सचिन फॅन क्लब

Submitted by फारएण्ड on 27 November, 2013 - 01:49

सचिन च्या मॅचेस, व्हिडीओ क्लिप्स, स्कोअरकार्ड्स चे संदर्भ देऊन त्याबद्दल फॅन-टॉक करण्यासाठी हा धागा उघडला आहे. बे एरियात आज ही चर्चा सुरू असताना इतरांनाही ती दिसावी व लिहीता यावे यासाठी. तुम्हीही लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन च्या खेळी लाईव्ह बघताना जे काही आतून वाटायचं तसं पुन्हा कधीच नाही वाटलं. ते वयच तसं होतं असं फार तर म्हणता येईल. पण फारएण्ड ने पुनःप्रत्ययाचा आनंद मिळवून दिला. धन्यवाद फारएण्डा.

लोकहो, धन्यवाद प्रतिक्रियांबद्दल. मधे फोकस नसल्याने बराच काळ लिहू शकलो नाही. आता पुढचा भाग टाकत आहे थोड्याच वेळात.

८. मार्च २००५ ते एप्रिल २००७
भाग #१

यापुढच्या दोन वर्षातला (साधारण मार्च २००५ ते मार्च २००७) मधला सचिन चा खेळ हा कधी खूप चांगला तर कधी सलग अपयशी डाव असा असे. त्यात कधीकधी हा नक्की काय करतोय असा प्रश्न पडे. २००६ च्या शेवटी झालेला दक्षिण आफ्रिकेचा दौरा हे त्याचे उदाहरण. याकाळात काही वेळा सचिन अगदी संथ पणे, कसलाही उद्देश न दिसणारा खेळ करत असे. पण हाच काळ टेनिस एल्बो व इतर दुखापतींनी त्रस्त असण्याचा काळ. त्यामुळे फटके मारण्यावर बंधने आली होती. दुखापती मुळे ते पंचेस, पुल्स, हुक्स गुंडाळून ठेवलेले होते. ड्राइव्हज ही फारसे दिसत नव्हते. याउलट इकडून तिकडून 'चीकी' शॉट्स मारणारा सचिन दिसू लागला. हा सचिन बघताना फार राग येत असे. त्याचेळेस हर्षा भोगले ने ही त्याची अँग्री यंग मॅन चे रोल सोडून इतर प्रयत्न करणार्‍या अमिताभशी केली होती. "he could do it fine, but that wasn't him"

असेच चित्र पुढच्या दोन वर्षांत अनेकदा दिसले. एरव्ही सहज ज्यांची तो धुलाई करे त्या बोलर्स पुढे चीपली आउट होताना तो दिसू लागला. नेहमीची सहज हालचाल दिसण्याऐवजी क्रीज वर जखडून राहिलेला सचिन, अर्धवट फिरणारी त्याची बॅट, व लाइन हुकून बोल्ड होउन खाली वाकलेला, पराभूत सचिन हे २००७ च्या वर्ल्ड कप मधे लंकेविरूद्ध दिसलेले चित्र आधीही एक दोनदा दिसले होते. २००६ च्या द आफ्रिका सिरीज मधेही एकदा १४ रन्स काढायला त्याने ६५ बॉल्स खाल्ले. टेस्ट मधे वेग महत्त्वाचा नसतो हे खरे पण ज्यांनी तो खेळ पाहिला त्यांच्या लक्षात असेल की त्या बॅटिंग मधे नेहमीचा सचिन नव्हता. मॅच वाचवायची म्हणजे सगळे फटके म्यान करून बॉल तटवत खेळायचे असे काहीतरी विचित्र लॉजिक दिसत असे.

मार्च २००५ च्या घरच्या पाक सिरीज मधल्या चौथ्या डावातील बॅटिंग हे आणखी एक उदाहरण. १९९९ मधे पाठ दुखत असताना खेळलेल्या एक दोन मॅचेस सोडल्या तर सचिन ला आधी कधी 'शेल' मधे गेलेला पाहिला नव्हता. या मॅच मधे मोठा स्कोअर चेस करत असतना अनाकलनीय रीत्या तो अत्यंत हळू खेळू लागला. केवळ बॉल तटवणे हाच फक्त उद्देश असल्यासारखा. तसा त्याचा तो नॅचरल गेम कधीच नव्हता. या आधी टीमची अवस्था वाईट असताना सचिन ने आक्रमक खेळून चित्र पालटवले होते (चेन्नई १९९९ चे उदाहरण सर्वात फेमस आहेच). पण इथे तब्बल ९८ बॉल्स मधे त्याने फक्त १६ रन्स केले आणि शेवटी आउट झाला. अपेक्षेप्रमाणे भारत ही मॅच हरला. पण इथे अपयशापेक्षा सचिन च्या भोवती ५-६ फील्डर्स चे जाळे लावले आहे व स्पिनर (आफ्रिदी) त्याच्यावर दडपण आणतो आहे हे तोपर्यंत कधीही न दिसलेले चित्र सर्वात निराशाजनक होते.

