उन्हाळ्यासाठी गारेगार बर्फ

Submitted by लसावि on 21 April, 2014 - 00:41

साहित्य -
एक रेफ्रिजिरेटर (चालू)
आईसक्यूब ट्रे (न गळणारा)
पाणी (प्यायचे)

कृती -
१. एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) पाणी घ्यावे.
२. स्वच्छ धुतलेल्या आईसक्यूब ट्रे मध्ये ते हळूहळू ओतावे*.
३. पाणी भरलेला हा ट्रे न हिंदकाळता फ्रीजच्या डीप फ्रीजर मध्ये ठेवावा. (कृतीचा हा भाग फार अवघड आणि महत्वाचा आहे. भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले पाणी न सांडता दुसर्‍या हाताने आधी फ्रीजचा आणि मग डीप फ्रीजरचा दरवाजा उघडणे हे एक परिश्रमसाध्य स्कील आहे.)
४. आता डीप फ्रीजचा आणि मग फ्रीजचा दरवाजा बंद करावा.
५. तुमच्या फ्रीजच्या लायकी प्रमाणे आणि तुमच्याकडे किती वेळ सलग वीज असते त्याप्रमाणे कधीतरी बर्फ तयार होईल.
६. बर्फ वापरायच्या वेळी तो ट्रे डायगोनली पकडून धुणे पिळल्याप्रमाणे हाताची हालचाल करावी. हे करताना काळजी घ्यावी कारण काही चुकार आईसक्यूब्स एकदम उडी मारुन नको तिथे पडू शकतात.
७. अशा प्रकारे तयार झालेला बर्फ इतर अनेक कृतीत वापरता येतो उदा. हळूच कॉलरमागून शर्टात टाकणे इ.इ.

* ही स्टेप करताना पाण्याशी गोड बोलल्यास चांगले आणि त्याला शिव्या घातल्यास खत्रूड आकाराचे क्यूब्स तयार होतात म्हणे. http://rationalwiki.org/wiki/Water_memory
फक्त इच्छाधारी नागांनाच नव्हे तर पाण्यालाही मेमरी असते हेच यावरुन सिद्ध होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले
पाणी न सांडता दुसर्या हाताने आधी फ्रीजचा आणि मग डीप
फ्रीजरचा दरवाजा उघडणे हे एक परिश्रमसाध्य स्कील आहे.)>>>>>

डबल डोअर फ्रीज असेल तरीसुध्दा फ्रीज चा दरवाजा उघडावा लागेल का?

<<अशा प्रकारे तयार झालेला बर्फ इतर अनेक कृतीत वापरता येतो उदा. हळूच कॉलरमागून शर्टात टाकणे इ.इ.>>
आणखीन पण उपयोग सांगा कि हो Happy

भल्याभल्या शेफिणी आणि शेफ यांनी कधीही न केलेली ही अप्रतिम पाककृती तुम्ही इथे दिल्याबद्दल धन्यवाद. कधी खूप काँन्फिन्डन्स वाटला तर त्या दिवशी नक्की करून बघेन आणि फोटो टाकेन.

एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) >>> हे वाक्य दिसतंय तितकं सरळ आहे ना? Wink

आज करून पाहीन. धन्यवाद.

जरा आणखी थोडी माहिती हवी होती.
- जास्तीच्या उरलेल्या बर्फाचे काय करता येईल? (कोणतीही पाकृ ट्राय करावी म्हटले की हा प्रश्न लगोलग मनात येतो. थांबतच नाही.)
- ट्रे फिजमध्ये ठेवताना त्यावर झाकण झाकायचे की नाही हे तुम्ही कुठे नमूद केले नाही. म्हणून वाटले तेही विचारून घ्यावे.
- <<काही चुकार आईसक्यूब्स एकदम उडी मारुन नको तिथे पडू शकतात.>> शेजारी वारंवार बर्फाची मागणी करत असतील तर त्यांच्यासमोर हा प्रकार करता येईल का?

(आगाऊ धन्यवाद.)

तुमच्या 'गारेगार बर्फ' या शब्दयोजनेमुळे पाकृची खुमारी वाढली आहे, खरंच.

पाकृ साठी लागणारा वेळही नाही दिलेला...!!!

>>> लिहिलंय ना त्यांनी!

आणि त्याचंही एक समीकरण आहे जे एका प्राचीन ग्रंथात दिले आहे :

वेळ = ०.५*(फ्रिजची लायकी) + (किंवा -, ज्या एरीयात घर असेल त्याप्रमाणे) (घरची वीज असण्याचा काळ)^२ + (घरातील लहान मुलांची संख्या)*(त्यांची फ्रीजचा दरवाजा उघडण्याची वारंवारीता)

सुजा, कॉलरमागूनच्या ऐवजी कॉलरपुढुन शर्टात किंवा अन्य कपड्यात (अंगावर घातलेल्या हां , कपाटातल्या नव्हे) टाकून पहा.
Wink

गजानन,
ट्रेवर झाकण नसावे. अन्यथा ते झाकण तयार बर्फाला चिकटून फ्रीजमधून बाहेर येते, बाहेर आल्याआल्या निसट्ते आणि ट्रे खाली पडतो.
शेजार्‍यांना थंड पाडण्याचे अनेक मार्ग आहेत त्यांचा वापर केल्यास ते बर्फ मागायला येणार नाहीत

अरे, फ्रीज नसल्यास काय करायचे सांगा ना कुणीतरी.
मायक्रोवेव वापरल्यास सेटींग काय ठेवावी?

