'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

भारतात कलम ३७७अंतर्गत 'अनैसर्गिक' लैंगिक संबंध बेकायदेशीर आहेत. भारतीय कायद्यानुसार समलिंगी संबंध ठेवणंही अर्थातच बेकायदेशीर आहे. इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेला, दोन सज्ञान व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणारा, त्यांना गुन्हेगार ठरवणारा हा कायदा भारतात पाळला जातो.

काही वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं हा कायदा घटनाविरोधी ठरवला. या निकालाविरुद्ध अनेक धार्मिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल भारतात सर्वत्र लागू व्हावा, म्हणून काही सामाजिक संघटना आणि समलिंगी मुलामुलींचे एकोणीस पालकही न्यायालयात गेले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.

उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार्‍या पालकांपैकी एक होत्या श्रीमती चित्रा पालेकर. चित्रा व अमोल पालेकर यांची मुलगी शाल्मली समलिंगी आहे. ऑस्ट्रेलियात एका विद्यापीठात ती प्राध्यापक आहे. गेली अनेक वर्षं चित्राताई भारतात समलैंगिकांना गुन्हेगार ठरवलं जाऊ नये, त्यांना समान हक्क मिळावेत, यासाठी लढा देत आहेत.

२०१२ साली 'माहेर'च्या दिवाळी अंकात चित्राताईंनी समलैंगिकतेबद्दल एक लेख लिहिला होता. हा लेख प्रकाशित झाल्यावर अनेकांचे फोन, ईमेल आले. आपला मुलगा / मुलगी समलिंगी असल्याची शंका असणारे पालक, आपला मुलगा / मुलगी समलिंगी आहे, हे माहीत असणारे पालक हा लेख वाचून पुढे आले. भारतात अजूनही या विषयाबद्दल किती अज्ञान, भीती, संकोच आहे, हे या निमित्तानं लक्षात आलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आलेल्या प्रतिक्रियांमधूनही हे जाणवलं. समान हक्क नाकारणार्‍या या कायद्याच्या बाजूनं किती मोठा समुदाय उभा आहे, हे समोर आलं. म्हणूनच चित्राताईंनी लिहिलेला लेख इथे (सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही बदलांसह) पुन्हा प्रकाशित करत आहे.

CP and Shal.jpg

`माझा मुलगा जर समलिंगी असेल, तर समलैंगिकतेला वाईट समजणार्‍या पारंपरिक रूढ कल्पनाच साफ चुकीच्या, असं मी ठामपणे मानतो.'

एका ख्रिस्ती बिशपचे हे उद्गार. मुलानं स्वतःची लैंगिकता उघड केल्यावर त्याची निर्भर्त्सना करण्याऐवजी, त्याला नाकारण्याऐवजी, मुलावर विश्‍वास ठेवून त्याला पूर्ण पाठिंबा देताना काढलेले! दोन वर्षांपूर्वी ’स्ट्रेट पेरेंट्स्, गे चिल्ड्रन : कीपिंग फॅमिलीज टुगेदर’ असं लांबलचक शीर्षक असलेलं पुस्तक वाचताना ते शब्द माझ्या नजरेस पडले. एका धर्मप्रचारकानं त्याच्या धार्मिक नीतिनियमांची तमा न बाळगता अशी भूमिका उघडपणे घ्यावी, याचं खूप बरं वाटलं. त्याचबरोबर, वीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीनं ती लेस्बियन आहे, असं मला सांगितल्यावर मला काय वाटलं होतं, ते पुन्हा एकवार आठवलं.

त्या काळी समलैंगिकतेबद्दल मला फारशी माहिती नव्हती (आता साठीत असलेल्या माझ्या पिढीला स्त्री-पुरुष संबंधांबद्दलसुद्धा उघड बोलायला संकोच वाटे, तिथे समलैंगिकतेचं काय घ्या?). ही गोष्ट कधीच स्वप्नातदेखील न आल्यामुळे, मुलीनं तसं म्हटल्यावर मी चकित होणं साहजिक होतं, पण मी अजिबात हादरून वगैरे गेले नाही. वर उल्लेख केलेल्या बिशपप्रमाणेच मला वाटलं, की जर माझी मुलगी लेस्बियन असेल, तर ती गोष्ट वाईट असणं शक्यच नाही. लेक म्हणाली, ''तू काळजी करू नकोस. लैंगिकता ही गोष्ट सोडून बाकी सर्व बाबतींत मी अगदी तीच आहे... माझ्या जन्मापासून आत्ता, काही क्षणांपर्यंत मी जी होते, जिला तू जाणत होतीस तीच... तुझी शाल्मली". वास्तविक तिनं हे बोलून दाखवायची गरज नव्हती. तिच्या वागण्याबोलण्यात कुठलाच फरक नाही, हे मला स्पष्ट दिसत होतं. मी केवळ हलकंसं स्मित करून होकारार्थी मान हलवली. शाल्मली बरीच रिलॅक्स झाली.

''अम्मा, समलिंगी असणं हा आजार नाही, बरं का! हे व्यंग किंवा विकृतीदेखील नाही", लेक समजावत होती. "समलैंगिकतेला अनैसर्गिक मानणं तर साफ चुकीचं आहे. तू लहान असताना डाव्या हाताचा वापर वाईट मानला जाई, नाही का? बिचार्‍या डावर्‍या मुलींना पूर्वी फटके मारून उजव्या हातानं लिहा-जेवायला भाग पाडत, हे तूच मला सांगितलं होतंस, पण आज डाव्या हाताला मान्यता मिळाली आहे. त्याचा वापर अनैसर्गिक, असं कुणी म्हणत नाही. अशा लोकांचं प्रमाण कमी असतं. समाजातल्या बहुतेक लोकांहून ते वेगळे असतात, पण त्यांच्या कृती नैसर्गिकच मानल्या जातात. समलिंगी असणं हे एका परीनं डावरं असण्यासारखंच आहे.''

''समाजात बहुतांश लोकांची लैंगिकता स्त्री-पुरुष संबंधाशी निगडित असते. त्यांच्या तुलनेत समलिंगी लोकांची संख्या कमी; पण ते बहुतेकांपेक्षा वेगळे आहेत म्हणून समाजानं त्यांच्यावर अनैसर्गिक असा शिक्का मारणं योग्य आहे का? खरंतर लैंगिकता केवळ बायोलॉजिकल फॅक्ट आहे. डोळ्यांच्या रंगांप्रमाणे. सर्व माणसांचे डोळे जसे एकाच प्रकारचे असत नाहीत - काळे, निळे, राखाडी असे वेगवेगळ्या रंगांचे असतात, त्याचप्रमाणे लैंगिकतादेखील केवळ एकाच प्रकारची - स्त्री-पुरुषसंबंधी नसते. समलैंगिकता हे ऐतिहासिक वास्तव तर आहेच. त्याशिवाय आता समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, तसंच जीवशास्त्रीय संशोधनांतून या विषयावर अधिकाधिक प्रकाश पडत चाललाय आणि अशा सगळ्या अभ्यासांतून जो निष्कर्ष निर्विवादपणे निघालाय, तो हाच, की गे किंवा लेस्बियन (होमोसेक्शुअल) असणं हे स्ट्रेट (हेटेरोसेक्शुअल) असण्याइतकंच नैसर्गिक आहे.''