मात्र या सगळ्याच्या अधूनमधून विशेषतः वन डे मधे त्याने काही जबरदस्त डाव खेळले. २००६ च्या पाक मधल्या वन डे सिरीज मधे दोन अतिशय चांगल्या इनिंग तो खेळला - एकदा १०० व एकदा ९५. दुखापतीमुळे तो अनेकदा बाहेर असे या काळात. व त्यामुळे अनेक मॅचेस त्याच्या "पुनरागमनाच्या" म्हणून मीडियात चर्चा होत असे. २००५ च्या मध्यावर बरेच महिने बाहेर राहिल्यावर तो ऑक्टोबर च्या लंका सिरीज मधे परत आला. आणि पहिल्या दोन्ही मॅच मधे पुन्हा जुना सचिन दिसला. त्यातले पहिल्या मॅच मधल्या ९३ मधले त्याचे शॉट्स जुन्या सचिनचीच आठवण करून देत होते. या काळातील आणखी एक चांगली इनिंग म्हणजे क्वालालंपुर ला वेस्ट इंडिज विरूद्ध मारलेले १४१. हे ही बरेच दिवस बाहेर राहिल्यानंतर संघात परल्यावर मारलेले होते. तसेच डिसेंबर २००५ मधे त्याने लंके विरूद्ध ३५ चे शतक मारून गावसकरचे रेकॉर्ड मोडले. हे शतक त्याने जवळजवळ १८ महिन्यांनंतर मारले होते (तसा मॅचेस खूप कमी खेळला तो त्या काळात).

माझ्या दृष्टीने हे शतक कायम लक्षात राहणारे आहे. मी त्याच दिवशी सकाळी पुण्यात पोहोचलो होतो. दुसर्‍या दिवशी तेथील ऑफिस मधे जायचे असल्याने दिवसभर न झोपता एकदम रात्री झोपून वेळ अॅडजस्ट करून घ्यायचा होता. दुपारी जेवल्यावर झोप येउ लागली, पण त्याचे वेळेस सचिन ची बॅटिंग जोरात होउ लागली व शतकाची चिन्हे दिसू लागली. त्यामुळे झोप वगैरे आपोआपच उडाली. हे त्याचे शतक सुंदर होते, पण यानंतर पुन्हा टेस्ट मधे त्याने बराच काळ काही विशेष केले नाही.

वन डेज मधे सुद्धा मधले काही डाव सोडले तर तसा भाकड काळच होता, तो अगदी वर्ल्ड कप २००७ मधून बाहेर पडेपर्यंत तसाच होता.

८. मार्च २००५ ते एप्रिल २००७
भाग #२

२००६ च्या शेवटी शेवटी 'सचिन संपला' अशी चर्चा सुरू झाली. हेल्मेट वर बॉल लागणे, वारंवार 'बोल्ड' होणे, संथ खेळ, म्यान केलेले फटके व एकामागोमाग एक लो स्कोअर्स हे पाहून अपरिहार्यपणे सचिन ने आता निवृत्त व्हावे असे अनेक लोक म्हणू लागले. खुद्द मुंबईत एकदा तो आउट झाल्यावर प्रेक्षकांतील एका गटाने त्याला "Boo" केल्याची चर्चा झाली.

पण सर्वात चर्चा झाली ती दोन गोष्टींची - टाइम्स ऑफ इण्डिया ने त्याच्या अपयशाबद्दल दिलेले शीर्षक "Endulkar?", आणि इयान चॅपेल ने सचिन ने निवृत्त व्हावे असा दिलेला सल्ला. यातील त्याच्या अपयशाची वर्णने बरोबर होती. पण तो खेळाडू म्हणून संपला आहे, आणि जुना सचिन पुन्हा दिसणार नाही असे लोकांनी म्हणणे याचा खूप राग येत असे. मला मुळात 'कमबॅक' करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना नेहमीच सपोर्ट करावेसे वाटते. सचिन पुन्हा यशस्वी होईल अशी आशा नेहमीच वाटायची.

