उन्हाळ्यासाठी गारेगार बर्फ

Submitted by लसावि on 21 April, 2014 - 00:41

साहित्य -
एक रेफ्रिजिरेटर (चालू)
आईसक्यूब ट्रे (न गळणारा)
पाणी (प्यायचे)

कृती -
१. एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) पाणी घ्यावे.
२. स्वच्छ धुतलेल्या आईसक्यूब ट्रे मध्ये ते हळूहळू ओतावे*.
३. पाणी भरलेला हा ट्रे न हिंदकाळता फ्रीजच्या डीप फ्रीजर मध्ये ठेवावा. (कृतीचा हा भाग फार अवघड आणि महत्वाचा आहे. भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले पाणी न सांडता दुसर्‍या हाताने आधी फ्रीजचा आणि मग डीप फ्रीजरचा दरवाजा उघडणे हे एक परिश्रमसाध्य स्कील आहे.)
४. आता डीप फ्रीजचा आणि मग फ्रीजचा दरवाजा बंद करावा.
५. तुमच्या फ्रीजच्या लायकी प्रमाणे आणि तुमच्याकडे किती वेळ सलग वीज असते त्याप्रमाणे कधीतरी बर्फ तयार होईल.
६. बर्फ वापरायच्या वेळी तो ट्रे डायगोनली पकडून धुणे पिळल्याप्रमाणे हाताची हालचाल करावी. हे करताना काळजी घ्यावी कारण काही चुकार आईसक्यूब्स एकदम उडी मारुन नको तिथे पडू शकतात.
७. अशा प्रकारे तयार झालेला बर्फ इतर अनेक कृतीत वापरता येतो उदा. हळूच कॉलरमागून शर्टात टाकणे इ.इ.

* ही स्टेप करताना पाण्याशी गोड बोलल्यास चांगले आणि त्याला शिव्या घातल्यास खत्रूड आकाराचे क्यूब्स तयार होतात म्हणे. http://rationalwiki.org/wiki/Water_memory
फक्त इच्छाधारी नागांनाच नव्हे तर पाण्यालाही मेमरी असते हेच यावरुन सिद्ध होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण एक शंका आहे.... मला अगदी जवळपास अश्शीच पाकृ ठोकळे काकूंनी लिहिलेल्या 'आधुनिक पाककृतींचे १००१ प्रकार' पुस्तकात वाचल्याचे आठवते. जाणकारांनी कृपया खुलासा करावा. धन्यवाद!

पण एक शंका आहे.... मला अगदी जवळपास अश्शीच पाकृ ठोकळे काकूंनी लिहिलेल्या 'आधुनिक पाककृतींचे १००१ प्रकार' पुस्तकात वाचल्याचे आठवते. जाणकारांनी कृपया खुलासा करावा. धन्यवाद!

मलाही तीच शंका आली.

शिवाय नेटवर गुगलले असता ह्याच नावाचा पण वेगळ्याच रंगाचा आणि पुर्णपणे वेगळे घटक वापरुन केलेला पदार्थ दिसला. आता नक्की कुठला पदार्थ ऑथेंटीक ते कसे कळणार??? आम्हाला फक्त ऑथेंटिक रेसिपीजच चालतात.

ठोकळे काकूंच्या पुस्तकातली रेस्पी अगदी हिच्च आहे. शंभर रंग आणि आकार आणि इसेन्स आणल्यावर काहीही छानच लागेल.
पारंपरिक रेस्पीने कसं मिनिमलिस्टीक असायला हवं. जिथल्या तिथल्या ऋतूनुसार लवचिक की काय ते... कळ्ळं?

अरे देवा.
इतकी हिट पाककृती करून बघितल्या शिवाय मला काही सद्गती मिळणार नाही. आताच्या आत्ता फ्रीज खरेदी करायला हवा.
कोणता फ्रीज घेवू म्हणजे असाच बर्फ मिळेल?
कृपया जाणकारांनी सल्ले द्यावेत.

मला अगदी जवळपास अश्शीच पाकृ ठोकळे काकूंनी लिहिलेल्या 'आधुनिक पाककृतींचे १००१ प्रकार' पुस्तकात वाचल्याचे आठवते. जाणकारांनी कृपया खुलासा करावा.

>>> अकु, एक जाणकार या नात्यानं सांगू इच्छिते की ठोकळे काकूंनी ठोकळे बनवले तर श्री. आगाऊ यांनी क्यूब्ज बनवले आहेत. या दोन्ही पदार्थांची जातकुळी वेगळी असते. असो.

या दुर्मिळ पाककृती करता श्री. आगाऊ यांस 'बर्रफाचार्य' ही पदवी प्रदान करण्याचा प्रस्ताव मांडत आहे.

100

मिनिमलिस्टीक>>>>>
हे मी 'मिनिमलिपस्टीक' असं वाचलं. कारण काही पोरी लिपस्टिकसुद्धा फ्रीजमध्ये ठेवतात, हे मी पाहिलंय.