Rofl
पाण्याचे प्रकार वेगळे वेगळे असतील (बिसलेरी, अक्वागार्ड, डायरेक्ट नळाच, माठातल ) तर पुढील क्रुतीत काही फरक करावे लागतील का? पाकृ जमेलशी वाटतीय, सगळे इन्ग्रेडियन्ट्स घरी आहेत, तर विकेंडाला करून पहावी म्हणतेय.
जमल करायला तर प्रचि टाकेन . Lol

Lol भन्नाट आहात सगळे
पण या बर्फाबरोबर काय काय चांगले लागते ते तरी सांगा
सरबताचे प्रकार, इतर पेये, इ. इ.
शिवाय या पेयांबरोबर काय काय चांगले लागते तेही सांगा
फरसाण, चकल्या

इन्ना, टिकतो. मी बाणेर रोडला राहते. माझ्या इकडे टिकतो. तुझ्याकडे टेरेस असेल तर एकदा ऊन दाखव चांगलं कडक मग एअरटाईट डब्यात भरून ठेव.

जांभळ्या रंगाच्या ट्रेमध्ये सोनेरी किंवा हिरवं असं कॉन्ट्रास्ट रंगाचं पाणी जास्त छान वाटेल असं मला वाटतं.

ह्याच्यात काय तुमची अ‍ॅडीशन?
माहीतीचा स्त्रोत नाही लिहिला? हि रेसीपी तुम्ही जन्माला घातली आहे का? की तुमच्या पणजी, आजी, आई ते नीट स्पष्ट लिहा की. पारंपारीक असेल तर तसे लिहा. Proud
आणि ईंग्रजी नावं नसल्याने बाद ठरते. ... तरी अजूनही नावं ठेवू शकता. Proud
हि घ्या नावं

बर्फ बनवणे - My way
My take on - बर्फ मेकींग.
Ice Ice baby - पारंपारीक
Proud

इन्ना, टिकतो. मी बाणेर रोडला राहते. माझ्या इकडे टिकतो. तुझ्याकडे टेरेस असेल तर एकदा ऊन दाखव चांगलं कडक मग एअरटाईट डब्यात भरून ठेव.
>>> श्र, माझी आजी उन्हाळ्यात इतर वाळवणांबरोबर हा प्रकार करत असे पण ती नंतर एक वाफ देऊन मग रुमटेंपरेचरला आल्यावर चौकोनी वड्या कापून ठेवायची. आल्यागेल्याच्या हातावर ठेवायला बरं पडतं म्हणायची.

* काही निवडक प्रतिक्रिया*
माझ्याकडे पिवळा ट्रे आहे तो चालेल का?

शाकाहारी लोकांसाठी हा बर्फ चालेल का? नसेल चालणार तर काय चालेल?

पाणी रंगीत घेतले तर काय होइल? किती घ्यायचे?

तुमची रेसीपी आमच्या घरी एकदम हिट होणार.

रेसीपी पाहूनच जुने दिवस आठवले व डोळे भरले पाण्याने. (ते पाणी वापरु का आता?)

बर्फ करायला ठेवला पण तो बाहेर काढल्यावर वितळला... काय करु? कसे करु?

फोटो नसल्याने नक्की कसा दिसतो हा बर्फ हे कळत नाहीये व त्यामुळे गोंधळ उडालाय. फोटो टाकाच राव तुम्ही.

मेले, पोचले स्वर्गात! काय मस्त रेसीपी आहे.

Proud

माझ्या निवडक दहात !!!

किती उन्हाळे शोधले तेव्हा आज ही पाक्रु मिळाली. जुन्या माबो वर कोणी दिली आहे का?
पुढ्च्या रविवारी करायचा घाट घातला आहे.शनिवारी सुट्टी आहे म्हणजे आधी तयारी करता येईल.
तुम्हाला आगाऊ धन्यवाद.

जांभळ्या रंगाच्या ट्रेमध्ये सोनेरी किंवा हिरवं असं कॉन्ट्रास्ट रंगाचं पाणी जास्त छान वाटेल असं मला वाटतं.> मंजूडी , अग आधी बेसीक पाक्रु जमु दे ना आमच्या सारख्यांना. उगाच कॉम्प्लीकेट करून स्वतःचे स्किल्स दाखवू नका.

मामी, इन्ना - हरणाच्या गोल्डन यलो रंगाच्या ट्रे मध्ये किरिमि़जी रंगाचे पाणी घातले तर तो बर्फ जगाच्या अंतापर्यंत टिकतो. मात्र पाणी ट्रे मध्ये ओतताना काही विशिष्ट स्तोत्रे म्हणावी लागतात, ती माबोवर इतरत्र मिळतील.
इतर सर्व रंग वर्ज्य आहेत, फारतर पाणी भरताना 'पानी रे पानी तेरा रंग कैसा' किंवा 'आज ब्लू है पानी पानी' हे म्हणू शकता.
झंपी, तुमचा मुद्दा बरोबर आहे. ही पारंपारिक रचनाच आहे.

तुम्हाला आगाऊ धन्यवाद. >>>>>
सामी, शब्दांचा क्रम उलटसुलट झालाय. तुम्हांला 'आगाऊ, तुम्हांला धन्यवाद.' असं म्हणायचंय का?

मामी, ट्रेंमुळे सध्या रेडीमेड चौकोनी तुकडे मिळतात.

जांभळ्या बटाट्याच्या पेयासमवेत असा जगाच्या अंतापर्यंत टिकणारा बर्फ चांगला लागावा, नाही का आगाऊ?

फारेन्ड - Lol (सगळेच प्रतिसाद)

श्रद्धा - आमच्याकडे आर्द्रतायुक्त ऊन असतं. ते चालतं का या बर्फाला दाखवलं तर?

Pages