पण बर्‍याच लोकांना तसे वाटत नव्हते. एक्स्पर्ट्स, जुने खेळाडू, मीडिया अनेक जण सचिन संपला हेच आळवत होते.

तेव्हा कोणालाही ही कल्पना नव्हती की सचिन या सर्वांना खोटे ठरवणार होता. पुन्हा फॉर्म मधे परतून त्याच्या कारकीर्दीतील व भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सुद्धा सर्वाधिक यशस्वी काळ अजून यायचा होता! तो पुढच्या भागात.

या काळातील कोच - मार्च २००५ पर्यंत जॉन राईट व नंतर ग्रेग चॅपेल
कॅप्टन्स - मार्च २००५ पर्यंत गांगुली आणि नंतर द्रविड
या काळात आलेले नवे खेळाडू - धोनी, रैना, उथपा, आर पी सिंग

फारएण्डा, झक्कास!! हा कमबॅक आवडला. सचिन च्या ईनिंग्ज बद्दल कधीही, कुठेही ईतकं चांगलं संकीर्तन ऐकायला / वाचायला मिळालं, की 'दिल गार्डन गार्डन हो जाता है|'

श्रीयु, १९९७-९८ चा शारजाह मधिल कोका-कोला कप च्या , दोन मँच ज्यांनी कोणी बघितल्या असतिल त्या क्रिकेट वेड्या लोकांच्या जन्माचे सार्थक झाले.
सेमि फायनल ला तुम्ही सांहितलेल्या सेम सिच्युएशन मध्ये फायनल साठी काँलिफाय व्हायचे होते जिंकण अवघड वाटत होत समोर आँस्ट्रेलिया ! शेन वॉर्न वैगेरे फुल फाँर्म मध्ये, शिवाय एकही मँच न हरता आधिच फायनल मधे पोहोचलेले, प्रचंड आत्मविश्वास व ताकतीने खेळत होते, अतिशय टिच्चुन बोलिंग करत होते, माझा साँरी आपला होउ घातलेला देव स्ट्राइक वर रनरेट हवा होता ६ का ७ चा अचानक वाळूचे वादळ आले गेम ५ का १० मिनीटांसाठी थांबवण्यात आला, ते वादळ थांबताच अचानक पुन्हा एक वादळ सुरु झाले त्या वादळाने अक्षरशः एकूण एक आँस्ट्रेलियन बाँलरच्या चिंध्या करुन कोणाला मैदानाच्या बाहेर,कोणाला पत्र्यावर फेकुन दिले स्कोर १४३ जबरदस्ती आउट, फायनल क्वालिफाय, मँच विन, हेच वादळ फायनल मध्ये ही थांबले नाही रिझल्ट सेम सिरीज विन
या दोन मँच नंतरच आपला देव शेन वॉर्न च्या स्वप्नात जाऊन घाबरउ लागला , आँफिशिअल स्टेटमेंट आहे वाँर्न च गुगल करु शकता मँच क्लिप येथे पहा
http://www.google.co.in/search?ie=ISO-8859-1&q=sachin%27s storm inning in sharjah&btnG=Search

<< त्या क्रिकेट वेड्या लोकांच्या जन्माचे सार्थक झाले.>> अगदीं खरंय. सचिनला प्रत्यक्ष खेळताना पाहून अनुभवलेला थरार त्याच्याबद्दल केंव्हांही ,कांहींही पहिलं, वाचलं कीं तितक्याच तीव्रतेने जाणवतो व मग नेमकं हेंच वाटतं.

