्या.

धनु राशीला पहिलीच अडीचकी आहे. व्यावसायीक महात्वाकांक्षांना आवर घालुन लो रिस्क असलेले करार मदार करणे क्रमप्राप्त ठरेल. धनु राशीला धन स्थानाचा मालक असलेला शनिच व्ययस्थानात या अडिचकीत असल्यामुळे स्थावर / रोकड यांचा क्षय होताना दिसणार आहे. तो थांबविण्यासाठी अतिरिक्त कामाचा ताण आणि मानसीक ताण जाणवणे अपरिहार्य आहे.

तृतीयेश शनि तुमच्या व्ययात असल्यामुळे सहोदरांची खास करुन मोठ्या भावा - बहिणीची चिंता सतावेल.

आपली मानसीकता अध्यात्मीक आणि परमेश्वराला मानणारी असल्यामुळे या कालखंडातुन आपण पार जाणारच आहात.

शनिवारी शनिमहाराजांना तेल आणि काळे उडीद याच बरोबर रुईपत्रांची माला अर्पण करा. मारुतीचे दर्शन घ्या. हा उपाय पुढील साडेसात वर्षे न चुकता करा. सोबत शनिस्तुती आणि हनुमान चालिसाचा पाठ सुरु ठेवा.

सर्वांसाठीच शनिचा नवग्रहपिडाहर स्त्रोत्रातला मंत्र रोज जपावा असा आहे.

सुर्यपुत्र दिर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया:|
मंद्चार प्रस्सनात्मा पीड़ा हरतु में शनि ||

हा मंत्र रोज किमान ११ वेळा रोज म्हणावा म्हणजे साडेसाती सुखकर होते

|शुभंभवतु |

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, नाही मी खूप चीअरफुल परसन आहे. माझ्यात खूप उत्साह असतो नेहमी. एकाएकी माझ्या पायाला मार बसला. अणि माझ्या एक पाय अधू झाला. मी नंतर राशी वाचली तर त्यात लिहिले होते पायाला सहज मार बसेल. तसेच झाले. आता पुर्वीसारखे नीट चालता येत नाही. माझे खाणे पिणे नेहमी चांगले असते. मला नक्की काय झाले आहे हेच माहिती नाही पण एकूण आयुष्य खूपच चिंताजनक झालेले आहे. मी ह्यातून बाहेर पडू पहातो आहे पण मला मार्ग दिसत नाही.

बी, तू साडेसाती हा विषय डोक्यातून कंप्लिट काढून टाक. असं काही असतं हेच विसरुन जा. राशीभविष्य आणि पंचांग बघूच नकोस. भित्यापाठी ब्रह्मराक्षस. हनुमंतांची उपासना कर आणि मजेत राहा. भाऊ, ज्याने अख्खा द्रोणागिरी उचलून आणला, राम लक्ष्मणाला वाहून नेले, त्याला तू जड आहेस का भार वाहून न्यायला? साडेसाती आली कधी आणि गेली कधी ते कळणारही नाही. आयुष्यातला इतर काळ जसा गेला तशीच साडेसाती जाईल. शनी हा न्यायाधीश आहे. तो वाईट नाही. तो फक्त आपल्याला सुधरवतो.

अरे बाबा बी तिथे कुठल्याच गणाचा अगदी अजय देवगणचा पण सम्बन्ध नाही रे. साडेसाती सगळ्यानाच येते. फक्त तिचा बाऊ न करता प्रामाणीकपणे वागावे. अहन्कार, दुसर्‍याला कमी लेखणे, माणुसकी हीन वागणे असे टाळायला पाहीजे. कारण साडेसातीच रावाचा रन्क होतो आणी रन्काचा राव देखील होतो.

नारायण राणे आणी आपले पन्तप्रधान नरेन्द्र मोदी दोघान्ची वृश्चिक रास, पण आज मोदी कुठे आहेत आणी राणे कुठे. एकाने वाट पाहुन कष्ट केले तर दुसर्‍याने ते अहन्कार आणी दादागिरी करुन सर्व गमावले.