आमच्या रेफ्रिजरेटरमधे बर्फ आपोआप तयार होतो. ( कसा ते क्रिप्या विचारु नै) पण मला माझे कूकिंग स्कील्स सगळ्यांना (एकदाचे!) दाखवायचेच आहेत. तेव्हा वरील रेसीपीसाठी फ्रीज भाड्याने आणावा काय? कुठे मिळतो? आणल्यानंतर वीज गेली तर भाड्याचे पैसे वळते करतील का? Wink

मी पण आजच करून बघितला. अगदी ट्रे न हिंदकळता वगैरे केल्या मुळे मोठ्या मोठ्या क्यूब्ज मिळाल्या. या डिटेल माहिती बदल आगाऊ तुझे धन्यवाद मानावे तितके कमीच . मला गहिवरूनच आले अशा मोठ्या मोठ्या क्यूब्ज बघून .तुझे कुठल्या शब्दात आभार मानू? लगेच मोठा ग्लास भरून सरबत प्यायले. गारेगार Happy

आत्ता कॉलरमागून /कॉलरपुढुन शर्टात घालण्याचा प्रयोग उद्या परवा आणि बरेच वेळा Lol
.रेसिपी इतकी सोप्पी आहे कि रोजच करून बघणार Happy

आदल्या दिवशी उरलेल्या आईसक्यूब्सच दुसर्‍या दिवशी थालिपीठ लावलं तर चालेल का? कारण मी शक्यतो काही वाया जाऊ देत नाही.. Wink

आगाऊ तुमची हि पाकक्रुती इथे सापडली . http://www.wikihow.com/Make-Ice-Cubes-with-an-Ice-Tray.
त्या फोटोंमधले हात तुमचे आहेत का ? असतील तर पुढच्या वेळी फोटो काढण्याआधी नखे कापून घ्या. तिसर्‍या फोटो मधे कोंबडी पण दिसते आहे ? तेंव्हा हि अंडी नसलेली पाकक्रुती असली तरी कोंबडी नसलेली नाही असे समजायचे का ? Lol

तांब्याच्या प्रमाणात न करता घंगाळाच्या प्रमाणात केले, आत्ता त्या extra ice cube चे काय करू ? इथे हिवाळा संपून spring सुरू झाल्याने लोकांनी शर्ट घालणे बंद केले असल्यामूळे शर्टात (इतरांच्या) सोडण्याचा प्रयोग करता येत नाहिये Lol

शेवटी ................. गारेगार बर्फ लिहुन आगाउ कर्तुत्व्वान झाले .. म्ह्णाव लागेल....

ते हात आणि कोंबडी दोन्हीही माझे नाहीत.
'सरकायलीयो खटिया जाडा लगे' या उद्बोधक लोकगीताप्रमाणे ही देखील एक पारंपारिक कृती आहे, त्यामुळे आंतरजालावर इतरत्र मिळू शकते.

हो, शिवाय त्या दुव्यात काचेच्या जगमधून पाणी (हिंदकाळत) ओतताना दाखवले आहे/ इथे आगाऊने लिहिलेच आहे स्पष्ट की हळूहळू तांब्यातलं पाणी ओता म्हणून.
तांब्या आणि जग यातील फरक समजून घ्यायचा असेल तर स्वयंपाकघरातील भांडी व उपकरणी नामक धागा आहे तिथे प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम करावा

'सरकायलीयो खटिया जाडा लगे' या उद्बोधक लोकगीताप्रमाणे ही देखील एक पारंपारिक कृती आहे >> ह्या लोकगीताचे फोटो कूठे मिळतील ? ज्यांचे फोटो असतील त्यांचा consent घ्यायला विसरू नका हा 'आगाऊ' सल्ला. Lol
* शेवटच्या वाक्यातील 'आगाऊ' हा शब्द प्रयोग विशेषण म्हणून वाचावा, विशेषनाम म्हणून समजून ' आगाऊ हा माझा डुआयडि असून मी स्वतःच्या बाफाचे टीआरपी वाढवतो आहे' वगैरे गैर समजास मी जबाबदार नाही.

अहो वरदाताई तुम्ही त्यांची वकिली का करताहात पण ? मी बघितलय कि काही बाफांवर असणार्‍या काहि आयडींना कोणी काही बोलले कि लगेच त्या बाफांवरचे इतर जण पण तिथे येऊन कोल्हेकुई करायला लागतात. :p

असाम्या, कंपूबाजी कंपूबाजी म्हणतात ती हीच. इतरांनी केली तर चालते आणि आम्ही फक्त निर्मळ मनाने त्या दुव्यामधला आणि या पाकृतला फरक समजवायला गेलो तर आमच्यावर कोल्हेकुई (उर्फ कंपूबाजी उर्फ झीलकरी मंडळ) वगैरेचे बिनबुडाचे आरोप!!!!!!!
हा हन्त! सध्या खर्‍याचा जमानाच नाही राहिला............. Proud

Pages