'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

भारतात कलम ३७७अंतर्गत 'अनैसर्गिक' लैंगिक संबंध बेकायदेशीर आहेत. भारतीय कायद्यानुसार समलिंगी संबंध ठेवणंही अर्थातच बेकायदेशीर आहे. इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेला, दोन सज्ञान व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणारा, त्यांना गुन्हेगार ठरवणारा हा कायदा भारतात पाळला जातो.

काही वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं हा कायदा घटनाविरोधी ठरवला. या निकालाविरुद्ध अनेक धार्मिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल भारतात सर्वत्र लागू व्हावा, म्हणून काही सामाजिक संघटना आणि समलिंगी मुलामुलींचे एकोणीस पालकही न्यायालयात गेले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.

उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार्‍या पालकांपैकी एक होत्या श्रीमती चित्रा पालेकर. चित्रा व अमोल पालेकर यांची मुलगी शाल्मली समलिंगी आहे. ऑस्ट्रेलियात एका विद्यापीठात ती प्राध्यापक आहे. गेली अनेक वर्षं चित्राताई भारतात समलैंगिकांना गुन्हेगार ठरवलं जाऊ नये, त्यांना समान हक्क मिळावेत, यासाठी लढा देत आहेत.

२०१२ साली 'माहेर'च्या दिवाळी अंकात चित्राताईंनी समलैंगिकतेबद्दल एक लेख लिहिला होता. हा लेख प्रकाशित झाल्यावर अनेकांचे फोन, ईमेल आले. आपला मुलगा / मुलगी समलिंगी असल्याची शंका असणारे पालक, आपला मुलगा / मुलगी समलिंगी आहे, हे माहीत असणारे पालक हा लेख वाचून पुढे आले. भारतात अजूनही या विषयाबद्दल किती अज्ञान, भीती, संकोच आहे, हे या निमित्तानं लक्षात आलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आलेल्या प्रतिक्रियांमधूनही हे जाणवलं. समान हक्क नाकारणार्‍या या कायद्याच्या बाजूनं किती मोठा समुदाय उभा आहे, हे समोर आलं. म्हणूनच चित्राताईंनी लिहिलेला लेख इथे (सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही बदलांसह) पुन्हा प्रकाशित करत आहे.

CP and Shal.jpg

`माझा मुलगा जर समलिंगी असेल, तर समलैंगिकतेला वाईट समजणार्‍या पारंपरिक रूढ कल्पनाच साफ चुकीच्या, असं मी ठामपणे मानतो.'

एका ख्रिस्ती बिशपचे हे उद्गार. मुलानं स्वतःची लैंगिकता उघड केल्यावर त्याची निर्भर्त्सना करण्याऐवजी, त्याला नाकारण्याऐवजी, मुलावर विश्‍वास ठेवून त्याला पूर्ण पाठिंबा देताना काढलेले! दोन वर्षांपूर्वी ’स्ट्रेट पेरेंट्स्, गे चिल्ड्रन : कीपिंग फॅमिलीज टुगेदर’ असं लांबलचक शीर्षक असलेलं पुस्तक वाचताना ते शब्द माझ्या नजरेस पडले. एका धर्मप्रचारकानं त्याच्या धार्मिक नीतिनियमांची तमा न बाळगता अशी भूमिका उघडपणे घ्यावी, याचं खूप बरं वाटलं. त्याचबरोबर, वीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीनं ती लेस्बियन आहे, असं मला सांगितल्यावर मला काय वाटलं होतं, ते पुन्हा एकवार आठवलं.

त्या काळी समलैंगिकतेबद्दल मला फारशी माहिती नव्हती (आता साठीत असलेल्या माझ्या पिढीला स्त्री-पुरुष संबंधांबद्दलसुद्धा उघड बोलायला संकोच वाटे, तिथे समलैंगिकतेचं काय घ्या?). ही गोष्ट कधीच स्वप्नातदेखील न आल्यामुळे, मुलीनं तसं म्हटल्यावर मी चकित होणं साहजिक होतं, पण मी अजिबात हादरून वगैरे गेले नाही. वर उल्लेख केलेल्या बिशपप्रमाणेच मला वाटलं, की जर माझी मुलगी लेस्बियन असेल, तर ती गोष्ट वाईट असणं शक्यच नाही. लेक म्हणाली, ''तू काळजी करू नकोस. लैंगिकता ही गोष्ट सोडून बाकी सर्व बाबतींत मी अगदी तीच आहे... माझ्या जन्मापासून आत्ता, काही क्षणांपर्यंत मी जी होते, जिला तू जाणत होतीस तीच... तुझी शाल्मली". वास्तविक तिनं हे बोलून दाखवायची गरज नव्हती. तिच्या वागण्याबोलण्यात कुठलाच फरक नाही, हे मला स्पष्ट दिसत होतं. मी केवळ हलकंसं स्मित करून होकारार्थी मान हलवली. शाल्मली बरीच रिलॅक्स झाली.

''अम्मा, समलिंगी असणं हा आजार नाही, बरं का! हे व्यंग किंवा विकृतीदेखील नाही", लेक समजावत होती. "समलैंगिकतेला अनैसर्गिक मानणं तर साफ चुकीचं आहे. तू लहान असताना डाव्या हाताचा वापर वाईट मानला जाई, नाही का? बिचार्‍या डावर्‍या मुलींना पूर्वी फटके मारून उजव्या हातानं लिहा-जेवायला भाग पाडत, हे तूच मला सांगितलं होतंस, पण आज डाव्या हाताला मान्यता मिळाली आहे. त्याचा वापर अनैसर्गिक, असं कुणी म्हणत नाही. अशा लोकांचं प्रमाण कमी असतं. समाजातल्या बहुतेक लोकांहून ते वेगळे असतात, पण त्यांच्या कृती नैसर्गिकच मानल्या जातात. समलिंगी असणं हे एका परीनं डावरं असण्यासारखंच आहे.''

''समाजात बहुतांश लोकांची लैंगिकता स्त्री-पुरुष संबंधाशी निगडित असते. त्यांच्या तुलनेत समलिंगी लोकांची संख्या कमी; पण ते बहुतेकांपेक्षा वेगळे आहेत म्हणून समाजानं त्यांच्यावर अनैसर्गिक असा शिक्का मारणं योग्य आहे का? खरंतर लैंगिकता केवळ बायोलॉजिकल फॅक्ट आहे. डोळ्यांच्या रंगांप्रमाणे. सर्व माणसांचे डोळे जसे एकाच प्रकारचे असत नाहीत - काळे, निळे, राखाडी असे वेगवेगळ्या रंगांचे असतात, त्याचप्रमाणे लैंगिकतादेखील केवळ एकाच प्रकारची - स्त्री-पुरुषसंबंधी नसते. समलैंगिकता हे ऐतिहासिक वास्तव तर आहेच. त्याशिवाय आता समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, तसंच जीवशास्त्रीय संशोधनांतून या विषयावर अधिकाधिक प्रकाश पडत चाललाय आणि अशा सगळ्या अभ्यासांतून जो निष्कर्ष निर्विवादपणे निघालाय, तो हाच, की गे किंवा लेस्बियन (होमोसेक्शुअल) असणं हे स्ट्रेट (हेटेरोसेक्शुअल) असण्याइतकंच नैसर्गिक आहे.''