आणी आपली माणसे दुरावणे हे तर साहजीक असते. कुणी दीर्घायुषी असते तर कुणी अल्पायुषी, जन्म- मृत्यु कुणाच्या हातात आहेत?

आता जे तुझ्या जवळ आहेत, त्याना साम्भाळ. पुढे चान्गले होईल अशी आशा ठेव. अजून सर्व काही सम्पलेले नाही. बी पॉझीटिव्ह!

साधना, अमा, रश्मी .. अगदी तुम्ही सर्वासर्वांचे खूप खूप आभार. मन मोकळ करुन खूप छान वाटत.

अश्विनी पर्फेक्ट सल्ला. बी आता जास्त विचार करणे सोड पाहु. अमा सान्गत आहेत तसे पण बघ. तुझ्या डिप्रेशनचा शरीरावर पण परीणाम झाला असेल. एकदा चेक करुन टॉनिक्स घे. जास्त कामाने पण त्रास होत असेल.

सुप्रिया थोडी वाट बघ. काही वेळेस एकदम बदल होत नाहीत. आताच कुठे शनी पुढे सरकलाय.

एकाएकी आपले शरीर गात्र थकायला लागते. माणसे विलग होतात. मित्रदोस्त शी थू करतात. आर्थिक खर्च अमाप होतो. कुणीतरी सोडून जात. कुटुंब दुभंगत हे सर्व साडेसातीमधे घडताना दिसत. इतकच काय बहुतेकाचे जगाला निरोप देणे हे देखील सासामधेच होते.>> तुम्हाला डिप्रे शनचा त्रास होतो आहे का? चेक करून घ्या. तुमची इनर
स्ट्रेंग्थ कमी होते आहे का? असे व्हिटामिन डेफिशिअन्सी मुळे पण होते. व्यवस्थित उपाय केले तर हे त्रास दूर होतात. चिअर अप.>>>>>> +१

बी, प्रामाणिकपणे सांगू का जे आपल्या नशीबात असते,त्यापलिकडे आपण नाही जाऊ शकत. त्यापेक्षा हे ही दिवस जातील हे ध्यानात ठेवा.मारुतीला उडीद वाहण्यासंबंधी तुम्ही म्हटले आहे.तुमचा विश्वास असेल तर वहा.तो एक सायकॉलॉजिकल भाग आहे.

रश्मी अग साडेसातीच्या पिरीयेडची म्हणतेय मी, आयुष्याची गोळाबेरीज शून्य झाल्यावर कसले आलेत हिशोब Happy

देवगण असेल तर उशा गाद्यांवर लोळत पडलेला /ली आहे. कोणीतरी कारचा दरवाजा उघडून या बसा करतोय काय छान चित्र आहे. परंतू जग चाललंय ते मनुष्य आणि राक्षसगणी लोकांवर. देवगण नाही म्हणून वाइट का वाटतंय ?कुटुंबात एकाला देवगण म्हणजे इतरांना म०/रा०शिवाय पर्याय नसतो.

अग सुप्रिया कन्या राशीची साडेसाती पन्चागाप्रमाणे सम्पलीय. पण तू म्हणतेस ते खरे आहे.:अरेरे:

देवगण असेल तर उशा गाद्यांवर लोळत पडलेला /ली आहे. कोणीतरी कारचा दरवाजा उघडून या बसा करतोय काय छान चित्र आहे.>>>> Lol इथे आहे की वट्टं देवगण आणि मीन रास. चरितार्थासाठी रोज दुसर्‍या वर्गाने लोकलने जाणं येणं चालू आहेच की. पण सगळे अप्स अँड डाऊन्स मस्त एन्जॉय करतेय Happy

बी, नाजुकसा वाटणारा अंकूर खडक फोडूनही ऊर्ध्व दिशेला बाहेर येतोच की नाही? तसंच सगळ्याला पुरुन उरायचं Happy