वीस वर्षांची माझी लेक तर्कशुद्ध विचार अतिशय सुसंगतपणे मांडत होती. वास्तविक मी व तिचे वडील अनेकदा तिच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर वाद घालत असू, चर्चा करत असू, पण आज केवळ तात्त्विक चर्चा होत नव्हती. तिच्या-माझ्यातला हा संवाद अतिशय नाजूक होता... आम्हां दोघींचं नातं, जवळीक पारखणारा, आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा होता. शाल्मली पोटतिडिकीनं बोलत होती, पण मधूनच अम्माला हे पटतंय का, अशी शंका तिच्या चेहर्‍यावर उमटून जात होती... कधी निराशेचा सूर डोकावत होता. मी तिला कुशीत घेऊन म्हटलं, ''तू मुळीच काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी सांगण्यापूर्वी तू जी माझ्यासाठी होतीस, तीच अजूनही आहेस... माझी लाडकी लेक. बस्स...'' आणि मग एकमेकींना मिठी मारून आम्ही खूप हसलो आणि थोडंसं रडलोसुद्धा. आपल्या वडलांना, जवळच्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना तिनं सांगितल्यावर सगळ्यांनी तिचा सहजपणे स्वीकार केला. माझ्यासारखंच सर्वांना वाटलं, तिचं-आपलं जे प्रेमाचं, आपुलकीचं नातं आहे, त्यात तिच्या लेस्बियन असण्यानं काय फरक पडतो? तो तिचा खासगी प्रश्‍न आहे! तिला आपल्या पुढच्या आयुष्यात सोबती म्हणून स्त्री हवी आहे, पुरुष नाही, इतकंच. सर्व जवळच्या, प्रिय लोकांनी स्वीकार केल्यामुळे माझ्या लेकीचं मानसिक बळ खूप वाढलं, यात शंका नाही. आज ती परदेशात एका महत्त्वाच्या विश्‍वविद्यालयात प्राध्यापक आहे. स्वतःच्या विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर तिचं खासगी जीवनदेखील अतिशय सुखी, समृद्ध आहे. याचं श्रेय तिच्या आत्मविश्‍वासाला आणि कर्तृत्वाला जातं, तिच्या सहचरणीच्या प्रेमाला जातं, तसंच तिच्या जवळच्या सर्व माणसांच्या पाठिंब्यालाही जातं, अशी माझी खात्री आहे.

''आपण लेस्बियन आहोत हे जाणवल्यावर तू लगेच मला का नाही सांगितलंस? मध्ये इतका काळ का जाऊ दिलास?'' मी लेकीला विचारलं. बालपणापासून कुठलीही गोष्ट तिनं माझ्यापासून लपवली नव्हती, पण या बाबतीत ती चार-पाच वर्षं गप्प राहिली, हे मला थोडंसं खटकलं होतं. ''मी तेव्हा चौदा-पंधरा वर्षांची असेन. एव्हाना माझ्या मित्रांना मुलींबद्दल आणि मैत्रिणींना मुलांबद्दल 'गुलुगुलु' वाटायला सुरुवात झाली होती. सगळे मला त्यांची गुपितं सांगत. आवडणार्‍या मुलीशी किंवा मुलाशी ओळख करून द्यायची विनंती करत! मी सगळ्यांची दोस्त! त्या वेळी माझ्या लक्षात आलं, की मला स्वतःला मुलांबद्दल निर्भेळ मैत्रीपलीकडे काही वाटत नाही... मी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. त्या वयात वेगळेपणाची भीती वाटते, तशी मलाही वाटली. मी लेस्बियन तर नसेन, अशी शंका मनात डोकावल्यावर तर फारच. अर्थात, हे सगळे शब्द तेव्हा माझ्या परिचयाचे नव्हते. माझ्या मनाचा गोंधळ उडाला. कुणाशी तरी बोलणं आवश्यक होतं, पण आजूबाजूच्या माणसांत कुणीही समलिंगी नव्हतं, किंवा कुणी असल्याचं मला माहीत नव्हतं. मी कुणाचा सल्ला घेणार?'' 'म्हणूनतर माझ्याकडे यायचंस ना...' असं मी म्हणणार, इतक्यात शाल्मली पुढे म्हणाली, ''तुझं व बाबांचं या विषयी नेमकं काय मत आहे, मला ठाऊक नव्हतं. आपल्या घरी अनेक कलात्मक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक विषयांवर चर्चा चालत, पण समलैंगिकतेचा कधी कुणी उच्चारही केला नाही. तुम्ही केवळ या विषयाकडे दुर्लक्ष करत होतात, की त्याच्या विरोधात होता, हे मला कसं कळणार? मी तुम्हांला सांगितलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हांला माझा राग येईल का... शरम वाटेल का... तुम्ही माझ्यापासून दूर जाल का... माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम कराल का? नाहीनाही त्या शंकाकुशंका मला सतावत होत्या. तुमच्यापाशी यायला मी धजावत नव्हते. याशिवाय अनेकदा अनेक ठिकाणी गे किंवा लेस्बियन माणसांबद्दल गलिच्छ कुजबूज, विनोद माझ्या कानी येत होते. अतिशय वाईट शब्दांत, अश्‍लील पद्धतीनं त्यांचा उल्लेख होताना मी ऐकलं होतं. क्लबमध्ये वा शाळेत नाजूक दिसणार्‍या मुलांना इतर मुलं किती वाईट वागवत, हे मी पाहिलं होतं. साहजिकच मी लेस्बियन आहे असं कळलं, तर माझ्याशी सगळे असंच वागतील, अशी भीती माझ्या मनात घर करून होती. हे सगळे धोके पत्करण्यापेक्षा गप्प राहणंच शहाणपणाचं होतं, नाही का?'' मी सुन्न होऊन तिचे अनुभव ऐकत होते.

काही क्षण गप्प राहून शाल्मली हसली आणि म्हणाली, ''पण गंमत म्हणजे जसजशी मी मोठी झाले, तसतसं माझ्या लक्षात आलं, की 'आपल्यात काही कमी आहे, तिरस्कार वाटण्यासारखं आहे, आपलं मन गलिच्छ आहे' असलं काही मला अजिबात वाटत नाहीये. मी मित्रमैत्रिणींपेक्षा 'वेगळी' असेन पण माझ्यात कमतरता मुळीच नाही. उलट अभ्यास, खेळ, गाणं सगळ्यांत मी पुढेच आहे. हळूहळू या विषयावरचे अभ्यासपूर्ण निबंध, लेख वाचायला मी सुरुवात केली. त्यावर विचार करायला लागले. माझा आत्मविश्‍वास बळकट झाला आणि वाटलं, अम्मा-बाबाला सांगायला का घाबरावं? शेवटी तुम्हीच तर मला सत्याची चाड धरायला शिकवलं होतं. निर्भय होण्याचे धडे दिले होते. शिवाय लेस्बियन असण्यानं मी कुणाचंही वाकडं करत नव्हते, कुणालाही इजा करत नव्हते! हो ना?''

उत्तरादाखल मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. माझ्यापाशी शब्द नव्हते. आईच्या नात्यानं मी तिच्या सर्वांगीण वाढीची सदैव काळजी घेतली होती. प्रत्येक बाबतीत तिला प्रोत्साहन दिलं होतं, पण जेव्हा तिच्या किशोरवयात तिला समलैंगिकतेची, स्वतःच्या 'वेगळेपणा'ची जाणीव झाली आणि ती गोंधळून गेली, तेव्हा तिला माझ्या मायेची, आधाराची खरी गरज होती आणि नेमकी तेव्हाच, मुलीची हेटेरोसेक्शुअ‍ॅलिटी गृहीत धरण्याची चूक केल्यामुळे मी कमी पडले होते!

समलैंगिकता मुलीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा घटक आहे, हे कळल्यावर त्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटली. मी तिला प्रश्‍न विचारायला, शंका बोलून दाखवायला सुरुवात केली आणि तीदेखील मनमोकळेपणानं, कसलाही संकोच न करता समजावून देऊ लागली. लेख, पुस्तकं वाचायला देऊ लागली. पुढे बर्‍याच समलिंगी स्त्री-पुरुषांशी माझी ओळख झाली, अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली. या सर्व प्रयत्नांतून, पूर्वी धूसर असलेलं समलैंगिकतेचं विश्‍व हळूहळू माझ्यापुढे साकार होऊ लागलं. समाजात त्यांच्याबद्दल ज्या समजुती प्रचलित आहेत, त्यांत वास्तव किती, दंतकथा किंवा फोल कल्पना किती, हे स्पष्ट व्हायला लागलं.