वीस वर्षांची माझी लेक तर्कशुद्ध विचार अतिशय सुसंगतपणे मांडत होती. वास्तविक मी व तिचे वडील अनेकदा तिच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर वाद घालत असू, चर्चा करत असू, पण आज केवळ तात्त्विक चर्चा होत नव्हती. तिच्या-माझ्यातला हा संवाद अतिशय नाजूक होता... आम्हां दोघींचं नातं, जवळीक पारखणारा, आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा होता. शाल्मली पोटतिडिकीनं बोलत होती, पण मधूनच अम्माला हे पटतंय का, अशी शंका तिच्या चेहर्‍यावर उमटून जात होती... कधी निराशेचा सूर डोकावत होता. मी तिला कुशीत घेऊन म्हटलं, ''तू मुळीच काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी सांगण्यापूर्वी तू जी माझ्यासाठी होतीस, तीच अजूनही आहेस... माझी लाडकी लेक. बस्स...'' आणि मग एकमेकींना मिठी मारून आम्ही खूप हसलो आणि थोडंसं रडलोसुद्धा. आपल्या वडलांना, जवळच्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना तिनं सांगितल्यावर सगळ्यांनी तिचा सहजपणे स्वीकार केला. माझ्यासारखंच सर्वांना वाटलं, तिचं-आपलं जे प्रेमाचं, आपुलकीचं नातं आहे, त्यात तिच्या लेस्बियन असण्यानं काय फरक पडतो? तो तिचा खासगी प्रश्‍न आहे! तिला आपल्या पुढच्या आयुष्यात सोबती म्हणून स्त्री हवी आहे, पुरुष नाही, इतकंच. सर्व जवळच्या, प्रिय लोकांनी स्वीकार केल्यामुळे माझ्या लेकीचं मानसिक बळ खूप वाढलं, यात शंका नाही. आज ती परदेशात एका महत्त्वाच्या विश्‍वविद्यालयात प्राध्यापक आहे. स्वतःच्या विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर तिचं खासगी जीवनदेखील अतिशय सुखी, समृद्ध आहे. याचं श्रेय तिच्या आत्मविश्‍वासाला आणि कर्तृत्वाला जातं, तिच्या सहचरणीच्या प्रेमाला जातं, तसंच तिच्या जवळच्या सर्व माणसांच्या पाठिंब्यालाही जातं, अशी माझी खात्री आहे.

''आपण लेस्बियन आहोत हे जाणवल्यावर तू लगेच मला का नाही सांगितलंस? मध्ये इतका काळ का जाऊ दिलास?'' मी लेकीला विचारलं. बालपणापासून कुठलीही गोष्ट तिनं माझ्यापासून लपवली नव्हती, पण या बाबतीत ती चार-पाच वर्षं गप्प राहिली, हे मला थोडंसं खटकलं होतं. ''मी तेव्हा चौदा-पंधरा वर्षांची असेन. एव्हाना माझ्या मित्रांना मुलींबद्दल आणि मैत्रिणींना मुलांबद्दल 'गुलुगुलु' वाटायला सुरुवात झाली होती. सगळे मला त्यांची गुपितं सांगत. आवडणार्‍या मुलीशी किंवा मुलाशी ओळख करून द्यायची विनंती करत! मी सगळ्यांची दोस्त! त्या वेळी माझ्या लक्षात आलं, की मला स्वतःला मुलांबद्दल निर्भेळ मैत्रीपलीकडे काही वाटत नाही... मी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. त्या वयात वेगळेपणाची भीती वाटते, तशी मलाही वाटली. मी लेस्बियन तर नसेन, अशी शंका मनात डोकावल्यावर तर फारच. अर्थात, हे सगळे शब्द तेव्हा माझ्या परिचयाचे नव्हते. माझ्या मनाचा गोंधळ उडाला. कुणाशी तरी बोलणं आवश्यक होतं, पण आजूबाजूच्या माणसांत कुणीही समलिंगी नव्हतं, किंवा कुणी असल्याचं मला माहीत नव्हतं. मी कुणाचा सल्ला घेणार?'' 'म्हणूनतर माझ्याकडे यायचंस ना...' असं मी म्हणणार, इतक्यात शाल्मली पुढे म्हणाली, ''तुझं व बाबांचं या विषयी नेमकं काय मत आहे, मला ठाऊक नव्हतं. आपल्या घरी अनेक कलात्मक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक विषयांवर चर्चा चालत, पण समलैंगिकतेचा कधी कुणी उच्चारही केला नाही. तुम्ही केवळ या विषयाकडे दुर्लक्ष करत होतात, की त्याच्या विरोधात होता, हे मला कसं कळणार? मी तुम्हांला सांगितलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हांला माझा राग येईल का... शरम वाटेल का... तुम्ही माझ्यापासून दूर जाल का... माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम कराल का? नाहीनाही त्या शंकाकुशंका मला सतावत होत्या. तुमच्यापाशी यायला मी धजावत नव्हते. याशिवाय अनेकदा अनेक ठिकाणी गे किंवा लेस्बियन माणसांबद्दल गलिच्छ कुजबूज, विनोद माझ्या कानी येत होते. अतिशय वाईट शब्दांत, अश्‍लील पद्धतीनं त्यांचा उल्लेख होताना मी ऐकलं होतं. क्लबमध्ये वा शाळेत नाजूक दिसणार्‍या मुलांना इतर मुलं किती वाईट वागवत, हे मी पाहिलं होतं. साहजिकच मी लेस्बियन आहे असं कळलं, तर माझ्याशी सगळे असंच वागतील, अशी भीती माझ्या मनात घर करून होती. हे सगळे धोके पत्करण्यापेक्षा गप्प राहणंच शहाणपणाचं होतं, नाही का?'' मी सुन्न होऊन तिचे अनुभव ऐकत होते.

काही क्षण गप्प राहून शाल्मली हसली आणि म्हणाली, ''पण गंमत म्हणजे जसजशी मी मोठी झाले, तसतसं माझ्या लक्षात आलं, की 'आपल्यात काही कमी आहे, तिरस्कार वाटण्यासारखं आहे, आपलं मन गलिच्छ आहे' असलं काही मला अजिबात वाटत नाहीये. मी मित्रमैत्रिणींपेक्षा 'वेगळी' असेन पण माझ्यात कमतरता मुळीच नाही. उलट अभ्यास, खेळ, गाणं सगळ्यांत मी पुढेच आहे. हळूहळू या विषयावरचे अभ्यासपूर्ण निबंध, लेख वाचायला मी सुरुवात केली. त्यावर विचार करायला लागले. माझा आत्मविश्‍वास बळकट झाला आणि वाटलं, अम्मा-बाबाला सांगायला का घाबरावं? शेवटी तुम्हीच तर मला सत्याची चाड धरायला शिकवलं होतं. निर्भय होण्याचे धडे दिले होते. शिवाय लेस्बियन असण्यानं मी कुणाचंही वाकडं करत नव्हते, कुणालाही इजा करत नव्हते! हो ना?''