साडेसाती आहे म्हणून आपल्याला काय कंट्रोल करता येते आणि काय नाही ह्याचे भान विसरू नये. लागले असेल, डिप्रेशन जाणवत असेल तर वैद्यकीय सल्ला घेणे आपल्या हातात असते. पुन्हा अपघात होणार नाहीत ह्याची काळजी घेणे ही आपल्या हातात असते. कुटुंबे दुभंगणे किंवा मृत्यू घडणे हे निसर्गचक्राचा भाग- त्यात फारसे काही आपल्या हातात नसते. गेलेल्या व्यक्तीच्या स्मृतीनिमित्त एखादे चांगले कार्य करणे, दुभंगलेल्या कुटुंबांसाठी मनात आस्था ठेवणे, जजमेंटल न होणे हे सगळ आपल्या हातात असत.
भोवताली घटना घडत असतात, आपल्या आपल्या कुवतीनुसार/श्रद्धेनुसार लोक त्याचा अर्थ लावत असतात (उदा: साडेसाती मुळे घडले किंवा योग्य वेळी मैत्रिणीला फोन न केल्याने घडले इ इ). पण कार्यकारण भावाच्या फार भानगडीत पडू नये. आयुष्य हे असंख्य, अतर्क्य योगायोगांचा समुदाय आहे एवढ समजून एन्जोय कराव.

अश्विनी.:फिदी:

एस आर डी परत अभ्यास करा हो. अहो तशी सुखाची लोळालोळी वृषभ आणी तुळ राशीवाल्यान्च्या नशीबात असते. देवगणाच्या नाही. पुष्य आणी अनुराधा नक्षत्र देवगणी आहे, पण मालक शनी असल्याने कसले जबरी कष्ट त्यान्च्या नशीबात असतात हे मी पाहीलेय. सो, तसे काही नसते. नसीब अपना अपना.

काही ठिकाणी खुदा मेहेरबान तो गधा पेहेलवान असे असते. तिथे कुठे आलाय देवगण आणी मनुष्य गण.

माझ्या एका मित्राच्या बाबतीत साडेसाती सुरु होऊ संपेपर्यंत घडलेल्या गोष्टी- शिक्षण संपून उत्तम नोकरी लागली, एका सुंदर मुलीशी विवाह, पुत्रजन्म, स्वतःचा प्रशस्त प्लॅट व फार्महाऊस होणं, पहिली नोकरी सोडून दुसरी जास्त चांगली नोकरी लागणं, प्रमोशन व पगारवाढ, देशविदेशात कुटुंबियांसमवेत प्रवास, स्वतःचं व कुटुंबियांचं प्रकृतीस्वास्थ्य उत्तम राहणं. सुख-सुख म्हणजे वेगळं काय असतं? त्याची सिंह रास आहे. त्याला एकदा विचारलं की तू साडेसातीला तुझा बेस्ट लाईफ पिरीयड कसं बनवलंस तर म्हणाला की वडील जिवंत असतील तर साडेसातीचा त्रास होत नाही म्हणून मला झाला नाही.

बी, मी सहसा इकडे येत नाही. पण तू सतत साडेसातीबद्दल चिंता करतो आहेस म्हणून लिहितेय.

माझे वडील स्वतः वकील असूनही उत्तम पत्रिका बघत असत. त्यांनी मला साडेसातीबद्दल सांगितले होते- ते सांगतेय. साडेसातीत मृत्यू येतो हे आधी डोक्यातून काढून टाक. ते म्हणत- शनी जीव घेत नाही. उलट त्रास, मनस्ताप भोगायला जिवंत ठेवतो. माझ्या मते तो उत्तम, पण कठोर शिक्षक असल्याने आयुष्यातले धडे शिकवितो ज्याचा आपल्याला फायदाच होतो.

माझ्या साडेसातीतच मला उत्तम नोकरी लागली होती. जवळचे कोण नि दूरचे कोण ह्याचाही धडा मिळाला. तो आयुष्यभर कामी येतोय.( तू मित्र सोडून गेले वगैरे म्हणतोस. पण असे लोक हे खरे मित्र नाहीतच Happy )

तुला सगळे सांगताहेत ते खरेच आहे. देवावर विश्वास ठेवून पुढे जा. हवेतर एम एन सीं च्या ब्लॉगवरील साडेसातीबद्दलचे आर्टिकल जरूर वाच.