***

माझी या जगाशी ओळख झाली त्या वेळी म्हणजे १९९०च्या दशकात, समलैंगिकतेबद्दल भारतात सर्वसाधारणपणे प्रतिकूल वातावरण होतं. शतकानुशतकं ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांचा आवाज दडपला गेला, हक्क हिरावले गेले अशा दलित, स्त्रिया, आदिवासी इत्यादी घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वतंत्र भारताच्या चाळीस वर्षांत संघटना उभ्या राहिल्या होत्या, चळवळी सुरू झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोडीनं खुल्या विचारांचे बुद्धिजीवी, कलाकार, पत्रकार यांत भाग घेत होते. सरकारवर दबाव आणत होते. अल्पसंख्याकांच्या प्रश्‍नांबद्दलही त्या सर्वांना सहानुभूती वाटत होती. आणीबाणीनंतर घटनेत नमूद केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी व प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांविषयी समाजात अधिक जागरूकता होती; पण समलैंगिक मात्र अल्पसंख्य, अन्यायाचे बळी असून, त्यांचे मूलभूत हक्क हिरावले गेले असूनदेखील उपेक्षित व अंधारात राहिले. एकदा स्त्रीमुक्ती चळवळीशी संबंधित एका प्रसिद्ध कार्यकर्त्रीला ''तुम्ही स्त्रियांच्या प्रश्‍नांबरोबर लेस्बियन्सचे प्रश्‍नही हाती घेता का?'' असं मी विचारलं. यावर त्या बाई म्हणाल्या, ''छे! तो तर वरच्या वर्गातल्या बायकांचा प्रश्‍न आहे. आम्ही ज्या बायकांबरोबर काम करतो, त्यांचा नाही.'' ही त्यांची समजूत साफ चुकीची होती, हे अर्थात मला पुढे कळून चुकलं. (आज मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्रीमुक्ती चळवळीत काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्या एलजीबीटी चळवळींत सक्रीय सहभाग घेतात.) वास्तविक समलैंगिकता दुनियेतल्या सर्व वंशांत, खंडांत, आर्थिक घटकांत, सामाजिक स्तरांत, जाती-जमातींत, तसंच धर्मांत सापडते. पाश्‍चात्त्य-पौर्वात्य, श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण अशा सगळ्या समाजात अस्तित्वात आहे. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत.

समलैंगिकता मूळ भारतीय नाही, तर ती पाश्‍चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आली, असं आपले संस्कृतिरक्षक सांगतात; पण तेही खरं नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीत समलैंगिकता प्रचलित असल्याचे पुरावे पुरातन शिल्पांमध्ये व ग्रंथांमध्ये संशोधकांना सापडले आहेत. उलट ज्या नीतिमत्तेच्या कल्पनेतून समलिंगी लोकांवर हल्ला चढवला जातो, ती बुरसटलेली नीतिमत्ता राणी व्हिक्टोरियाच्या काळात आपल्यावर लादली गेली, तेव्हा खरंतर ही नीतिमत्ताच पाश्‍चात्त्य आहे!

समलैंगिकांबद्दलच्या चुकीच्या कल्पनांची यादी लांबलचक. अशी माणसं ठरावीक (बायकी?!) क्षेत्रांत वावरतात, ही अशीच एक गैरसमजूत! वास्तविक, समलिंगी माणसं कुठल्याही क्षेत्रात सापडतील. ती डॉक्टर, इंजिनीअर, वैज्ञानिक, राजकीय पुढारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, पत्रकार, खेळाडू असे कुणीही असू शकतात. पोलिस, सैन्य वगैरे 'पुरुषी' क्षेत्रांतदेखील ही माणसं आढळतात. कला, फॅशन, जाहिरात यांत वावरणारे अनेकदा ओळखू येतात. प्रस्थापित क्षेत्रांत, करीअरवर घाला येऊ नये म्हणून बहुतेक जण समलैंगिकता लपवतात. देशातला समलैंगिकतेबद्दलचा कायदा, समाजातली सहिष्णुता यांवर या लोकांचं 'प्रकाशात येणं' बरंच अवलंबून असतं.

इतिहासात अनेक प्रसिद्ध समलिंगी व्यक्ती होऊन गेल्या. उदा. 'मोनालिसा' या प्रख्यात चित्राचा जनक लिओनार्दो दा विंची. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र, विज्ञान अशा सर्व तर्‍हेच्या विषयांतलं त्याचं श्रेष्ठत्व आज सहाशे वर्षांनंतरदेखील अबाधित आहे; पण त्याच्या काळात (पंधराव्या शतकात) इटलीतल्या कायद्याप्रमाणे, समलिंगी असल्याच्या आरोपावरून त्याला त्रास देण्यात आला, धार्मिक चित्र रंगवण्यास मनाई करून त्याचा अपमान करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात ऑस्कर वाइल्ड या थोर आयरिश लेखक-नाटककाराला तो समलिंगी असल्याचं उघडकीला आल्यावर व्हिक्टोरियन कायद्यानुसार तुरुंगवास भोगावा लागला; पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मार्टिना नवरातिलोवा या प्रसिद्ध टेनिसपटूनं आपण लेस्बियन असल्याचं जाहीर केलं, तेव्हा अनेकांच्या भुवया जरी वर गेल्या, तरी तिला क्रीडाजगतात (आणि त्याबाहेरही) मानाची वागणूकच मिळाली. आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच व्हिक्टोरिया राणीचा वंशज प्रिन्स विलियम याच्या लग्नसोहळ्यात एल्टन जॉन हा प्रसिद्ध समलिंगी गायक व्हीआयपी पाहुणा म्हणून आमंत्रित केला गेला!

आपल्या देशात 'इंडियन पीनल कोड कलम ३७७' खाली समलैंगिकता हा गुन्हा आहे. 'लैंगिक क्रियेचा एकमेव हेतू 'गर्भधारणा व त्यातून प्रजोत्पत्ती' हाच असायला हवा आणि म्हणून, केवळ सुख-समाधान देणारी लैंगिकता पाप आहे', असं मानणार्‍या सनातन धार्मिक विचारांतून, तसंच व्हिक्टोरियन काळातल्या संकुचित नीतिमत्तेतून या कलम ३७७चा उगम झाला. कायद्याच्या पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांना पुष्टी मिळाली. समाजानं समलैंगिकांना वाळीत टाकलं. धर्म आणि समाज यांच्या दडपणाखाली कुटुंबीय आपल्या समलिंगी मुलांना नाकारायला लागले, लैंगिकता उघड झाल्यास नोकरी मिळणं मुश्किल, समाजात अवहेलना, वर कुटुंबाचा आधारही नाही! एखादा पुरुष 'गे' असल्याची नुसती शंका जरी आली तरी इतर पुरुषांकडून मारहाण, छळ, बलात्कार होण्याची शक्यता असे. असे समलिंगी पुरुष पोलिसांच्या अत्याचाराचेही वारंवार बळी होत, पण कायदाच प्रतिकूल असल्यावर दाद कुणाकडे मागणार?

लेस्बियन बायकांची कमीजास्त फरकानं अशीच स्थिती होती, पण यांना कुटुंबीयांचीच जास्त भीती होती. आपल्या पुरुषप्रधान समाजात मुलींची किंमत कमीच. मुलींच्या नियमबाह्य वागण्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला किंचित जरी धक्का बसला, तरी मुलीला कठोर शिक्षा करायला (प्रसंगी तिची हत्या करायला) घरचे पुरुष मागेपुढे पाहायचे नाहीत. स्ट्रेट मुलींची ही गत, तर लेस्बियन मुलींना वाली कुठून असायचा? अशा अनेक कारणांमुळे समलैंगिकतेभोवती अंधार पसरला; त्यांच्याविषयी सच्ची, वस्तुनिष्ठ माहिती मिळणं मुश्किल झालं आणि परिणामी चुकीच्या कल्पना, गैरसमजुती वाढत गेल्या. हे दुष्टचक्र चालत राहिलं आणि त्यातून समलिंगी मुलं आईबापांच्या प्रेमाला मुकली, स्वाभिमानास पारखी झाली, खरं रूप लपवावं लागल्यामुळे अस्मिता गमावून बसली, दुहेरी जीवन जगू लागली. अनेकदा त्यांच्यावर लग्नाची सक्ती झाल्यामुळे, त्यांचं स्वतःचं, तसंच त्यांच्या वधू/वराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.