उत्तरादाखल मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. माझ्यापाशी शब्द नव्हते. आईच्या नात्यानं मी तिच्या सर्वांगीण वाढीची सदैव काळजी घेतली होती. प्रत्येक बाबतीत तिला प्रोत्साहन दिलं होतं, पण जेव्हा तिच्या किशोरवयात तिला समलैंगिकतेची, स्वतःच्या 'वेगळेपणा'ची जाणीव झाली आणि ती गोंधळून गेली, तेव्हा तिला माझ्या मायेची, आधाराची खरी गरज होती आणि नेमकी तेव्हाच, मुलीची हेटेरोसेक्शुअ‍ॅलिटी गृहीत धरण्याची चूक केल्यामुळे मी कमी पडले होते!

समलैंगिकता मुलीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा घटक आहे, हे कळल्यावर त्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटली. मी तिला प्रश्‍न विचारायला, शंका बोलून दाखवायला सुरुवात केली आणि तीदेखील मनमोकळेपणानं, कसलाही संकोच न करता समजावून देऊ लागली. लेख, पुस्तकं वाचायला देऊ लागली. पुढे बर्‍याच समलिंगी स्त्री-पुरुषांशी माझी ओळख झाली, अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली. या सर्व प्रयत्नांतून, पूर्वी धूसर असलेलं समलैंगिकतेचं विश्‍व हळूहळू माझ्यापुढे साकार होऊ लागलं. समाजात त्यांच्याबद्दल ज्या समजुती प्रचलित आहेत, त्यांत वास्तव किती, दंतकथा किंवा फोल कल्पना किती, हे स्पष्ट व्हायला लागलं.

***

माझी या जगाशी ओळख झाली त्या वेळी म्हणजे १९९०च्या दशकात, समलैंगिकतेबद्दल भारतात सर्वसाधारणपणे प्रतिकूल वातावरण होतं. शतकानुशतकं ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांचा आवाज दडपला गेला, हक्क हिरावले गेले अशा दलित, स्त्रिया, आदिवासी इत्यादी घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वतंत्र भारताच्या चाळीस वर्षांत संघटना उभ्या राहिल्या होत्या, चळवळी सुरू झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोडीनं खुल्या विचारांचे बुद्धिजीवी, कलाकार, पत्रकार यांत भाग घेत होते. सरकारवर दबाव आणत होते. अल्पसंख्याकांच्या प्रश्‍नांबद्दलही त्या सर्वांना सहानुभूती वाटत होती. आणीबाणीनंतर घटनेत नमूद केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी व प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांविषयी समाजात अधिक जागरूकता होती; पण समलैंगिक मात्र अल्पसंख्य, अन्यायाचे बळी असून, त्यांचे मूलभूत हक्क हिरावले गेले असूनदेखील उपेक्षित व अंधारात राहिले. एकदा स्त्रीमुक्ती चळवळीशी संबंधित एका प्रसिद्ध कार्यकर्त्रीला ''तुम्ही स्त्रियांच्या प्रश्‍नांबरोबर लेस्बियन्सचे प्रश्‍नही हाती घेता का?'' असं मी विचारलं. यावर त्या बाई म्हणाल्या, ''छे! तो तर वरच्या वर्गातल्या बायकांचा प्रश्‍न आहे. आम्ही ज्या बायकांबरोबर काम करतो, त्यांचा नाही.'' ही त्यांची समजूत साफ चुकीची होती, हे अर्थात मला पुढे कळून चुकलं. (आज मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्रीमुक्ती चळवळीत काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्या एलजीबीटी चळवळींत सक्रीय सहभाग घेतात.) वास्तविक समलैंगिकता दुनियेतल्या सर्व वंशांत, खंडांत, आर्थिक घटकांत, सामाजिक स्तरांत, जाती-जमातींत, तसंच धर्मांत सापडते. पाश्‍चात्त्य-पौर्वात्य, श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण अशा सगळ्या समाजात अस्तित्वात आहे. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत.

समलैंगिकता मूळ भारतीय नाही, तर ती पाश्‍चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आली, असं आपले संस्कृतिरक्षक सांगतात; पण तेही खरं नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीत समलैंगिकता प्रचलित असल्याचे पुरावे पुरातन शिल्पांमध्ये व ग्रंथांमध्ये संशोधकांना सापडले आहेत. उलट ज्या नीतिमत्तेच्या कल्पनेतून समलिंगी लोकांवर हल्ला चढवला जातो, ती बुरसटलेली नीतिमत्ता राणी व्हिक्टोरियाच्या काळात आपल्यावर लादली गेली, तेव्हा खरंतर ही नीतिमत्ताच पाश्‍चात्त्य आहे!

समलैंगिकांबद्दलच्या चुकीच्या कल्पनांची यादी लांबलचक. अशी माणसं ठरावीक (बायकी?!) क्षेत्रांत वावरतात, ही अशीच एक गैरसमजूत! वास्तविक, समलिंगी माणसं कुठल्याही क्षेत्रात सापडतील. ती डॉक्टर, इंजिनीअर, वैज्ञानिक, राजकीय पुढारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, पत्रकार, खेळाडू असे कुणीही असू शकतात. पोलिस, सैन्य वगैरे 'पुरुषी' क्षेत्रांतदेखील ही माणसं आढळतात. कला, फॅशन, जाहिरात यांत वावरणारे अनेकदा ओळखू येतात. प्रस्थापित क्षेत्रांत, करीअरवर घाला येऊ नये म्हणून बहुतेक जण समलैंगिकता लपवतात. देशातला समलैंगिकतेबद्दलचा कायदा, समाजातली सहिष्णुता यांवर या लोकांचं 'प्रकाशात येणं' बरंच अवलंबून असतं.

इतिहासात अनेक प्रसिद्ध समलिंगी व्यक्ती होऊन गेल्या. उदा. 'मोनालिसा' या प्रख्यात चित्राचा जनक लिओनार्दो दा विंची. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र, विज्ञान अशा सर्व तर्‍हेच्या विषयांतलं त्याचं श्रेष्ठत्व आज सहाशे वर्षांनंतरदेखील अबाधित आहे; पण त्याच्या काळात (पंधराव्या शतकात) इटलीतल्या कायद्याप्रमाणे, समलिंगी असल्याच्या आरोपावरून त्याला त्रास देण्यात आला, धार्मिक चित्र रंगवण्यास मनाई करून त्याचा अपमान करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात ऑस्कर वाइल्ड या थोर आयरिश लेखक-नाटककाराला तो समलिंगी असल्याचं उघडकीला आल्यावर व्हिक्टोरियन कायद्यानुसार तुरुंगवास भोगावा लागला; पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मार्टिना नवरातिलोवा या प्रसिद्ध टेनिसपटूनं आपण लेस्बियन असल्याचं जाहीर केलं, तेव्हा अनेकांच्या भुवया जरी वर गेल्या, तरी तिला क्रीडाजगतात (आणि त्याबाहेरही) मानाची वागणूकच मिळाली. आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच व्हिक्टोरिया राणीचा वंशज प्रिन्स विलियम याच्या लग्नसोहळ्यात एल्टन जॉन हा प्रसिद्ध समलिंगी गायक व्हीआयपी पाहुणा म्हणून आमंत्रित केला गेला!