बी,
फलज्योतिष वगैरेंवर माझा विश्वास आहे की नाही हे मला माहित नाही. मंत्रजप, उपासतापास, देवाला जाणे इत्यादी करण्यावर मात्र माझा कणभरही विश्वास नाही.
माझीही रास वृश्चिक आहे आणि माझा देवगणही आहे. आणि तो मंगळ बिंगळ पण बहुतेक आहे माझ्या पत्रिकेत. गेल्या अडीच वर्षात मी पण भरपूर मनस्ताप, ताण, डिप्रेशनचा दरवाजा ठोठावून येणे, प्रकृतीची पडझड, आजीचा मृत्यू हे सगळे झेलले आहे पण त्या सगळ्याचे उत्तर कष्ट आणि पेशन्स एवढेच मिळाले. गेल्या अडीच वर्षांमधे काही महत्वाच्या गोष्टी पुढे गेल्या. त्यातही पावलापावलाला ठेचकाळणे, सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटणे हे ही चालू आहेच.
प्रत्येक ठिकाणी लढाई आहे आणि प्रत्येक लढाई पुढच्या लढाईसाठी तयार करतेय मला असं जाणवतंय. तेव्हा वेळ परिक्षेची आहे इतकेच आहे. कधीही कुठलेही संकट ही परीक्षेचीच वेळ असते. एकतर आपण त्या परीक्षेला संपवतो किंवा परिक्षा आपल्या आत्म्याला संपवते. यातलं काय निवडायचं हा आपला प्रश्न आहे. तेव्हा उगाच हातपाय गाळून बसू नकोस. जे काय होतंय ते का होतंय, तसंच का होतंय, कोण तुझ्या वाईटावर आहे, कुठले जप करू, कुठे काय वाहू यावर लक्ष केंद्रीत न करता असलेला प्रॉब्लेम अ‍ॅक्सेप्ट करून तो सॉल्व्ह कसा करता येईल यावर लक्ष दे.
जप, देवळातल्या फेर्‍या, अमुक तमुक वस्तू वाहणे याने तुला मन ताळ्यावर रहायला उपयोग होत असेल तर ते कर पण ते समस्येचे उत्तर नाही. समस्येचे उत्तर धैर्य, कष्ट, पेशन्स हेच आहे.

त्याला एकदा विचारलं की तू साडेसातीला तुझा बेस्ट लाईफ पिरीयड कसं बनवलंस
<<
रास चुकली असेल मोजायची Wink

मकर राशी ला नाही ना साडेसाती, पण सारखी जाणवतेय.
बी ,तुझ्यासारखेच खूप प्रोब्लेम सुरु आहेत एका मागे एक .बुडत्याला काडीचा आधार असतो ,तसे जे आहे ते घट्ट घरून ठेवायचे .काही कारण नसतानाही एकाद्या प्रश्नाचे चटकन उत्तर मिळू नये असे होते ..
नी छान पोस्ट !
हि जी लढाई असते न आपली व परीक्षेची, त्यात खूप शक्ती ऱ्हास होत असते ,सर्व सुरळीत कधी होणार हा प्रश्न राहतोच !

सुप्रिया,: कन्येची साडेसाती मे २०१४ ला संपणार होती. तसे कॅलक्युलेशन बरोबर आहे.पण ग्रहांचे काही भ्रम ण वगैरेचे इश्यूज असल्याने ती एक्स्टेंड झाली व परवा दोनला संपली. अजून दोन महिने तरी काही रेसिड्यूअल इफेक्ट जाण्वत राहतात असे ही वाचले. धनुर्धारीच्या अंकात डीटेल आहेत मागच्या वर्शीच्या. मी रविवारी लिहीन इथे.

आपले कर्म करणे, प्रामाणिकपणे वागणे, प्रलोभनांच्या आहारी न जाणे, स्वतःशी पराकोटीचा सच्चेपणा बाणवणे. फार पैसे न उडव्णे ही साधी पथ्ये पाळल्यास हा कालखंड सुसह्य होइल. सर्व नातेसंबंधांचे खरे स्वरूप समोर येणे व ते समजून घेणे हा ही एक भाग होतो. काही आपल्याला सहन होत नाही पचत नाही पण हेच सत्य आहे हे समजून घेतले कि मन शांत होते. शाब्दिक बाणांनी हर्ट होणे थांबते.