२००९ साली दिल्ली उच्च न्यायालयानं ३७७ या कलमात बदल करून सम व अन्य लैंगिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं. न्यायालयाचा निकाल होता- 'दोन प्रौढ समलिंगी व्यक्तींचा परस्पर संमतीनं खासगीत केलेला संग गुन्हा नाही.' कायद्यातल्या या अतिशय महत्त्वाच्या बदलामुळे देशातल्या एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्ससेक्शुअल) लोकांत चैतन्याची लाट पसरली, त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. यांच्या विरोधात सनातन विचारांचे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा समलैंगिकांना सहानुभूती दर्शवणारे लोक वेगवेगळ्या शहरांतून, निरनिराळ्या क्षेत्रांतून खूप मोठ्या संख्येत पुढे आले. त्यात वकील, प्राध्यापक, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ अशांचा समावेश होता. अनेक तज्ज्ञांनी ऐतिहासिक, वैद्यकीय दाखले देऊन समलैंगिकतेच्या बाजूनं शपथपत्रं न्यायालयात सादर केली. एक महत्त्वाचं शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलं ते एकोणीस आईबापांनी- ज्यांत मीही होते- आपल्या मुलांवर आजपर्यंत (म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानं कलम ३७७मध्ये बदल करण्यापूर्वीपर्यंत) कसा अन्याय झाला,त्यांना मानसिक, प्रसंगी शारीरिक छळ समाजात कसा सहन करावा लागला, आई-बाप या नात्यानं आमची कशी घुसमट झाली अशा अनेक गोष्टी त्यात मांडल्या होत्या. त्याचबरोबर लैंगिकता ही आमच्या मुलांची खासगी बाब आहे. त्यामुळे आमच्या मुलांत काहीही कमी आहे, असं आम्हाला वाटत नाही. ते सगळ्या बाबतींत आदर्श नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगार मानणं अन्याय्य आहे. आमच्या मुलांना त्यांचे घटनांतर्गत हक्क मिळायला हवेत आणि त्यासाठी कलम ३७७मधला बदल अत्यावश्यक आहे, हे आम्ही ठामपणे शपथपत्रात लिहिलं.

आमच्या या कृतीचा खूप मोठा परिणाम झाला. आई-बापांनी विरोधकांना न भिता उघडपणे मुलांची बाजू घ्यावी, त्यांच्या व आपल्या भावना व्यक्त कराव्यात, हक्कासाठी झगडावं, याचं अनेकांना आश्‍चर्य वाटलं, कौतुक वाटलं. तशातून टीव्ही, वर्तमानपत्रं, मासिकं यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या (किंवा केवळ अश्‍लीलतेच्या संदर्भात उल्लेख झालेल्या!) समलैंगिकतेची बाजू उचलून धरली. आई-बापांच्या, मुलांच्या मुलाखती, मान्यवर तज्ज्ञांबरोबर चर्चा, लेख, इत्यादींमधून या लोकांची वस्तुस्थिती, त्यांचे अनुभव, या विश्‍वाबद्दलची शास्त्रोक्त माहिती समाजातल्या इतर लोकांपर्यंत पोचू लागली. समाजातल्या सहानुभूतीचा ओघ काही अंशी वाढला.

आता दरवर्षी निरनिराळ्या शहरांत एलजीबीटी लोकांचे, त्यांच्याबद्दल सहानुभूती असणार्‍यांसह मेळावे भरतात, सार्वजनिक जागेत कार्यक्रम होतात, मिरवणुका निघतात. आई या नात्यानं मी अशा बर्‍याच गोष्टींत भाग घेतला आहे. भोवती जमलेल्या बघ्यांच्या चेहर्‍यावर नवल असतं, कुतूहल असतं; पण तिरस्कार मात्र मी आजकाल कधी पाहिलेला नाही. दगडफेक, अश्‍लील शेरे असलंही काही अनुभवलेलं नाही. तेव्हा एकूण वातावरण बर्‍याच अंशी निवळलंय. निदान मोठ्या शहरांत तरी होमोफोबिया कमी झालाय, यात शंका नाही; पण उत्साहाच्या भरात हे विसरून चालणार नाही, की गुन्हेगारीचा ठप्पा पुसला जाणं ही निव्वळ पहिली पायरी आहे. एलजीबीटींना त्यापुढेही खूप मजल मारायची आहे. नागरिक या नात्यानं लागू होणारे भारतीय संविधानातले सगळे हक्क मिळवायचे आहेत. नोकरी, आईवडलांची मालमत्ता, आर्थिक मदत अथवा सरकारी कर्ज इत्यादी बाबतींत समलैंगिकतेवरून भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होऊ नये, यासाठी जागरूक राहायचं आहे. समलिंगी जोडीदाराला साहचर्याचे हक्क मिळावेत, समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' मानलं जावं, या जोडप्यांना मुलं दत्तक घेता यावीत, अशा अनेक गोष्टींत कायदेशीर तरतुदी करून घ्यायच्या आहेत. निव्वळ मोठ्या शहरांतच नाही, तर छोट्याछोट्या गावांतही समलैंगिकांना स्वीकारलं जावं, यासाठी झटायचं आहे. परंतु या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या आईवडलांची, भावाबहिणींची, जवळच्या इतर कुटुंबीयांची मानसिकता पालटून, त्यांचा मनापासूनचा पाठिंबा मिळवायचा आहे.

आज समलैंगिकतेविषयीचं संशोधन खूप पुढे जात आहे. समलिंगी असणं म्हणजे पाप आहे, अनैसर्गिक आहे इत्यादी कल्पना चुकीच्या असून, त्या निव्वळ अज्ञानातून उद्भवल्या आहेत, असं मत तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केलं होतं (आणि माझ्या मुलीनं ते वीस वर्षांपूर्वी मला सांगितलंही होतं). त्याच्यापुढे जाऊन हल्ली वैद्यकीय संशोधनातून हेही सिद्ध झालं आहे, की 'सम अथवा विषम लैंगिकता जन्मतःच निश्‍चित होते.' जन्मतः निश्‍चित झालेली, नैसर्गिक समलैंगिकता ही 'बायोलॉजिकल फॅक्ट' असेल, तर 'आईवडलांना पसंत नाही, समाजाला पटत नाही' असल्या कारणांवरून ते बदलणं कसं शक्य आहे? अशा मुलांवर दडपण आणून, त्यांना साधूंच्या पायांवर घालून, अंगारे लावून, किंवा एखाद्या पैसेखाऊ डॉक्टरकरवी शॉक ट्रीटमेंट देवऊन त्यांची समलैंगिकता नाहीशी होईल, असं मानणंदेखील साफ चुकीचं आहे. खरी लैंगिकता लपवून, खोटं जीवन जगायला भाग पाडल्यास मुलं दुःखी होतात, तणावाखाली जगतात, कधी आत्महत्या करतात. अनेकदा तर आपल्या दबल्या लैंगिकतेला कसा ना कसा वाव देण्याच्या प्रयत्नांत रोगांची अथवा नीच लोकांची शिकार बनतात.

याउलट, आज उपलब्ध असलेल्या आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा/माहितीचा आधार घेऊन आईबापांनी जुन्या, चुकीच्या कल्पनांना तिलांजली दिली, तर त्यांना कौटुंबिक/सामाजिक विरोधाची काळजी करण्याचं कारण उरणार नाही. आपल्या समलैंगिक मुलांना तोडून, त्यांचं जीवन नष्ट करण्याऐवजी आईबाप त्यांचा मनापासून स्वीकार करू शकतील. आपल्या इतर मुलांसारखंच प्रेम व आधार त्यांना देऊ लागतील. अशा स्वीकृतीमुळे मुलंही आनंदानं जगतील, कर्तृत्ववान होऊ शकतील. समलैंगिकांना आईबापांचा पाठिंबा लाभल्यास, समाजाच्या मुख्य धारेत सामावलं जाणं त्यांच्यासाठी मुळीच अशक्य नाही, अशी माझी खात्री आहे.