आपल्या देशात 'इंडियन पीनल कोड कलम ३७७' खाली समलैंगिकता हा गुन्हा आहे. 'लैंगिक क्रियेचा एकमेव हेतू 'गर्भधारणा व त्यातून प्रजोत्पत्ती' हाच असायला हवा आणि म्हणून, केवळ सुख-समाधान देणारी लैंगिकता पाप आहे', असं मानणार्‍या सनातन धार्मिक विचारांतून, तसंच व्हिक्टोरियन काळातल्या संकुचित नीतिमत्तेतून या कलम ३७७चा उगम झाला. कायद्याच्या पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांना पुष्टी मिळाली. समाजानं समलैंगिकांना वाळीत टाकलं. धर्म आणि समाज यांच्या दडपणाखाली कुटुंबीय आपल्या समलिंगी मुलांना नाकारायला लागले, लैंगिकता उघड झाल्यास नोकरी मिळणं मुश्किल, समाजात अवहेलना, वर कुटुंबाचा आधारही नाही! एखादा पुरुष 'गे' असल्याची नुसती शंका जरी आली तरी इतर पुरुषांकडून मारहाण, छळ, बलात्कार होण्याची शक्यता असे. असे समलिंगी पुरुष पोलिसांच्या अत्याचाराचेही वारंवार बळी होत, पण कायदाच प्रतिकूल असल्यावर दाद कुणाकडे मागणार?

लेस्बियन बायकांची कमीजास्त फरकानं अशीच स्थिती होती, पण यांना कुटुंबीयांचीच जास्त भीती होती. आपल्या पुरुषप्रधान समाजात मुलींची किंमत कमीच. मुलींच्या नियमबाह्य वागण्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला किंचित जरी धक्का बसला, तरी मुलीला कठोर शिक्षा करायला (प्रसंगी तिची हत्या करायला) घरचे पुरुष मागेपुढे पाहायचे नाहीत. स्ट्रेट मुलींची ही गत, तर लेस्बियन मुलींना वाली कुठून असायचा? अशा अनेक कारणांमुळे समलैंगिकतेभोवती अंधार पसरला; त्यांच्याविषयी सच्ची, वस्तुनिष्ठ माहिती मिळणं मुश्किल झालं आणि परिणामी चुकीच्या कल्पना, गैरसमजुती वाढत गेल्या. हे दुष्टचक्र चालत राहिलं आणि त्यातून समलिंगी मुलं आईबापांच्या प्रेमाला मुकली, स्वाभिमानास पारखी झाली, खरं रूप लपवावं लागल्यामुळे अस्मिता गमावून बसली, दुहेरी जीवन जगू लागली. अनेकदा त्यांच्यावर लग्नाची सक्ती झाल्यामुळे, त्यांचं स्वतःचं, तसंच त्यांच्या वधू/वराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.

२००९ साली दिल्ली उच्च न्यायालयानं ३७७ या कलमात बदल करून सम व अन्य लैंगिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं. न्यायालयाचा निकाल होता- 'दोन प्रौढ समलिंगी व्यक्तींचा परस्पर संमतीनं खासगीत केलेला संग गुन्हा नाही.' कायद्यातल्या या अतिशय महत्त्वाच्या बदलामुळे देशातल्या एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्ससेक्शुअल) लोकांत चैतन्याची लाट पसरली, त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. यांच्या विरोधात सनातन विचारांचे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा समलैंगिकांना सहानुभूती दर्शवणारे लोक वेगवेगळ्या शहरांतून, निरनिराळ्या क्षेत्रांतून खूप मोठ्या संख्येत पुढे आले. त्यात वकील, प्राध्यापक, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ अशांचा समावेश होता. अनेक तज्ज्ञांनी ऐतिहासिक, वैद्यकीय दाखले देऊन समलैंगिकतेच्या बाजूनं शपथपत्रं न्यायालयात सादर केली. एक महत्त्वाचं शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलं ते एकोणीस आईबापांनी- ज्यांत मीही होते- आपल्या मुलांवर आजपर्यंत (म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानं कलम ३७७मध्ये बदल करण्यापूर्वीपर्यंत) कसा अन्याय झाला,त्यांना मानसिक, प्रसंगी शारीरिक छळ समाजात कसा सहन करावा लागला, आई-बाप या नात्यानं आमची कशी घुसमट झाली अशा अनेक गोष्टी त्यात मांडल्या होत्या. त्याचबरोबर लैंगिकता ही आमच्या मुलांची खासगी बाब आहे. त्यामुळे आमच्या मुलांत काहीही कमी आहे, असं आम्हाला वाटत नाही. ते सगळ्या बाबतींत आदर्श नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगार मानणं अन्याय्य आहे. आमच्या मुलांना त्यांचे घटनांतर्गत हक्क मिळायला हवेत आणि त्यासाठी कलम ३७७मधला बदल अत्यावश्यक आहे, हे आम्ही ठामपणे शपथपत्रात लिहिलं.

आमच्या या कृतीचा खूप मोठा परिणाम झाला. आई-बापांनी विरोधकांना न भिता उघडपणे मुलांची बाजू घ्यावी, त्यांच्या व आपल्या भावना व्यक्त कराव्यात, हक्कासाठी झगडावं, याचं अनेकांना आश्‍चर्य वाटलं, कौतुक वाटलं. तशातून टीव्ही, वर्तमानपत्रं, मासिकं यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या (किंवा केवळ अश्‍लीलतेच्या संदर्भात उल्लेख झालेल्या!) समलैंगिकतेची बाजू उचलून धरली. आई-बापांच्या, मुलांच्या मुलाखती, मान्यवर तज्ज्ञांबरोबर चर्चा, लेख, इत्यादींमधून या लोकांची वस्तुस्थिती, त्यांचे अनुभव, या विश्‍वाबद्दलची शास्त्रोक्त माहिती समाजातल्या इतर लोकांपर्यंत पोचू लागली. समाजातल्या सहानुभूतीचा ओघ काही अंशी वाढला.