मी एकदा कुत्रे फिरवताना काही बारकी पोरे रुईची पाने अगदी कचर्‍यात उगवलेल्या झाडांची तोडून जमा करत होती असे पाहिले. ह्याचे हार करून ते मंदिरात विकणार् होते. त्यामुळे त्यांना पैसे मिळतील इतकेच ते. त्यामुळे फार रिच्युअलस न करता देखील सच्च्या मनाने देवाशी संवाद साधल्यास जास्त समाधान मिळेल अर्थात हे सब्जेक्टिव आहे.

देवगणाच्या समजुतीबद्दल थोडं गमतीनंच लिहिलंय रश्मी. पुढे देवगणाचा प्रतिसाद आलाच आहे. कित्येकांचा देवगण असेल परंतू एखाद्या मूर्तीच्या नशीबी जसे दह्या-दुधाची-आंघोळ-चंदनाचा-लेप असतो बाकीच्या मूर्ती आवारात आणि कोनाड्यात पावसाची वाट पाहात असतात. देव देवळांची ही कथा तर सामान्यांनी किती अपेक्षा ठेवायची ते सिमंतीनी यांनी छान सांगितले आहेच. ज्योतीषाकडे गांभिर्याने कमी आणि विनोदाने अधिक पाहणेच मला योग्य वाटते.नीचभंग राजयोगही असतोच पण तो एंजॉय करायला लग्नेश बलवान असावा लागतो नाहीतर उच्चीचा राजयोग आणि नीच लग्नेश सिंहासनावर बसूनही चुळबुळ करतो.थोडक्यात धैर्यधर कोणत्याही संकटाला भीक घालत नाहीत आणि आपल्याबरोबर दुसऱ्यालाही आनंद देतात. या जगात रडतराउंचं काम नाही.मन चंगा तो कठौती मेँ गंगा.

नीधप, अमा , Srd सर्वांनाच अनुमोदन!

कन्येची साडेसाती संपली तरी ह्या ७ वर्षात बरेच वेगवेगळे अनुभव आलेत .. नोकरी , पहिला परदेश प्रवास, प्रमोशन हे २००८-२०१० पर्यंतच झालं.. नंतर मानसिक ताणतणाव, वादावादी, टोकाचे निर्णय घेणे.. एक प्रश्न सोडवताना नवीन प्रश्न उभा राहणे.. गेल्या २ वर्षात २ काकांचा लागोपाठ निधन, आजारपण.. सगळं झाल..

मागे कधीतरी मोकिमी यांनी साडेसातीवरच लिहलं होत की शनी तुम्हाला बरचं शिकवतो, अगदी कठोर शिक्षक! अगदी तावुन सुलाखुन बाहेर पडु.. इतकंच लक्षात ठेवलं होत.. या सात वर्षांनी बरचं काही शिकवलं, कोण आपल्या परीघात आहे हेही कळालं, स्वतः ठाम निर्णय घेण्याची शक्ती मिळाली.. कधीकधी स्वतःशी संवाद करुन उत्तर मिळाली..

गेल्या २-३ वर्षात घडणार्या गोष्टींमुळे मी साडेसाती सुरु आहे हे विसरुनच गेले होते... ते एकदम हा लेख आल्यावरच संपल्याचे कळलं Happy

>>शनी तुम्हाला बरचं शिकवतो, अगदी कठोर शिक्षक! अगदी तावुन सुलाखुन बाहेर पडु.. इतकंच लक्षात ठेवलं होत.. या सात वर्षांनी बरचं काही शिकवलं, कोण आपल्या परीघात आहे हेही कळालं, स्वतः ठाम निर्णय घेण्याची शक्ती मिळाली.. कधीकधी स्वतःशी संवाद करुन उत्तर मिळाली..

शत प्रतिशत सत्यवचन श्रीमान !