***

समलैंगिक मुला-मुलींच्या पालकांना, किंवा समलिंगी मुलामुलींना काही शंका असतील, किंवा संवाद साधायचा असेल तर श्रीमती चित्रा पालेकर यांच्याशी parents@queer-ink.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल. तुमचा पत्रव्यवहार, तुमची ओळख यांबाबतीत संपूर्ण गोपनीयता पाळली जाईल.

***
विषय: 
प्रकार: 

भारतात असे संबंध कायदेशीर होतील याची शक्यता फारच कमी दिसतेय. >>>>>>असहमत.. मला वाटते सगळे राजकीय पक्ष कलम ३७७ रद्द करायच्या बाजुने आहेत त्यामुळे आज ना उद्या हे कलम रद्द होणार हे नक्कीच.

काही प्रश्नः
१. पोलिसांनी या कायद्याअंतर्गत आतापर्यंत कुणाला अटक्/प्रॉसिक्युट केले आहे का? अश्या बर्‍याच केसेस झाल्या आहेत का?

२. समजा 'अ' आणि 'ब' या दोन व्यक्तींमधे हे संबंध असतील तर 'क' या तिसर्‍याच व्यक्तीने पोलिसात तक्रार केल्यास ते त्यांना प्रॉसिक्युट करु शकतील का?
जर नसेल तर 'अ' किंवा 'ब' यांना आपले संबंध उघडपणे ठेवण्यासाठी कलम ३७७ जाचक वाटत आहे का?

दिनेशजी,

भारतात हे संबंध लवकरच कायदेशीर होतील अशी मला सार्थ आशा आहे आणी निकडही आहे. पेन्शन , प्रॉ फंड, दवाखान्यात भेट असे इतरही अनेक विषय आहेत. अमेरिकन सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या एका निकालातले वाक्य आहे 'separate but equal is not equal'

>> समाजापुढे ( सार्वजनिक ठिकाणी ) प्रेमाचे प्रदर्शन करणे तसे स्त्रीपुरुष संबंधातही कायदेशीर नाही.

'आम्हाला आमच्या प्रेमाचे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करू द्या' या मागणीसठी हा लढा नाही.

पूर्वी विधवा विवाहाला मान्यता देण्याचा विषय असताना काही लोकांनी 'तुम्ही हवे असेल तर विधवेला "ठेवून" घ्या पण कायदेशीर मान्यता कशाला ?' असे प्रश्न केले होते. त्याची आठवण झाली.

जोपर्यंत हे कायदेशीर होत नाहीत तोपर्यंत अशी जोडपी सदैव पोलिसांच्या भीतीखालीच वावरणार. आणी पोलीसही या कायद्याच्या बागुलबुवा दाखवून चहापाणी उकळणार.

विजय,
पेन्शन, प्रॉ. फंड वगैरे नॉमिनेट करता येत नाहीत का ? दवाखान्यात भेट हा मुद्दा कळला नाही. अशी केस झाल्याचे वाचले होते पण हा माझा जवळचा मित्र / मैत्रिण आहे असे जर रुग्णाने नोंदवले असेल तर डॉक्टर आडकाठी करतील का ?

विधवा विवाहाला कायदेशीर मनाई होती का ?

उत्तम लेख आहे. इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
नैसर्गिक गोष्टिंना नैसर्गीकरित्या स्विकारण्यासाठी आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
बाकी चालु द्या.

लेख आवडला.
बेफिकीर यांच्या 'धक्का बसला' पोस्टला उद्देशून- चित्रा पालेकरांनी इथे क्लिअरली लिहिलं आहे
>> ही गोष्ट कधीच स्वप्नातदेखील न आल्यामुळे, मुलीनं तसं म्हटल्यावर मी चकित होणं साहजिक होतं, पण मी अजिबात हादरून वगैरे गेले नाही. >>

बाकी मायबोलीवर ह्या विषयावर आधीही चर्चा झालेली असल्याने तेच लिहिणारे आयडी आणि त्यांचे प्रतिसाद वाचून आश्चर्य नाही वाटलं.

बाकी मायबोलीवर ह्या विषयावर आधीही चर्चा झालेली असल्याने तेच लिहिणारे आयडी आणि त्यांचे प्रतिसाद वाचून आश्चर्य नाही वाटलं. >> +१

महेश ह्यांचे आनंदवनबद्दल केलेले विधान निषेधार्ह आहे. ते विधानच वरच्या लेखाची गरज काय आहे हे दाखवून देते.

हा खूप मोठा प्रतिसाद होणारे पण इथल्या काही प्रतिक्रिया वाचून राहवले नाही म्हणून लिहीत आहे.
१. अतुल ठकार यांनी त्यांना नाटकात दाखवलेली समलैंगिक चुंबनदृश्ये पाहताना किळस वाटली असे लिहिले आहे. ती अत्यंत स्वाभाविक (नैसर्गिक) प्रतिक्रिया आहे! आता तुम्ही एका समलैंगिक व्यक्तीच्या दृष्टीने भिन्नलिंगी संबंधांकडे पहा! मग तुम्हाला त्या सर्व (भिन्नलिंगी) क्रिया किळसवाण्या वाटू शकतील. आणि तरीही समाजात गेली अनेक वर्षे ह्या समलैंगिक व्यक्ति असं किळसवाणे आयुष्य जगत आहेत! कारण त्यांच्या अत्यंत नैसर्गिक अशा भावनांना समाज आणि कायद्याची मान्यता तर नाहीच आहे त्याउप्पर त्यांना गुन्हेगार ठरवण्याची तरतूद ह्या कायद्यात आहे! हे सारं माणुसकीच्या कोणत्या निकषात बसतं? आणि आनंदवनाची पोस्ट तर फार फार असंवेदनशील आहे. कुष्टरोग हा किमानपक्षी संसर्गजन्य आजार आहे. समलैंगिकता हा आजार नाही.
तुम्ही म्हणता तुम्हाला समलैंगिकता आवडत नाही आणि हे मत मांडल्यानंतर लोक तुमच्यावर तुटून पडतात. तुम्ही आवड आणि योग्य/अयोग्य ह्याची गल्लत करत आहात. उदा. मला दारू पिणे आवडत नाही पण मला ते चूक आहे असे वाटत नाही. मात्र मला सिगारेट ओढणेही आवडत नाही आणि मला ते चूकीचेही वाटते. मला असं वाटतं की तुम्ही असं म्हणून बघा की मला समलैंगिकता आवडत नाही पण ती चूक आहे असही मला वाटत नाही! मग बघू तुमच्याशी कोण वाद घालतं ते!
२. As a student of molecular biology and genetics I think a Genetics 101 (अमेरिकेत कोणत्याही विषयाच्या तोंडओळखीला 101 म्हणतात) is essential here for those who think homosexuality as an unnatural phenomenon. (ह्यात अनेक इंग्रजी शब्द असतील कारण मला पर्यायी मराठी शब्द माहिती नाहीत.)
कोणत्याही माणसाच्या पेशींमध्ये असलेली गुणसूत्रे त्याचे लिंग ठरवीत असतात. Two X chromosomes makes you a female while an XY chromosome combination makes you a male. प्रत्येक species मध्ये sex determination च्या पद्धती निराळ्या असतात. उदा. काही माशांच्या प्रजातींमध्ये आजूबाजूच्या पाण्याच्या तापमानावर लिंग ठरते! म्हणजे जर उन्हाळा असेल तर सर्व संतती स्त्री मासे होतील आणि हिवाळ्यामध्ये पुरुष मासे (This is in spite of what chromosomes they carry)! माणसांमध्ये हे असं अर्थात होत नाही. मात्र केवळ गुणसूत्रे असल्याने देखील संपूर्ण लिंग ठरत नाही. त्या गुणसुत्रावरील सर्व जनुके (genes) योग्य रीतीने express व्हावी लागतात. How is this genes expression regulated? हा सध्याच्या संशोधनाचा एक अत्यंत hot topic आहे! ह्या विषयातील सर्वात महत्वाचा शोध म्हणजे epigenetics: म्हणजे संशोधनातून असे समोर आले आहे की gene expression is driven by the 3D architecture of the DNA and this architecture is dynamic. (अवांतर: epigenetics वर Time magazine ने एक cover केले होते).
ह्या साऱ्याचा समलैंगिकतेशी काय संबंध? तर शास्त्रज्ञांना असे आढळते आहे की समलैंगिक व्यक्तींच्या गुणसूत्रात काही दोष नसून बरेचदा epigenetics वेगळे असते. आता हे अनैसर्गिक आहे का? तर मुळीच नाही! ह्याच epigeneitcs च्या प्रभावामुळे ९९.९९% जनुकीय साम्य असतानाही जगातील दोन व्यक्ति (अगदी जुळी भावंडेही) एकसारख्या दिसत नाहीत. मग जर आपल्या इतर पैलूंवर (रंग, उंची, वजन, cancer होण्याची शक्यता आणि इतर अनेक) जर epigenetics चा प्रभाव पडत असेल तर आपल्या sexual orientation वरही त्याचा प्रभाव पडू शकतो ह्यात अनैसर्गिक असे काय आहे?
सध्याचे संशोधन हे epeigenetics चा प्रभाव कसा पडतो? How it is regulated इत्यादी वर चालू आहे.
तेव्हा एक वैज्ञानिक संशोधक म्हणून आणि त्याउप्परही एक संवेदशील माणूस म्हणून मी सर्वांना सांगेन की एकदा आपल्या मनाशी प्रामाणिकपणे विचारून पहा की केवळ भिन्न sexual orientation मुळे एखाद्या व्यक्तीला समाजात सन्मानाने जगण्याचा, वावरण्याचा हक्क नाकारणे योग्य आहे काय? आणि तुम्ही जर स्वतः अशी व्यक्ति असता तर तुम्हाला काय वाटले असते?