आता दरवर्षी निरनिराळ्या शहरांत एलजीबीटी लोकांचे, त्यांच्याबद्दल सहानुभूती असणार्‍यांसह मेळावे भरतात, सार्वजनिक जागेत कार्यक्रम होतात, मिरवणुका निघतात. आई या नात्यानं मी अशा बर्‍याच गोष्टींत भाग घेतला आहे. भोवती जमलेल्या बघ्यांच्या चेहर्‍यावर नवल असतं, कुतूहल असतं; पण तिरस्कार मात्र मी आजकाल कधी पाहिलेला नाही. दगडफेक, अश्‍लील शेरे असलंही काही अनुभवलेलं नाही. तेव्हा एकूण वातावरण बर्‍याच अंशी निवळलंय. निदान मोठ्या शहरांत तरी होमोफोबिया कमी झालाय, यात शंका नाही; पण उत्साहाच्या भरात हे विसरून चालणार नाही, की गुन्हेगारीचा ठप्पा पुसला जाणं ही निव्वळ पहिली पायरी आहे. एलजीबीटींना त्यापुढेही खूप मजल मारायची आहे. नागरिक या नात्यानं लागू होणारे भारतीय संविधानातले सगळे हक्क मिळवायचे आहेत. नोकरी, आईवडलांची मालमत्ता, आर्थिक मदत अथवा सरकारी कर्ज इत्यादी बाबतींत समलैंगिकतेवरून भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होऊ नये, यासाठी जागरूक राहायचं आहे. समलिंगी जोडीदाराला साहचर्याचे हक्क मिळावेत, समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' मानलं जावं, या जोडप्यांना मुलं दत्तक घेता यावीत, अशा अनेक गोष्टींत कायदेशीर तरतुदी करून घ्यायच्या आहेत. निव्वळ मोठ्या शहरांतच नाही, तर छोट्याछोट्या गावांतही समलैंगिकांना स्वीकारलं जावं, यासाठी झटायचं आहे. परंतु या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या आईवडलांची, भावाबहिणींची, जवळच्या इतर कुटुंबीयांची मानसिकता पालटून, त्यांचा मनापासूनचा पाठिंबा मिळवायचा आहे.

आज समलैंगिकतेविषयीचं संशोधन खूप पुढे जात आहे. समलिंगी असणं म्हणजे पाप आहे, अनैसर्गिक आहे इत्यादी कल्पना चुकीच्या असून, त्या निव्वळ अज्ञानातून उद्भवल्या आहेत, असं मत तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केलं होतं (आणि माझ्या मुलीनं ते वीस वर्षांपूर्वी मला सांगितलंही होतं). त्याच्यापुढे जाऊन हल्ली वैद्यकीय संशोधनातून हेही सिद्ध झालं आहे, की 'सम अथवा विषम लैंगिकता जन्मतःच निश्‍चित होते.' जन्मतः निश्‍चित झालेली, नैसर्गिक समलैंगिकता ही 'बायोलॉजिकल फॅक्ट' असेल, तर 'आईवडलांना पसंत नाही, समाजाला पटत नाही' असल्या कारणांवरून ते बदलणं कसं शक्य आहे? अशा मुलांवर दडपण आणून, त्यांना साधूंच्या पायांवर घालून, अंगारे लावून, किंवा एखाद्या पैसेखाऊ डॉक्टरकरवी शॉक ट्रीटमेंट देवऊन त्यांची समलैंगिकता नाहीशी होईल, असं मानणंदेखील साफ चुकीचं आहे. खरी लैंगिकता लपवून, खोटं जीवन जगायला भाग पाडल्यास मुलं दुःखी होतात, तणावाखाली जगतात, कधी आत्महत्या करतात. अनेकदा तर आपल्या दबल्या लैंगिकतेला कसा ना कसा वाव देण्याच्या प्रयत्नांत रोगांची अथवा नीच लोकांची शिकार बनतात.

याउलट, आज उपलब्ध असलेल्या आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा/माहितीचा आधार घेऊन आईबापांनी जुन्या, चुकीच्या कल्पनांना तिलांजली दिली, तर त्यांना कौटुंबिक/सामाजिक विरोधाची काळजी करण्याचं कारण उरणार नाही. आपल्या समलैंगिक मुलांना तोडून, त्यांचं जीवन नष्ट करण्याऐवजी आईबाप त्यांचा मनापासून स्वीकार करू शकतील. आपल्या इतर मुलांसारखंच प्रेम व आधार त्यांना देऊ लागतील. अशा स्वीकृतीमुळे मुलंही आनंदानं जगतील, कर्तृत्ववान होऊ शकतील. समलैंगिकांना आईबापांचा पाठिंबा लाभल्यास, समाजाच्या मुख्य धारेत सामावलं जाणं त्यांच्यासाठी मुळीच अशक्य नाही, अशी माझी खात्री आहे.

***

समलैंगिक मुला-मुलींच्या पालकांना, किंवा समलिंगी मुलामुलींना काही शंका असतील, किंवा संवाद साधायचा असेल तर श्रीमती चित्रा पालेकर यांच्याशी parents@queer-ink.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल. तुमचा पत्रव्यवहार, तुमची ओळख यांबाबतीत संपूर्ण गोपनीयता पाळली जाईल.

***
विषय: 
प्रकार: 

<जसं बाबा आमटेंनी आनंदवन बनवलं> काय सुचवताय? सगळ्या समलैंगिकांनी बाकीच्या समाजापासून दूर व्हावे, रहावे? कोणालातरी समलैंगिकतेची कुष्टरोग्यांशी तुलना झालेली आवडली नव्हती.

आंदोलन कलम ३७७ रद्दबातल करावे यासाठी आहे. ते कलम कायम ठेवण्यासाठी सरकारने एक मुद्दा :समाज अजून या गोष्टींसाठी तयार नाही असाही मांडला होता.

समाज स्त्रीशिक्षणासाठी, अस्पृश्यतानिवारणासाठी, सतीबंदी, बालविवाहबंदीसाठी कधी तयार होता? या मागण्या करणार्‍यांवर समाजाने फुले उधळली होती का?

कलम ३७७ च्या बाबत किमान आंतर्जालीय जगात समाज बहुसंख्येने कायद्याच्या पुढेच आहे, त्यांना हे कलम रद्दबातल झालेले हवे आहे असे चित्र अनेक ऑनलाइन सर्वेक्षणांतून दिसलेले आहे.
काही राजकीय पक्षांनी याला पाठिंबा दिलेला आहे (जसा काहींचा विरोध आहे-विरोध करणारे पक्ष अन्य मुद्द्यांवरही सनातनी असल्याचे दाखले आहेत)

वैज्ञानिक सत्य पटवून घेण्याबद्दलचा विरोध सिलेक्टिव्ह असू शकतो हे मान्य आहे का?

जनसंख्येच्या दहा टक्के लोक समलैंगिक असतात असे काही अभ्यासक मानतात. उभयलिंगींची संख्या बरीच जास्त आहे. या समलैंगिकांचे आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे मत (व्होट) निवडणुकीत निर्णायक ठरू शकते.