एकाएकी माझ्या पायाला मार बसला. अणि माझ्या एक पाय अधू झाला. मी नंतर राशी वाचली तर त्यात लिहिले होते पायाला सहज मार बसेल. तसेच झाले. आता पुर्वीसारखे नीट चालता येत नाही. माझे खाणे पिणे नेहमी चांगले असते. मला नक्की काय झाले आहे हेच माहिती नाही पण एकूण आयुष्य खूपच चिंताजनक झालेले आहे. मी ह्यातून बाहेर पडू पहातो आहे पण मला मार्ग दिसत नाही.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>..
बी तुमची मानसिकता काय होत असेल हे मी समजू शकतो . कधीकधी जीवनात अशी संकटे येतात कि माणसाचा जीवना कडे आणि सर्वच गोष्टीन कडे बघायचा दृष्टीकोनच बदलून जातो .
आपल्या जीवनात जे काही बरे वाईट घडते ते १०० % आपल्या पूर्व कर्माचे फळ असते उगाचच कुणावरही संकटे येत नाहीत आणि उगचाच कुणाचीही भरभराट होत नाही.तुमच्या जीवनात जे काही घडले आहे ते नक्कीच तुमच्या पूर्व पापांची फळे आहेत .त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या पूर्व पुण्याईची फळे सुद्धा योग्य वेळी मिळतीलच. ईश्वराच्या राज्यात चुकूनही कोणावरही अन्याय होत नाही.

http://www.hirabhaithakkar.net/karma1.htm

हे जरूर वाचा बर्याच प्रश्नाची उत्तरे त्यात मिळतीलच .

सर्व समस्यां मधून तुम्ही लवकरच मुक्त व्हाल हि सदिच्छा !!

सर्वांचे मन:पुर्वक आभार. मी प्रत्येकाची इथे नावे घेत नाहे पण तुम्हा सर्वांचे प्रतिसाद मनस्वी आवडले. खूप फायदा होतो अशा प्रतिसादांचा. मनावर एक सकारात्मक परिणाम होतो.

एकाएकी माझ्या पायाला मार बसला. अणि माझ्या एक पाय अधू झाला. मी नंतर राशी वाचली तर त्यात लिहिले होते पायाला सहज मार बसेल. तसेच झाले. आता पुर्वीसारखे नीट चालता येत नाही. माझे खाणे पिणे नेहमी चांगले असते. मला नक्की काय झाले आहे हेच माहिती नाही पण एकूण आयुष्य खूपच चिंताजनक झालेले आहे. मी ह्यातून बाहेर पडू पहातो आहे पण मला मार्ग दिसत नाही.>> तसे सुद्धा
एक मेल मेनोपॉज हा शारिरिक टप्पा आणि मिडलाइफ क्रायसिस हा भावनिक टप्पा आयुश्यात आला असेल तर ते ओळखून घेउन दोन्ही साठी उत्तम इलाज अवेलेबल आहेत. चांगल्या अँड्रोलोजिस्ट ला भेटा ते शारिरिक त्रासांसाठी ट्रीट मेंट देतील तसेच मिड लाइफ क्रायसिस हा आजकाल बिट्ट्या पोरांना पन होतो व काउन्सेलिन्ग, उत्साह वाढविण्याचे मार्ग इत्यादी सांगणारे अभ्यासू गुणी गोड स्वभावाचे काउसेलर उपलब्ध असतात तुमच्या नैराश्याच्या कोषातून बाहेर पडून काही काँक्रीट स्टेप्स घ्या आणि जीवन सुखकर होइल. हेच शनी तुमच्या कडून अपेक्षा करतो आहे.

पूर्वकर्म वगैरे विचारांनी पूर्ण समाजच मानसिक पांगळा करून ठेवला आहे. शारिरिक अपंगत्वापेक्षाही वाईट. परदेशात आणि इथेही अडवेंचर/ साहसिक खेळांत तरूणवर्ग झोकून देतो. त्यात काही अपंगही होतात ते काय कर्म कर्म म्हणत पाप पुण्याचा विचार करत खितपत बसतात का?

Pages