जिज्ञासा, चांगला प्रतिसाद.
>> केवळ भिन्न sexual orientation मुळे एखाद्या व्यक्तीला समाजात सन्मानाने जगण्याचा, वावरण्याचा हक्क नाकारणे योग्य आहे काय?>> अजिबातच नाही.

जिज्ञासा, मुद्देसूद, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय भाषेतील तरीही समजायला सोपा असा प्रतिसाद. धन्यवाद.

जिज्ञासा, खूप छान एक्स्प्लेन केलं आहे.

जी गोष्ट कुणाच्या हातात नाही ती गोष्ट गुन्हा कसा काय ठरते? एखाद्या भुरट्या चोराला देखील (सापडला तरच) दोन रट्टे देऊन सोडून दिलं जातं आणि इथे काहीच समाजविघातक कृत्य न करताच तुरुंगात????? इतकी टोकाची भुमिका का? ह्या बाबतीत काही गैरसमज असतील तर ओपन माईंड ठेवून अधिक वाचन करुन समजून घ्यावे, त्याच जोडीला एक माणूस म्हणून तुमचं मन काय सांगतं ते ऐकावे. काही जेनेटिक गोष्टींमुळे जेव्हा मुल अल्बिनो किंवा ड्वार्फ जन्माला येतं तेव्हाही हाच नियम लावाल का? ह्या गोष्टी चटकन दिसून येतात पण समलैंगिकता ही माणसाच्या अपिअरन्सवरुन दिसून येईल असं नाही त्यामुळे ती समजून घ्यायला जरा जास्त प्रयास मेजॉरिटीमध्ये येणार्‍या लोकांनी करायला नकोत का? की काहीतरी वेगळं आहे म्हणून सरळ हेटाळणीच करायची?

हा! जे समजून उमजून लैंगिक गुन्हे हेटेरो/होमो कडून केले जातील त्याला माफी नसावीच.

माझ्या "आनंदवन" संबंधित विधाना बद्दल,

मुळात मी ते का लिहिले याचा कोणी खरच विचार केला का ?
एकतर आधी कोणी तरी कुष्ठरूग्ण आणि या विषयाची तुलना केली होती,
त्यामुळे त्या ओघाने मी म्हणालो की अशाच धर्तीवर "या लोकांसाठी" पण एखादे आनंदवन सुरू केले जावे.

१.
बाबा आमटे आणि त्यांच्या कार्याचा आदर आहेच. नक्कीच आहे. त्यांनी आयुष्य वेचले नसते तर कुष्ठरूग्णांना अजुनही समाजाने वाळीत टाकलेच असते.
जर रस्त्यात कोणी कुष्ठरूग्ण भिकार्‍याने जर अंगाला हात लावून भिक मागितली तर जास्तीत जास्त लोकांची प्रतिक्रिया काय असते अजुनही. दचकून किळसवाण्या चेहर्‍याने लांब होतात ना.
अशा लोकांसाठी एक वेगळे जग निर्माण केले गेले हे चांगलेच झाले ना त्यांच्यासाठी ? की नाही ?
मग "या विशेष" लोकांसाठी पण असे एक वेगळे जग निर्माण झाले तर चांगले होईल की वाईट ?
पुढे मागे जेव्हा खुप मोठ्या प्रमाणावर "तथाकथित" जनजागृती होइल तेव्हा हे जग मुख्य प्रवाहात सामावून घेतले जाईलच. पण सद्ध्या असे होणे फार अवघड आहे.

२.
अजुन एक म्हणजे कित्त्येक गावांमधे (अगदी शहरांमधे सुद्धा) जात आणि धर्मावर आधारित वेगळ्या वस्त्या अजुनही आहेत. वाढत आहेत. (हे चांगले की वाईट हा एक वेगळा वादाचा विषय आहे).
उदा. पुण्यात मी जिथे राहतो त्या भागात काही सोसायट्या फक्त जैन समाजासाठी आहे.
हे असे जर असेल तर "या विशेष" लोकांनी वेगळे राहिले तर काय बिघडले ? वेगळे राहणे म्हणजे अगदी वाळीत टाकल्यासारखे नाही.

असे संबंध ज्यांना ठेवायचे असतील त्यांनी ते ठेवावेत, त्याचा उगाच उदोउदो करू नये आणि इतरांना करायला लावू नये.
(वर अनेकांनी अशाच स्वरूपाचे प्रतिसाद लिहिलेले आहेतच.)

या आधी एका धाग्यावर जी काही महाभयानक चर्चा झालेली आहे, कृपया कोणी तरी त्याची लिन्क देणे हि विनंती. अनेकांचे कष्ट वाचतील लिहिण्याचे.

वि.सू. : माझा शास्त्रीय अभ्यास वगैरे नाही, पण तरीही मला हे योग्य वाटत नाही म्हणुन मी याच्या उदात्तीकरणाचा विरोध करणार.

जिज्ञासा, अश्विनी के यांना अनुमोदन.
विशेषतः- इतकी टोकाची भुमिका का? ह्या बाबतीत काही गैरसमज असतील तर ओपन माईंड ठेवून अधिक वाचन करुन समजून घ्यावे, त्याच जोडीला एक माणूस म्हणून तुमचं मन काय सांगतं ते ऐकावे.

जिज्ञासा, एपिजेनेटिक थिअरी ऑफ होमोसेक्श्युअलिटी फक्त एक पॉस्टूलेशन आहे.
काहीच ठोस पुरावा नाही.
अगदी या एपिजेनेटिक थिअरीवर काम करणार्या बहुतांश शास्त्रज्ञांनीही या क्षेत्रात हवं तर कॅन्सरचे उत्तर सापडेल पण होमोसेक्श्युअ‍ॅलिटीचे उत्तर शोधणे हा वेळेचा अपव्यय आहे हे स्पष्ट केलेले आहेझ
आपण संदर्भ तपासून पाहू शकता.

>>त्याच जोडीला एक माणूस म्हणून तुमचं मन काय सांगतं ते ऐकावे.
माझे मन सांगते की हे जे काही आहे हे नैसर्गिक नाहीये, असे असेल तर त्यावर काही उपाय केले जावेत.

जिज्ञासा,
चांगली माहिती.