समलैंगिकता समाजानं स्विकारण्याची गरज आहे. ती स्विकारणे म्हणजे तुम्ही कंपलसरी समलैंगिक संबंध प्रस्थापित करणे नव्हे. तर काही व्यक्तींचे सेक्शुअल ओरिएंटेशन आपल्या पेक्षा वेगळे असू शकते याला मान्यता देणे. बस.>>+११११

तर काही व्यक्तींचे सेक्शुअल ओरिएंटेशन आपल्या पेक्षा वेगळे असू शकते याला मान्यता देणे.

आपली संपूर्ण मान्यता आहे.

फक्त ती गोष्ट आवडत नाही हे सांगण्याचा माझा हक्क अबाधित रहावा इतकेच माझे म्हणणे.

फक्त ती गोष्ट आवडत नाही हे सांगण्याचा माझा हक्क अबाधित रहावा इतकेच माझे म्हणणे.>> पण त्याच्यावर कोण गदा आणतंय? Uhoh

विकृत आहे, अनैसर्गिक आहे, त्यासाठी शिक्षा- तुरुंगवास/ दंड, सामाजिक बहिष्कार - हे सगळं अन्वॉन्टेड आहे. त्यासाठी समाज प्रबोधन आवश्यक आहे आणि काही प्रमाणात असलेल्या कायद्यात बदलही.

फक्त ती गोष्ट आवडत नाही हे सांगण्याचा माझा हक्क अबाधित रहावा इतकेच माझे म्हणणे. <<
आवडत नाही आणि मला जे आवडत नाही ते चूकच म्हणून गुन्हा या दोन गोष्टींमधे फरक आहे.

समलैंगिक व्यक्तीला माणूस म्हणून सर्व सामाजिक अधिकार असायला हवेत यामधे समलैंगिकता आवडते किंवा नाही याचा संबंध कसा आणि कुठून आला?
आणि आवडो नावडो फरक काय पडतो. तुम्हाला कोणी समलैंगिक वर्तन करायला भाग पाडत नाहीये.

मायबोलीकर मित्रहो ,

वरील लेख आणि प्रतिक्रिया वाचल्या. मला कोणत्याही वादविवादात भाग घ्यावयाचा नाही पण अनेक वर्षे मानवी शरीरांचा आणि मनाचा अभ्यास केल्यानंतर वाटलेले काही विचार मांडू इच्छितो,

१. लैंगिक जीवन प्रत्येक व्यक्तीची अतिशय खाजगी बाब आहे.
२. पती-पत्नी हे केवळ कांही क्षणांचे पतीपत्नी पण आयुष्यभराचे सहचारी असतात, मित्र असतात. दोन व्यक्तींना एकमेकांविषयी प्रेम आणि आस्था वाटली आणि त्यांनी एकत्र राहण्याचे ठरविले तर समाजाला काय अडचण वाटावी? असा त्यांनी काय गुन्हा केलाय कि त्यांना तुरुंगात टाकावे? तुरुंग, शिक्षा यांचा उद्देश त्या व्यक्तीपासून समाजाला धोका होवू नये व त्यात समाजाला अपेक्षित अशी सुधारणा व्हावी असाच आहे ना? कि त्यांना 'पुण्यवान' लोकांनी दगडांनी ठेचावे ?
३. समलैन्गिकता हि काही वेळा एक तडजोड, एक शारीरिक गरज असते. कुरूप बदक ही वस्तुस्थिती तर राजहंस ही एक कल्पना, फ्यानटसी असते.

जरी मुठभर असली तरी ती तुमच्या माझ्यासारखी माणसेच आहेत ना ?
कायद्याच्या चौकटीतून बाहेर येवून या प्रश्नाकडे माणुसकीच्या चष्म्यातून पाहण्याची गरज आहे.

-----
कोर्टाचा निकाल वाचल्यापासून कोठेतरी काही तरी चुकते आहे असे वाटत होते. या चर्चेमुळे त्याला व्यक्त स्वरूप मिळाले. धन्यवाद !

<एवढेच वाटत असेल तर पालेकरांसारख्या लोकांनी पण एक वेगळे "आनंदवन" उभारावे अशा लोकांसाठी.>

माफ करा महेश, पण हे वाक्य वाचून अतिशय वाईट वाटलं. असं काही कधी ऐकावाचावं लागेल, हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. 'आनंदवन बंद होईल, तो आमच्या आयुष्यातला सर्वांत आनंदाचा दिवस, पण पुढची शंभर वर्षंतरी हा आनंद आम्हांला मिळणार नाही', असं विकास आमटे का म्हणतात, ते नीट कळलं.

भारतीय समाजात प्रत्येकाला ताठ मानेनं जगता यायलाच हवं. आमटे किंवा पालेकर यांनी उभारलेल्या आनंदवनांमध्ये का कोणी जाऊन राहावं? हा देश त्यांचा नाही? या देशात त्यांचा जन्म झाला आहे.

अशोक, ती समलैंगिकांच्या मानवी हक्कांची पायमल्ली आहे. संयुक्त राष्ट्रांची , जागतिक आरोग्य संघटनेची भूमिकाही यापेक्षा वेगळी आहे.

मुळात धर्माला माणसाच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करायचे काय कारण आहे ते मला कळलेले नाही. तरीही....नव्य पोपनी समलैंगिकतेबद्दल वेगळी भूमिका घेतलेली आहे.

पण त्याच्यावर कोण गदा आणतंय?

अरेच्च्या मग एवढा वेळ मी काय म्हणतोय? याबाबत विद्यापीठात कुठेही चर्चा सुरु झाली की समर्थक मंडळी हे ऐकुनच घेत नाहीत. धडाधड तोंडावर उदाहरणं फेकायला लागतात. महाभारत काय, बृहन्नडा काय, काही विचारुच नका. मला तर विद्यार्थ्यांनी कँटीनमध्ये घेरुन याबद्दल तिटकारा व्यक्त केल्याबद्दल जाब विचारला होता.

>>विश्व हिंदू परिषदेचे सिंघल, बाबा रामदेव, जमाईते उलीमा, कॅथेड्रल चर्चचे प्रवक्ते

कामे नसावीत बहुदा. अन्यथा लोकांच्या बेडरूममध्ये चोम्बडेपणाने नाक कशाला घालायचे ?

अतुल ठाकुर,
समलिंगी संबंधांबद्दल तिटकारा व्यक्त करताना समलिंगी व्यक्तींबद्दल तिटकारा व्यक्त करणं, असं तर होत नाहीये ना? Happy

"Banning same-sex marriage is like going to a restautant and saying "Waiterm cancel that man's order. I simply don't enjoy the variety of pasta he is getting."

And using religion to justify banning same sex-marriage is even worse! Its like staying in the restaurant and saying , "Waiter, cancel that man's order. My Diet book briefly mentions its downsides."

And frankly, who enjoys depriving others the joys of (food/love)?"

साभार स्वाती आंबोळे.

डॉ. सुरेश शिंदे, उत्तम पोस्ट.

