मायबोलीवरील प्रकाशचित्रांबद्दल धोरण

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

गेले काही दिवस जिप्सी यांनी काढलेल्या काही फोटोंबाबत चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने मायबोली प्रशासनातर्फे हे निवेदन.

मायबोलीवर नियमितपणे प्रकाशचित्रं प्रकाशित होत असतात. या प्रकाशचित्रांमध्ये अनेक फोटो हे सार्वजनिक ठिकाणी काढलेले असतात. जोपर्यंत हे फोटो कुठल्याही कायद्याचा भंग करत नाहीत, तोपर्यंत असे फोटो मायबोलीवर प्रकाशित करण्याला मायबोली प्रशासनाची हरकत नाही. मात्र मायबोलीवर फोटो प्रकाशित करताना फोटोग्राफरने पुरेशी काळजी घेणं, फोटोंबाबत व्यवस्थित विचार करणं अत्यावश्यक आहे, असं प्रशासनाचं मत आहे.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे फोटोंचा गैरवापरही खूप वाढला आहे. असा गैरवापर जगभरात अनेक प्रकारे होत असतो. त्याला देशाचं, प्रांताचं बंधन नाही. म्हणून आपण काढलेल्या प्रकाशचित्रांमुळे फोटोतील व्यक्तीची सुरक्षितता तर धोक्यात येत नाही, तिच्या प्रायव्हसीचा भंग तर होत नाही ही काळजी तर घेतली पाहिजे, शिवाय त्या व्यक्तीची, किंवा लहान मुलांचे फोटो असतील, तर मुलांच्या पालकांची परवानगी घेतली गेली पाहिजे, असं मायबोली प्रशासनाला वाटतं. हे फोटो आपण का काढत आहोत, ते कुठे, कसे प्रकाशित होणार आहेत, याची मुलांच्या पालकांना फोटोग्राफरने व्यवस्थित कल्पना द्यायला हवी आणि तशी परवानगी मिळवायला हवी. पालकांच्या संपूर्ण परवानगीने फोटो आंतरजालावर प्रकाशित करणं सगळ्यांच्याच दृष्टीनं हितावह आहे, हे प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं.

हे बंधन फक्त लहान मुलांच्या फोटोंबाबतच नव्हे, तर इतर वेळीही पाळलं जावी, अशी अपेक्षा आहे. सर्व कायदे पाळून, इतरांच्या प्रायव्हसीचा, भावनांचा विचार करूनच मायबोलीवर लिखाण केलं जावं किंवा प्रकाशचित्रं प्रकाशित केली जावीत, अशी मायबोली प्रशासनाची भूमिका आहे.

मायबोलीवर प्रकाशित केलेल्या लेखनाचे, प्रतिसादांचे, प्रकाशचित्रांचे सर्व हक्क लेखकाकडे आणि फोटोग्राफरकडे असतात. या हक्कांबरोबरच त्या त्या देशातले कायदे पाळण्याच्या जबाबदारीची जाणीवही प्रत्येक सदस्याने ठेवायला हवी.

मात्र मायबोली हे एक सार्वजनिक व्यासपीठ आहे. मायबोलीचे सभासद इथे मुक्तपणे लिहू शकतात, प्रकाशचित्रं प्रकाशित करू शकतात. त्यामुळे फोटो प्रकाशित करण्याआधी फोटोग्राफरने पालकांची किंवा फोटोतल्या व्यक्तीची परवानगी घेतली आहे किंवा नाही, याची खातरजमा करणं मायबोली प्रशासनाला शक्य नाही. इतकंच नव्हे तर विविध देशात याबद्दलच्या कायद्यांमध्ये भिन्नता असल्यामुळे सरसकट एकच नियम करणेही शक्य नाही. अशा परिस्थितीत जर मुलांच्या पालकांनी किंवा फोटोतील व्यक्तीने किंवा कायद्याशी संबंधित विभागांनी / अधिकार्‍यांनी फोटोंवर आक्षेप घेतल्यास मायबोली प्रशासन त्यांना सर्वतोपरी साहाय्य करेल.

विषय: 
प्रकार: 

अरुन्धतीने खणल्यावर बाफ सार्थकी लागला एकदाचा. धन्यवाद अरुन्धती.
खरच! मनापासुन धन्यवाद, नाहीतर पार चिपाड झालेल्या ऊसाप्रमाणे चर्चा होतच राहिली असती.

रश्मी, अगदी अगदी, अन बाफची चर्चेची गाडी रुळावर "कायद्याच्या कक्षेत" ठेवण्याचे, (न की माबोप्रशासनाला दोष देत बसण्याचे) कामीही याचा उपयोग झालाय. थ्यान्क्स अरुन्धतीजी.

<<बायदिवे, इथला विषय नसेल कदाचित पण ओघात येतोय म्हणून सान्गू पहातो, गेल्या पन्चवीस वर्षात मी काढलेल्या अनेक फोटोतील अनेक व्यक्ति गचकल्या, अन त्या गचकल्यानन्तर, तसबिरी करुन लावायला त्यान्चे फोटो त्यान्च्या कुटुंबियांकडे नसल्याने शेवटी माझ्याकडून अशा सुन्दर पोट्रेट टाईप फोटोच्या प्रति अनेकजणान्नी "विनाधन्यवाद" नेल्या आहेत हा माझा एक अनुभव.>> लिंबाजी राव टीम्बाजी राव . ग्रेट Lol किती तरी धन्यवाद मिळाले असतील तुम्हाला Happy

गेल्या काही दिवसात झालेल्या मनस्तापातुन तो बाहेर पडला की या निर्णयावर नक्कीच पुनर्विचार करेल अशी मी आशा बाळगतेय.>> साधना +१११
खरंच जिप्सी, कारण मी मायबोलीवर फक्त एक वाचक म्हणूनच वावरत असते. आणि जेव्हा मला नवीन लेखन मध्ये तुझ्या प्रचिंची लिंक दिसते न तेव्हा आवर्जून तो धागा उघडला आणि पाहिला जातो फक्त प्रत्येकवेळी प्रतिसाद द्यायला जमत नाही. आम्हा माबोकरांना घरबसल्या तू विविध ठिकाणची सफर घडवून आणतोस आणि हे सगळं मला यापुढेही हवं आहे. म्हणून तू कृपा करून तुझ्या या निर्णयावर पुनर्विचार कर हि विनंती.

Pages