मला मनापासून समलैंगिक लोकाना समाजात समान वागणूक मिळावी हे पटले आहे. खरे तर समाज आणि लग्न या कल्पनाच मी 'अनैसर्गिक' मानत असल्यामुळे हे खरे तर oxymoronic ठरते पण डार्विन च्या सिद्धांतावर विश्वास असेल तर आज मला जे पटते ते उद्या पटायलाच हवे असे नाही Happy

काही वैज्ञानिक प्रश्न -

"प्रभाव" पडतो म्हणजे नक्की काय? cancer होणे वैज्ञानिक व्याखेनुसार "अनैसर्गिक" का मानतात मग? कुठेतरी "Cancer is "abnormal" growth of tissue" असे वाचलेले आठवते आहे म्हणून हा प्रश्न!

जसे प्रत्येक नैसर्गिक गोष्ट नैतिक असतेच हे खोटे आहे तसेच प्रत्येक अनैसर्गिक गोष्ट अनैतिक असतेच असे नाही हे मला पटले आहे. कारण नीतिमत्ता ही संकल्पनाच 'अनैसर्गिक' आहे. तेव्हा समलैंगिकतेला अनैसर्गिक मानून तिला समाजात मान्यता द्यायला लोकांची काहीच हरकत नसावी असे मला पटले होते. आता ती नैसर्गिक कशी आहे हा वाद चालू झाला आहे म्हणून हा मुद्दा!

बाकी कुष्ठरोग आणि समलैंगिकता यांची तुलना पूर्ण चूक वाटली.

http://en.wikipedia.org/wiki/Biology_and_sexual_orientation

<कुष्ठरोग आणि समलैंगिकता यांची तुलना पूर्ण चूक वाटली.>

तुलना कुष्ठरोग व समलैंगिकतेची केलेली नाही, कुष्ठरुग्ण व समलिंगींची केली आहे. याच पंक्तीत आदिवासी, फासेपारधी यांनाही बसवता येईल.

माझे मन सांगते की हे जे काही आहे हे नैसर्गिक नाहीये, असे असेल तर त्यावर काही उपाय केले जावेत >>> तसं नाही हो! खोलात जाऊन, जास्त माहिती करुन घेऊन, सगळं चित्र समोर मांडून, शांतपणे त्यावर विचार करुन मग तुमचं मन काय सांगतं ते ऐका असं म्हणायचंय मला Happy

मगाशी मी भुरट्या चोरीचा उल्लेख केलाय. एखादा माणूस कष्टाविण कमाई व्हावी म्हणून चोरी करेल, तर एखादं लहान मूल जे स्वत: कमावू शकत नाही आणि खूप भूक लागल्यावर खाऊ घालायला आईवडिलही जवळ नाहीत ते समोर एखाद्या खाद्यपदार्थ स्टॉलवर त्याचा हात पोहोचेल असा एखादा पदार्थ (तो चवीला कसा लागतो हे न कळताही) उचलेल. दोन्ही चोर्‍याच पण तुमचं मन तिथे नक्कीच भेदभाव करेल ना? पहिल्या माणसाचा तुम्हाला संताप येईल पण त्या मुलाचं कृत्य तुम्ही समजून घ्याल.

इथे तर कुठलाच गुन्हा नाही, मग समजून घ्यायला का जड जावं? बरं, वर कुणीही म्हटलं नाहिये की समलैगिकांना समजून घेतलं म्हणजे आपणही समलैंगिक व्हावं किंवा त्या गोष्टीचं उदात्तीकरण करावं, खतपाणी घालावं. फक्त जे त्यांच्या नैसर्गिकरित्या/उपजत वाट्याला आलंय ते तसं आहे एवढं मान्य करावं, त्यांची हेटाळणी करु नये, त्यांना समाजापासून तोडू नये. ते नाही करु शकत स्त्री पुरुषांचा संसार. जबरदस्ती केली तर तिसर्‍या स्त्री पुरुषावर अन्याय होईल. त्यापेक्षा कुणावरही अन्याय न करता, कुठलीही परपीडा न करता त्यांना त्यांचं सुख ज्यात आहे ते त्यांना मिळू नये असं आपण का म्हणावं?

कुष्ठरोग्यांसाठी वेगळा समाज, समलैंगिकांसाठी वेगळा समाज, अजून कुणासाठी वेगळा समाज.... असं केल्याने समाज एकसंध रहाणार कसा? एकसंध नाही राहिला तर बलवान रहाणार कसा? जे भौगोलिक दृष्ट्या पुर्वीसारखाच असूनही ह्या वेगळेपणाच्या जाणिवेने आणि जाणिव करुन देण्याने भारताचं झालं (काय झाल? विभाजन...समजलं?) तेच अंतर्गतरित्या करायचं आहे का?

'नैसर्गिक' चे तुणतुणे वाजविणार्‍यांसाठी एक प्रश्न.

बरीच भिन्नलिंगैक विवाहित जोडपी एकमकांना अपारंपारिक पद्धतीने आनंद देत असतात. ते 'नैसर्गिक' नक्कीच नाही. ते कदचित इतरांना किळसवाणे वाटू शकेल. पण म्हणून ते कायद्याने गुन्हा ठरवावे का?

होमोसेक्सुअ‍ॅलिटी चे जेनेटिक उत्तर सापडले नाहिये, कदाचित सापडणारही नाही. पण ते जन्मजात असते इतपत सर्वांना मान्य व्हावे.

अशा लोकांसाठी एक वेगळे जग निर्माण केले गेले हे चांगलेच झाले ना त्यांच्यासाठी ? की नाही ?
>> हे चांगले झाले वाटणे हिच समाजासाठी एक निंदनिय गोष्ट आहे आहे हो. म्हणजे मुळात समस्या निर्माण केल्यामुळे हा उपाय आलेला आहे. कुष्ठरोग्यांना हेटाळणी होणारी वागणूक न मिळता फक्त एक रुग्ण म्हणून समाजाने स्वीकारून एक normal मनुष्य म्हणून जगायची संधी मिळाली असती तर आनंदवनाची गरज (आजच्या स्वरुपात) लागली असती का ?

तसेच "मग "या विशेष" लोकांसाठी पण असे एक वेगळे जग निर्माण झाले तर चांगले होईल की वाईट ?" हा उपाय (?) शोधण्याऐवजी समस्याच निर्माण होउ नये ह्याबद्दल उपाय करणे चांगले होणार नाहि का ?

असे संबंध ज्यांना ठेवायचे असतील त्यांनी ते ठेवावेत, त्याचा उगाच उदोउदो करू नये आणि इतरांना करायला लावू नये. (वर अनेकांनी अशाच स्वरूपाचे प्रतिसाद लिहिलेले आहेतच.)>> वादाचा मुद्दा हा नाही आहे. त्यांच्या sexual orientation वरून त्यांना वेगळी वागणूक मिळणे योग्य आहे का ? हा आहे.

महेश,
एका विक्टिमलेस अ‍ॅक्ट्चा तुम्हाला तिरस्कार वाटतो म्हणून ईतरांनी त्या माणसांना दुय्यम किंवा गुन्हेगार म्हणून वागणूक द्यावी अशी अपेक्षा ??
निषेध.!!!

बाकी चालुद्या!!!

"प्रभाव" पडतो म्हणजे नक्की काय? cancer होणे वैज्ञानिक व्याखेनुसार "अनैसर्गिक" का मानतात मग? कुठेतरी "Cancer is "abnormal" growth of tissue" असे वाचलेले आठवते आहे म्हणून हा प्रश्न!>>

सुलू, प्रभाव पडणे म्हणजे epigenetics मुळे दोन व्यक्तींमध्ये जरी एकच gene असला तरी त्याच्या expression मध्ये फरक पडू शकतो. ज्यामुळे त्याचे normal function करण्यास अडथळा येऊ शकतो. हे मी केवळ समलैंगिकतेच्या संदर्भात बोलत नाहीये in general epigenetics कसे चालते ह्याबद्दल बोलत आहे. Cancer होणे अनैसर्गिक नसून abnormal आहे. निसर्गात माणूस सोडून अनेक प्राणी-पक्षांना (अगदी झाडांनाही) cancer होतो आणि त्यामुळे ते मरण पावतात.