एवढेच वाटत असेल तर पालेकरांसारख्या लोकांनी पण एक वेगळे "आनंदवन" उभारावे अशा लोकांसाठी >>>> निषेध. का? ते लिहितच होते तेवढ्यात चिनूक्सची पोस्ट आली.

Mahesh yanchya Anandvan sandarbhat nishedh! Atishay vait vaTale!

अतिशय छान लेख.
समजावून सांगणार्‍यांचे कौतुक वाटत आहे.
महेश तुमच्या आजूबाजूला असे लोक दिसले तर त्यांना असेच म्हणाल का ?

एवढेच वाटत असेल तर पालेकरांसारख्या लोकांनी पण एक वेगळे "आनंदवन" उभारावे अशा लोकांसाठी >>>> << फार वाईट दर्जाचे वाक्य. समलैंगिकच नव्हे तर आनंदवन या संकल्पनेचादेखील अपमान करणारे वाक्य.

तर काही व्यक्तींचे सेक्शुअल ओरिएंटेशन आपल्या पेक्षा वेगळे असू शकते याला मान्यता देणे.
आपली संपूर्ण मान्यता आहे.
फक्त ती गोष्ट आवडत नाही हे सांगण्याचा माझा हक्क अबाधित रहावा इतकेच माझे म्हणणे.
>>>> १००% सहमत. मी तेच म्हणतोय. आम्हाला आवडत नाही, तुम्हाला आवडते, तर तुम्ही करा. आम्ही त्याला नैसर्गिक म्हणो वा अनैसर्गिक, त्याचा काय फरक पडावा. आणि मी अगदी अनैसर्गिक म्हटलं तरी किळस वगैरे म्हणणार नाही, हा ज्याची त्याची खाजगी बाब आहे.
समलैंगिकांच्या कायदेशीर लढ्याला शुभेच्छा. {पाठींबा नसला, तरी लढ्याला विरोधही नाही}.

कलम ३७७ चे समर्थन (अरे, पण ते इथे कोणीच करत नाहीए , नाही का? Wink करणार्‍यांसाठी एक प्रश्न.
किंवा कलम ३७७ रद्द करा अशा आंदोलनांचा ज्यांना त्रास होतो त्यांच्यासाठी.

त्या कलमात समलैंगिक असा शब्द नाही. फक्त काही कृत्ये निसर्गनियमाच्या विरोधात जाणारी असल्याने ती गुन्हा ठरतात. अनेक भिन्नलिंगी जोडपी ही कृत्ये करून आनंद मिळवतात. त्याबद्दल आक्षेप असल्याचे दिसत नाही. मग दोन समलैंगिकांनी परस्पर संमती-सहकार्याने ती कृत्ये करून इतर कोणालाही कसलाही त्रास न देता आनंद मिळवला तर मात्र तो नेमका गुन्हा ठरतो (समाजाच्या नजरेत)

तर कायद्यातील ही संदिग्धता दूर करून विशिष्ट कृत्ये करणे हा गुन्हा असे म्हणण्यापेक्षा समलैंगिक प्रवृत्ती असणे हाच गुन्हा आहे अशा कायद्याची मागणी करावी का?

२) आदरणीय बाबा रामदेव यांच्या मते समलैंगिकता हा आजार आहे. योगोपचाराद्वारे ते तो बरा करू शकतात. मग अशा आजारी माणसाला तुरुंगात पाठवायला खरे तर त्यांनी विरोध केला पाहिजे.

छान आणि मुद्देसूद लेख
चिनूक्स..हा लेख ईथे प्रकाशित केल्याबद्दल आभार आणि हा मुद्दा ऐरणीवर आणल्याबद्दल अभिनंदन.

>>सौ पालेकरांनी त्यांची मुलगी समलिंगी नसती तर या 'लढ्याबाबत' काही आस्था दाखवली(च) असती असे मानायला काहीतरी वाव आहे का?<<
हे चित्रा पालेकरांविषयी नाही पण हि एकनॅचरल टेन्डेन्सीच आहे, जेव्हा आपला घरात घडतं तेव्हाच कळतं. उगाच ती म्हण नाही का आही, ज्याचा जळतं त्यालाच कळतं. त्याच्या आधी आस्था वाटण्याचा प्रश्णच येतच नसतो.

समलंगिकता किती वाईट असे जरी कोणी नाही म्हणालं व आपण किती ओपन आहे अशी मतं जरी मांडली तरी पण जेव्हा स्वतःचा मुलगा/मुलगी समलैंगिक निघाला/ली तर लोक गडब्डतातच हेच पाहिलय. ह्याचे कारण खरे तर अजून पारंपारीक पगडाच आहे ना लोकांवर. पण जोवर आप्लया घरात नाही घडत तोवर बुरखा पांघरून लोकं मत मांडतातच.

हे इथे मतं लिहिणार्‍यांविषयी नाही पण एक मिनिटं नुसता विचार करा, तुमचा मुलगा जर उद्या येवून तो समलैंगिक आहे असे डिक्लेअर केले तर किती जण सहज प्रतिक्रिया देतील किंवा काहीच नविन नाही म्हणून स्विकारतील? खरोखर हा प्रश्ण जरी विचारला तर समजेल त्यांना.

मला समलैंगिकता काहीच वाईट वाटत नाही. आपण आधीच तयारी ठेवलेली बरी.

मी आनंदवनाचे वाक्य लिहिले त्याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाही. का ते जरा उशिराने लिहू शकेन.
उलट मला आश्चर्य वाटत आहे की येथे अनेकांना ते खटकले.
बाबा आमटे आणि त्यांच्या कार्याचा आदर आहेच. त्याचा अनादर झाला आहे असे पण वाटत नाही.

झंपी, हा मुद्दा येणारच हे माहित होते. मागे सत्यमेव जयते च्या निमित्तानं प्रेमविवाह या विषयावर जी चर्चा झाली त्यातही प्रेमविवाहाच्या बाजूनं बोलणार्‍या लोकांना हाच प्रश्न विचारला गेला. त्याची उत्तर तुम्हाला इथे सापडतील.

हे असे प्रश्न विचारले जातात कारण आपल्यापेक्षा वेगळी मनोधारणा कोणाची असू शकते हे मान्य होत नाही असं आहे का? तुमच्यापेक्षा जास्त पुरोगामि भुमिका घेणारे स्युडो आहेत असं तुम्हाला वाटतं का? का बरं?

मी तिथे लिहिले होते तेच इथेही लिहित आहे की माझ्या मुलीच्या अशा बाबतीतल्या कोणत्याही निर्णयात मी आणि माझा नवरा दोघेही तिला पूर्णपणे साथ देऊ.

तुम्ही सांगा समजा तुमचा मुलगा / मुलगी समलैंगिक असतील तर तुम्ही कसे रिअ‍ॅक्ट व्हाल?