हवी तशी बायको मिळाली, मुलांनीं नांव कमावलं, मग कधीं नाही तें आत्तांच छाती पुढे काढून
' खरंच जन्माचं सार्थक झालं !' म्हणायला माबोवर आज असं वाचलंत तरी काय ?
sachaa.JPG

आज १९९६ वर्ल्डकपमधल्या सचिनच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळीची आठवण आली.

https://www.youtube.com/watch?v=AdmlUUiMFHw

ह्या व्हिडीओमध्ये १:२० ला पहाल, तर भारत २५८ चेस करताना ११ ओव्हर्समध्ये ५४/२ होता, विच इज अबाऊट पार फॉर रनरेट, बॅड फॉर विकेट्स लॉस्ट. त्यात सचिनच्या धावा ३६ बॉलमध्ये ४५ होत्या. म्हणजे इतरांनी ३० बॉल्समध्ये ९ धावा काढल्या. हा व्हिडीओ पूर्ण पहाल, तर सचिन कसला चोपतोय ते लक्षात येईल. त्या काळात हा स्ट्राई़क रेट म्हणजे जोक नव्हता. सचिन बॅटने जे डिस्डेनफुल फटके मारतो, ते पाहून खरंतर त्याची 'दादा'गिरी लक्षात येते. तो आउट झाला, तेव्हा मी चिडून टीव्ही बंद केलेला आठवतो. पण खरेतर ही मॅच फक्त १६च रन्सनी हरलो हेच आश्चर्याचे वाटते.

ती ऑस्ट्रेलियाविरूद्धची मॅच अजूनही लक्षात आहे. "Preview of the final" अशी पेपर्स नी जाहिरात केली होती या गेम ची. प्रत्यक्षात एक संघ विरूद्ध एक खेळाडू अशा सामन्याला फारच मोठे अवास्तव रूप दिले होते. बहुधा डेमियन फ्लेमिंग ने सुरूवातीला दोन लौकर उडवले होते (जडेजा आणि सिद्धू असेल). जेव्हा इतरांना बोलिंग झेपत नव्हती तेव्हा सचिन जरा चान्स मिळेल तेव्हा स्ट्राइकवर जायला बघायचा (विंडीज विरूद्ध अ‍ॅम्ब्रोज ने साधारण अशीच सिच्युएशन केली होती, तेव्हाही). पण सचिन मारतोय तर आपण एक रन काढून त्याला स्ट्राइक द्यायची हा प्रकार आपल्या इतर बॅट्समेन लोकांना तेव्हा झेपला नाही. ऑस्ट्रेलियाने ते अवघड केले हे खरे आहे, पण इतर संघांविरूद्ध सुद्धा गांगुली, मांजरेकर, द्रविड ई. लोक तेव्हा हे करत नसत. ९६-९८ च्या सुमारास अनेकदा सचिन प्रचंड फॉर्म मधे असताना व पूर्ण बोलिंग व मॅच कंट्रोल करत असताना इतरांनी पहिल्या १५ ओव्हर्स मधले अनेक बॉल्स विशेष रन्स न करता खाल्लेले लक्षात आहेत. एकाने हाणायचे व दुसर्‍याने त्याला साथ द्यायची इतके प्लॅनिंग तेव्हा करत नसत किंवा ते प्रत्यक्षात आणू शकत नसत.

आम्ही पिंपरीमधे मित्राच्या घरी ही मॅच पाहिली होती. सचिन आउट झाल्यावर अशक्य नव्हते पण ते होणार नाही असेच वातावरण असे. इतके क्लोज जाउन हरल्याचे तेव्हा वाईट वाटले होते. मात्र का कोणास ठाउक कॉमेण्टेटर शास्त्रीला खूप शिव्या उपस्थितांनी घातल्याचे लक्षात राहिले आहे Happy

अरे वा!

"सचिन तेंडुलकर" ह्या ब्रॅण्ड चा सर्वजण पुरेपूर वापर करून घेत आहेत Happy

आज एकदम बार्बाडोसमधली ही ९२ धावांची खेळी आठवली. - https://www.youtube.com/watch?v=W8Ab2FYu9GM

१:४२ ला असलेला ऑफ ड्राईव्ह/पंच सॉल्लिड. लगेच त्यानंतर असलेला २:२० चा पंच. चांगल्या बॉल्सवर करकरीत टायमिंग. गावस्कर म्हणतो तसे, मॅजिकल स्टफ.

सचिनच्या अनेक गोष्टी भारावून टाकणाऱ्या आहेत. प्रत्येक प्रकरण वाचणं शक्य नसेल तर त्याच्या काही महत्त्वाच्या घटना इथे नमूद करतो. तुम्हाला ते वाचून आनंद मिळेल. या लिंकवर क्लिक करा...
https://www.kheliyad.com/2019/11/sachin-tendulkar-records.html

Pages