आता पुन्हा एकदा थोडेसे Genetics 101: Normal Vs natural.
एक उदाहरण घेऊ. एका बेटावर ७०% लोकांचे डोळे निळे आहेत. आणि उरलेल्या ३०% लोकांमध्ये करडे, घारे, काळे डोळे असणारी माणसे आहेत. तर अशावेळी जो eye color चा gene लोकांमध्ये dominant असतो त्याला wild type किंवा normal allele म्हटले जाते. उरलेल्या ३०% लोकांमध्ये असलेला eye color चा gene हा mutant allele म्हणून ओळखला जातो. पण हे सर्व एकच eye color gene चेच वेगवेगळे alleles आहेत आणि सर्वच natural आहेत. आता दुसऱ्या एखादया बेटावर जर ७०% लोकांचे डोळे काळे असतील तर त्या population मध्ये black eye color will be the normal or wild type allele. आता जेव्हा एखादया व्यक्तीला cancer होतो तेव्हा तिच्या genes पैकी काही genes हे mutation मुळे wild type allele मधून mutant allele मध्ये रुपांतरीत झालेले असतात आणि त्यामुळे मग पेशींची अनिर्बंध वाढ सुरू होते.

homosexuality किंवा एकूणच sexual orientation साठी लागणारे genes किंवा इतर epigenetic processes अजून पूर्णपणे उलगडल्या नाहीयेत. ह्यात heredity चा भाग किती हेही माहिती नाही. मात्र संशोधन चालू आहे. ज्या गोष्टी माहिती आहेत त्यावरून एवढे नक्की म्हणता येते की समलैंगिकता ही अनैसर्गिक नसून निसर्गात असलेल्या विविधतेचा अविष्कार आहे.

साती, postulates मधूनच principles develop होत असतात. विज्ञानावर (वैज्ञानिक संशोधन प्रक्रियेवर )विश्वास असेल तर सर्व प्रश्नांची उत्तरे एक दिवस नक्की सापडतील! १०० वर्षांपूर्वी आपल्याला जे ज्ञान होते त्यापेक्षा कितीतरी अधिक ज्ञान आज आपल्याला आहे. एक ना एक दिवस आपल्याला समलैंगिकतेविषयीदेखील कळेल! फक्त सत्य जाणण्याची आणि पचवण्याची ताकद हवी!

सायो, नंदिनी, अश्विनी के >> धन्यवाद Happy

दुसर्‍या बीबी वरच्या चर्चेच्या अनुषंगाने मला महेश यांची पोस्टस नीट लक्षात असल्यास - त्यांची समलैंगिक संबंधांना हरकत नाही जोवर ते त्यांच्या बेडरूमपर्यंत सिमित आहे. पण त्याबाहेर पडून त्यांना यावर बोललेलं, उदात्तीकरण केलेलं, त्यांची चळवळ, त्यांचे हक्क याला अजिबातच मान्यता नाही कारण त्यांच्यामते हे अजिबात नैसर्गिक नाही, त्यांना आवडत नाही इ.
महेश- सांगण्यात चुकलं असल्यास सांगा.

लोकहो,

मी जिथे राहतो ते इंग्लंडमधील ब्रायटन हे शहर 'आनंदी' राजधानी (गे कॅपिटल ऑफ ब्रिटन) आहे. या पार्श्वभूमीवर काही निरीक्षणं नोंदवतो.

१. ब्रायटनमध्ये आनंद्यांचा स्वत:चा समूह आहे. तो केम्पटाऊन नावाच्या विभागात वसलेला आहे. महेश यांनी गे साठी वेगळे आनंदवन काढावे असे सुचवले होते. तसं आनंदवन प्रत्यक्ष अस्तित्वात आहे. आपण त्याला आनंदीवन म्हणूया. हे कोणी मुद्दामून निर्माण केलेलं नाही तर आपोआप घडत आलं आहे.

२. गे पुरुषाने घ्यायच्या खबरदार्‍या इथे सापडतील (इंग्रजी दुवा). अरेच्चा, या खबरदार्‍या तर वेश्येकडे जातांनापण घ्यायच्या असतात. होय मित्रांनो, गे बनणं हे वेश्येसारखंच आहे. का बरं? पुढचा मुद्दा पहा.

३. कारणकी गे पुरूष समूहात कपडे बदलावे इतक्या सहजपणे जोडीदार बदलले जातात. गे पुरूष इतके स्वैर का? एका गे नवयुवकाने हाच प्रश्न विचारला आहे. उत्तरांतून दिव्यज्ञान मिळेल (इंग्रजी दुवा).

ज्ञानी झालात? व्हेरी गुड. आता आनंदीवनाची सफर पुढे चालू ठेवूया.

४. आनंदीवनात रोगराईचा सुळसुळाट असतो. कुठली रोगराई ते कळलं असेलंच. बरेचसे गे पुरूष केवळ मजा मारावी म्हणून तसे झालेले असतात. अमेरिकन गे पुरुषांच्या आरोग्याची काय परिस्थिती आहे ते पहा (इंग्रजी दुवा).

५. गे लोकांबद्दल सहानुभूती दाखवायला म्हणून तोंडच्या वाफा दवडणं सोपं आहे. प्रत्यक्ष #वा#वीला सुरुवात झाली की रं#खान्यापेक्षा हालत खराब होते. का बरं? कारण की आनंदीवनात मुक्तहस्ते ड्रगचा वापर चालतो. कोणीही कोणाच्याही सुया वापरा. कसली सुई ते विचारू नका! आणि सुई म्हणजे काय हेही विचारू नका!!

ड्रगविरहित आनंदीवन हा केवळ कम्युनिस्ट युटोपिया आहे.

६. आनंदीवनाची अजून एक खासियत म्हणजे तिथली लोकसंख्या सतत कमी होत असते. जरा वय वाढलं की तुमची डिमांड आपोआप घसरते. त्यामुळे तिथे रिक्रूटमेंट ड्राईव्ह सतत ऑन असतो. शाळकरी मुलांच्या मनात आपल्या लिंगाविषयी गोंधळ उत्पन्न करण्यास जुने जाणते लोक एकदम तत्पर असतात. याच कारणापायी इंग्लंडमधल्या दोन शाळांत समरतींचे प्रवर्तन (प्रमोटिंग) करणे निषिद्ध ठरवले आहे (इंग्रजी दुवा).

कुण्या थेरड्या, थोराड, जरठ, निब्बर सांडसोट्यास गुदगुल्या व्हाव्या म्हणून तुमच्या गोजिरवाण्या मुलाचं शारीरिक, मानसिक, भावनिक भवितव्य उद्ध्वस्त करायचं का? मला या प्रश्नाचं उत्तर देण्यात अजिबात रस नाही. हा प्रश्न उद्भवू नये अशी परिस्थिती मात्र मला यायला हवीये.

७. एव्हढा सद्गुणसंपृक्त लोकसंग्रह ज्या कुणाला करायचा आहे त्याने खुशाल आनंदीवनी जावे. इतरांच्या उरावर गे आणून बसवू नयेत. भले त्यांच्या सवयी काहीही असोत.

पण म्हणून मी गे लोकांच्या विरुद्ध नाहीये. १९७३ साली अमेरिकन सायकीयाट्री असोसियेशनने गेगिरी हा प्रकार आजारांतून वगळला. तत्पूर्वी गे पणा मानसिक आजार होता, जो बरा करता येत असे अशी धारणा होती. अचानक १९७३ साली त्या विश्वस्तमंडळाने यात बदल केला. हा बदल करतांना कोणतीही वैज्ञानिक वा सांख्यिकीय पद्धतीद्वारे चर्चा केली गेली नव्हती. केवळ मतदानाने हा बदल केला.

म्हणून गेगिरी हा प्रकार पूर्वीप्रमाणेच आजार म्हणून समजला जावा. एक पीडित म्हणून माझी गे लोकांना सहानुभूती आहे. पण त्याकरिता त्यांना विशेष अधिकार वगैरे मिळणार नाहीत.

असो.

गे चळवळीच्या मागे कोण आहे ते मी सांगत बसत नाही. वाचकांची इच्छा असल्यास लिहीन.

आ.न.,
-गा.पै.

गापै, लिहाच. मला भिती होतीच की यातुन लहान मुलांचा छळ वाढेल... Sad पण पुरावा/उदाहरण माहीती नव्हतं.

Pages