आवडत नाही आणि मला जे आवडत नाही ते चूकच म्हणून गुन्हा या दोन गोष्टींमधे फरक आहे

नक्कीच म्हणुन "आवडत नाही" येथे मला थांबायचंय. ते चुकच म्हणुन गुन्हा इथपर्यंत जाण्याचा प्रश्नच नाही. पण आवडत नाही म्हटल्याबरोबर माणसे "काय मूर्ख माणुस आहे" असंतरी किंवा कीव केल्याच्या दृष्टीने पाहु लागतात आजकाल. आणि लगेच महाभारत, बृहन्नडा, खजुराहो गाडी सुरु...

बरं हिजड्यांचे प्रश्न, क्रॉस ड्रेसर्स, बायसेक्शुअल्स, लेडीबॉईज, या सार्‍या गोष्टी समलिंगीयासक्तीपेक्षा वेगळ्या आहेत हे देखिल भान या लोकांना नसते. एखाद्या गोष्टीने "चार्ज" झाले की झाले. सर्व गोष्टींची सरमिसळ करुन समोरच्याला मुर्खात काढुन मोकळे. शिवाय या प्रश्नाच्या बाजुने बोललो की फुकटात मानवतावादी, उदार वगैरे बिरुदे मिरवता येतात ते वेगळेच.

कृपया राग मानु नये. पण विद्यापीठात आपल्या मित्रमंडळींमध्ये समलिंगी आहेत हे सांगण्याची "फॅशन" आलेली आहे. त्यात सहानुभुती किती आणि वेगळेपणाची ट्रॉफी मिरवण्याचा सोस किती हे ज्याने त्यानेच ठरवावे.

हे इथे मतं लिहिणार्‍यांविषयी नाही पण एक मिनिटं नुसता विचार करा, तुमचा मुलगा जर उद्या येवून तो समलैंगिक आहे असे डिक्लेअर केले तर किती जण सहज प्रतिक्रिया देतील किंवा काहीच नविन नाही म्हणून स्विकारतील? खरोखर हा प्रश्ण जरी विचारला तर समजेल त्यांना. <<
या प्रश्नांची उत्तरे याच विषयावरच्या चर्चेत माबोवरच लोकांनी देऊन झालीयेत.

<<या लेखावर आलेल्या काही प्रतिक्रिया वाचल्या आणी या लेखाचे महत्व आणी नितांत आवश्यकता माझ्या लक्षात आली. हा लेख माबोवर दरवर्षी प्रसिद्ध व्हायला हवा. इतरत्रही.>> +१०००००००००००

मयेकर, चिनूक्स आणि इतर शांतपणे समलैंगिकतेच्या बाजूने मुद्देसूद चर्चा करणारे - लगे रहो!!

मला वेळ झाला की आणखी येऊन लिहेन पुढच्या आठवड्यात. सध्या रुमाल

>>हे असे प्रश्न विचारले जातात कारण आपल्यापेक्षा वेगळी मनोधारणा कोणाची असू शकते हे मान्य होत नाही असं आहे का? तुमच्यापेक्षा जास्त पुरोगामि भुमिका घेणारे स्युडो आहेत असं तुम्हाला वाटतं का? का बरं?<<
मामी, तुम्ही खूपच घाई केलीत माझी पोस्ट नीट न वाचता व मुद्दा कळला असता का कुठल्या अर्थाने विचारतेय. त्या लिंका कशाला देताय हो? त्याच लिंकेवरची त्या विषयावरची माझी मतं वाचली असती तर... हे प्रश्ण नसते विचारले.
तरी खोडसाळपणे नाही विचारलत म्हणून उत्तर देते. आणि मुळात प्रश्ण मी डायरेक्टली असा तुम्हालाच विचारलाच न्हवता.

हे प्रश्ण मी विचारले कारण, जे लोकं इतकं पोटतिडिकीन इथे ओपन मताची असतात ते गडबडतात( दोन उदाहरणं पैकी एक एकलय व एक पाहिलय). कारणं त्यांची त्यांची मानसिकता, सामाजिक दडपण. अजून समाजात हे स्विकारायला नसलेली तयारी. लोकं स्वतःवर वेळ आली की वेगळेच वागतात ,खास करून ह्या बाबतीत पाहिलय म्हणून विचारले की, उद्या तुमचा मुलगा/मुलगी असे सांगेल तेव्हा तुम्ही खरेच तयार असाल ना?
जर उत्तर हो असेल तर आनंदच आहे(उपहासाने नाही).

मला तुम्ही जो प्रश्ण विचारलात, मी आधीच उत्तर दिलेय की, ते वाचल असतं नीट तर कळले असते ना. पुन्हा शेवटची ओळ वाचा पाहू माझ्या आधीच्या पोस्ट मधली.

---------------------------------

दुसरे म्हणजे, जे समलंगी संबधाना इतके तीव्र कयद्याने विरोध करताहेत त्यांना,
त्यांनी सुद्धा हि तयारी केलेली बरीच की उद्या तुमचे मूल तुम्हाला काय सांगेल येवून तर काय होउल म्हणून. उगाच इतका विरोध महागात पडायचा.

समलैंगीकांना समाज स्विकारेल याला अनेक वर्षे जावी लागतील. तो पर्यंत काय ? समजा एखाद्या कुटुंबात एक मुलगी / मुलगा समलैगीक आहे. तिच्या /त्याच्या पार्ट्नर बरोबर ह्या कुटुंबियांनी कसा व्यवहार करावा ? कितीही पुरोगामी कुटुंबाला हा प्रश्न पडणारच. खास करुन मध्यम वर्गियांना.

कदाचित लोकसभा/ राज्यसभा वेगाने हा कायदा पास करुन तांत्रीक अडचण संपवेल. पण सामजिक स्तरावर लोक लगेच मान्य करतील ? अजुनही हरियाणात जातीबाहेर लग्न करणार्‍यांना काय शिक्षा झाली हा इतिहास ताजा आहे.

केवळ एकच कायदा बदलुन संपणार नाही. आजतरी हे समलैगीकांचे विवाह ( परदेशात ) होतात. उद्या अश्या विवाहांना कायद्याने मान्यता हा प्रश्न भारतात निर्माण होईल. त्यापुढे वारसा हक्क एक ना दोन.

दोन्ही बाजू वाचल्या.
भारतात असे संबंध कायदेशीर होतील याची शक्यता फारच कमी दिसतेय. पण कायदेशीर मान्यता हवीच आहे तशी निकड आहे असेही मला वाटत नाही.

दत्तक घेण्यासाठी विवाहीत असण्याची अट नाही. मालमत्ता कुणीही कुणाच्याही नावे करू शकतो. जिवंतपणी
किंवा मृत्यूनंतर देखील. एकत्र राहण्यासही कायद्याची हरकत नाही. ( तसे लोक रहातही आहेत. )

मग सामाजिक मान्यतेवाचून काय अडलंय ? समाजापुढे ( सार्वजनिक ठिकाणी ) प्रेमाचे प्रदर्शन करणे तसे स्त्रीपुरुष संबंधातही कायदेशीर नाही.

मग नेमकं काय हवंय ? आणखी कुठल्या अडचणी आहेत ?

Pages